Skip to content Skip to footer

शिल्पा गुप्ता यांची मुलाखत : टीना मरी मोनेल्योन | मराठी अनुवाद : आशुतोष पोतदार

Discover An Author

  • contemporary Indian artist

    शिल्पा गुप्ता मुंबईत जन्मल्या आणि वाढल्या असून १९९० च्या दशकात त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून फाइन आर्टसमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. गेली दोन दशकं त्या संशोधनावर आधारित सराव आणि मांडणीतून सहभागी, परस्परसंवादी आणि सार्वजनिक परिमाण लाभलेली कला सादर करत आल्या आहेत. लिखित संहिता, रेखाटनं, वस्तू, ध्वनी आणि परस्परसंवादी व्हिडिओ अशा साधनांचा अंतर्भाव करत सीमा-रेषा, सेन्सॉरशिप, समाज किंवा व्यक्तींवर शिक्के मारणं आणि सुरक्षितता अशा विचारांची चिकित्सा याद्वारे शिल्पा आपली सर्जनशील मांडणी करत असतात. त्यांच्या कामाचं प्रदर्शन जगभरातील बिनाले, म्युझियम्स आणि गॅलरीजमधून सातत्यानं होत असतं.

  • Researcher

    टीना मेरी मोनेल्योन या व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस इथं पीएच.डी.साठी संशोधन करत उद्योजकता आणि नवकल्पकता या विषयांवर व्याख्यानं देतात. त्यांनी व्यवस्थापन या विषयात एम.एस्सी. पदवी (युनिव्हर्सिटी ऑफ मॅनहाइम), आधुनिक आणि समकालीन इतिहास (डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई सिटी म्युझियम); तसेच सिद्धांतण, सौंदर्यशास्त्र आणि सराव (ज्ञानप्रवाह, मुंबई) या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा मिळविला आहे.

  • Writer

    आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक आणि संशोधक आहेत. आशुतोष यांच्या नावावर नाटक, कविता संग्रह, भाषांतर तसेच संपादने अशी सात पुस्तके असून ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer of several one-act and full-length plays, poems, and short fiction. He writes in Marathi and English with seven books to his credit. He is Associate Professor of literature and drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art and Performance), FLAME University, Pune. 

फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट : एन्काउंटर्स विथ प्रीझन हे शिल्पा गुप्ता आणि सलील त्रिपाठी यांनी संपादित केलेले पुस्तक ‘वेस्टलँड बुक्स’च्या ‘कॉन्टेक्स्ट’ने २०२२ मध्ये प्रकाशित केले आहे. शिल्पा गुप्ता यांच्या फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट या मांडणी शिल्पाबरोबरचा संवाद, रेखाचित्रे, छायाचित्रे आणि जगभरातील निवडक कवितांचे इंग्रजी अनुवाद यांच्या गुंफणातून साकारलेले हे पुस्तक कवितेतून व्यक्त केला गेलेला प्रतिरोध, कवींच्या धाडसाचा इतिहास आणि त्याची विविध रूपे मांडते. पुस्तकात समाविष्ट असलेल्या शिल्पा गुप्ता यांच्या टीना मरी मनिल्योन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा मराठी अनुवाद.

टीना मरी मनिल्योन: कलाकार आणि लेखकांचे आवाज दडपले जातात त्याबद्दलचा ‘फॉर, इन युवर टंग, आय कॅनॉट फिट’ हा तुझा ध्वनी- कला मांडणी शिल्प प्रकल्प आहे. तुला हा प्रकल्प का करावासा वाटला?

शिल्पा गुप्ता: पंधरा वर्षांपूर्वी कला क्षेत्रात नुकतीच स्थिरावत होते. ‘न्यू मीडिया आर्टिस्ट’, ‘स्त्री-कलाकार’ किंवा ‘तरुण कलाकार’ – अशी जी काही होते – तेव्हा कुठल्याही प्रकारची वर्गवारी मला मान्य नव्हती. त्यावेळेस, वर्गवारीकडेपलीकडे जाण्याच्या प्रयत्नांतून मी एक संशोधन प्रकल्प हाती घेतला आणि त्याला नाव दिले : ‘समवन एल्स.’ लिंग आणि भाषाधारित भेद किंवा राजकीय कारणापायी कलाकारांबद्दल पूर्वग्रह करून घेऊन त्यांच्यावर जे अपेक्षांचे ओझे लादले जाते; अशा ओझ्यातून स्वतःची सुटका करून घेण्याच्या इराद्याने निनावी किंवा टोपणनावाने लिहिल्या गेलेल्या शंभर पुस्तकांवर आधारित उभारलेला ‘समवन एल्स’ हा प्रकल्प होता. २०११ मध्ये या प्रकल्पाची मांडणी करून झाल्यावर वाटलं, चला झालं काम. पण, काम करताना बऱ्याच थक्क करून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्या डोक्यात पिंगा घालत राहिल्या. उदाहरणार्थ, जॉर्ज ऑरवेल आणि अगदी मला आवडणाऱ्या मुन्शी प्रेमचंदांसारख्या लेखकांनासुद्धा कायद्याला आणि पोलिसांना सामोरे जावे लागले होते. काम सुरू करेपर्यंत, प्रेमचंदांची पुस्तके जाळली गेली होती आणि त्यांच्यावर एकदा देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता, याबद्दल मला ठाऊक नव्हते. खरंतर, अगदी अलीकडेपर्यंत माझ्यासारख्या बऱ्याच जणांना वाटायचं, की ‘देशद्रोह’ हा शब्दच आपल्या वापरातून गेलाय. उजव्या विचारसरणीच्या कडवट लोकांनी तुर्किश लेखक अझीझ नेसीनना ज्या भयानक आणि हिंसक मार्गानं  विरोध केला याबद्दल किंवा फ्रेंच लेखक व्हॉल्टेअर यांच्या तुरुंगवासाबद्दल मी या काळात वाचून घेतलं. मग, ज्यांच्या प्रातिभ शब्दांमुळे समाज अस्वस्थ होऊ शकतो त्या लेखकांना डांबून टाकले जाते अशी जगभरातील उदाहरणे मी गोळा करायला सुरुवात केली होती. नंतर ते मागं पडलं. कारण, आपली आडनावं बदलली आहेत अशा शंभर जणांबद्दलच्या ‘अल्टर्ड इन्हेरिटन्स’ या छायाचित्र-कथनाच्या नव्या प्रकल्पात मी अडकून गेले. 

टीना मरी मनिल्योन: सामाजिक आणि राज्यव्यवस्थेच्या अनियंत्रित सत्तेला आव्हान देणारे व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा एखाद्या व्यक्तीने निरंकुश सत्ता गाजवत राहणं असे विषय तुझ्या कामात परत परत येताना दिसतात. याबद्दल तू काय सांगशील?

शिल्पा गुप्ता: स्वतःच्या इच्छा-आकांक्षा प्रकट करताना लोक व्यवस्थेतून कसा मार्ग काढतात हे समजून घ्यायला मला आवडतं. सत्ताधिकाऱ्यांच्या अधिकृत जाहीरनाम्यांना उलथवून टाकण्यासाठी ‘वापरून झाल्यावर याची कृपया विल्हेवाट लावा’ असे छापलेले शिक्के (अनटायटल्ड १९९५-९६) आणि ‘इथे सीमारेषा नाहीत’ अशा सूचनांच्या काळ्या-पिवळ्या रंगांच्या चिकटपट्या मी माझ्या कामात वापरल्या. आपलं जग आपण कसं रचतो आणि त्यात राहतो हे समजून घेण्यासाठी मी माझी साधनं गोळा करत राहते. उदाहरणार्थ, २००१ मध्ये, स्त्रियांच्या मासिक पाळी-दरम्यान स्रवणाऱ्या रक्ताच्या डागांची कापडं माझ्या नव्या मांडणी-शिल्पासाठी गोळा केली होती. शिल्प पाहणाऱ्याला मुद्दाम सांगेपर्यंत कसले कापड हे कळायचे नाही. लोकांनी स्वतःच्या हातांनी रेखाटलेले पण अधिकृत सरकारी नकाशाशी मिळते जुळते नसणारे नकाशे मी गोळा केले. ज्या-ज्या सीमा प्रदेशात मी फिरले तिथं राज्यांच्या सीमारेषा आणि नैतिकता अंधुक होत जाताना मला दिसायच्या. २०१६ मध्ये, काही सीमा-परिसरात उभारलेल्या तपासणी नाक्यांच्या आसपास वाढलेल्या गांजातली रंगद्रव्यं वापरून मी रेखाचित्रं केली. आपल्याला दिसत असतं, की एखादी व्यवस्था आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण राहतो त्या जागेचे नकाशे तयार करते,  ज्या परिसराचे आपण भाग आहोत त्याचे आलेख तयार करते, त्यावर आधारलेली श्रेणीबद्ध सारणी तयार करते आणि मग सगळ्याचे वर्गीकरण करण्याची व्यवस्था उभी करत जाते. अर्थात, या सगळ्याला मग लोकही भिडत राहतात. मग, त्यात काही जण वेषांतर करून त्यातून सुटतात आणि काही जण घुसखोरी करतात. तर काही गोफणीच्या दगडासारखे त्याबाहेर, वर फेकले जातात!

टीना मरी मनिल्योन: आणि मग तू कवींकडे कशी वळलीस?

शिल्पा गुप्ता: काही वर्षांपूर्वी, मुंबई पोएट्री फेस्टिव्हलमधल्या आपल्या बीजभाषणात सलील चौधरीनी तग धरून राहण्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. ते भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली नव्हती. पण ईमेलनं ते भाषण माझ्यापर्यंत आलं होतं. सलीलच्या त्या भाषणानं मला आतून हलवून टाकलं होतं. तग धरून राहण्यातून आणि भाषेतील विभवांद्वारे कविता आपल्यापर्यंत परत कशी जाऊन पोहोचते याबद्दल सलील अगदी आतून बोलला होता. सत्यालाच आव्हान देत आपल्यामधली जी कार्यकारी ऊर्जा आहे तिच्यावर बळजबरी तिलाच आज गोठवलं जातंय त्या काळात मला सलीलचं म्हणणं महत्त्वाचं वाटतं. तेव्हा लेखक आणि पत्रकारांना कसं अडकवलं जातं याचा अभ्यास करायला मी नुकतीच सुरुवात केली होती. सलीलच्या भाषणानंतर त्या प्रकल्पानं एक  वेगळी दिशा पकडली आणि मला नवा मार्ग दिसला. आठव्या शतकातील अबू नुवास या अरेबिक कवीनं सुरुवात करत, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध प्रांतांत ज्या-ज्या कवींनी स्वतःला आणि सत्ताधिकाऱ्यांना सत्य सांगण्यासाठी जाणते-अजाणतेपणानं स्वतःला धोक्यात घातलं अशांचा शोध मी घेऊ लागले. हे मी सगळं करत होते आणि वेगानं बदलत चाललेल्या भारतात उदारमतवादाचं असणं हाच एक इलजाम मानला जाऊ लागला होता. लेखक आणि सिनेमा करणारे कलाकार सत्ताधाऱ्यांना खुपत होते. अशा वातावरणात माझं काम सत्तेच्या विरुद्ध जाणारं ठरणार होतं. याच काळात मधुश्री दत्ता या माझ्या मैत्रिणीने तिच्या फिल्मसाठी मिळालेलं राष्ट्रीय पारितोषिक परत केलं आणि राज्यव्यवस्था पसरवत असलेल्या द्वेषभावनेचा निषेध करण्याच्या आंदोलनात तीसुद्धा सामील झाली. जगभरात ज्या-ज्या कवींनी आणि कार्यकर्त्यांनी कविता लिहिल्या आणि सरकारला अस्वस्थ केलं त्याबद्दल मी काम करू लागले.

टीना मरी मनिल्योन: ध्वनि-कला मांडणी शिल्पाच्या आगळ्या-वेगळ्या शीर्षकाबद्दल सांग. कसं सुचलं हे शीर्षक?

शिल्पा गुप्ता: ‘फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट’ या ध्वनि-मांडणी शिल्पाचं शीर्षक मी चौदाव्या शतकातील अझरबैजनी कवी नेसीमीच्या कवितेतून घेतलं आहे. कवी लिहितात: “बोथ वर्ल्ड्स कॅन फिट विदिन मी, बट इन धिस वर्ल्ड आय कॅनॉट फिट.’ जी भाषा खरंतर माणसानं जगाशी साधलेला पहिला दुवा असतो, तीच अभिव्यक्तीचं रूप म्हणून एकतंत्री संरचनेच्या कचाट्यात कशी सापडते याबद्दल मला या मांडणी शिल्पातून व्यक्त व्हायचं आहे. इतर लेखक आणि कलाकारांप्रमाणं कवीदेखील स्वप्नं पाहात असतात आणि जगताना आलेल्या भयाण अनुभवांबद्दल बोलत असतात. कवीचं आपल्याला घडवणाऱ्या श्रद्धा आणि स्वप्नांना धरून ठेवणं याबद्दल माझं मांडणी-शिल्प आहे. 

टीना मरी मनिल्योन: ‘फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट’ या पुस्तकातील रेखाटनात काही भाग वगळून तू तिथं रिक्त जागा ठेवल्या आहेस त्याबद्दल सांग. 

शिल्पा गुप्ता: कवींच्या आयुष्यातील छायाचित्रांच्या ‘ट्रेसिंग्ज’वरून मी रेखाटनं केली आहेत. काही छायाचित्रं कवींना ज्या वेळेला अटक झाली त्या क्षणांची आहेत, तर काही जिथून त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढलं गेलं त्या त्यांच्या घरांची किंवा शहरांची आहेत. यामध्ये, दारिन तातुर या पॅलेस्टिनियन कवयित्रीला तिच्याच घरात ‘बंदिस्त’ करून ठेवलं होतं, त्याची छायाचित्रं वापरली आहेत. काही छायाचित्रं कवींच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांनाही अडकवलं गेलं त्याची आहेत. मांडणी शिल्पासाठी रेखाटनं करताना माणसांची शरीरं जागोजागी मी ‘मिसिंग’ दाखवली आहेत. कारण ‘नसण्या’तून मला त्यांचं असणं दाखवायचं आहे. नेसेट या इस्रायली पार्लमेंटमधून बाहेर काढल्या गेलेल्या सदस्यांबद्दलची रेखाटनं मी अनटायटल्ड (२०१६) या मालिकेत केली होती. त्याचाच विस्तार ‘फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट’ या मांडणी-शिल्पात मी केलाय. त्याच्याही आधी, ‘नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड’ या २०१३-१४ मधल्या कामात आपल्या सिक्युरिटी फॉर्सेसनी निष्पाप जिवांचा बळी घेतल्याची पार्लमेंटमधली चर्चाच शासकीय रेकॉर्डमधून काढून टाकली होती, याबद्दलची मांडणी केली होती. त्या मांडणीबरोबर ‘फॉर इन युअर टंग..’ चं नातं आहे. जे कोणी आपल्यावर टीका करतं त्यांना अटक करायची या प्रवृत्तीबद्दलची ही मांडणी-शिल्पं आहेत. असं आहे, की कितीही माणसांची शरीरं गायब गेली, शब्द निसटले तरी त्यांचे पडसाद ऐकू येत राहतातच! 

टीना मरी मनिल्योन: पुस्तकातल्या कवितांबद्दल काय सांगशील?

शिल्पा गुप्ता: आपल्या मनात जी कविता असते ती दुभंगलेली; पण गर्भितार्थ मांडणारी आणि एखाद्याच्या अगदी जवळची असू शकते. अभिरुचीची वेगवेगळी रूपं पहिली, तर त्यात कविता अधिक वळणदार असते असं मला वाटतं. तसं तर कविता कमीत कमी वेळेला आपल्या समोर येत असते. म्हणजे, इतर लेखक आणि कलाकारांच्या तुलनेनं कवी आणि त्यांच्या कवितेला वर्तमानपत्रात क्वचित जागा मिळते. पुस्तकाच्या दुकानात मांडलेले कवितासंग्रह पाहायला मिळणं दुर्मीळ होत चाललेले आहे. एखाद्या कवितेच्या पुस्तकाची बांधणी एखाद्या इंचापेक्षा जास्त नसते. नेहमीप्रमाणं, मी प्रश्न विचारत गेले तशी काही उत्तरं मिळाली. अर्थात, जी काही उत्तरं मिळाली त्यातून नवीनच प्रश्न उभे राहिले. कवी असणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते असूनही कविता करणारे कवी मी शोधत गेले. त्याचबरोबर, कवींनी स्वतःला आणि त्यांच्यावर जीव असणाऱ्यांना धोक्यात टाकून ज्या-ज्या वेळी स्वतःला व्यक्त केलं आहे, अशा क्षणांचा मी मागोवा घेत गेले. जसजसे कवींचे आवाज शोधत गेले तसतसं जाणवलं, की आपल्याला माहितीही नाही अशा ठिकाणी कवी आणि त्यांची कविता पोहोचली आहे. 

टीना मरी मनिल्योन: अभिव्यक्ती-स्वातंत्र्य हा प्रश्न तुझ्यासाठी नवा नाही.. 

शिल्पा गुप्ता: खरंय. सुरुवातीपासून माझ्या कामातून अभिव्यक्ती, सत्ता आणि माणसाला वाटणारं भय यामधल्या नात्यांकडं पाहात आलेय. पकडून ठेवण्यासाठी, हक्क सांगण्यासाठी, एखाद्याला वश करून सत्तेत टिकून राहण्यासाठी सत्ताधारी एखादं नामकरण करतात किंवा दोषारोप करून निर्बंध घालत असतात.  सत्ताधीशांना  स्वतःसाठी स्वातंत्र्य आणि निश्चितता हवी असते; पण हे सारं त्यांना इतरांना द्यायचं नसतं. सत्ता एखाद्याला मृत्यूची सतत आठवण करून देत राहते आणि म्हणून आपण एखाद्या सत्तेनं केलेल्या हत्या शांतपणे पाहात राहतो. सत्ताकारण इतिहासावर हल्ला करतं (धावा बोलतं – हे हिंदी आहे) आणि पुस्तकं नाहिशी करतं तेव्हा आपण मूग गिळून बसतो. सत्तेविरुद्ध जे  आवाज उठवतात त्यांचं हसं उडवलं जातं, त्यांची दिशाभूल झाली आहे अशी जाहिरात केली जाते आणि त्यांना कटकारस्थानी ठरवलं जातं. ट्रोल्स आणि बॉट्सना त्यांच्याविरुद्ध मोकाट सोडून त्यांना त्रास दिला जातो. लोकांचं लक्ष विचलित करून त्यांना गोंधळात टाकलं जातं. २००५ मध्ये मी ‘व्हाइल आय स्लीप’ हे मांडणी-शिल्प करत होते, तेव्हा नाओम चॉम्स्की यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेला, चोम्स्की म्हणाले होते, की सर्वेक्षणातून बहुतेकजणांना शांतता हवी आहे हे स्पष्ट झालेय. ते मी लक्षात ठेवलं होतं.  पण आज आपण अशा जागी राहतोय जी जागा फक्त काहीच जणांच्या ताब्यात आहे आणि तेच सर्वांत जास्त ओरडतात, कर्कश्शपणे, आणि दुसऱ्याच्या मतांवरही आपला अधिकार सांगतात. म्हणून मला एकशेनव्याण्णवांचा – अनेकांचा, सामूहिक आवाज उभा करायचाय जो ‘फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट’ या मांडणी-शिल्पासाठी आणि पुस्तकासाठी निवडलेल्या कवींचा – समाजाच्या पोटातून ऐकू येणारा – प्रतिध्वनी आहे.

टीना मरी मनिल्योन: ..म्हणजे हा सामूहिक आवाज बहुजनांचा आहे?

शिल्पा गुप्ता: भारतातल्या विशाल अशा ‘असणे’पणाच्या तीव्र संवेदनांचा हा आवाज आहे. चर्चगेट स्टेशनवर लोकलमधून उतरताना किंवा एखाद्या दाटीवाटीच्या बाजारपेठेत चालत असताना ज्या वेगवेगळ्या भाषा आणि बोलींची बहुविध कंपनं आपल्याला जाणवतात ती या आवाजातून ऐकू येतील. म्हणून, हे मांडणी-शिल्प आणि पुस्तक वाचल्यानंतर अनेकविध भाषा आणि संहिता तुमच्या अवतीभवती असतील; जिथं काहीतरी माहिती नसणं हा नवं माहित करून घेण्याचाच भाग असेल. 

प्रतिमा: फॉर इन युअर टंग, आय कॅनॉट फिट या मांडणी शिल्पातील कलाकृती.
छायाचित्रे: पॅट वरब्रगन, जॉनी बॅरिंग्टन, फाखरीया मामदोवा 

Photograph courtesy: Pat Verbruggen, Johnny Barrington, Fakhriyya Mammadova

Post Tags

Leave a comment