एक
अनंत अंतरावरून चालत
धावत रखडत पडत
धापा टाकत
अखेर वाटतं आपल्याला कुठल्या एका बिंदूवर
की
पोहोचलोय आपण कुठल्याशा एका निश्चित मुक्कामी
खूप खूप दुरून लांबवरून शिणूनभागून
टेकलाय
आपला झिजका तळवा
कोण्या एका थांब्यावर
नेमका तो बिंदू
शून्य मैल निघावा
वामनाचं सर्वव्यापी पाऊल नाहीय आपलं
पण आपण तर कोणतीच चलाखी न करता
मानेवर अखंड जू वागवत
घातल्याच होत्या ना अगण्य येरझारा
तर मग
जन्ममरणाची वारी समजून कापलं
ते अंतर
शून्य कसं निपजलं ?
***
दोन
पुन्हा पुन्हा थबकतो आपण
एका जुन्या तारखेवर
विरून जातो मधला काळ
उशापायथ्याशी चुरगाळून पडलेला
अर्थहीन गदारोळ
अर्थवत्तेचे शब्द पांघरून
सांधतो तारखा ओलांडलेल्या संदर्भांना
जुनी तारीख आणि नवा आज
यांदरम्यान लोंबकळत
बावळट अपरिचितासारखे
सर्वांग आक्रसून उभे आपण
साक्षीभावाने नव्हे
तिऱ्हाईतासारखे
संपूर्णातून वजा जात जात
पानांनंतरच्या पानावर
आपल्यातून
किती थोडेसेच शिल्लक
आपण ?
***
तीन
काळी वळणं घेत
लांबलचक विवरातून सरकत जातेय
धीम्या गतीने रात्र
रात्र नसावीच ती
अखंड पशू गिळून
सुस्त रेंगाळणारा अजगर असावा
रात्रीच्या पोटात
अर्धमेल्या जाणिवेचा गुदमर अनुभवतो
आपल्यातला पशू
रात्र अजस्र विळखा घालते
संपूर्णाचा घास करत
जिवंत गिळून घेते
गुदमरतो श्वास
पण धुगधुगत राहतो आपल्यातला
कासावीस पशू
काळ्याभोर वळणांची
धीमी
सुस्त
अजस्र
अजगरी रात्र…
***
चार
ऐक ना,
तुझा उष्ण मायाळू तळवा फिरव
आणि लिंपून घे ही सगळी गिचमिड
सांगता येतंच नाही तसं तर
जे जसं जितकं सांगायचं होतं अगदी तसंच तितकंच
नुसतेच
थिजलेली थारोळी साचतात निरर्थकाच्या तपशिलाची
कोरे कर सगळे शब्द सगळी विरामचिन्हं
वादग्रस्त अथवा वादातीत
भूमिकेसह किंवा भूमिकाहीन
कोणतीच नको ओळ
अनंताच्या मौनाची हाक खुणावतेय मला
क्षीण होत चाललेय मी
उमटलेलं पुसण्याची ताकद नाहीय माझ्यात
आणि तसंच ठेवण्याची इच्छाही
फिरव तुझा घनदाट ओलसर तळवा
या आकंठ दलदलीवरून
कोरा कर माझ्या कवितेचा कागद
कर स्वच्छ शुभ्र आणखी शुभ्र
कफनाइतका करकरीत
***
Image credits: Shubhangi Singh for हाकारा । hākārā
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
