द रोस्ट पोटॅटो पार्टी
‘द रोस्ट पोटॅटो पार्टी’ लोकांना बोलावण्यासाठी आयोजित केलेली नव्हती. खरं तर, ते औपचारिक निमंत्रणही नव्हतंच. मुळात ही एक संशोधनाधारित कलाकृती सादर करण्याची प्रक्रिया होती. त्याचाच भाग म्हणून सिंगूरमधील बेराबेरी पूर्व पारा गावाजवळच्या बटाट्याच्या शेतात हे मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) रचण्याचा आणि बटाटे भाजण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकांनी यावं म्हणून कुठलीही औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती. पत्रकं, पोस्टर्स, बॅनर्स किंवा माईकवरून घोषणा असं काहीच नव्हतं. तरीही, ज्या भूमीत सिंगूरच्या जमीन-आंदोलनाचा इतिहास अजूनही जिवंत आहे, तिथे एखादी घटना घडवण्याची कृतीच स्वतःमध्ये एक ठळक आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी हाक बनली.
वस्तूंमधून उमटलेली हाक :
पसरलेल्या शेतजमिनीत उभं राहणारं कोणतंही बांधकाम लगेच नजरेत भरतं. ते एक प्रकारचा दृश्य संकेत बनतं. सकाळच्या प्रकाशात बांबूची रचना हळूहळू उभी राहत होती. कापणीनंतर उरलेल्या अवशेषांनी कुंपणासारखा आकार तयार केला जात होता. तिथून जाणारे शेतकरी थांबत होते. पाहत होते. प्रश्न विचारत होते. ही गोष्ट नेमकी कशासाठी आहे, याचा अंदाज ते बांधत होते. काही जणांनी विचारलं, “इथे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे का?” काहींनी हसत विचारलं, “आलूपोरा ? तुम्ही हे आलूपोरासाठी करताय ? तुम्ही लोक वेडे आहात. करायचंच असेल तर मोठ्या थाटात करा. साउंड बॉक्स आणि स्पॉटलाइटही आणा.” काहींना काळजीही वाटत होती. “हे नेमकं कधी होणार ?” “कार्यक्रम झाल्यावर या रचनेचं काय होणार ?” हे प्रश्न आणि संवादच निमंत्रणाचा पहिला भाग होते. गेल्या दोन दशकांपासून सिंगूरमध्ये कुंपणं म्हणजे बंदी, ताबा आणि औद्योगिक बदल यांची चिन्हं बनली होती. त्यामुळे ही बांबूची रचना लोकांमध्ये सावध उत्सुकता निर्माण करत होती. लोकांनी या रचनेचा अर्थ आपापल्या पद्धतीने लावायला सुरुवात केली. त्यामुळे ती केवळ एक स्वतंत्र कलाकृती राहिली नाही. कुंपणांनी विद्रूप झालेल्या ह्या परिसरात, ह्या रचनेने कुंपणाच्या कल्पनेलाच पालटलं. इथली जमीन स्वतःच्या सीमारेषा पुन्हा नव्यानं आखत होती. एका सरळ, एकरेषीय इतिहासाला ती मोडून काढत होती.
वासाचा संकेत :
दुपारपर्यंत ही हाक नजरेतून जाणवणाऱ्या गोष्टींपासून इंद्रियांच्या अनुभवाकडे सरकली होती. शेकोटी पेटवली गेली. पांढरा, नागमोडी धूर आकाशात पसरू लागला. तो जणू सांगत होता, इथे काहीतरी घडत आहे, या, सहभागी व्हा. भाजल्या जाणाऱ्या बटाट्यांचा वास अधिकाधिक उत्सुक लोकांना तिकडे खेचून आणत होता. ते आता एखाद्या संस्थात्मक चौकटीतले ‘प्रेक्षक’ राहिले नव्हते. ते त्या संवेदनांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देणारे लोक बनले होते. २००६मध्ये सिंगूर जमीन आंदोलन सुरू झाल्यापासून त्या जागेत एक संवाद धुमसत होता. ह्या लोकांनी येऊन त्या संवादाला चालना दिली.
‘मोठ्या कथना’ला पडलेले तडे :
एका दिवसासाठी तयार झालेल्या ह्या तात्पुरत्या जमावाभोवती कुंपणासारखं इन्स्टॉलेशन उभं होतं. भारतातल्या जमीन-संघर्षांच्या इतिहासाचे तेरा वेगवेगळे तुकडे त्यात होते. ह्या सगळ्याला लोकांनी आपापल्या अनुभवांतून प्रतिसाद दिला. अनेक वेगवेगळी सत्यं तिथे समोर आली. ह्यात सहभागी झालेल्या निरंजन मन्ना ह्यांना त्या आगीमुळे सिंगूर आंदोलनाचे दिवस आठवले. तर काही तरुण सहभागींसाठी तो अनुभव त्यांच्या लहानपणीच्या आलूपोराच्या आठवणींसारखा होता. त्यांचा जन्म २००६ ते २०१६दरम्यान झाला होता. त्यामुळे त्यांनी आंदोलन प्रत्यक्ष पाहिलेलंच नव्हतं.
कार्यक्रमाची ही संकल्पना गायत्री चक्रवर्ती स्पिवाक ह्यांच्या एका विचाराशी जोडलेली आहे. त्यांच्या मते, प्रत्येक ‘मोठं कथन’ काही प्रमाणात पक्षपाती असतंच. कारण एकसंध कथा तयार करताना काही गोष्टी अपरिहार्यपणे वगळल्या जातात. इथे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होती. कुणी गप्पा मारत होतं. कुणी जुन्या आठवणी सांगत होतं. कुणी शांतपणे ऐकत होतं. कुणी त्या अनुभवाचं वर्णन करत होतं. तर काही जण व्ह्लॉग बनवण्यात गुंतले होते. ह्या वेगवेगळ्या तुकड्यांतून अनेक स्तरांनी बनलेलं अधिक व्यापक सत्य आकार घेत होतं.
वृत्तमाध्यमांनी सिंगूर जमीन-आंदोलनाची मांडणी अनेकदा उद्योग विरुद्ध शेतकरी अशा संघर्षासारखी केली. पत्रकार बहुतेक वेळा एकाच प्रकारचे राजकीय विचार असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या मुलाखती घ्यायचे. एखाद्या बातमीत विरोधाभास दिसला, तरी शेवटी येणारं निष्कर्षात्मक विधान अनेक विचारांना एका सरळ रेषेत बसवत होतं. म्हणूनच काही दाबले गेलेले आवाज सतत एक प्रश्न विचारत होते — “खरं सत्य नेमकं कोणतं ?” आंदोलनकर्ते, उद्योगसमर्थक, आणि संभ्रमात असलेले भूमिहीन शेतकरी, प्रत्येकाच्या दृष्टीने सत्य वेगळं होतं. अनेक कथा सांगितल्याच गेल्या नव्हत्या. त्या दुर्लक्षित कथा जणू एखाद्या सामूहिक हाकेची वाट पाहत होत्या. लोकांनी एकत्र यावं, त्या कथा स्वतःच्या म्हणून सांगाव्यात आणि माध्यमांनी जे दाखवलं नाही, ते वास्तव एकमेकांशी शेअर करावं, अशी जणू त्यांची इच्छा होती. स्पिवाक ह्यांनी केलेल्या ‘मोठ्या कथना’च्या टीकेप्रमाणे, आधीपासून तयार असलेली एकरेषीय कथा ह्या कार्यक्रमात येऊन ढासळली. ह्या उत्स्फूर्त सार्वजनिक सहभागातून सामूहिक सत्याचं एक नवं रूप समोर आलं. अधिक जिवंत, अधिक स्पष्ट.
द रोस्ट पोटॅटो पार्टीने एक गोष्ट दाखवून दिली — लोकांना एकत्र बोलावण्यासाठी नेहमीच भोंग्याची गरज नसते !
पुन्हा ताबा मिळवणं :
रात्री पडलेल्या पावसाने हे मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) एकदा मोडून टाकली. दुसऱ्या दिवशी सहभागी लोकांनीही ती उलगडून काढली. तरीही हे काम तिथे थांबलं नाही. त्या दिवशी घडलेल्या घटनांच्या आणि अनुभवांच्या तुकड्यांमधून ते पुढेही सुरू राहिलं. इन्स्टॉलेशन आणि बटाटे भाजण्याच्या ह्या कार्यक्रमातून समुदायाने त्या जागेवर पुन्हा आपला हक्क निर्माण केला. हे कुणाच्या सांगण्यावरून घडलं नव्हतं. त्यामागे ठरवून आखलेली योजना नव्हती. ती एक उत्स्फूर्त राजकीय भूमिका होती — तुकड्या-तुकड्यांत विभागलेली, काही प्रमाणात पक्षपाती, पण तरीही लोकांना एकत्र आणणारी आणि काहीतरी नव्याने उभं करणारी.
पुढील व्यक्तींशी झालेल्या संवादाच्या आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून हा मजकूर आकाराला आला आहे :
सौरव मन्ना, बाप्पा मन्ना, सुकात मन्ना, तिस्ता सरकार, मौमिता बारिक, मिनाती मन्ना, शुभंकर मन्ना, दीपंकर मन्ना, बापन मन्ना, निरंजन मन्ना, काकली मन्ना, सैकत दत्ता, सृजिता दत्ता, तुंपा दत्ता, सुकृती मन्ना, सुमित्रा मन्ना, सम्राट मन्ना, अहाना मन्ना, अमिता मन्ना, मानसी दास, दुस्तू मन्ना, काकली मन्ना, रिक्स्मिता मन्ना, देबार्पण मन्ना, देबजित मन्ना आणि रिक मन्ना.
संदर्भ:
फिलॉसॉफी ओव्हरडोस. (१९८४). डिबेट ऑन पोस्टमॉडर्निझम.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
