Skip to content Skip to footer

कृष्णविवर: सतीश तांदळे

Discover An Author

  • Poet

    सतीश तांदळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते अभिनेता, लेखक म्हणून मराठी व हिंदी रंगभूमीवर कार्यरत आहेत.

कृष्णविवर

बुबुळातून थेंब थेंब झिरपतोय पसरतोय शरीरभर अंधार
धमन्यांमधून वाहू लागलाय.. काबीज करतोय
पेशी पेशी
हळूहळू जाईल दृष्टी
उदास भयाण पोकळी नुसती
रंध्र रंध्र काळोख मिट्ट 
कृष्णविवर: अजगरघट्ट.

शिवालयाच्या गाभाऱ्यासारखी निळीसंथ
नाही लाभत समाधी.

अलवार उघडत डोळे कोवळे
प्रकाशकण मुरवणे आत
नाहीच जमत
शहरभर नुसता गोंगाट माझं
घर नाही जळत..

कुठून आणलीस तिन्हीसांज  
दिवा लावलास हळुवार  
उजळवलंस घर   
पणत्या पणत्या क्षितीजभर.

मोगऱ्याचं तोरण बांधलंस दाराला  
तुळशीला घातलंस पाणी मायेनं 
रांगोळी काढलीस ठिपक्या ठिपक्यांची  
माझं अंगण हरखलं
तुझ्या पाऊल स्पर्शानं.

दृष्ट काढलीस निखाऱ्या
मुठभर टाकून मीठ 
ताडताड आवाज झाला
भुताखेतांचा आल्या-गेल्यांचा 
बोटं मोडलीस कडाडा..

माया केलीस मावशीसारखी 
मांडीवरती डोकं ठेवून दिलंस बघू
आकाश निळं
ओढणी दिलीस डोळ्यातले क्षार ओले टिपायला..
उबेसाठी छाती दिलीस 
उजेड दिलास जाताना
सांडू नको म्हणालीस
गोवळकोंड्याच्या भिंती पडक्या भेदत जातोय 
जगजीतचा अश्मयुगीन आवाज व्याकूळ..

चिरत राहते  देह जीर्ण
वाळवंटी अजान एक.

तेव्हा रडायचे राहून गेले तुझ्या कुशीत
राहून गेले ट्रेनमध्ये
दारात बसून पाय बुडवणे अंधारात
सुसाट गाणे वाऱ्याचे
डोहखोल डोळे तुझे पहायचेच राहून गेले..
राहून गेले हिरव्याओल्या केसांमध्ये गुंतायचे..
गेलेच राहून हातामध्ये गुंफून हात माथेरान हिंडायचे..

दिवस बहराचे.. फुलायचे
दरीत ऐकायचे एकोज तुझ्या नावाचे
मातीत चालायचे चपला काढून
रात्र:
चढत जाते भिनत राहते 
आस्ते आस्ते.

तलावात पाहणे बिंब चंद्राचे मनोहर
उगवतीची लाली ओठांवर
तरीही मोसम बदलायचे थांबत नाहीत
येतोच भडवा मार्च.

बुट्टीभर चांदण्या
आणि ते एक लखलखत कानातलं.. 
जपून ठेवलंय.

माझे अहंकार मोडून पडले
विखुरले
बरे झाले.

वर्षे जातात मिनटासारखी 
उरतात मागे स्निग्ध श्वास.
***

ज़ियारत

अत्तरांचा सुगंध सभोवती
आणि पहाटधुके बेहोष
मखमली चादर ओढून   
निजलेत कुणी सुफी संत
कबरी फोडून
नाही येत गाता
एखादं विकल गाणं

कंठात रुतून बसलेली स्मरणे
वाचता येत नाहीत ओरडून

ज़ियारत ज़ियारत

मी मागितली मन्नत
तुझे स्पर्श रहावेत चिरंजीव
ख्रिस्ताच्या जख्मेसारखे भळभळत
माझ्या कपाळावर कायम

मी मागितला झरा ओंजळ भरून खळखळ
ऊर फुटेस्तोवर टेकड्या मुश्कील
आणि उबदार खडक थकला देह पसरायला

दीर्घायुषी उत्तररात्री
लपेटायला वारा खट्याळ
किंवा
मृद् गंधी पाऊस सदा भुरभुर खिडकीत
चहात भिजलेल्या वाफाळत्या संध्याकाळी अनंत

मी मागितले तुझ्यापर्यंत पोचण्याचे
वाटांचे पत्ते रोमांचक

किंवा

मी संपूर्ण तुलाच मागितले..
***

काफ़िर

मी कबूल केली होती तुला घमघमती चंद्रकोर 
चांदण्यांची लखलखती माळ तुझ्या गळ्याला
पिंपळाची नित्य हिरवी सळसळ
घामेजल्या रात्री निळशार तळ छातीला

हळदुवी मेंदी नक्षीदार  तुझ्या संगमरवरी हाताला
सलामत रहावे शुभ्रपण म्हणून   
मोगऱ्याचा जोड तुझ्या पायाला

मी पुटपुटलो कानांशी तुझ्या स्वप्नं काही
गोलघुमटाच्या ग्यालरीतून
आणि गुणगुणले आभाळाचे अभंग
तिन्ही सांजेला टेकडीवर अखंड

पहाटधुपात दुवा मागितली अखेरची आपण  
ओळखता येऊ नये पुन्हा गंध घामाचा
म्हणून
स्मरणीय रहावा त्वचेहून सहवास
म्हणून

तळं खुणावतंय झाडांआडून पानांआडून
पोटात घेऊन तारांगण  
रात्रीचे ओसाड रस्ते हवेहवेसे
अवकाश जणू काळेभोर..
तरंगावे भटकावे  रात्र रात्र अंतराळभर

एलीस गार्डन समोर रात्री डोळ्यात घेऊन पाणी म्हणालीस
ओलांडून काळ जाता आलं असतं मागे तर
रचला असता हा पसारा एकजागी आधीसारखा
आधीसारखे झालो असतो अनोळखी तर

डोळ्यातल्या मायेशिवाय शाबूत राहिली असती पाठ
राहिले नसते गंध असे श्वासात अडकून कायमचे
नसत्या राहिल्या खुणा गालांवर मानेवर कपाळावर जन्मभर

पण टाकता येत नाहीत पुसुन डोळ्यांवर उमटलेले बोटांचे ठसे
कायमचे

आणि

टाळता येत नाहीत शहरं
मधोमध उभी केलेली स्मारकं सुद्धा
जागोजागी उभे असतात हेळवी घेऊन
कुळकथा जन्माची
धावलो गळ्याशी येईपर्यंत जीव
संचिताशी झटत तरीही
शहरे चिकटून असतात पाठीला
वेताळासारखी

आणि

हा दर्ग्यातला पांडुरंग हाक ऐकत नाही
छातीशी घेत नाही कवटाळून
मांडीवर घेऊन देत नाही
रडूही पोटभर
भोग म्हणतो भोग
आणि हसतो क्रुसावर ख्रिस्तही

बाबा पांडुरंगा,
जळो माझे स्वार्थ      जळो माझे गर्व
ऋण जन्मभर     पाठीवरी
डोळे राहो जित्ते     दुःख पुरेपूर
टिको काफिरपण    पांडुरंगा 

चित्र सौजन्य: स्वाती विश्वनाथ 

Post Tags

4 Comments

  • Kiran gawade
    Posted 23 सप्टेंबर , 2020 at 10:58 am

    तांदळे जी लाजवाब 😍 खाेल शब्दामध्ये मुरलात☺

  • SANGALE PRATIK SUDAM
    Posted 23 सप्टेंबर , 2020 at 6:16 pm

    Wahhhh Satyaaa bhawa… Manatle Shabd

  • R B Holle
    Posted 24 सप्टेंबर , 2020 at 4:21 pm

    अप्रतिम कविता ,,,,,

  • Manali Tunge
    Posted 2 जुलै , 2021 at 10:36 pm

    Waa waaa.. satyaaa.. kammaaallll…👍

Leave a comment