हवा अगदी स्तब्ध होती आणि आकाश जड भासत होतं. पूर्ण काळोख नव्हता, पण पूर्ण शांतताही नव्हती. शेकोटीभोवती पावलांची हलकी चाहूल होती. मध्येच कुणाचं तरी कुजबुजणं ऐकू येत होतं. झाडांचे आवाज ऐकू येणं कठीण होतं आणि वाराही फारसा नव्हता. एका हरिणाने धोक्याची चाहूल देणारा आवाज एकदा काढला. एकदाच. मग पुन्हा शांतता पसरली. इतकी गडद, की शेकोटीचाही आवाज मंदावल्यासारखा वाटला. आम्ही अंधाराकडे नजर लावून बसलो. आता कानच आपल्याला काही सांगतील, अशी वाट पाहत. पण काहीच घडलं नाही. फक्त शांतता.
मी थांबून राहिले. सावध. कान देऊन ऐकत. काहीतरी शोधत. तोंडातली चव आणि श्वासाची लयही जाणवत होती. अचानक विजेच्या लखलखाटाने जमीन हादरली. दचकून उठल्यासारखी वाटली. दूरवर ढग गडगडत होते. त्या आवाजातून काही ऐकू आलं का ? प्रतीक्षा तशीच सुरू राहिली. एक जण सावध उभा होता. बाकीचे चरत राहिले…
दुसऱ्या एका ठिकाणी, मी शाळेत शिकवायला जाताना तळपत्या उन्हातून सायकल चालवत जायचे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कापसाची आणि भाताची शेतं क्षितिजापर्यंत पसरलेली असायची. तीच शेतं रोज वेगळी दिसायची. पण पेरणी, पीक आणि कापणी यांची लय मात्र कायम सारखीच असायची. अगदी प्रवेश, शिक्षण आणि पदवी पूर्ण होण्याच्या प्रवासासारखी. संगोपन ही देखील रोज घडणारी प्रक्रिया आहे.
माझं बालपण आवाजांनी भरलेल्या घरात गेलं. आई-वडिलांच्या संगीताच्या रियाजाचे स्वर आणि मागे सतत वाजणारा इलेक्ट्रॉनिक तंबोरा ऐकतच मला अनेकदा झोप लागायची. वर्षानुवर्षं घरात एकाच वेळी चालणारे वेगवेगळे आवाज माझ्या जगण्याचा भाग बनले. एका खोलीत कर्नाटकी संगीताचा क्लास, दुसऱ्या खोलीत बॉसानोव्हा, पाण्याच्या मोटारीचा आवाज, भांड्यांची खणखण, आणि मध्येच वाजणारा फोन. उसन्या घेतलेल्या आवाजात एखादं गाणं आपल्या आतून कसं उमटतं, हे सांगणं कठीण आहे. घरात शांतता असायची, तेव्हा मी भरतकाम, शिवणकाम आणि हाताने बनवलेल्या वस्तूंवरच्या नक्षी आणि आकृत्या निरखत बसायचे. परत-परत दिसणारे आकृतिबंध मला नेहमीच आकर्षित करत आले आहेत. कारण त्यातून एक लय तयार होते. आणि हळूहळू ती लय इतकी अंगवळणी पडते, की तिच्यातला छोटासा बदलही जाणवू लागतो. पण इम्प्रोव्हायजेशन आपल्याला मुद्दाम त्या ओळखीच्या वाटेपासून दूर जाऊन, अनोळखी वाटांवर फिरून पुन्हा परत येण्याची संधी देतं. मी प्रत्येक चित्रात असंच काहीसं करत असते, जसं एखाद्या रागाच्या वेगवेगळ्या मांडण्या शोधणं किंवा तीच गोष्ट पुन्हा नव्यानं सांगणं.
मी स्टुडिओमध्ये असते, तेव्हा अनेक काल्पनिक जगं माझ्यासमोर खुली होत जातात. चित्र काढण्याची माझी प्रक्रिया म्हणजे अनेक दरवाजे असलेल्या घरात शिरण्यासारखी आहे. रेखाटन हा आत शिरण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग असतो. पण कधी मी रंगांच्या एखाद्या थरापासून सुरुवात करते, तर कधी एखाद्या जागेच्या मांडणीपासून.
मानवी आकृती रेखाटण्याचा मला कधीही कंटाळा आलेला नाही. अॅक्रिलिक रंगांमध्ये काम करताना एक घाई सतत जाणवत राहते. रंग पटकन सुकतील, ही हलकी अस्वस्थता मनात असते. रंग मिसळताना, एकजीव करताना कपाळ, नाक, गाल, जबडा, हनुवटी, मग भुवया आणि डोळे यांचा आकार हळूहळू स्पष्ट होत जातो. मी रंगवलेले चेहरे आणि शरीरं ओळखीची वाटतात. तरी प्रत्येक वेळी ती नव्याने भेटल्यासारखीही वाटतात. नाकावर उजेडाचे हलके स्पर्श देताना एखाद्या मेक-अप आर्टिस्टचे रील्स मनात चमकून जातात. ब्रशचे केस कॅनव्हासच्या खरखरीत पोतावरून फिरतात, जणू खडतर वाटांची सवय असलेली पावलं चालत आहेत. ह्या आकृत्यांना हालचाल हवी असते. अगदी झोपलेल्या शरीराच्या श्वासातही. कानात कुठला तरी ऑडिओ सुरू असतो. बंद खिडक्यांमधून बाहेरच्या गाड्यांचे हॉर्न आणि वाहनांचे आवाज आत शिरत असतात. एकाच वेळी दोन गोष्टी घडत असतात. एक त्या ऐकू येणाऱ्या आवाजांमध्ये, दुसरी माझ्या चित्रात. काही जागा थांबून राहतात. तिथले रंग गुणगुणतात. सावल्यांशी संवाद साधतात.
मुलांना शिकवताना आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला ओरिगामीचं सौंदर्य पुन्हा नव्याने सापडलं. कागदाची घडी घालताना आणि उलगडताना तयार होणारे आकार, नक्षी आणि लय मला माझ्या चित्रांमधल्या प्रत्यक्ष आणि भासमान अशा दोन्ही अवकाशांशी खेळू देतात. शहरांमधल्या बांधकामांच्या कठोर वास्तवाच्या अगदी विरुद्ध हा अनुभव आहे. घरं उभारणं आणि पाडणं अनेकदा मनमानीपणे घडत राहतं. ह्याउलट, कागदाच्या घड्या मला कोमलता, लवचिकता आणि नजाकत जपणाऱ्या जागा घडवण्याबद्दल विचार करायला लावतात. सपाटपणाच्या वर उठण्याचा प्रयत्न करणारी काल्पनिक जगं उभी करण्यात मला एक प्रकारचं समाधान मिळतं — अशी जगं, जी माणसांच्या मनात काही प्रतिध्वनी भविष्यापर्यंत जिवंत ठेवू शकतील.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
