छोट्या कथा
अॅमस्टरडॅमच्या एका ट्रॅफिक सिग्नलपाशी मी उभा होतो आणि सहज लॅम्पपोस्टकडे लक्ष गेलं. एका छोट्याशा स्टिकरवर मी लहानपणी पाहिलेल्या कॉमिक बुकमधली दोन पात्रं होती. एकाच्या हातात एका देशाचा झेंडा होता, तर दुसऱ्याच्या हातात अर्धं कापलेलं कलिंगड. खाली डच भाषेत काहीतरी लिहिलं होतं, जे मला तेव्हा वाचता आलं नाही. सिग्नल हिरवा झाला आणि मी पुढे गेलो, पण ते स्टिकर मात्र डोक्यात राहिलं. कुणीतरी, कुठेतरी वेळ काढून हे चिकटवून गेलं होतं. पण कुणासाठी ? आणि कशासाठी ?
काही वर्षांपूर्वी मी नेदरलँड्स इथे स्थायिक झालो. बऱ्याच देशांचा प्रवास झाला होता, पण एखाद्या नव्या देशात राहून, तो जवळून अनुभवता यावा या विचाराने इथे येणं झालं. प्रवासातला तो नेहमीचा वेग बाजूला ठेवून एका जागी स्थिरावणं माझ्या फोटोग्राफीसाठी फायद्याचंच ठरलं.
नव्या जागेत, नव्या प्रवाहात, माझ्यातला फोटोग्राफर ओळखीच्या खुणा प्रथम शोधतो, त्यांच्या आधाराने तिथे पाय ठेवायला जागा मिळाली की नंतर ते अनोळखी जग नव्या दृष्टिकोनातून निवांत पाहता येतं. नव्या ठिकाणी चालणं उत्तम असतं, तेही भटकणं या अर्थाचं. शहर संथ गतीने पायाने मापावं, त्याच त्याच रस्त्यांवरून पुन्हा पुन्हा फिरत राहावं. कालांतराने पावलांना रस्ते ओळखू लागतात आणि शहरही हळूहळू बोलू लागतं.
स्ट्रीट फोटोग्राफीमधला, स्ट्रीट आर्ट हा माझा आवडता विषय. भिंतीवर अंग पसरलेले म्युरल आणि रंग-छटा-अक्षरलेखन यांची गुंफण घालणारी ग्रॅफिटी, हे मला रंगमंचावरील चित्रित पडद्यासारखे वाटतात. त्यांच्या पार्श्वभूमीवर मानवी हालचाली आणि क्षणोक्षणी बदलणाऱ्या प्रकाशछटा एक सुंदर फोटोग्राफिक फ्रेम देऊन जातात.
पण या भटकंतीदरम्यान मला एका नव्या कलाप्रकाराची ओळख झाली, ‘स्टिकर आर्ट’ (Sticker Art). अॅमस्टरडॅमच्या त्या सिग्नलवरचा क्षण ही फक्त सुरुवात होती.
कालांतराने जाणवलं, हे स्टिकर्स इथल्या अनेक शहरांमध्ये सर्वत्र दिसतात — लॅम्पपोस्टवर, भिंतींवर, युटिलिटी बॉक्सवर, कचऱ्याच्या डब्यांवर, सायकलींवर. गजबजलेल्या सिटी सेंटरमध्ये, शांत गल्ल्यांमध्ये, अगदी हायकिंग ट्रेलवरसुद्धा. काही ठिकाणी एखादे स्टिकर एकटेच लॅम्पपोस्टवर विसावलेले असायचे, तर काही भिंतींवर एकमेकांच्या अंगाखांद्यांवर गर्दी करत चढून बसल्यासारखे शेकडो स्टिकर्स दिसायचे.
ते कधी विनोदी असायचे. कधी उपहासाने भरलेले. कधी आकलनापलीकडचे.
मी फोनवर त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. हे सोपं होतं — माझा सिस्टम कॅमेरा बाजूला ठेवता यायचा. दुरून स्टिकर भावलं की थांबायचं, जवळून बघायचं, क्लिक करायचं.
हे स्टिकर्स मला कुणीतरी मागे ठेवून गेलेल्या चिठ्ठ्यांसारखे वाटायचे, तर कधी पत्रातल्या ता. क. (ताजा कलम) या टिप्पणीसारखे. सोशल मीडिया, न्यूज चॅनेलवर तासन्-तास बोलल्या गेलेल्या विषयांवर किंवा त्यांना विसर पडलेल्या पण शहरासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर — आपल्या मनातील उद्वेग, एका आफ्टरथॉटप्रमाणे मोजक्या शब्दांत लिहून ठेवल्यासारखे. कुणीतरी या धावत्या रस्त्यांवर थोडं थांबून वाचेल या आशेने.
सुरुवातीला मी या स्टिकर्सना फोटोग्राफीचा विषय म्हणून पाहिलंच नव्हतं. केवळ कुतूहलापोटी मी ते टिपायचो. पण हळूहळू या स्टिकर्समधून व्यक्त होणाऱ्या अभिव्यक्तींनी मला या नव्या देशातील संस्कृती आणि सामाजिक जाणिवा यांची जवळून ओळख घडवली. नकळत इथली शहरं माझ्याशी स्टिकर्सच्या माध्यमातून बोलू लागली.
कुजबुज
२०२५च्या सुरुवातीला माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे अशा हजारो स्टिकर्सचे फोटो जमा झाले आहेत. जेव्हा मी ते नीट पाहायला लागलो, तेव्हा मला त्यात काही विशिष्ट पॅटर्न दिसले.
या स्टिकर्समधून व्यक्त होणाऱ्या अभिव्यक्तींना जोडणारे काही समान धागे होते. त्यांची रचना, रूपकांची निवड, भाषा आणि मुद्रणकला या सर्व घटकांच्या निवडींमागे एक सखोल विचार डोकावत होता. हे स्टिकर्स पुन्हा पाहणं म्हणजे त्या शहराच्या तत्कालीन सामाजिक-राजकीय प्रतिक्रियांच्या भिंतीवरील खुणा वाचण्यासारखं होतं.
लिंगभाव, वर्णद्वेष, स्थलांतर, फॅसिझम — अशा अनेक मुद्द्यांवरील अभिव्यक्ती या स्टिकर्समधून दिसल्या. अगदी आठवड्याआधी घडलेल्या अमेरिकेच्या निवडणुकांच्या निकालावर भाष्य करणारे फॅसिझम-विरोधी स्टिकर्स. ‘Eat the rich’ असा जुना वर्गसंघर्ष, आणि त्याच्या शेजारी विद्यार्थ्यांच्या कर्जावरचे नवे वाद दाखवणारे स्टिकर्स. एका स्टिकरमध्ये तेलात बुडालेली फूटबॉल ट्रॉफी — सौदी वर्ल्ड कपचा निषेध. दुसऱ्या स्टिकरमधून डोकावणारं छोटं वासरू आणि चित्राखाली — ‘I need my mother’s milk’ हे वाक्य. आणि या तीन वर्षांच्या काळात, पॅलेस्टाइन आणि युक्रेन यांच्यामधल्या जागतिक संघर्षांवर वेळोवेळी आपला उद्वेग ओरडून सांगणारे अनेक स्टिकर्स. प्राणी आणि पर्यावरण संवर्धन, कामगारांचे प्रश्न, घरांचा तुटवडा, महागाई, परराष्ट्रधोरण, हे सगळं एकाच लॅम्पपोस्टवर शेजारी-शेजारी.
यांतले बहुतेक स्टिकर्स जेमतेम २ x २ इंचाचे, निनावी कॅनव्हाससारखे — नाव नाही, श्रेय नाही.
प्रत्येक स्टिकरला स्वतःची अशी स्वतंत्र अभिव्यक्ती. पण एकत्र पाहिले की त्यांच्यात एक संवाद ऐकू यायचा — शहरातील भिंतींमधून चाललेला एक सलग संवादाचा थर.
मला ते विखुरलेल्या भावनांना फुटलेला शहराचा एक आवाज वाटायचे, पण असा आवाज, जो कोण्या एका लेखकाचा नव्हता.
इथून पुढे शहरात भटकताना, जाणीवपूर्वक थांबून स्टिकर्सची ही कुजबुज ऐकणं माझ्यासाठी अपरिहार्य होतं.
शहराचा आवाज
डच स्ट्रीट आर्ट संस्कृतीत स्टिकर्सचं स्थान वेगळं आहे. आकाराने छोटे, मोठ्या संख्येने छपाईसाठी सोयीस्कर, तुलनेने स्वस्त, लावायला सोपे, आणि मागोवा घ्यायला कठीण. वैयक्तिक पण एकत्रित परिणामात मोठे.
न्यूज, अॅडव्हर्टायझमेंट आणि सोशल मीडिया या माध्यमांसारखी इथे अधोरेखित नियम आणि बंधनं नाहीत. इथे वैयक्तिक भावनांना मोकळा श्वास घेता येतो. आणि कदाचित म्हणूनच, स्टिकर्स शहरांना एक निर्भीड आवाज देतात, त्या त्या शहराचा एक स्वतंत्र आवाज, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा.
अॅमस्टरडॅम, हे नेदरलँड्सच्या बाहेर बहुतेकांना माहीत असलेलं शहर, उदार मूल्यांसाठी प्रसिद्ध, प्रवाशांनी भरलेलं. त्या भव्य सेंट्रल स्टेशनमधून बाहेर पडलं की वाटतं, आपण जणू जगाच्या नकाशाच्या मधोमध उभे आहोत. हे शहर एकाच वेळी काहीसं पोक्त आणि थोडंसं वात्रट वाटतं. इथल्या भिंतींवर पर्यावरणातील बदल, जेंडर पॉलिटिक्स आणि जागतिक विषययांची दाटी असते, आणि त्यांच्या बरोबरीने कला आणि विनोद यांचा उत्तम मिलाफ दिसतो. एका लॅम्पपोस्टवरच्या गर्दीत मला एक स्टिकर सापडलं — काळ्या-पांढऱ्या रेषांत रेखाटलेलं, खाली शीर्षक — Buried Beds & Bicycle Frames. कालव्याच्या पाण्यात बुडालेला एक बेड, अर्धी डोकावणारी सायकलची चाकं, आणि एक जुनी लॅम्पपोस्ट — एका छोट्या चित्रात या शहराने काळाच्या प्रवाहात गिळून टाकलेल्या असंख्य गोष्टीचं मर्म. इथे प्रत्येक कोपरा नेहमीच एखाद्या स्टिकरने ‘बुक’ केलेला असतो.
रॉटरडॅम, हे एक बंदराचं शहर — युरोपातलं सगळ्यात मोठं आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण. कामानिमित्त माझं इथे वारंवार जाणंयेणं होतं. दुसऱ्या महायुद्धात हे शहर जवळजवळ पूर्ण जमीनदोस्त झालं होतं, आणि नंतर पुन्हा सुरुवातीपासून बांधलं गेलं. आता ते आधुनिक इमारतींनी भरून आलंय, पण त्याच्या भूतकाळाचे व्रण अजूनही दिसतात. ऐतिहासिक वास्तू नसल्यामुळे शहराला एका ‘मोकळ्या कॅनव्हास’चा फील आहे. इथे भिंती सगळ्यांसाठी खुल्या असतात. एका पॅनेलवर दिसलेलं स्टिकर आठवतं — सुटातला एक माणूस, पण डोक्याच्या जागी एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा, आणि खालचे पाय एखाद्या कुत्र्याचे. थोडंसं विचित्र पण कमालीचं मार्मिक — सत्ता, पाळत, आणि सुटामागे लपलेल्या पशुवृत्तीवर एका चित्रात केलेलं भाष्य. अॅमस्टरडॅमच्या जुन्या-शहरी संयमापेक्षा रॉटरडॅमच्या स्टिकर्सची अभिव्यक्ती अधिक खेळकर, प्रयोगशील आणि मार्मिक वाटते.
आयनहोवन — जिथे मी राहतो आणि काम करतो. फिलिप्स कंपनीच्या लाइट बल्बचं जन्मस्थान. इथल्या बऱ्याच नावाजलेल्या डिझाइन अकॅडमींमुळे हे देशाचं डिझाइन-कॅपिटल मानलं जातं. उत्तरेकडच्या डच शहरांपेक्षा अधिक जुने असलेले औद्योगिक कारखाने आता स्टुडिओमध्ये बदलले आहेत, हे सगळं इथल्या भिंतींवर वेगळ्या पद्धतीने उमटतं. इथे भिंतीवर दिसलेलं एक स्टिकर — काळ्या-पांढऱ्या रंगात एक आकृती वाऱ्याशी झुंज देणाऱ्या छत्रीला धरून उभी, आणि ठळक टायपोग्राफीत दोन ओळी: ‘BOYCOTT UMBRELLAS / GET WET’. इथल्या सततच्या पावसाळी हवामानाची ही मस्करी, पण त्याच वेळी एखाद्या मॅनिफेस्टोसारखी. इथले स्टिकर्स जास्त कल्पक, डिझाइन-ओरिएंटेड, टायपोग्राफिक असतात. इथे निषेधाच्या आधी विनोदबुद्धी आणि घोषणेच्या आधी कलात्मक संवेदना महत्त्वाच्या ठरतात.
द हेग — इथे डच संसद भरते, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, आणि अनेक परकीय दूतावास इथेच आहेत. जागतिक राजकारणाचं सान्निध्य असलेलं शहर. आणि हे सान्निध्य भिंतींच्या सुरालाही बदलतं. राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांचे गट, आंतरराष्ट्रीय एकजूट चळवळी, सगळेच विषय इथल्या जागेसाठी स्पर्धा करतात. इथले स्टिकर्स वर्तमानपत्रांतल्या राजकीय व्यंगचित्रांसारखे वाटतात — मार्मिक, मुद्द्यावर नेमकं बोट ठेवणारे. इथलं एक स्टिकर मला अजूनही आठवतं — सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं चित्र, मधोमध दोन भागांत विभागलेलं; एका बाजूला अतिरेक्याच्या वेषात, दुसऱ्या बाजूला पाश्चात्य सुटात — त्याच्या पूर्वायुष्याचा विचार करता, त्याला एक वैध राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता द्यावी का, हा प्रश्न उपस्थित करणारं.
सामाजिक विषयांइतकाच आणखी एक महत्त्वाचा विषय या सर्व शहरांमध्ये दिसतो — फूटबॉल आणि स्पोर्ट्स क्लबमधील पारंपरिक वैर. स्थानिक फूटबॉल टीमला पाठिंबा देण्यासाठी आणि पाहुण्या प्रतिस्पर्धी टीमला हिणवण्यासाठीसुद्धा स्टिकर्स एखाद्या शस्त्रासारखे वापरले जातात. सर्व काही खिलाडूवृत्तीने पण अतिशय सीरियसली.
गेल्या काही वर्षांत, ही शहरं माझ्यासाठी एका प्रकारे भेटीच्या जागा झाली आहेत, जिथे मी एखाद्या नव्या स्टिकरला भेटायला, त्याची गोष्ट ऐकायला जातो. प्रत्येक वेळी एखादं स्टिकर जाऊन त्याच्या जागी दुसरं येतं. नवा आवाज, नवी कुजबुज घेऊन.
संवाद
कोण्या अनोळखी व्यक्तीचं या स्टिकर्सच्या माध्यमातून आपल्या शहराबद्दल, तसंच स्थानिक आणि जागतिक घडामोडींवर, अतिशय प्रामाणिकपणे आणि सहजतेने व्यक्त होणं… आणि ते स्टिकर्स संकलित करणं, हे आजही सुरूच आहे.
स्टिकर्सनी व्यापलेली ही भिंत म्हणजे एक अशी जागा आहे, जिथे परस्परविरोधी मतं मोकळेपणाने मांडली जातात; पण अंतिम निर्णय मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य माणसावरच सोपवला जातो.
स्टिकर्सच्या माध्यमातून शहरं माझ्याशी बोलू लागली, आणि अप्रत्यक्षपणे माझा इथल्या लोकांशी संवाद साधला गेला. सामाजिक प्रवाहांचं भान येत गेलं; इथला समाज कोणत्या मूलभूत मूल्यांना प्रमाण मानतो, आणि इथली अभिव्यक्ती अन् निषेधाची भाषा नेमकी कशी व्यक्त होते — हे मला उमजू लागलं.
काही दिवसांपूर्वी पुन्हा अॅमस्टरडॅमच्या त्याच ट्रॅफिक सिग्नलवर पाहिलं, तर ते जुनं कलिंगडवालं स्टिकर तिथे नव्हतं. त्याच्या जागी एक नवं स्टिकर होतं — समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर वितळत चाललेला एक आइस्क्रीमचा कोन, आणि वर डच भाषेत एक वाक्य : ‘DIT IS DE KOELSTE ZOMER VAN DE REST VAN JE LEVEN.’ म्हणजेच, ‘हा तुझ्या उरलेल्या आयुष्यातला सर्वांत थंड उन्हाळा आहे.’ आणि त्याच्याच शेजारी, अर्धवट फाटलेलं दुसरं स्टिकर — ‘NO INSECTS NO FOOD.’ एका लॅम्पपोस्टवर, दोन वाक्यांत पुढच्या काही दशकांच्या भविष्याची चाहूल. सिग्नल हिरवा झाला. मी पुढे गेलो, पण ती स्टिकर्स मनात राहिली.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram













