Skip to content Skip to footer

खिडकीतून चंद्र येतो (नारायण सुर्वेंच्या घरात शिरलेल्या चोराबद्दल नाटक रचताना…)
दत्ता पाटील

Discover An Author

  • Playwright & Writer

    दत्ता पाटील हे गेल्या पंचवीस वर्षांपासून नाट्यलेखन करत आले आहेत. त्यांचे पाणी-प्रश्नावरचे हंडाभर चांदण्या हे नाटक गेल्या दहा वर्षांपासून मराठी रंगभूमीवर गाजते आहे. मानसरंग-प्रकल्पाची निर्मिती असलेले तो राजहंस एक, एन. सी. पी. ए., मुंबई ह्यांची निर्मिती असलेले कलगीतुरा ह्यांशिवाय त्यांनी दगड आणि माती, गढीवरच्या पोरी, इथेच टाका तंबू  ह्यांसह अनेक नाटकांचे व एकांकिकांचे लेखन केले आहे. त्यांना नाट्यलेखनाकरिता अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा रा. शां. दातार पुरस्कार, मुंबईतील चैत्रचाहूल पुरस्कार, विखे-पाटील पुरस्कार, म. टा. सन्मान, झी गौरव पुरस्कार, धी गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार, नाट्यपरिषदेचा पुरस्कार, एन. सी. पी. ए.चा दर्पण पुरस्कार ह्यांसह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची नाटके विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमांमध्ये शिकवली जातात. हंडाभर चांदण्या हे नाटक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच प्रताप महाविद्यालय (अमळनेर), मणिबेन महिला महाविद्यालय (मुंबई) येथे अभ्यासक्रमामध्ये आहे. दगड आणि माती हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. मराठी-द्वितीयवर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये, तर तो राजहंस एक हे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए.च्या अभ्यासक्रमामध्ये आहे. बंगलोरमधील बहुवचना प्रकाशन व तमाशा थिएटर ह्यांच्या वतीने नुकताच त्यांच्या तो राजहंस एक ह्या नाटकाचा कन्नडमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. दत्ता पाटील सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस (ललित कला केंद्र) ह्या पदावर कार्यरत आहेत.

    Datta Patil has been actively engaged in playwriting for the past twenty-five years. His play Handabhar Chandanya, centred on the issue of water scarcity, has remained widely acclaimed on the Marathi stage for over a decade. His work in theatre has received several prestigious honours, including the Ra. Shan. Datar Award from the Maharashtra Foundation, the Chaitrachahool Award, Vikhe Patil Award, Mata Sanman, Zee Gaurav, Goa Hindu Association Award, Natya Parishad Award, and the NCPA Darpan Award, among others. He has written several plays and one-act plays such as To Rajhans Ek, produced under the Mansarang project, Kalgitura, produced by National Centre for the Performing Arts (NCPA), as well as Dagad Ani Mati, Gadhivarachya Pori, and Ithech Taka Tambu. His plays are taught in the curricula of various universities. Handabhar Chandanya is part of the syllabus at Savitribai Phule Pune University, Pratap College, Amalner, and Maniben Women’s College, Mumbai. Dagad Ani Mati is included in the second-year B.A. Marathi syllabus at University of Mumbai, while To Rajhans Ek is taught in the B.A. programme at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. His play To Rajhans Ek was translated into Kannada by Bahuvachana Prakashana and Tamasha Theatre, Bangalore.Datta Patil currently serves as Professor of Practice at the Lalit Kala Kendra of Yashwantrao Chavan Maharashtra Open University.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२४च्या जुलै महिन्याच्या १६ तारखेला वर्तमानपत्रातल्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतलं. ती वाचून थक्क झालो आणि मनाचा तळ अक्षरश: ढवळून निघायला सुरुवात झाली. बातमी होती — ‘कविवर्य नारायण सुर्वेंच्या घरात चोरी करणाऱ्या चोराने ते कवीचं घर असल्याचं लक्षात येताच माफीपत्र लिहून चोरलेला मुद्देमाल पुन्हा जसाच्या तसा घरात आणून ठेवला.’ सुरुवातीला चोराबद्दल वाटणाऱ्या कौतुकाची जागा नंतर त्या चोराच्या जडणघडणीबाबतच्या, त्याच्या वर्तमान भवतालाबाबतच्या आणि त्याच्या आकलनाबाबतच्या उत्सुकतेनं घेतली.  शिवाय, ‘चोरी करणं हा काही आपला गुन्हा नाही, तो पेशा आहे, पण कवीच्या घरी चोरी करणं मात्र थेट मुद्देमाल परत करून माफीपत्र लिहून ठेवण्याएवढा गंभीर गुन्हा आहे’, असा निष्कर्ष काढायला भाग पाडलं. यातूनच, मी त्याच्या एकूण वर्तनाबाबतचा अदमास बांधायला आणि विचार करायला सुरुवात केली. म्हणजे, त्या भुरट्या चोरानं यापूर्वी केलेल्या अनेक चोऱ्यांबाबत त्याला कधी कायद्याची भीती वाटली नसेल किंवा चोर बनण्यातील अपरिहार्यतेला त्यानं कधी तडा जाऊ दिला नसेल, पण मग नारायण सुर्वेंच्या घरी चोरी केल्यावर पश्चातापदग्ध होऊन माफीपत्र लिहावंसं वाटताना त्याला आपल्या कृतीबद्दल ओशाळवाणं का वाटलं असावं ? तो स्वत:च्या चोरीच्या पेशाबद्दल माफी न मागता किंवा यापूर्वी केलेल्या एकूण अनेक चोऱ्यांबद्दल माफी न मागता कवीच्या घरी चोरी केल्यावरून माफी का मागत असेल ? मुद्देमाल परत आणून ठेवणं इतपत ठीक. पण मग नसती मागितली माफी तर काय घडलं असतं ? किंवा त्याचं काय बिघडलं असतं ? असं काय जागं झालं त्याच्या आत नारायण सुर्वेंच्या घरात भिंतीवरच्या कविता वाचताना, त्यांची छायाचित्रं पाहताना, त्यांचे पुरस्कार वगैरे पाहताना ? 

हल्लीच्या माध्यमांचा आणि समाजमाध्यमांचा एकूण स्वभाव लक्षात घेता, भारतभर ही बातमी चॅनल्सवरून, समाजमाध्यमांवरून प्रचंड व्हायरल झाली. लोक पाहून, वाचून क्षणभर चकित झाले, पण चकित करणाऱ्या याहून वेगळ्या नवनव्या घटना आपल्या देशात दर सेकंदाला घडत असल्याने त्या बातमीलाही आकाशात आतषबाजी करताना उडवलेल्या रंगीत फटाक्यांएवढंच आयुष्य मिळेल, याची खात्री होती. लोकही चवीने वाचून, ऐकून विसरले. चर्चा चोरावर झाली, पण कवीवर काही झाली नाही. कवितेमुळे एखाद्या चोराचं मनपरिवर्तन होऊन तो त्या क्षणापुरता तरी नैतिक होतो, हा विचार तसा सांप्रतकालीन उधाणलेल्या भवतालाला सहजासहजी मान्य न होणारा. आपल्या आनंदाची, मान्य-अमान्यतेची संकल्पनाच आजच्या वर्तमानात बदलत चालली आहे. न्यायाची बातमी आपल्याला दुर्मिळ आनंदाची, दिलाशाची वाटू लागली आहे. नोकरी, रोजगार मिळणं ही दुर्मिळ आनंददायी घटना वाटू लागली आहे. माणुसकीसाठी लोक धावून गेल्याचं पाहून आपण अचंबित होऊ लागलो आहोत. नारायण सुर्वेंचं घर फोडणाऱ्या चोराने घरातल्या कविता, फोटो पाहून पश्चातापदग्ध होऊन मुद्देमाल परत आणून ठेवणं ही आपल्याला अशक्य कोटीतली घटना वाटू लागली आहे. मुळात मानवकल्याणार्थ असलेल्या मूल्यव्यवस्थेवरचा विश्वास इतका उडालाय, की काही चांगलं घडलं की अविश्वसनीय वाटावं. तसं  या घटनेकडे काहीशा अविश्वासाने पाहत नंतर लोक ती विसरले. लोक हल्ली अशा गोष्टी जाणीवपूर्वक विसरू पाहतात. कारण मग त्यातून, इतक्या प्रयत्नांतून खोलवर गाडून टाकलेली मानवी नैतिकतेची सांप्रत जगण्यात अडचणीची ठरू शकणारी मूल्यं जागी होऊन  ‘अकारण’ ओझं सांभाळत बसावं लागतं मग ! 

अशा एकूण पार्श्वभूमीवर ही बातमी मला फार महत्त्वाची वाटली. त्या क्षणी ठरवलं की यावर नाटक लिहायला हवं. स्वत:चाच एक पाठपुरावा सुरू केला. पण लक्षात येत गेलं की मला वेळ घ्यायला हवा. कारण नारायण सुर्वेंचं बोट धरून चोराला उलगडवत न्यायचं, की चोराचं बोट धरून नारायण सुर्वे नव्याने मांडायचे, हा संभ्रम होता. आपण तर नारायण सुर्वे वाचले आहेत. कोणत्याही काळात माणसाला माणूस म्हणून सजग ठेवणाऱ्या या त्यांच्या लेखनानं आपल्यालाही वेगळं भान दिलंय. पण मग चोर का जागा होऊ शकतो त्यांच्या नावानं? कशासाठी ? त्यानं वाचले असतील का सुर्वे ? मग सुर्वे वाचूनही तो चोर कसा झाला ? एकामागून एक प्रश्नांची मालिका तयार होत गेली. या प्रश्नांची उत्तरं शोधायची, तर मग पुन्हा नारायण सुर्वे नव्याने वाचून काढले पाहिजेत. नारायण सुर्वेंना जवळून अनुभवलेल्या माणसांना भेटलं पाहिजे. टिपणं काढत राहिलं पाहिजे. 

पहिल्या टप्प्यात सुर्वेंची, त्यांच्या कवितांवरची पुस्तकं वाचून काढली पुन्हा. या घटनेच्या अनुषंगाने काही कविता निवडून ठेवत गेलो. लक्षात येत गेलं की सुर्वे दादांच्या लेखनातच नाट्यमय सादरीकरणाच्या शक्यता ठासून भरल्या आहेत. माणूस केंद्रस्थानी ठेवून ज्या पद्धतीने सुर्वे रचत जातात, त्या रचनांना भेदक वास्तवाबरोबरच कलात्मक लयही आहे आणि मानवी चेतनेचा गंधही, हे प्रकर्षाने जाणवत गेलं. मग नाशिकमधील नारायण सुर्वे वाचनालयात जाऊन जमतील तसे संदर्भ अभ्यासले. यूट्यूबला अरुण खोपकर, दि. पु. चित्रे यांच्यासह विविध दिग्दर्शकांचे माहितीपट पाहिले. सुर्वेंची बोलण्याची, चालण्याची, कविता-सादरीकरणाची, मुलाखत देतानाची पद्धत, हे सगळं नीट पाहत होतो. म्हणजे, याचा नाटक-लेखनाशी नेमका काय संबंध येईल, हे अर्थातच माहीत नव्हतं. एके काळी परिवर्तनाची चळवळच कवितेतून उभी करण्याची ताकद असणारा हा कवी आजच्या काळातल्या चोरालाही परिवर्तनाची संधी देतो, ही गोष्ट फारच विलक्षण वाटत होती. हा सगळा अभ्यास करताना तो चोर, त्याची चोरीची प्रक्रिया, नारायण सुर्वेंच्या कविता आणि चोराची मुद्देमाल परत आणून ठेवण्याची प्रक्रिया, त्यानं माफीपत्र लिहिणं या सगळ्या गोष्टी एकाच वेळी मनात तरंगत होत्या. सुर्वेंना प्रत्यक्ष अनुभवलेल्या त्यांच्या निकटच्या माणसांना भेटणं आवश्यक वाटलं. साहित्यिक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांना गाठलं. त्यांना कायमच माझ्या लेखनाबद्दल प्रेम आणि उत्सुकता वाटत आलीये. शिवाय मी १३ वर्षं पत्रकारिता केलेली. तिची पायाभरणी कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेली. त्यामुळे ‘तुला माझ्याकडून सुर्वे का जाणून घ्यायचे आहेत ?’ या प्रश्नावर त्यांना ती चोरीची घटना आणि त्यावर मला नाटक लिहिण्याची झालेली इच्छा सांगावी लागली. त्यांना खूप आनंद झालेला दिसला. मग सलग दोन दिवस आठ-आठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेतून उत्तम कांबळे सरांनी त्यांनी अनुभवलेले कवितेतले, कवितेच्या बाहेरचे सुर्वे, त्यांची जीवनदृष्टी हे सगळं एखाद्या गोष्टीसारखं सांगितलं. रशियातील रेडिओवर झालेल्या सुर्वेंच्या मुलाखतीची गोष्ट कांबळे सरांकडूनच मला समजली. सुर्वेंची भवतालच्या माणसाकडे पाहण्याची, त्याला वागवण्याची मानवी दृष्टी या चर्चेतून मला जरा जरा समजत गेली, ज्यातून मला नाटक लिहिण्याचा ‘दबाव’ वाटेनासा झाला. कारण आधी मला सुर्वे नीट समजून घ्यायचे होते. कोणतीही संदिग्धता नाटक लिहिताना मनात ठेवायची नव्हती. कुसुमाग्रजांनी संपादित केलेल्या सनदमधील सुर्वेंचं मनोगत वाचताना जाणवलं, की जगण्याची दुखरी गोष्ट सांगतानाही ती लयीत सांगण्याचं वेगळं कसब या महाकवीत आहे. आयुष्यात एकूण केवळ १४५ कविता लिहिणारे नारायण सुर्वे या कवितांमधून विलक्षण वैश्विक भाष्य करून जातात, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहिली. ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन याशिवाय सर्व सुर्वे हा ग्रंथ, नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता हा ग्रंथ, त्याला दिगंबर पाध्ये यांनी लिहिलेली प्रस्तावना हे सगळं अभ्यासताना नवं काही सापडत गेलं. एक बाब स्पष्ट झाली, की आपल्याला हे नाटक म्हणजे नारायण सुर्वेंच्या जीवनप्रवासावर डॉक्युड्रामा वगैरे तर नक्कीच नाही करायचंय… चोर हा समकालीन व्यवस्थेचा प्रतिनिधी आहे. या व्यवस्थेनेच त्याला चोर बनण्याचा चॉईस दिलाय किंवा भाग पाडलंय. कारण अन्य बरंच काही बनण्याचे पर्याय नव्या भांडवलशाहीने समोर ठेवले आहेत. ती भांडवलशाही पाहता आणि पर्याय पाहता पहिला किंवा शेवटचा पर्याय म्हणून गुन्हेगार होणं हे जास्त सोयीस्कर वाटू शकत असावं. यातलं नेमकं काय झालं असावं चोराच्या बाबतीत, ते शोधायला हवं. 

आता नारायण सुर्वेंवर अभ्यास करता येणं हे संदर्भांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं तुलनेत सोपं होतं. पण चोरी करून कवीचं घर असल्याच्या कारणावरून मुद्देमाल परत ठेवून माफी मागणाऱ्या चोराला शोधायचं कसं नि कुठं ? ते सर्वथा कठीण होतं. किंवा अगदीच सोपं असतं तरी मला चोराकडून काहीही जाणून घ्यावं, असं काही वाटत नव्हतं. कारण ‘माणूस’ म्हणून जिवंत असल्याचा त्यानं दाखवलेला तो एक पुरावा मला पुरेसा वाटत होता. काय वय असेल त्याचं ? ते निश्चित करावं लागणार होतं. अनन्वित स्वप्नं, मनात दाबून टाकलेला विद्रोह, स्वीकारलेली नवी जीवनशैली, भौतिक सुखाच्या स्वत:च्या कल्पना, कष्टकऱ्याऐवजी चोर बनण्यातल्या फायद्याचं त्याचं त्यानं तयार केलेलं जीवनतत्त्व यावर एका बाजूला विचार आणि नोंदी सुरू केल्या. त्या घटनेबद्दलच्या बातम्या अनेक वेळा नीट वाचून काढल्या. विविध चॅनल्सवरही त्या बातम्या झळकलेल्या. त्या पाहिल्या. त्यानं लिहिलेला माफीनाम्याचा कागद, त्यावरचं अक्षर, मध्ये थोडीशी केलेली खाडाखोड, लिहिण्यातील प्रांजळ सावधगिरी आणि वाचनीयता ठेवण्यासाठी केलेला प्रयास, शेवटी इंग्रजीतून सॉरी लिहिताना त्याखाली दोन रेषा ओढून ठासून केलेली अंडरलाईन हे नीट पाहिलं. अभ्यासलं. 

हे केवळ इन्टरेस्टिंग नव्हतं. त्यापलीकडचं होतं. कुठला असेल हा चोर ? काय वय असेल ? मूळ गाव कुठलं असेल, निर्वासित असेल का, त्याला घरदार असेल का ? पत्नी असेल का ? मग हा चोरी करून मुद्देमाल घरी घेऊन गेल्यावर जेव्हा ते कवीचं घर असल्याचं समजलं, तेव्हा तो मुद्देमाल परत ठेवायला निघताना पत्नीनं विरोध केला असेल का ? की सपोर्ट केला असेल ? घरातल्या अगदी जुन्या साध्या वापरातल्या वस्तू चोरून नेताना या मूलभूत गोष्टींची बाहेर किंमत तरी किती आली असती ? सर्वात किमती वस्तू टीव्ही. त्यातून दोनपाच हजार मिळाले असते, फार तर. तीही वस्तू पुन्हा ठेवून पत्रात ‘टीव्ही सुद्धा परत ठेवला आहे’ असं तपशीलवार लिहिणं याचा अर्थ टीव्ही ही त्याच्या दृष्टीने चोरीतली सर्वात अधिक किमती वस्तू होती. कदाचित ती घरात लावली असती, किंवा विकली असती. हा सगळा विचार करताना चोराचं व्यक्तिमत्त्व उभं करायला सुरुवात केली. मुंबईहून माथेरानला जाताना लागणारं हे गाव नेरळ. बदलापूर–कर्जत मार्गावरचं. मुंबईपासून सुमारे ८० किलोमीटरवर. पण मुंबईच्या परिघातलंच. रोजगाराच्या शोधार्थ मुंबईकडे आलेले अनेक स्थलांतरित आसपासच्या उपनगरांत स्थिरावतात. विशेषत: झोपडपट्टीत, छोट्या वस्तीत. या परिसरात परप्रांतीयांबरोबरच मराठवाड्यातून, विदर्भातूनही अनेक तरुण मुलं रोजगार शोधत येतात, स्थायिक होतात. नारायण सुर्वे माहीत असणारा हा चोर किमान काही इयत्ता शिकलेला असावा, अशी अटकळ बांधायला जागा होतीच. त्यातूनच तो आकार घेत गेला. मराठवाड्यातून नीटनेटकं असलेलं पूर्वसंचित सोडायला भाग पाडणाऱ्या काळाच्या महापुरात तोही वाहत येऊन या किनाऱ्याला लागला असावा का ? मग चारपाच घरात धुणीभांडी व स्वयंपाकाची कामं करणारी त्याची बायको आणि तो मिळून काही स्वप्नांच्या मागे असू शकतील. त्यांच्याही सुखाच्या काही कल्पना असतील. चोरी करणाऱ्याचा त्याचा पेशा तिला नकोसाही असेल, पण त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला थेट नाकारण्याइतपत नैतिकता असण्याचं तिला काहीच कारण नसावं. यातून गोवर्धन हा चोर आणि गीता ही त्याची बायको आकाराला आले. आधी म्हटल्याप्रमाणे हे नाटक नारायण सुर्वेंच्या माहितीपटासारखं किंवा चोराच्या उदात्तीकरणाचं होऊ नये, याची काळजी घ्यायची होती. समकालीन भवताल, व्यवस्था आणि चोराचं कुटुंब यावर लक्ष केंद्रित होणं आवश्यक वाटत होतं. 

या विचारातून लक्षात आलं की आपण या चोरीमुळे महाराष्ट्रात उडालेली खळबळ, कायदा व सुव्यवस्था, पोलिसांची बाजू याचा काहीच विचार केलेला नाही. गोष्ट रचताना ती पोलिसांच्या अनुषंगाने तपास करत-करत उलगडत न्यावी का, हा जरा सोपा वाटणारा सोयीचा आकृतीबंध डोळ्यांपुढे आला. पण मग फारच सपक आणि एक पोलिसी तपासाचं नाट्य होईल ते, असं लक्षात आलं. मुळात चोरामध्ये हा मुद्देमाल परत आणून देण्याची नैतिकता एका कवीमुळे जागी झाली, आणि ती का, याची मीमांसा करणं हा आपल्या नाटकाचा विषय असायला हवाय, हे परत परत स्वत:ला बजावून सांगत होतो. पोलिस असायला हवे, हे पक्कं झालं. पण त्या चोराच्या या एकूण कृतीबद्दल पोलिसांतच दोन मतं असली, तर अधिक व्यापक मुद्याला हात घालता येऊ शकेल, असं वाटून हवालदार आणि इन्स्पेक्टर ही दोन विभिन्न मतं असलेली पात्रं सुचली. तरीही मांडणीची चौकट सुचेना. हे सगळं सुचेस्तो २०२५च्या मध्यावर मी आलो होतो. मूळ घटना घडून वर्ष झालं होतं. मी अजून चाचपडतच होतो. चोरीची प्रक्रिया तीन दिवस चालली. दोन दिवस चोरी आणि तिसऱ्या दिवशी मुद्देमाल परत आणून ठेवून जाणं. ही प्रक्रिया एकाच वेळी प्रेक्षकांना आणि पोलिसांनाही पाहायला मिळाली तर ? त्या दृश्याचे दोन्ही पोलिसांच्या मते निघणारे अर्थ आणि प्रेक्षकांच्या मनात उमटणारे अन्वयार्थ हे दोन्ही मजेशीर असतील, असं वाटलं. पण मग दृश्यनिर्मिती करायची कशी ? कोण पाहतंय चोरी करताना ? त्यांचं बोलणं कोण ऐकतंय ? यावर दोन महिने विचार करताना अचानक प्रश्न सुटला. हे आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून उलगडत नेलं तर ? हवालदार आणि इन्स्पेक्टर हे दोघं वेगवेगळ्या विचारसरणीचे समर्थक आहेत. इन्स्पेक्टर समतोल व समन्वयवादी सहिष्णू विचारांचे आहेत, तर हवालदारास प्रत्येक चोरात, गुन्हेगारात देशद्रोही किंवा नक्षलवादी लपलेला दिसत राहतोय. पहिल्याचा, व्यवस्थेनेच चोराला चोर बनायला भाग पाडलंय, यावर विश्वास आहे; तर दुसऱ्याची, चोर हा केवळ चेहरा आहे, ही देशद्रोही माणसं असून आताच नीट तयार झालेली व्यवस्था उद्धवस्त करायला आली आहेत, यावर प्रगाढ श्रद्धा आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचं फूटेज पाहताना मूळ घटना आणि त्याचे अन्वयार्थ यांतून नाटक लिहिणं हे अधिक सोपं वाटत गेलं. विविध व्यवस्थेत काम करणाऱ्या त्या त्या काळातील सत्तेच्या विचारसरणीच्या कट्टर अनुयायांचा अनेकदा त्यांच्या वरिष्ठांना एक अदृश्य धाक वाटत असतोच. परिणामी, येथे सीनियर हवालदाराचा तरुण पोलिस निरीक्षकावर म्हणजे त्याच्या बॉसवर एक प्रकारचा अदृश्य धाक आहेच. हवालदार आणि पोलिस निरीक्षक यांच्यातील चकमकी ह्या वर्तमानकालीन परिस्थितीचं प्रतिनिधित्व करतात. 

यादरम्यान, म्हणजे लिहायला सुरुवात करण्याआधी एक अजून महत्त्वाची घटना घडली. नाशिकच्या नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने सुर्वेंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चर्चासत्र, परिसंवाद, कवितावाचन असे कार्यक्रम होणार होते. मग दोन्ही दिवस त्या संमेलनाला जाऊन बसलो. एक प्रकारे रिव्हिजनच पूर्ण झाली ! आणि हेही लक्षात आलं, की आपण सुर्वेंच्या जन्मशताब्दीलाच योगायोगानं हे नाटक रंगमंचावर आणणार आहोत…   

लिहिताना पहिल्या प्रसंगाला जरा जास्तच वेळ लागला, आणि तेथून पुढे मात्र गोवर्धन नि गीता यांनीच मला मार्ग दाखवत पुढे पुढे नेलं. आधी परिवाराशी नि मग स्थलांतर केल्यावर व्यवस्थेशी झगडून अखेर चोर बनलेला गोवर्धन आणि त्याची बायको गीता यांच्यातील नातं हे एकाच वेळी हळुवार प्रेमाचं आणि परिस्थितीशी झगडताना व्याकुळ होत एकमेकांना दोषी ठरवणारं असायला हवं, असं वाटलं. श्रीमंत बायकांकडे कामाला जाऊन-जाऊन गीताच्या मनात सुखाच्या काही संकल्पना जन्माला आल्या आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हे सुख प्राप्त करणं कठीण आहे, याची तिलाही जाणीव आहे. परंतु तिच्या या घालमेलीतून अस्वस्थ झालेला गोवर्धन नकळत चोर बनून तिची स्वप्नं पूर्ण करायला लागलाय. ‘जे ज्याच्याकडे जास्त आहे, ते आपण चोरणं म्हणजे गुन्हा नाही’ हे त्याचं लॉजिक. पण एका खेड्यातून मोठ्या कुटुंबाच्या विखंडीकरणानंतर हताश होऊन स्थलांतरित झालेल्या अनेक लोकांमध्ये ‘हे सगळं नीटनेटकं झालं, की जाऊ परत आपल्या गावाकडे’ अशी मनाच्या तळाशी काजव्यासारखी क्षीण लुकलुकणारी आशा कायम असते. कदाचित त्या आशेवरच अनेक माणसं महानगरात स्थलांतरित होऊनही ती महानगरी होत नाहीत. ती शहरी होत नाहीत. म्हणूनच महानगरांमध्ये ही दरी केवळ आर्थिक स्वरूपाची न उरता ती सामाजिक, सांस्कृतिक स्वरूप धारण करत अधिक भीषण होत जाते. गोवर्धनच्या चोरीच्या पेशाला गीताचा वरवर पाठिंबा असला, तरी ‘चोरी करणं बंद करून चायनीजची गाडी टाकून इज्जतीत कमवू’ ही नैतिकतेची लुकलुकती ज्योत तिच्या आत आहेच. सुर्वेंच्या घरात चोर ज्या पहिल्या रात्री येतो, त्या रात्री एकटा येतो. फोनवरून बायकोला म्हणजे गीताला घराचं वर्णन करून सांगतो. घर घेणं हे दोघांचं अत्यंत मोठं स्वप्न. स्वतःचं घर झालं की अनेक प्रश्न सुटतील, यावर दोघं ठाम आहेत. त्या घराचं वर्णन करताना दुसऱ्या रात्री उरलेलं सामान चोरण्यासाठी किंबहुना घर पाहण्यासाठी गोवर्धनसोबत गीताही येते. एक संपूर्ण रात्र त्या घरात दोघं सहज वावरत राहतात. निवांत बोलतात. एकमेकांवर बोलतात. प्रेम करतात. हसतात. रडतात. त्यांच्यात एकमेकांशी अत्यंत उत्कट संवाद करणारी ही जागा सुर्वेंची असणं ही मला गंमत वाटली. ज्या पाइपावर चढून वरच्या खिडकीतून ते आत येतात, ती तिथली रात्र ते एन्जॉय करतात. खिडकीतून सतत त्यांना चंद्र दिसतो, जो त्यांना झोपडपट्टीतूनही दिसतो. पण हा मात्र वेगळा आहे, यावर दोघं ठाम असतात. 

या त्यांच्या उत्कट सहवासाला नारायण सुर्वेंच्या काही कविता अतिशय समर्पक वाटत होत्या, ज्या मी त्यात त्यांच्या संवादाचाच एक भाग म्हणून पेरत गेलो… त्यातले हे काही निवडक संवाद… 

चंद्रा…
ह्या खिडकीतून सरळ आत उतरून ये,
चल हे कपडे घाल,
तुझी कोमल बोटे मळतील —
गीता – मळू देत.
गोवर्धन – हाताला घट्टेही पडतील.
गीता – (रडत) पडू देत.
गोवर्धन – सर्वांची सुरुवात अशीच असते.
गीता – (रडत) सुरुवात संपू देत —
गोवर्धन – आणखी एक —
गीता- हूं… ?

गोवर्धन – सूर्यमालिकेतील सर्वांविषयी विचार करणारे आम्ही — कधी भाकरीचा चंद्र म्हणतो; कधी गालावरचा… फारच झिजल्यात या उपमा… चंद्रा, तू आपला आमच्यासारखाच सामान्य हो !

किंवा, 

मध्यरात्री गोवर्धनच्या कुशीत गीता झोपून गेल्यावर गोवर्धनचा गळा दाटून येतो. तेव्हा तो शेल्फमध्ये ठेवलेलं पुस्तक उलगडत दुसऱ्या हातानं तिला थोपटत सुर्वेंची कविता वाचतो, 

‘माझी गा दमून निजली खुराड्यात चंद्रावळ
मीही शब्द जुळवीत जागा आहे उशाजवळ
मलाही ऐकू येते आहे वाऱ्याची सळसळ
वेळेवर येण्याचा नियम आज सांगू नको’

चोरीचा माल परत करायला गीतासह गोवर्धन येतो. परत करायला गीताचा विरोध असतो, पण गोवर्धनला मुद्देमाल परत ठेवायचाच असतो. कारण ते नारायण सुर्वे नावाच्या कवीचं घर आहे म्हणून… त्या एका प्रसंगात गोवर्धन म्हणतो, “गीता, नारायण सुर्वे लय मोठा माणूस — तुला नाय माहीत ?” त्यावर गीता म्हणते, “मोठाच असला पायजे ना. गरीबाघरी कशी चोरी करणार आपण ?” 

नाटकात हवालदार आणि इन्स्पेक्टर यांच्या संवादातून इन्स्पेक्टरही हवालदाराला नारायण सुर्वे समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु हवालदार म्हणतो की, “उद्या हा चोर पण कविता करायला लागला आणि त्याच्या कविता छापून यायला लागल्या तर त्याच्यातल्या चोराचं कौतुक व्हायला लागेल. मग काय करायचं ? समाजाचा तोल सांभाळायचा असेल, तर साहेब, कवीनं चोर होऊ नये आणि चोरानं कवी होऊ नये. तुम्ही ना साहेब, फिलॉसॉफी वगैरे बाजूला ठेवा, मी रिक्वेस्ट करतो, ह्या चोराकडे आपण देशविघातक कृत्याची सुरुवात म्हणून पाहायला पाहिजे, साहेब. तुम्हाला सांगतो, ब्रिटिश काळात एक वेळ भुरट्या चोरांना पकडलं जायचं नाही, पण विद्वान लोकांना पकडून तुरुंगात टाकत. कारण ब्रिटिश राजवटीला धोका चोरांपासून नव्हता. विद्वानांपासून होता. इतिहासातून आपण शिकायला पाहिजे साहेब…” या पद्धतीचं लॉजिक मांडत राहून तो एका प्रकारे समकालातील कोलाहलाला कारणीभूत ठरलेल्या अनेकविध सत्तांचं प्रतिनिधित्व करत राहतो. 

यासोबतच एक संदर्भ मला माहीत होता, चांदवडला शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी असलेल्या चाळीस हजार शेतकरी बायकांनी नारायण सुर्वेंची ‘डोंगरी शेत माझं गं, मी बेणू किती’ ही कविता सादर केली होती. ही घटना खूप गाजली. तोही संदर्भ मला या नाटकात घ्यावासा वाटला. शिवाय —

“सात वाजता सकाळी । भोंगा वाजवी भूपाळी । सुरू झाली पहिली पाळी । मोठ्या डौलात ॥ चाक फिरे गरगरा । सूत निघे भरभरा । नटवाया वसुंधरा । आमच्या घामातून ॥ निर्मून धन आम्ही सारं । मालक असून झालो चोर । धनिकांचा वाढे जोर । ऐट दावून । पैका नाही इंधनाला । काय शिजवावं बोला । का शिवावं पोटाला । टाके घालून ॥” —

ही नारायण सुर्वेंची गिरणीची लावणीही यात घ्यावीशी वाटली. भांडवलशाही तशीच राहते. तिचं स्वरूप बदलतं. पूर्वी मालक होते. आता खूप मालक आहेत, फक्त ते डोळ्यांनी दिसत नाहीत. शोषण आहेच, ते अधिक वाढलंय. फक्त पद्धत बदलली आहे. गुंगीचं औषध देऊन लोकांना बधीर केलं जातं हे आणि मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जात आहे. ते कमी न होता प्रपोर्शनेटली अधिक ‘विकसित’ झालं आहे, ही मांडणी गीता-गोवर्धन आणि हवालदार-इन्स्पेक्टर यांच्या संवादांतून नकळत येत गेली. 

म्हणजे, कोणतंही भाष्य जाणीवपूर्वक करणं टाळून या चौघांच्या नैसर्गिक संवादांतून, वागण्यातून ते येत जावं, हा माझा लेखन करतानाचा स्वत:ला आग्रह होता. कदाचित ते तसं उतरत गेलंही…

संहितेनंतरचा प्रवास

माझी अनेक नाटकं दिग्दर्शित करणारा सचिन शिंदे याचा कायमच ‘मिनिमलिस्टिक’ थिएटरवर भर असतो. ही घटना सांगितल्यापासून तो लिहिण्यासाठी अत्यंत मागे लागलेला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचा तो प्रभारी संचालक, तर मी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून काम पाहतो आहोत. आम्ही ठरवलं की आपण विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने हे प्रायोगिक नाटक रंगमंचावर आणायचं. या निमित्ताने विद्यापीठाच्या या उपक्रमाला प्रसिद्धी मिळेल आणि महाराष्ट्रापर्यंत ललित कला केंद्रही पोहोचेल. नवनव्या विद्यार्थ्यांनाही जोडून घेता येईल. मग आधी नाटक लिहून पूर्ण करण्याचं ठरवलं. आठवडाभरात लिहून झालं. पहिला खर्डा लिहून पूर्ण झाला. सचिनला वाचून दाखवलं. त्याला खूप आवडलं. एका आठवड्याभरानंतर पुन्हा संहिता समोर घेऊन बसलो. नीट संपादित केली. दुसरा खर्डा तयार केला. तोवर विद्यापीठातील, तसंच आमच्या ग्रुपमधील काही कलावंत, तंत्रज्ञ आणि या चार भूमिकांसाठी ओंकार गोवर्धन (चोर), अश्विनी कासार (गीता), अमेय बर्वे (इन्स्पेक्टर) आणि उमेश जगताप (हवालदार देशमुख) यांना निश्चित केलं. तालमीच्या पहिल्या दिवसांपर्यतची सलग प्रक्रिया सचिन नेहमी माझ्या सोबतीने करतो. कलावंतांकडून वाक्यांतील चढउतार, त्यांतील अर्थ, सबटेक्स्ट, आशय, त्यांतील लय, लहेजा हे सगळं तीन ते चार दिवसांत पूर्ण केल्यानंतर सचिन नाटक बसवायला हाती घेतो. ही मेथड. ते घडलं तसंच. परंतु दर वेळी सचिनला पटकन सुचतं तसं यावेळी नेपथ्यच काही केल्या सुचेना. अनेकानेक पद्धतींनी त्यानं डिझाईन करून पाहिल्या, अभ्यास केला. संहिता पुन्हा पुन्हा वाचली. परंतु लेखकानं लिहिलेला सीसीटीव्हीचा फॅक्टर रंगमंचावर नेमका काय वेगळ्या पद्धतीने घेता येईल, यावर तो विचार करत होता. 

एक दिवस अचानक ‘युरेका ! युरेका !’सारखं ओरडत तो आला, आणि त्यानं नेपथ्य सुचल्याचं मला सांगितलं. रंगमंच हाच लॅपटॉपचा स्क्रीन असेल, बाकी फार करायची गरजच नाही, असं तो म्हणाला. मग त्यानं डिझाईन तयार केलं. पीव्हीसी पाईप जोडून एक सांगाडा तयार करून त्रिमितीय आभास निर्माण करणं ही त्याची संकल्पना. आधी त्यानं या नेपथ्याचं एक छोटं मॉडेल तयार केलं. त्या मॉडेलमुळे सगळ्याच गोष्टी सोप्या होत गेल्या. कलावंत, प्रकाशयोजना आणि संगीत यांतून या सांगाड्याचा रिकामा अवकाश सहज भरून निघेल, हा त्याचा विचार सगळ्यांनाच आवडला. 

दरम्यान या नाटकाची संकल्पना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांना ऐकवली. त्यांना प्रचंड आवडली. एका सामान्य चोराचं किंवा चुकीच्या मार्गाला लागलेल्या माणसाचं मनपरिवर्तन कवीच्या माध्यमातून होणं, ही घटनाच मानवी मूल्यांवरची, माणुसकीवरची श्रद्धा दृढ करणारी आहे, असं कुलगुरू म्हणाले, आणि त्यांनी सांगितलं, की हे नाटक आपण विद्यापीठातर्फे रंगमंचावर आणू यात. संहिता पूर्ण झाल्यावरही कुलगुरूंसमवेत एक वाचन झालं. त्यांना संहिता खूपच आवडली. त्यांनी निर्मितीबाबत काही मौलिक सूचनाही केल्या. ज्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. सचिनने नेपथ्य करून घेतलं. विद्यापीठातच तालमी सुरू झाल्या. तासून-तासून संहिता आणखी बांधेसूद करण्यावर सचिनचा भर होता. नाटकाचं नाव मनात होतं, पण ठरायचं होतं. माझ्या डोक्यात ही घटना वाचल्यापासून ‘इथेच टाका तंबू’ या जुन्या गाण्याच्या ओळी उगाचच रेंगाळू लागल्या होत्या. चोराला घर आवडलं होतं. कदाचित असंच आपलं घर असावं, आपण सुखवस्तू माणसांसारखं जगावं, ही त्याची अभिलाषा असणारच. त्यामुळे चोरी करायला तो जिथे जिथे जात असेल, तिथे तिथे त्याला ते घरच आपलंसं करून घ्यावंसं नक्कीच वाटत असणार. जिथे आपल्या सुखाच्या सगळ्या गोष्टी मिळतात, तिथेच मुक्काम करू, या त्याच्या भावनेतून, त्याच्या रेंगाळण्यातून ‘इथेच टाका तंबू’ हे शीर्षक निश्चित केलं. ऋषिकेश शेलार हा आमच्या ग्रुपमधला प्रतिभावंत संगीतकार आणि गायक, लोकसंगीताची चांगली समज असलेला. या नाटकाला जोडणारं एक चांगलं थीम-साँग हवं होतं. त्याचे शब्द लिहून दिले —  

“आपण मालक असून जिणे,
चोरट्याचे वाट्याला…
नको चोरटे जगणे आता
पोटासाठी भटकणे —
जमिनीची मऊ गादी
आकाशाचे एक छप्पर
खिडकीतून चंद्र येतो
इथेच आता थांबू…
इथेच टाका तंबू…”

व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या क्रांतिगीतासारख्या या शब्दांना ऋषिकेशनं मराठी लोकसंगीत आणि सुफी संगीत यांचा मस्त मिलाफ करत त्यातील बंडखोरीला हलकीशी अगतिकता दिली, आणि फारच सुंदर गाणं केलं. या गाण्याचा संपूर्ण नाटकभर अत्यंत समर्पक वापर केल्यानं एक वेगळंच परिमाण प्रयोगाला मिळतं. पार्श्वसंगीतातही समकालीन आणि गिरणकामगारांच्या काळातील मुंबईतील कोलाहल या दोन्ही गोष्टी साधायच्या होत्या. ते काम ऋषिकेश गांगुर्डे या विद्यापीठात नोकरीला असलेल्या गुणी मुलाकडून सचिननं करवून घेतलं. लेखनाच्या प्रक्रियेचा सचिन साक्षीदार होता. मी काय पद्धतीनं संहितेपर्यंत पोहोचलो, हे तो जाणून होता. त्याला प्रत्येक दृश्याला, शब्दाला नीट न्याय द्यायचा होता. नाटकात नारायण सुर्वे कुठेही नसताना ते नाटकभर जाणवत राहतील, हा परिणाम साधायचा होता. प्रकाशयोजना डिझाईन करताना प्रणव सपकाळे आणि निखिल मारणे या युवा जोडीकडून सचिननं अतिशय प्रभावीपणे हे काम केलं. रंगमंचाच्या चौकटीबाहेरून वरच्या खोलीतून मध्येच एक पिवळा झोत जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा तेथून पुस्तकातून झटकलेल्या धुळीचे कण दिसत राहतात. तो झोत म्हणजे नारायण सुर्वे यांच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे.

एखादी कविता रचत जावी, तसं नाटक घडत गेलं. ओंकार हा स्वत: चांगला अभ्यासक. त्याच्या भूमिकेबाबत अत्यंत बारकाईनं त्यानं प्रश्न, शंका विचारत बैठक पक्की करत नेली. अश्विनी ही आजच्या काळातील अतिशय चतुरस्र व तरल अभिनेत्री. तिच्या भूमिकेतील अनेक स्तर दाखवताना तिनंही खूप मेहनत घेतली. इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील अमेयला एक बॅलन्स्ड, नव्या काळातला पुरोगामी विचारांचा समंजस अधिकारी दाखवायचा होता. समोर हवालदाराच्या भूमिकेत कसलेला अभिनेता उमेश जगताप होता. अमेयनं अत्यंत संयतपणे आपली भूमिका समजावून घेतली. उमेशला मिळालेली हवालदाराची भूमिका मुळात लिहितानाच मला खूप मजा आली होती. एखाद्या निरुपद्रवी किंवा किरकोळ अदखलपात्र गुन्हा करणाऱ्याला मोठा गुन्हेगार किंवा देशद्रोही, नक्षलवादी ठरवण्यासाठी नॅरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट करत त्याला वेढलं जातं, याबाबत आपण वाचत आलो आहोत, पाहत आलो आहोत. याच यंत्रणेच्या विचारांचा वाहक किंवा समर्थक असलेला वयस्क हवालदार हुद्द्यानं ज्येष्ठ असलेल्या इन्स्पेक्टरचा आदर ठेवून उपहासात्मक विनोदाची झालर देऊन आपलं म्हणणं प्रत्येक वेळी मांडत राहतो. त्याचा मुद्दा किंवा विरोध हा कळत-नकळत समकालाबाबत एक प्रखर भाष्य करणारा हवा, यातूनच मी हे पात्र कॅरिकेचर आणि मानवी स्वभाव यांतील धूसर सीमारेषेवर ठेवण्याचा प्रयत्न केला. ती सीमारेषा उमेशने अतिशय प्रगल्भपणे सांभाळून या भूमिकेला अप्रतिम न्याय दिला. तालीम झाल्यावर मी येई, तेव्हा सगळे नाटकातील आशयाबद्दल चर्चा करीत. त्यातील आंतरसंहिता उलगडायला लागली होती. सचिननं प्रत्येक प्रसंगांचं ब्लॉकिंग पेपरवर तयार करून प्रत्यक्ष बसवलंही. ही सगळी प्रक्रिया संहिता लिहून झाल्यानंतर दोन महिने सुरू होती. मग प्रयोग सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांत नाटकाला मिळणारा प्रतिसाद फारच उत्तम आहे. चर्चा होताहेत. भरभरून लिहून येतंय…

मुळात एखादी दोन कॉलमची बातमी तुमचा ताबा घेते आणि एक दीर्घ उत्खनन करायला भाग पाडते, ही फार विलक्षण प्रक्रिया आहे. कुणीतरी विषय सुचवला नि मी लिहिला असं माझ्या बाबतीत होत नाही. कारण तसं करण्यासाठीची एक वेगळी गुणवत्ता तुमच्याकडे असावी लागते, ती माझ्याकडे नाही. आतून जे येतं ते लिहावंसं वाटतं. पण हा विषय बाहेरचा होता. घटनेशी दूरान्वयानेही माझा संबंध नव्हता. त्या बातमीनं आत काहीतरी हललं होतं. एकूण नकारात्मक वातावरणात ही घटना कदाचित आपल्या समाजावर चढलेला गंज खरवडून काढणारी होती. आपल्या कथित शहाणपणाला, नैतिकतेला पुन्हा नव्या काळाच्या निकषावर घासून पाहायला भाग पाडणारी घटना होती. त्या घटनेचा नायक कोण होता ? नारायण सुर्वे ? की चोर ? गीता जेव्हा मुद्देमाल सुर्वेच्या घरात परत आणून ठेवणाऱ्या गोवर्धनवर त्रागा केल्यावर शांत होत विचारते की, “कोण होते हे नारायण सुर्वे ?” तेव्हा त्यानंतरचा एक छोटा भाग सुर्वेंच्या कवितांचा आणि त्यांच्याबद्दलच्या गद्य माहितीचा करायचा होता. त्यामुळे पोर्टर, मनीआडरमधली सुंद्री, याकूब नालबंदवाला, आफ्रिकन चाचा आणि “खडे असो रे माझो झील… ह्या मेरेर की त्या…” म्हणणारी स्टेशनवरची चंद्रा नायकीण ही सुर्वेंच्या कवितेतील पात्रं काही मिनिटांपुरती नाटकाच्या कथेच्या प्रवाहाचाच एक भाग वाटावी या पद्धतीनं आणली, ज्यातून सुर्वेंच्या डॉक्युड्रामाचा फील मला येऊ द्यायचा नव्हता. पहिल्या खर्ड्यात जाणवणारं ओव्हररायटिंग दुसऱ्या खर्ड्यात कमी करत अधिक बंदिस्त करायचा प्रयत्न केला होताच. खरं तर, ही वरवर पाहता गुन्हेगारी कथा होती. पोलिस-तपासातील गुंतागुंत यात होती. सीसीटीव्ही फूटेज पाहत वेगवेगळ्या अर्थांच्या आविष्करणातून संभ्रम वाढवत नेण्यावर भर दिलेला होता. शिवाय पहिल्या अंकात, चोरानं ही चोरी नेमकी कोणाच्या घरात केली आहे, हे गुपित सांगून टाकलं आहे. मग उत्सुकता ही होती की सगळी गुपितं पहिल्या अंकात लेखकानं सांगून टाकल्यानं आता दुसऱ्या अंकात काय असणार आहे ? या शंका बरोबर होत्या, परंतु मला तपासनाट्याचा किंवा धक्कातंत्राचा वापरच करावासा वाटला नाही. फोकस माझा एक गुन्हा उलगडत नेण्याच्या प्रक्रियेवर नव्हता. तो, सुरुवातीला सांगितलं त्यानुसार, चोराच्या व त्याच्या बायकोच्या भवतालावर होता. ज्या जगण्याला आपण संघर्ष म्हणतो, अशा त्यांच्या जीवनशैलीवर मला फोकस करायचा होता. त्यांची समज नेमकी काय आहे, त्यांची मुळं कुठली आहेत ? त्यांना या शहरात पाच वर्षांपासून राहूनही ‘हे तात्पुरतं आहे, भारीतलं जीवन अजून सुरू व्हायचंय, तोवर वाट पाहत टाईमपास करू’ असं का वाटतंय ? यांवर मला फोकस करायचा होता. कविता, त्यांतील संवेदनशीलता आणि त्यांतील मानवी जगण्याची सूत्रं इथपर्यंत चोराला, त्याच्या बायकोला आणि पोलिसांच्या निमित्ताने यंत्रणेला मला घेऊन यायचं होतं. ते कितपत साधलं, ते माहीत नाही; पण सगळा मुद्देमाल जागेवर ठेवल्यावर चोराने लिहून ठेवलेला माफीनामा ही त्याची पहिली कविता आहे, असं हुंदके देत गीता म्हणते तेव्हा या माफीनाम्याला व तिच्या विधानाला एका वैश्विक कवितेचा आयाम आपोआपच प्राप्त होऊन जातो. चोराला चोरच ठेवून त्याचं फार उदात्तीकरण न करता त्याच्या या नैतिक जागरुकतेचा मौन राखून सन्मान करण्याचा माझा प्रयत्न होता. चोराचं, चोराच्या — आपल्या वर्तमान भवतालाचं हे नाटक एक प्रकारचं दस्तऐवजीकरणच आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Image credit: Datta Patil

Post Tags

Leave a comment