भक्ती-सुफी गीते माझ्या आयुष्याचा पदवी-शिक्षणापासून एक भाग राहिली आहेत. किंबहुना, त्याआधीपासूनच तशी ती राहिली असावीत, पण मी त्यांची जाणीवपूर्वक दखल या काळात घेऊ लागले. पदव्युत्तर शिक्षणादरम्यानही मी या क्षेत्राचा अकादमिक पातळीवर अभ्यास पुढे सुरू ठेवला. परंतु भक्ती-सूफी विश्वाचा खरा अर्थ आणि त्यातील सखोलता यांची उकल मला कोविड-१९ महामारीच्या काळात झाली, तीही विशेषतः तेराव्या-चौदाव्या शतकातील मराठी संत-कवयित्री जनाबाई यांच्या लेखनातून. यापूर्वी माझ्यासाठी भक्ती ही ‘स्व’चा शोध घेण्याची एक प्रक्रिया होती. परंतु मी पीएच.डी.च्या सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच, कोविडच्या महामारीमुळे आलेल्या बंधनांतून आणि आपण सर्वजणच एकान्तात ढकललो गेलो. आणि इतरांच्या भौतिक सहवासापासून तुटून देखील गेलो होतो. या दरम्यान माझा भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भक्ती-सुफी परंपरेतील समुदाय घडवण्याची ताकद मला उमगू लागली. खरेतर अशा अर्थाचे उल्लेख अनेक अभ्यासकांकडूनही झाले आहेत.
मी माझी चिंता कमी करण्यासाठी, तसेच जगभर पसरलेल्या गोंधळाचा आणि वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथींचा अर्थ लावण्यासाठी रोजनिशी लिहायला सुरुवात केली. कधी मी स्वतःलाच ‘प्रिय नित्या’ असे संबोधून लिहायचे; कधी एखाद्या व्यक्तीला ‘प्रिय क्ष’ म्हणत संवाद साधायचे, तर कधी माझ्या रोजनिशीलाच उद्देशून लिहायचे. पण अनेकदा असे वाटायचे की, हे लेखन प्रत्यक्षात मी विश्वालाच उद्देशून करत आहे. आजच्या युगात भ्रमणध्वनीमुळे आपण सगळेच सातत्याने संपर्कात असल्याचा एक भास निर्माण होतो; अशा वेळी परिचित पण अनुपलब्ध, तर कधी अपरिचितांना उद्देशून लिहिण्याच्या कृतीने माझे मन, आत्मा आणि शरीर शांत होत असे. त्या काळात लेखनच माझ्यासाठी हाक — बोलावणे, एक आर्त साद, एक आवाहन — बनले; मात्र त्या हाकेचा प्राप्तकर्ता निश्चित नव्हता.
हा निबंध महामारीच्या काळात अनुपस्थित व्यक्तींना लिहिण्याच्या माझ्या अनुभवाचे सैद्धांतिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. भक्तिगीते अशा प्रकारच्या शोधासाठी अत्यंत फलनक्षम क्षेत्र आहे, कारण अनुपस्थिती-उपस्थिती, आस-आपलेपणा, विरह-संयोग हे विरोधाभास त्यात अंतर्भूत आहेत. म्हणूनच जनाबाई, मीराबाई, कबीर आणि रविदास यांच्या निवडक अभंगांच्या अभ्यासातून भक्तीगीते ही एक हाक आहेत असा मी विचार मांडत आहे. ही हाक बहुधा देवाला तर कधीकधी देवाच्या माध्यमातून स्वतःलाच, कधी निर्जीव वस्तूंना, तर कधी एखाद्या समुदायाला उद्देशून असते . आणि या गीतांचे सामर्थ्य ‘संबोधन’ कोणाला किंवा कशाला उद्देशून आहे यांच्या प्रवाही आणि लवचिक स्वरूपातच दडलेली आहे.
मुळात ‘संबोधन’ म्हणजे एखाद्या अनुपस्थित व्यक्तीला किंवा तत्काळ प्रतिसाद देऊ न शकणाऱ्या घटकाला केलेले थेट संबोधन होय. संबोधिताची अनुपस्थिती संबोधकाला एक विशिष्ट स्वातंत्र्य देते. विशेषतः भक्तीगीते हाक-प्रत्युत्तर (call and response) या पद्धतीने, तसेच संबोधन-स्वाक्षरी या आकृतिबंधात घडलेली दिसतात. त्यामुळे ‘स्व’ आणि ‘पर’ यामधील अंतर व वेगळेपण नष्ट करण्याऐवजी हाक त्या अंतरातच वसते आणि एक संवादात्मक देवाणघेवाण घडवते. इथे, भक्तीच्या अवकाशात, हाक केवळ भक्तीभाव व्यक्त करत नाही; तर ती ‘पर’कडे पोहोचण्याची अशी इच्छा आहे जी एकाच वेळी आत्मीय आणि अनिश्चित अशा आग्रहाने भरलेली असते.
हा निबंध ‘हाक’ ही संकल्पना मध्ययुगीन काळातील उपरोक्त संतांच्या काव्यरचनांमध्ये निरनिराळ्या रूपांत कशी उमटते, याचा मागोवा घेतो. तसेच, अपॉस्ट्रोफी ही एक सर्जनशील पद्धत म्हणून कशी आकार घेत जाते, याचाही विचार करतो. ही पद्धत सामाजिक आणि अस्तित्वाशी संबंधित बदलांच्या क्षणी, व्यक्ती आणि समुदाय यांना नव्याने समजून घेण्याच्या शक्यता निर्माण करते. कारण यात संबोधित केलेल्या व्यक्तींची ओळख प्रवाही आणि सतत बदलत राहते — कधी ती ईश्वरी, कधी मानवी, कधी सामूहिक तर कधी अंतर्मनाशी संबंधित असते. मी शेवटी मला समांतर आणि एक आधुनिक उदाहरण म्हणून डियर तुकोबा या मराठी पुस्तकाची चर्चा करणार आहे. सर्वप्रथम, माझ्या स्वतःच्या आर्त सादेशी साधर्म्य असलेल्या, एका निसटत्या ‘पर’ला जनाबाईंनी दिलेल्या हाकेचा विचार करूया.
‘पर’चे प्रतिबिंब आणि ‘स्व’ उलगडणे
एकलीच गाता, दुजा साद उमटता
कोण तुझे बरोबरी, साद देतो निरंतरी
(जनाबाई, अभंग क्र. २५६, संत जनाबाई.)
जनाबाई लिखित ह्या ओळींमध्ये हाक अप्रत्यक्ष स्वरूपात समोर येते : येथे स्पष्टपणे कोणाला तरी उद्देशून हाक दिली आहे असे दिसून येत नाही. परंतु ‘साद’ असल्याने हाक कुठेतरी दिली गेली असणार, असे सूचित होते. येथे उमटणारा एकटा आवाजही खऱ्या अर्थाने कधीच एकाकी नसतो — या अनुनादाच्या अनुभूतीमुळेच कदाचित महामारीच्या काळात मी जनाबाईंच्या अभंगांने इतकी भारावून गेले की पुढे मी त्यांच्या परंपरेवर पीएच.डी.-प्रबंध लिहिला. जनाबाई या महाराष्ट्रातील तेराव्या-चौदाव्या शतकातील स्त्री-संत होत्या. त्यांच्याशी जोडल्या जाणाऱ्या काव्यपरंपरेनुसार तसेच त्यांच्या संतचरित्रलेखनानुसार, त्या नामदेव आणि कुटुंबियांची दासी (सेविका, शिष्या) म्हणून राहत होत्या. जनाबाईंच्या काव्यात घरगुती प्रतिमा विपुल प्रमाणात आढळतात, ज्यात त्या दैनंदिन घरकामातील कष्टांना भावपूर्ण अभंगांमध्ये रूपांतरित करतात. परंपरेनुसार, जनाबाई लहानपणापासूनच अनाथ होत्या आणि नामदेवांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेतले. त्यामुळे जनाबाईंनी नामदेवांच्या कुटुंबालाच आपले कुटुंब मानले. जनाबाई त्यांच्या अनेक अभंगांमध्ये घरातील दैनंदिन कामे करताना दिसतात, आणि अशा कामांत त्यांचा आराध्य दैवत विठ्ठल—पंढरपूरचा देव ज्याच्यावर त्यांची अखंड भक्ती आहे — त्यांना मदत करत असल्याचे चित्र उभे राहते. दुसरीकडे, अनेक अभंगांमध्ये त्या ‘आई विठाबाई’, ‘वडील विठोबा’, किंवा ‘विठ्या’ असे संबोधून त्याला लवकर भेटायला येण्याची हाक देतात.
त्यांच्या बर्याच अभंगांचा अर्थ एकाकी, अनाथ, सोडून दिलेल्या बालिकेची देवाला केलेली हाक असा लावता येतो; विशेषत: या अभंगाला संबोधित व्यक्तीची निसटती प्रतिमा वेगळेपण देते. सुरुवातीला या ओळींची रचना अगदी सरळसोप्या बांधणीची वाटते — एक स्वर उमटतो, आणि दुसरा प्रतिसाद देतो. मात्र, दुसरी ओळ या स्पष्टतेला ढवळून काढते आणि दृश्याला प्रश्नात रूपांतरित करते. गाणाऱ्या व्यक्तीला नेमके कोण साथ देत आहे? आणि हा हाक-प्रतिसादाचा संवाद दोन जणांमध्ये घडतो आहे की तिघांमध्ये : प्रश्न नेमके कोण विचारत आहे? हा अभंग याचे थेट उत्तर राखून ठेवतो; किंवा त्याऐवजी दुसरीकडे विस्थापित करतो.
“खूण कळली नामदेवा, विठ्ठल श्रोता जनीच्या भावां ।”
(जनाबाई, अभंग क्र. २५६, संत जनाबाई .)
ह्या ओळीमध्ये नामदेवांनी जनीच्या गाण्याला विठ्ठलाने प्रतिसाद देताना पाहिले किंवा ऐकले, असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. त्याऐवजी, नामदेवांनी दखल घेतल्याचे अप्रत्यक्षरीत्या दाखवल्याचे दिसते. याशिवाय, पहिल्या दोन ओळींमध्ये प्रतिसाद किंवा प्रतिसाद देणे यावर भर दिला असताना, नामदेवांच्या दृष्टीने महत्त्व ऐकण्यावर—म्हणजे ‘श्रोता’ — केंद्रित होतो. त्यामुळे वाचक किंवा श्रोता विचारात पडतो की प्रतिसाद देणारा आवाज नेमका कोणता आहे ? तो खरोखर विठ्ठलाचा प्रतिसाद आहे का? की जनीच्या गाण्याला नामदेवांनी दिलेला प्रतिसाद आपण विठ्ठलाचा प्रतिसाद म्हणून वाचतो? की ‘प्रतिसाद’ हा तिच्या स्वतःच्या गाण्यातूनच उमटणारा — एक प्रतिध्वनी आहे, ज्याला नंतर कुणीतरी अर्थ देतो, नाव देतो किंवा समजून घेतो ?
याचसारख्या शब्दरचनेतील दुसरा अभंग ही संदिग्धता आणखी पुढे नेते, कारण ती ‘साद’ या शब्दाऐवजी ‘शब्द’ हा शब्द वापरते — ज्यामुळे रचनेत निरंत अनुनाद जागृत होतो.
“एकलीच गाणे गाशी, दुजा शब्द उमटे पाशी
कोण गं तुझ्याबरोबरी, गाणे गाती निरंतरी ”
(जनाबाई, अभंग क्र. २२१, संत जनाबाई. )
येथे प्रतिसाद हा एखादा, ठरवलेला वेगळा आवाज राहत नाही, तर तो एका असीम ‘शब्दा’त अनाहत नादासारखा रूपांतरित होतो. जसे की भाषाच जणू खोल भावनिक आणि शारीरिक वेदनेला प्रतिसाद बनून उभी राहते. मागील अभंगाप्रमाणेच, या ओळींमध्येही प्रतिसाद देणाऱ्याला नाव देणे टाळलेले आहे. त्याऐवजी, ही ओळ अचानक जनीच्या आई-वडिलांना पांडुरंग आणि रखुमाई म्हणून संबोधते. ह्या टाळाटाळीच्या चपळ बदलातून, जनीच्या अभंगांची ओळख दैवी वंशपरंपरेशी जोडते. म्हणूनच, जनाबाईंची ‘हाक’ दैवी, बाह्यरूपातील स्व, ऐकणारा व अर्थ लावणारा समुदाय, किंवा वक्त्याच्या माध्यमातून प्रतिध्वनी निर्माण करणारी भाषा स्वतःच्या संरचनेद्वारे संबोधित व्यक्तीच्या बाबतीत अनेक शक्यता निर्माण करते. या संदर्भात, अपॉस्ट्रोफी कोणत्याही ठराविक संवादकाची आवश्यकता न ठेवता एक संवादात्मक अवकाश निर्माण करते. ‘एकट्याने गाणे’ ही कृती हाक आणि साद यांच्यातील नात्यात रूपांतरित होते, जिथे ‘स्व’ आणि ‘पर’ हे हाक देण्याच्या कृतीतूनच घडत राहतात — ते स्थिर किंवा निश्चित राहत नाहीत.
जनाबाईंची रहस्यमय ‘साद’ याचा एक विलक्षण प्रतिध्वनी कबीरांच्या काव्यात ऐकू येतो, जिथे त्यांच्या रामाला केलेल्या संबोधनामुळे त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा उलगडा होतो. कबीरांच्या नावावर प्रचलित असलेल्या दोह्यांनुसार आणि त्यांच्याविषयीच्या चरित्रलेखनानुसार, ते पंधराव्या शतकात वाराणसी येथे एका साध्या विणकर कुटुंबात जन्मले. त्यांच्या गीतांत हिंदू-मुस्लिम परंपरांचे समन्वयरूप जग उभे राहते; जिथे कठोर विधी, धर्मग्रंथाचे बंधन आणि पुरोहितांची मध्यस्थी नाकारून थेट निर्मळ आध्यात्मिक सत्याला महत्त्व दिले गेले आहे. त्यांच्या गीतांनी जातिभेद, मूर्तिपूजा आणि अवडंबरयुक्त धर्मशीलता यांना आवाहन दिले, साधू-फकिरांना निर्गुण भक्तीचा मार्ग अनुसरण्याचा आग्रह केला आणि देव सर्वांना सहज उपलब्ध व खुला आहे, अशी मांडणी पुढे आणली. कबीरांच्या रचेनेतील बेधडक व थेट शैली, मातीशी जोडलेली दैनंदिन रूपके (भांडी, नद्या, हातमागाचे ठिकाण) आणि सखोल मर्मज्ञान यांचा संगम साधत, वाचक/श्रोत्यांना कोड्यात टाकते.
संबोधक आणि संबोधित यांतील भेद धूसर करणाऱ्या कबीरांच्या पुढील दोहयाचा विचार करूया :
“राम, मला सांग, माझे काय होईल?
…
शिवाच्या नगरीत मी व्यर्थ केलेले आयुष्य, माझी वेळ आलीच की मगहरला गेलो.
…
काशी, मगहर : दोन्ही सारखेच भासतात
…
आणि कबीर ? तो आधीच ‘मृत’ आहे
तो रामासोबत जीवनाचा आनंद घेत आहे”
(हॉले आणि जुर्गेन्समायर, पृ. ५३. अनुवाद नित्या पवार)
कबीरांची ही रचना, जनीच्या रचनेतील अस्पष्टपणाच्या उलट जात प्रारंभीच रामाला केलेल्या थेट संबोधनाने सुरू होते. मात्र “राम, मला सांग, माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी, रचनेचा सूर बदलून या प्रश्नामागील पार्श्वभूमी देते. अर्थात कवी हा प्रश्न का विचारतो आहे, हे सांगते. कबीरांनी पवित्र काशी नगर सोडून साध्याशा मगहर येथे प्रस्थान केले. तिथेच त्यांनी देहत्याग केला असेही मानले जाते. याचा संदर्भ देत, कबीर धार्मिक संरचनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. काशी ते मगहर ही मुक्ती आणि अमुक्ती यांच्या परस्परविरोधी अर्थांनी ओतप्रोत स्थळांमधला, कबीरांचा हा प्रवास परंपरागत द्वैतांची केलेली एक जाणीवपूर्वक मोडतोड ठरतो. पुढे ‘काशी, मगहर : दोन्ही एकसारखेच वाटतात’ या विधानाने हा अर्थ अधिक दृढ होतो — जसे राम आणि कबीर.
द्वितीय निवेदन संवादात्मक स्वरूपातून तृतीय निवेदनातील ठाम विधानाकडे — ‘आणि कबीर ? तो आधीच मृत आहे’ — असा बदल करून कबीर यांची ओळ आणि कबीर, संबोधित आणि संबोधक यांमधील भिन्नता अस्थिर करते. जर कबीर आधीच ‘मृत’ असतील, तर मग बोलत कोण आहे? आणि कोणाशी ? ह्या बदलामुळे देवत्वाला बाह्य अधिकार मानणाऱ्या संकल्पनात्मक चौकटींची कमकुवतता समोर येते. या ठिकाणी संबोधन, उकल होण्याची रीत बनते — जीवन आणि मृत्यू, पवित्र आणि अपवित्र, इथे आणि इतरत्र यांमधील भेद विरघळवणारी. रामाला संबोधित केले जाते, तरीही गीताचा केंद्रबिंदू कबीर यांच्या ध्यानावर आणि चिंतनावर राहतो; त्यामुळे संबोधन, ‘हाक’, आणि गीत सर्वव्यापी (immanence)जाणिवेमध्ये गुंडाळली जाते : “तो रामासोबत जीवनाचा आनंद घेत आहे.”
या अर्थाने, संबोधन सहसा गृहीत धरत असलेले अंतर किंवा भिन्नता ढासळते. कबीर यांची ‘हाक’, दैवी आणि भक्त, तसेच संबोधक आणि संबोधित यांच्यातील विलगीकरण जरी भासमान असले, तरी आत्मसाक्षात्कारासाठी ते आवश्यक ठरते असे दाखवून देते. ही रचना कबीरांच्या विस्तृत वाणीसंग्रहामधील ‘हाके’चे केवळ एक उदाहरण आहे — विशेषतः रामाला दिलेली एक ‘हाक’. लिंडा हेस यांनी कबीर यांच्या रचनेत “कहे कबीर, सुनो” अशा द्वंद्वात्मक (dialectic) शैलीचा वापर करून श्रोते किंवा वाचकांवर जणू एक प्रकारचा ‘प्रहार’ केला जातो असे दाखवून दिले आहे. त्यांच्या मते, ही रचना थेट ‘हाक’ देत, वाचकांच्या अंतर्मनात काहीतरी भंग करण्यासाठी लिहिली आहे. त्यांच्या अनेक गीतांमध्ये फकीर, साधू, पंडित, काजी किंवा मित्र यांना थेट संबोधित केलेले दिसते (हेस, २००२).
जनाबाई आणि कबीर यांच्या हाकेत एक समान धागा दिसतो : गीत रचणे ही क्रिया स्वतःच एक हाक देण्याची क्रिया आहे, जी ‘स्व’ आणि ‘पर’ यांतील सीमारेषा ढवळून काढते. जनाबाईंचा ‘पर’ अंधुक राहतो; तर कबीरांचा संबोधित स्पष्ट नामनिर्देशनाने उलगडत असला तरी, तो ‘स्व’ची उकल करण्याचे साधन बनतो. दोन्हीच्या बाबतींत ‘हाक’ ही केवळ अवकाशीय (spatial) किंवा कालिक (temporal) अंतर किंवा फरक ओलांडणारी हाक राहत नाही; ती एक सर्जनशील अवकाश ठरते, जिथे ‘स्व’ हे संबंधांतून घडत जाते. म्हणूनच, देव आणि भक्त, वक्ता आणि श्रोता, ‘स्व’ आणि ‘पर’, तसेच भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्यात खरोखर वेगळेपणा आहे, ही आभासी कल्पना कोलमडून पडते. अशी मांडणी आपल्याला अशा संत- कवींकडे घेऊन जाते. ज्यांच्यासाठी ‘हाक’ देणे ही संभाव्य भविष्यांची कल्पना करणे, त्यांचे पूर्वानुमान करणे आणि कधीकधी त्यांतच वावरण्याचे एक माध्यम ठरते. उदाहरणार्थ मीराबाई, ज्या आपल्या प्रियकराच्या आगमनाची अपेक्षा करतात. आणि रविदास, जे एका न्याय्य शहराची कल्पना करतात.
भविष्याच्या (भविष्यांच्या) कल्पना आणि पूर्वानुमान करणे
मीराबाईंची कविता/गीते जनमानसाइतकेच अकादमिक क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांना बहुधा प्रेमविरहाने झालेल्या व्याकुळतेचे साररूप मानले जाते. अनेक हिंदी चित्रपट गीतांमध्ये त्यांच्या नावावर प्रचलित असलेल्या कवितांमधील ओळी वापरल्या गेल्या आहेत. प्रचलित कथांनुसार, सोळाव्या शतकातील मेवाडची राजपूत राजकुमारी मीराबाई यांनी बालवयातच कृष्णाला आपला पती मानले. परंतु, त्यांचे लग्न लवकरच राणाशी लावून दिले गेले. राणाच्या मृत्यूपश्चात, मीराबाईंनी ऐहिक सुखांचा त्याग केला आणि त्या साधू-संतांच्या सहवासात हर्षोन्मादाने नृत्य करत कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या, असे सांगितले जाते. त्यांच्या गीतांमध्ये सावळ्या गिरीधराविषयीची अखंड, उत्कट आणि शृंगारिक विरहाची ओढ जाणवते. उदाहरणार्थ, पुढील ओळींमध्ये ती आपल्याला प्रियकराच्या आगमनाची तयारी करताना दिसते :
“ये रे मेघा, स्वतःला पाण्याने भरून ये
अगं सखी, पावसाचे थेंब पडत आहेत
…
माझा प्रियकर आज माझ्या घरी येईल
…
आणि तुम्ही, सख्या हो, त्याच्या स्वागताची गीते गाल
मीरा म्हणते : हे हरि, हे अविनाशी
ज्यांना तुझा सहवास लाभतो ते खरोखर भाग्यवान”
(अल्स्टन, पृ. ९५.अनुवाद नित्या पवार)
ही कविता विशेषतः महत्त्वाची ठरते, कारण यातील हाक मेघ, सखी, आणि अखेरीस हरि–मीरांचा गिरीधर, त्यांचा प्रियकर, अशा विविध संबोधित घटकांमध्ये उलगडत जाते. प्रत्येक आवाहन मीरांच्या हाकेला एक नवा स्तर जोडते, जिथे मेघांसारखे नैसर्गिक घटकही केवळ रूपक म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष सहभागी म्हणून प्रियकराच्या प्रतीक्षेत केलेल्या भावनिक आणि वैयक्तिक आर्त सादेत सामील होतात. “ये मेघा, स्वतःला पाण्याने भरून ये” या ओळीने कविता सुरू होताच हाक ही मानवी संवादकांच्या पलीकडे जाणारी संबोधनरचना असल्याचे लक्षात येते. येथे नैसर्गिक, मानवेतर जग हे संबोधकाच्या म्हणजेच वक्त्याच्या आत्मनिष्ठतेचे आणि इच्छेचे विस्ताररूप म्हणून समोर येते.
त्याच वेळी सहचराला केलेले संबोधनही बहुपदरी आहे. एका जागी ते गिरीधर आणि प्रियकर यांना संबोधित आहे, तर दुसऱ्या जागी ते सखीला, मैत्रिणीला, सोबतीणीला म्हणजेच परंपरेनुसार अशा स्त्रीला, जी या मिलनाची साक्षीदार आहे किंवा जी साक्षीदार होईल अशी संबोधित आहे. जनाबाईंच्या अभंगांत जे अव्यक्तपणे सूचित केलेले आहे, ते मीराबाईंच्या सखी-संबोधनातून जाहीरपणे उलगडते. येथे हाक मीराबाई आणि त्यांच्या सोबतींमध्ये दोलायमान राहते आणि प्रतीक्षेची भावना एका सामायिक अवकाशात पुनर्वितरित होते. या वितरणामुळे विरह ही केवळ वैयक्तिक भावना न राहता सामुदायिक अनुभव बनते, जी सहभागातून आणि पुनःपुन्हा केलेल्या सामायिक आवाहनांद्वारे टिकून राहते. म्हणूनच हे संबोधन दैवी व सामाजिक संदर्भाना वैयक्तिक विरहाच्या नातेसंबंधांत गुंफत यांदरम्यान अस्तित्वात राहते.
शेवटी ही कविता प्रियकराला दिलेली हाक या तिच्या अंतिम टप्प्यावर पोहोचते. अगोदरच्या “आज माझा प्रियकर घरी येणार आहे” या ओळीच्या पार्श्वभूमीवर तिच्या प्रियकराला, हरीला केलेले हे अंतिम व थेट आवाहन त्याच्या ‘प्राप्ती’ची शक्यता उभी करते. या अर्थाने, कविता शेवटी आगमन सूचित करत नाही; ती त्या आगमनाची कल्पना करण्याची संभाव्यता निर्माण करते. दुसऱ्या शब्दांत, येथे ‘हाक’ अजून न आलेल्या उपस्थितीला साकार करणारी, या अर्थाने भविष्याभिमुख आहे. ती आश्वासित आहे, पण त्याची तत्काळ पूर्तता टाळली गेली आहे. नेमका हाच विलंब मीराबाईंच्या कवितेत ‘हाके’चे सार टिकवून ठेवतो. घर सजवले जाते, गाण्यांची कल्पना केली जाते आणि सख्या एकत्र जमतात, हे प्रियकर प्रत्यक्ष आला म्हणून नव्हे, तर हाक त्याच्या आगमनाची अपेक्षा ठामपणे व्यक्त करते म्हणून. मीराबाईंचे गीत, विरहाच्या क्षोभाने प्रेमिकेच्या हृदयातील अनुपस्थिती आणि उपस्थिती यांतील अंतर जपून ठेवते. या अंतरातच आणि त्याच्या माध्यमातूनच हाक अनुपस्थितीचे निराकरण करत नाही, उलट तिला अर्थनिर्मितिक्षम स्थिती म्हणून खुली ठेवते. परिणामी त्यातून जे उदयास येते, तो केवळ भक्तिभाव नसून, ते एका प्रकारे वास्तवाचे विशिष्ट स्वरूप आहे. अशारीतीने, प्रियकराची अनुपस्थिती ही भरून काढण्याची उणीव न राहता, या विस्तृत आणि सहभागी अस्तित्वाच्या पद्धतीला शक्य करणारी मूलभूत अट ठरते. संबोधन हे संबोधिताच्या अनुपस्थितीमुळे निष्प्रभ होत नाही, उलट त्याच अनुपस्थितीमुळे ते सर्जनशीलतेने कार्य करते आणि हीच वाट आपल्याला रविदासांच्या कल्पित शहराला केलेल्या हाकेकडे आणते.
रविदास हे पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात ऐतिहासिकदृष्ट्या अस्पृश्य म्हणून कलंकित मानल्या गेलेल्या चांभार या जातीत जन्माला आलेले संतकवी होते. उत्तर भारतात त्यांना एक महत्त्वपूर्ण दलित संत म्हणून मान दिला जातो. त्यांच्या रचनांमध्ये चामड्याचे संकलन आणि रंगकाम या त्यांच्या व्यवसायाशी निगडित कामांचा संदर्भ मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यांच्या कवितांमधील स्वाक्षरी किंवा ओळखचिन्हही ‘रैदास खलास चमारा’ असे आहे — म्हणजेच ‘शुद्ध’, ‘मुक्त’ किंवा ‘खरा’ चमार. त्यांच्या एका कवितेत ते ‘बेगमपुरा’ या स्वप्ननगराची कल्पना करतात — जिथे जातीय श्रेणीभेद नाही, दुःख नाही, कर नाहीत, आणि कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन नाही. मीराबाई ज्या प्रकारे प्रियकराच्या आगमनाची तयारी करतात, त्याउलट रविदास आपल्या न्याय्य नगराच्या कल्पनेचा दावा करण्यासाठी आधीच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रविदासांच्या कवितेत हाकेमार्फत संबोधित व्यक्ती—भाऊ—याचे नाव घेऊन, आवाहन करून, त्याला या बाहेरील सामाजिक व राजकीय दृष्टीत एक सहभागी म्हणून उभे केले जाते.
“दुःखरहित नावाचे ते राजस राज्य :
त्याला ‘बेगमपुरा’ म्हणतात — दुःखरहित नगरी
जिथे कर नाहीत, चिंता नाही, मालकीची बंधने नाहीत
अन्याय, भय, दहशत किंवा यातना काहीच नाही
अरे भाऊ, मी ते माझे म्हणून स्वीकारायला आलो आहे —
माझे दूरचे घर, जिथे सर्व काही योग्य आहे.”
(हॉले आणि जुर्गेन्समायर, पृ. ३२. अनुवाद: प्रमोद मुजुमदार)
कित्येक कवितांमध्ये रविदास एखाद्या फेरीवाल्याला संबोधन करतात, आणि काही ठिकाणी ते स्वतःलाच ‘फेरीवाला’ म्हणून संबोधतात. त्यामुळे, नगराची कल्पना करणे किंवा एका समन्यायी कल्पित नगराला हाक देणे, हे कायमच्या आणि व्यवस्थात्मक बेघरपणाचे निराकरण म्हणून वाचली जाऊ शकते. रविदासांचे बेगमपुराने पुढे जाऊन जातिव्यवस्थेविरुद्धच्या क्रांतीसाठीचे एक प्रतीक आणि हाक असे दुहेरी रूप धारण केले आहे, जे मूलगामी समतेवर आधारलेल्या युटोपियाकडे घेऊन जाते. गेल ऑम्वेट यांचे सीकिंग बेगमपुरा (२००८) हे त्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. वरील ओळींमध्ये या युटोपियन शहराची सामूहिक प्रतिपादनातून कल्पना आणि त्याविषयीचा दावा केला आहे. यातील पहिला संकेत “ते त्याला ‘राणीचे नगर’ म्हणतात” या ओळीत दिसतो. जिथे ‘ते’ हा सामूहिक आवाज शहराच्या अस्तित्वाला आकार देतो. ‘ते’ जेव्हा या शहराचा उल्लेख करतात, आवाहन करतात आणि सहभागी करून घेतात तेव्हाच हे नगर अस्तित्वात येते.
म्हणूनच या अवकाशाच्या घडणीमध्ये, “अरे माझ्या भावांनो” हे संबोधनात्मक वळण निर्णायक भूमिका बजावते. येथे ‘भाऊ’ हा केवळ श्रोता नसून, या नगराची कल्पना आणि दावा करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी ठरतो. हे आप्तसंबंध दर्शवणारे आणि समतावादी संबोधन, केवळ दूरच्या कल्पलोक-स्थानाप्रमाणे नव्हे, तर जिवंत मानवी समुदायाच्या रूपात बेगमपुराच्या सामाजिक रचनेचे प्रतिबिंब आहे. हे संबोधन संबोधक आणि संबोधित यांच्यातील अंतर आणि भेद मिटवते. आणि भाषेमध्येच त्या शहराने वचन दिलेल्या श्रेणीभेदाच्या लयास जाण्याची प्रक्रिया साकार करते. अशा प्रकारे, ‘भाऊ’ आणि ‘नगर’ यांना दिलेली हाक ही एक सामाजिक कृती ठरते. ती न्यायावर आधारलेल्या, सामाजिक दृष्टीला ओळखणाऱ्या आणि त्यामध्ये वावरण्यास सक्षम असणाऱ्या समुदायास एकत्रित आणते. ही जिवंत अनुभव आणि कल्पित शक्यता यांतील दरी भरून काढणारी सामाजिक-राजकीय हाक जातविरोधी चळवळींसाठी प्रभावी ठरली आहे.
याशिवाय, “मी ते माझे म्हणून घ्यायला आलो आहे” ही ओळ दोन अर्थांनी ऊर्जा देते. ती एका बाजूला आगमन सूचित करते, तर दुसऱ्या बाजूला आकांक्षाही व्यक्त करते. जिथे मीराबाई आगमनाची शक्यता मांडतात, तिथे रविदास आधीच त्या शक्यतेत वावरत आहेत आणि तिला स्वतःचे मानत आहेत. अर्थात, ही हाक घोषणा आणि आमंत्रण दोन्ही आहे. ती भविष्यासोबतचे वैयक्तिक नाते अधोरेखित करते. आणि इतरांनाही ते ओळखून त्यात सहभागी होण्याचे आवाहन करते. “माझे लांबचे घर” हा विरोधाभासी शब्दप्रयोग या दुहेरी अर्थाला अधिक दृढ करतो. बेगमपुरा एकाच वेळी ‘माझे’ आणि ‘दूरचे’ असे स्थान आहे, ज्यापर्यंत पोहोचण्यासाठी हाक — एक आवाहन — हा त्यांना जोडणारा सेतू ठरतो. या रचनेची भाषा उपस्थिती-अनुपस्थिती, मालकी-अभाव या शाश्वत विरोधाभासांना भक्तिकाव्यात एकत्र धरून ठेवते. अशा रीतीने, हे कल्पित नगर हाक देण्याच्या कृतीमधूनच आणि तिच्यामुळेच वसाहत करण्यायोग्य ठरते.
समारोप
प्रस्तुत निबंधात केलेल्या उपरोक्त विवेचनाप्रमाणे, ‘हाक’ ही काहीवेळा एकमेकांशी गुंतलेल्या स्वरूपांत तर अनेकवेळा नानाविध रूपांत प्रकट होते. जनाबाईंच्या कवितेत ती एक निसटणारा प्रतिध्वनी म्हणून दिसते — जिथे आपल्याला केवळ संबोधकाची ओळख आहे. पण प्रतिसाद देणाऱ्याची खरी ओळख अनिर्धारित राहते. कबीरांकडे ती थेट संबोधनाच्या रूपात येते, परंतु अखेरीस तेच संबोधन परावर्तित होऊन संबोधक आणि संबोधित यांतील विभिन्नता अस्थिर करते. मीराबाईंकडे ती भावस्पर्शी वैयक्तिक, प्रेममय आणि आगमनाची पूर्वसूचना देणाऱ्या आवाहनाच्या स्वरूपात उलगडते. रविदासांसाठी ती एका पर्यायी सामाजिक व्यवस्थेची — जिथे कर नाहीत, अन्याय नाही, कुणी दुसरा-तिसरा नाही आणि सर्वजण समृद्ध व सुरक्षित आहेत — कल्पना करण्याची, तिला साकार करण्याची आणि स्वतःची म्हणून घोषित करण्याची हाक ठरते. या सर्व भिन्न रूपांमध्ये शैली आणि संबोधित बदलत असले, तरी त्या सर्वांचा संगम भक्तीगीते ही हाक म्हणूनच रचली गेलेली आहेत. जिथे अंतर आणि भिन्नता निरंतर सामायिक केल्या जातात आणि वक्ता व श्रोता, ‘स्व’ व ‘पर’, तसेच भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या विविध स्थानांमध्ये पुनर्वितरित होतात. हाच अस्थैर्याचा गुण एका निर्णायक वळणाची पायाभरणी करतो : ज्या कवींनी एकेकाळी हाक दिली, तेच पुढे जाऊन स्वतः हाक ऐकणाऱ्यांच्या स्थानावर येतात.
वरील प्रवाहांचा शेवट, म्हणूनच अंतिम निष्कर्षात न होता, एका सातत्यपूर्ण परिभ्रमणात होतो. जशी संतांनी कशाला तरी वा कुणाला तरी — बहुधा दैवी — उद्देशून हाक दिली, तसेच सामान्य लोक संतांना हाक मारू लागतात. याचे एक नेमके उदाहरण म्हणजे विनायक होगाडे यांचे डियर तुकोबा हे पुस्तक आहे. खरं तर, या पुस्तकामुळेच प्रस्तुत शोधनिबंध लिहिण्याची प्रेरणा दिली. हे पुस्तक ‘कोणालातरी हाक देणे’, ‘कोणाचेतरी स्मरण करणे’ आणि ‘कोणासोबत तरी संवाद साधणे’ या हाक देण्याच्या तीन वेगवेगळ्या स्वरूपांना एकत्र आणते. या पुस्तकाचा पहिला भाग — तुकारामायण — हा होगाडे यांनी रचलेल्या कवितांचा संग्रह आहे, ज्यात तुकाराम आणि विविध काळातील विचारवंत व क्रांतिकारक यांची काल्पनिक भेट घडवली आहे. दुसऱ्या भागात, एकविसाव्या शतकात तुकाराम जिवंत असते, तर काय झाले असते आणि धर्म व देवाच्या तथाकथित रक्षकांकडून त्यांना कशा प्रकारच्या परीक्षणांना सामोरे जावे लागले असते, याची कल्पना मांडली आहे. शेवटी मला आवडलेला या पुस्तकाचा तिसरा भाग, होगाडे यांनी तुकोबांना लिहिलेल्या पत्रांचा आहे, ज्याला डियर तुकोबा असे शीर्षक आहे.
जसे तुकरामांनी — पुण्याजवळील देहू येथील सतराव्या शतकातील संतकवी — त्यांच्या हजारो अभंगांमधून वैयक्तिक आणि सामाजिक वेदनेचे आध्यात्मिक व सामाजिक शक्तीत रूपांतर केले. होगाडेही स्वतःच्या आणि अनेकांच्या तुकोबांप्रती असलेल्या प्रेमाला सार्वजनिक संवादात रूपांतरित करत आणि त्यातून दिलासा शोधत तसाच प्रयत्न करतात. या प्रयत्नामुळे वाचकांना तुकारामांच्या अभंगांकडे केवळ अवशेष म्हणून नव्हे, तर आजच्या गोंधळाला प्रतिसाद देणारी जिवंत अभिव्यक्ती म्हणून पुन्हा पाहण्यास आमंत्रित करतात आणि मानवी नातेसंबंधांना चालना देतात. या प्रकारे, केवळ तुकाराम नव्हे, तर भक्तिसंप्रदायांतील बहुतांश संत त्या स्थानावर येतात, जे पूर्वी सामान्यतः दैवी किंवा अकल्पित घटकांनी व्यापलेले होते. संबोधनाची ही रचना काळानुसार स्वतःची पुनरुत्पत्ती आणि संबोधित घटकांचे पुनर्संरचना करत राहते. तरीही त्यातील खुलेपणाचे मूलभूत वैशिष्ट्य ती कायम ठेवते.
अशा रीतीने ‘हाक’ हे शेवटच्या आणि निर्णायक समाप्तीशिवाय नात्यांमध्ये वावरण्याची एक पद्धत ठरते. ती प्रतिध्वनी निर्माण करते, पूर्वानुमान करते, प्रश्न विचारते आणि कल्पना करते. यातून ‘स्व’ आणि ‘पर’ यांमधील एक असा अवकाश टिकवून ठेवते, जिथे अर्थनिर्मिती शक्य आहे. होगाडेनी त्यांच्या पुस्तकाच्या रूपात तुकोबांना दिलेली हाक एका कवितेतून अंतिम टप्प्यात पोहोचते. ही कविता एका पत्राच्या रूपात असून, तुकोबांप्रती त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनीच रचलेली आहे. या कवितेत तुकोबांच्या वाढदिवसाच्या समारंभात बहिणाबाई गात असल्याची कल्पना केली आहे. यातून तुकोबा जनमानसात जीवनाचे सार, कवितेचा आत्मा, आशेचा किरण, मुक्यांना वाचा देणारा शब्द, प्रतिकाराचे बीज इत्यादी अशा अनेक अर्थांनी उभे राहतात. या निबंधाचा शेवट मी त्याच कवितेच्या तुकारामांना आणि हाकेलाही तितक्याच लागू होणाऱ्या पुढील ओळींनी करू इच्छिते, कारण दोन्हीमध्येही याचे स्वरूप दिसते, “प्रवाही राहतो । उसळी मारतो । पुन्हा खळाळतो ।” आणि “सांगून उरतो ।” (होगाडे, पृ. १६९).
संदर्भसूची
- Alston, A. J. The Devotional Poems of Mirabai. Motilal Banarsidass, 1980.
- Hawley, John Stratton, and Mark Juergensmeyer. Songs of the Saints of India. Oxford University Press, 1988.
- Hess, Linda. “Introduction.” The Bijak of Kabir, translated by Linda Hess and Shukdeo Singh, Oxford University Press, 2002, pp. 3-37.
- Hogade, Vinayak. Dear Tukoba. Madhushri Publication, 2022.
- Omvedt, Gail. Seeking Begumpura: The Social Vision of Anticaste Intellectuals. Navayana, 2008.
- Omvedt, Gail. Begumpurachya Shodhat: jativirodhi vicharvantachi samajik drushti
- Sant Janabai: Charitra va Kavya. 2nd ed., Janabai Shikshan Sanstha, 2018.
Image Credit: Akashleena Basu for हाकारा । hākārā
ह्या लेखाचा अनुवाद करण्यासाठी डॉ. गजानन अपिने यांचे मार्गदर्शन लाभले. मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
