पंधरा वर्षांच्या सम्तेनने तेनसिंगच्या बाजूला बसून आपलं फिंगर चिप्सचं पाकीट उघडलं. तेनसिंगही त्याचं स्वतःचं पाकीट संपवत होता. मधली सुट्टी झाली होती, आणि वर्गाच्या खिडकीच्या गंजलेल्या चौकटीतून वाऱ्याची दमट-ओलसर झुळूक आत आली. तिच्याबरोबर वाहत आलेल्या मऊ ओलसर मातीने सम्तेनचा शर्ट त्याच्या अंगासरशी चिकटला. तिच्यामुळे मधल्या सुट्टीत त्या वर्गात अजूनच गर्दी झाल्यासारखं भासत होतं. विद्यार्थी हळूहळू कॅन्टीनकडे निघाले होते. सम्तेनने त्याच्या आईने भेट दिलेल्या आपल्या चंदेरी रंगाच्या, काळ्या किनारीच्या हातावरच्या घड्याळात पाहिलं, आणि उरलेल्या चिप्सचं पाकीट सावकाश गुंडाळून ठेवलं. अजून चिप्स खाण्याची आपली ऊर्मी त्याने आवरली, कारण तो शेवटचा चटकमटक खाऊ उरला होता. तेनसिंगने आपल्या शाळेच्या पँटवरचा चुरा झटकला, आणि सोनेरी कडांच्या चष्म्यातून सम्तेनकडे पाहत विचारलं, “झालं तुझं ?”
“अं, हो,” सम्तेनचं उत्तर आलं. वर्गामधल्या तिसऱ्या रांगेतल्या बाकावर बसलेले ते दोघे मित्र उभे राहिले आणि बाजूच्या मोकळ्या पॅसेजमध्ये फिरू लागले. जिना उतरून ते शेवटी चिखलाने माखलेल्या खेळाच्या मैदानात आले. तिथल्या बुद्धाच्या पुतळ्याभोवती फिरता फिरता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. परीक्षेनंतरच्या उन्हाळी सुट्टीत त्यांना काय काय करायचंय ह्याविषयी ते बोलत होते. सम्तेन एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होता. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आई-वडिलांच्या घटस्फोटात हरवून गेलेल्या प्रेमासाठी, मायेसाठी आसुसलेलं असं ते लहानगं पोर होतं. तो सध्या त्याच्या आईबरोबर पूर्व सिक्कीममधल्या माचोंगमध्ये राहत होता, त्याच्या वडिलांनी उत्तर सिक्कीममधल्या अन्य एका स्त्रीशी दुसरं लग्न केलं होतं. त्याला एक सावत्र बहीणही होती. त्याच्या बाबांच्या दुसऱ्या लग्नाला तब्बल दहा वर्षं लोटली होती, पण त्याची तिच्याशी कधीच भेट झाली नव्हती. ह्याउलट, तेनसिंग गंगटोकमधल्या एका श्रीमंत तिबेटी कुटुंबातला मुलगा होता. त्याचे आई-वडील दोघंही डॉक्टर होते. तेनसिंगला एक संपन्न-समाधानी आयुष्य जगण्याकरिता सर्व सोयीसुविधा मिळाव्या ह्याची ते पूर्ण तजवीज करत होते. सर्वसामान्य भाषेत सांगायचं तर, तो एक लाडोबा होता.
शाळेच्या बास्केटबॉल-मैदानाजवळ असलेल्या कोपऱ्यातली घंटा जोरदार, कानात घुसणारा तीक्ष्ण आवाज करीत घणघणली. घंटेच्या आवाजाने शाळेच्या आवारातल्या प्रत्येकाला मधली सुट्टी संपल्याची, आणि सर्वांनी आपापलं काम सुरू करावं, अशी सूचना दिली. मुलं चिखलमाती, डबकी ह्यांतून उड्या मारत आपल्या वर्गाकडे पळू लागली, चिखलाच्या शिंतोड्यांनी त्यांच्या काळ्या बुटांवर आणि पँटींवर मातकट तपकिरी रंगाचे डाग पडले.
शाळा सुटल्यावर, तेनसिंगच्या घराच्या दिशेने जाताना सम्तेनने उरलेल्या फिंगरचिप्सचं पाकीट उघडलं आणि आपल्या सर्वांत जवळच्या मित्रासोबत चिप्स वाटून खाऊ लागला. सम्तेन आणि तेनसिंग ह्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली, तेव्हापासून रोज शाळा सुटल्यानंतर गंगटोकच्या बाजार-परिसरातील टेकडीवरच्या तेनसिंगच्या मोठ्या घरात एकत्र खाऊ खाणं ही त्यांची एक प्रथाच बनून गेली होती.
तेनसिंग फ्रेश व्हायला गेला, तेव्हा सम्तेन तेनसिंगच्या खोलीतील शोभिवंत वस्तूंचं निरीक्षण करत होता. त्याला कुतूहल वाटलं की ह्या एकेका वस्तूची किती बरं किंमत असेल ! तेनसिंगच्या आई-वडिलांची सम्तेनशी चांगली ओळख होती. ते त्याला प्रेमाने वागवत. तरीही, काय कारणाने ते ठाऊक नाही, पण तेनसिंगला नेहमी आपल्या पालकांच्या चेहऱ्यांवर मुखवटे असल्यासारखं वाटायचं. एके दिवशी, तेनसिंगच्या घरातून बाहेर पडत असताना त्याच्या आई-बाबांचं बोलणं सम्तेनच्या कानांवर पडलं. तेनसिंगच्या आई-बाबांना सम्तेनचं त्यांच्या घरी रोज
येणं-जाणं कमी व्हायला हवं होतं. त्यांच्या मते, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकत होती. तेव्हापासून, सम्तेन तेनसिंगचे आई-बाबा घरी यायच्या आत तिथून बाहेर पडायचा.
सुदैवाने त्या दिवशी त्याला आपल्या मित्राबरोबर खेळण्यासाठी आणि त्यानंतर वसतिगृहाकडे सुरक्षित परतून येण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. वसतिगृहात परतल्यावर त्याच्यासाठी एक दूरध्वनी आला. डोमाने — त्याच्या आईने — दूरध्वनी केला होता, तिने त्याचे बाबा त्याच्या सावत्र बहिणीसह घरी येणार असल्याने त्याला येत्या वीकेंडला घरी येण्याची विनंती केली.
सुरुवातीला, सम्तेनला तिथे जावंसं वाटत नव्हतं, कारण त्या ठिकाणी गेलं की आपल्या घराच्या, कुटुंबाच्या जुन्या आठवणी त्याला अजूनही छळत, भेडसावत असत. पण तरीही, आपली सावत्र बहीण भेटेल ह्या आशेच्या धाग्याने त्याला घरपरतीच्या दिशेने खेचलं.
रविवारची पहाट गडद काळ्या पावसाळी मेघांतून डोकावणारा लख्ख सूर्यप्रकाश घेऊन उगवली. वसतिगृहातली मुलं त्यांच्या दमटओल्या कपड्यांच्या कुबट वासाला उबगली होती, लॉनवर कपडे सुकवण्यासाठी ती उत्साहाने हसत-खिदळत जाऊ लागली. त्यांच्यात सम्तेन हा सर्वाधिक उत्साहात होता; सगळं आवश्यक सामान आणि पुष्कळ वर्षांपासून तो लिहीत असलेली दैनंदिनी भरून आपली छोटीशी बॅकपॅक त्याने तयार ठेवली होती. तो गंगटोक आणि माचोंग ह्यादरम्यान दोनशे रुपयांत फेरी घडवणाऱ्या खंबू दाजू ह्या स्थानिक टॅक्सीवाल्याची आतुरतेने वाट पाहत होता.
सम्तेन खंबू दाजूंच्या जुन्या सुमो गाडीत खिडकीजवळ बसला. नवल म्हणजे, त्या दिवशी गाडीत कमी प्रवासी होते, त्यामुळे त्याला ऐसपैस बसायला मिळालं. खंबू दाजूंनी गाडीच्या पुढच्या आरशातून सम्तेनकडे पाहून म्हटलं, “आज एक मुलगा घरी जाताना आनंदी दिसतोय बरं का.” सम्तेन आपल्या भावनांवर ताबा ठेवत, हिरव्यागार दऱ्याखोऱ्यांकडे आणि रस्त्याकडेच्या निळ्या, फिकट जांभळ्या हायड्रेंजियांच्या झुडुपांकडे बघत फक्त हसला. असं वाटत होतं की पावसाळ्यात भूमीला पुन्हा नवचैतन्याचे धुमारे फुटत होते. त्याला नवल वाटलं, माणसांना दुःखी करणारी गोष्ट निसर्गाला कशी काय बरं प्रसन्न करते !
पर्वतरांगांतून, टेकड्यांच्या चढ-उतरणींतून खाचाखळग्यांनी भरलेल्या रस्त्याने खडखडत एकदाची ती गाडी सम्तेनच्या गावी पोहोचली. त्याने खंबू दाजूंना दुसऱ्या दिवशीच्या परतीच्या प्रवासाविषयी विचारून घेतलं नि त्यांना निरोप दिला. तो गावामधल्या बाजारातील आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
त्याची पावलं वेगाने पडू लागली, तसतसा, इतक्या दीर्घ काळानंतर आपल्याला आईबाबांना एकत्र भेटता येणार ह्या भावनेने तो अधिकच आतुर, अस्वस्थ होऊ लागला. तो स्वयंपाकघरालगतच्या बागेत पोहोचला, तेव्हा त्याला तिथल्या हायड्रेंजियाच्या झुडुपांमागे कशाची तरी हालचाल दिसली. त्याला वाटलं, अन्न शोधण्यासाठी एखादा गावठी साप बाहेर आला असेल, पण तेवढ्यात त्याला झुडुपांच्या बुंध्यांमधून एक छोटीशी काळीभोर पोनीटेल बाहेर डोकावताना दिसली.
जवळ गेल्यावर, त्याला त्याच्याकडे पाहत असलेली मातकट तपकिरी डोळ्यांची आणि गोल-गोंडस दुधाळ रंगाच्या चेहऱ्याची एक छोटीशी मुलगी दिसली. “भॉऽ !” ती ओरडली, आणि स्वतःच्या ह्या वागण्यावर खिदळू लागली. त्या लहानगीसाठी सम्तेनच्या मन भरून आलं, तो आशा करत होता की हीच आपली सावत्र बहीण असू दे. त्याने एकदा
कधीतरी आपल्या आईचे बालपणीचे फोटो पाहिले होते. ती छोटी मुलगी झुडुपांतून बाहेर आली, तेव्हा त्याला तिचं त्या फोटोंशी खूप साम्य असल्याचं लक्षात आलं.
सम्तेनला हे सारं अगदी स्वप्नवत वाटत होतं. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यापासून इतकी वर्षं तो वसतिगृहात राहत होता, त्याचं जगणं कष्टमय होतं. अखेरीस आता त्याला आपल्या सावत्र बहिणीबरोबर आणि आपल्या कुटुंबीयांबरोबर राहता येणार होतं.
काही वर्षांनंतर…
सोनम पाऊस पडत असताना सूर्यप्रकाशात उजळलेल्या दरीच्या एका छोट्या भागाकडे पाहत होती, त्याविषयीची कोल्ह्यांच्या लग्नाची नेपाळी मिथ्यकथा तिच्या लक्षात होती. तेव्हा तिने घराचं आर्थिक गणित सांभाळणाऱ्या सम्तेनकडे पाहिलं नि विचारलं, “दादा, तू मला चंद्रमुखी वगैरे काहीतरी छानसं म्हणू शकला असतास, पण बरखा को घाम — पावसाळ्यातला सूर्य — असं का बरं म्हणालास ? त्यात काही यमक तरी आहे का ?!”
ह्यावर सम्तेन हसला, त्याला तो दिवस आठवला, जेव्हा त्याच्या बहिणीने त्याचं आयुष्य पालटलं होतं. त्याने उत्तर दिलं, “गडद करड्या पावसाळ्याच्या ऋतूत एके दिवशी दूर कुठेतरी दरीतून लख्ख तेजस्वी सूर्य उगवला, त्या दिवशी तुझा जन्म झाला होता.”
“अरे, तू परत आलास तर,” पाठीमागून एक खोल-गंभीर आवाज आला, आणि सम्तेनने लगेच ओळखलं, ते त्याचे बाबा होते. “अरेच्चा ! सोनम, तू इथे आहेस तर. छी ! ह्या चिखलात का खेळतेयस ? तुझे कपडे मळतील ना.”
सोनम तिच्या वडिलांकडे धावत गेली, त्यांनी तिला उचलून घेतलं.
“तुझा दादा आलाय, बघ.”
“चल, आत जाऊ या, डोमा वाट पाहतेय तुझी.”
ल्हाक्पाने — सम्तेनच्या बाबांनी — सम्तेनला, त्याचा घरापर्यंतचा प्रवास सुखरूप झाला ना, हे विचारलं. “पावसाचे दिवस आहेत, कधी कुठे दरडी कोसळतील, सांगता येत नाही.” ते म्हणाले.
“खंबू दाजू थकलेयत, पण ते अजूनही छान गाडी चालवतात,” सम्तेनने उत्तर दिलं.
डोमा दारापाशी गालातल्या गालात हसत उभी होती, “माझं लेकरू आलं घरी, किती वाळलायस तू ! वसतिगृहात पुरेसं खायला देत नाहीत का रे ? ये, फ्रेश हो, मी तुझी आवडती इक्युसची भाजी आणि आलू दम केलंय.”
सगळं कुटुंब जेवायला बसलं. सम्तेनचा अजूनही विश्वास बसत नव्हता की ह्या क्षणात त्याचे आई नि वडील दोघंही एकत्र होते, आणि त्यांच्यात सहज-साधा संवाद घडत होता. हे अगदी त्यांच्या घटस्फोटाआधी — जेव्हा त्याच्याकडे त्याचं घर होतं — घडायचं, तसं सगळं घडत होतं.
जेवणाच्या टेबलावर एक चमत्कारिक शांतता पसरली, अखेरीस तिचा भंग करीत सम्तेनचे बाबा बोलले,
“सम्तेन, मी तुझ्या आईशीही ह्या विषयावर बोललोय. सोनम ह्या जूनमध्ये चार वर्षांची होईल, तर मी आणि सांगेयने — सोनमच्या आईने — निर्णय घेतलाय की तिला गंगटोकमधल्या तुझ्या शाळेत घालावं.”
“आम्ही दोघंही कामावर असू, त्यामुळे आम्हांला सोनमकडे लक्ष द्यायला आणि तिला अभ्यासात मदत करायला कोणीतरी हवंय.”
“डोमा मला म्हणाली की तू शाळेच्या परीक्षांमध्ये पहिला येतोस. आमची पूर्ण खात्री आहे की तुझ्या सावत्र बहिणीला, खरं म्हणजे, तुझ्या बहिणीला तू चांगलं मार्गदर्शन करशील.”
सम्तेनने ल्हाक्पा आणि डोमा ह्यांच्याकडे पहिल्यांदाच पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यांवर शांत स्मित होतं. त्याच्या कष्टांचं कौतुक होत होतं, त्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता. एका छोट्याशा विरामानंतर ल्हाक्पा पुढे म्हणाला —
“तुला वसतिगृह सोडून आमच्याबरोबर चांदमारीमध्ये राहायला आवडेल ?”
***
Image credit: Rajdeep Savenkar for हाकारा । hākārā
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
