Skip to content Skip to footer

स्थलांतर: सागर कांबळे

Discover An Author

  • Faculty

    सागर कांबळे स प महाविद्यालय पुणे येथे राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन.

    Sagar Kamble is a faculty of Political Science at S P College, Pune.

Rajib Chowdhury, Blossoms in the Ruin I, 2019

वडापवाला

मी हातावरचं पोट असलेला वडाप ड्रायव्हर असतो
गुटखा चघळत पोरीबायांना डोळ्यांनी चाचपडणारा वासनांध बुवा असतो
रास्ता रोको करणारा शेतकरी असतो
पानटपरीवाल्याला मारणारा डॉन असतो

माझ्या गाडीत अधुनमधून प्रवास करणारी
ती मॅडम कोण असते ?
तिच्या वडाम डॉक्टरसोबतच्या अफेअरची बरीच चर्चा चालू असते
ती वाडीतल्या बनसोडेच्या पोराला
भाषण शिकवणारी गुरू असते
घरकाम करणाऱ्या शालूआक्काला नि तिच्या पोरीला राबवून घेणारी मालकीण असते


वडाम डॉक्टर डॉक्टरणीचा नवरा असतो
वर्षातून एकदा वारी करणारा माऊली असतो
आईची सेवा करणारा आदर्श मुलगा असतो
त्याचा धाकटा भाऊ, माझा वर्गमित्र

तो आदर्श मुलगा नसतो
तो कायमचा शहरवासीय असतो
फेसबुकवर दिसतो, राजकारणाचा भाष्यकार वाटतो
मॉल्स, सिनेमा,गोवा-तारकली बीच इथले फोटो टाकत असतो
म्हणजे तसा तो आदर्श नवरा असतो

शालूआक्का आदर्श बायको असू शकेल का ?
तिची पोरगी कोण असते ? विद्यार्थी असते का ?
ती कायम शाळेला दांड्या मारत असते
आमच्या वडापलानईची पोरं तिच्याकडून
तिकिटाचं पैसे घेत नाहीत
ती तशी फेमस असते
गणपती, शिवजयंती, भिमजयंती सगळ्यात डांस करते
म्हणजे ती स्वतंत्र असते

बनसोडेचं पोरगं जयंती-मयंतीत जात नाही
पोरगं त्याच्या शब्दात असतं
बनसोडे आदर्श बाप असतो
त्याचं पोरगं सगळ्या शिक्षकांच्या आवडीचं असतं
म्हणजे ते आनंदी असतं

बनसोडेचं पोरगं, शालूआक्काची पोरगी, त्यांची मॅडम
यांचा मी वडापवाला असतो

***

स्थलांतर

माणसाने स्थलांतरीत व्हावं पुन्हा पुन्हा.
बुडाला चिकटलेली माती कवटाळून बसू नये
सदासर्वकाळ
घर-दार, वाड्या-वस्त्या
माझं माझं म्हणू नये
खानदानाच्या परंपरेच्या पांदीला ओलांडून
प्रवेश करावा वेगळ्या क्षेत्रात

कोल्हापूरवाल्यांनी दिब्रुगडला जाऊन राहावं
पुणेकरांनी मेळघाटात जगून बघावं
लडाखच्या लोकांनी तिरुअनंतपुरममध्ये पोहचावं
यमुनेच्या घाटावरुन थेट टोकियोला जावं
लॉस एंजिलसमधून नायजेरिया गाठावा
रंगीबेरंगी करुन टाकाव सारं दक्षिणोत्तर विश्व
उगाचच गल्लीला, पेठेला कवटाळून बसून टेबललॅम्पखाली विश्वव्यापी बौद्धिक मैथून करण्यात काय अर्थ आहे

उद्योगपतींनी पत्र्याखाली झोपावं
शेतकऱ्यानं संसदेत बोलावं
चित्रकारानं राज्यशास्त्राच्या कार्यशाळेत
पेपर प्रेझेंटेशन करावं

शेंडीवाल्यांनी दाढी राखावी
दाढीवाल्यांनी काटपदराची साडी नेसावी
साडीवाल्यांनी कुत्र्याला पाळण्यात झोपवावं; भूताखेतांशी मुलांना खेळवावं
त्यांना समजावून सांगावं,
हे घर-दार, वाड्या-वस्त्या तुमच्या नाहीतच
तुमचं जे काय आहे ते तुमचं तुम्ही शोधा, निर्माण करा इथं थांबू नका सर्वकाळ,
तुम्ही जा

माणसाला केव्हाही स्थलांतरीत होता आलं पाहीजे माणसाला गोष्टी सोडून देता आल्या पाहीजेत.

***

ईडन गार्डन

मला उन्हापावसात भिजायचं होतं तुझ्यासोबत जगभर भटकत
त्वचेची ऊब, कपड्यांचा सुवास आणि
डोळ्यांत ओलावा घेऊन.

धुंडाळायचे होते बुद्ध, जिब्रानचे रस्ते
दुःख सोडून देणारे, कवटाळणारे

रंकाळ्याच्या तलावात पाय बुडवल्यावर आपल्याला दिसायची अर्धी झगमगाट
तिच्याखाली टाकायची होती टपरी
ग्रेस, आरती, अनिल सोबत संध्याकाळचा चहा प्यायचा होता

मार्क्स, नीत्शे, फ्रॉईड सोबत वाद घालायचा होता
विद्यापीठात आपल्या ग्रुपमध्ये बोलवून

ढसाळ, सुर्वे, तुकारामा सोबत भाकरी खायची होती
तू थापलेली, मी भाजलेली.

तुला सावित्री व्हायचं होतं
मला ज्याँ पॉल सार्त्र.

बरे केलेस.
तू मला घराबाहेर काढलेस
उन्हापावसात मला भिजता येईल
आकाशाखाली निजायला थंडीमुळे गोची होती,
टागोरांसारख्या दाढीबरोबर अंगावरचे केसही वाढवेन मी अँडमसारखे.
राहता राहिले जंगलातले निबीड अंधारी भय,
ते आत्ताच क्षुल्लक झाले आहे
ईडन गार्डनमध्ये आल्याबरोबर.

***

अशांतता

खोलवर अशांतता घुमत आहे
कुणी घर पोखरतंय धीम्या गतीने

वावटळाच्या चिन्हांनी काही फरक पडत नाही
पाने गळाली आहेत अकाली

सुटा सुटा वळवाचा पाऊस पडत आहे
भरलेल्या ढगातून संततधार होणार नाही

पाऊलवाट भयावह एकटीच आहे
श्वासांना मारवा राग गाता येतो

पक्ष्याने युद्ध छेडले आहे
झाड घरटं सांभाळून आहे

बैराग्याची काठी धुळीनं माखली आहे
मला शेवट कळून चुकला आहे

***

चिलखत

जन्मजात आडदांड शरीर लाभलं नाही
व्यायामानं पीळदार बनवायला पाहिलं
व्यायामात सातत्य नाही
‘लढा किंवा पळा’ च्या रणात
तिसरा मार्ग दुष्कर

एक चिलखत चढवलं
घट्ट झालं शरीराला,
त्वचेला आवरण

आवरण ढिलं झालं
आतल्या आघातानं

पुन्हा रणात प्रवेश
चिलखत काढून ठेवलंय दुबळ्या छातीवरचं
घावात सातत्य आहे.

***

काळ

आपल्याला विभक्त करणारा हा काळ
तुला माझ्यापासुन
मला तुझ्यापासून, स्वतःपासुन

तुझ्याकडे त्याज्या भाज्या आहेत
कोंबडीची अंडी, वासाचा तांदूळ,
सारवलेलं अंगण

हे सगळ भोगायला सोबत नाही

मला सिनेमा आहे, पुस्तकं आहेत
ट्रैफिक, ऑफिस, अभ्यास
गुंतवून ठेवणारं सगळं सगळं आहे

विसाव्याला तू नाहीस

त्याग कुणी कशाचा करायचा,
गुंतवणाऱ्या गोष्टींचा की प्रसन्नतेचा ?

***

शाई

शाईचा वास आणि त्याहूनही चव
अतिशय कडवट असते
सुगंधित पेन वापरून पाहिलेत तीन-चार, पण
चव कडूच राहते शाईची

अक्षर वळणदार आहे
लेखणात व्याकरण-शुद्धता आहे, किंवा
अक्षर वळण्दार नाही, सुद्ध नाही.
काहीही असो;
शाईचा कडवटपणाच सत्य.

खाडाखोड संपवून लिहलेल्या कविता
सुकल्यावर
कडवटपणा कमी होत जातो,
छापल्यावर
नाहीसा होतो.

ओलाशार कडवटपणा टिकवायचा तर
जशी ओल याच्या मनात आली
तशी तुझ्या-माझ्या मनात स्रवली पाहिजे.
कविता जिवंत राहिल-
चिरंतन;
कडवटपणासह.

***

अल्फा-ओमेगा

आपली पहिली भेट आठवत नाही
तू घरातच भेटलास मात्र
कळायला लागत असताना
तू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलं
मग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधून
आपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा

एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलास
भारत भाग्यविधातातील सूर,
तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलास
बोधिसत्व प्रियदर्शी राजा
कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरून
तुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले

मग मी परदेशी गेलो
सारे इझम पांघरून पाहिले
तुझ्यापासून सुटलो असं वाटलं
ठेच लागल्यावर तूच आठवलास
इतका तू रक्तात भिनलास

मी खूपदा
जावू पाहतो लांब तुझ्यापासून
व्यक्तिवादाच्या उत्सवात
कधी मौनात, आत्मचिंतनात
कृतज्ञतेतून तिथेही तू उचंबळून वर येतोस

प्रियेशी गुजगोष्टी करताना
आईच्या मांडीवर निजताना
रस्त्यात भिडताना
स्टेजवर नडताना
अश्रू पुसताना
झाडाला बिलगताना
तू तिथेही सोबत असतोस

मला विश्वनिर्मितीचे ज्ञान नाही
पण
माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस
(अल्फा-ओमेगा : सुरुवात आणि शेवट)

Post Tags

11 Comments

  • शोभा चा पोर्गा
    Posted 14 मे , 2020 at 1:47 pm

    भन्नाट कविता आहेत सागर.

    …माणसाला स्थलांतरित होता आलं पाहिजे, …मला शेवट कळून चुकलं आहे, …घावात सातत्य आहे, …ईडन गार्डन मध्ये आल्याबरोबर, यांसारखा कवितांचा शेवट संपूर्ण कवितेलाच वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो, अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.

    • दागो.काळे
      Posted 14 मे , 2020 at 4:39 pm

      सागर कांबळे यांच्या कविता पहिल्यांदाच वाचतो आहे.त्याला त्यांच्या अस्सल अनुभवाची दुखरी पण बेडर सल आहे.तो आपलेपणातून व्यवस्थेचा विचार करतो.त्याला अवस्थातंराची सृजनात्मक बाजू जशी माहिती आहे,तशी विध्वंस आणि विषादाची बाजूही माहिती आहे.आपल्यात वाढत चाललेला वखवखलेला पुरुषही त्याला जाणवतो आहे.हे शेवटी कशातून येत असतं ? याची उकलही करण्याचा प्रयत्न तो करतो.त्यासाठी महापुरुषही त्याला आठवतात.आणि सगळीकडून कोंडी करणारी व्यवस्थाही.सागर यांना शुभेच्छा !! । । दागो.काळे । ।

      • Sagar
        Posted 17 जून , 2020 at 8:44 am

        खूप धन्यवाद सर

    • Sagar
      Posted 20 जून , 2020 at 3:03 pm

      थँक्स

  • poonam sonawane
    Posted 14 मे , 2020 at 4:24 pm

    The poem shai is highly amazing, and as i scrolled down i got with new title migration is commendable…
    keep going n sharing as wel
    its rare to see the poets holding all the aspects tht a real poet acquire…
    all the best fr upcoming one

  • Dinkar Manwar
    Posted 14 मे , 2020 at 5:40 pm

    एकूण सगळ्या कविता आवडल्या. कवितेतील विश्व सामान्यांचे असूनही कविता सगळ्यांची वाटते.

  • Suyog deshapnde
    Posted 15 मे , 2020 at 12:58 pm

    आवडल्या कविता

  • Pooja Dhawale
    Posted 29 मे , 2021 at 11:28 pm

    सागर, तुझ्या कविता खूप खोल आहेत…
    सगळ्याच कविता आवडल्या. लिखाणाची तुझी ही स्टाईल वेगळीच आहे… मला जाम आवडली.
    Thank u

Leave a comment