Skip to content Skip to footer

दहा कविता : स्वानंद बेदरकर

Discover An Author

  • स्वानंद बेदरकर हे 'साहित्य' ह्या विषयातील नव्या पिढीतील आश्वासक नाव आहे. भारतीय संस्कृती, भारतीय संतसाहित्य, आधुनिक कविता असे त्यांचे अभ्यासाचे विषय असून ते स्वतः कवी आहेत. 'पावसाच्या गर्भतळी' (२०२५) हा त्यांचा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. 'शब्द कल्पिताचे - न पाठविलेली पत्रे' (२०२३) ह्या त्यांनी संपादित केलेल्या ऐतिहासिक ग्रंथाला विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून जाणकारांनी ह्या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. 'शब्दमल्हार' ह्या प्रकाशनसंस्थेचे ते संचालक व संपादक आहेत. लेखनाबरोबरच विविध विषयांवरील व्याख्याने हाही त्यांच्या व्यक्तित्वाचा एक पैलू आहे.

    Swanand Bedarkar is regarded as one of the promising young voices in the field of literature. His areas of interest include Indian culture, Indian saint literature, and modern poetry. He is also a poet himself. His poetry collection Pavasachya Garbhatali was published in 2025. The historical volume Shabda Kalpitache - Na Pathavilēlī Patre (2023), which he edited, received several state-level awards and was widely appreciated by literary critics and readers alike. He is the Director-Editor of the publishing house Shabdamalhar. Alongside his writing, delivering lectures on a range of subjects is another significant aspect of his personality.

सावर स्वतःला
पक्षी उडून जातातच
त्यात दुःख कसले…

काही ठसे 
आहेत तुझ्याजवळ
ते वापर
नेटाने जगण्यासाठी

इतिहास ठशांनाच मानतो
जिवंत प्रमाण
बाकी सारे झूट

उठ, डोळे पूस 
आवरून घे सारं काही 
ती बघ,
विस्मरणातील ठसे घेऊन
तुझी ओटी भरायला 
दारी कविता आली आहे

दूर जावे 
आत पाहावे 
हृदय व्हावे 
आपुले 

आत जावे 
दूर पाहावे 
नेत्र व्हावे 
आपुले

उंच जावे 
खोल पाहावे 
मूळ व्हावे 
आपुले 

खोल जावे 
उंच पाहावे 
कळस व्हावे 
आपुले

दिवाणखान्यात ठेवलेली डेग 
आई-बाबा येणाऱ्या प्रत्येकाला
अभिमानाने दाखवतात
पाहणाराही आश्चर्य व्यक्त करीत
डेग साठवून घेतो डोळ्यांत
पणजोबांचे नाव अंगावर मिरवीत
अस्तित्व विस्तारतेय ती आमच्या घराण्याचे
आमच्याकडे पणजोबांचा फोटो नाही
आई-बाबांनी त्यांना पाहिलेले नाही
माझा तर प्रश्नच नाही
तरीही उतरतात ते माझ्या मनात
आपल्या घाटदार कर्तृत्वासह…
मागच्याच महिन्यात आईने आणलेला स्टीलचा डबा 
काठाला चिरल्याचे 
तिने सकाळीच सांगितले
‘महिन्यातच आटोपले त्याचे अस्तित्व’
तिचे हे वाक्य ऐकताना
मीच उभा चिरत गेल्याची
मरण भावना दाटून आली 

जन्म भोगला भोगला 
त्याचे विश्वरूप झाले 
काठ सोडताच नदी 
जीव गिळायासी धावे

जन्म जाळला जाळला 
त्याची चंद्रकोर झाली
निखाऱ्याच्या झाडालाही
शांती उमलून आली

जन्म विझला विझला
उरे पणतीत तेल
वात धिटाईची तरी 
खातो अंधार उजेड

विलक्षणाचे कसदार कण घेऊन 
मी उभा असतो स्वतःच्याच दारात
तेव्हा तिथे दिसते 
एक खोल खोल विहीर 
हातातल्या कणांनी 
भरून टाकावी ती विहीर 
असे वाटत असूनही 
भीती वाटते अनामिक, कसलीशी
मी मागे सरकत राहतो अखंडपणे
अशा वागण्यातच 
सांडत गेले आहेत 
विलक्षणाचे ते कसदार कण 
असे कण सतत हाती लागत नाहीत
याचीही तीव्र जाणीव होत राहते 
तरीही माती खाणे सुटत नाही
हा डाव भुताचा पुढचा आपला 
पुढचा काही येत नाही 
भूत काही जात नाही 
कण सांडलेत तिथे 
उगवून आली आहेत 
आता नक्षत्रांची झाडं 
जी फक्त दुरून पाहता येतात 
त्याच्या सावलीत राहण्याचे फळ 
गळून पडले आहे
या विदारक विस्मयाचे काय करायचे ?

कविता वाहात असते अखंड
शरीरातून रक्त वाहावे तशी 
मात्र तिचा गट तपासायचा नसतो
नाहीतर ती निसटून जाते
कंसाच्या हातून 
योगमाया निसटली तशी…

सागराचे दुःख | सागरासी ठावे |
इतरांसी दिसे | थोरपण ||
इवली मासोळी | कोरिते जळास |
करिते उदास | क्षणोक्षणी ||
सांगता येईना | होईना सहन |
वेदना करुण | गाजमय ||
नदीशी करावे | हितगुज काही |
ती तर जाहली | एकरूप ||
जल गूढ कढ | लाट ती हुंदका |
थेंबही परका | पाणीयासी ||

१०

राऊळाच्या पार | आहे तुझी सृष्टी |
तिथे माझी दृष्टी | स्थिरावू दे ||

समईची ज्योती | काळजात उरो |
तुझे माझे असो | श्वास एक ||

अबीराचा रंग | जगण्याला चढो |
प्राणांचीच वाजो | झांज माझ्या ||

अठ्ठावीस युगे | म्हणे ती एकाकी | 
तशी गत माझी | होऊ नये ||

एकांताचा धूप | जळो माझ्या आत
खर्जाचाही खर्ज | लागू दे रे ||

Image credit: Photo by Roshan Kumara on Unsplash

Post Tags

Leave a comment