Skip to content Skip to footer

“मी डोळे अचूक दाखवतो” : रोहन चक्रवर्तींशी संवाद : पल्लवी सिंह | मराठी अनुवाद : प्रिया साठे 

Discover An Author

  • Cartoonist and Illustrator

    Rohan Chakravarty is a cartoonist, illustrator and the creator of Green Humour, a series of cartoons, comics and illustrations on wildlife and nature conservation. Cartoons from Green Humour appear periodically in newspaper columns, magazines and journals, and have been used for several projects and campaigns on wildlife awareness and climate change. Rohan is also the author of nine books and has won awards by UNDP, Sanctuary Asia, WWF International, the Royal Bank of Scotland and Bangalore Literature Festival for his work. He is notorious for rolling up into a ball like a pangolin to avoid answering the phone or meeting people.



    रोहन चक्रवर्ती हे चित्रकार आहेत. ते वन्यजीव तसेच निसर्गसंवर्धन यांवर आधारित चित्रे, कॉमिक्स रेखाटतात. ते चित्रांच्या ग्रीन ह्यूमर (Green Humour) ह्या मालिकेचे निर्माते आहेत. ग्रीन ह्यूमरमधील व्यंगचित्रे विविध नियतकालिकांमधून नियमित प्रकाशित होतात. तसेच, त्यांच्या कॉमिक्सचा वापर वन्यजीवविषयक जागरूकता आणि हवामानबदल यांविषयीच्या अनेक प्रकल्पांमध्ये व मोहिमांमध्ये करण्यात आला आहे. रोहन हे नऊ पुस्तकांचे लेखक देखील आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना यूएनडीपी, सँक्चुअरी एशिया, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनॅशनल, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, आणि बेंगळुरू साहित्य-महोत्सव ह्यांच्याकडून पुरस्कार मिळाले आहेत. दूरध्वनीवर बोलणे किंवा लोकांना भेटणे ह्यांपासून स्वतःचा बचाव करून घेण्याकरिता खवल्या मांजरासारखे स्वतःला आत गुंडाळून घेण्यासाठी ते (कु)प्रसिद्ध आहेत.

  • Writer and Researcher

    Pallavi Singh is an independent researcher and writer from Noida, India. She has published ecocritical and literary essays in journals and presented at international conferences, including Dublin City University and IIT Dhanbad. She is also the founder of Literature and Criticism, an educational platform simplifying literary theory for students.

  • अनुवादक आणि लेखक

    प्रिया साठे ह्या लेखक आहेत. त्यांना चित्रपटांची परीक्षणे आणि कथा लिहायला आवडतात. प्रिया ह्यांच्या काही कथा 'माहेर', 'साप्ताहिक सकाळ' इत्यादी नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. तसेच त्यांनी, जलरंग-चित्रकार मिलिंद मुळीक ह्यांच्या दोन पुस्तकांचे इंग्रजी शब्दांकन केले आहे. प्रिया ह्यांची ‘Wovenfeelings’ ह्या नावाची इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कवितांची अनुदिनी (ब्लॉग) आहे.

पुस्तकांच्या दुकानात पर्यावरणावरची पुस्तकं चाळत मी अगदी सहज फिरत होते, तेव्हा ‘रोहन चक्रवर्ती’ हे नाव पहिल्यांदा नजरेस पडलं. त्यांचं पगमार्क्स अँड कार्बन फुटप्रिंट्स हे पुस्तक इतर जड-जड शीर्षकांच्या पुस्तकांमध्ये उठून दिसलं होतं, हे आजही स्पष्टपणे आठवतं. मी हा कॉमिक्सचा संग्रह घेतला तेव्हा मला जराही कल्पना नव्हती की रोहन चक्रवर्ती माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक होतील. प्राणी/सजीव आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास यांबद्दल जनजागृती आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी कॉमिक्स किती ताकदीचं माध्यम ठरू शकतं, याबद्दल माझा दृष्टिकोनही त्या पुस्तकानं पूर्णपणे बदलून टाकला.

रोहन चक्रवर्तींनी दंतशास्त्राचं शिक्षण घेतलं, आणि चार वर्षं ते अ‍ॅनिमेटर म्हणून काम करत होते. पण नागझिरा वन्यजीव अभयारण्यात एका वाघिणीशी अचानक झालेल्या भेटीनंतर त्यांनी सगळं सोडून ग्रीन ह्यूमर नावाची व्यंगचित्रांची मालिका सुरू केली. २०१३मध्ये ही मालिका गोकॉमिक्सवर प्रसिद्ध झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वितरित होणारी पहिली भारतीय कॉमिक स्ट्रिप ठरली. आज ग्रीन ह्यूमर हा वन्यजीव, त्यांचे नैसर्गिक अधिवास, त्यांचा नाश, संवर्धन आणि त्यातल्या बारकावे यांवर आधारित इंटरनेटवरचा सर्वांत मोठा संग्रह आहे.

माझ्यामते, रोहन चक्रवर्तींची व्यंगचित्रं माहिती, विनोद आणि त्याच प्रमाणात तीव्र पण प्रभावी जागरूकता यांचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत. ‘परतणे’ या बहुआयामी संकल्पनेला समोर ठेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळणं हा मी माझा विशेष सन्मान समजते. हा अनुभव मी आयुष्यभर मनात जपून ठेवीन.

पल्लवी सिंह : ग्रीन ह्यूमर ह्या मालिकेतल्या तुमच्या पहिल्याच व्यंगचित्रापासून आपण सुरुवात करू या का ? ते तुम्ही कसं साकारलं?

रोहन चक्रवर्ती : हे सांगायला मला, खरं तर, कसंतरी वाटतंय. मला आठवतंय, २००८मध्ये मी व्यंगचित्रकार म्हणून काम करायला नुकतीच सुरुवात केली होती. त्या वेळी सुनीता नारायण या टायगर टास्क फोर्सच्या अध्यक्षा होत्या. संवर्धनाच्या बाबतीत त्यांचा दृष्टिकोन आदिवासींच्या बाजूनं होता. वाघांच्या टोळीनं त्यांना पळवून नेऊन खुर्चीला बांधलंय आणि ते वाघ त्यांची चौकशी करत आहेत, असं माझं पहिलं व्यंगचित्र होतं. ते आठवलं की हसू येतं, पण तेव्हा मी ते चित्र काढलं याचं आता खूप वाईटही वाटतं. त्या वेळी सँक्युअरी एशियाचे संस्थापक-संपादक बिट्टू सहगल यांना प्रत्यक्षात माहीत होतं की हे संवर्धनाचं अगदी चुकीचं चित्रण आहे. त्यांना पूर्ण जाणीवही होती की ते व्यंगचित्र त्यांनाही अडचणीत आणेल. आणि तरीही त्यांनी ते त्यांच्या मासिकात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. नंतर जेव्हा त्याबद्दल त्यांना विचारण्याची मला संधी मिळाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी असंच शिकावं अशी त्यांची इच्छा होती. मी अजूनही त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. तेव्हापासून मी त्यांना मार्गदर्शक आणि वडीलधारी व्यक्ती मानतो. मला खूप बरं वाटतं की मी आता ‘तो’ व्यंगचित्रकार राहिलो नाही !

पल्लवी : तुमच्या चित्रांमध्ये प्राणी केंद्रस्थानी असतात. जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात एक मोठा आणि आनंददायक बदल त्या चित्रांमध्ये जाणवतो. हे जग केवळ आपलंच नाही, हे मान्य करायला तुम्ही भाग पाडता. तुम्ही जाणीवपूर्वक या उद्देशानं चित्र काढता का ?

रोहन : तसं नाहीये. ही भावना माझ्या मनात अगदी सहज आली. माझ्या आयुष्यात वन्यजीव येण्यापूर्वी मी हरवल्यासारखाच होतो. व्यंगचित्रकार म्हणून स्वतःला शोधायचा प्रयत्न करत होतो. मी अशा मालिका काढल्या आहेत, ज्यांत मानव केंद्रस्थानी आहेत. पण त्या मनासारख्या झाल्या नाहीत, त्यामुळं मला रुचल्या नाहीत. वन्यजीवांमध्ये मला जास्त रस निर्माण झाल्यानंतरच मला उमगलं की मी माणसांपेक्षा प्राणी चांगले रेखाटू शकतो ! माझ्या चित्रात जरी तसं जाणवू देत नसलो, तरी जसं वय वाढतंय तसा मी माणूसद्वेष्टा होत चाललोय. कदाचित म्हणूनच, मला प्राण्यांची चित्रं काढणं जास्त नैसर्गिकपणे जमतं. ग्रीन ह्यूमर ही मालिका प्राण्यांना कोणतीही स्वायत्तता देण्यासाठी डिझाइन केलेली नाही. मानव म्हणून आपल्याला प्राण्यांना कोणतीही स्वायत्तता किंवा व्यासपीठ देण्याचा अधिकार नाही, असं मला वाटतं. माझ्या व्यंगचित्रांमधून मी असं दाखवायचा प्रयत्न करतो की हा विशिष्ट प्राणी (मी जो कोणता प्राणी काढत असेन तो,) माझ्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे.

पल्लवी : तुमच्या कलाकृती संवर्धनातील सफलतेचं आणि गुंतागुंतीचं सुंदर चित्रण करतात. जेव्हा तुम्ही या कथा रेखाटता, तेव्हा एखाद्या प्रजातीचं पुनरागमन साजरं करतानाच, त्या प्रजाती त्यांच्यापासून तुटलेल्या आणि कदाचित त्यांच्याशी शत्रुत्व असलेल्या जगात परतत आहेत या गंभीर वास्तवाचं संतुलन कसं साधता ? तिथे क्षीण होत जाणारी आशा तुम्ही कशी पकडून ठेवता, आणि त्यामागची अनिवार हुरहूर इतकी यशस्वीपणे कशी लपवता?

रोहन : मी विशिष्ट माहितीच्या आधारे माझ्या व्यंगचित्रांची दिशा ठरवत नाही. विविध प्रसंग मला चित्रं काढण्याची प्रेरणा देतात. जसं की, एखाद्या घटनेचा किंवा बातमीचा परिणाम, किंवा पक्षिनिरीक्षण, अथवा निसर्गभ्रमंतीत अचानक दिसलेलं एखादं दृश्य. मी अगदी साधी व्यंगचित्रं काढली आहेत, ज्यांत घरट्याचं साहित्य घेऊन जाणाऱ्या पक्ष्याचा आनंद दाखवला आहे. काही जास्त गुंतागुंतीचीही आहेत, ज्यांत एखाद्या नामशेष मानल्या जाणाऱ्या प्रजातीचा पुनर्शोध आपल्या जीवनासाठी कसा अर्थपूर्ण असेल हे मांडलं आहे. एखाद्या विशिष्ट प्रजातीचे आणि तिचे निसर्गाशी असलेल्या परस्परसंवादाचे, तसेच माणसांच्या आणि समाजाच्या आरोग्य-जीवनात त्या प्रजातीची भूमिका समजून घेण्याच्या प्रयत्नांत विविध दुवे जोडलेले असतात. आता, माझ्या शहराचं, नागपूरचंच, उदाहरण देतो. गेल्या वर्षी चिकनगुनियाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. तेव्हा माझ्या कॉलनीत, माझ्यासह असं एकही घर नव्हतं, ज्यात चिकनगुनियाचे रुग्ण नव्हते. त्या वेळी, त्या भागांना योग्यरीत्या सिमेंट आणि फ्युमिगेट केलं जात नसल्याबद्दल बरीच टीका झाली होती. दुर्दैवानं, मुख्य कारण केवळ पत्रकारांनाच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य-व्यावसायिकांना आणि राजकारण्यांना देखील सापडलं नाही. ते म्हणजे, आमच्या परिसरातून चतुर गायब होणं ! निसर्गात चतुर हे डासांचे सर्वांत प्रभावी शिकारी असतात. पण हा दुवा कुणाला दिसलाच नाही. तुम्हांला या विषयाची थोडीशी समज असल्याशिवाय तुम्हाला हे कळूही शकत नाही. मी माझ्या व्यंगचित्रांमध्ये नेमकं हेच करण्याचा प्रयत्न करतो. मी काढलेल्या जवळजवळ प्रत्येक व्यंगचित्रात ही समज आणि जाणीव निर्माण करणं हा माझा हेतू असतो.

पल्लवी : नामशेष होणाऱ्या प्राण्यांचं चित्रण करताना तुम्ही संकोचत नाही. नाहीशा होत चाललेल्या प्राण्यांना रेखाटण्याचा निर्णय घेताना तुमची भावनिक आणि कलात्मक प्रक्रिया कशी असते ?

रोहन : मला हा प्रश्न यापूर्वी कधीच विचारला गेला नाहीये. या घटनांचा माझ्यावर खोलवर परिणाम होतो. एखाद्या प्रजातीचं लुप्त होणं हे मी मानवतेचं अपयश मानतो. गेल्या वर्षी, मी ‘यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस’ (USFWS)च्या विलुप्त होणाऱ्या प्रजातींविषयींचा अहवाल वाचला. त्यात तब्बल ३५ प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्याचा उल्लेख होता. दुर्दैवानं, ब्रेकिंग न्यूज आणि मथळे बनण्याऐवजी अशा बातम्या वर्तमानपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात छापून येतात. आपण त्या वाचण्याची तसदीही घेत नाही. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफमधील ब्रॅम्बल के मेलोमीस नावाच्या उंदराचा असाच एक प्रसंग मला आठवतो. २०१६मध्ये मानवनिर्मित हवामानबदलामुळे नाहीसा झालेला तो पहिला सस्तन प्राणी होता. त्याच्या नाहीशा होण्याची बातमी आल्यानंतरच मला या प्राण्याच्या अस्तित्वाबद्दल कळलं. तुम्ही आणि मी पुन्हा कधीही हे प्राणी पाहू शकणार नाही, ही शोकांतिका दर्शवायला मी काळ्या कॅनव्हासवर पांढऱ्या शाईने ती वेदना रेखाटलेली मला आठवते.

ब्रॅम्बल के मेलोमीस : "संडे मिड-डे २०१६, www.greenhumour.com"

पल्लवी : आपल्याला अधिक शाश्वत जीवनशैलीकडे परतण्याची आवश्यकता आहे, असा एक रास्त विचारप्रवाह आहे. यामध्ये सहसा सह-अस्तित्वाचं सखोल ज्ञान असलेल्या आदिवासी ज्ञानाकडे परतणं असतं. तुमच्या व्यंगचित्रांना या विचारप्रवाहातून प्रेरणा मिळाली आहे का ?

अरुणाचल प्रदेश फॉरेस्ट डिपार्टमेंट, २०१७.

रोहन : अगदी ! मी अनेक व्यंगचित्रांमध्ये आदिवासी मूल्यं आणि आधुनिक भांडवलशाही मूल्यं यांतील संघर्ष मांडलेला आहे. शहरी लोकांवर लादल्या जाणाऱ्या या भांडवली मूल्यांमुळं त्यांना शाश्वत जीवनशैली अंगीकारून जगणं खूप कठीण जातं. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला जाणवलं की आजच्या जगाच्या स्थितीसाठी एखाद्या व्यक्तीला दोष देणं अयोग्य आहे. कंपन्या, मोठ्या प्रशासकीय संस्था आणि सरकारी यंत्रणा यांच्यावर टीका करण्याची गरज आहे. मी अनेक आदिवासी संस्कृती, प्रथा आणि घटक यांचं चित्रण केलं आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बुगुन ग्रामसभेशी माझा जवळचा संबंध आहे.

भूतान ग्लोरी फुलपाखरांना दिलेली नवी बुगुन नावे : "राऊंडग्लास सस्टेन, सप्टेंबर २०२५"

तिथं एक ईगलनेस्ट नावाचं अभयारण्य आहे, जिथं जगातल्या दुर्मिळ पक्ष्यांपैकी एक ‘बुगुन लायोसिचला’ नामक पक्षी आढळतो. त्या जमातीच्या नावावरूनच त्याचं नामकरण झालं आहे. अलीकडेच, बुगुन जमातीनं एक अनोखा समारंभ आयोजित केला, जिथं त्यांनी दोन दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजातींना अधिकृत आदिवासी नावं दिली. त्यांनी ‘भूतान ग्लोरी’ या फुलपाखराचं नाव बदलून शारुवा जिंग-खोनोक, आणि ‘लडलोज् भूतान ग्लोरी’ या फुलपाखराचं नाव बदलून लछन जिंग-खोनोक ठेवलं. आदिवासी जमातींच्या हक्कांचं पुनर्स्थापन करण्याच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. सुदैवानं, या प्रदेशात काही तरुण वन-अधिकारी आहेत, जे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळं मला उमेद मिळते. बुगुन लायोसिचला पक्षी त्या दुर्मीळ फुलपाखराचं त्याच्या नवीन आदिवासी नावाबद्दल अभिनंदन करतोय, असं एक व्यंगचित्र मी काढलंय.

पल्लवी : तुमची व्यंगचित्रं, त्यांच्यातल्या विविध प्राण्यांनी आणि त्यांच्या अद्भुत वर्तनांनी आमच्यासाठी जग पुन्हा सुंदर बनवतात. अशी निरागस उत्सुकता आणि विस्मय निर्माण करणं आपल्या ग्रहाची निगा राखण्यासाठी फार गरजेचं आहे. तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या वाचकांमध्ये (ज्यांपैकी बरीच मुलं आहेत,) हे निर्माण करायचा प्रयास करता का ?

रोहन : नाही. मला वाटतं की माझी व्यंगचित्रं इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माझ्या मनःस्थितीचं प्रतिनिधित्व जास्त करतात. मी जी काही चित्रं काढतो, ती प्रथम माझ्यासाठी असतात. एखादं खास मागणीचं काम वगळता, मी जेव्हा चित्र काढतो, तेव्हा माझ्या मनात कोणताही विशिष्ट वयोगट नसतो. जोपर्यंत ते ग्रीन ह्यूमर मालिकेत आहे, तोपर्यंत वयोगट हे माझं लक्ष्य नसतं. जर मी स्वतः रेखाटलेली गुंतागुंतीची माहिती समजू शकलो, तर ती सर्वाधिक लोकांना देखील समजेल, हे माझ्या कामाचं तत्त्व आहे. मी स्वतःला एक सामान्य वाचक मानतो. त्यामुळं जर मला काही आवडलं, तर ते माझ्या बहुतेक वाचकांनाही आवडेल, असा माझा समज आहे. कधीकधी गुंतागुंतीची पर्यावरणीय माहिती असते, आणि केवळ ती माहिती समजून घेण्यासाठी नि ती लक्षात ठेवण्यासाठी मी व्यंगचित्रमालिका रेखाटतो !

पल्लवी : ग्रीन ह्यूमर मालिकेतल्या तुमच्या कामापैकी तुम्हाला कोणतं चित्र सर्वाधिक आवडतं ? फक्त सर्वांत लोकप्रिय असं नाही, तर ज्याचं तुमच्यासाठी वैयक्तिकरीत्या एक विशेष स्थान असेल असं कोणतं चित्र आहे, आणि का ?

रोहन : मी कधीकधी चालू घडामोडींवर आणि राजकारणावर आधारित व्यंगचित्रं काढतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला ती फारशी आवडत नाहीत; कारण ती माहितीपूर्ण नसतात, फक्त प्रतिक्रियात्म स्वरूपाची असतात. मला वैयक्तिकरीत्या बिगर राजकीय कलाकृती आवडतात, ज्यांच्यात विनोदाचं आणि माहितीचं मिश्रण असेल. मला माणसं आणि राजकारणी यांची चित्रं काढण्याचा वैताग येतो. मी माझ्या स्वतःच्या कामाचा खूप कठोर समीक्षक आहे, त्यामुळं मी सतत माझ्या चित्रांमध्ये बारीकसारीक चुका शोधतो, आणि सुधारणा करायचा प्रयत्न करतो. बाया विणकर पक्षी आणि त्याच्या प्रजनन-सवयी याबद्दलचं एक व्यंगचित्र मला अजूनही हसवतं. नर बाया विणकर हा एक उत्कृष्ट कारागीर आहे, जो खूप कलात्मक घरटी बांधतो. मादी बाया विणकर पक्षी त्याची तपासणी करण्यासाठी येते, आणि ती तिथे थांबणार इतक्यात तिला लक्षात येतं की टॉयलेट सीट वर उचललेली आहे, आणि ती निघून जाते, असं एक चित्र मी काढलं होतं. हे व्यंगचित्र ग्रीन ह्यूमर फॉर अ ग्रेइंग प्लॅनेट या माझ्या पहिल्या संकलनात देखील समाविष्ट केलं गेलं होतं.

बाया विणकर पक्ष्यांची घरटी : "ग्रीन ह्यूमर फॉर अ ग्रेइंग प्लॅनेट - रोहन चक्रवर्ती, पेंग्विन इंडिया"

पल्लवी : आपण ग्रीन ह्यूमर-मागील मूळ विषयांबद्दल आणि तुमच्या हेतूबद्दल बोललो. मला तुमच्या तंत्राबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. असं काही विशिष्ट कलात्म आव्हान आहे का, जे वारंवार समोर येतं ? असा काही विशिष्ट पैलू आहे का, ज्यात तुम्ही अजूनही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहात ?

रोहन : अर्थात ! तुम्हांला माहीत आहेच की जेव्हा तुम्ही कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघता, तेव्हा त्याच्या डोळ्यांत एक खास अद्वितीय सत्त्व दिसतं. त्याचं वर्णन करणं खूप कठीण आहे. ते व्यक्तिमत्त्व आणि तो आत्मा मी माझ्या रेखाचित्रांमध्ये आणि चित्रांमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतो. कधी मी यशस्वी होतो, तर कधी नाही. पण मी कायम तो प्रयत्न करत राहतो, आणि हेच माझं रोजचं आव्हान आहे. तांत्रिकदृष्ट्या इतरही मर्यादा आहेत. मला गाड्या, विमानं, इमारती वगैरे गोष्टी काढण्यात फारशी गती नाही. मी सुधारणा करायचा प्रयत्नही करत नाही. जोपर्यंत मी चित्रात मुद्दा स्पष्टपणे मांडू शकतोय, तोपर्यंत मला त्यांची फारशी पर्वा नाही. पण या अद्भुतरम्य प्राण्यांची मूलस्वरूप ओळख, व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा खोडकरपणा चितारणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ते अनेकदा हातातून निसटतं, पण तरी मी माझ्या परीनं प्रयत्न करत राहतो.

पल्लवी : मुद्दे सोपे करून प्रभावीपणे मांडण्यात तुमच्या व्यंगचित्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशी एखादी पर्यावरणीय दुर्घटना आहे का, जी इतकी मोठी होती की तुम्हाला ती चित्रित करण्यासाठी भावनिक पातळीवर आणि तांत्रिकदृष्ट्या संघर्ष करावा लागला ?

गाझा आणि वॉटर डे : "www.greenhumour.com"

रोहन : हो, नक्कीच. गाझाबद्दल एका चित्रात असं झालं होतं. मला आठवतंय, जागतिक जलदिन जवळ येत होता, आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. संयुक्त राष्ट्रांकडून तो दिवस साजरा करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात होत्या. पण गाझामधलं पाणी आता पिण्यायोग्य नाही या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात होतं. मला हा विरोधाभास अत्यंत असंवेदनशील वाटत होता. मी एक अतिशय प्रतिक्रियात्म आणि उस्फुर्त चित्र काढलं. ते हिंद रजब या पाच वर्षांच्या मुलीवर आधारित आहे, आणि त्यात ती गाझामधलं पाणी किती पिण्यायोग्य आहे याची चाचणी घेत आहे. तिला आढळतं की ते पाणी आता कोणत्याही जिवंत माणसाला पिण्यायोग्य नाही, आणि ती स्वतः ते पिते, कारण इस्रायली सैन्यानं तिची आधीच हत्या केलेली असते. ते चित्र काढताना मला खूप त्रास झाला होता, पण तेव्हा मला ते काढणं आवश्यक वाटलं होतं.

पल्लवी : हवामानबदल, बर्नआउट आणि चिंता यांचा सामना तुम्ही वैयक्तिकपणे कसा करता ? प्रत्येक व्यंगचित्रात तुम्ही विनोद आणि बुद्धिचातुर्य कसं आणता ?

रोहन : मला वाटत नाही की माझ्यात हवामानबदलाच्या संकटाचा सामना करायची किंवा त्याचा सामना कसा करायचा याची चिंता करायची क्षमता आहे. हवामानबदलात दररोज घडणाऱ्या घटनांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, माझ्या परिसरातून मुंगूस गायब होताना पाहून मला खूप वाईट वाटतं. माझ्या सभोवतालच्या परिसराचं वेगानं काँक्रिटीकरण होताना मला दिसतंय. यामुळं त्या अधिवासात वाढणाऱ्या या प्राण्यासाठी खूप कमी जागा उरली आहे. मी माझ्या चित्रांमध्ये त्या मुंगुसाला महत्त्व देऊन त्या प्राण्याला लोकांच्या जाणिवेत परत आणण्याचा प्रयत्न करतो. यामुळं मुंगुसांबद्दल समाजात थोडी संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण होईल, अशी मला आशा असते. मी ज्या पद्धतीनं संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, त्यांपैकी एक म्हणजे, पर्यावरणीय ऱ्हासाची प्रचंड नकारात्मकता थोडी दूर ठेवून, माझ्या आवाक्यातील वन्यजीवांतील सौंदर्य पुन्हा अनुभवण्याचा आणि त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करणं. याचंच एक उदाहरण म्हणजे, नॅचरलिस्ट रड्डी. 

नॅचरलिस्ट रड्डीचं मुखपृष्ठ : "रोहन चक्रवर्ती, पेंग्विन इंडिया"

हे एक अतिशय हलकंफुलकं पुस्तक आहे, ज्यात एक जिज्ञासू मुंगूस गुप्तहेर बनून निसर्गाचा शोध घेतं, आणि स्वतःच्या निरीक्षणांना गुन्ह्यांच्या दृश्यांचं स्वरूप देतं. अशा प्रकारे, वाचकाला मुंगुसाच्या कामाबद्दल जवळून माहिती मिळते. या पुस्तकानं माझी स्वतःची आशा जिवंत ठेवली आहे. ते मला आठवण करून देतं की अजूनही अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल मला उत्सुकता आहे, त्या जाणून घेण्याची मला इच्छा आहे. आणि अर्थातच, अजूनही संवर्धन करण्यासारखंही बरंच काही आहे. मालिकेच्या दुसऱ्या भागावर काम करण्यात सध्या मला प्रचंड धमाल येत आहे.

पल्लवी : जेव्हा लोक तुमच्या कलाकृतींकडे परततात, किंवा ते तुमची व्यंगचित्रं आणि रेखाटनं प्रथमच पाहतात, तेव्हा त्यांना कोणता संदेश द्यावा किंवा मिळावा, असं तुम्हांला वाटतं ?

रोहन : मी तीन गोष्टी सांगेन, कारण त्या सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्हांला घरी एखादा प्राणी दिसला, अगदी कोळ्यासारखा लहान कीटकही असला, तर वर्तमानपत्र घेऊन तो मारू नका. माझी व्यंगचित्रं, तुमच्या घरातला कोळी फळमाश्या मारून फळं कुजण्यापासून कशी वाचवतो हे तुम्हांला दाखवतील. ते तुमचे सहयोगी आहेत याची तुम्ही जाणीव ठेवाल, आणि त्यांच्याशी आदरानं आणि सन्मानानं वागाल, अशी मला आशा आहे.

वन्यजीवांची पाळीव प्राणी म्हणून होणारी तस्करी : "द हिंदू संडे मॅगझिन, मार्च २०२५"

 दुसरं म्हणजे, माझ्या आजूबाजूला असलेल्या अनेक लोकांकडे असे परदेशी प्राणी आहेत, जे शहरी वस्तीत राहू शकत नाहीत. शहरी उच्चभ्रूंमधली विदेशी पाळीव प्राणी बाळगण्याची वाढती इच्छा चिंताजनक आहे. जर माझ्या कामाचा तुमच्यावर काहीही परिणाम होत असेल किंवा तुम्ही त्यानं प्रभावित होत असाल, तर मला आशा आहे की तुम्ही कधीही एखादा दुर्मिळ / परकीय प्राणी पाळणार नाही. जो प्राणी पाळाल, त्याच्या नैसर्गिक अधिवासाची जाणीव ठेवायचा तुम्ही प्रयत्न कराल.

तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमचं मतदान करता तेव्हा ते पर्यावरणीय जाणिवेनं करा.

Post Tags

Leave a comment