Skip to content Skip to footer

गाबोच्या गावात : बोगोटा : सुनील तांबे

Discover An Author

  • Editor

    सुनील तांबे मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रातून पत्रकार. त्यांनी रॉयटर्स मार्केट लाइट या कंपनीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. तांबे यांनी गॅब्रिएल गार्सिया मार्खेज या प्रख्यात लेखकाच्या जीवन-साहित्याचा आढावा घेणा-या मार्खेजची गोष्ट या पुस्तकाचे लिखाण तसेच फ्री व्हॉईस या रविश कुमार यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.

    Sunil Tambe was the Editor, Multimedia with Reuters Market Light. He started his career in Marathwada, a lesser-known regional Marathi daily from Aurangabad; gradually, moving to English newspapers with a brief stint in electronic media and finally settling down at Reuters, a global leader in news and financial information service in 2006. Sunil led the Editorial of Reuters Market Light from 2007 to 2015. As a journalist, he has travelled the length and breadth of the country covering politics, agriculture, and social issues and has also won the Jagan Phadnis Award for Investigative Journalism. He has written Marquez Chi Gosht, a Marathi book on the life and works of Gabriel Garcia Marquez and his Magical Realism and has also translated two books to Marathi—Free Voice by Ravish Kumar and 21 Lessons for 21st Century by Yuval Noha Harari.

रात्रीचे साडेअकरा वाजले होते. थंडी होती. पावसाची एक सर येऊन गेली होती. त्यामुळे रस्ते चकचकीत दिसत होते. चार चाकी वेगाने पळत होत्या. रस्त्यावर एकही दुकान, रेस्त्रां उघडं नव्हतं. चहाची टपरी नाही की पानाची गादी. हॉटेलचा काचेचा दरवाजा बंद होता. सिक्युरिटीवाल्याला सांगून उघडावा लागला. काऊंटरवर एकजण आला. रुमची चावी दिली आणि गेला. बोगोटा मला डेड सिटी वाटली. 

२ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री दहा वाजता मी बोगोटाला विमानातून उतरलो. समुद्रसपाटीपासून सुमारे अडीच हजार मीटर उंचीवर, अँडीज पर्वताच्या पठारावर असलेलं हे शहर कोलंबियाची राजधानी आहे. एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी मी तिथे गेलो होतो. गॅब्रियल गार्सिया मार्खेज हा माझा आवडता लेखक कोलंबियाचा. त्याचं टोपण नाव गाबो. त्याच्या पुस्तकांतून समजलेला कोलंबिया पाह्यची, अनुभवायची संधी मला मिळाली. 

अँडीज पर्वतरांगामधील पठारावर वसलेल्या बोगोटाचं विहंगम दृश्य

मार्खेज बोगोटाला पहिल्यांदा आला १९४३ साली. त्यावेळी बोगोटा फार मोठं शहर नव्हतं. पियाझा दे बोलिव्हार पासून सॅनडिएगो प्लाझा या दोन चौकातलं अंतर जेमतेम चार किलोमीटर. तेवढाच विस्तार होता बोगोटाचा तेव्हा. मार्खेजला बोगोटाचं जुनं नाव– सांता फे, अधिक पसंत होतं. मार्खेजचा जन्म आणि बालपण कॅरेबियनमधलं. म्हणजे समुद्रकिनार्‍याजवळ. स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाशात, उष्ण आणि दमट हवामानात. बोगोटाला आल्यावर तिथल्या थंडीने आणि “सोळाव्या शतकापासून” सुरु असणार्‍या पावसाच्या सरीने तो गांगरून गेला (१५३८ मध्ये या शहराची स्थापना स्पॅनिश लोकांनी केली. त्यामुळे कदाचित मार्खेज बोगोटाच्या वर्णनात सोळाव्या शतकापासून अशी नोंद करतो). इथे सर्वजण काळ्या कोटपाटलोणीत. डोक्यावर उंच हॅटस. रस्त्यावर, दुकानांत, रेस्त्रांमध्ये एकही स्त्री नव्हती. बायकांना बंदीच होती तिथे जायची. आपणच मृत्यूचा शोध लावलाय अशा थाटात बोगोटाचे लोक अंत्ययात्रा काढायचे, अशी नोंद केलीय मार्खेजने. मार्खेज बोगोटाला आला मागदलेना नदीतून. डोंगरपायथ्यापर्यंत वा नदीने जिथपर्यंत शक्य होतं तिथवर. तिथून ट्रेन पकडून तो बोगोटाला आला. हायस्कूल शिक्षणासाठी रवाना झाला झिपाकिराला. हे शहर बोगोटापासून जवळ आहे. आता बोगोटा एवढं वाढलंय की झिपाकिरा हे त्याचं उपनगर मानलं जातं. 

प्लाझा दे बोलिव्हार हा भला मोठ्ठा चौक आहे. चर्च, कोलंबियाची पार्लमेंट वा लोकप्रतिनिधींची सभा, न्यायालय, त्याशिवाय सरकारी कार्यालयं, लष्कर आणि पोलीस ठाणी, रेस्त्रां, दुकानं यांच्या मधोमध आहे विस्तीर्ण चौक. बँका, दुकानं, कंपन्यांची कार्यालयं, म्युझियम, विद्यापीठ, महाविद्यालयं, शाळा, होस्टेलं, निवासी वस्त्या कारेरा आणि काये यांना लगटून. कारेरा या शब्दाचा स्पॅनिश भाषेतला अर्थ आहे शर्यत वा रेस. रथांच्या शर्यतीचा रस्ता. हा रस्ता चांगला रुंद असतो. एव्हेन्यू, बुलव्हार्ड हेही शब्द त्यासाठी वापरले जातात. या रस्त्यांच्या दुतर्फा ठराविक अंतरावर झाडं असतात. कारेराला छेद देणारे रस्ते म्हणजे काये. सामान्यतः हे रस्ते कारेराला काटकोनात छेदतात. हे रस्ते कारेराच्या तुलनेत अरुंद असतात. इंग्रजीमध्ये त्यांना स्ट्रीट म्हटलं जातं. 

कोलंबियाच्या कोणत्याही शहरात, गावात मुख्य चौक, कारेरा आणि काये असतात. घर क्रमांक, कारेरा वा काये क्रमांक आणि शहर वा गाव एवढ्या सामग्रीच्या आधारे कोणताही टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला अचूक पत्त्यावर घेऊन जातो. गुगुल मॅपची गरज नाही की वाटेत कुणाला विचारायची गरज नाही. एक्स आणि वाय अक्षांवर सर्व शहरं आणि गावं वसलेली आहेत. स्पॅनिश लोक युरोपातून आले. त्यामुळे तिथल्या शहरांच्या आराखड्यानुसार त्यांनी या देशातली शहरं वसवली. 

सिमोन बोलिव्हार प्लाझा

प्लाझा स्पॅनिशमध्ये (पियाझा) हा केवळ चौक नसतो. राजकीय, आर्थिक, धार्मिक सत्ताकेंद्र असतं. प्लाझा, कारेरा, आणि काये पाह्यल्यावर मार्खेजच्या अनेक कथा, कादंबर्‍यांचं नेपथ्य समजलं. क्रॉनिकल ऑफ डेथ फोरटोल्ड या कादंबरीतले जुळे भाऊ मार्केटमध्ये सुरे विकत घेतात आणि भेटेल त्याला सांगत असतात की आम्ही इब्राहिम नासेरला ठार मारणार आहोत. शहराचा मेयर त्या दोघांकडचे सुरे काढून घेतो आणि त्यांना घरी जायला सांगतो. गावातल्या मुख्य चौकाच्या भोवतीच बाजारपेठ, रेस्त्रां आणि मेयरचा बंगला, पोलीस ठाणं इत्यादी असतं. म्हणून तर मेयर त्या दोन जुळ्या भावांकडचे सुरे काढून घेतो आणि त्यांना घरी पाठवतो. नो वन राईटस टू कर्नल या कथेतही प्लाझा वा मुख्य चौक महत्वाची भूमिका बजावतो.

बोगोटा शहराचा कारभार सकाळी पाच-साडे पाच वाजता सुरु होतो. मेट्रोची तिकीट खिडकी सकाळी चार वाजता उघडते. बसमध्ये गर्दी असते. इथे प्रत्येकाकडे पाण्याची बाटली असती. रेस्त्रांमध्ये पाणी विकत घ्यावं लागतं. रविवारी संध्याकाळी सात वाजता जेवणासाठी रेस्त्रां शोधत होतो. आसपासची सर्व रेस्त्रां बंद झाली होती. बोगोटा शहरात नाईट लाइफ नाही, आले म्हणाली. 

डेमोरिसेट या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी मी तिथे गेलो होतो. डेमोरिसेट म्हणजे लोकशाहीची पुनर्रचना. कॉर्पोरेट कंपन्या, राजकारणी यांनी प्रातिनिधीक लोकशाहीचं अपहरण केलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांची अर्थात इनोव्हेशन्सची गरज आहे. धोरण, कायदेकानून आणि अंमलबजावणी यामध्ये नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी नव्या संस्थांची गरज आहे, अशी डेमोरिसेट लॅब ची धारणा आहे. शेती धोरण, शेती कायदे करताना शेतकर्‍यांचा सहभाग कसा वाढवता येईल, ग्लोबल साऊथमध्ये या संस्था कशा रुजवता येतील, या विषयावरील कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. या संस्थेची एक कार्यकर्ती आले. आले २७ वर्षांची. तिचे आई-वडील बोगोटाचे. कोलंबियामध्ये निमलष्करी दलं वा पॅरामिलीटरी फोर्सेस म्हणजे पेंढार्‍यांच्या टोळ्या आहेत. या टोळ्या खाजगी आहेत. जमीनदारांच्या म्हणजे मोठ्या कंपन्यांच्या. डाव्या विचाराच्या क्रांतीकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार वा लष्कर या टोळ्यांना पोसतं, असं आलेने सांगितलं. निमलष्करी दलं, पोलीस आणि लष्कराची दहशत आहे ग्रामीण भागात. त्यांनी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍या आहेत. २०१६ साली झालेल्या शांतता करारानंतर एफआरसी वा एफ. ए. आर. सी. (रेव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या मार्क्सवादी सशस्त्र संघटनेने शस्त्रं खाली ठेवली. राजकीय पक्ष म्हणून ही संघटना निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय झाली. शांतता करारामुळे पन्नास वर्षांच्या यादवी युद्धाची अखेर झाली. या शांतता कराराबद्दल कोलंबिया या देशाला २०१६ साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र जमीन वाटप, सरकारी अत्याचारांचे बळी ठरलेल्यांना नुकसान भरपाई इत्यादी शांतता करारातील अनेक कलमांची अंमलबजावणी झालेली नाही. २०१६ नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये कॉन्झर्वेटिव पक्षाला सत्ता मिळाली. या पक्षाने शांतता कराराला धाब्यावर बसवलं. २०२२ साली गुस्टाव पेट्रो या एकेकाळच्या सशस्त्र क्रांतीकारकाची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. कोणत्याही एका पक्षाला निर्णायक बहुमत मिळालं नाही. पेट्रो संमिश्र सरकार चालवतो. त्याचं मंत्रिमंडळ, त्याच्या पुढची आव्हानं याबाबत आले माहिती देत होती.

ब्लादीमीर लोपेझ सालियस या सशस्त्र क्रांतीकारकाला भेटलो. रेव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबियामध्ये हा तरुण सक्रिय होता. २०१६ सालच्या शांतता कराराचा समर्थक होता. या करारामुळे केवळ आम्हाला (एफ. ए. आर. सी) फायदा झालेला नाही. संपूर्ण देशाचा त्यामुळे फायदा होणार आहे. जमीन सुधारणा होतील, विस्थापितांना जमीन मिळेल, राजकीय सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल, बेकायदेशीर कोका लागवडीची समस्या सुटेल आणि गेल्या पन्नास वर्षांतल्या हिंसाचारात जे बळी पडले त्यांना नुकसानभरपाई मिळेल. ब्लादीमीरने सांगितलं सशस्त्र क्रांतीदलातील तरुण-तरुणी शेतकर्‍यांची मुलं आहेत. लहान वयातच ती सैन्यात भरती झाली. त्यांच्यासाठी ब्लादीमीर साक्षरतेचे वर्ग चालवायचा. कोलंबियातील केवळ ३० टक्के जनताच सर्वार्थाने साक्षर आहे. ब्लादीमीर स्वतः लेखकही आहे. त्याने काही कथा लिहिल्या आहेत. 

गेतियनची हत्या झाली तो स्पॉट

लिबार्डो सारमिएन्तोस अन्झोला या अर्थतज्ज्ञाच्या अंदाजानुसार कोलंबियातील दहा लाख शेतकरी भूमीहीन आहेत. गेल्या पन्नास वर्षांत यादवी युद्धात अडीच लाखांहून अधिक माणसं ठार झाली. कित्येक लाख लोकांना स्थलांतरीत व्हावं लागलं. शांतता करारानंतर अनेक माजी क्रांतीकारकांचे खून झाले. देशाच्या एकूण बजेटच्या ३० टक्के रक्कम लष्करावर खर्च होते. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिकेने या देशामध्ये सुमारे २० अब्ज डॉलर्स ओतले. कोकेनच्या तस्करीला आळा घालण्यापेक्षा कम्युनिस्ट क्रांतीकारकांचा बीमोड करण्याला लष्कराने प्राधान्य दिलं आहे. 

अल्हेंद्रो रेयेस या कृषीअर्थतज्ज्ञांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. इमारत टोलेजंग होती. प्रवेशद्वार काचेचं होतं. ओळखपत्र दाखवल्याशिवाय आणि यजमानाने तुमच्या आगमनाची वर्दी दिली नसेल तर ते प्रवेशद्वार उघडायचं नाही. किराणा, फळं-भाजी, अमेझॉन, स्विगी, झोमॅटो या सेवांसाठी एक खिडकी उघडली जायची. पहारेकरी त्यातून सर्व माल घ्यायचा. बोगोटा ही गेटेड कम्युनिटी आहे. रेस्त्रां, दुकान, हॉटेल, हॉस्पीटल वगळता कोणत्याही इमारतीत ओळखपत्र वा आगाऊ वर्दी दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. स्मार्टफोनवर या सर्व बाबी क्यूआर कोडसह असायला हव्यात.

कोलंबियामध्ये कमालीची आर्थिक विषमता आहे. ८५ टक्के जमीन एक टक्का लोकांच्या ताब्यात आहे. म्हणून कोलंबियाला यादवी युद्धांचा मोठा इतिहास आहे, अल्हेंद्रो म्हणाले. वॉर ऑफ थाऊजंड डेज १८९९-१९०२ या काळात कोलंबियामध्ये  कॉन्झर्वेटिव आणि लिबरल यांच्यामध्ये यादवी युद्ध सुरु होतं. मार्खेजचे आजोबा, कर्नाल निकोलस मार्खेज या लिबरल्सच्या फौजेत दाखल झाले आणि कर्तबगारीच्या जोरावर कर्नल या हुद्द्यापर्यंत पोचले. १९०२ साली निरलांदियाच्या तहानंतर लिबरल फौजेने शस्त्रं खाली ठेवली. लिबरल्स आणि कॉन्झर्वेटिव यांच्यातलं दुसरं यादवी युद्ध– ला व्हायोलेन्सिया.  गेतियनच्या हत्येनंतर म्हणजे १९४८ साली सुरु झालं. एक दशक हे युद्ध सुरु होतं. वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूडमध्ये वॉर ऑफ थाऊजंड डेज च्या कालखंडाचं चित्रण आहे. नो वन राईट्स टू कर्नल, इन इव्हिल अवर या मार्खेजच्या कादंबर्‍यांमध्ये ला व्हायोलेन्सियाचं चित्रण आहे. १९६६ ते २०१६ या काळात रेव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया म्हणजे फार्क या मार्क्सवादी क्रांतीकारकांच्या संघटनेने सरकारच्या विरोधात युद्ध छेडलं होतं.  ८५ टक्के जमीन ताब्यात ठेवलेले १ टक्का लोक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यांनी जंगल अर्थात सार्वजनिक मालकीची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांच्या फौजा आहेत. या फौजांना निमलष्करी दलं म्हणतात. क्रांतीकारक, निमलष्करी दलं, पोलीस आणि लष्कर यांच्यातील रक्तरंजित संघर्षात लाखो लोक ठार झाले, सुमारे सत्तर लाख विस्थापित झाले आहेत. वीस लाख महिला लैंगिक अत्याचारांना बळी पडल्या आहेत. फार्क आणि कोलंबियाचं सरकार यांच्यातील शांतता कराराच्या वाटाघाटींमध्ये अल्हेंद्रो रेयेस यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड यामार्खेजच्या कादंबरीत बनाना कंपनी खलनायक आहे. युनायटेड फ्रूट कंपनीची पिवळी आगगाडी येईपर्यंत कोलंबियाच्या किनारपट्टीवरील अनेक गावं संथ जीवन जगत होती. सिनागा, आराकाताका, फुंडासिया ह्या गावांमध्ये पोस्ट आणि तार ऑफीसं उभी राह्यली. नवी हॉटेलं आणि वेश्यांच्या वस्त्या आल्या. हजारोंच्या संख्येने आलेले कामगार आपली खेचरं खुंटाला बांधून कामावर हजर झाले. कुदळी, कोयत्यांनी त्यांनी जंगल साफ करायला सुरुवात केली. दिवसाला एक डॉलरपेक्षा कमी मजूरीवर ते काम करत होते. गलिच्छ बराकींमध्ये राहात होते. मलेरिया आणि टिबी ने मरत होते. १८९४ ते १९२८ हा प्रदीर्घ काळ त्यांनी अपरिमित शोषण सहन केलं. अखेरीस एक युनियन स्थापन केली. १९२८ साली त्यांनी संप पुकारला. केळी झाडांवर कुजायला लागली. रिकाम्या गाड्यांना बांधलेले बैल झोपा घेऊ लागले. रिकाम्या स्टेशनवर रिकामी आगगाडी. बारांकियाच्या बंदरामध्ये केळ्यांची वाट पाहात सात आगबोटी उभ्या होत्या. चारशे संपकर्‍यांना अटक करूनही संप फोडता येईना. तिथे आराकाताकामध्ये (मार्केजचं जन्मगाव) युनायटेड फ्रूट कंपनीने देशाच्या लष्करशहाला पार्टी दिली. जनरल कोर्तेझ कोर्टस व्हर्गास दूर वाळवंटात होतात. त्याला संपाची खबर मिळाली. तो सिनागाला रवाना झाला. तिथे हजारोंच्या संख्येने कामगार जमले होते. कमरेला विळे, कोयते. त्यांच्या बायका, आईबापांसोबत मुलंही. कंपनीने आश्वासन दिलं होतं की आज करारावर सह्या होतील. प्रत्यक्षात जनरल कोर्तेझ कोर्टस व्हर्गास तिथे येतो. युनायटेड फ्रूट कंपनीच्या मॅनेजरचा पत्ता नसतो. निदर्शनं, संप ताबडतोब थांबवा अन्यथा परिणामांना तयार राहा असा आदेश कामगारांच्या कानावर पडतो. कोणीही जागचं हलत नाही. तीन वेळा ब्युगल वाजतं आणि काही क्षणात मशीनगन, रायफली धडधडू लागतात. प्रेतांचा खच पडतो. या हत्याकांडाचं वर्णन मार्खेजने केलेलं वर्णन – बंदुकीच्या गोळ्यांच्या लाटेने आडवं केल्यावर भीतीचं रुपांतर ड्रॅगनच्या शेपटीत झालं. एका लाटेवर समोरून येणारी दुसरी लाट आदळली आणि दुसर्‍या ड्रॅगनच्या शेपटापाशी, रसत्याच्या त्या बाजूला मशिनगन न थांबता धडधडत होत्या (वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड).  रात्रभर सैनिक प्रेतं गोळा करत असतात. सर्व प्रेतं रातोरात समुद्रात फेकून दिली जातात. दुसर्‍या दिवशी सकाळी रस्त्यावर रक्ताचा थेंबही नसतो. वृत्तपत्रांवर कडक सेन्सॉरशिप.  “मोकोंडोमध्ये काहीही घडलेलं नाही, काहीही घडत नाहीये वा पुढे कधीही काहीही घडणार नाही असं निवेदन सरकारतर्फे जारी करण्यात येतं”. (वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड)

१९२९ साली योर्ग एलिसिअर गेतियन हा पेशाने वकील असणारा लिबरल पार्टीचा नेता या हत्याकांडाला वाचा फोडतो. १९२९ ते १९४८ या दोन दशकांत गेतियनचा करिष्मा कोलंबियाच्या सीमा पार करून लॅटिन अमेरिकेतील तरुणांना साद घालू लागतो. १९४८ च्या एप्रिल महिन्यात कोलंबियाच्या राजधानीत, बोगोटाध्ये नवव्या पॅन अमेरिकन कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अमेरिका खंडातील सर्व देशांचा संघ स्थापन करण्यासाठी. या परिषदेला विरोध करण्यासाठी विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात येते. क्यूबाहून फिडेल कॅस्ट्रो या परिषदेसाठी येतो. ७ एप्रिल १९४८ रोजी त्याची आणि गेतियनची भेट होते. पुढची मिटिंग ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता ठरते. गेतियन त्याच्या ऑफिसातून निघतो. रस्त्यातच त्याच्यावर मारेकरी गोळीबार करतो. गेतियन रक्ताच्या थारोळ्यात पडतो. तोपावेतो मार्खेज राजकारणापासून फटकून होता. परंतु गेतियनच्या हत्येच्या स्थळी पोचतो. त्याचा मित्र म्हणतो, तू तर कधीच गेतियनचा चाहता नव्हतास, इथे का आलास. मी कधीच गेतियनचा चाहता नव्हतो पण त्या कॉन्झर्वेटिव्जनी माझे पेन्शनचे कागद जाळून टाकलेत, मी माझ्या कथा हरवून बसलोय, मार्खेज उत्तरतो. गेतियनच्या हत्येनंतर बोगोटामध्ये दंगल उसळते. पिसाळलेल्या जमावाने झुंजीतून पळ काढणार्‍या बैलाला केवळ बुकलून ठार केला. या दंगलीला म्हणतात बोगाटाझो. या दंगलीनंतर ला व्हायोलेन्सिया हा कोलंबियाच्या इतिहासातील रक्तरंजित कालखंड सुरु झाला. नो वन राईटस टू कर्नल, इन इव्हिल अवर या कादंबर्‍यात या कालखंडाचं चित्रण मार्केजने केलं आहे. मार्केज महाविद्यालयीन शिक्षणासाठी बोगोटामध्ये होता. ‘एल एक्सपेक्टेडोर’ या बोगोटातल्या वर्तमानपत्रात त्याची पहिली कथा प्रसिद्ध झाली. पत्रकारितेची सुरुवात त्याने बोगोटामध्ये केली. बोगोटातल्या रेस्त्रांमध्ये आणि ट्राममध्ये त्याने दणकून वाचन केलं. बोगोटाझोनंतर मार्खेज बस पकडतो आणि कॅरेबियन समुद्राच्या किनार्‍यावरील कार्तेहेना या शहरात जातो. 

अल्हेंद्रो रेयेस यांच्या घरातून निघायला रात्र झाली. उबर कॅब बुक करत होतो. मात्र ड्रायव्हर ट्रीप कॅन्सल करत होते. अखेर सांतियागो आला. सांतियागो गप्पिष्ट होता. परंतु जुजबी इंग्रजी बोलता यायचं. मला जुजबी स्पॅनिशही येत नाही. त्यामुळे गुगुल ट्रान्सलेटरच्या मदतीने मी त्याला सांगितलं की गॅब्रिअल गार्सिया मार्खेज या लेखकाच्या गावांना मी भेटी देतोय. सांतियागोने मार्खेजच्या चार-सहा कादंबर्‍यांची नावं घेतली. मी त्या वाचल्या होत्या. गाबोने कोलंबियातील कॅरॅबियन संस्कृती टिपली आहे. कोलंबियात विविध प्रदेश आहेत. अटलांटिक, पॅसिफिक समुद्रांचे किनारे, तीन पर्वतरांगा, पठारं इत्यादी. गाबो केवळ कॅरेबियन कोस्टचं चित्रण करतो. प्रत्येक प्रदेशातली भाषा स्पॅनिशचं आहे परंतु उच्चारण वेगळं आहे, प्रत्येक बोलीचं संगीत वेगळं आहे, असं सांतियागोने सांगितलं. अर्थात गुगुल ट्रान्सलेटरच्या मदतीने. बोगोटाचं चित्रण मार्खेजच्या कथात्म लिखाणात अपवादानेच येतं. मी थक्क झालो. माझा चेहेरा पाहून सांतियागो सांगितलं की तो आर्किटेक्ट आहे. गेली चोवीस वर्षं तो याच व्यवसायात होता. परंतु दिवस फिरले, प्रोजेक्ट बंद झाले. आता उबर टॅक्सी चालवून हाता-तोंडाची गाठ घालावी लागते. मीही कॅरेबियनमधलाच आहे, अशी पुस्ती त्याने जोडली. कॅरेबियनमधले लोक दिलखुलास, बोलघेवडे असतात. बोगोटाच्या गेटेड कम्युनिटीत सांतियागोच्या गप्पांनी ऊबदार वाटलं.

वन हंड्रेट इअर्स ऑफ सॉलिट्यूड ही मार्खेजची कादंबरी १९६७ साली प्रसिद्ध झाली. लिबरल आणि कॉन्झर्वेटिव यांच्यातील यादवी युद्ध हे या कादंबरीचं एक महत्वाचं आशयसूत्र आहे. निरलांदियामध्ये लिबरल आणि कॉन्झर्वेटिव यांच्यात तह होतो. लिबरल शस्त्रं सरकारच्या हवाली करतात. परंतु शांतता करारातील एकाही अटीची अंमलबजावणी होत नाही. करारानुसार लिबरल सैन्यातील सैनिकांना पेन्शन मिळणार असतं. परंतु कुणालाही पेन्शन मिळत नाही. दस्तुरखुद्द मार्केजचे आजोबा लिबरल फौजेत कर्नल या हुद्द्यावर होते. ते आयुष्यभर पेन्शनची वाट पाहात होते. २०१६ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पुढाकाराने झालेल्या शांतता कराराची गतही निरलांदियाच्या तहासारखीच झालीय. युनायटेड फ्रूट कंपनीप्रमाणेच अनेक कंपन्यांनी जंगल जमीन बळकावून मूळच्या अमेरिकन निवासींना विस्थापित केलंय. निमलष्करी फौजा, क्रांतिकारक, पोलीस आणि लष्कराच्या अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना अजूनही न्याय मिळालेला नाही. २०१९ ते २०२१ ही दोन वर्षं कोलंबियात अभूतपूर्व आंदोलन उभं राह्यलं. विषमतेच्या विरोधात, सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी. या आंदोलनावर लाठीमार, गोळीबार करण्यात आला. अनेक आंदोलक ठार झाले, काही कायमचे जायबंदी झाले. बोगोटामध्ये एका आंदोलकाच्या पाठीतून एक गोळी आरपार गेली. मानवी हक्कांसाठी झगडणारे कार्यकर्ते त्याची केस लढवत आहेत. त्यांना अजून यश मिळालेलं नाही. 

निरलांदियाच्या तहावर सही करायला जाण्याआधी कर्नल ऑर्लियानो बुएंदा आपल्या तंबूत डॉक्टरला बोलावून घेतो आणि विचारतो माझं हृदय कुठे आहे. टिंक्चर आयोडिनमध्ये बुडवलेला कापसाचा बोळा छातीवरील एका बिंदूवर ठेवून डॉक्टर म्हणतो या ठिकाणी. तहावार सह्या झाल्यानंतर कर्नल तंबूत परत येतो. तह केल्यावर आपली निर्भत्सना होणार आपण कॉन्झर्वेटिवांना विकलो गेलो अशी टीका होणार याची कर्नलला खात्री असते परंतु रक्तपात थांबवण्यासाठी करार गरजेचा आहे असं त्याला मनोमन पटलं होतं. तंबूत परतल्यावर कर्नल आपलं रिव्हॉल्वर काढतो आणि डॉक्टरने जिथे खूण केलेली असते तिथे नळी टेकवून चाप दाबतो. शरीरातल्या कोणत्याही नाजूक अवयवाला स्पर्श न करता गोळी आरपार जाते. कर्नल मरत नाही. डॉक्टर म्हणतो तो माझा मास्टरपीस होता. मी वाचलो याचा मला राग आलेला नाही तर तू मला मूर्ख बनवलंस म्हणून मी चिडलोय, कर्नल डॉक्टरला म्हणतो. 

२०२१ साली बोगोटामध्ये एका तरुण निदर्शकाच्या पाठीतून गोळी आरपार जाते, शरीराच्या कोणत्याही नाजूक भागाला न दुखावता.

छायाचित्रे : सुनील तांबे

Post Tags

Leave a comment