मराठी | English
पंचवीस आवृत्त्या. नऊ वर्षे. हा मैलाचा दगड गाठल्याचा आम्हांला आनंद आहे. लेखक, कलाकार, अभ्यासक आणि वाचक ह्यांच्या पाठबळाच्या जोरावर आम्ही पाय रोवून उभे राहिलो आणि हा महत्त्वाचा टप्पा गाठला. हा योगायोग नव्हे, तर नऊ वर्षांत भाषा, अभिव्यक्ती आणि भवताल ह्यांच्यात घडवलेल्या संवादाचा परिपाक आहे.
आमचा अवकाश द्वैभाषिक. आम्ही मानतो की दोन वेगवेगळ्या भाषांना जोडणारा आम्ही एक दुवा आहोत. द्वैभाषिक असणे म्हणजे फक्त सहिष्णुता किंवा सहअस्तित्वाचं निव्वळ एक रूपक नव्हे, तर भाषांच्या सहयोगातून आपण अर्थनिर्मिती कशी करतो ह्याबद्दलही आहे : कोणताही शब्द पूर्णपणे भाषांतरित होत नाही, आणि स्वतःची अशी स्वतंत्र अशी ओळख असलेल्या दोन्ही भाषांमधले अंतर ही एक अपरिहार्य बाब राहतेच. हे अंतरच आमचे अर्थनिर्मितीसाठीचे घर राहिले आहे. हाकारा । hākārāची पंचविसावी आवृत्ती ही अशा घरपणाचा आणि त्यातील सातत्याचा उत्सव आहे.
नऊ वर्षांचा मार्ग सरळसाधा नाही. तो लुंगम्यिंग लेप्चा ह्यांच्या पावसाळ्यातला सूर्य (सम्तेनच्या घरपरतीची कथा) ह्या कथेतील सम्तेनच्या प्रवासासारखा आहे : उतार-चढावरून डोंगररांगांना वळसा घालत, मुक्कामाच्या ठिकाणी काय वाढून ठेवले असेल हे माहीत नसणारा. हाकारा । hākārā सुरू होता त्या मधल्या काळात कोरोनाने आपल्याकडच्या अनेक बहुमोल गोष्टी हिरावून घेतल्या होत्या. त्या काळात, ऑनलाइन माध्यमाचे स्वरूप बदलले. हाकारा । hākārāच्या कुटुंबात लोक आले, राहिले, गेले. वैयक्तिक अहंकार, सत्ता-समीकरणं, आणि बिघडलेले नातेसंबंध ह्यांतून जमवलेलं गमवायचे प्रसंग आले. अनपेक्षित आजारपणं आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूने मानवी अस्तित्वाविषयी विचार करायला भाग पाडलं. पण नवे लोक येत राहिले. नवे विचार आले आणि कामाच्या नव्या पद्धती रुळल्या. कितीही चढउतार झाले, तरी शिल्लक राहते ती आशा. आपण परत उठून उभे राहतो — उरलं- सुरलं जे काही असतं ते गोळा करून, पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची उमेद बाळगत. पुन्हा एकदा हाक मारण्याची जिद्द. दरम्यान, कुणीतरी हाकेला ओ देतं आणि ती आपण ऐकतो, आणि परत उभे राहतो.
सोबत करून राहिलीय : हाक
हाक देणं ही मानवी नातेसंबंधांतील एक आदिम प्रेरणा आहे, आणि आमची २५वी आवृत्ती हाकेचा शोध घेते. आम्ही ‘हाक’ हा विषय मांडला, आणि त्यातील बारकावे आवृत्तीत समाविष्ट केलेल्या लेखक-कलाकारांच्या संवेदनशील आणि विचारप्रवण लेखन-कलाकृतींतून आले. म्हणून, ‘हाक’ हा शब्द ह्या आवृत्तीत सर्वत्र दरवळलेला दिसेल. ह्या अंकात, तुम्हांला एखादी हाक ऐकू येईल ती दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या परमेश्वराचा धावा करणाऱ्या भक्ती-परंपरेतील संतांच्या कवितेत. ती अवतरेल एखाद्या तत्त्वज्ञाच्या मांडणीत, ज्याचा दावा असतो की कलाकृती आधी आपल्याला खुणावते आणि मग तिचा आपण अर्थ लावतो. सिंगूरच्या वादग्रस्त शेतात भाजल्या जाणाऱ्या बटाट्यांतही हाकेचा वास येईल. १९९०च्या दशकातील कोलकात्याच्या एखाद्या पीसीओ बूथमधल्या खरखरीतून किंवा घरदार सोडून मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एखाद्या चाकरमान्याच्या तोंडून त्याच्या मातीशी बिलगलेला ‘शिमगा’ हा शब्द बाहेर पडतो, तेव्हा ती हाक तुम्हांला ऐकू येईल. लहानपणी पाठ केलेल्या घरच्या फोन-नंबरच्या डायल टोनमध्ये हाक हा शब्द जिवंत असतो. गँगटोकच्या पावसाळी शाळेच्या कॉरिडॉरमध्ये दोन मित्र चिप्सचं पाकीट वाटून खातात, तिथेही तो असतो. युरोपातल्या दिव्यांच्या खांबांवर आणि बसथांब्यांवर चिकटवलेल्या स्टिकर्समधून तो पसरलेला असतो, छोट्या कागदी तोंडांतून युद्धाच्या गोष्टी सांगत. प्रकाशित केलेली प्रत्येक रचना अशीच एक हाक आहे. दृश्य-कथन, मांडणी-शिल्प, व्यक्तिगत संस्मरण किंवा सर्जनात्मक कथन असो — कोणतीही रचना नुसती माहिती देत नाहीये. तर, प्रतिमा आणि शब्द ह्यांच्याद्वारे एखाद्या वाचकापर्यंत — रसिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत तिच्याकडे पाहण्यासाठी बोलवत आहेत.
२५व्या अंकात समाविष्ट केलेल्या साहित्याचा आणि कलाकृतींचा आढावा पेश करायचा मोह मी टाळतोय. त्याऐवजी, आम्ही अंकात जे काही जमवलंय ते वाचण्याचं आणि पाहण्याचं मी तुम्हांला आवतण देतो. वेगवेगळ्या रूपांतून, भाषांतून, भवतालांतून आलेल्या रचना ज्या ‘हाके’च्या अवकाशात येऊन मिसळतात, तो अवकाश निरखण्यासाठी मी तुम्हाला साद घालतो. ‘हाक’ ह्या संकल्पनेवर व्यक्त झालेल्या काही विचारांविषयी आणि अभिव्यक्तींविषयी थोडी चर्चा करावीशी वाटते.
ह्या अंकात नित्या पवारांच्या मध्ययुगीन भक्तिगीते : एक आर्त हाक ह्या अक्षय चौधरी ह्यांनी अनुवाद केलेल्या लेखात हाक या संकल्पनेची मांडणी प्रगल्भ आणि विचारप्रवर्तक झाली आहे. जनाबाई, कबीर, मीराबाई आणि रविदास ह्यांच्या काव्यविश्वाबद्दलची मांडणी करताना नित्या एकीकडे अभ्यासकाची चिकित्सक दृष्टी बाळगतात, तर दुसरीकडे एका सामान्य वाचकाची आस्थाही. मध्ययुगीन कालखंडातील संतांच्या काव्याची चर्चा करताना त्या प्रश्न विचारतात की ज्याला हाक दिली जाते ती व्यक्ती तिथे नसेल किंवा त्या व्यक्तीचे निश्चित स्वरूप आपल्याला माहिती नसेल, तेव्हा हाक मारणं म्हणजे नक्की काय असतं ? अशा वेळी, जणू आपल्याच मनातला प्रश्न त्या पुढे नेतात, असं वाचकाला वाटतं. त्यांचा लेख वाचताना आपल्याला जाणवतं की हाक मारण्यासाठी समोर कुणी असणं गरजेचं नाही. उलट, स्वतःला जाणवणाऱ्या स्पंदनांतूनच आपल्याला एखाद्याची हाक ऐकू येऊ शकते. त्यावेळी ती प्रतिध्वनीसारखी फिरून परत आपल्याकडे येते, आणि त्या परतण्यातून आपण काय बोलतो आणि कसं बोलतो ह्याकडं पाहण्याची आपल्याला नवी दृष्टी मिळते. नित्या म्हणतात तसं, आपण कबीरांच्या काव्याने हेलावून जाण्याइतके संवेदनशील असू तर त्यांच्या काव्यातील हाक आपल्या अंतःकरणाला स्पर्श करते. असं झाल्यावर वक्ता आणि श्रोता ह्यांच्यातला भेद मिटू लागतो. संत जनाबाईंच्या विठोबाशी असलेल्या संवादासारखी, ही हाकही कोणत्याही मध्यस्थाविना थेट आपल्यापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे, मी आणि तू, स्व आणि इतर, ह्यांच्यातील लयबद्ध, अव्याहत चालणारा प्रवाह हीच खरी अभिव्यक्ती आहे, हाच खरा अर्थ शोधण्याचा मार्ग असल्याचे आपल्याला जाणवते.
फरीझा फरीद मेमन ह्यांच्या मागे सोडलेलं ह्या कथेला भौगोलिक अंतराबरोबर भावनिक दुराव्याचीही किनार आहे. ही कथा एका अशा मुलीची आहे, जिला अगदी शब्दशः आणि अनेक स्तरांवर वारसा नाकारला गेला. ही कथा म्हणजे उत्तर न मिळणाऱ्या हाकेसारखी वाटते. कारण, कथेत ज्यांनी उत्तर द्यायला हवं होतं ते वडीलच आता नाहीत. तसंच, वडील असतानाही तिच्या हाकेला त्यांनी कधीच मनापासून उत्तर दिलं नाही अशा मुलीची ही कथा आहे. मृत्यूनंतरही आपला आवाज स्पष्ट पोहोचवण्यासाठी तयार केला जाणारा मृत्युपत्रासारखा अधिकृत दस्तऐवज कथेतील महत्वाचं साधन आहे. मात्र मृत्युपत्राच्या पलीकडे जात कथा फक्त रिकाम्या जागांमधून बोलतं. व्यक्तीची अनुपस्थितीच इथं कथन बनते, आणि हाक मारणाऱ्याच्या मनातली उलथापालथ मांडू लागते. अनेकदा न बोललेलंही बोललेल्या शब्दांइतकंच प्रभावी असतं ह्याचं भान म्हणजे ही कथा.
फरीझा ह्यांच्या कथेपेक्षा वेगळं हाक-कथन स्नेहा बिस्वास ह्यांच्या तारा आणि हळवेपणाच्या गोष्टी : मोठं होत जाण्याची कहाणी ह्या आत्मकथनातून उलगडतं. चित्ररूप आणि निवेदनात्मक अवकाश मांडणारे हे कथन स्वतःच्या स्वत्वाचा शोध घेत वेगळा भौगोलिक आणि सांस्कृतिक परीघ मांडतं. ह्या कथेतलं शहर म्हणजे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या एका रूढिप्रिय बंगाली कामगारवर्गीय कुटुंबाचं कोलकाता आहे. स्नेहा ह्यांच्या कथेतील हाका तंत्रज्ञानाच्या बदलत्या रूपांतून येतात — घराची ओळख बनलेल्या लँडलाइन नंबरमधून, पीसीओ बूथच्या जिव्हाळ्याच्या बंदिस्त जागेतून, सुरुवातीच्या मोबाईलच्या QWERTY कीपॅडमधून, आणि इंटरनेटच्या खुल्या महापुरातून. फरीझा मेमन ह्यांच्या कथेतील नायिका कोणतीच स्पष्ट हाक न मिळाल्यामुळे स्वतःमध्येच गुरफटत जाते; तर स्नेहा बिस्वास ह्यांच्या कथेतली निवेदिका कलाकार ह्या घरात सहज स्थान मिळू न शकणाऱ्या स्व-ओळखीमुळे आणि कलात्मक जगण्याने स्व-बाहेरच्या दिशेने खेचली जाते. दोघींचेही दोन्ही अनुभव तितकेच अस्सल आहेत, कारण दोघींच्या केंद्रस्थानी एक हाक आहे : असलेली किंवा नसलेली, कधी आत वळवणारी तर कधी बाहेर खेचणारी.
हाकारा । hākārāच्या पारावर आम्ही एखादा विषय घेतो; तेव्हा त्याचा वेध व्यापक सामाजिक-राजकीय संदर्भांत घेतो, तसेच व्यक्तिगत व राजकीय गुंतागुंतीच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. हाक हा विषय मांडताना आमचे प्रश्न पुढीलप्रमाणे होते : बदलत्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीत व्यक्ती किंवा समाज कशी हाक देतात ? छोट्यामोठ्या घटनांच्या हाकांनी आपल्या ‘मी’पणाची जाणीव आणि दुसऱ्यांशी असलेले संबंध कसे नव्याने घडवले आहेत ? भारताच्या अलीकडच्या राजकीय इतिहासात जमीन, विकास आणि विस्थापन ह्यांविषयी मोठ्या वादाचं प्रतीक बनलेल्या पश्चिम बंगालमधील सिंगूरच्या शेतात प्रीतम दास ह्यांचं द रोस्ट पोटॅटो पार्टी हे मांडणी शिल्प (इन्स्टॉलेशन) आपल्याला घेऊन जातं. भवतालातल्या बदलांना प्रीतम आपल्या प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून आणि वस्तू-मांडणीद्वारे प्रतिसाद देतात — भाजलेल्या बटाट्यांचा वास, शेकोटीची ऊब आणि निमंत्रणाच्या औपचारिकतेचा अभाव. प्रीतम ह्यांचं मांडणीशिल्प दाखवतं की कथन किंवा राजकारण येण्याआधीच, वास, ऊब आणि एकत्र येण्याची निःशब्द हाक लोकांना जोडायला पुरेशी असते. गायत्री स्पिवाक ह्यांच्या “भव्य कथनं स्वभावतःच एक्स्क्लुजिव्ह असतात,” ह्या विचारांना समोर ठेवून मांडलेलं प्रीतम ह्यांचं काम वैयक्तिक, विखुरलेल्या आणि प्रतिकाराच्या स्मृतींना समोर आणतं. प्रीतम ह्यांच्या मांडणीशिल्पातील ही हाक अशी आहे, जिथं समुदाय आधीच जमा झालेला नसतो, तर एकत्र येण्याची प्रक्रिया घडते आणि त्या प्रक्रियेत हाकेला कोण आणि कसं प्रतिसाद देतंय हे कळतं.
मयूर सलगर ह्यांचं दृश्य-कथन युरोपियन शहरांतील दृश्यांमधून एका शांत हाकेचा मागोवा घेतं. कुजबुज ह्या आपल्या दृश्य-कथनात मयूर ह्यांनी मांडलेली स्टिकर आर्ट आकाराने लहान आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेली असते. ती नेदरलँड्समधल्या दिव्यांच्या खांबांवर आणि दुकानांच्या काचांवर चिकटवलेली आपल्याला दिसते. युद्ध आणि सामाजिक बदल ह्यांवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया मांडणाऱ्या ह्या स्टिकर्सना मुख्य प्रवाहात नीट जागा मिळत नाही. पण, तरीही त्यांच्याकडं दुर्लक्ष करता येत नाही. मयूर ह्यांच्या कथनात सहज वाटणारी ही निरीक्षणं बदलत्या सामाजिक अवकाशाकडे पाहणारी एक सर्जनशील अभ्यासपद्धती बनतात. अधिकृत संभाषित म्हणून शहरांच्या भिंतींवरील स्टिकर्सना सामावून घेतले जात नाही, पण समाज-मानसाच्या भावना इथे कशा उमटतात हे समजून घेण्याचा एक मार्ग मयूर ह्यांच्या कथनात आपल्याला मिळतो. ह्या स्टिकर्समधून येणाऱ्या हाका अशा लोकांकडून येतात, ज्यांची नावं आपल्याला माहीत नसतात. पण, तरीही त्या भावना कुणाही अनोळखी माणसापर्यंत पोहोचू शकतात. आणि नेमकं ह्याच अनिश्चिततेमुळे आणि मोघमपणामुळे जन-कला हे आविष्कारण अर्थपूर्ण वाटते. स्टिकर्सकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला हाकेला प्रतिसाद द्यायचा का नाही, हे त्याच क्षणी ठरवावे लागतं.
अशीच सर्जनशील पद्धत थोर मराठी कवी नारायण सुर्वे ह्यांच्या घरात शिरलेल्या चोराबद्दल स्वतःचे नाटक रचतानाच्या प्रक्रियेचा मागोवा घेणाऱ्या दत्ता पाटील ह्यांच्या खिडकीतून चंद्र येतो… ह्या लेखात आपल्याला पाहायला मिळते. दत्ता ह्यांचे नाटक म्हणजे जणू चोर आणि चोरीच्या कृतीला दिलेली हाक आहे. पुढे ही कृती सर्जनशील प्रक्रियेतून समाज, व्यक्ती आणि हरवलेलं परत मिळविण्याची वेदना ह्यांवर भाष्य करणारे नाट्यरूप बनते.
ह्याच संदर्भात, मला विनय शर्मा ह्यांच्या कवितेचा इथे उल्लेख करावासा वाटतो. विनय हे एक असे कवी आणि रंगकर्मी आहेत, ज्यांच्या कामाबद्दल मला नेहमी आदर वाटत आला आहे. आमच्या २५व्या आवृत्तीत प्रकाशित केलेली द पोएम ट्री ही त्यांची कविता आम्हांला ह्या आवृत्तीत काय म्हणायचं आहे ते नेमकं पकडते, असं मला वाटतं. विनय ह्यांच्या ह्या कवितेत एक माणूस आयुष्यभर अशा एका झाडाकडे चालत राहतोय, जे झाड त्याला सतत दिसतं, पण त्यापर्यंत तो कधी पोहोचू शकत नाही. हे झाड आहे कवितेच्या सर्जनशीलतेनं भरलेलं. झाडाकडे पाहताना त्याला प्रत्येक वेळी भीती वाटते की हे झाड आता अदृश्य होईल — त्याच्या फांद्या, त्याचे खोड, त्याच्या मुळांचे अवशेष — असं सगळं उडून जाईल. पण तेवढ्यात पानपक्षी पुन्हा येतात. ते जणू एखाद्या हाकेनं येतात. पण ती हाक त्या माणसाला कधीच ऐकू येत नाही. झाडापासून त्या माणसाचं अंतर कधी कमी होत नाही, आणि ते कधी वाढतही नाही. तरी तो झाडाकडे चालतच राहतो.
हाक म्हणजे नेमकं काय ह्याचा वेध घेणारा आविष्कार म्हणजे विनय ह्यांची द पोएम ट्री ही कविता. शोधकाची हाक थांबत नाही, आणि ते झाडही हरवत नाही. शोधकाच्या हाकेला न मिळालेला प्रतिसाद हेच खरं तर त्याच्या चालत राहण्यामागची प्रेरणा ठरते. अंतर टिकून राहतं आणि त्या झाडापर्यंत पोहोचण्याची शक्यता जिवंत राहते. एखादा शब्द, एखादी कविता किंवा निर्मिती नेहमीच हाकेच्या अंतरावर असते. ती थोडी दूर असते, पण तरी ती सतत दिसत राहते आणि तिला गाठण्याचा आपला प्रयत्नही अव्याहत सुरू असतो. स्वतःशी आणि जगाशी संवाद साधणाऱ्या या हाकांशी आपलं नातं असंच खोल, गुंतागुंतीचं आणि टिकून राहणारं असतं. ह्यालाच कदाचित सर्जनशील जीवन म्हणतात. आणि ते असंच असतं.
पंचविसाव्या अंकाचा हा टप्पा गाठताना, आमच्या हाकांना कोणता प्रतिसाद परत येईल ह्याची खात्री नसतानाही हाक देणारं आपलं काम माझ्याकडे विश्वासानं सोपवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला कृतज्ञ वाटतं. गेली नऊ वर्षे सुरू असणाऱ्या आमच्या हाका तुम्हांला ऐकू आल्या, आणि ह्यापुढेही त्या ऐकू येतील, अशी मला आशा आहे. हाकारा । hākārāच्या पंचविसाव्या आवृत्तीसाठी टीम निःस्वार्थीपणे एकत्र आली आणि संपूर्ण प्रवासात एकमेकांसोबत राहिली. ह्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. पल्लवी सिंह, मयूर सलगर, सत्या गुम्मुलुरी, अनघा मांडवकर, सोहनी हर्षे, सई पवार, गायत्री लेले आणि प्रिया साठे ह्यांच्या सोबतीनेच हा २५व्या अंकाचा प्रवास शक्य झाला.
प्रतिमा-सौजन्य: Obayya Puttur for हाकारा । hākārā
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
