१.
|| स्तब्ध ||
भिंती खचल्या की
मळभ
भरलेले आभाळ
चक चक~~ करते
उदास झालेल्या
झाडांची
सळसळ सावकाश
फिकट होत जाते
तू अशी वेंधळी
डोळ्यात फूल पडले तुझ्या
भिंतीना
थोडे पकडून ठेव की
आभाळाचे ओठ
स्तब्ध होतील मग
२.
।। हिमयुगापासून ।।
प्राचीन काळापासून
उभाय
पाषाण पुरुषत्वाचा.
त्याला लपेटल्या आहेत
नाजूक पानांच्या
लतावेली.
मुक्तीला झालाय विस्मरणाचा रोग.
फिक्शन आणि मिथकांचा घोडेबाजार
तेव्हापासूनचा.
नंतर,
सुरू झाल्या
गौरी गणपतीच्या फुगड्या.
न गारठता आपापले बाँनफायर्स पेटवून
पाषाण निश्चिंत आहेत.
ओसाड जमिनी आपल्यातच आहेत.
कोणतेही नवे पीक न घेण्याच्या
फंदात आपण.
फुले फळे फळतील ?
नाहक पाषाण खरचटेल ?
त्याला कव्हर-अप दिले पाहिजे.
वाक्यातील कर्ता
अपरिणामित राहिला
पँसिव्ह राहिला
तर
कर्माची चिंता कशाला ?
शिवाय, क्रियापद हे कर्त्याबरोबरच असते,
आणि
पाषाणाला आयुष्यही खूप असते.
हिमयुगापासूनचे.
•••
३.
|| आज ||
कोजागिरीच्या चंद्राला
काळ्या ढगांची
त्यांनी आत्ताच झालर लावलीय
प्रकाशाला आवतन मिळू नये
असा काहीतरी कावा असावा
त्यांचा
अरे चंद्रा,
तू तर स्वत:च परप्रकाशी परप्रकाशीच तुझे जगणे
परप्रकाशीच तुझे गाणे
तुला काय सांगायचे ?
आणि तू करशील तरी काय ?
तसा प्रत्येकजण परप्रकाशीच !
कोण आहे स्व-प्रकाशी ?
प्रकाशा,
तू तरी आहेस का प्रकाशी ?
तू तर केवळ भारवाही
करू दे त्यांना
काय काय करायचे आहे ते
करू दे त्यांना
जे जे करायचे आहे ते
कालचा दिवस
कालचा क्षण
कालचा काळ
कालचा काळोख
कालचा प्रकाश
असतोच कुठे आज ?
काल होता कोजागिरीचा चंद्र
आज तो थोडाच असणाराय ?
काल होते काळे ढग कोजागिरीला झाकणारे
आज ते थोडेच असणाराहेत ?
आवतन प्रकाशाचे मिळत नसते
ते मिळवावे लागते
हे त्यांना सांगायची
वेळ आणली त्यांनी आज
•••
४.
|| पाथरवट ||
आरशातल्या प्रतिमांवरुन
ते
बोलत असतात
नेहमी
रस्त्यावरच्या शेवटच्या माणसाबद्दल
आणि बापूंचे नाव घेऊन
तर जोर देऊन बोलत असतात ते.
दुपारचे झोंबणारे उन
किमान दोनवेळा तरी
रक्तपात घडवते
नाकाच्या सांदरीतून.
तो पाथरवटी तरुण
आणि तरुणीसुध्दा
दिवसाकाठी
पत्थर तोडताना
आपली दहाही बोटे
दहावेळा चेंबवून घेतात.
तुमचे
ते शुभ्र उत्थान तर्क
आणि
तुमचे
ते पाषाण अर्क
थोडे राहू द्या बाजूला.
आत्ताच त्यांनी तारुण्यात पाय ठेवला आहे.
मला हे पैले सांगा,
त्यांनी
आरशाबाहेरच्यांवर विश्वास ठेवायचा ?
का
तुमच्या आरशाच्या
आतील
प्रतिमांना
कवटाळायचे त्यांनी ?
•••
५.
|| त्याचा फोन ||
त्या रकमीकडं जाऊ नगंस
न्हाई तं परत तेच ते करत बस्सील,
आन् म्या काय काय सांगितलं हाय,
ते समजलं न्हंवं ?
ते समदं ध्यानात ठीव.
आता सा महिनं तं काय याया मिळाचं न्हाय,
लय काळजी वाटती म्हून म्हणतोया.
आता परत हाय का तेच ते ?
म्या म्हनली न्हवं,
तुमी म्हणत्याल तशीच
-हातीय म्हून,
उगा सारकं सारकं तेच ते कशापायी बोलताय म्हण्ते?
लय शानपना करु नगंस,
आन् मला काय शिकवू नगंस
म्या काय म्हन्तोय तेवडंच कराचं.
ते रकमीचं सिंदाड काय हाय म्हाईत हाय न्हवं?
चल, ह्यो टीसी आलाय डब्ब्यात
नंतर परत करतोया फोन.
आता आनी कशाला करतायीसा ?
मलाबी लय कामं हायती
पोरांच्या साळा हायती
सकाळी,
म्याच करती तुमाला,
तुमी शांत -हावा
माज्यावं इसवास न्हाय व्हंय ?
आन् तिकडं थंडीचं काळजी घ्या,
न्हायतं मागच्यासारकं नगं व्हायला.
आता,
ठिवती फोन
उद्या बोलते परत
पोरं भुक्यावल्यात.
चला, झोपा जावा आता.