Skip to content Skip to footer

कलेची हाक : एक अस्तित्वशास्त्रीय शोध
मूळ इंग्रजी निबंध: शुभंकर पोद्दार । मराठी अनुवाद: गायत्री लेले

Discover An Author

  • Researcher

    Subhankar Poddar is a researcher in the Department of Philosophy, University of North Bengal. His research focuses on Philosophy of Photography. His area of interest includes philosophical aesthetics, existentialism, Gandhian philosophy and post-modern philosophy.

    शुभंकर पोद्दार हे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ बंगाल येथील तत्त्वज्ञान विभागात संशोधक आहेत. त्यांचे संशोधन मुख्यतः छायाचित्रणाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. तत्त्वज्ञानातील सौंदर्यशास्त्र, अस्तित्ववाद, गांधीवादी विचार आणि उत्तर-आधुनिक तत्त्वज्ञान ह्या विषयांत त्यांना विशेष रस आहे.

  • साहाय्यक प्राध्यापक आणि लेखक

    गायत्री लेले सध्या  मिठीबाई महाविद्यालय, मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्या मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात, तसेच रुईया महाविद्यालय, मुंबई येथे साहाय्य्क प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांचा पीएच.डी.चा अभ्यास ‘ईशान्य भारतातील नागा अस्मिता, त्यांचा राष्ट्रवाद आणि भारतीय राज्यसंस्थेचे धोरण’ ह्या विषयाशी संबंधित होता. गायत्री लेले ह्यांना लेखन, शास्त्रीय संगीत आणि कविता-साहित्य ह्यांची आवड आहे. 

    Gayatri Lele is an Assistant Professor in the Department of Political Science at University of Mumbai. She holds a PhD in Political Science and has a deep interest in writing, Indian classical music, and poetry.

जेव्हा आपण कुठल्याही कलाप्रकाराशी समरस होतो, मग ती चित्रकला असो, अथवा कविता, किंवा संगीत; तेव्हा आपली त्या कलाकृतीबरोबर काहीएक जवळीक निर्माण होते, किंवा त्या कलाप्रकारात असे काही असते ज्यामुळे आपण त्याकडे ओढले जातो. ही संलग्नता अथवा या कलाप्रकारांच्या जगताचा एक भाग होणे, ही प्रत्येक वेळेस आपली निवड असतेच असे नाही.  किंबहुना, कलाकृतीच असते जी निरीक्षकाबरोबर सहभागी होऊ लागते.

जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीपाशी थबकतो, तेव्हा नेमके काय घडत असते ? अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, कलाकृती आपल्याशी बोलते. ती आपल्यापर्यंत पोहोचू पाहते, आपले लक्ष वेधून घेते आणि कधीकधी आपली जीवनदृष्टी ठरवते. ‘कला बोलावते’ असे म्हणताना आपण त्या कलाकृतीच्या मूलभूत जातकुळीविषयी काही सांगू पाहतो — केवळ एक कलात्मक गुणधर्म, किंवा अभिव्यक्तीचे माध्यम, किंवा सौंदर्यात्मक वस्तू म्हणून नव्हे; तर असे काहीतरी, ज्याला स्वतःचे एक अस्तित्व आहे, जे हाक देत राहते.  

या लेखाचा उद्देश कलेचे स्वरूप ‘हाक’ म्हणून विस्ताराने स्पष्ट करणे हा आहे. हा युक्तिवाद चार टप्प्यांमध्ये मांडला आहे. पहिल्या टप्प्यात, या हाकेचा एक तात्त्विक संकल्पना म्हणून विस्तार केला आहे, ‘आपल्याला काहीतरी साद घालते’ असे आपण म्हणतो, ते नेमके काय असते, याचा ऊहापोह केला आहे. दुसऱ्या टप्प्यात, कलेचा आदर्शवादापासून वास्तवतेपर्यंत प्रवास कसा होतो, आणि त्यातून ‘हाक’ ही संकल्पना कशी सुस्पष्ट होत जाते, याची चर्चा केली आहे. तिसऱ्या टप्प्यात, या हाकेच्या स्वरूपाचा विस्तार केला केला आहे आणि त्यासाठी विविध विचारवंतांच्या सिद्धांतांचा — जसे हायडिगर, गॅडमर, मर्ले-पॉन्टी इत्यादींचा — आधार घेतला आहे. चौथ्या टप्प्यात, काही कलाप्रकार वेगवेगळ्या लोकांना कशी वेगवेगळ्या तऱ्हेने साद घालतात, याबाबतचा विचार मांडला आहे. 

‘हाक’ म्हणजे नेमके काय ? – एक तात्त्विक स्पष्टीकरण 

कलेच्या संदर्भात ‘हाक’ या संकल्पनेचा विचार करण्यापूर्वी, हाक म्हणजे नेमके काय, याची व्याख्या करणे आवश्यक आहे. ही हाक म्हणजे आवाज किंवा ध्वनी नव्हे. ते एखाद्याला उद्देशून केलेले संबोधन असते. यामध्ये प्रतिसाद अपेक्षित असतो, आणि त्यामुळे हाक देणारा आणि ज्याला हाक दिली जात आहे त्यांच्यात एक नाते निर्माण होते. 

हाक देणे म्हणजे निर्वात पोकळीमधले संबोधन नव्हे. ही हाक कोणाला तरी दिलेली असते. याचा अर्थ असाही होतो की प्रत्येक वेळेस ही हाक नेमकी कोणाला दिलेली आहे हे जरी आपल्याला कळले नाही, तरीही ही हाक कोणाला तरी दिलेली आहे, याची जाणीव मात्र आपल्यास होते. हाक प्राप्तकर्त्याची निर्मिती करते. जेव्हा आपल्याला साद घातली जाते, तेव्हा आपल्याकडून आपोआप एखादी विशिष्ट मागणी किंवा अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा असते, किमान उपस्थित राहण्याची, किंवा प्रतिसाद देण्याची, किंवा काहीएक कृती करण्याची. बिइंग अँड टाइममध्ये मार्टिन हायडिगर ‘हाक’ या संकल्पनेचा विशेषतः अंतर्मनाने दिलेल्या हाकेसंदर्भात मागोवा घेतात. ही अंतर्मनाची हाक खरे तर आपल्याला काहीही सांगत नाही. ती आपल्यालाच आपल्या शक्यतांकडे वळवते. (हायडिगर, १९६२, पृ. ३१८.) हाक म्हणजे ठोस विधान नव्हे. हाक म्हणजे आदेश (समन्स). 

हाक कोणाकडे तरी पोहोचण्याची आवश्यकता असते, त्यालाच नातेसंबंध असे म्हणू शकतो. याचा अर्थ, हाक ही त्या नातेसंबंधातून निर्माण होते असे नाही. ही हाक त्या कलाकृतीचीच असते, पण ती कोणापर्यंत पोहोचली नाही, तर तिला हाक म्हणून संबोधू शकत नाही. ती अस्तित्वात तर असते, परंतु अपूर्ण राहते. नातेसंबंध म्हणजे हाक मारण्याचे स्थान नव्हे, तर ती हाक पूर्णत्वास जाण्याची अट आहे. जेव्हा कुठलाही प्रेक्षक एखादी कलाकृती पाहतो, तेव्हा ही अगोदरपासूनच अस्तित्वात असलेली हाक पूर्णत्वास जाते. त्या भेटीत ती पूर्ण होते. 

कलेची हाक : आदर्शवादापासून वास्तवतेपर्यंत 

कला नेहमीच साद घालते. परंतु ती नेमकी कशाप्रती साद घालते, हे मात्र काळाच्या ओघात बदलत गेले आहे. आधुनिकपूर्व काळ हा आदर्शवादाकडे झुकलेला होता — अशा वास्तवतेकडे कल होता, जी आपल्या नजीकच्या अनुभवांपलीकडे असते. प्राचीन ग्रीसमध्ये मानवी देहाकृतीचे आदर्श स्वरूप ही शिल्पकलेची प्रमुख विषयवस्तू होती. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे प्रत्यक्ष रूप नव्हे, तर त्या व्यक्तीचे साधारणतः आदर्श चित्रण केले जात असे. पुनरुज्जीवनाच्या काळात दैवी गोष्टींना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न झाला — अशा कलेप्रती मनुष्याला वळवले गेले, जी सामान्य जगताच्या पलीकडे होती. तो एक असा अतींद्रिय अनुभव होता, जो मानवी वर्तमानाच्या पल्याड होता. महाकाव्यांत महान कार्ये केलेल्या नायकांच्या कथा सांगितल्या गेल्या, म्हणजेच ऐकणाऱ्यांचे लक्ष मानवी आयुष्यातील आदर्श कर्तृत्वाकडे वळवले गेले. जी. डब्लू. एफ. हेगेल यांनी त्यांच्या सौंदर्यशास्त्रावरील व्याख्यानांत याची व्याख्या केली आहे — “कलेने आपल्या अभिजात स्वरूपात आशय आणि रूप यांचा परिपूर्ण मेळ साधला, ज्यामुळे आध्यात्मिकतेची संपूर्णपणे जाणीव होऊ लागली.” (हेगेल, १९७५, पृ. ७५.) आधुनिकपूर्व काळातील कलेची हाक ही ऊर्ध्वगामी होती — अतींद्रियतेकडे, आदर्शाकडे, आणि सामान्य जगताच्या पलीकडील विश्वात नेणारी.

आधुनिक कलेतील एका महत्त्वपूर्ण प्रवाहाने या ‘हाके’च्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. एकोणिसाव्या शतकातील वास्तववादी चळवळीपासून ते विसाव्या शतकातील अभिव्यक्तीवाद, दादाइजम आणि सामाजिक वास्तववाद यांनी मनुष्याचे लक्ष वर्तमानापलीकडे असणाऱ्या अतींद्रिय जगापासून खऱ्याखुऱ्या, वास्तव जगाकडे वळवले — विशेषतः अशा अनुभवांकडे, जे बहुसंख्यांच्या प्रबळ संस्कृतीने आणि तिच्या सौंदर्यविषयक जाणिवांनी अदृश्य करून टाकले होते.

या प्रवाहामध्ये केवळ विषयवस्तूतील बदलापेक्षा अधिक खोल असे तत्त्वज्ञानात्मक महत्त्व दडलेले आहे. जिथे आधुनिकपूर्व काळातील कलेने वास्तवतेपलीकडच्या आदर्शाला साद घातली, तिथे आधुनिक कलेतील या प्रवाहाने त्या आदर्शात दडलेल्या वास्तवतेला साद घातली. गरिबी, हिंसा, विस्थापन आणि अन्याय यांकडे लक्ष वेधले, अशा परिस्थिती ज्या लोकांच्या ओळखीच्या जगातील सुखसोयींमुळे आणि सत्ताकारणामुळे दृश्य नव्हत्या. जॉन बर्जर त्यांच्या वेज् ऑफ सीइंगमध्ये म्हणतात — “आपण ‘जसे’ पाहतो ते एखाद्या विशिष्ट संस्कृतीने आणि त्यातील सत्तासंबंधांनी घडवलेले असते.” (बर्जर, १९७२, पृ. ८.) ही हाक ऊर्ध्वगामी नाही, तर आपल्याला आत झाकून पाहण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे — अशा जगाकडे, ज्याने स्वतःला स्वतःपासून लपवून ठेवले आहे. आधुनिक कलेतील आणखी एक प्रवाह आदर्शवादी दृष्टिकोन टिकवून ठेवतो, जो अंतर्यामी असलेल्या अनुभवांविषयी बोलतो, आध्यात्मिक सत्य आणि शुद्ध स्वरूप यांविषयी मांडणी करतो — तरीही वास्तवतेकडे झुकलेला कल बहुतेक कलाप्रकारांत स्पष्टपणे दिसून येतो.

जॅक रन्सिअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने या बदलाकडे पाहायचा आणखी एक दृष्टिकोन दिला आहे. रन्सिअर यांच्या मते, प्रत्येक सामाजिक व्यवस्था ही ‘सामंजस्याच्या विभागणी’वर आधारभूत असते — ही एक अशी अंतर्निहित व्यवस्था असते, जी ठरवते की काय दृश्य असावे आणि काय अदृश्य असावे, काय बोलले जावे आणि काय न बोलले जावे, काय वास्तव मानले जावे आणि काय न मानले जावे. (रन्सिअर, २००४, पृ. १२.) हा ‘आदर्श’ याच व्यवस्थेचा भाग आहे. बघण्यायोग्य आणि दर्शवण्यायोग्य काय आहे, हे तोच ठरवतो. या आदर्शाबाहेर जे काही असते, ते आपोआप  दृष्टीआड केले जाते. जेव्हा कलाकृती शोषितांवर आणि पीडितांवर लक्ष केंद्रित करते — असे काही जे सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून नजरेआड केले आहे — त्या कलाकृती या व्यवस्थांसाठी त्रासदायक ठरतात. कारण, त्या अंधारातल्या गोष्टी उजेडात आणू पाहत असतात, बोलू नये असे काही बोलतात. त्यामुळे कलेचा आदर्शाकडून वास्तवतेकडचा प्रवास हा केवळ कलाकृती काय दाखवू इच्छिते, याबाबतचा नसतो. हा बदल असतो तो, कला नेमके काय ‘वास्तव’ मानते, याबद्दलचा. आणि हा बदल घडवून आणताना कला काहीएक राजकीय कृती करत असते — म्हणजे पक्षकारण अथवा धोरणनिर्मिती अशा संकुचित अर्थाने नव्हे, पण — या जगास नेमके काय धार्जिणे आहे, याचा खोलात जाऊन विचार करते.   

आदर्शाला साद घालणे ते वास्तवतेकडे झुकणे या ऐतिहासिक बदलामध्ये एक गोष्ट निश्चित राहते — ती म्हणजे, या हाकेचे स्वरूप. कला नेहमीच अशा गोष्टींकडे आपल्याला खेचते, ज्या तिच्याशिवाय उपलब्ध झाल्या नसत्या. एका ऐतिहासिक क्षणी जी हाक सामान्य जगतापलीकडील वास्तवाकडे घेऊन जात होती; दुसऱ्याच क्षणी ती हाक सर्वसामान्य जगाने दडवून ठेवलेल्या वास्तवतेकडे झुकते. हाकेची दिशा बदलली आहे. हाक स्वतः बदललेली नाही. 

कलेच्या ‘हाके’ची अस्तित्वात्मक रचना

कला कशी हाक देते ? कलाकृतीत स्वतःची अशी चेतना नसते. एखाद्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीसोबत संवाद करण्याची जशी इच्छा असते, तशा प्रकारची इच्छा कलेत नसते. चित्राला कोणताही आवाज नसतो. कुठलीही इच्छाशक्ती नसते. आणि तरीही ते साद घालते. प्रश्न असा आहे की या ‘हाके’स आपण कसे ओळखू शकतो — प्रतिक्रियेशिवाय, व्यक्तिनिष्ठतेशिवाय, वस्तूकरणाशिवाय ? जसे काही, ती हाक म्हणजे त्या कलाकृतीचे अंगभूत वैशिष्ट्य आहे.  

ओरिजिन ऑफ द वर्क ऑफ आर्टमध्ये हायडिगर याकडे पाहण्याचा एक मार्ग सुचवतात. त्यांच्या मते, कलाकृती वास्तवाचे प्रतिनिधित्व करत नाही. ती वास्तवास उघड करते. ती एका वेगळ्या जगाची पायाभरणी करते. ती अर्थाचे असे अवकाश निर्माण करते, ज्यामध्ये गोष्टी जशा आहेत तशा प्रकट होतात. हा उलगडा प्रेक्षक करत नाहीत. कलाकृतीच तो करते. ती एक अस्तित्वात्मक घटना असते — अशी घटना, जी कलाकृती स्वतः घडवून आणते. (हायडिगर, १९७१, पृ. ३९.) पूर्वी लपवले गेलेले असे काही कलाकृती खुल्या जगात आणते. 

हे विश्लेषण आपल्या सर्वसामान्य समजुतीला आव्हान देते. आपल्याला वाटत असते की एखाद्या कलाकृतीसमोर आपण तटस्थ प्रेक्षकासारखे उभे असतो, एखाद्या भावनाहीन वस्तूला सामोरे गेल्यासारखे. हायडिगर यांचे विधान याला छेद देते. कुठलीही कलाकृती आपल्यासमोर निव्वळ निरीक्षण करवून घेण्यासाठी उभी ठाकत नाही. ती एक जग खुले करते, आणि त्या खुल्या झालेल्या जगात आपण ओढले जातो. आपण त्या दाराच्या बाहेर उभे राहून आत डोकावत नसतो. आपण त्यात ओढले जातो. त्यालाच ‘हाक’ असे म्हणतात. कलाकृतीने खुल्या केलेल्या जगात खेचले जाण्याचा तो अनुभव असतो. असे जग, ज्यात आपण जाणून प्रवेश करत नाही,  पण तरीही आपण स्वतःला आधीपासूनच त्यात असल्याचे पाहतो.

गॅडमर याचे आणखी व्यापक विश्लेषण करतात. त्यांच्या ट्रुथ अँड मेथडमध्ये ते यासाठी ‘आन्सप्रूक’ या जर्मन शब्दाची योजना करतात, ज्याचा अर्थ ‘हक्क सांगणे’, ‘संबोधणे’, आणि ‘मागणी करणे’ असा होतो. याद्वारे कलाकृती आपल्यासोबत नेमके काय करतात, हे प्रतीत होते. “कलाकृती ही आपल्यासमोर एक वस्तू म्हणून उभी राहत नाही. ती आपल्याविरुद्ध उभी राहते आणि आपल्यावर अशा प्रकारे हक्क सांगते, जो आपण दुर्लक्षित करू शकत नाही किंवा डावलूही शकत नाही.” (गॅडमर, १९७५,पृ. १२१.) कलाकृतीचे असे (आपल्यावर) हक्क सांगणे हे (आपण) तिचा अर्थ लावण्याअगोदरपासूनच अस्तित्वात असते. कलाकृतीचा अर्थ काय, हा प्रश्न आपण विचारण्यापूर्वीच, किंवा तिचे विश्लेषण करण्यासाठीच्या विविध पद्धती अवलंबण्यापूर्वीच, आणि अभिरुचीसंदर्भात काही निर्णय घेण्यापूर्वीच, कलाकृतीने आपल्याला संबोधित केलेले असते. 

याचाच अर्थ, ‘हाक’ ही कलाकृतीकडे लक्ष पुरवल्यामुळे निर्माण होत नाही. ते असे काही आहे, जे आपले लक्ष वेधून घेते. आपल्याला साद घातली जावी, हे आपण ठरवत नाही. पण आपल्याला हाळी दिली जाते आहे, हे आपल्यालाच (आपोआप) जाणवते. कलाकृतीत केवळ समरसून जाण्यामुळे या हाकेची अनुभूती येत नाही, तर ती जणू पूर्वअटच असते. सर्वसामान्य समजुतीप्रमाणे आपण निष्क्रिय विषय म्हणून कलाकृतीकडे पाहतो. परंतु प्रत्यक्षात मात्र उलटे घडते. कलाकृतीचे हक्क सांगणे, तिचे संबोधन, हेच त्या संवादाला गती आणते. 

गॅडमर कलेच्या या ‘दावा सांगण्या’चे ऐहिक महत्त्व स्पष्ट करतात. कलाकृती वेगवेगळ्या ऐतिहासिक काळांतून तावून-सुलाखून निघते. हा केवळ एक अपघात नसतो किंवा घटना नसते. याचा अर्थ असा होतो की कलाकृती ही साद घालतच राहते, आपल्या प्रेक्षकांवर अथवा वाचकांवर परिणाम करतच राहते. या रसिकांचे स्वरूप बदलत राहते, तरीही. गॅडमर त्यांच्या रेलेव्हन्स ऑफ द ब्युटीफुलमध्ये म्हणतात, “कलाकृतीचे हे सतत हाक देत राहणे, हे तिच्या अस्तित्वात्मक सामर्थ्याचे (ontological power) द्योतक आहे.” (गॅडमर, १९८६, पृ. ३०.) 

मॉरिस मर्ले-पॉन्टी या विश्लेषणात भर घालत कलाकृतीला केवळ आकलनाच्या कक्षेतील नव्हे, तर मूर्त स्वरूपातील असे काही म्हणून पाहतात. त्यांच्या आय अँड माईंडमध्ये ते म्हणतात की, “चित्र हे बघणाऱ्याच्या आकलनक्षम मनास नव्हे, तर अनुभवक्षम देहाला आधी साद घालते. जेव्हा आपण चित्र बघतो, विशेषतः एखादे निसर्गचित्र अथवा हालचाली करणारी शरीरे, तेव्हा आपली दृष्टी एखाद्या अलिप्त निरीक्षकासारखी राहात नाही. ती देहासमान होते, असे शरीर ज्याला अवकाशाची, वजनाची, पोताची आणि खोलीची जाणीव स्वानुभवातून होते. चित्र हे अशा शारीर आकलनास प्रवृत्त करते. (म्हणूनच) चित्रकला ही केवळ बौद्धिकतेला साद घालत नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या, अनुभूतिक्षम आणि आकलनक्षम मानवास साद घालते.” (मर्ले-पॉन्टी, १९६८, पृ. १६२.)  

मार्टिन हायडिगर यांनी मांडलेला ‘अस्तित्वात्मक उलगडा’ (ontological disclosure), हान्स जॉर्ज गॅडमर यांनी मांडलेले ‘सौंदर्यात्मक प्रतिपादन’ (aesthetic assertion),आणि मॉरिस मर्ले-पॉन्टी यांनी मांडलेले ‘देहाधारित संबोधन’ (embodied address) — हे सारे दृष्टिकोन मिळून कलेच्या ‘हाके’च्या अस्तित्वात्मक स्वरूपाचा एक विस्तृत पट निर्माण करतात. कलाकृतीची हाक ही एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर अस्तित्वात असते. जग उलगडण्याचा स्तर (कलाकृती आपल्यासाठी कोणते जग उघड करते ?), आकलनात्मक संबोधनाचा स्तर (आपण कलाकृतीकडे पाहण्यापूर्वीच ती आपल्याकडून कोणती अपेक्षा किंवा मागणी करते ?), आणि ऐंद्रिय संबोधनाचा स्तर (कलाकृती केवळ आपल्या विवेकी ‘स्व’शी नव्हे, तर आपल्या संपूर्ण शारीर अस्तित्वाशी कशा प्रकारे संवाद साधते ?). या तिन्ही पातळ्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. म्हणूनच, कलेची हाक ही एकाच वेळी अस्तित्वात्मक, आकलनात्मक आणि ऐंद्रिय असते.

कलाकृती सगळ्यांना सारख्याच पद्धतीने बोलावते का ? 

एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे : जर कला आपल्याला साद घालते, जर कला आपण तिचा अर्थ लावण्याअगोदरच आपले लक्ष वेधून घेते, तर याचा अर्थ, कलाकृती सगळ्यांना सारख्याच पद्धतीने साद घालते, असा होतो काय ? कलाकृती सगळ्यांना सार्वत्रिकरीत्या हाक देते, की प्रत्येकास वेगवेगळ्या रीतीने बोलावते, हे आपण कोण आहोत, कुठून येतो आणि आपले अनुभवविश्व काय, यावर अवलंबून असते. प्रत्यक्षातले अनुभव असे सांगतात की वेगवेगळ्या लोकांचे एखाद्या कलाकृतीबद्दलचे अनुभव निरनिराळे असतात. एखादी कविता एखाद्या वाचकाला दुःखाच्या आणि विरहाच्या अत्यंत खोल अनुभवांत ओढून नेऊ शकते, परंतु दुसऱ्या वाचकाला मात्र मुळीच स्पर्श करू शकत नाही. एखादे चित्र एखाद्या प्रेक्षकाला सामाजिक न्यायासंदर्भातल्या प्रश्नांबाबत संवाद करायला प्रवृत्त करू शकते, तर दुसऱ्या प्रेक्षकास रचनांच्या रोचक मांडणीसारखे वाटू शकते.

कान्ट यांनी त्यांच्या क्रिटिक ऑफ द पॉवर ऑफ जजमेंट या ग्रंथात सार्वत्रिक आणि वैयक्तिक यांच्यातील परस्परसंबंधाला सौंदर्यनिर्णयाचा मूलभूत भाग मानले आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते, तेव्हा आपण तो केवळ एक वैयक्तिक आनंददायी अनुभव म्हणून मांडत नाही. आपण आपले मत सार्वत्रिकरीत्या मान्य होईल, अशा पद्धतीने मांडतो. शिवाय, एखाद्या वस्तूचे सौंदर्य आपण ज्या प्रकारे अनुभवतो, ते आपण तर्कशास्त्रीय निष्कर्ष सिद्ध करतो तशा प्रकारे सिद्ध करू शकत नाही. यालाच कान्ट यांनी ‘रुचीचे द्वंद्व’ (antinomy of taste) असे म्हटले आहे. 

परंतु, कान्ट यांचे हे निरीक्षण आपण ‘हाके’च्या सिद्धांतालाही लागू करू शकतो. कलाकृतीच्या ‘हाके’ला एक वैश्विक रूप आणि विशिष्ट आशय असतो. हाकेचे रूप सार्वत्रिक असते : कलाकृती नेहमीच विशिष्ट दिशेप्रती हाक देते,  ती अर्थ लावण्यापूर्वीच हक्क सांगते, आणि ती नेहमीच पाहणाऱ्याला अशा नात्यात ओढते जे निव्वळ माहितीच्या किंवा युक्तिवादाच्या पलीकडे जाते. हाकेची औपचारिक सार्वत्रिकता कुठल्याही संस्कृतीतील किंवा काळातील कलाकृतीला ‘कलाकृती’ म्हणून ओळख प्रदान करते.. परंतु या हाकेचा आशय — म्हणजे प्रत्येक व्यक्तीस त्या हाकेतून काय गवसते — ते त्या व्यक्तीच्या विशिष्ट अनुभवानुसार, इतिहासानुसार, आणि सामाजिक स्थानानुसार बदलत राहते. तीच हाक ही वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे संबोधित करते, कारण प्रत्येकजण तिला सामोरे जाताना स्वतःचे वेगळे जग घेऊन येतो.

हे वैश्विक आणि वैयक्तिक यांच्यामधील नाते ही ‘हाके’ची मर्यादा नसून सामर्थ्य आहे. कारण हाक ही वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभवतात. यामुळे असा संवाद शक्य होतो, ज्यात आपण प्रत्येकजण आपल्याला नेमकी कशासाठी साद घातली गेली आहे, आणि त्या हाकेचे विविध अर्थ जगातल्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी आणि स्थानांविषयी आपल्याला काय सांगतात, याचा विचार करू शकतो.

निष्कर्ष : 

या लेखातील विधाने तीन परस्परसंबंधित दाव्यांमध्ये संक्षेपाने सांगता येतील. प्रथमतः, हाक ही कलाकृतीत अंतर्भूत असते — ती कलाकृतीच्या मूळ ढाच्याचा अविभाज्य भाग असते. परंतु ही हाक केवळ नात्यातच पूर्णत्वाला पोहोचते. प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय ती अपूर्ण आणि केवळ एक संभाव्यता म्हणून राहते. दुसरे म्हणजे, ही हाक आपल्याला कशाप्रती बोलावते, हे काळानुरूप बदलत गेले आहे — आधुनिकपूर्व काळातील अतींद्रिय आदर्शाकडून ते आधुनिक कलेतील सामाजिक वास्तवापर्यंत. परंतु या बदलांनंतरही एक गोष्ट स्थिर राहिली आहे ती म्हणजे कला ‘हाक देते’ हे  मूलभूत वैशिष्ट्य कायम आहे. तिसरे म्हणजे, हाकेचे रूप वैश्विक आहे — ती नेहमीच कलाकृतीतून उद्भवते आणि नेहमीच अगोदरपासूनच काहीएक दावा करते. परंतु ती पूर्णत्वास मात्र विशिष्ट प्रकारे जाते — ती शेवटी काय घडते हे तिला उत्तर देणाऱ्या व्यक्तींवर, त्या व्यक्ती कोणते जग घेऊन येतात यावर, आणि त्या हाकेने जाणिवेपूर्वीच त्यांच्या आतमधले काय बदलले आहे, यावर अवलंबून असते.

थोडक्यात, हे सिद्ध होते की मनुष्य-जीवनात कलेची अस्तित्वात्मक भूमिका अपरिहार्य आहे. इतर कोणत्याही मानवी निर्मितीत किंवा संवादाच्या पद्धतीत अशी ‘हाक’ अत्यावश्यक ठरत नाही. गरिबीवरील सांख्यिकीय अहवाल आपल्याला माहिती देतो. राजकीय युक्तिवाद आपल्याला उद्युक्त  करतो. वैयक्तिक कथनामुळे आपले हृदय द्रवते. परंतु कलाकृती मात्र यांपैकी काहीही करत नाही. ती आपल्याला वास्तवाचा भाग बनवते, त्या वास्तवात वास्तव्य करण्यास भाग पाडते, आणि जे उलगडले जात आहे त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला तयार करते. कलेला ‘हाक’ म्हणून पाहणे म्हणजे हे मान्य करणे की आपले जगाविषयीचे आकलन अपूर्ण आहे, आणि आपल्यापर्यंत न पोहोचू शकलेली अनेक जगं अस्तित्वात आहेत. त्यामुळे कला हे निव्वळ चैनीचे साधन अथवा करमणूक नव्हे. ते मानवी क्षमतेला उद्देशून केलेले एक संबोधन आहे — खऱ्याखुऱ्या परिस्थितींना संपूर्णपणे, त्यांचे काठिण्य आणि मागण्या यांसहित सामोरे जाण्यासाठी.

संदर्भसूची :

  • कांट, आय. (२०००). क्रिटिक ऑफ द पॉवर ऑफ जजमेंट (पी. गायर आणि ई. मॅथ्यूज, अनुवादक). केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. (मूळ ग्रंथ प्रकाशित १७९०).
  • गॅडमर, एच. जी. (१९७५). ट्रुथ अँड मेथड (जी. बार्डेन आणि जे. कमिंग, अनुवादक). सीबरी प्रेस. (मूळ ग्रंथ प्रकाशित १९६०).
  • गॅडमर, एच. जी. (१९८६). रेलेव्हन्सऑफ द ब्युटीफुल अँड अदर एसेज (एन. वॉकर, अनुवादक). केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.
  • बर्जर, जे. (१९७२). वेज ऑफ सीइंग. पेंग्विन बुक्स.
  • मर्लो-पॉन्टी, एम. (१९६८). “आय अँड माइंड” (सी. डॅलरी, अनुवादक). जे. एडी (संपा.), द प्रायमसी ऑफ परसेप्शन मध्ये. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी प्रेस. (मूळ ग्रंथ प्रकाशित १९६०).
  • राँसिएर, जे. (2004). द पॉलिटिक्स ऑफ अॅस्थेटिक्स: द डिस्ट्रिब्युशन ऑफ द सेन्सिबल (जी. रॉकहिल, अनुवादक). कॉन्टिन्युअम.
  • हेगेल, जी. डब्ल्यू. एफ. (१९७५). अ‍ॅस्थेटिक्स: लेक्चर्स ऑन फाइन आर्ट, खंड १ (टी. एम. नॉक्स, अनुवादक). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. (मूळ ग्रंथ प्रकाशित १९३५).
  • हायडिगर, एम. (१९६२). बीइंग अँड टाइम (जे. मॅक्वॉरी आणि ई. रॉबिन्सन, अनुवादक). हार्पर अँड रो. (मूळ ग्रंथ प्रकाशित १९२७).
  • हायडिगर, एम. (१९७१). द ओरिजिन ऑफ द वर्क ऑफ आर्ट: इन पोएट्री, लँग्वेज, थॉट (ए. हॉफ़स्टॅड्टर, अनुवादक). हार्पर अँड रो. (मूळ ग्रंथ प्रकाशित १९३५).

Post Tags

Leave a comment