“होळीसाठी तुला अख्ख्या आठवडाभराची रजा कशाला हवी ? हा एका दिवसाचाच सण आहे ना ? मला तुझं आणि तुझ्या काम करण्याच्या पद्धतीचं काहीच समजत नाही,” बॉस थंड आणि कोरड्या आवाजात बोलला. तो डोकं शांत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याच्या आवाजातला ताण मला स्पष्ट जाणवत होता. माझ्याशी सौजन्याने वागणं हे त्याच्यासाठी किती कष्टाचं काम आहे, हे मला चांगलंच ठाऊक होतं. मी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता त्याच्याकडे बघत राहिलो. माझ्या या कृतीचे पुढे काय परिणाम होतील, याची पर्वा करण्याच्या मनःस्थितीत मी त्या क्षणी नव्हतो. याच्यासाठी मी राजीनामा द्यायला आणि ‘नोटीस पीरियड’ पूर्ण न करताच फरार व्हायलाही सज्ज होतो. ‘ नाही देऊ दे माझा माझा शेवटचा पगार आणि सेटलमेंट’ मी खिन्नपणे विचार केला. त्या सकाळी मी ठरवलं होतं. एक तर माझी रजा मी मंजूर करून घेणार किंवा नोकरी सोडून देणार.
“पण, इतक्या उशिरा का रजा टाकलीस ?” मी आता पुढे काहीच बोलणार नाही हे ओळखून त्याने विचारलं. “मला तत्काळची तिकिटं कन्फर्म झाल्याचं आत्ताच कळलं; आणि गेल्या महिन्यातच मी तुम्हाला सांगितलेलं की, तिकीटं मिळाली तरच मी रजेसाठी अर्ज करीन,” माझ्या निर्विकार चेहर्याला साजेशा अलिप्त आवाजात मी उत्तर दिलं. मला पक्कं ठाऊक होतं की, त्याच्या कुप्रसिद्ध संतापाची आग माझ्यावर ओकण्यासाठी तो फक्त योग्य संधी शोधत होता. त्याच्या कपाळाची नस जोरजोरात उडत होती आणि तो आपल्या पेनाशी चाळा करत होता — या दोन्ही खुणांमुळे, काहीच क्षणात माझ्यावर ‘आशीर्वादांचा’ जो वर्षाव होणार होता, त्याची पूर्वसूचना मिळाली.
त्याने क्षणभर डोळे मिटले; जणू काही आपल्या शब्दांच्या प्रहाराने माझा सर्वनाश करायला म्हणून तो आपली सर्व आसुरी शक्ती एकवटत होता. पण प्रहार करण्यासाठी त्याला एका सॉलिड ट्रिगरची गरज होती. कदाचित, सुतळी बॉम्बच्या वातीवर ठिणगी पडण्यासाठी, माझ्याकडून अजून जास्त विरोधाची त्याला अपेक्षा होती. दुसरीकडे मात्र, मला स्वतःबद्दल खूप छान वाटत होतं. स्लीपर क्लासमध्ये कन्फर्म तत्काळ तिकिटं मिळवणं — आणि तेही सलग सुट्ट्या आलेल्या असताना — ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. गेल्या एका तासात अनुभवलेल्या त्या रोमांचक अनुभवाने मी अजूनही भारावलेला होतो. आणि आता मला नशीब आजमावून बघायचं होतं.
माझ्या डोळ्यांदेखत तो कोसळावा अशी माझी तीव्र इच्छा होती. मी हे आधीही केलं होतं आणि तो अनुभव फारच समाधानकारक होता. यामुळे मला नेहमी माझ्या शाळेतल्या तापट स्वभावाच्या एका मास्तरांची आठवण यायची. ते प्रत्येक वेळी कोणी त्यांचं ऐकलं नाही की आपला संयम गमावून बसायचे आणि स्वतःची थट्टा करून घ्यायचे. मी नेहमीच त्यांना चिडवायचो आणि त्याची मोठी किंमत मला दोन्ही तळहातांवर मिळणार्या छडीच्या फटक्यांच्या रूपात चुकवावी लागायची. पण शाळेच्या त्या अंधाऱ्या वर्गात त्यांना रागाने वेडं होऊन कोसळताना बघण्यात मला नेहमीच खूप समाधान मिळायचं.
मात्र, बॉस काय बोलणार हे आधीच माहीत असल्यामुळे त्याचा तो शिव्यांचा भडिमार कंटाळवाणा वाटायचा. हे सर्व अगदी एखाद्या जोडप्याच्या भांडणांसारखं वाटू लागलं होतं. जसं एखादे नवराबायको वर्षानुवर्षं काही क्षुल्लक गोष्टींवरून भांडत राहतात, पण त्या सोडवण्याचा कोणताही विचार करत नाहीत; त्यांचे ते अपमान माहीत असतात, इतके की त्यांचा अंदाज लावणं जरा जास्तच सोपं झालेलं असतं, आणि जर सुरुवातीलाच प्रत्युत्तर दिलं गेलं नाही, तर पुढे काय होणार आहे हेही माहीत असतं; आणि मग कोणी एकजण थांबतं कारण ते एक तर थकून गेलेले असतात, किंवा भुकेलेले असतात, किंवा दोन्ही.
त्याची ओरडण्याची पद्धत म्हणजे खरं तर जुनं उकरून काढायचं व अत्यंत खासगी गोष्टींवरून अपमान करायचा अशी होती, पण मी आतापर्यंत केलेल्या सर्व चुकांचा इतिहास सांगण्याच्या ढोंगामागे ती लपवलेली होती. तो अगदी सुरुवातीपासून सुरू व्हायचा, जेव्हा मी कंपनीत रुजू झालो तेव्हापासून; जेव्हा मी मोठ्या बॉसला पाठवलेल्या एका साध्या परिचयात्मक इ-मेलमध्ये त्याला सीसी-मध्ये ठेवायला विसरलो होतो आणि तेव्हा तो माझ्यावर किती नाराज झाला होता. त्या इ-मेलच्या घटनेचा पुरेपूर फायदा उचलल्यावर, तो विषय बदलायचा आणि माझ्या इतर चुका एकापाठोपाठ एक सांगायला लागायचा, जणू काही माझ्या कारकिर्दीतील वाईट टप्पे म्हणजे उडुपीच्या एखाद्या जुन्या हॉटेलच्या मेन्यूमधील पदार्थच होते. मी एक वाईट कर्मचारी का आहे, याची त्याची लांबलचक यादी असह्य झाल्याने, मी पुटपुटत माफी मागून निघून जाईपर्यंत तो बोलतच राहायचा.
मी आता एका तिठ्यावर येऊन थांबलो होतो. एकीकडे, त्या तत्काळ तिकिटांसाठी माझ्याशी झुंजलेल्या इतर हताश प्रवाशांवर मी गोड विजय मिळवला होता आणि त्याचा आनंद मला घ्यायचा होता, आणि दुसरीकडे, अंगावर येणार्या त्या बैलाला शिंगावर घ्यायचं होतं. मला ती ठिणगी पेटवायची होती, पण तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला.
तो एचआरवाला होता. तो केबिनमध्ये डोकावून बॉसशी बोलला. तो फक्त ‘चौकशी करत होता’, ‘म्हणजे काहीही असो,’ मी मनातल्या मनात विचार केला. “इथे सगळं ठीक आहे, यार,” बॉस पूर्णपणे कृत्रिम पण उत्साही आवाजात म्हणाला, पण तो एचआरवाला ऐकत नव्हता. त्याने मान डोलावली आणि तो निघून गेला. त्याच्यासाठी ती नेहमीचीच एक तपासणी होती. पण त्याने नकळत खोलीतला तणाव दूर केला होता. माझाही आता या नाटकीपणामधला रस उडाला होता. मला फक्त घरी जायचं होतं, बॅग भरायची होती, आणि आज रात्री आमच्या गावी, आमच्या मायभूमीला जाणाऱ्या ट्रेनसाठी एलटीटीकडे (लोकमान्य टिळक टर्मिनस) निघायचं होतं. म्हणून, “पुन्हा असं वागणार नाही,” असं काहीतरी पुटपुटत त्याने जाण्याची परवानगी देईपर्यंत मी शांत उभा राहिलो. दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. मी खूप थकलो होतो आणि मला भूक लागली होती. त्याला काय वाटत असेल याची मला आता पर्वा नव्हती.
माझ्या टेबलापाशी बसून मी विचार केला की, माझ्या रजेमुळे तो इतका का संतापला ? खूप प्रयत्न करूनही, मला याचं काहीच कारण सुचत नव्हतं. मी शेवटची रजा गणेशचतुर्थीच्या वेळी घेतली होती — आणि ती सुद्धा फक्त एका दिवसाची. त्यानंतर मी तत्परतेने काम केलं होतं आणि त्याला तक्रार करण्याची फारशी संधी दिली नव्हती. वर्षभर मी अतोनात कष्ट घेतले होते आणि माझ्या सर्व रजा केवळ याच क्षणासाठी राखून ठेवल्या होत्या. शेवटी, ही होळी होती — शिमग्याचे दिवस!
मी कोकणातला आहे — रत्नागिरी नावाच्या ‘हिरव्यागार’ जिल्ह्यात माझं छोटंसं गाव आहे. आमच्या लोकांसाठी होळी हा काही एका दिवसाचा सण नाही, तो त्याहूनही कितीतरी मोठा आहे. आमच्या ग्रामदेवतेचा हा एक उत्सवी सोहळा असतो, ज्याची सुरुवात ‘होळी’ने — म्हणजेच होळीची शेकोटी पेटवण्याने — होते. या काळात, ग्रामदेवतांना त्यांच्या मंदिरातून पालखीतून अतिशय थाटामाटात बाहेर आणलं जातं आणि गावातल्या प्रत्येक घरापर्यंत नेलं जातं; तिथे आम्ही असीम भक्तिभावाने आणि कृतज्ञतेने त्यांचं स्वागत करतो. काही वेळा तर मी स्वतःही ती पालखी माझ्या खांद्यावर उचलली आहे. दर वर्षी मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो.
रात्रीच्या वेळी गाव जागं होतं. ही वेळ असते आम्हा सर्व चाकरमानींसाठी — शहरातून स्थलांतरित झालेल्यांसाठी — आपल्या मायभूमीवर परतण्याची. आम्ही एकसंध होऊन एकत्र जमतो. भक्तीत, आनंदात आणि अगदी खोड्यांमध्येही रमून जातो. हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्ही तिथे असायला हवं. तिथलं वातावरण विजेच्या प्रवाहासारखं, व्यसन लावणारं असतं. रात्री आम्ही क्वचितच झोपतो आणि गावात आठवड्यापेक्षा कमी वेळ राहणं म्हणजे मोठा गुन्हा केल्यासारखं वाटतं.
गेल्या वर्षी मी तो गुन्हा केला. एका तातडीच्या कामामुळे मी माझा गावचा दौरा रद्द केला. बॉससमोर माझ्या भूमिकेवर ठाम उभं राहण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. आयटीमधल्या माझ्या मित्रांप्रमाणे मला घरून काम करायला मिळालं नाही, त्यामुळे मी रिमोट लॉग इन करण्याचा प्रस्तावही देऊ शकलो नाही. माझी वार्षिक भेट हुकली आणि त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नाही. तेव्हापासून, शिमग्याच्या दिवशी आमच्या लाल जांभ्या दगडांच्या भूमीत नेहमी परत येण्याची मी शपथ घेतली होती. अलीकडेच एचआरवाल्याने सांगितलं होतं की आम्ही आठवड्यातून एकदा घरून काम करू शकतो. पण बॉसने मला कधीच परवानगी दिली नाही. “का ?” तुम्ही विचाराल. मला माहीत नाही. व्यक्ती-विशिष्ट काही अटी आहेत का, असं तुम्ही एचआरला विचारू शकता.
मी कंपनीचा हिशेब सांभाळणारा एक साधा लेखापाल / अकाउंटंट होतो. पण बॉसच्या मते, माझ्याकडे संवेदनशील आणि गोपनीय माहिती होती, जी कंपनीच्या आवारातून बाहेर पाठवण्याचा धोका ते पत्करणार नव्हते. माझ्यासाठी ते फक्त माझ्या हार्ड ड्राईव्हमध्ये साठवलेले आकडे होते, पण बॉससाठी मात्र ती अमूल्य माहिती होती. ऑफिस नामक या पोलादी आणि काचेच्या इमारतीमध्येच ती माहिती सुरक्षित राहील, असं त्यांना वाटायचं. त्यांना हे माहीत नव्हतं की जर कोणी उकसवलं, तर माझ्या वहीच्या मागच्या पानावर ही स्प्रेडशीट मी सहजपणे उतरवू शकलो असतो. मला सगळं काही अगदी व्यवस्थित आठवत होतं.
मी नेहमीच गणितात चांगला होतो, त्यामुळे आकडे मला चांगले लक्षात राहायचे. मला कॅल्क्युलेटरची गरज पडायची नाही, पण तरीही मी तो वापरायचो, जेणेकरून बॉसला काळजी वाटू नये. माझ्या झटपट अंदाजांवर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात असे, आणि तुम्ही अंदाज लावला असेलच की ते अंदाज नेहमीच अचूक असायचे. पण जर मी कधी माझं हे कौशल्य त्यांना दाखवलं असतं, तर त्यांनी मला एक दुष्ट राक्षस, एक असुर ठरवून टाकलं असतं. माहिती चोरल्याबद्दल मला ऑफिसमधून हद्दपार केलं असतं, रस्त्यावर हाकलून दिलं असतं — अगदी शंकासुराप्रमाणे, ज्याने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले आणि विष्णूने ज्याला शिक्षा दिली.
शंकासुर, बाप रे ! तो राक्षस ! शिमग्याच्या काळात आमच्या गावाच्या गल्ल्यांमधून जो धुमाकूळ घालत फिरतो, तोच तो. तो गडद काळ्या रंगाचा पोशाख घालतो; डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी, लांबसडक दाढी आणि भयानक जीभ — असा त्याचा अवतार असतो, शिवाय कमरेला घुंगरांचा पट्टाही बांधलेला असतो. त्याच्या हातात एक आसूड असतो आणि जो कोणी त्याला छेडण्याचं धाडस करतो, त्याचा तो पाठलाग करतो. जगाच्या नजरेत कदाचित तो दुष्ट असेल; आमच्यासाठी मात्र तो अतिशय पूजनीय, किंबहुना प्रेमाचं पात्र आहे. खरं तर, शंकासुराला नेहमीच चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं आहे. माझी आजी — तिच्या आत्म्याला शांती मिळो — मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा गावी आलेलो, तेव्हा तिने मला त्याची गोष्ट सांगितली होती.
तिने मला सांगितलं होतं, की शंकासुर हा ‘अनार्यां’चा राजा होता आणि मूळचे वेद हे याच लोकांचे होते. त्यामुळे, ब्रह्मदेवाकडून तो केवळ तीच गोष्ट परत मिळवत होता, जी मूळची त्यांचीच होती. पण देव आणि असुर यांच्या कृती किती योग्य-अयोग्य होत्या, यावर आम्ही गावकरी फारसा विचार करत नसू. आम्हां गावकऱ्यांसाठी तो आमचा रक्षक होता, आमचा वाली होता; आणि त्याच्या आसुडाचा फटका पाठीवर बसणं, म्हणजे आम्ही त्याचा आशीर्वादच मानत असू. लहानपणी, या प्रेमळ राक्षसाने आमचा पाठलाग करणं हा आमच्यासाठी एक मोठा थरारच असायचा. त्याची शंकूच्या आकाराची टोपी, सळसळणारी दाढी आणि त्या गडद काळ्या पोशाखावर घुंगरांचा होणारा छमछमाट — हे सर्व सुरुवातीला थोडं भीतीदायक वाटायचं; पण गावाच्या गल्ल्यांमधून तो आमच्या दिशेने धावत येताना पाहून आम्हांला खूप आनंद व्हायचा.
काही वर्षांपूर्वी, एका स्थानिक हिप-हॉप कलाकाराने शंकासुरावर एक गाणं तयार केलं. ते छानसं गाणं आमच्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर लगेचच व्हायरल झालं. शंकासुर एखाद्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती ! आणि त्या कलाकाराने आपल्या लाडक्या देवाचं सार इतक्या अप्रतिमपणे टिपलं होतं. मला आठवतंय, तेव्हा मी ते गाणं माझ्या वडिलांना दाखवलं होतं. ते सहसा खूष होत नसत आणि गाण्याच्या शेवटी पण ते काही मोजक्या शब्दांपेक्षा जास्त बोललेच नाहीत. पण ते गाणं आणि त्याची दृश्यं पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. ही एक आठवण मी आजही जिवाशी जपून ठेवली आहे.
माझ्या गावातील इतर अनेकांप्रमाणेच, माझे वडील स्वतः ही एक ‘चाकरमानी’ होते. त्या काळात मुंबईत जोरात चालणार्या कापड-गिरण्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ते वाफेच्या बोटीने मुंबईला आले होते. एक गिरणी-कामगार म्हणून, त्यांचं आयुष्य गिरणीतून वाजणाऱ्या भोंग्यावर अवलंबून होतं. ठराविक वेळी वाजणाऱ्या त्या भोंग्यांनी आमच्या आयुष्यालाही एक शिस्त लावली होती. उदाहरणार्थ, त्यांची कामाची पाळी संपली की माझा खेळायचा वेळही संपायचा. मला पक्कं ठाऊक होतं की संध्याकाळचा भोंगा वाजल्यावर काहीच मिनिटांत ते घरी पोचतील. त्यानंतर आम्ही दोघंही पश्चिम दिशेला तोंड असणार्या आमच्या दरवाजापाशी बसायचो आणि बाहेरचा उजेड मावळण्यापूर्वीच मी माझा गृहपाठ पूर्ण करून टाकायचो. पण गिरण्या बंद पडल्या, तेव्हा हे सर्व बदललं. कामगारांची आंदोलनं अयशस्वी ठरल्यानंतर, जेव्हा गिरणीच्या दाराला भलंमोठं कुलूप लावण्यात आलं, तेव्हा ते फार काही बोलले नाहीत. आमचं भविष्य अनिश्चित वाटू लागलं होतं. पण, त्यांचा स्वभाव अत्यंत करारी होता. त्यांनी त्या लाकडी चाळीतलं आमचं घर विकून टाकलं आणि आम्ही उपनगरातल्या एका झोपडपट्टीत (स्थानिक भाषेत झोपडपट्ट्यांना ‘चाळ’च म्हटलं जाई — झोपडपट्टीवासीयांचा स्वाभिमान जपण्यासाठी तो सौम्य शब्दप्रयोग वापरला जायचा !) राहायला गेलो. त्यांनी एक जुनी सेकंड-हँड रिक्षा विकत घेतली आणि रातोरात आपला
पेशा बदलला. मी शाळेत जाण्यापूर्वीच ते कामावर जात असत आणि अनेकदा रात्री उशिरा घरी परतत.
पण दर रात्री, मला शाळेत काय शिकवलं याबद्दल ते विचारत असत. संध्याकाळचा गृहपाठ शिस्तीने नियमितपणे करायचा मी आटोकाट प्रयत्न करायचो; पण त्या वेळी फार गोंधळ असायचा. कारण नेमक्या त्याच वेळी नगरपालिकेकडून सार्वजनिक नळांमध्ये पाणी सोडलं जायचं आणि तिथे जाऊन आपला नंबर लावायचं काम आम्हां मुलांचं असायचं. पाणी येईपर्यंत तिथे वाट बघत राहण्याचा तो वेळ कधीच निवांत किंवा शांत नसे. आणि पाणी भरायचे हंडे, बादल्या घेऊन माझी आई तिथे पोहोचेपर्यंत, पाण्यासाठी चाललेल्या चढाओढीमुळे चाळीमधल्या बायकांमध्ये हमखास भांडण लागलेलं असायचं. घरी पोहोचेपर्यंत आम्ही बर्याचदा पार थकून जायचो; कारण आपला पाण्याचा वाटा मिळवण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांशी नुकतंच झगडून आलेलो असायचो — आणि दुसऱ्या दिवशी तेच सर्व पुन्हा नव्याने करायचं असे.
माझी आई एक कणखर बाई होती. आम्हां सर्वांसाठी तिने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं होतं. शहरामध्ये तिची ओळख केवळ ‘माझी आई’ आणि ‘माझ्या वडिलांची पत्नी’ एवढ्यापुरतीच मर्यादित होती. याचं तिला फार काही वाटत नसे. पण गावात मात्र तिचं स्वतःचं असं एक स्वतंत्र अस्तित्व होतं. तिथे, मॅट्रिकच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेली गावातील पहिली मुलगी म्हणून तिची ओळख होती. ती हुशार आणि गुणी विद्यार्थिनी होती. सर्वजण तिचा हेवा करत आणि तिचं कौतुक करत.
तिने पुढे जाऊन नर्स किंवा शिक्षिका व्हावं, असं सर्वांना वाटत होतं; पण तिने मात्र त्याऐवजी आपल्या कुटुंबाला निवडलं. तरी शहरात स्थायिक झाल्यानंतरही, तिला गावी जायची नेहमीच तीव्र ओढ वाटायची. म्हणून ती शिमग्याच्या प्रत्येक सणापूर्वी रेल्वेची तिकिटं काढायला माझ्या मागे लागायची. माझे वडील गेल्यानंतरही, गावी परत जाण्याबाबतचा तिचा उत्साह कधीच मावळला नाही. पण जेव्हा मी तिला विचारलं की तिला तिथेच कायमचं राहायला आवडेल का, तेव्हा ती हसून म्हणाली की, आता ती पूर्णपणे ‘शहरी’ झाली आहे. तरीही, गावाला भेट देण्याची कोणतीही संधी ती कधीच सोडत नसे. बॉसशी बोलणं झालं त्या दिवशी सकाळी, आणि माझ्या तत्काळ तिकिटांच्या विजयाच्या आधी, ती फार बोलत नव्हती. तिला चांगलंच ठाऊक होतं की मी वेळेवर तिकिटं बुक केली नव्हती आणि माझ्याकडे फक्त वेटिंग लिस्टवरची तिकिटं होती, जी या नव्या व्यवस्थेत निरुपयोगी होती. मी घरी पोचलो आणि तिला सांगितलं, की आपण सगळे तीन कन्फर्म तिकिटांवर गावी जातोय ! (तिसरं तिकीट माझ्या बायकोसाठी होतं, जी काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात आली होती.) तिला खूप आनंद झाला. ती लगेच स्वयंपाकघरातल्या देवघरात ठेवलेल्या गावच्या कुलदेवतेच्या फोटोच्या पाया पडायला गेली. तिचा हा क्षणिक दिलासा लवकरच संपून धावपळ सुरू झाली. तिने आमचं सर्वांचं सामान भरायला सुरुवात केली, जे एक न संपणारं काम वाटत होतं. तिने माझ्या बायकोला आणि मला सोबत घेतलं आणि आम्ही सगळे प्रवासाची तयारी करण्यात व्यग्र झालो.
त्या रात्री हलकंच जेवण केलं आणि निघालो. दादरपर्यंत आम्ही रेल्वेने गेलो; तिथून कुर्ल्यासाठी दुसरी ट्रेन पकडली आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यासाठी टिळक नगरची ट्रेन घेतली. थेट रिक्षाने जायला ती नको म्हणाली. रिक्षाने प्रवास केल्यावर पाठीला त्रास होतो, असं म्हणाली; आणि शिवाय तो प्रवास खर्चिकही ठरेल, अशीही पुस्ती तिने जोडली. पण मला ठाऊक होतं की, रिक्षातील प्रवासामुळे तिला माझ्या वडिलांची आठवण यायची. पूर्वी आम्ही जेव्हा आमच्या गावी जायला निघायचो, त्या दिवशी माझे वडील आम्हांला त्यांच्या स्वतःच्या रिक्षातून ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’पर्यंत नेऊन सोडायचे. ते आपली रिक्षा जवळच असलेल्या रिक्षा-स्टँडवर उभी करायचे आणि मग आम्ही सर्वजण एकत्रच गाडीत चढायचो.
आम्ही टिळक नगरला पोहोचलो, आणि तिथून, आपल्या गावी परतणाऱ्या इतर सर्व स्थलांतरितांच्या मागोमाग, मी एलटीटीकडे जाणाऱ्या वाटेवर पुढे झालो. या वर्षी, त्यांच्यापैकी अनेकांनी आपलं सामान मोठ्या प्लास्टिकच्या ड्रम्समध्ये भरून नेलं होतं. एलटीटीच्या प्रवेशद्वाराशीच, अंधारात एक मोठा प्रखर एलईडीचा फलक तळपत होता — जणू काही एखाद्या प्रयोगशाळेत एखादा किरणोत्सर्गी पदार्थ सांडला असावा. तो मजकूर स्पष्ट वाचण्यासाठी मी त्याच्या अधिक जवळ गेलो. तिथे लिहिलं होतं :
एलटीटी-एमएओ-विशेष गाडीला विलंब; ही गाडी आता पहाटे ३ वाजता सुटेल. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
हा जर इतर कोणताही दिवस असता, तर मी त्या फलकाला जोरात ठोसा मारला असता. पण आजच्या संध्याकाळी माझी मनःस्थिती खूपच आनंदी होती. आज शिमग्याचा सण सुरू होत होता, आणि त्यामुळे थोडाफार उशीर होणं मला चालणार होतं. याबद्दल मी काही बोलण्याआधीच, आईच म्हणाली, “मी बोलले होते ना तुला, आपण ‘कोकण कन्या’नेच जायला हवं होतं.”
मी हसून मान डोलावली. मध्यरात्र झाली होती; अवघे तीन तास उरलेले आणि मग आम्ही प्रवासाला निघणार होतो. मी तिची माफी मागितली आणि पुढच्या वर्षी नक्की वेळेवर तिकिटं काढीन, असं वचन दिलं. “चल, आपण बसायला जागा शोधू या,” असं म्हणत मी त्यांना माझ्या मागोमाग यायला खूण केली. वेटिंग रूम पूर्ण भरलेली होती, आणि त्यात ती मोफत वगैरे नव्हती. तसं इथे थोडे पैसे खर्च करायला माझी हरकत नव्हती, पण त्या अंधाऱ्या खोलीत सगळीकडे डास होते आणि एसी जेमतेम चालत होता. शिवाय, मी ओडोमॉस न्यायला विसरलो होतो. आता पुढचे तीन तास खूप कठीण वाटायला लागले. माझी बायको म्हणाली, “आपण प्लॅटफॉर्म एकवर दुसर्या जागा शोधू या.” आम्ही निघालो आणि आम्हाला स्टीलच्या खुर्च्यांचा एक बाक दिसला. तिथे फक्त एक उंच, सडपातळ माणूस अवघडून पुस्तक वाचत बसला होता. मी माझ्या आईला त्याच्या शेजारी बसायला दिलं, आणि मी आणि माझी पत्नी एक चादर पसरवून जमिनीवर बसलो.
तिथेही थोडे डास होते. डासांनी आपला हल्ला चढवताच, आम्ही सर्व आपापल्या उघड्या अंगावर जोरात थपडा मारू लागलो. आम्हांला डासांशी झुंजताना पाहून, हातात पुस्तक असलेल्या त्या गृहस्थाने त्याच्या पिशवीत हात घातला आणि माझ्या आईला ओडोमॉसची ट्यूब देऊ केली. आई थोडी संकोचली, पण मी तिला ती घ्यायला सांगितलं. मीही त्यातलं थोडं ओडोमॉस घेतलं आणि सर्व अंगाला लावून टाकलं. डासांचा उपद्रव तात्पुरता थांबला. तो गृहस्थ एकटाच गोव्याला जात होता. मला ते थोडं विचित्र वाटलं — त्याचं कुटुंब कुठे होतं ? आम्ही त्याला विचारलं. “सगळे आसपासच आहेत,” तो म्हणाला आणि पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. खरोखरच विचित्र माणूस होता !
मी उठलो आणि सर्वांसाठी थोडं पाणी विकत घ्यायला गेलो. दुकानाच्या अगदी बाजूलाच, मला एक ओळखीचा चेहरा दिसला. तो माझा जुना सहकारी होता. तोही कोकणातलाच होता आणि माझ्या गावापासून जवळच्याच एका गावचा होता. तो सुद्धा आपल्या कुटुंबासह घरी परत चाललेला. मी त्याला आमच्या जागेवर येऊन आमच्यासोबत बसायला बोलावलं, आणि तो लगेच ‘हो’ म्हणाला. त्याची आई आणि तो आमच्या बाजूलाच जमिनीवर बसले, आणि आमच्या गावाच्या बोलीभाषेत गप्पा मारायला सुरुवात केली.
घरी आम्ही त्या बोलीभाषेत फारसे बोलत नसू. बहुतेकदा आम्ही मराठीतच बोलायचो — आणि तेही अगदी मुंबईच्या शैलीत, ज्यात हिंदी, इंग्रजी आणि थोड्याफार गुजराती शब्दांचीही सरमिसळ असे. पण इथे ते बोलत असलेली ती गोड बोलीभाषा ऐकून मला खूप बरं वाटत होतं; त्यामुळे, गावामधल्या येत्या आठवड्यासाठी माझी जणू तयारीच होत होती. जसजशा गप्पा रंगत गेल्या, तसतसं आम्हांला वेळेचं भानच राहिलं नाही; शिवाय, त्या आठवड्यात पुन्हा कधीतरी भेटण्याचे बेतही आम्ही आखले. ठरल्याप्रमाणे, काहीसा उशीर होऊन आमची गाडी स्थानकात दाखल झाली आणि आम्ही तिच्या दिशेने धाव घेतली. माझी बायको आणि आई — दोघींनाही आपापल्या बर्थवर बसवल्यावर, मी जाऊन दरवाजापाशी उभा राहिलो. त्या क्षणी, आजचा दिवस कसा गेला आणि पुढचे दिवस कसे असतील, याचेच विचार मनात येत होते.
साधारणतः तीन वाजताच्या सुमारास, मोटरमनने प्रवासाच्या सुरुवातीचा संकेत दिला — त्या घंटेच्या जोरदार आवाजाने बहुतेक संपूर्ण टिळक नगर जागं झालं असावं —- आणि गाडीला गती दिली. तीन ‘कन्फर्म’ तिकिटांसह मला गाडीत जागा मिळवता आली, याचा मला खूपच आनंद झाला होता; आणि आता अखेर मी पालखी वाहायला, आमच्या कुलदेवतेची पूजा करायला आणि शंकासुराकडून पाठलाग करून घेऊन त्याचा आशीर्वाद घ्यायला म्हणून माझ्या माणसांकडे, माझ्या घरी निघालो होतो !
प्रतिमा-सौजन्य : आर्या जोशी (विकिमीडिया कॉमन्स)
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
