ते १९७७ साल होतं. पालीच्या यात्रेत विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशाफड उभा राहिलेला होता. गणगवळण संपून रंगबाजीला सुरुवात झाली होती. सरदार, सोंगाड्या आणि त्यांचे मित्र तमाशा ठरविण्यासाठी विठाबाईकडे आलेले असतात. ‘तुमचं अगोदर नाचगाणं बघतो अन् मग नंतर तुमचा तमाशा ठरवतो,’ असे सोंगाड्या अंगविक्षेप करत विठाबाईला सांगतो. विठाबाई त्याचे म्हणणे कबूल करते, लगेच एक तारुण्यात पर्दापण केलेली १८/१९ वर्षाची नर्तिका नाचगाण्यासाठी सज्ज होते. वाद्ये वाजू लागतात. ढोलकीच्या ठेक्यावर नर्तिकेनं गिरकी घेऊन गुडघ्यावर नाचायला सुरुवात केली. तो नाच संपल्यानंतर तिने पेटती समई डोक्यावर ठेवली अन् दोन्ही हातात दोन पेटत्या पणत्या घेतल्या. परातीच्या काठावर दोन्ही पाय देऊन उभी राहिली. पेटीमास्तर लहरा वाजवू लागला. ढोलकीवाला त्याला साथ देऊ लागला. सुरत्यांनी टाळ, तुणतुणे वाजवीत सूर तालाचा मेळ साधला. वाद्यसंगीताच्या नादमय वातावरणात नर्तिकेनं नाचायला सुरुवात केली. प्रेक्षकांचा गलबला थांबला. अचंबित होऊन एकटक नजरेने सारेजण रंगमंचाकडे पाहू लागले. नाचरंगात ते रंगून गेले. गुंगून जातील असा नाच ते पहिल्यांदाच पाहत होते. कितीतरी वेळ ते देहभान हरपून बघत होते. नृत्य संपल्यावरच सर्वजण भानावर आले आणि मग त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. कोण हाती ही नर्तिका? काय नावं तिचं? ही नर्तिका आहे विठाबाई नारायणगावकर यांची सुकन्या. तिचं नाव संध्या. तमाशा रसिकांची संध्याताई. वयाच्या अकराव्या वर्षापासून पायात चाळ बांधून ती तमाशाच्या बोर्डावर नाचतेय, वयाची साठी उलटली तरी अजूनही ती नाचतेय आणि पुढेही ती नाचतच राहणार आहे.
संध्याताईला थाळीनृत्य, समईनृत्य कुणीही शिकवलं नाही. ती स्वत:च शिकली. स्वत:च गुरु न् स्वत:च शिष्य. मात्र हे नृत्य शिकण्यासाठी तिला प्रेरणा मिळाली ती एका संगीत बारीतून. दिवस पावसाळ्याचे होते. विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशाफड मराठवाड्यात फिरत होता. यात्रा-जत्रांचा हंगाम संपलेला हाता. तरीपण विठाबाईनं आपला तमाशाफड चालू ठेवलेला होता. ज्या ठिकाणी संगीतबारीचे थिएटर असेल त्याठिकाणी तमाशाचा कार्यक्रम केला जात हाता. फिरत फिरत तमाशाफड उस्मानाबादला आला. तिथे तमाशाफडाचा चार दिवस मुक्काम हाता. रोज रात्री बारा वाजेपर्यंत संगीतबार्यांचे कार्यक्रम व्हायचे अन् त्यानंतर विठाबाईचा तमाशा उभा राहायचा. तो पहाटेपर्यंत चालायचा, चौथ्या दिवशी एका संगीतबारीतील मोहना नावाच्या मुलीने थाळीनृत्य, समईनृत्य सादर केले. त्याला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. टाळ्या वाजवून, पैसे देऊन लोकांनी तिचे कौतुक केले. या कार्यक्रमाला विठाबाई हजर होत्या. त्यांच्याबरोबर मंगला आणि संध्या या त्यांच्या मुलीही होत्या. टाळ्या वाजवून त्यांनीही नृत्य करणार्या मुलीला दाद दिली होती. त्या मुलीचे नृत्य पाहून प्रेक्षक एवढे भारावून गेले होते की थिएटरमध्ये पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट चालू होता. प्रेमाबरोबरच पैशाचाही वर्षाव तिच्यावर चालू होता. हे सारं पाहून विठाबाईलाही वाटलं असं कौतुक आपल्या मुलीच्याही वाट्याला आलं पाहिजे. त्यांनी तिथेच आपल्या मुलींना-मंगलाला आणि संध्याला थाळीनृत्य शिका म्हणून सांगितले. आईच्या म्हणण्याला दोघींनीही होकार दिला.
मराठवाड्याचा दौरा करून तमाशाफड परत नारायणगावला आला. आईच्या सांगण्यानुसार संध्याताईनं परात घेऊन थाळीनृत्याचा सराव सुरू केला. सराव करताना परातीचे काठ पायाला रक्तबंबाळ करू लागले. वेदनेनं जीव हैराण होऊ लागला. हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही म्हणून संध्याताईनं आईला-विठाबाईला सांगितलं:
“आई मला हा डान्स नको. मला नाही जमणार.’’
“का जमणार नाही? ती पोरगी काय आईच्या पोटातून शिकून आली होती का?’’ प्रोत्साहन देत आई म्हणाली,
“अगं संध्या, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. सहजासहजी कला मिळाली असती तर सगळेच कलाकार झाले असते.’’
“हा पाय बघ कसा झालाय माझा.’’ ज्या परातीच्या काठानं जखम झालेला पाय संध्याताईनं आईला दाखवला.
“व्हय दे. तू आता माघार घ्यायची नाहीस. कलेसाठी मरण आलंतरी चालंल. त्या पोरीलासुद्धा सुरुवातीला शिकताना असाच त्रास झाला आसंल. पण ती शिकलीच ना, तू पण शिकायचं. जिद्द सोडायची नाही.’’ आईच्या बोलण्यानं संध्याताईला हुरूप आला. मनातील नकरात्मक विचार तिने झटकून टाकले अन् पुन्हा ती सराव करू लागली. पायांना झालेल्या जखमांना न जुमानता ती नाचू लागली. दिवसामागून दिवस गेले. पहिला आठवडा गेला. दुसराही काळाच्या उदरात गडप झाला. तिसर्या आठवड्याचाही भूतकाळ झाला. अजूनही नृत्य जमत नव्हते. पण तिने जिद्द, चिकाटी सोडली नाही. सरावात खंड पाडला नाही. दिवस रात्र न दमता न थकता तिची नृत्यसाधना सुरू होती. तिच्या मनात-ध्यानात एकच आस. एकच ध्यास. थाळीनृत्य शिकायचं, समईनृत्य शिकायचं. मी कलावंत आहे. कलावंत आईच्या पोटी माझा जन्म झाला आहे. मी माघार घेणार नाही. आईच्या कर्तृत्वाला साजेल अशीच कर्तबगारी करणार, मी शिकणार, होय शिकणारच.
तिला आता थाळी नृत्याचं, समई नृत्याचं वेडच लागलं होतं आणि ती ध्येयपूर्ती करण्यासाठी तिची खडतर तप:श्चर्या अखंडपणे चालू होती. यासाठी किती काळ लागेल याची तिला पर्वा नव्हती. खंत नव्हती. असे किती दिवस आले नि गेले याची तिनं गणतीच केली नाही, परात (थाळी), समई आणि घुंगरं याच विश्वात ती रममाण झाली होती.
थोड्याच दिवसात तिच्या कष्टाला फळ मिळालं. प्रयत्नाला यश मिळालं. तिची नृत्यसाधना सफल झाली. संध्याताई डोक्यावर पेटती समई घेऊन थाळीवर तोल सांभाळीत नाचू लागली. आनंदाला पारावार उरला नाही. मन हरवून गेलं. आनंदानं तेही नाचू लागलं. सुरुवातीच्या व्यथा वेदनांचा आता मागमूसही राहिला नाही. उरला फक्त आनंद आणि आनंदच. आईनं विठाबाईनं लेकीचं संध्याताईचं नृत्यकौशल्य पाहिलं. लेकीचं कौतुक कसं करावं हे सुचेना. त्यांनी प्रेमानं लेकीला गच्च मिठी मारली. पाठ थोपटली. मनातील भावना स्पर्शानंच व्यक्त केल्या. दोघींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले होते.
आता संध्याताई धिटाईनं, धाडसानं तमाशाच्या बोर्डावर नाचू लागली होती. थाळीनृत्य, समईनृत्य बिनधास्तपणे करू लागली होती. तिचं नृत्य संपलं की प्रेक्षकांच्या शिट्या अन् टाळ्यांनी थिएटर दणाणत होतं. ‘वाहवा, लई झकास ‘एकदम बेस्ट’ ‘तिकीटाचे पैसे फिटले आमचे’ अशा कौतुकांच्या शब्दांची उधळण लोक करत होते. लेकीचं लोकांनी केलेलं कौतुक पाहून विठाबाईचा ऊर आनंदानं भरून येत होता. संध्या आपली लेक आहे याचा तिला अभिमान वाटत होता.
संध्याताईचं थाळीनृत्य आणि समईनृत्य बघण्यासाठी लोक तमाशाला गर्दी करू लागले होते. विठाबाईचा तमशा लोकांना आवडत होता. तो आता अधिक आवडू लागला होता. संध्याताईचं नृत्य हे तमाशाफडाचं प्रमुख आकर्षण ठरलं होतं. ते नृत्य पाहिलं की प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फिटायचं.
रमेश माने हे संध्याताईंचे पती. विठाबाईच्या तमाशात ढोलकी वाजविण्याचे काम करत होते. तमाशामध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्ये प्रथमत: त्यांनीच आणली. १९८७ साली संध्याताईनं पतीच्या पाठिंब्याने स्वतंत्र तमाशाफड उभा केला. फडाला नाव दिले, संध्या माने सोलापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ. महाराष्ट्रातील तमाशा रसिकांनी या तमाशाफडाचे मनापासून स्वागत केले. या तमाशा मंडळाने ‘रक्तात न्हाली कुर्हाड’, ‘मी वेश्या पुढार्याची सन’, ‘गरिबांना जगू द्या’, ‘हुंड्याला कायदा आहे का?’ यासारखी दर्जेदार वगनाट्ये सादर करून तमाशा रसिकांच्या मनात आपले स्थान पक्के केले. सलग अकरा वर्षे संध्याताईचा तमाशा सुरळीत चालला होता. तमाशाचा दौर चालू असताना कधी यात्रेतजत्रेत आईच्या कनाती शेजारी कनात लावावी लागायची. तर कधी थोरली बहीण मंगला बनसोडे हिच्या कनातीसमोर कनात लावून तमाशा करण्याची वेळ यायची. एका यात्रेत तर या तिघींचेही तमाशाफड एकाच वेळी लागलेले होते. तमाशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं. पण तिघींच्याही मनात एकमेकींबद्दल शत्रुत्व नव्हतं. वैरत्व नव्हतं. तमाशा संपला की तिघीही एकत्र एकाच ताटात जेवण करायच्या. जेवता जेवता गप्पागोष्टी व्हायच्या, हास्य-विनोद व्हायचा. मनसोक्त हसायच्या, डोळ्यात पाणी आणून एकमेकींचा निरोपही घ्यायच्या.
१७ मे १९९८ हा संध्याताईच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. आयुष्यभर पुरेल एवढं दु:ख काळजावर गोंदून ठेवलं आहे. काळालाही पुसून टाकता येणार नाही अशी ती महाभयानक आठवण आहे. संध्याताईची एक मैत्रीण शिक्षिका आहे. तिच्या मुलाचं लग्न होतं. मुलाच्या लग्नाला आलंच पाहिजे असा मैत्रिणीचा आग्रह होता. तिच्या आग्रहाला मान देऊन संध्याताई वर्हाडाच्या गाडीत बसून लग्नाला चालल्या होत्या. रस्ता मोकळा होता. गाड्यांची फारशी वर्दळ नव्हती. ड्रायव्हर भन्नाट वेगानं गाडी चालवत होता. टेंभुर्णी-मोडलिंबच्या दरम्यान ड्रायव्हरचंं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. वेणेगावाजवळ गाडी उलटीपालटी होऊन खड्ड्यात पडली. तीस ते चाळीस लोक जबर जखमी जाले. दोन महिला जागेवरच ठार झाल्या. अनेकांचे हातपाय मोडले. यातून संध्याताईही सुटल्या नाहीत. त्यांचेही दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. सर्वांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सारेजणच दु:खाने विव्हळत होते, रडत होते.
डॉक्टरने संध्याताईला तपासले. वेदनेनं हैराण झालेल्या संध्याताईला प्रथमत: वेदनाशमक गोळ्या औषधं दिली. शरीराच्या थांबल्या आणि मग मनाच्या वेदना सुरु झाल्या. चैत्र महिना असूनही डोळ्यातून श्रावणसरी झरू लागल्या. पायाचे एक्स रे काढण्यात आले. ते पाहून डॉक्टरने सांगितले पायाची हाडे मोडलेली आहेत. ती जोडली जाणार नाहीत. पायामध्ये रॉड टाकावा लागेल. या निर्णयाचं गळ्यातील हुंदक्यांनी आणि डोळ्यातील आसवांनी स्वागत केलं. मन सुन्न झाले, शब्द मुके झाले.’ पायामध्ये रॉड टाकावा लागेल या वाक्यातील प्रत्येक शब्द म्हणजे काळजावर घणाचा घाव होता. भविष्यकाळ अंध:कारमय झाला होता. प्रश्नांच्या इंगळ्या निर्दयपणे मनावर डंख मारू लागल्या. आता नाचायचं कसं? तमाशाच्या बोर्डावर उभं राहायचं की नाही? तमाशा विश्वातून आपल्याला बाजूला व्हावे लागेल की काय? इथून पुढचं आयुष्य घरी बसून काढायचं की काय? करायचं तरी काय? प्रश्न अनेक होते पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. नृत्याशिवाय नर्तिकेचं जगणं म्हणजे जिवंत असूनही मेल्यासारखंच की, कसं सहन करायचं दु:ख हे!
पायामध्ये रॉड बसवले तरी बरेच दिवस हॉस्पिटलमध्येच रहावे लागले होते. काही दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला. संध्याताई घरी आली. समोर अनेक समस्या उभ्या होत्या. सर्वात महत्त्वाची आर्थिक समस्या होती. पैसा मिळविण्याचं तमाशा हे एकमेव साधन होते. पण तमाशाफड उभा करणे आता शक्य नव्हते. पायाकडे पाहिलं की संध्याताईचं मन सैरभर व्हायचं नि डोळ्यातून नकळतपणे अश्रू गळायचे.
अशा पडत्या काळात आईनं आणि थोरली बहीण मंगलानं आधार दिला. अशी दोन वर्षे गेली. परावलंबी जगण्याचा संध्याताईला कंटाळा आला होता. आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे असा तिला वाटायला लागलं होतं. त्याचेळी आई म्हणाली, ‘संध्या तू अशी बसून राहू नकोस. सुधा चंद्रन कशी पुन्हा उभी राहिली तशी तू उभी राहिली पाहिजेस. तिच्यासारखं नाव कमावलं पाहिजे. सकंटानं खचून जायचं नाही.
“पायात रॉड असताना कसं नाचता येईल.’’ “प्रयत्न कर. हार मानू नकोस.’’ आईच्या सांगण्यानुसार संध्याताईची नृत्यसाधना पुन्हा सुरू झाली. परात (थाळी) समई, घुंगरं यांच्याशी पुन्हा नातं जोडलं गेलं. पुन्हा त्याच व्यथा, वेदना सोबतीला घेऊन संध्याताई नृत्याचा सराव करू लागली. आई तिला प्रोत्साहन देऊ लागली. नाचत रहा, जमेल तुला. तूच हे करून दाखवशील. कष्टाची तयारी ठेव. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आईचा आशीर्वाद, मनाची जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांच्या जोरावर संध्याताईनं थाळीनृत्याची, समई नृत्याची कला पुन्हा अवगत केली. पण आता नाचायचं कुठं? संध्याताईचा तमाशा तर बंद पडलेला. मन तिनं ठरवलं, पुन्हा तमाशाफड उभा करायचा. पण कसा उभा करायचा? त्यासाठी लागणारं भांडवल, लागणारा पैसा कुठे होता तिच्याजवळ. मग त्यासाठी तिने शेठ-सावकारांचे, तमाशा कंत्राटदारांचे उंबरठे झिजवले. सरकार दरबारी खेटे घातले. बँकाचे दरवाजे ठोठावले. पण तिची ओजंळ रिकामीच राहिली. कुणीच सहकार्य केलं नाही. पण आता गप्प बसून चालणार नव्हतं. काहीतरी करणं आवश्यकच होतं. मग संध्याताईनं छोटासा हंगामी तमाशाफड उभा केला चैत्र-वैशाख या दोन महिन्यासाठी. गावच्या यात्रे-जत्रेत जेव्हा संध्याताई थाळीनृत्य-समई नृत्य सादर करते तेव्हा लोकांचा तिला प्रचंड प्रतिसाद मिळतो. केवडा आनंद होतो तिला. प्रेक्षकांच्या शिट्याटाळ्यांनीच तिला जगण्याचं बळ दिलं आहे. १६ सप्टेंबर २०१० साली अल्पशा आजारानं पतीचं निधन झालं. खंबीरपणे पाठिशी उभा राहणारा पतीही काळानं हिरावून नेला. आयुष्यभर संकटाच्या विस्तवावर चालूनही संध्याताई खचल्या नाहीत. त्यांना दोन मुलगे अन् एक मुलगी आहे. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा यासाठी त्यांची धडपड चालू आहे. आपला तंबू कनातीचा तमाशा उभा राहावा हे त्यांचे स्वप्न आहे. कधी ना कधी हे स्वप्न पुरे होईल असे त्यांना वाटते कारण त्यांचा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे.
मी लहानपणी काही वर्ष नारायणगावला राहिले आहे. आणि घरासमोरच्या ओपन एअर थिएटर मधल्या वाळूवर आपापल्या चटयांवर बसून विठाभाऊ नारायणगावकर, लीला गांधी यांचे वग पाहिले आहेत. लेख वाचायला खूप आवडलं.
to be continued with the earlier comment…
नारायणगावकर आणि गांधीं विषयी ऐकिवात असलेल्या विलक्षण गौरवपूर्ण आख्यायिका पुन्हा आठवल्या.
क्रुपया सोपानराव खुडे,यांचा मो.नंबर मिळाला तर पाठवा..
बाबाजी कोरडे, राजगुरूनगर
9730730146
7020302559
नव्या पिढीला अज्ञात अशा अनेक गोष्टी खुडे सर आपण मांडलेल्या आहेत. आपला लोकसाहित्याचा व्यासंग आणि अभ्यास किती खोलीचा आहे याची नव्याने प्रचिती झाली. उपेक्षितांच्या संस्कृती आणि लोककलेवर लिहिताना आपण नेहमीच या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असता , पुढील लेखनप्रपंचासाठी आभाळभर शुभेच्छा….