Skip to content Skip to footer

‘मागे सोडलेलं’| मूळ इंग्रजी कथा : फरीझा फरीद मेमन । मराठी अनुवाद : प्रिया साठे

Discover An Author

  • Fariza Farid Memon is an emerging Pakistani writer based in Finland, who has done her Masters in English Language and Culture. Her works have appeared in To The Litehouse Magazine, Sontag Magazine, Backstory Journal. She was also a mentee at Fahmidan Journal's annual mentorship program for Gen-Z writers. In her spare time, she's either learning Finnish tenses or out on a walk.

    फरीझा फरीद मेमन ह्या फिनलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या उदयोन्मुख पाकिस्तानी लेखिका आहेत. त्यांनी इंग्रजी भाषा आणि संस्कृती ह्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या लिखाणाला टू द लाइटहाऊस मॅगझिन, सोनटॅग मॅगझिन, बॅकस्टोरी जर्नल ह्यांसारख्या प्रकाशनांमध्ये स्थान मिळाले आहे. त्या फाहमिदान जर्नलच्या जेन-झी लेखकांसाठी असलेल्या वार्षिक मार्गदर्शन-कार्यक्रमात एक प्रशिक्षणार्थी (mentee) देखील होत्या. मोकळ्या वेळात त्या कधी फिनिश भाषेतील गुंतागुंतीची काळ-व्यवस्था शिकत असतात, तर कधी फिरायला बाहेर पडतात.

  • Translator and Writer

    Priya Sathe is a writer with a keen interest in storytelling and film reviews. Her short stories have been published in literary magazines such as Maher and Saptahik Sakal. She has also worked on the English rendering of two books by the renowned watercolour artist Milind Mulick. She runs a blog titled Wovenfeelings, where she publishes poetry in English, Hindi, and Marathi.

    प्रिया साठे ह्या लेखिका असून त्यांना कथालेखनाची आणि चित्रपट-परीक्षणाची विशेष आवड आहे. त्यांच्या कथा माहेर आणि साप्ताहिक सकाळ ह्यांसारख्या नियतकालिकांत प्रकाशित झाल्या आहेत. जलरंग-चित्रकार मिलिंद मुळीक ह्यांच्या दोन पुस्तकांचे इंग्रजी शब्दांकनही त्यांनी केले आहे. ‘Wovenfeelings’ ह्या त्यांच्या अनुदिनीवर त्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांतील स्व-रचित कविता प्रकाशित करतात.

मराठी | English

बाबा वारले तेव्हा त्यांनी सर्व काही — अपार्टमेंट, ती टोयोटा गाडी, साठवलेले पैसे आणि गावाकडच्या शेतातला त्यांचा वाटा — सगळंच माझ्या भावाला, हाशिमला, दिलं. माझ्यासाठी, बहिणीसाठी, किंवा अम्मासाठी त्यांनी काहीच ठेवलं नाही. बहिणीच्या आणि माझ्या वाट्याला आलं ते फक्त बाबांचं नाव. आईची ओळख एका क्षणात ‘त्यांची बायको’वरून ‘त्यांची विधवा’ अशी झाली. माझ्या बहिणीने, ईशाने, मृत्युपत्रावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट तिला हे अपेक्षितच होतं, असं म्हणाली. मृत्युपत्रात आश्चर्य वाटण्यासारखं खरं तर काही नव्हतंच, तरीही कुठेतरी वाटत होतं की बाबांनी या कुटुंबातील स्त्रियांचाही विचार केला असेल.

वकिलासोबतच्या भेटीदरम्यान ईशाने सरळ सांगितलं की तिला बाबांच्या मृत्युपत्राशी काही देणंघेणं नाही आणि बाबांशीही नाही. मृत्युपत्रातील मजकूर वाचून झाल्यावर लगेचच ती तिच्या नवऱ्यासोबत वकिलाच्या ऑफिसमधून निघून गेली होती. कदाचित ईशाला कशाचीच गरज नव्हती. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असूनही, ती तिच्या आयुष्यात स्थिरावली होती, आणि तिला कसलीही कमतरता नव्हती. तिला तिच्या नोकरीत भरपूर पगार होता आणि नवरा नसीमसोबत, सासरच्या मंडळींच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, तिचा संसार शांत आणि सुखी सुरू होता. गेल्या महिन्यात तर तिने त्यांच्या अपार्टमेंटसाठी घरकाम करणारा मदतनीस शोधायलाही सुरुवात केली होती. नसीम एका व्यावसायिक कंपनीत अकाउंटंट होता. घराची आणि त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जबाबदारी तो व्यवस्थित सांभाळत होता. 

ईशाची मला फारशी चिंता नव्हती. काळजी होती ती अम्माची आणि माझी. 

हाशिम माझा भाऊ असला, तरी पैशांचा वापर असो किंवा वागणं — दोन्ही बाबतींत तो कधीच धड नव्हता. आम्ही तिघं एकाच आईच्या पोटी जन्मलो होतो, तरी आमचे स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते.  ईशा कधीकधी उद्धट किंवा अलिप्त वाटली, तरी तिला माझी आणि अम्माची मनापासून काळजी वाटायची. बाबा किंवा हाशिम आमच्याशी, किंवा तिच्याशीही कठोरपणे वागले, तरी ती कधी आवाज चढवून बोलत नसे. उलट शांतपणे, सरळ मुद्द्याचं बोलत असे. ती बाबांना विरोध करायची, हाशिमशीही वाद घालायची. म्हणूनच बहुतेक तिचं लग्न माझ्याआधी लावून दिलं गेलं.

पण त्यांना माहीत नव्हतं की ज्या माणसाशी त्यांनी तिचं लग्न ठरवलं, तो मनाने इतका चांगला निघेल. ईशाच्या आयुष्यात नसीमसारखा माणूस आणल्याबद्दल, मी आजही देवाचे आभार मानते.

हाशिम आमचा धाकटा भाऊ. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान, पण वागणं मात्र एखाद्या हुकूमशहासारखं — स्वतः कमी काम करायचं आणि इतरांकडून जास्त करून घ्यायचं. आजही अम्माच त्याचं जेवण त्याच्या टेबलापर्यंत आणून देते. आयुष्यात एकदाही त्याने जागचं उठून अम्मासाठी पाण्याचा ग्लास आणला नसेल. बाबांनी त्याला लहानपणापासूनच खूप लाडावून ठेवलं. त्याला हवी ती खेळणी मिळायची. मी आणि ईशा रडून रडून मागायचो, तरी आम्हांला ती कधी मिळाली नाहीत. बाबा त्याला अशा अम्यूजमेंट पार्कमध्ये घेऊन जायचे, ज्यांचं नाव सुद्धा आम्ही कधी ऐकलेलं नसायचं. त्याला गाडी चालवायलाही बाबांनीच शिकवलं. एकदा तर हॉटेलमध्ये एका वेटरवर हात उगारल्यामुळे त्याला पोलिसांनी पकडलं होतं. तेव्हाही बाबांनीच त्याला जामिनावर सोडवलं. अशा गोष्टींची यादी खूप मोठी होईल. हाशिम कॉलेजमध्ये प्रवेश  मिळवण्यात अनेकदा अपयशी ठरला, तरी बाबांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही. पण मी पुढे मास्टर्स करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मात्र ते खूप संतापले.

आता सगळं काही हाशिमच्या हातांत होतं. पण तो आमच्याशी बाबांपेक्षा वेगळं वागेल, असं मला वाटत नव्हतं, त्यापेक्षाही वाईट वागेल, असंच आतनं वाटत होतं. कारण, लहानपणापासूनच बाबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच तो वागत राहिला.

मृत्युपत्राच्या वाचनानंतर, हाशिम, अम्मा आणि मी बाबांच्या टोयोटामध्ये बसून घरी आलो. टोयोटा आता हाशिमची झाली होती. हाशिम मोठ्याने काहीतरी बोलत होता. खरं तर, तो आमच्याशी कमी, स्वतःशीच जास्त बोलत होता. मी आणि अम्मा मात्र संपूर्ण प्रवासभर शांत बसून होतो. दुःखाचा आणि फसवणुकीचा तो भार मुकाट्याने सहन करणं खूप जड जात होतं. त्यामुळे मागच्या सीटवर आम्ही एकमेकींचा हात घट्ट धरून बसलो होतो. अम्मा आतून खूप खचली होती. तिला फारसं काही नको असायचं, पण तिच्यासाठी सगळी मुलं सारखीच होती. बाबांसारखं तिचं फक्त हाशिमवर प्रेम नव्हतं. बाबांनी ते त्यांच्या शेवटच्या शब्दांतून, त्यांच्या मृत्युपत्रातून आम्हांला सिद्धच करून दाखवलं होतं.

***

हाशिमचं खरं रूप समोर यायला फार वेळ लागला नाही. बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर फक्त पाचच दिवस झाले होते. शनिवारची दुपार होती आणि अचानक त्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमू लागला. तो आवाज इतका मोठा होता की शेजाऱ्यांना, अगदी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो ऐकू गेला असेल, याची मला खात्री होती. अम्माला आणि मला संतापाने थरथरत उभा असलेला हाशिम दिसला. त्याने हातात काहीतरी धरलेलं होतं.

“काय झालं ?” अम्माने काळजीने विचारलं, “देव न करो, अजून काही वाईट बातमी तर नाही ना ?”

“या बिलावरच्या आकड्यांपेक्षा वाईट काय असू शकतं ?” त्याने ते बिल तिच्या हातात कोंबलं. तिने ते बिल नीट वाचलं. आधी माझ्याकडे बघितलं आणि मग हाशिमकडे. मी तिच्या हातातून बिल घेतलं. त्यावर बारा हजार रुपये लिहिलेले दिसले. मागच्या महिन्यात ते सुमारे दहा हजार होतं. बाबा असताना त्यांनी कधी बिलांबद्दल कुरकुर केली नव्हती. रिकाम्या खोल्यांचे दिवे बंद ठेवायला मात्र ते कधीकधी सांगायचे. अम्मा तर या बाबतीत खूपच काळजी घ्यायची. वीज गेली की यू.पी.एसवर ताण येऊ नये आणि बिल वाढू नये म्हणून ती घराबाहेरच्या जिन्याचा दिवाही बंद करून टाकायची. कधीकधी तर वॉशिंग मशीन जास्त वीज खातं, म्हणून ती हातांनीच कपडे धुवायची.

“मला काही समजत नाहीये, बेटा. इतक्या वेळा वीज जाते. हे लोक मुद्दामच बिल जास्त लावतात, तुला माहीत आहे ना,” अम्मा म्हणाली.

“हो, आपल्याशी वैर आहे म्हणून मुद्दाम बिलची रक्कम वाढवतात !” हाशिम वैतागून उपरोधाने म्हणाला.

“हाशिम, अम्माशी बोलायची ही पद्धत नाही,” मी ठामपणे म्हणाले. 

“हो हो,” तो नाटकीपणे हातवारे करत बोलत होता. “पण ऐक, असे आकडे असलेली बिलं मी आता भरणार नाही, समजलं ?”

“भरायची गरजही नाही. तसंही कधी भरली आहेत तू ?” मी पुटपुटले.

“काय म्हणालीस ?” त्याचा आवाज चढला.

मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

“आणि अजून एक. आता तुम्ही दोघींनीही तुमचा हिस्सा द्यायची वेळ आलीये, असं मला वाटतं,” त्याने माझ्या हातातून बिल घेतलं, आणि अम्माकडे आणि माझ्याकडे पाहत म्हणाला.

“म्हणजे ? तुला काय म्हणायचंय ?” मी विचारलं.

“हिस्सा म्हणजे हिस्सा,” तो उपहासाने म्हणाला. “तू आणि अम्मा या घरात राहता, आणि हे घर बाबा माझ्या नावावर करून गेलेत. त्यामुळे तुमचंही काहीतरी देणं लागतं. तुमचा अर्धा वाटा द्या, असं म्हणतोय.”

“तू अम्माकडून भाडं मागतोयस ? तुझ्या स्वतःच्या दुःखी आईकडून ?” मी अविश्वासाने त्याचेच शब्द परत उच्चारले . रागाने आणि गोंधळाने माझं डोकंच सुन्न झालं होतं. 

“मग काय, परिस्थितीच अशी बिकट आहे,” माझ्या शेजारी उभ्या राहून रडणाऱ्या अम्माकडे पूर्ण दुर्लक्ष करत तो निर्विकारपणे खांदे उडवत म्हणाला. 

“मग तू तुझ्याच आईकडून भाडं मागून ती आणखी बिकट करणार आहेस का ?”

“मग, तुझ्या मते, मी काय करू?”

“नको नको, तू काही करू नकोस, तसंही कधी काय केलंयस ? मी आणि अम्मा दर महिन्याला तुला भाडं देऊ. आणि बिलांचाही आमचा अर्धा हिस्सा देऊ.” मी त्याच्या हातातून बिल परत घेतलं आणि अम्माचा हात घट्ट धरला. 

“अर्धा नाही.”

“म्हणजे ? तू तुझा अर्धा हिस्सा भर, आम्ही आमचा. तेच बरोबर आहे.”

“हो, पण मी इथे राहणार असतो तर दिले असते ना पैसे.”

“म्हणजे ? तुला म्हणायचंय काय ?” अम्माने आश्चर्याने विचारलं.

“ठीक आहे, आता सरळ सांगतो,” तो वैतागून म्हणाला, “बाबांनी गावाकडचं शेत माझ्या नावावर केलंय, आणि मी तिकडे जाऊन राहायचं ठरवलंय. मी तिथंच काम सुरू करणार आहे.”

“तू आयुष्यभर शहरातच राहिला आहेस बेटा,” अम्मा म्हणाली, “गावाकडचं आयुष्य तुला माहीत नाही. तुझे बाबा सुद्धा सगळी जबाबदारी तिथल्या कामगारांवर किंवा नातेवाईक शेतकऱ्यांवर सोपवायचे. तू जाऊ नकोस तिकडे. मला आणि तुझ्या बहिणीला इथे सोडून कसा जाशील ?”

“अम्मा, कुणीतरी ते सगळं बघायला हवंय, आणि ते मीच करणार आहे. बाबांना त्या शेतीतून भरपूर पैसा मिळायचा. आता मला ते सांभाळायचं आहे.”

“म्हणजे तू मला आणि अम्माला इथे एकटंच सोडून जाणार ?” मी विचारलं.

“मी काय करावं असं तुला वाटतं, हं ? इथे राहिलो तर तुम्ही म्हणाल, मी काही करत नाही. तिकडे गेलो तर किमान काहीतरी शिकेन, काम करीन. कधीतरी पैसेही पाठवीन, काळजी करू नकोस.”

“आम्हांला पैशांची चिंता नाही, हाशिम,” अम्माच्या डोळ्यांत पाणी दाटलं, “तुला कळत नाही का, मी आणि सना इथे एकट्या कशा राहणार ? हे कराची आहे. इथे शेजाऱ्यांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही.”

“नको अम्मा, त्याला जाऊ दे. हाशिमने आयुष्यात काहीतरी करावं, असं मलाही वाटतं. जर तिकडे सगळं नीट चाललं तर तिथंच राहा. कोणी तुला अडवणार नाही. नाही तर, परत ये. शेवटी हे घर तुझंच आहे,” माझ्या ओठांवर एक कडवट हसू उमटलं.

“अर्थात ! मग तुला उशिरापर्यंत बाहेर राहायची मोकळीक मिळेल, नाही का ?” 

“तुला लाज वाटली पाहिजे, हाशिम !” अम्मा त्याच्यावर संतापली, “तुझी बहीण शिकवायला जाते. तू तिच्यावर केलेले आरोप मी अजिबात सहन करणार नाही.”

“हो ना ! ती नोकरी करते, पैसे कमावते, म्हणून तिच्याविरुद्ध एक शब्दही तुला सहन होत नाही.”

“आता गप्प बस आणि निघ. उद्या जा किंवा आजच जा, मी तुला अडवणार नाही. जा, तुझ्या वडिलांच्या शेतावर,” शेवटी अम्माने त्याला शांतपणे सांगितलं.

तो उपहासाने हसला. त्याने अम्माला किती दुखावलं होतं, याची त्याला काहीच पर्वा नव्हती. त्याच्या टोमण्यांनी मला काही फरक पडायचा नाही, त्यांना मी कधीच मनावर घेतलं नव्हतं. पण त्याचं अम्माला इतकं दुखावून बोलणं मला सहन झालं नाही. ती पूर्णपणे खचलेली दिसत होती, आणि मी तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होते. शेवटी ती  हताश होऊन डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली आणि मनसोक्त रडली. खोलीत जाण्यापूर्वी, त्याने पुन्हा एकदा बिलाची, भाड्याची, आणि तो आम्हांला त्याच्या घरात राहू देतोय या त्याच्या मोठेपणाची आठवण करून दिली. तेच घर — जिथे आम्ही दोघं लहानाचे मोठे झालो होतो.

आमच्या इमारतीबाहेरचा रस्ता सकाळच्या वेळेला नेहमी स्वच्छ असायचा, कारण सफाई-कामगारांनी आदल्या दिवसाचा सगळा कचरा झाडून टाकलेला असे. त्या वेळी शहर अजून पूर्ण जागं झालेलं नसायचं. त्यामुळे रस्ताही शांत आणि जवळजवळ रिकामाच असायचा. काही लोक माझ्यासारखे पहाटेच्या नमाजासाठी उठायचे, काही गजर वाजल्यावर जागे व्हायचे, तर काहींची सकाळच दुपारी व्हायची. सकाळी रिक्षा सहज मिळायची. त्या वेळचं कराची इतकं सुंदर दिसायचं, की त्याच्या प्रेमात पडावंसं वाटायचं. गजबजलेले रस्ते, अरुंद गल्ल्या, अंधुक जिने, सगळंच त्या वेळेला कसं नीटनेटकं दिसायचं. सकाळच्या हवेत रस्त्यांवर एक हलकी शांतता पसरलेली असायची. गाड्यांचे हॉर्न क्वचित ऐकू यायचे. चुकीच्या बाजूने गाडी चालवली म्हणून रिक्षावाले आरडाओरडा करत नसत. लोकांना रस्ता ओलांडू द्यायला गाड्या थांबत असत. एवढ्या सकाळी कुणालाच उगाच चिडचिड करत घाई करायची फुरसत नसायची. सगळ्यांना आपापल्या कामावर पोहोचायचं असायचं.

रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेली असताना माझ्या उजव्या पायाच्या एका भागावर सूर्यकिरण पडले. त्या हलक्या उबेने क्षणभर छान वाटलं आणि त्यांच्या सौंदर्याने मी भारावून गेले. त्या  प्रकाशात माझ्या पायावरची जन्मखूणही स्पष्ट दिसू लागली. लहानपणी मला माझ्या चेहऱ्यावरच्या जन्मखुणांची लाज वाटायची. त्या सगळ्यांच्या नजरेत भरणाऱ्या माझ्या वेदनेच्या पारदर्शक खुणा आहेत, असं मला वाटायचं. माझ्या शाळेतल्या मुलींच्या चेहऱ्यावर एखाददोन ठसठशीत खुणा असायच्या, आणि त्या त्यांच्यावर सुंदर दिसायच्या. पण माझ्या चेहऱ्यावर मात्र अशा आठपेक्षा जास्त खुणा होत्या. अम्माने मात्र मला जन्मखुणांकडे वेगळ्याच नजरेने पाहायला शिकवलं. ती म्हणायची, त्या माणसाचं वैशिष्ट्य असतात. तिची एक वही होती. त्यात ती सगळंच लिहायची — पाककृती, जुन्या मैत्रिणींचे फोन-नंबर,  कवितांच्या ओळी. मला आठवतं, त्यातच तिने या शब्दाचं सिंधीतील स्पेलिंग लिहून ठेवलं होतं : تل (तिल / तीळ).

“किती सुंदर आहे ना हा शब्द ?” ती मला मांडीवर बसवून लिहीत म्हणाली होती, “किती नाजूक आहे हा शब्द — तिल. नाजूकपणात लाज वाटण्यासारखं काही नसतं. तुझ्या या खुणा आकाशातल्या ताऱ्यांसारख्या आहेत. सगळ्या मिळून त्या एक सुंदर नक्षत्र तयार करतात. लोक आकाशातल्या ताऱ्यांकडे कौतुकाने पाहतात ना ? मग तू स्वतःकडे कमीपणाने का पाहतेस ?”

उन्हाची झळ वाढल्यावर मी पाय हलकेच सावलीत घेतले. शाळेच्या गेटपाशी रिक्षा थांबली तेव्हा मी ड्रायव्हरला भाडं दिलं. गेटवरच्या सुरक्षारक्षकाला नमस्कार केला. त्याने माझं सांत्वन केलं. माझ्यामागे उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांना मी आधी जाऊ दिलं. ते माझ्याकडे अशा नजरेने पाहत होते, जणू त्यांनी एखादं भूतच पाहिलं होतं.

आज बरीच कामं करायची होती. आठवडाभर मी शाळेत नव्हते, पण मी शिकवत असलेल्या तीन वर्गांच्या आज चाचण्या होणार होत्या. त्या उत्तरपत्रिका या आठवड्याच्या शेवटपर्यंत तपासून पूर्ण करायच्या होत्या, कारण पुढच्या आठवड्यात अजून दोन वर्गांच्या चाचण्या असणार होत्या.

स्टाफरूममध्ये शिक्षकांपेक्षा कागदपत्रंच जास्त असत. सगळेच शिक्षक एक तर कामाच्या ओझ्याखाली दबलेले होते, किंवा त्यांना कमी पगार होता, किंवा दोन्हीही होतं. कोणीही कोणाकडून मदत मागत नसे आणि गोंधळ होण्याच्या आणि पकडलं जाण्याच्या भीतीने कोणीही आपलं काम दुसऱ्याला देण्याची चूकही करत नसे. स्टाफरूममध्ये प्रवेश करताच माझे सहकारी माझ्याकडे सहानुभूतीने पाहतील, अशी मला अपेक्षा होती, आणि माझा तो अंदाज खरा ठरला. त्यांच्या मनातले विचार जणू मला ऐकू येत होते — हीच ती शिक्षिका जिचे वडील गेलेत. मी तिला थोडी जास्त सहानुभूती दाखवली तर ती रडायला लागेल का ?

प्रिन्सिपल स्टाफरूममध्ये होत्या. त्या माझीच वाट पाहत आहेत, हे मला लगेच कळलं. कारण त्या माझ्या डेस्कजवळ उभ्या होत्या. इतर शिक्षकांच्या निःशब्द नजरा टाळत मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला सांगितलं की मला वाटलं तर मी आज लवकर घरी जाऊ शकते, त्या ते समजून घेतील.

मी त्यांच्या काळजीबद्दल आभार मानले. पण माझा तास आहे, आणि मला वर्गात जायचं आहे, असं त्यांना सांगितलं. आणि त्यांना तिथंच उभं ठेवून मी निघून गेले.

***

जसं जसं वय वाढतं तसं तसं माणूस आपल्या जवळच्या लोकांशी स्वतःबद्दल कमी बोलायला लागतो. आम्हांलाही बाबांबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. ते त्यांच्या तरुणपणाबद्दल फार क्वचित बोलायचे. त्या काळाला ते ‘आठवत नसलेला भूतकाळ’ म्हणायचे. कधीतरी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. कॉलेजमध्ये त्यांचा वर्गात नेहमी पहिला क्रमांक यायचा. त्यांनी काही वर्षं डब्लू.ए.पी.डी.एमध्ये काम केलं होतं. त्या संस्थेबद्दल मी एकदा शाळेच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात वाचलं होतं, आणि तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटला होता. एकदा त्यांनी सांगितलं होतं की आईला पाहायला जाताना त्यांनी केसांना इतकं तेल लावलं होतं, की आई नक्कीच त्यांना नाकारेल, असं त्यांना वाटलं होतं.

आम्हांला बाबांबद्दल खरंच फार कमी माहिती होती. ज्या माणसामुळे मी, ईशा आणि हाशिम या जगात आलो, त्यालाच आम्ही नीट ओळखलं नव्हतं. त्यांना स्वतःबद्दल बोलायला आवडत नसे. अर्थातच, त्यांनी मला, ईशाला आणि अम्माला खरंच कधी आपलं मानलं नाही, याची खंत आमच्या मनांत होतीच. ते नेहमी आमच्याशी एक अंतर ठेवूनच वागले. त्यांनी आम्हांला कधीच फार जवळ येऊ दिलं नाही. कदाचित आम्ही त्यांच्या मनात डोकावू, आणि ते कमकुवत दिसतील, अशी त्यांना भीती वाटायची. आम्ही त्यांना आधार देऊ शकतो, हा विचारच कधी त्यांच्या मनात आला नाही. मुलांनी आईवडिलांना सांभाळणं हे त्यांना कदाचित हास्यास्पद किंवा कमीपणाचं वाटत होतं असावं. आणि म्हणूनच, आम्हांला त्यांना ओळखायची संधीच मिळाली नाही.

आपण आपल्या वडिलांना खरंच कधी ओळखतो का, किंवा कधी ओळखू शकतो का, असा मला प्रश्न पडायचा. 

माझ्या शाळेपासून काही मैलांवर असलेल्या एका बागेत बसून मी हा विचार करत होते. कधीकधी कामानंतर मी क्लिफ्टन पार्कमध्ये फिरायला जाते, हे मी अम्माला किंवा ईशालाही कधी सांगितलं नव्हतं. दिवसभराचा ताण हलका करायला आणि भूतकाळ, वर्तमान व भविष्य यांच्याबद्दल विचार करायला मी तिथं जायचे. शहरात वाढत चाललेल्या छोट्या-मोठ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, कुणालाही न सांगता तिथं जाणं धोकादायक आहे, हे मला ठाऊक होतं. पण दिवसातून एकदा तरी, काही क्षणांसाठी मला सगळ्यांपासून दूर व्हावंसं वाटायचं. कोणतंही ओझं मनात न ठेवता फक्त चालत राहावं, आणि त्या चालण्यातून हलकं व्हावं, असं मला वाटायचं.

काही आठवड्यांपूर्वी प्रिन्सिपलने सगळ्या शिक्षकांना एका स्टाफ-मीटिंगसाठी बोलावलं होतं. विद्यार्थ्यांची चाचण्यांमधील कामगिरी सुधारणं हा त्यामागील उद्देश होता. म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतःहून मेहनत करण्याची तसदी घेतली नाही, तरीही शिक्षकांनी मात्र दुप्पट कष्ट करायचे. दुसरं कारण म्हणजे, स्वच्छतागृहांमध्ये होणारी छुपी दादागिरी. एका विद्यार्थ्याने, दोन मुली एकमेकींना मारहाण करत असल्याचा आणि दुसऱ्या एका मुलीचे केस ओढत असल्याचा व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी शाळा-प्रशासनावर जोरदार टीका केली. हे सगळं त्यांच्या लक्षात कसं आलं नाही, असा प्रश्न विचारला जात होता. दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपलनी त्या तिन्ही मुलींना ऑफिसमध्ये बोलावलं. नंतर त्यांच्या पालकांनाही चर्चेसाठी बोलावण्यात आलं. जीवशास्त्र शिकवणाऱ्या फराहकडून मला कळलं की मारहाण करणाऱ्या त्या दोन्ही मुलींना एका महिन्यासाठी शाळेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना त्या मुलीची, तिच्या कुटुंबाची आणि शाळा-प्रशासनाची माफी मागणारं पत्र लिहायला सांगितलं गेलं होतं. शेवटची गोष्ट जरा जास्तच वाटली, पण कदाचित त्याचा संबंध शाळेची प्रतिमा टिकवण्याशी असावा.

माझ्या लक्षात येत होतं की आजकालच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वागण्याचे परिणाम फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत. आपण अल्पवयीन आहोत, किंवा आपले श्रीमंत आईवडील काहीतरी मार्ग काढतील, या भरवशावर त्यांना वाटतं की ते काहीही करू शकतात. काही जण तर शिक्षकांशीही उद्धटपणे बोलायचे. माझे विद्यार्थी मला काही अपमानास्पद बोलले, तरी मला त्याचं फारसं काही वाटत नसे. उलट, ते मला थोडं गंमतीशीरच वाटायचं. माझ्या वजनावरून, कुरळ्या केसांवरून किंवा सावळ्या रंगावरून त्यांनी मला चिडवलं, तर मी दुखावली जाईन असं त्यांना वाटतं, ही गोष्टच मला विचित्र वाटायची. हा सगळा विचार करत मी चालत होते, तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारली आणि मी दचकले. मागे वळून पाहिलं, तर एक टक्कल पडलेला मध्यमवयीन माणूस धापा टाकत समोर उभा होता. त्याच्या गळ्याभोवती शर्टाची कॉलर घामाने भिजली होती आणि शर्टाच्या काखाही घामाने ओल्या झाल्या होत्या. मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं, त्याला ओळखण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कोण आहे, हे काही माझ्या लक्षात आलं नाही.

“काय हो?” मी विचारलं. 

“माफ करा, मला एक मिनिट श्वास घेऊ द्या,” तो धापा टाकत म्हणाला.

तो माझ्यापर्यंत धावतच आला असावा, अशी मला शंका आली. तो सावरला तेव्हा त्याने त्याचा हात पुढे केला. त्याच्या तळहातावर मला काहीतरी छोटंसं, गडद रंगाचं दिसलं. मी नीट पाहिलं. ते माझंच माणकाचं कानातलं होतं. नकळत मी माझ्या कानाला हात लावला, तेव्हा डाव्या कानाची पाळी रिकामी असल्याचं मला जाणवलं.

“हे बहुतेक तुमचंच आहे,” तो हात पुढे करत म्हणाला, “तुमच्या पुढे काही बायका चालत होत्या. आधी मला वाटलं, हे त्यांचं असेल, पण त्यांच्या कानांत वेगळीच कानातली होती. मग तुम्ही याच रस्त्याने जाताना दिसलात, आणि आता मला दिसतंय की हे नक्की तुमचंच आहे. हे घ्या.”

त्याने माझ्या हातात ते कानातलं दिलं, आणि मी त्याचे मनापासून आभार मानले. मग तो शांतपणे निघून गेला. मी त्या कानातल्याकडे पाहिलं. तो आमच्या घरातला पिढ्यान्‌पिढ्यांचा ठेवा होता. नानीने तो अम्माला तिच्या लग्नात दिला होता, आणि नंतर अम्माने तो माझ्याकडे जपायला दिला. त्या अनोळखी माणसाच्या प्रामाणिकपणामुळे मनाला थोडा दिलासा मिळाला. काही लोकांना दुसऱ्याचं काही ढापायला क्षणभरही लाज वाटत नाही, हे माहीत असल्यामुळे त्या माणसाचा प्रामाणिकपणा मनाला भिडला. अशा चांगुलपणासाठी कृतज्ञता व्यक्त करणं पुरेसं असतं का, असा प्रश्न मला कधीकधी पडायचा.

***

दुपारची गर्दीची वेळ त्रासदायक असायची. रस्त्यावरचा प्रत्येकजण वैतागलेला आणि दिवसभराच्या कामानंतर किंवा शाळेनंतर लवकरात लवकर घरी पोहोचायच्या घाईत असायचा. कोण आधी घरी पोहोचेल याची जणू एक शर्यत लागलेली असायची. एम. ए. जिन्ना रोडवर रिक्षा यू-टर्न घेत होती, आणि समोरून येणाऱ्या गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने माझं डोकं ठणकायला लागलं होतं. त्या गर्दीमुळे मी अक्षरशः गळून गेले होते. मला एक कप चहाची नितांत गरज होती. एखाद्या नदीकडून येत असावा असा कुबट वास मला सतर्क राहायला भाग पाडत होता. तो कमी झाल्यावर मी रिक्षाच्या बाजूला टेकले, बाहेर पाहिलं आणि मग वर पाहिलं. या शहरासारखं पक्ष्यांनी व्यापलेलं आकाश कुठेच दिसत नाही. ते पक्षी आकाश आपलंच समजून उडतात, झेप घेतात, खेळतात, मुक्तपणे नाचतात. त्यांना असं दिमाखात उडताना बघणं माझ्यासाठी एक विशेष अनुभव असायचा.

भिट्टाई हॉल दिसायला लागला, तसं मी रिक्षावाल्याला दोन गल्ल्या आधीच थांबायला सांगितलं. मला थोडी सफरचंदं आणि टोमॅटो घ्यायचे होते. मी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबली, आणि मी त्याला पाचशे रुपये दिले. रोजच्या रोज ये-जा करताना आठशे-नऊशे रुपये खर्च होणं मनाला बोचायचं. दोन गल्ल्या पुढे चालत गेले, तर भाजी-मंडईभोवती माणसांची गर्दी उसळलेली दिसली. पुरुष, बायका, बाइकवरचे लोक, शाळकरी मुलं, सगळेच तिथं होते. सर्वात आधी मी माझ्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे गेले. तिथून चांगले पिकलेले टोमॅटो, अम्माला आवडणारी भेंडी, ताजी कांद्याची पात आणि एक किलो छोटे बटाटे घेतले. शेजारच्या फळांच्या टपरीवर इतकी छान दिसणारी केळी  होती, की त्यांच्याभोवती माश्याही घिरट्या घालत होत्या.

“भाई, केळी कशी दिलीत ?” मी केळ्यांकडे बोट दाखवत विचारलं.

“बाजी, दोनशे रुपये किलो,” तो दुसऱ्या ग्राहकाला संत्री देत म्हणाला.

“दोनशे ? गेल्याच आठवड्यात तर एकशे ऐंशी होती ना ?”

“बाजी, महागाई आहे, मी तरी काय करू ? हवं असेल तर अर्धा किलो शंभरला देतो.”

“ठीक आहे. अर्धा किलो संत्री आणि एक किलो सफरचंदंही द्या.”

त्याला चारशे तीस रुपये देऊन, मी अशा खरेदीसाठी नेहमी ठेवत असलेल्या एका रिकाम्या पिशवीत फळं आणि भाज्या घेऊन निघाले. त्या अरुंद रस्त्यात दरवळणाऱ्या तळलेल्या समोशांच्या आणि रोल्सच्या वासाने माझी भूक चांगलीच चाळवली गेली. शेवटी मी चार समोसे, तीन व्हेज रोल्स, आणि उद्याच्या नाश्त्यासाठी थोडासा रव्याचा शिरा घेतला.

खड्डे आणि समोरून येणाऱ्या बाइक्स चुकवत मी सावधपणे घरी जात होते. चालता चालता माझ्या पायांना माती लागल्याचं जाणवलं. पाय खडबडीत आणि उघडे दिसत होते. उद्यापासून सँडल न घालता बूटच घालायचे, असं मी मनाशी ठरवलं. आमच्या इमारतीच्या अंधाऱ्या जिन्यावर चढताना घरी पोहोचल्याचं समाधान झालं. मी बेल वाजवली. काही क्षणांनी अम्माने दरवाजा उघडला. तिने माझं स्वागत केलं आणि मी तिची विचारपूस केली. मग मी गेट आणि दार लावून घेतलं. 

बाहेरचा उकाडा इतका तीव्र होता की घरी परत येताच, छतावरच्या पंख्यांच्या थंड हवेमुळे मला लगेच शांत आणि प्रसन्न वाटलं. पूर्णपणे ताजंतवानं झाल्यावर, खरेदी केलेल्या वस्तू मी जेवणाच्या टेबलावर ठेवल्या. सँडल्स काढत मी अम्माला केळ्यांचे भाव कसे वाढले आहेत हे सांगितलं. भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर गेली, तेव्हा गंमत वाटली. शहरातल्या एका तासाच्या कामाला वाहतूक-कोंडीमुळे कधीकधी तीन तास लागू शकायचे.

“इथे गरीब माणसांनी कसं निभावायचं, याची कुणालाच पर्वा नाही,” अम्मा म्हणाली.

“अगं, मी समोसे आणि रव्याचा शिरा आणलाय. शिरा उद्यासाठी ठेव,” मी शाल काढून, ती कोट-रॅकवर टांगत तिला सांगितलं.

“बाहेरून जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ आणत जाऊ नकोस.”

“अम्मा, अधूनमधूनच आणतो ना आपण, चालतं अगं. मी हातपाय धुवून घेते, मग आपण जेवायला बसू.”

मी माझ्या खोलीतून कपडे आणि टॉवेल घेऊन येत होते, तेवढ्यात अम्माने मला हाक मारली. तिच्या हातातल्या प्लेटमध्ये समोसे आणि रोल्स होते आणि तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते.

“सना, अगं एवढं सगळं कशाला आणलंस ?”

“कशाला म्हणजे ? आपल्या सगळ्यांसाठी.”

“यांचा आकार बघता, एका व्यक्तीला एक समोसा पुरे होतो.”

ती एका माणसाला एक समोसा म्हणाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन, असं तिला सांगून मी पटकन आंघोळ करायला बाथरूममध्ये गेले. बाबा आता आमच्यासोबत जेवायला बसणार नाहीत हे मी कशी विसरले ? 

***

“नसीम जरा तणावात आहे सध्या,” ईशा सांगत होती.

“अगं काही नाही, तू काही काळजी करू नकोस. देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल. तो सक्षम आणि पात्र आहे. मला खात्री आहे की त्याला ते पद मिळेल.”

“त्याचा स्वतःवरच विश्वास नाही,” ती उसासा टाकत म्हणाली, “मी त्याला धीर दिला की तो उलट आणखीच बेचैन होतो.”

“पुढच्या वेळी मी त्याच्याशी बोलेन. कदाचित त्याला समजेल.” 

“कोण जाणे !” ईशा नुसतीच हसली.

फोनवर ईशाचा आवाज तुटत होता, म्हणून मी तिला तिचा प्रश्न पुन्हा विचारायला सांगितला. तिचा आवाज नीट ऐकू यावा म्हणून मी फोनचा आवाज वाढवला. 

“हाशिम फोन करतो का ?” तिने पुन्हा विचारलं.

हाशिम ! गावाला पोहोचल्यावर त्याने आम्हांला एकदाच फोन केला होता. त्यानंतर तो अम्माला फक्त अधूनमधून व्हॉट्सॲपवर व्हॉइस-नोट्स पाठवायचा. तो म्हणायचा की तो काम करतोय आणि बाबांच्या भावांकडून व चुलतभावांकडून शेती सांभाळायला शिकतोय. पण त्यात किती तथ्य होतं, कोण जाणे. तो कधीच गोष्टी जशा आहेत तशा सांगत नसे.

“तो जास्तकरून अम्माशीच बोलतो,” मी सूर्यफुलाच्या बीचं टरफल दाताने सोलून आतली छोटी बी खात म्हणाले.

“मला त्याची काळजी वाटते.”

“आपल्याला सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते.”

“नाही, मी फक्त त्याच्या वागण्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल म्हणत नाहीये,” ईशाच्या आवाजात चिंता होती, “माझं म्हणणं असं आहे की तो आपल्या सगळ्यांपेक्षा बाबांच्या जास्त जवळ होता. बाबांच्या मृत्यूचा त्याला खूप मोठा धक्का बसला असणार.”

“हाशिमला खरंच काही फरक पडत नाही. जाण्यापूर्वी तो फक्त पैशांबद्दलच बोलत होता.”

“आता तो स्वतःला घरचा प्रमुख समजतो, म्हणून असेल. तुमच्यासाठी काही करावं, असं त्याला वाटत असेल. कोण जाणे !”

“तो लहानपणापासून कधी सुधारला नाही, तर आता बाबा गेल्यानंतर तो बदलेल असं तुला खरंच वाटतं ?”

“दुःख माणसाला बदलून टाकतं, सना. मला माहीत आहे की तुझ्या आणि माझ्या मनात बाबांबद्दल कडवटपणा आहे, पण हाशिमचा त्यांच्यावर जीव होता. माझं म्हणणं चुकीचंही असू शकतं, पण कदाचित त्यांच्या जाण्यानंतर तो स्वतःला बदलायचा प्रयत्न करत असेल. तू एकदा त्याला फोन कर ना. माझा फोन तो उचलत नाही, पण तुझ्याशी कदाचित बोलेल. त्याला एकटं वाटत असेल गं.”

हाशिम आणि बाबा यांच्यात नक्कीच खूप जवळीक होती. तो जवळजवळ प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत असायचा. तो बाबांकडून चालायला शिकला, त्यांच्याबरोबर मशिदीत जायचा आणि बाबांशी चर्चा करण्यासाठी ते पाहायचे त्याच मालिका सुद्धा बघायचा. एका प्रकारे, बाबांना जाणून घेण्यासाठी तो आमच्याइतकाच आतुर होता.  आमच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो यात यशस्वी झाला. मला कधी कधी वाटायचं, हाशिमचं गावाकडे जाणं म्हणजे बाबांचा मान राखण्याचा प्रयत्न होता का ? की त्यांच्या अगणित आठवणींनी भरलेल्या घरापासून पळ काढण्याचा ? की दोन्ही ? मी त्याला बाबांच्या अंत्यविधीच्या वेळी किंवा मृत्युपत्राच्या सुनावणीच्या वेळी रडताना पाहिलं नव्हतं, उलट तो खूप बडबड करत होता. पण मग मला वाटलं की जर मी त्याच्या दुःख व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून त्याच्याबद्दल मत बनवलं असेल, तर माझ्यात आणि स्टाफरूममधल्या त्या न्याहाळणाऱ्या नजरांमध्ये फरक काय ?

काम आटोपल्यावर चालत जाणं, आणि चालून झाल्यावर बागेतल्या एखाद्या बाकावर बसून थोडा विसावा घेणं हा एक मोठा दिलासा वाटायचा. मी कधीकधी कोणताही विचार न करता, पण भावनांनी भारलेल्या अवस्थेत बाकावर नुसती बसून राहायचे. इथे आल्यावर अधूनमधून जुन्या आठवणी मनात दाटून यायच्या, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झाडांवर लक्ष केंद्रित करायचे. मंद वाऱ्यावर त्यांची हलकी डोलणारी हालचाल मनाला आनंद द्यायची.

बागेतल्या रॉबिन पक्ष्यांचं आणि चिमण्यांचं मंजुळ गाणं हे तिथं परत येत राहण्याचं कारण होतं. शहराच्या गोंगाटात पक्ष्यांचे आवाज ऐकू येणं जवळजवळ अशक्य झालं होतं. आमच्या बाल्कनीत आम्हाला अनेकदा कबुतरांची घुमघुम ऐकू यायची. पण रहिवासी इमारतींच्या, शॉपिंग मॉल्सच्या आणि कॉर्पोरेट इमारतींच्या दाट गर्दीत चिमण्यांचा किंवा पारव्यांचा चिवचिवाट कधीच ऐकू यायचा नाही.

माझ्या डोळ्यांसमोर मला अशीच एक काँक्रीटची वास्तू दिसत होती — आयकॉन टॉवर — उंच, दिमाखदार, सगळ्यांना आव्हान देत उभी असलेली वास्तू. मी पुन्हा समोरच्या झाडांकडे लक्ष वळवलं. ती झाडं त्यांच्या प्रत्येक हालचालीतून, अगदी शांत उभं राहण्यातूनही, काहीतरी सांगत असतात, असं वाटायचं. वाऱ्याने ती जोरात डोलू लागली की मी डोळे मिटून त्यांचा आवाज ऐकत बसायचे. ती झाडं समाधानी वाटायची. कृतज्ञ वाटायची. आपण मात्र इतके व्यग्र झालो आहोत की आसपासच्या निसर्गाचं ऐकायलाही थांबत नाही. लांबून गाड्यांचे कर्कश हॉर्न ऐकू येत होते, पण मी तिथं झाडांचंच ऐकत बसले होते, त्यांना म्हणत होते — 

तुमचं हे शांत शहाणपण मला थोडंसं द्या… म्हणजे मीही माझ्या मुळांशी जोडलेली राहीन.

मला आकाशात निर्धास्तपणे उडणारे पक्षी दिसले, आणि खाली, बागेत अन्न शोधत फिरणारे भुकेलेही. त्यांचं घर आकाशातही होतं, आणि जमिनीवरही. त्यांच्या त्या नशिबाची मला गंमत वाटली. घड्याळात वेळ बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता घरी जायलाच हवं. अम्मा वाट पाहत असेल, ती एकटीच असेल. आज कपडे धुवायचं ठरलं होतं. 

आज फराहने मला दोन कादंबऱ्या दिल्या होत्या — टोनी मॉरिसन यांची जॅझ आणि जेन ऑस्टिन यांची सेन्स अँड सेन्सिबिलिटी. माझ्यासारखी इंग्रजी कादंबऱ्या वाचणारी फराह ही एकमेव दुसरी शिक्षिका होती. त्यामुळे मी अधूनमधून तिच्याकडून पुस्तकं घ्यायचे, किंवा नवीन कादंबऱ्यांची तिला नावं विचारायचे. घेतलेली पुस्तकं मी साधारणपणे आठवड्याभरात परत करायचे, पण सरावपरीक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे, या वेळेस ती परत करायला कदाचित महिना लागायची शक्यता वाटत होती.

बऱ्याच दिवसांपासून मी पुस्तकाला हातही लावला नव्हता. बाबा गेल्यापासून मला पूर्वीसारखा कोणत्याच गोष्टीत रस वाटेनासा झाला होता. वाचन, टीव्ही-मालिका, घरातलं बागकाम, सगळंच मागे पडलं होतं. माझ्या शेल्फवरच्या पुस्तकांवर धूळ साचली होती. टीव्ही सुद्धा चादरीखालीच झाकलेला होता. त्यावर कोणी काहीच पाहत नसे, फक्त बाबाच मोठ्या आवाजात बातम्या बघायचे. आमच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमधली रोपं केव्हाच सुकून, त्यांचा रंग फिका पडून वाळून गेली होती. आमच्या घरावर दुःखाचं सावट पसरलं होतं. त्यामुळे आधीच शांत असलेली माणसं आणखी गप्प झाली होती. मी दगडी  बाकावरून शांतपणे उठले. घरी जाताना आठवणीने दुकानातून चहासाठी दूध घेतलं.

***

अम्मा तिच्या बेडरूममध्ये माझ्या डोक्याला खोबरेल तेल लावून मालिश करत होती. मी तिला सांगितलं होतं की केस नियमित धूत असूनही माझी टाळू कोरडी पडतेय. अम्माचं म्हणणं होतं की मी केसांना तेल लावत नाही, म्हणून असं होतंय. मला तिचं म्हणणं पूर्णपणे पटत नव्हतं, पण तरीही मी तिला माझ्या केसांना तेल लावू देत होते. माझ्या केसांतला अम्माच्या उबदार बोटांचा तो हलका, मायेचा स्पर्श मनाला खूप सुखावून जात होता. समोरच्या भिंतीला लागून असलेल्या ड्रेसिंग टेबलकडे लक्ष गेलं, आणि माझ्या काळजात वेदना दाटून आली. त्यावर बाबांचा केसांचा ब्रश अम्माच्या ब्रशच्या शेजारी तसाच जागेवर ठेवलेला होता. अम्माच्या परफ्यूमच्या बाटलीशेजारी त्यांची अर्धी वापरलेली अत्तराची बाटली, ईशाने पहिला पगार मिळाल्यावर भेट दिलेलं त्यांचं स्वॉचचं घड्याळ, अम्मा-बाबांच्या लग्नातला फ्रेम केलेला फोटो, आणि आम्ही सगळे लहान असतानाचा एक फॅमिली फोटो, सगळं त्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेलं होतं. त्यांच्या घरातल्या चपला पलंगाच्या त्यांच्या बाजूला तशाच ठेवलेल्या होत्या. एकेकाळी रोजच्या वापरात असलेल्या या वस्तू पाहून माझं मन भरून आलं.

“अम्मा ?”

“ह्म ?”

“आपल्याला सोडून गेलेल्या माणसांच्या वस्तूंचं शेवटी काय होतं ?”

मला जाणवलं की तिच्या हातांची हालचाल मंदावली, पण पूर्णपणे थांबली नाही. आमच्यामध्ये एक  शांतता पसरली, जी बाहेरून येणाऱ्या मोटारसायकलच्या कर्कश आवाजाने अधूनमधून भंग पावत होती.

“काय झालं ? तुला तुझ्या बाबांची आठवण आली का ?”

“तुला येते ?”

“कधीकधी येते, पण खरं तर, मला ते रोजच आठवतात,” तिचा आवाज जड झाला, “त्यांचा टूथब्रश अजूनही बाथरूममध्येच आहे, त्यांचा टॉवेल, रेझर आणि इतर लहानसहान वस्तूही आहेत. जेव्हाजेव्हा मी बाथरूममध्ये जाते, तेव्हा माझी नजर नेहमी आधी त्यांच्या टूथब्रशवरच पडते.”

“ते तुझ्याशी जसे वागले, त्यानंतर हे सगळं फेकून द्यावं असं तुला वाटत नाही का ?”

“कधीकधी,” ती हसली, पण तिच्या हसण्यात वेदना होती, “आम्ही आयुष्यभर कशाकशावरून भांडलो, तेही आता आठवत नाही. पण एक काळ असा होता, जेव्हा आम्ही एकमेकांना आवडत होतो. एका प्रकारे, त्यांच्या वस्तू पाहून मला रोज त्यांच्या मृत्यूविषयी पुन्हा पुन्हा नवीन गोष्टी शिकायला मिळतात असं वाटतं. मला माहीत आहे की एक दिवस मला त्यांच्या बहुतेक वस्तू देऊन टाकाव्या लागतील, पण सध्या तरी मला त्या जशा आहेत तशाच राहू द्यायच्या आहेत.”

कधीकधी मला वाटायचं, मी बाबांच्या जाण्याचं दुःख खरंच नीट पेललं का ? अम्मा बऱ्यापैकी सावरल्यासारखी वाटत होती. ईशासुद्धा. हाशिम मात्र कसा आहे हे मला कळत नव्हतं. आम्ही त्याच्याशी बाबांबद्दल बोललो, तरी तो त्यांच्याबद्दल काही बोलत नसे. तो मनातलं मनातच ठेवायचा. बाबांवर माझा रागही होता. त्यांनी मुलगा म्हणून हाशिमवर जास्त प्रेम केलं, याचं दुःख होतं. त्यांनी माझ्या कामाकडे कमीपणानं पाहिलं, त्याची ईशाच्या कामाशी तुलना केली, हेही मनाला लागलं होतं. ज्या बागेत मी नेहमी जाते, त्याच बागेत एकदा मी सात वर्षांची असताना धावत होते. ते माझ्या वेगाशी जुळवून घेऊ शकले नाहीत, तेव्हाही माझं मन मोडलं होतं. पण जेव्हा ते दर आठवड्याला गुपचूप फक्त मला आवडणारी हिरवी सफरचंदं फ्रिजमध्ये ठेवायचे, तेव्हा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, असंही वाटायचं. मला अचानक माझं तोंड  कडवट झाल्यासारखं वाटलं. आणि बाबा गेल्यापासून पहिल्यांदाच माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

“अम्मा, जो माणूस आपल्या शब्दांनी आणि कृतींनी आपल्याला दुखावतो, त्याच्यासाठी शोक कसा व्यक्त करायचा ?” मी घसा खाकरत तिला विचारलं.

“त्याला माफ करून.”

“आणि जर ते जड जात असेल तर ?”

“मग त्याला मनातून मुक्त करून.”

बाहेरचा रस्ता नेहमीप्रमाणेच गजबजलेला होता. विक्रेते त्यांच्या स्पीकरवरून स्वस्त फुलकोबी आणि टोमॅटो विकायला मोठ्याने ओरडत होते. काठीने टायर बडवणाऱ्या मुलांचं खळखळून हसणं गल्लीत ऐकू येत होतं. मोटारसायकलींचा कर्कश आवाज सतत येत होता. वरच्या मजल्यावर कुणी आजारी असेल, वृद्ध असेल, एखादं बाळ असेल किंवा अजूनही शोकात असणाऱ्या दोन बायका असतील, याची कोणालाच पर्वा नव्हती.

Image credit: Unsplash

Post Tags

Leave a comment