मराठी | English
आयुष्यातला पहिला शब्द आपण जेव्हा उच्चारतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपले आयुष्य सुरू होते. हा पहिला-वहिला शाब्दिक उच्चार असतो तो अर्थातच मातृभाषेतला. या एका शब्दाद्वारेच आपली जगाशी ओळख होते, आणि आपण अर्थ व संबंध यांच्या गुंतागुंतीच्या एका जाळ्यात विणले जातो. आपण आपल्या नावाचा उच्चार ओळखू लागतो. हळूहळू, आपल्या अस्मितेची जाणीव आकार घेऊ लागते. ही जाणीव आयुष्यभर आपल्यासोबत राहते, आणि आपली पहिली भाषाही. माझ्यासाठी, ही भाषा होती ‘मराठी’. याच भाषेत मी लहानाची मोठी झाले. पण या भाषेभोवतीचे सामाजिक-राजकीय संदर्भ; विशेषतः गुंतागुंतीच्या इतिहासाने आणि आर्थिक-सांस्कृतिक सत्तासंबंधांच्या व्यापक रचनेने घडवली गेलेली ‘मराठी अस्मिते’ची संकल्पना समजून घ्यायला मला बराच काळ लागला.
मराठी ही एक प्राचीन भाषा आहे जिची मुळे महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये सापडतात. अनेक युगांचा जन्म आणि मृत्यू या भाषेने पाहिला आहे. सातवाहन साम्राज्यापासून ते मराठा साम्राज्यापर्यंत, भक्ती-चळवळीपासून ते ब्रिटिश राजवटीतील समाजसुधारणांपर्यंत व स्वातंत्र्यलढ्यापर्यंत, आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत, मराठी परिस्थितीनुसार बदलली, विकसित झाली आणि इतर भाषांबरोबर तिची सरमिसळ झाली. या ऐतिहासिक प्रवासातून मोठ्या प्रमाणात मौखिक आणि लिखित साहित्य, परंपरा, तसेच ज्ञानप्रणाली विकसित झाल्या. आज मराठी भाषा मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी यांसारख्या विविध बोलीभाषांमध्ये आणि प्रादेशिक रूपांमध्ये दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी बोलींची वैशिष्ट्यपूर्ण उच्चारपद्धती व बोलण्याची आपापली स्वतंत्र शैली ऐकायला मिळते. यातून प्रत्येक बोलीचे वेगळेपण जाणवते. महाराष्ट्रातील विविध भागांत मुलाखती घेताना, मला अनेकदा स्थानिक लोकांच्या मदतीने मराठीचे मराठीतच भाषांतर करून घ्यावे लागले आहे. विदर्भातील किंवा मराठवाड्यातील खेड्यापाड्यांमध्ये ज्या प्रकारे मराठी बोलली जाते, ती शैली मुंबईच्या मराठीला सरावलेल्या माझ्या कानांना अनोळखीच वाटली. मराठीची ही समृद्ध विविधता, भाषिक अस्मितेभोवती आणि प्रतिष्ठेभोवती दीर्घकाळापासून धुमसत असलेल्या राजकीय वादळामध्ये कुठेतरी हरवूनच जाते.
मराठी आणि भीतीचे राजकारण
ऐतिहासिकदृष्ट्या, महाराष्ट्रामध्ये अस्मिता, स्वतंत्र भाषिक प्रदेश आणि राजकीय सत्ता यांविषयीचे संघर्ष अनेकदा मराठी भाषेच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करून त्यासाठी झालेल्या लढ्यातूनच व्यक्त झाले आहेत. मराठीभाषक लोकांसाठी स्वतंत्र राज्य हवे यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ सुरू करण्यात आली, जिचा यशस्वी समारोप १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीने झाला. इथेच पुढच्या भाषा-आधारित जनआंदोलनांचा पाया रचला गेला. शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष याच संदर्भातून उदयास आले; सुरुवातीला त्यांनी रोजगार आणि सार्वजनिक जीवनात मराठी भाषेला व संस्कृतीला प्राधान्य मिळावे यासाठी संघर्ष केला. त्यानंतर हळूहळू शिवसेनेने आपल्या राजकीय पटाचा विस्तार केला.
मराठी भाषेविषयीच्या समकालीन चर्चांमध्येही हे भाषिक तणाव सातत्याने दिसून येतात. विशेषतः राज्याच्या भाषिक रचनेतील लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या पार्श्वभूमीवर, जिथे मराठी, उर्दू आणि गुजराती या भाषांच्या स्थिर वाढीबरोबरच हिंदी-भाषकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, त्या संदर्भातील तीव्रता वाढत चालली आहे. लोकसंख्येच्या भाषिक रचनेत होणारे असे बदल अनेक गटांना चिंतित करतात, महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक भविष्याबद्दलच्या जुन्या चिंता पुन्हा जागृत होतात. (ओक, २०२५.) ऐतिहासिकदृष्ट्या कायम बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक राहिलेल्या या प्रदेशातील भाषिक असुरक्षिततेची ही भावना गोंधळात टाकणारी आहे. मराठी भाषेबद्दलचा आजचा संदेश आपल्याला सांगतो, की आपली भाषा धोक्यात आहे; जर आपण मराठी वाचवण्यासाठी सक्रियपणे काही केले नाही, तर ती नाहीशी होईल. असुरक्षिततेच्या या भावनेचे आत्यंतिक सातत्य आणि तिला असलेली लोकमान्यता यांमुळे मराठी भाषिक अस्मितेचे चिकित्सक अन्वेषण करणं आवश्यक वाटतं. करण्याची मागणी करते.
ऐतिहासिकदृष्ट्या, मराठी भाषेला भेडसावणारी आव्हाने किंवा ‘धोके’ हे भाषेच्या लोप पावण्याशी संबंधित नसून, ते प्रामुख्याने सत्ता, आश्रय आणि प्रतिष्ठा यांच्या बदलत्या संबंधांशी अधिक निगडित राहिले आहेत. वसाहतपूर्व काळात, मराठी भाषा आधी संस्कृतच्या आणि त्यानंतर पर्शियनसारख्या राजदरबारी भाषेच्या सोबतीने अस्तित्वात होती; अनेकदा ती या भाषांच्या तुलनेत दुय्यम मानली जात असे. पण तरीही महानुभाव पंथातील लीळाचरित्र, धवळे यांसारखे साहित्य, भक्तिपरंपरेतील संत-वाड्मय, समाजदर्शन घडवणारे शाहिरी वाङ्मय यांच्यामुळे मराठी भाषा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होती. मात्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत, इंग्रजी शिक्षणाच्या आगमनामुळे भाषिक उतरंडीची पुनर्रचना अधिक निर्णायकपणे झाली. या समीकरणात इंग्रजीला सामाजिक प्रगती, प्रशासन आणि आधुनिक ज्ञान यांची भाषा म्हणून स्थापित करण्यात आले, तर मराठी भाषा केवळ स्थानिक आणि साहित्यिक क्षेत्रांपुरतीच अधिकाधिक मर्यादित राहिली. परंतु त्याच वेळी, १९व्या शतकातील मुद्रणक्रांतीच्या आणि समाजसुधारणा-चळवळींच्या संदर्भात, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, जोतीराव फुले आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तींनी मराठीचा वापर एक ‘मूलगामी सार्वजनिक भाषा’ म्हणून केला. याद्वारे, एखादी भाषा उपेक्षित असूनही राजकीयदृष्ट्या किती सर्जनशील आणि परिणामकारक ठरू शकते, हे त्यांनी सिद्ध केले. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीनंतर, भाषेला जाणवणार्या धोक्याचा स्रोत हा राजकीय सत्तासंघर्षापासून स्थलांतर, शहरीकरण आणि मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये हिंदी व इंग्रजीचे वाढते वर्चस्व यांसारख्या अंतर्गत लोकसांख्यिकीय व आर्थिक बदलांकडे सरकला.
गेल्या काही दशकांत, नवउदारमतवादी शैक्षणिक धोरणे आणि जागतिकीकरण यांमुळे इंग्रजी भाषेचा आर्थिक प्रगतीशी असलेला संबंध अधिक दृढ झाला आहे. यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. भाषिक आकांक्षांची पुनर्रचना झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा-सूत्राच्या अंमलबजावणीवरून आणि विशेषतः शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याच्या शासकीय हालचालींवरून अलीकडे प्रचंड वाद निर्माण झाले. या धोरणामुळे भाषिक केंद्रीकरण अधिक दृढ होऊन त्यामुळे मराठीची गळचेपी होईल हा मुद्दा पुढे करत या नव्या होऊ
घातलेल्या बदलावर कडाडून टीका होत आहे. (ईपीडब्ल्यू, एंगेज २०२१.) अशा प्रकारे, इतिहास आणि सद्य घडामोडी पाहता, मराठी भाषेसमोर एकच एक असा सततचा धोका नसून परिवर्तनांची आणि आव्हानांची एक मालिकाच दिसून येते, ज्यामध्ये मराठीचे स्थान हे इतर भाषा, भाषिक समूह, तसेच राजकीय संस्था आणि सत्ताधारी शासनव्यवस्था यांच्या तुलनेत मोजले-मापले गेले आहे. तरीही, आज मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांबद्दलची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे आपल्याला दिसते.
जिवंत भाषा, मृत भाषा
२०१०मध्ये, अंदमान बेटांवर ‘बो’ या प्राचीन भाषेची शेवटच्या भाषक आणि ८५ वर्षं वयाची वृद्ध महिला ‘बोआ सीनियर’ यांचे निधन झाले. (बीबीसी न्यूज, २०१०.) त्यांच्या निधनासोबतच ती भाषाही लुप्त झाली असे मानले जाते. त्यानंतरच्या एका दशकात, म्हणजेच २०२०मध्ये, ‘सारे’ या भाषेच्या शेवटच्या ज्ञात भाषक ‘लिचो’ यांचेही निधन झाले. (टेरालिङ्ग्वा, २०२०.) अशा प्रसंगी आपल्याला एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचा सामना करावा लागतो : एखाद्या भाषेचा ‘मृत्यू’ होणे याचा अर्थ काय ? २०१०पूर्वी ‘बो’ भाषा खरोखरच ‘जिवंत’ होती का ? जेव्हा बोआ सीनियर यांच्याशी त्या भाषेत बोलण्यासाठी सोबत कोणीही उरले नव्हते, अगदी तेव्हाही ? भाषातज्ज्ञ अन्विता अबी यांनी नमूद केल्याप्रमाणे, बोआ सीनियर या आपल्या बो भाषेच्या एकमेव भाषक म्हणून अनेक दशके जगल्या; या काळात त्या एकाकी राहिल्या. पुढे, केवळ संवाद साधता यावा या उद्देशाने त्यांनी हिंदी भाषेचे अंदमानी रूप शिकून घेतले.
जर एखादी भाषा केवळ संग्रहालये, ध्वनिमुद्रणे किंवा शब्दकोश यांमध्येच टिकून राहिली असेल, जर ती लोकांच्या दैनंदिन बोलचालीत नसेल, तर आपण त्या भाषेला ‘जिवंत’ म्हणू शकतो का? की ती जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये कुठेतरी अधांतरी आहे, जतन केलेली पण आता जिवंत नसलेली ?
भाषेचे अस्तित्व हे तिच्या भाषकांपासून स्वतंत्र नसते; भाषा ही तिच्या वापरातून, दररोजच्या सामान्य आणि जिव्हाळ्याच्या कृतींमधला अर्थ निर्माण करण्यातून जिवंत राहते. भाषा ही जिवंत राहते ती मुलांच्या पहिल्या शब्दांमध्ये, वर्गातील गप्पांमध्ये, कुजबुजींमध्ये आणि वादांमध्ये, शिव्यांमध्ये आणि अंगाई-गीतांमध्ये, पुन्हा पुन्हा सांगितलेल्या गोष्टींमध्ये आणि कायम पाठ असलेल्या गाण्यांमध्ये. आज, भाषा ही आपल्या फोनमधल्या संदेशांमध्ये, आपल्या स्क्रोलिंगमध्ये, समाजमाध्यमांच्या आपल्या सहज वापरामध्ये, आपल्या मनातल्या आवाजामध्येही जगते आहे. जी भाषा सर्वांत सहजतेने मनात येते, जी तुमच्या जगाशी सर्वांत जवळून जुळते, तीच भाषा तुमच्यातून, तुमच्या माध्यमातून जिवंत राहते.
तरीही अनेकदा, आपल्याला भाषेकडे एक माध्यम म्हणून, संस्कृती, ओळख आणि ज्ञान वाहून नेणारे एक पात्र म्हणून पाहण्यास शिकवले जाते. ही शिकवण एका प्रकारचे विभाजन गृहीत धरते — शरीर आणि मन यांच्यातील विभाजनासारखेच — जिथे एक गोष्ट (उदा., शरीर / भाषा) दुसऱ्या गोष्टीला (उदा., मन / ज्ञान) केवळ सामावून घेते. हे विभाजन स्त्रीवादी आणि उत्तर-वसाहतवादी विचारधारांनी फार पूर्वीच मोडीत काढले आहे, आणि यामधून अमूर्ततेला प्राधान्य देणार्या आणि प्रत्यक्ष अनुभवाला झाकोळून टाकणार्या उतरंडीचे विषम संबंध कसे निर्माण होतात हे दाखवून दिले
आहे. या विचारधारा आपल्याला आठवण करून देतात की आपल्याकडे शरीर नाहीये, तर आपणच आकलन आणि विचार करणारे शरीर आहोत. हेच म्हणणे जर भाषेला लागू केले, तर भाषा हे एक तटस्थ माध्यम नाही हे मान्य करावे लागेल. भाषा म्हणजे जगलेले ज्ञान, जगलेली संस्कृती.
या दृष्टिकोनाचा विस्तार केला, तर दिसून येते की भाषा ही जगाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी गोष्ट नाही; तर जग अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मार्गांपैकी ती एक आहे. हे नुकतेच बोलायला शिकणाऱ्या लहान बाळामध्ये अधिक निकटतेने पाहता येते. सुरुवातीला बाळाचे जग चिमुकले असते, जिव्हाळ्याच्या हावभावांमध्ये आणि मोजक्या आवाजांमध्ये सामावलेले असते. जसजसे ते विस्तारते, तसतसा भाषेतून नवीन गोष्टींचा अर्थ लावला जातो, त्यांना नावे दिली जातात, आणि त्या एकमेकांशी जोडल्या जातात. अर्थ भाषेच्या आधी येत नाही; तो भाषेसोबतच उदयास येतो. आपण जे जाणतो, अनुभवतो आणि कल्पना करतो, ते सगळे ज्या भाषेच्या माध्यमातून आपण त्याचा अनुभव घेतो, त्या भाषेपासून अविभाज्य आहे. सपीर -वोर्फ नावाच्या एका प्रसिद्ध भाषिक गृहीतकात संगितलं आहे की तुम्ही बोलता ती भाषा तुमच्या विचारांवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकू शकते. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात ही शक्यता या विचारप्रवाहात मांडली जाते. (रेगियर आणि शू, २०१७) सपीर -वोर्फ भाषिक सपेक्षतावादाचा सारांश हाच आहे की , भाषा आपल्या बाहेर नाही; तर ती आपल्या जगण्यातच सामावलेली आहे.
भाषांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेकडे पाहिल्यास एक वेगळेच चित्र समोर येते. मराठी भाषेला असलेला धोका आणि तिच्या लोप पावण्याविषयीची भावना या गोष्टी निःसंशयपणे खर्या आहेत, पण या धोक्याचे स्वरूप काय आहे ? आज महाराष्ट्रात मराठी क्वचितच पूर्णतः अद्दश्य किंवा अनुपस्थित असते; ती दैनंदिन जीवनात बोलली जाते, कानावर पडते, सणासुदीला ती साजरी होते, महत्त्वाच्या प्रसंगी उच्चारली जाते. मात्र त्याच वेळी, भाषेचे जीवन टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञान-व्यवहारांच्या आर्थिक, सामाजिक जागांमधून तिला विस्थापित केले जात आहे. या जागा म्हणजे महाविद्यालयांमधल्या आणि विद्यापीठांमधल्या वर्गखोल्या, रोजगाराची-आर्थिक उलाढालीची ठिकाणे, आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षांचा परीघ. तिच्या वाढीसाठी आवश्यक असलेला योग्य पाठिंबा आणि संसाधने तिला मिळत नाहीत. तिचे हे उपेक्षित होणे म्हणजे अचानक झालेले नुकसान नसून एक हळूहळू होणारी पुनर्रचना आहे — तिला सत्तेच्या संरचनांपासून दूर करणारी. जरी ती भावनिक क्षेत्रामध्ये टिकून असली, तरी शैक्षणिक आणि आर्थिक संरचनांमधून तिचे उच्चाटन केले जात आहे. जर भाषा आपल्यातून जगत असेल, तर तिचा ऱ्हास हा अचानक होणारा किंवा अमूर्त नसतो. ती ज्या विश्वात वावरू शकते, ते संकुचित होण्यातून तिचा ऱ्हास हळूहळू होत जातो आणि ती भाषा संकुचित होत जाते. मराठीचा हा असा संकोच आज ठळकपणे जाणवतो. मराठी विषयामध्ये होणारी विद्यार्थ्यांची घसरण, दहावीच्या गेल्या काही वर्षांतील निकालाचं चित्र, उच्च शिक्षणामधील मराठीचा अभाव, बहुतांश व्यावसायिक क्षेत्रांमधलं इंग्रजी भाषेला दिलं जाणारं प्राधान्य, मराठी भाषेतून केल्या जाणार्या लेखनाला व संशोधनाला मिळणारं अपुरं आर्थिक-सामाजिक पाठबळ या सर्व गोष्टी मराठी भाषा संकुचित होत जाण्याच्या प्रक्रियेचाच भाग आहेत. मग, मराठीला जिवंत ठेवण्याचा अर्थ काय ?
मराठी भाषा काय साद घालते ? आपण तिची हाक खरोखरच ऐकतो, की ती जागा एका अस्पष्ट प्रतिध्वनीला देऊन टाकतो ?
या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यासाठी आपल्याला एक लांबचा रस्ता घ्यावा लागेल. इथे आपल्याला इतिहास तसेच विविध / समांतर विचारधारा लक्षात घ्याव्या लागतील. आणि त्याच वेळी आपली भूमिका, आपले स्थान कुठे आहे याचे मूल्यांकन करावे लागेल. या रस्त्याची सुरुवात भाषा आणि संस्कृती यांच्या संदर्भातील वसाहतवाद-विरोधाच्या जागतिक आणि स्थानिक प्रवाहांपासून होते.
निर्वसाहतीकरण आणि देशीवाद
मराठीसारख्या स्वदेशी भाषा टिकवून ठेवण्याविषयीचे विचार, खासकरून आत्मप्रकटीकरण किंवा आत्मप्रतिपादन या अनुषंगाने पाहिल्यास, हा वसाहतवादविरोधी विचारांचाच एक भाग आहे, हे लक्षात येते. वसाहतवादी इतिहास हा आपले ज्ञान, भाषा आणि अस्मिता यांना ज्या पद्धतीने आकार देत असतो, त्यावर वसाहतवादविरोधी विचारप्रवाह प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आधुनिकता ही काही तटस्थ बाब नाही, असे सांगत ज्ञानप्राप्तीचे व जगण्याचे इतरही मार्ग फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत, आज ते परिघावर ढकलले गेले असले तरी त्यांचे अस्तित्त्व शोधता येते, याची वसाहतवादविरोधी विचारव्यूह आठवण करून देतात.
गायत्री स्पिवाक (स्पिवाक, १९८८) आणि आशिष नंदी (नंदी, १९८३) यांच्यासारखे विचारवंत आज मुख्य प्रवाहात दाबल्या गेलेल्या स्थानिक व निर्वसाहतवादी विचारांकडे आपले लक्ष वेधण्याचे काम करत आहेत. वसाहतवादी विचार आपल्या दैनंदिन जीवनाला कशा प्रकारे कळत-नकळत सूक्ष्मरीत्या आकार देत राहतात, हे ते दाखवून देतात. त्याचप्रमाणे न्गुगी वा थिओंगो (न्गुगी, १९८६) हे, भाषा स्वतःच वर्चस्व आणि प्रतिकार या दोन्हींचे एक प्रमुख केंद्र कशी बनू शकते, यावर भाष्य करतात. मुळात, वसाहतवादविरोधी विचार हा केवळ अकादमिक समीक्षेपुरता मर्यादित नाही, तर ज्ञानप्राप्तीच्या आणि अस्तित्वाच्या विविध स्थानिक पद्धतींकडे लक्ष देण्याबद्दल, त्या पुन्हा मिळवण्याबद्दल आणि त्या टिकवून ठेवण्याबद्दल तो सातत्याने बोलत आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकन संस्कृतींमध्ये काळाकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. तिथे, काळ हा रेषीय नसून प्रत्यक्ष घटनांवर आधारित एक आविष्कार आहे. याचा अर्थ, तिथे भविष्याबद्दल कोणतीही ठोस अपेक्षा किंवा समज नाही. प्रसिद्ध आफ्रिकन तत्त्वज्ञ जॉन म्बिती यांच्या मते, काळाची आफ्रिकन संकल्पना रेषीय भविष्याऐवजी सासा (वर्तमान / नजीकचा भूतकाळ) आणि झमानी (स्थूल भूतकाळ) या द्विमितीय संरचनेवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे, तिथे भव्य भविष्याची अमूर्त संकल्पना अस्तित्वात नाही. त्याची जागा घेतात चक्रीय घटनांच्या आणि अनुभवांच्या पुनरावृत्तीबद्दलच्या अपेक्षा. (म्बिती, १९६९.) स्थानिक किंवा देशी आकलनप्रणाली ही एखाद्या व्यक्तीची जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि अर्थ लावण्याची पद्धत कशी मूलभूतपणे बदलू शकते हे दाखवणे, हा या उदाहरणाचा उद्देश आहे. जेव्हा आपण आज भारतीय भाषांमधल्या मुख्य प्रवाहातील विचारप्रणालीकडे पाहतो, तेव्हा रूढिप्रिय विचारांचा अपवाद वगळता, आपल्याला त्यात पाश्चात्य तर्क कार्यरत असल्याचे दिसते. आधुनिकतेवरील चर्चा ही पाश्चात्य विचारांचे स्वदेशी भाषेमध्ये
आणि संस्कृतीमध्ये केलेले केवळ भाषांतर बनते, जे आजच्या आधुनिक भारतीय समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साहजिकच अपुरे ठरते. भारतीय साहित्यक्षेत्रात आणि शिक्षणक्षेत्रात पाश्चात्य तर्क आणि ज्ञानमीमांसा यांचे वर्चस्व दुःखद आहे, कारण या विचारधारा भारतीय समाजाला थेट लागू केल्या जाऊ शकत नाहीत; आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याकडे देशी आधुनिक विचारांचा एक समृद्ध आणि समन्वित इतिहास आहे.
भारतात, वसाहतवादविरोधी विचार एका दीर्घ आणि वैविध्यपूर्ण अशा बौद्धिक परंपरेतून आकार घेतो. ही परंपरा केवळ वसाहतवादी वर्चस्वाशीच नव्हे, तर जातिव्यवस्थेसारख्या खोलवर रुजलेल्या अंतर्गत विषमतेशीही संघर्ष करते. ब्रिटिश राजवटीत, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या वसाहतवादविरोधी विचारवंतांनी पाश्चात्त्य आधुनिकतेवर आणि तिच्या सभ्यतेच्या दाव्यांवर टीका केली; तर जातिव्यवस्थेसारख्या रचना या वसाहतमुक्तीच्या कोणत्याही सोप्या कथनाला कशा गुंतागुंतीच्या बनवतात हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले, आणि राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक समानतेचा आग्रह धरला. आपल्या देशातली ही ऐतिहासिक विषमता आजही कायम आहे. पाश्चात्त्य प्रभावावरील टीका ही बहुतेकदा स्वदेशी परंपरांचे आणि सामाजिक रचनांचे उदात्तीकरण करते. प्राचीन भारताच्या सुवर्णकाळातील ज्ञानाचा उल्लेख केवळ स्मरण आणि आदर यांपुरता मर्यादित राहतो. जेव्हा टीकात्मक व चिकित्सक विचारांचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा चार्वाकाचे नाव आवर्जून घेतले आते; पण त्याचवेळी चार्वाक संप्रदायाच्या विचारवंतांचा छळ झाला आणि त्यांचे मूळ ग्रंथ जाळले गेले, हे तथ्य सोयीस्करपणे विसरले जाते. आपण भारतीय तत्त्वज्ञानावर परंपरा आणि आधुनिकता या द्वंद्वात्मक — जे प्रामुख्याने पाश्चात्य तत्त्वज्ञानात आढळते — माध्यमातून टीका करायला शिकलो आहोत. यामुळे आपण या एक बाजू निवडण्याच्या खेळात, भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य आधुनिकता या दोन प्रतिस्पर्धी संघांपुरतेच मर्यादित राहतो. पण आपण जर या द्वंद्वाच्या पलीकडे गेलो तर काय दिसेल ?
महाराष्ट्रामध्ये, इतिहासाच्या विविध टप्प्यांवर या प्रश्नाचा सामना केला गेला आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांसारख्या संतांच्या भक्ती-चळवळीने श्रद्धेची चिकित्सक आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित पुनर्कल्पना मांडली. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शैक्षणिक कार्याद्वारे आणि ‘सत्यशोधक चळवळी’द्वारे टीका आणि परिवर्तनाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा वापर केला; त्यांनी पितृसत्ताक जातिव्यवस्थेला आव्हान दिले आणि वंचितांच्या दृष्टिकोनातून ज्ञानाची पुनर्मांडणी केली. हा वारसा आज सर्वाधिक उठून दिसतो तो दलित-बहुजन साहित्यामध्ये आणि चळवळींमध्ये. इथे मराठी भाषा केवळ संवादाचे एक माध्यम न राहता, ती प्रतिकार, स्मृती आणि राजकीय अस्मिता यांच्या प्रकटीकरणाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र बनली आहे. हाच तो ‘स्थानिक चिकित्सकते’चा वारसा आहे, ज्याच्या आधारे वसाहतवादी प्रभावाचा केवळ निषेध करणे, यापलीकडे जाऊन ज्ञानप्राप्तीच्या आणि जगण्याच्या अधिक न्याय्य पद्धतींची मांडणी करता येऊ शकते.
मराठी भाषेतील स्वदेशी चिकित्सक विचाराची अलीकडील एक महत्त्वाची अभिव्यक्ती ही भालचंद्र नेमाडे यांनी संकल्पित केलेल्या ‘देशीवाद’ या साहित्यसिद्धान्ताच्या माध्यमातून केली गेली आहे. भारतीय देशीवादाच्या या प्रवाहाला इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनेक समर्थक लाभले आहेत; त्याच वेळी, मराठी साहित्यविश्वाच्या आत आणि बाहेरही या सिद्धांतावर सखोल टीका झाली आहे. देशीवाद ही मूलतः भारतीय भाषा आणि संस्कृती यांविषयीची वसाहतवाद-विरोधी स्वदेशी सैद्धांतिक मांडणी आहे. भारतीय साहित्यावर असलेला इंग्रजीचा आणि पाश्चिमात्य शहरी सौंदर्यशास्त्राचा अतिरेकी प्रभाव नेमाडे यांना जाणवतो, ज्यावर ते कठोर टीका करतात. अशा जीवनशैलीमुळे वास्तवापासून तुटलेले, परकेपणाने ग्रासलेले आणि केवळ अनुकरणावर आधारित साहित्य निर्माण होते, असा युक्तिवाद ते करतात. देशीवादाचा हा प्रकार संस्कृतीवर तिथल्या भौगोलिक स्थानाचा जो प्रभाव होतो त्यावर भर देतो. या सिद्धान्तानुसार, ऐतिहासिक बदल होत असताना आणि बाह्य प्रभाव पडत असतानाही, भौगोलिक घटकाच्या स्थिरतेमुळे संस्कृतीमध्ये एक प्रकारचे सातत्य टिकून राहते. नेमाडे देशीवादाचे वर्णन करताना म्हणतात की, “देशीवाद म्हणजे ‘भूगोलाच्या समग्रतेची, तसेच त्या भूभागातील सर्व जाती, वांशिक समुदाय, पंथ, धर्म, परंपरा, कालखंड आणि स्थळे, यांच्या उभ्याआडव्या छेदांसह असलेल्या एकजिनसीपणाच्या जाणिवेची एक प्रकारची सजगता होय.” (नेमाडे, २००९ : ३०.) देशीवादाची ही समज या विचारधारेला बहुसांस्कृतिक स्वरूप देते आणि वांशिक वर्चस्वाच्या प्रवृत्तीपासून तिला अलिप्त ठेवते. महत्त्वाचे म्हणजे, नेमाडे यांचा देशीवाद केवळ सांस्कृतिक अभिमानावर केंद्रित न राहता, ‘ज्ञानमीमांसीय स्थान’ हा आपला आधार मानतो. अर्थ, रूप आणि साहित्यिक मूल्य हे एका विशिष्ट भाषिक विश्वाच्या आतूनच निर्माण झाले पाहिजे, असा आग्रह तो धरतो. हा ज्ञानमीमांसीय बदल एका सशक्त देशी आधुनिकतेसाठी जागा मोकळी करतो. अशा भारतीय आधुनिकतेची सुरुवातीची अभिव्यक्ती भक्ती-चळवळ, फुले-आंबेडकरवादी विचार आणि नंतर दलित साहित्य यांत आढळते. पण ती एक तर विशिष्ट विचारप्रणाली-समुदायांपुरती मर्यादित राहिली आहे, किंवा तिच्याकडे केवळ आदरभावाच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले आहे. या दोन्ही गोष्टी देशी आधुनिक विचारांना विशिष्ट दृष्टिकोनातून सामाजिक संरचनांवर टीका करण्यापुरते मर्यादित ठेवतात, किंवा त्यांना जतनीय व पूजनीय मानून बंदिस्त करतात. नेमाडे ज्या प्रकारची आधुनिकता सूचित करतात, ती या मर्यादांच्या पलीकडे जाते. पाश्चात्त्य विचार तसेच पारंपरिक रूढिवाद यांपासून स्वतंत्र असलेल्या, आणि आजच्या भारतीय लोकांच्या दैनंदिन वास्तवाशी संवाद साधणाऱ्या अशा एका देशी आधुनिकतेच्या मांडणीसाठी मराठीसारख्या भाषांच्या क्षमतेचा योग्य वापर करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. या देशी आधुनिकतेला वाव देणारी ज्ञानमीमांसीय भूमिका आज भाषेबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनात समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. पण, या दिशेने वाटचाल करत असताना सावधगिरी बाळगणेही अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे, वसाहतवादविरोधी विचार आणि देशीवाद यांचे पारंपारिक मूलतत्त्ववादी विचारधारेत केले जाणारे विलीनीकरण.
विलीनीकरणाची समस्या
वसाहतवादविरोधी विचार आणि देशीवाद यांवरील प्रमुख टीका म्हणजे मूलतत्त्ववाद, वांशिक केंद्रवाद आणि स्वदेशी अस्मितेचे उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती यांच्याशी असलेली त्यांची जवळीक. हिंदुत्ववादी विचारधारेचे वर्चस्व असलेल्या सध्याच्या राजकीय वातावरणात, स्वदेशी परंपरांचे आणि संस्कृतीचे उदात्तीकरण ही गोष्ट बहुसंख्याकवादी आणि राष्ट्रवादी प्रकल्पांकडून सहजपणे आत्मसात केली जाते. आधुनिकतेचे प्रत्येक मूल्य पाश्चात्त्य आणि वसाहतवादी भूतकाळाशी जोडले जाते. स्वदेशी अस्मितेला राष्ट्रवादाशी बांधले जाते. निर्वसाहतीकरणाची ही राष्ट्रवादी विचारधारा आणि देशीवादाचा हा प्रकार फार धोकादायक आहे. या वर्चस्ववादी प्रकारांमध्ये स्थानिक ज्ञानप्रणाली आणि संस्कृती यांतील वैचारिक आणि भाषिक बारकाव्यांचा योग्य प्रकारे अभ्यास न करता, आपली श्रेष्ठता घोषित करण्यासाठी दूरच्या भूतकाळाकडे सुवर्णकाळ म्हणून पहिले जाते. देशी अस्मितेच्या नावाखाली स्त्रीद्वेषी, जातीयवादी आणि शोषक प्रथांचे समर्थन होते. किरा हुजू नमूद करतात त्याप्रमाणे, ‘वसाहतवादी विचारसरणीपासून आश्रय देणारा असा एक निर्भेळ वसाहतपूर्व काळ अस्तित्वात आहे असे निर्वसाहतीकरणाचा विचारप्रवाह हे गृहीत धरतो. हा एक पलायनवाद आहे ज्यामधे भ्रष्ट झालेल्या पाश्चात्त्य आधुनिकतेपासून अलिप्त असलेली आणि आपल्या अस्तित्वानेच पूर्णतः सद्गुणी असलेली नैतिकदृष्ट्या दोषमुक्त अशी स्वदेशी व्यक्तीरेखा समोर उभी करतो.’ (हुजू, २०२४.) जसजसे पुराणमतवादी राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण अति-राष्ट्रवादाच्या आणि फॅसिझमच्या दिशेने झुकते, तसतसे देशीवाद आणि भाषिक अस्मिता यांभोवतीचे बहुतेक संवाद हेही सांस्कृतिक वर्चस्व आणि पारंपरिक शोषक प्रथा यांना बळ देण्याचे काम करतात.
या विलीनीकरणाच्या प्रक्रियेमुळे आज अनेकांसाठी पुराणमतवादाने गिळंकृत केलेला देशीवाद ही या विचारधारेची पहिली ओळख बनते. यामुळे तार्किकदृष्ट्या अनेकजण पाश्चात्त्य आधुनिकतेकडे ढकलले जातात. त्याचबरोबर पाश्चात्त्य प्रभावाखालील गट आणि कथित पारंपरिक भारतीय प्रभावाखालील गट अशा दोन गटांमध्ये समाजाची विभागणी होते. हेच विलीनीकरण जिज्ञासू, चिकित्सक लोकांना दूर लोटते. भारतीय भाषांना पाश्चिमात्य इंग्रजीच्या प्रभावापासून ‘वाचवण्यासाठी’, त्या बचावाकरिता आवश्यक असलेल्या वसाहतवादविरोधी विचारव्यूह आणि देशीवाद यांसारख्या सर्वांत प्रभावी सैद्धांतिक / वैचारिक प्रतिवादांना सर्वप्रथम रूढिप्रिय हिंदुत्ववादी विचारसरणीपासून वेगळे करण्याची गरज आहे.
विलीनीकरणामुळे निर्माण झालेल्या या द्वैतभावात मराठीसारख्या भाषा आपली विविधता गमावत आहेत. कारण, मूलतत्त्ववादी दृष्टिकोनातून, कोणतीही भाषा बोलण्याची नेहमीच एकच एक योग्य म्हणजे प्रमाण पद्धत असते. इथे, एका बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या भाषेला, तिचे रक्षण करण्याच्या खोट्या आशेने, औपचारिक किंवा शुद्ध भाषेच्या चौकटीत बंदिस्त केले जाते. इथे भाषेच्या इतर उच्चारांना आणि बोलीभाषांना मान्यता मिळत नाही आणि काहींची तर थट्टाही केली जाते. मग या भाषेचा बचाव करणे म्हणजे तिच्या सामर्थ्याची, क्षमतेची, इतिहासाची आणि मधुरतेची प्रशंसा करणे होय. मराठी भाषेच्या समर्थनार्थ केलेल्या जवळजवळ प्रत्येक भाषणात, संत ज्ञानेश्वरांच्या “माझा मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके ।” (अर्थात, मराठी अमृतापेक्षाही मधुर आहे !) या ओवीचा उल्लेख केला जातो. या ओवीत मराठी भाषेच्या खऱ्या समृद्धीला आणि मधुरतेला एक सुंदर आदरांजली अर्पण केलेली आहे. पण, ही ओवीतेराव्या शतकातील महाराष्ट्रात रचली होती हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या काळात उच्च जातींचे वर्चस्व असलेल्या धर्मग्रंथांची भाषा म्हणून संस्कृत प्रस्थापित होती. उच्चभ्रू आणि अगम्य संस्कृत भाषेच्या विरोधात, बहुजन बहुसंख्यांकांची भाषा असलेल्या मराठीची
क्षमता सिद्ध करण्यासाठी ही ओवी ज्ञानेश्वरांनी लिहिली होता. ज्ञान हे एका भाषेपुरते आणि एका विशिष्ट गटापुरते मर्यादित असण्याची गरज नाही, ते भाषांतरित होऊ शकते, हे दाखवण्यासाठी तो लिहिला होता. त्या काळातील संदर्भामध्ये त्या ओवीचा हेतू साध्य झाला. वर्तमानकाळाच्या संदर्भात या ओवीच्या पुनर्वापराचा काय हेतू आहे?
आज, मराठी भाषेची श्रेष्ठता आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी असे ऐतिहासिक संदर्भ वापरले जातात. इथे भाषा म्हणजे अधिकृत मराठी; ‘शुद्ध’ मराठी जी एका विशिष्ट वर्ग-जातीय स्थानाचं निदर्शचं करते. या श्रेष्ठ व अधिकृत रूपालाच मग एकमेव ‘खरी’ भाषा मानली जाते, आणि या श्रेष्ठत्वाच्या मागे मराठीच्याच विविध रूपांना आणि बोलीभाषांना कमी लेखलं जातं. समृद्ध इतिहास, विपुल शब्दभांडार आणि व्याकरणातील गुंतागुंत यांवर दिला जाणारा भर हाच भाषेच्या श्रेष्ठत्वाचा स्रोत बनतो; हे घटक आणि व्याकरणातील ही गुंतागुंतच मराठी भाषेवर प्रेम करण्याची आणि तिचे जतन करण्याची कारणे ठरतात. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपण स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारण्याची गरज निर्माण होते —
जर ही भाषा इतकी मधुर नसती, तर तुम्ही तिच्यावर प्रेम केले नसते का ? जर तिच्याकडे अफाट शब्दसंग्रह आणि व्याकरणाची गुंतागुंत नसती, किंवा जर तिचा इतिहास इतका समृद्ध नसता, तर तुमचे प्रेम कमी झाले असते का ? याच भाषेतून तुम्ही विचार करायला आणि संवाद साधायला शिकलात आणि आजही जगताना ती वापरता, केवळ या कारणासाठी तुम्ही तिच्यावर प्रेम केले नसते का ?
मराठीच्या समृद्धीची आणि इतिहासाबद्दलची ही छाती फुगवून केलेली स्तुती, श्रेष्ठत्वाच्या दाव्यांखाली दडलेल्या आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर प्रकाश टाकते. आजच्या काळातल्या तुटक अस्तित्वावर आणि निश्चिततेच्या अभावावर आधारित असलेली ही असुरक्षितता खरी आहे. म्हणूनच ती उलगडून तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास, आपल्या मते आपली भाषा न जाणणारे, भाषेचा अपमान करणारे जे कोणी लोक असतात त्यांच्यावर हिंसक हल्ले केले जातात. पण मराठी भाषेला आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात. उदाहरणार्थ, विशिष्ट स्थळ-काळाची गतिशीलता स्वीकारणे, आणि लोकांना या भाषेत जगणे शक्य करणे. विभाजनकारी राजकारणामुळे या अपेक्षांपासून आपण दूर भरकटतो.
मराठी भाषेच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद द्यायचा असेल, तर आपल्या या लांबलचक रस्त्यावर भेटलेल्या सर्व घटकांची गुंतागुंत समजून घेणे आणि तिचा आदर करणे गरजेचे आहे. आता आपण त्या रस्त्याच्या शेवटाकडे आलो आहोत, जिथे आपण पाश्चिमात्य आणि पारंपरिक या द्वंद्वाच्या पलीकडे पाऊल टाकतो.
द्वंद्वाच्या पलीकडे
आतापर्यंत आपण पाहिल्याप्रमाणे, मराठीसारख्या भारतीय भाषांवरील चर्चा दोन परस्परविरोधी गटांमध्ये विभागलेली आहे. एक गट पारंपरिक मूल्यांची श्रेष्ठता आणि भारतीय भाषा-संस्कृतीबद्दलचा चिकित्सारहित आदर यांचा पुरस्कार करतो, तर दुसरा गट स्वातंत्र्य, समानता, मुक्ती इत्यादी इंग्रजी भाषा आणि युरोपीय-अमेरिकन तत्त्वज्ञान यांचा आधार असलेली आधुनिकतेची मूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे आहेत. अस्थिरता आणि अस्मितेबद्दलचा गोंधळ या सामान्य बाबी असलेल्या आजच्या जगात, परंपरेचा अभिमान बाळगणारी बाजू अधिक बलवान आहे. इंग्रजी भाषा आणि पाश्चात्त्य मूल्ये यांच्याकडे आपला खरेपणा आणि अस्मिता हिरावून घेऊ पाहणाऱ्या शत्रूची शस्त्रे म्हणून पाहिले जाते. इंग्रजीच्या अतिक्रमणाच्या या प्रश्नात तथ्य असले तरी, त्याकडे द्वैतवादी दृष्टिकोनातून पाहिल्याने आपली समज मर्यादित होते.
पाश्चात्त्य आधुनिकता आणि इंग्रजी भाषा यांच्या अतिक्रमणाचा सामना भारतीय परंपरेच्या केवळ आदराने कधीही करता येणार नाही. यांतील एक गोष्ट दुसऱ्यावर मात करू शकते, हे या वाक्यामागचे कारण नाही. तर, या दोन भिन्न गोष्टी आहेत, ज्यांची थेट तुलना करणे तार्किकदृष्ट्या योग्य नाही. पाश्चात्त्य आधुनिकतेची तुलना भारतीय देशी आधुनिकतेशी होऊ शकते, भारतीय परंपरेशी नाही. भारतीय परंपरेची प्रतिरूपे पाश्चात्य देशांमध्ये रूढिवादामध्ये आणि ख्रिस्ती धर्माच्या परंपरांमध्ये आढळतात. पाश्चात्त्य देशांमधील आधुनिकता म्हणजे तिथल्या राजेशाहीच्या आणि धर्माच्या राजकीय-सांस्कृतिक मूल्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या समाजावर केलेली टीका आणि त्यातून होणारी प्रगती होय. पाश्चात्त्य देशांप्रमाणेच भारतातही कबीर, भक्ती-चळवळीतील संत, फुले, आंबेडकर, पेरियार इत्यादी भारतीय विद्वानांनी आपल्याला भारतीय आधुनिक विचारांचा पाया दिला आहे. पाश्चात्त्य देशांमधील विचारांप्रमाणेच, हा आधुनिक विचार धार्मिक ग्रंथांवर आधारित जातिव्यवस्थेसारख्या परंपरांवर आणि वसाहतवादासारख्या जुलमी रचनांवर टीका करतो व त्यातून प्रगतीचे मार्ग शोधतो. परंतु, गेल्या काही दशकांमध्ये भारतात पाश्चात्त्य संकल्पनांच्या भाषांतरावर आधारित नसलेल्या अशा निखळ देशी आधुनिक विचारप्रणालीचा फारच कमी विकास झाला आहे. सशक्त, वैविध्यपूर्ण आणि सूक्ष्म अशा भारतीय देशी आधुनिकतेच्या अभावामुळे आजच्या अतिआधुनिकतेच्या काळात आपण आपल्या तुटक अस्मितेशी झगडत आहोत.
भारतीय भाषांचे आणि संस्कृतींचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी, आपल्याला भारतीय आधुनिकतेचा हा ज्ञानमीमांसीय बदल रुजवण्याची गरज आहे. याचा अर्थ, इतर ज्ञानप्रणालींकडून कधीही काही उधार न घेणे किंवा सर्व परंपरांकडे दुर्लक्ष करणे, असा नाही; तर आजच्या संदर्भात आधुनिक भारतीय समाजाच्या गरजांना आणि आकांक्षांना संबोधित करणारा संवाद विकसित करणे होय, असा आहे. भारतीय आधुनिकतेमध्ये व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्य यांसारख्या आधुनिक संकल्पना कशा दिसतात हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला आज देशी स्त्रीवादी सिद्धांताची गरज आहे. आपल्या देशी भाषांमध्ये आपण जगलेले वास्तव आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी एका अवकाशाची गरज आहे. हा अवकाश निर्माण करण्यासाठी स्थानिक जगण्याचा संदर्भ असलेल्या तत्वज्ञानाचा एक भक्कम पाया हवा. असणं गरजेचं आहे. तत्त्वज्ञान ही संकल्पना निर्मितीची कला आहे असं म्हणतात, आणि हे कार्य भारतीय भाषांमध्येच व्हायला हवे. ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत मराठीला आणि इतर भारतीय भाषांना मूलभूत स्तरावर समाविष्ट करणे आवश्यक आहे.
आपल्याला मराठीसारख्या भारतीय भाषांमध्ये नवीन, समर्पक संकल्पना निर्माण करण्याची गरज आहे. यातूनच मराठी पूर्णपणे जिवंत होईल, आणि हीच मराठीची व इतर भारतीय भाषांची हाक आहे.
संदर्भसूची
मराठी संदर्भ
- बाबर, अशोक. ‘देशीवाद’. साकेत प्रकाशन, २००५. ISBN-81-7786-221-9
- नेमाडे, भालचंद्र. ‘टीकास्वयंवर’. साकेत प्रकाशन, २००१.
इंग्रजी संदर्भ
- Abbi, Anvita. Vanishing Voices of the Great Andamanese. 2006.
- BBC News. “Last speaker of Bo language dies in India.” 2010.
- Bhalekar, Ritvick Arun. “Political Row in Maharashtra Over Plan to Make Hindi Compulsory in Schools; Opposition Parties Protest Marathi Identity Row.” April 17, 2025. https://www.indiatoday.in/india/story/political-row-maharashtra-plan-hindi-compulsory-schools-opposition-parties-protest-marathi-identity-row-2710620-2025-04-17
- Chatterjee, Partha. The Nation and Its Fragments. Princeton University Press 1993.
- EPW Engage. “English Language Education in India: How Aspirations for Social Mobility Shape Pedagogy.” 2024. https://www.epw.in/engage/article/english-language-education-india-aspirations-pedagogy
- Huju, K. “How ‘decolonial Hindutva’ marries nativist politics with left-wing vocabulary”. The Scroll, 2024. https://scroll.in/article/1065727/how-decolonial-hindutva-marries-nativist-politics-with-left-wing-vocabulary
- Mbiti, John S. African Religions & Philosophy, 1969. https://books.google.co.in/books?id=eTUpo9lH-fYC&printsec=frontcover&redir_esc=y#v=onepage&q&f=false
- Nandy, Ashis. The Intimate Enemy. Oxford University Press, 1983.
- Ngũgĩ wa Thiong’o. Decolonising the Mind. James Currey, 1986.
- Nemade, Bhalchandra. Nativism (Deshivad). Shimla IIAS, 2009.
- Oak, Mandar. “Hindi vs Marathi and the Contest Over Indian Identity.” The Diplomat. Published July 21, 2025. https://thediplomat.com/2025/07/hindi-vs-marathi-and-the-contest-over-indian-identity/
- Pramanick, Mrinmoy. Indian literary criticism and theory. Balachandra Nemade and Nativism. Indian Literary Criticism and Theory. https://ebooks.inflibnet.ac.in/engp11/chapter/balachandra-nemade-and-nativism/
- Regier, T. and Xu, Y. (2017), The Sapir-Whorf hypothesis and inference under uncertainty. WIREs Cogn Sci, 8: e1440. https://doi.org/10.1002/wcs.1440
- Spivak, Gayatri Chakravorty. Can the Subaltern Speak? In C. Nelson & L. Grossberg (Eds.), Marxism and the interpretation of culture. University of Illinois Press.1988.
- Terralingua. “Remembering Licho, the Last Speaker of the Sare Language.” Published April 30, 2020. https://terralingua.org/2020/04/30/remembering-licho-the-last-speaker-of-sare-a-great-andamanese-language/
प्रतिमा-सौजन्य : विकिमीडिया कॉमन्स
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
