Skip to content Skip to footer

‘तारा आणि हळवेपणाच्या गोष्टी : मोठं होत जाण्याची कहाणी’ | मूळ कथन : स्नेहा बिस्वास । मराठी अनुवाद : प्रिया साठे

Discover An Author

  • Sneha Biswas is an art practitioner and researcher with a background in Art History and English literature. She spends most of her time engaging with the criticality of meaning-making and the intersections of the image and internet culture. She has written a few essays, interview pieces, and exhibition reviews for Critical Collective, Usawa Literary Review, and Serendipity Arts. She was shortlisted for the Digital Art section of Toto Funds The Arts 2025.

     

    स्नेहा बिस्वास ह्या कला-अभ्यासक आणि संशोधक असून, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी कला-इतिहास आणि इंग्रजी साहित्य ह्या विषयांची आहे. अर्थनिर्मितीची प्रक्रिया, तसेच प्रतिमा आणि महाजाल-संस्कृती ह्यांच्यातील संबंध ह्याविषयी विचार करण्यात त्या त्यांचा बहुतांश वेळ व्यतीत करतात. त्यांनी क्रिटिकल कलेक्टिव्ह, उसावा लिटररी रिव्ह्यू आणि सेरेंडिपिटी आर्ट्स ह्यांसाठी काही निबंध, मुलाखती आणि प्रदर्शन-परीक्षणे लिहिली आहेत. 'टोटो फंड्स द आर्ट्स २०२५'च्या डिजिटल आर्ट विभागासाठी त्यांची अंतिम निवड झाली होती.

  • Translator and Writer

    Priya Sathe is a writer with a keen interest in storytelling and film reviews. Her short stories have been published in literary magazines such as Maher and Saptahik Sakal. She has also worked on the English rendering of two books by the renowned watercolour artist Milind Mulick. She runs a blog titled Wovenfeelings, where she publishes poetry in English, Hindi, and Marathi.

    प्रिया साठे ह्या लेखिका असून त्यांना कथालेखनाची आणि चित्रपट-परीक्षणाची विशेष आवड आहे. त्यांच्या कथा माहेर आणि साप्ताहिक सकाळ ह्यांसारख्या नियतकालिकांत प्रकाशित झाल्या आहेत. जलरंग-चित्रकार मिलिंद मुळीक ह्यांच्या दोन पुस्तकांचे इंग्रजी शब्दांकनही त्यांनी केले आहे. ‘Wovenfeelings’ ह्या त्यांच्या अनुदिनीवर त्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांतील स्व-रचित कविता प्रकाशित करतात.

जागतिकीकरणाच्या व्यापक सांस्कृतिक वातावरणात, दूरसंचार-साधनांनी लेखिकेची वैयक्तिक जडणघडण कशी घडवली, याचा वेध घेणारं हे दृश्यात्मक आत्मकथनात्मक लेखन आहे.

मानवी आयुष्य संवादातून घडत जातं. आपल्याला उपलब्ध असलेल्या संवादमाध्यमांमुळे आणि त्या संवादाला आकार देणाऱ्या सामाजिक-ऐतिहासिक परिस्थितींमुळे आपण घडत असतो. माझा जन्म सन २०००च्या उंबरठ्यावर कोलकात्यातील एका पारंपरिक बंगाली कामगारवर्गीय कुटुंबात झाला. मी मोठी होत होते, तो काळ झपाट्याने विकसित होत असलेल्या संवाद-तंत्रज्ञानाच्या उत्साहाने आणि नवलाईने भरलेला होता. विविध दूरसंचार-साधनांचं आमच्या घरात झपाट्याने आगमन होत होतं. घरातल्या दैनंदिन आयुष्याचा आणि गुपितांचा भाग बनलेल्या या साधनांनी माझ्या जडणघडणीच्या काळातील कोमल मनावर आणि वाढत्या शरीरावर खोल ठसे उमटवले. या संवाद-साधनांशी संबंधित काही उत्कट प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात आहेत. असे क्षण, ज्यांनी माझ्या आयुष्याची दिशा बदलली आणि शक्यतांच्या नव्या वाटांकडे मला ढकललं. शांतपणे आणि तितक्याच तीव्रतेने, या प्रत्येक क्षणात एक प्रकारची मुक्ती मिळाल्यासारखं वाटत होतं, आणि त्यासोबत परिवर्तनाची जाणीवही होत होती. आता मागे वळून पाहताना, त्या अनुभवांना ‘मुक्ततादायी’ म्हणणं मला आवश्यक वाटत नाही. पण माझ्या मोठं होत जाण्याच्या प्रवासातील अनेक महत्त्वाचे टप्पे त्यांनी व्यापलेले आहेत. आज मी जी आहे, ती घडवणाऱ्या माझ्या इच्छांना आणि निवडींना आकार देण्यात त्या क्षणांचा मोठा वाटा आहे. या आठवणींकडे, त्यांच्या विस्कळीत आणि तुटक स्वरूपासह, दृश्य आणि लिखित अशा दोन्ही माध्यमांतून थोडक्यात पुन्हा पाहण्याची माझी इच्छा आहे.

१. I२४०११६८९

मला तेव्हाचं माझं वय आठवत नाही, पण मला ते छोटे पांढरे मलमलचे फ्रॉक घातल्याचं आठवतं. ते हलके आणि हवेशीर होते, ज्यावर नाजूक चिकनकारी भरतकामाची अगदी थोडीशी नक्षी होती. ते खूप लहान मुलींसाठी असायचे, त्याअर्थी मी चार-पाच वर्षांपेक्षा मोठी नसेन.

मला चालता येत होतं, पण टेबलावर ठेवलेल्या आमच्या लाल रंगाच्या लँडलाईन टेलिफोनपर्यंत स्वतःहून पोहोचण्याइतकी माझी उंची नव्हती. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला कुणीतरी उचलून घ्यावं लागे किंवा मला एखाद्या स्टूलवर चढावं लागे. आमच्याकडे बीएसएनएलचं कनेक्शन होतं. त्या लँडलाइनचा नंबर ही अंकांची पहिली मालिका होती, जी मला व्यवस्थित पाठ झाली होती.

०३३२४०११६८९

२४०११६८९   २४०११६८९    २४०११६८९

२४०११६८९    २४०११६८९   २४०११६८९

मी त्या आकड्यांचा क्रम स्वतःशी पुन्हा पुन्हा घोकत राहायचे. त्याला गाण्यासारखी चढ-उतार असलेली एक लय होती. मी त्याचं एक छोटंसं गुप्त गाणं बनवलं होतं. तो नंबर पाठ करण्याच्या प्रक्रियेतच मला पहिल्यांदाच आपलेपणाची एक खोल जाणीव झाली — ‘घर’ नावाची एक जागा आहे, आणि त्या जागेशी माझं नातं आहे.

२. घरातील अंतरंग-लहरी

माझे वडील अबोल होते आणि त्यांचा स्वभाव तापट होता. आई-वडिलांच्या नात्यात भावनिक दुरावा होता. त्यामुळे घरात नेहमी एक उदास वातावरण जाणवत असे. लहानपणीच मी खोलीतील वातावरणाचा अंदाज घ्यायला शिकले होते. मी लहानसहान गोष्टींमध्ये स्वतःला ताब्यात ठेवत मोठी झाले. कुठलाही अनुचित परिणाम ओढवू नये म्हणून मी कमी जागा व्यापत असे, आवाज होऊ नये म्हणून सावधपणे वावरत असे. जेवणाच्या टेबलावरची ती विशिष्ट शांतता म्हणजे गप्प बसून जेवायचं, हे मला कळून चुकलं होतं.

पण काही दुपारी मात्र अतिशय मऊ आणि निवांत वाटत. माझ्या आठवणीत त्या दुपारी नेहमीच मावळत्या उन्हाच्या मधाळ, उबदार प्रकाशाने भरलेल्या आहेत. आठवड्यातून एखाद-दोनदा एक फोन यायचा आणि आई अलगद पावलांनी वाजणाऱ्या लँडलाइनकडे जाऊन किंचित लाजत तो उचलायची. मग बराच वेळ संभाषण चालायचं. आई फारसं बोलत नसे, पण तिच्या चेहऱ्यावर एक मंद शांत आनंद नेहमीच उजळून यायचा. त्या क्षणांत ती इतकी गोड, इतकी तरुण आणि निरागस दिसायची की तिची एक झलक पाहण्यासाठी मी मुद्दाम घराच्या त्या कोपऱ्यात घुटमळत राहायचे.

हे फोन माझ्या आई-वडिलांचा जुना मित्र असलेल्या, एका मामाचे असायचे. मी त्यांना ‘रमेश मामा’ म्हणायचे. रमेश मामा आणि माझी आई यांच्यात या फोनकॉल्समधून सतत संपर्क राहिला. माझ्या आईचं आयुष्य माझ्या वडिलांच्या मर्यादित विश्वातच अडकलेलं होतं, तर दुसरीकडे रमेश मामा शहराशहरांत, देशोदेशी फिरत असत आणि त्यांचे अनुभव तिला सांगत असत. स्वतःच्या वास्तवाच्या चौकटीत अडकलेल्या आईला या फोनकॉल्समधून एका मोठ्या जगाची ओळख होत गेली. त्यामुळे तिच्यात एक प्रकारची जगाची जाण निर्माण झाली. नकळत तीच दृष्टी तिने मला शिकवताना माझ्यातही रुजवली. माझ्या आईच्या मनातली जगाकडे बघण्याची ओढ माझ्यात फार लहानपणीच रुजली होती. जणू त्या साध्यासुध्या दूरध्वनीच्या उपकरणामुळे आम्ही तिघेही काळ आणि अंतर ओलांडणाऱ्या एका समान भावनेने जोडले गेलो होतो.

३. गुपितांसाठी मौन आवश्यक असते !

मला वाटतं, मोठ्यांचे हावभाव मुलं नकळत उचलतात, तसं मला तिच्यासारखं वागून पाहायचं होतं. मला टेलिफोन वापरायचा होता आणि आईच्या दुपारच्या टेलिफोनवरील संभाषणात जाणवणारी गुपिताची भावना अनुभवायची होती. त्या काळच्या बहुतेक लँडलाइन फोनना डिस्प्ले स्क्रीन नसायचा, त्यामुळे फोनवरील संभाषणांमध्ये बऱ्यापैकी अनामिकता होती. आमचा लँडलाईनही बिनडिस्प्ले स्क्रीनचा होता, त्यामुळे येणाऱ्या फोनचे नंबर दिसत नसत, कोण फोन करत आहे हे कळत नसे आणि केलेल्या फोन-कॉल्सची कोणतीही नोंद राहत नसे. जेव्हा कधी संधी मिळायची, तेव्हा मी एक प्लास्टिकचं स्टूल टेबलाजवळ ओढून आणायचे, त्यावर चढायचे आणि माझ्या लँडलाईनवरून कोणतेही नंबर फिरवायचे. जर कधी फोन लागलाच आणि पलीकडून कोणी तो उचलला, तर मात्र मी काही बोलायचे नाही.

पलीकडून कुणी अनोळखी व्यक्ती “हॅलो ?” म्हणायची. 

मग क्षणभर थांबून, पुन्हा “हॅलो ?” ऐकू यायचं.

मी मात्र काही बोलायचे नाही.

“कोण बोलतंय ? बोला !” पलीकडून आवाज यायचा.

थोड्याच वेळात त्या आवाजात चिडचिड आणि राग जाणवायचा. मी मात्र शांतपणे ऐकत राहायचे. माझ्या न बोलण्याने त्या व्यक्तीची अस्वस्थता वाढत जायची. ज्या महिन्यांत मी हे उद्योग करायचे, त्या महिन्यांत लँडलाइनच्या बिलांवर अनेकदा अनपेक्षित आकडे दिसत. हे असं का होतंय, याचं माझ्या आई-वडिलांना आश्चर्य वाटे. ते याचा दोष सेवा पुरवणाऱ्या कंपनीला देत. त्यांना कधी माझ्यावर संशय कसा आला नाही, याचं मला आजही आश्चर्य वाटतं ! कदाचित तेव्हा मी खूपच निरागस दिसत असेन. घरात पसरलेल्या त्या गूढतेचा मला आनंद वाटायचा. आई ज्या हळव्या, गुप्त फोनकॉल्सची वाट पाहायची, त्यांच्याशी मी हा छोटासा उद्योग जोडला होता. त्यामुळे हे करताना मला जणू आईबरोबर एक गुपित शेअर करत असल्यासारखं वाटायचं.

४. हा मिनिटं…

मी साधारण नऊ वर्षांची असताना, पुतुल दी नावाची माझी एक खूप मोठी चुलतबहीण जवळपास वर्षभर आमच्याकडे राहायला आली. आमच्या घराजवळच्या एका संस्थेत तिला प्रमाणपत्र-अभ्यासक्रम करायचा होता. ती एकोणीस वर्षांची होती. ती खूप सुंदर आणि तापट स्वभावाची आहे, असं सगळे म्हणायचे. तिने लगेचच माझी जबाबदारी घेतली, आणि ती जिथे जिथे जायची तिथे मला तिच्यासोबत घेऊन जाऊ लागली. दुपारी उशिरा, साधारण साडेचार-पाचच्या सुमारास, ती मला फिरायला बाहेर घेऊन जायची आणि दहा रुपयांच्या तिच्या छोट्याशा बजेटमध्ये मला काहीतरी खाऊपिऊ घालायची. मला सगळ्यात आवडणारा उसाचा रस, किंवा थम्स अप, स्लाइस, चिप्सचं पाकीट, एखादा चॉकलेट बार, यापैकी काहीही. हे फेरफटके फार तर तासाभराचे असायचे. सहा वाजायच्या आत आम्हाला घरी परतावं लागे, कारण माझे आई-वडील त्यांच्या सोबतीशिवाय मला सूर्यास्तानंतर बाहेर राहण्याची परवानगी देत ​​नसत. या बाहेर जाण्याचा खरा उद्देश मात्र वेगळाच होता. आमच्या वस्तीला शहरापासून वेगळं करणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे एका ठराविक पी.सी.ओ बूथमधून तिला तिच्या प्रियकराला फोन करायचा असे. एक मिनिट बोलायला दोन रुपये. ती मला बूथमध्ये सोबत घेऊन जाई, पण ती इतक्या हळू आवाजात बोलत असे की मला काहीच ऐकू येत नसे. तरीसुद्धा, गुपचूप फुलत असलेल्या एका प्रेमकथेची खरीखुरी साथीदार असणं मला फार रोमांचक वाटायचं. दर मिनिटाला कॉल सुरू ठेवण्यासाठी नाणं टाकण्याचं काम ती मला करू देई. तिच्याकडे साधारण वीस रुपयेच या फोनकॉलसाठी असत, म्हणजे प्रेमिकांना एकमेकांचे आवाज ऐकण्यासाठी फक्त दहा मिनिटं मिळत. आजच्या काळाच्या आपल्या संकल्पनेत दहा मिनिटं फारच कमी वाटतात. पण त्या काळात जगणाऱ्या आम्हां सर्वांना ती खूप मोठी वाटायची. त्या काही मिनिटांतच त्यांचं प्रेम जपलं जायचं, वाढायचं. एका साध्या फोनमुळे त्यांना एकत्र राहण्याचे ते छोटे क्षण मिळत होते.

५. मिस्ड कॉल्स !

ज्या प्रकारच्या वागणुकीला आज आपण संशयास्पद मानतो, त्या २०००च्या दशकातील प्रेमसंस्कृतीत अगदी सामान्य गोष्टी होत्या, हे आता आठवलं की थोडं चमत्कारिक वाटतं. किशोरवयाच्या उंबरठ्यावर उभी असताना, मी माझ्या लैंगिकतेशी चाललेल्या झगड्यांतून हे जग समजून घेऊ लागले होते. इतरांच्या हावभावांमधून आणि प्रतिसादांमधून स्वतःकडे हळूहळू एक स्त्री म्हणून पाहू लागले होते.

एकदा ऑटोच्या प्रवासात माझी एका मुलाशी भेट झाली. पहिल्याच नजरेत तो मला खूप आकर्षक वाटला होता. मी ऑटोमध्ये बसणार इतक्यात आमची नजरानजर झाली. तो लगेच घाईघाईने पुढे आला, त्याच ऑटोत चढला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. प्रवास फक्त दोन थांब्यांचाच होता. पण त्या छोट्याशा भेटीतच आमच्यात एक वेगळी ओढ निर्माण झाली होती. जणू एकमेकांशी बोलावं, संवाद सुरू करावा, अशी एक नि:शब्द इच्छा हवेत भरून राहिली होती. पण आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नाही. आजच्या तुलनेत त्या काळात किशोरवयीन मुलामुलींच्या मनांत खूप संकोच आणि भीती होती. लोकही लगेच लक्ष ठेवून बोलत असत. त्यामुळे नंबरांची उघडपणे देवाणघेवाण करण्याचं धाडस ना त्याला होत होतं, ना मला. अधूनमधून संकोचत तो त्याच्या कोपराने माझ्या हाताला स्पर्श करत होता, आणि मी मात्र तणावाने आणि अवघडलेपणाने अगदी ताठ बसून राहिले होते. मग मी पाहिलं की त्याने आपला क्वर्टी फोन बाहेर काढला, त्यावर एक नंबर टाइप केला, आणि क्षणभर स्क्रीन मला दिसेल असा माझ्यापुढे धरला. तो मला त्याचा नंबर देत होता, हे मला समजलं. पण माझी आतुरता एका क्षणात घाबरगुंडीत बदलली, आणि मी तो नंबर नीट लक्षात ठेवायच्या आतच ऑटो त्याच्या थांब्यावर येऊन थांबली, जिथे तो उतरून गेला.

तो संवाद मग कधीच घडला नाही.

६. ऑनलाइन जगात मोठं होणं, स्वतःला नाव देणं

किशोरवयात मी आयुष्याच्या एका वेगळ्याच उन्मेषात जगत होते. पण माझ्या घरात तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीसाठी फारसं योग्य वातावरण नव्हतं. लैंगिक जागृतीमुळे मनात निर्माण होणाऱ्या गोंधळांशी मला एकटीलाच झुंज द्यावी लागत होती. तोपर्यंत आमच्या घरात संगणक आणि इंटरनेट आलं होतं. माझ्या आसपासचं जग मर्यादित आणि गुदमरवणारं वाटत होतं. त्यामुळे मी स्वतःला इंटरनेटच्या अमर्याद जगात झोकून दिलं. मी डोळे विस्फारून स्क्रीनकडे पाहत बसायचे. मला जगाबद्दल जाणून घ्यायचं होतं. माझ्या मनातली माझ्या अस्तित्वाशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरं मला तिथे शोधायची होती. काही काळातच मी त्या वेळच्या इंटरनेट-संस्कृतीचा एक विचित्र भाग बनले होते. टीव्हीवरील पॉप कल्चर आणि तासन्-तास इंटरनेट वापरणं यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. मला खूप छान चित्र काढता येत होतं, आणि मी सर्व प्रकारच्या कला, त्यांचा इतिहास आणि तंत्रं यांच्याबद्दल शिकत होते. फेसबुकवर अकाउंट उघडण्याच्या खूप आधी मी डेव्हिएंटआर्टवर होते. इंटरनेटवरची चित्रं पाहून मी जवळजवळ रोज काहीतरी स्केच किंवा चित्र काढत असे. आईच्या २ एम पी 2MP कॅमेरा फोनने त्यांचे फोटो काढून मी ते त्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत असे. तिथे माझा एक मित्र झाला होता, ज्याच्याशी मी नियमितपणे गप्पा मारत असे. माझ्या अकाउंटचं नाव काय होतं, हे आता मला आठवत नाही, याची मला खंत आहे. माझ्यावर सगळ्यांत जास्त प्रभाव मात्र अमेरिकन सुपरहिरोंच्या जगाचा होता. मी डीसी कॉमिक्सची खूप मोठी चाहती बनले होते. कॉमिक्समधल्या पात्रांची चित्रं कॉपी करत-करत मी मानवी आकृत्या काढायला शिकत होते. भारतामध्ये सहज मिळत नसलेल्या अनेक कॉमिक्सच्या आणि ग्राफिक नॉव्हेल्सच्या सीबीआर फाइल्स (कॉमिक बुक रीडर) डाउनलोड करायलाही मी शिकले होते. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आल्यावर मी भारतात उपलब्ध असलेल्या, मला परवडणाऱ्या किंवा न परवडणाऱ्या सर्व ग्राफिक नॉव्हेल्सची यादी अक्षरशः वेड्यासारखी स्क्रोल करत असे. लवकरच माझी ओळख ॲलन मूर आणि फ्रँक मिलर यांच्या कामाशी झाली. एचबीओवर ‘सिन सिटी’ आधीच प्रसारित झालं होतं, जे मी पाहिलं होतं. पण नंतर मला समजलं की त्या चित्रपटाआधी त्याच नावाची कॉमिक मालिका आली होती. ती फ्रँक मिलर यांनीच लिहिली आणि रेखाटली होती. त्या कलेने माझ्या देहात आणि मनातच जणू एक मोठा बदल घडवला. ‘घोस्ट इन द शेल’ आणि ‘अकिरा’ यांनी माझ्या कल्पनाशक्तीसमोर मानवी मर्यादांपलीकडच्या अस्तित्वाच्या नव्या शक्यता उघडल्या.

माझ्या मनात सतत कुतूहल होतं. त्यामुळे मी वेगवेगळ्या जीवनशैलींबद्दल आणि लैंगिक ओळखींबद्दल जाणून घेऊ लागले. फरीज, कॉसप्ले करणारे लोक, बी डी एस एम समुदाय, फेटिश संस्कृती, हे सगळं मला हळूहळू समजू लागलं. हळूहळू मला डार्क वेबचे काही भाग, पॉर्नोग्राफीचं जग, कल्ट क्लासिक चित्रपट आणि रेडिट यांचीही ओळख होऊ लागली. अव्हाँ-गार्द चित्रपटांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. जॉन वॉटर्स, द रॉकी हॉरर पिक्चर शो, डेव्हिड लिंच, क्रोनेंबर्ग यांच्या कामांमधली विक्षिप्त आणि मुक्त करणारी ऊर्जा मी जवळून अनुभवत होते. लार्स व्हॉन ट्रिअरच्या ‘अँटीख्राइस्ट’ आणि ‘निम्फोमॅनियाक’मधील तीव्र लैंगिकताही मला खोलवर भिडली होती. या सगळ्याचा बौद्धिक अर्थ मला समजत होता की नाही, याने मला फरक पडत नव्हता. महत्त्वाचं हे होतं की त्या कलाकृती त्यांच्या तीव्र आणि बदल घडवणाऱ्या दृष्टिकोनाने मला आतून हादरवत होत्या.

इंटरनेटमुळे माझ्यासमोर ज्ञानाचं एक खूप मोठं विश्व उघडलं होतं. त्या सगळ्याने मला आतून हादरवून टाकलं. पण त्यातलं जे काही माझ्या मनात राहिलं, त्याने मला स्वतःकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवलं. मी स्वतःची ओळख अधिक वैयक्तिक, आणि पारंपरिक चौकटीबाहेर घडवू लागले. अठरा वर्षांची झाल्यावर, समाजाने ठरवून दिलेल्या पारंपरिक ‘स्त्री’च्या चौकटीत स्वतःला बसवण्याला काही अर्थ नाही, असं मला वाटू लागलं. नुकत्याच मिळालेल्या नागरी स्वातंत्र्यांसह मी जगाकडे नव्या नजरेने पाहू लागले. लैंगिकता ही प्रत्येकाने स्वतःला दिलेली ओळख असते, ही जाणीव मला झाली.

ती खूप वैयक्तिक गोष्ट असते. प्रत्येकासाठी वेगळी. जणू तिला फक्त ‘स्नेह’ किंवा ‘स्वतः’ असंच नाव देता येईल. त्यामुळे शेवटी प्रत्येकजण आपल्या अनुभवांत एकटाच असतो. पुढच्या काळात, हळूहळू वय आणि अनुभव वाढत गेले. या प्रवासात माझ्या तरुण वयाने एकटेपणाची आणि परकेपणाची खूप वेदना सहन केली. तरीही मी पुढे जात राहिले. शेवटी कला निर्माण करण्यात, किंवा कलेविषयी विचार करण्यातही, मला स्वतःला व्यक्त करण्याचा आणि शांतता मिळवण्याचा मार्ग सापडला. मी त्या संपूर्ण पिढीचा भाग होते, जिने २०००च्या दशकातील बदलांचा जवळून अनुभव घेतला. त्या काळात आपल्या समाजात वैयक्तिक ओळख ही परंपरा आणि स्थानिक चौकटींपासून हळूहळू वेगळी होऊ लागली होती. लोक स्वतःची वेगळी ओळख नव्या आणि अनपेक्षित पद्धतींनी घडवू लागले होते. इंटरनेटने एक नवं, खुलं जग उघडलं होतं. तिथे ज्ञान सहज उपलब्ध होतं. जगभरातील लोकांशी मैत्री होत होती. सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती. डिजिटल समुदाय तयार होत होते. या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवर नव्या प्रकारची सर्जनशीलता निर्माण होत होती. त्या दशकात भविष्याची एक वेगळीच ओढ होती. जगाशी जोडले जाण्याची आणि मोठ्या विश्वाचा भाग असल्याची भावना होती. त्यामुळे ठरवून दिलेल्या चौकटींपलीकडे स्वतःला व्यक्त करण्याचे अनेक छोटे-छोटे मार्ग तयार होत होते.

स्थानिक उपसंस्कृती वाढत होत्या. स्वतंत्र संगीतप्रवाह तयार होत होते. कलेची अधिक खुली आणि लोकशाही स्वरूपाची दृश्यं तयार होत होती. कला फक्त श्रीमंत किंवा संस्थात्मक जागांपुरती मर्यादित राहिली नव्हती. हे सगळं चांगलं होतं की वाईट, साधं होतं की आयुष्य बदलून टाकणारं, ही गोष्ट निराळी. पण २०००च्या दशकातील दूरसंचार-माध्यमांनी पहिल्यांदाच लोकांसमोर अनेक शक्यतांचं एक जग उघडलं. आधीच्या पिढ्यांनी असा अनुभव कधी घेतला नव्हता.

(सर्व चित्रांकने लेखिकेने स्वतः तयार केलेल्या मूळ कलाकृती आहेत. या लेखाच्या लेखिका आणि चित्रकार दोन्हीही त्या स्वतःच आहेत.)

Post Tags

Leave a comment