ओंकार गोवर्धन

अखंड, प्रचंड, सतत आणि सुस्पष्ट



back

रंगमंचावरील आणि प्रेक्षकांतील सर्वांना नमस्कार. तन्वीर सन्मान या अतिशय आवडत्या समारंभात मला आज बोलायची संधी मिळते आहे, त्याबद्दल आभार. सगळ्यात आधी बी. जयश्रीजी यांचं मनःपूर्वक अभिनंदन. जयश्रीजी, my heartiest congratulations. तन्वीर सन्मान सोहळा आम्हाला कायमच electrify करत आलेला आहे. हे वर्षं सुद्धा त्याला अपवाद नसणार याची मला खात्री आहे.

आज माझ्या दिग्दर्शकाला, माझ्या सिनियर मित्राला आणि एका अस्सल नाटकवाल्या माणसाला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार मिळणार आहे. आपल्या आवडत्या माणसाला पुरस्कार मिळणं, त्या समारंभात आपल्याला बोलायला मिळणं आणि आपण त्या समारंभाचं औचित्य राखणं, यातल्या पहिल्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत आणि तिसरी घडू देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. एकच गोष्ट आधी सांगतो की हे अतुल पेठे यांचं विश्लेषण नाही. मला ते कसे दिसतात हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

अतुल पेठे हे नाव उच्चारलं की पहिला शब्द माझ्या मनाशी येतो तो म्हणजे ‘ऊर्जा’. गेली ३५ वर्षं ते काम करत आहेत. त्यांनी अनेक कामं केली आहेत. त्या सर्व कामांमध्ये ऊर्जा, एनर्जी ही गोष्ट आहेच आहे. ही ऊर्जा exciting आहे, infectious आहे. तिचा संसर्ग तुम्हाला तात्काळ होतो. ‘सत्यशोधक’ नाटकापासून माझा हा सिलसिला सुरू झाला आणि आजपर्यंत तो चालूच आहे. अखंड, प्रचंड, सतत आणि सुस्पष्ट हे चार शब्द आपण जवळ जवळ सर्वांनी त्यांच्या तोंडून ऐकलेले आहेत. या शब्दांचा आवाका फक्त त्यांनाच माहीत आहे असं त्यांच्या या एनर्जी वरून वाटतं.

अतुल सर हा एक अस्सल नाटकवाला माणूस आहे. अस्सल. त्यांना नाटकाशिवाय काही दिसत नाही, सुचत नाही. ते नाटकात गढून, बुडून, रमून गेलेले आहेत. ‘करना फकिरी अब क्या दिलगिरी सदा मगन में रहना जी’ या अवस्थेत ते मला कायम दिसलेले आहेत. आणि नाटकात म्हणजे नाटकाच्या प्रत्येक घटकात ते त्याच ऊर्जेनं involve होत असतात. मला याचा प्रत्यक्ष अनुभव ‘सत्यशोधक’ नाटकाच्या वेळी आला. गोपुंनी लिहिलेलं हे नाटक माझ्याकरता एक eye opener होतं. पुणे महानगरपालिकेचे कचराकामगार आणि नाटकातील काही जण अशी आमची टीम होती. ही सर्व टीम बांधणं, ती एकजीव करणं, नाटकाच्या विचाराची किमान पातळी सर्वांमध्ये नीट स्पष्टतेनं पोहोचवणं, नाटक बसवणं, त्याचे प्रयोग गावोगाव हिंडवणं, नाटकावर होत असणाऱ्या टीकेला आणि प्रशंसेला सामोरं जाणं या सर्वच भूमिकांमध्ये मी त्यांना पाहिलं आणि त्यानं माझ्यावर खोल परिणाम झाला. या प्रोसेसमुळं मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. आपलं नाटक एका public domain मध्ये आलं की त्याची व्याप्ती किती वाढते याचं भान मला ‘सत्यशोधक’ आणि अतुल पेठ्यांनी दिलं. गावोगाव प्रयोग करताना आलेली मजा, तिथे असणाऱ्या अनंत अडचणी, त्यातून प्रयोग करणं यानं एक अतिशय सॉलिड अनुभव तर मिळालाच शिवाय खरोखर वेगवेगळा प्रेक्षक काय असू शकतो हे मला पहिल्यांदा कळलं. त्यांच्या जवळ जवळ सर्वच नाटकांचा प्रेक्षक हा केवळ नेहमीचा नाटकाचा प्रेक्षक नसतो, फक्त नाटकातले लोकं नसतात. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, साहित्य, संगीत, सामाजिक संस्था, चित्रकार, फोटोग्राफर्स, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स असा varied प्रेक्षक त्यांची नाटकं पहातो. हा सामाजिक कलाव्यवहार मला महत्त्वाचा आणि रंजक सुद्धा वाटतो. अर्थात, हा प्रेक्षक एका नाटकात तयार झालेला नाही. हा अतुल सरांनी हळू हळू तयार करत आणलेला आहे. गावागावातली अशी इंटरेस्टिंग माणसं पहायची, त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या, लोकं जर काही करत असतील तर त्याला चालना द्यायची, त्यातलं चांगलं काम पसरवण्याचा अॅक्टीव प्रयत्न करायचा, कधी पुण्यात त्याचे प्रयोग, प्रदर्शन, स्क्रीनिंग करायचं, वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप्स घ्यायची या सगळ्यातून ते नाटक या गोष्टीचा परीघ वाढवतात. fraternity वाढवतात. रिंगणनाटकासारखा मोठा प्रकल्प पण त्यांनी अशाच पद्धतीनं पार पाडला. आपल्या नाटकाची रेषा अनेक क्षेत्रांना भिडवण्याची त्यांची पद्धत मला fascinating वाटते. एक wholesome नाटकवाला असणं या करता आवश्यक आहे. तसे ते आहेत. नाटक हे केवळ निर्मितीपुरतं ते मानत नाहीत. आणि प्रयोगांच्या संख्येमुळे अभिनयात होणारी सुधारणा मी अनुभवलेली आहे. त्यामुळे याचा नटांना फायदा तर होतोच. त्या फायद्याकरता मी त्यांचा ऋणी आहे.

संवाद हा त्यांच्या कामाचा अपरिहार्य भाग आहे. त्यांचे अनेकांशी दररोज वेगवेगळ्या विषयांवर संवाद चालूच असतात.त्यांचे प्रयोग ठरवण्यासाठी होणारे फोन्स तर सतत असतातच. मी आणि ते तर अक्षरश: दररोज भेटतो आणि गप्पा मारतो. अर्थात, नाटकाबद्दल तर होतंच पण एकंदरीत कशाहीबद्दल. मला यातून अनेकदा स्पष्टता मिळालेली आहे, नाटक आणि नाट्यव्यवहाराबद्दल फार मोलाच्या insights मिळालेल्या आहेत, राजकीय सामाजिक भूमिकांबद्दल भान आलेलं आहे. या संवादामधला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे equality. अतुल सर equality मानतात आणि पाळतात. त्यामुळे अनेक गोष्टी, सूचना, विनोदही शक्य होतात. मला त्यांचा हा भाग फारच महत्त्वाचा वाटतो. ‘आता त्याच्यात वयपरत्वे गोडवा आलाय’, ‘तुम्हाला पूर्वीचा अतुल माहीत नाही’, ‘ coca cola मधला सोडा आता कमी झालाय’ ही मतं वादासाठी ठेऊन मी पुढे जातो.

डॉ लागू, निळूभाऊ, आळेकर, श्याम मनोहर, डॉ दाभोळकर असे अनेक प्रभाव त्यांच्यावर आहेत. त्यांची नाटकाची निवडही हे सर्व प्रभाव मान्य करून आणि पचवून उमललेली आहे. मला त्यामुळे अतुल पेठे हे कधीच management guru वाटत नाहीत. आपल्याला हवं ते नाटक आपल्याला हवं त्या पद्धतीनं करून मग ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हाच त्यांचा क्रम मी पाहिलेला आहे. या क्रमाची अदलाबदल झालेली मला दिसलेली नाही. त्यांनी शिष्य बनवणं टाळलं, संस्था स्थापन करणं टाळलं हे सुद्धा मला त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगतच वाटतं. ते स्वतःच स्वत:ची कबर खणत असतात प्लस अभिवाचनासारखे आंतरपीकपालटीचे त्यांचे जे प्रयोग चाललेले असतात ते मला फार मोलाचे वाटतात.

कलाकाराची काही जबाबदारी असते का, काय असते, असल्यास ती काय करून पार पाडायची असते, कधी थेटपणे कशात उतरण्याची गरज असते का याबद्दल अर्थातच मतप्रवाह आहेत. अतुल सर मात्र यात मला अगदी थेटपणे काम करताना दिसतात. आपल्याला योग्य वाटणाऱ्या विचाराचा, मतांचा, भूमिकांचा, लढ्यांचा ते अगदी जोरकसपणे पुरस्कार करतात. अनेक वेळा यामुळे काही वाद निर्माण होतात पण एक value म्हणून आजच्या काळात ती कधी नव्हे इतकी महत्त्वाची झालेली आहे. यात ते आपल्या अनेक सहकऱ्यांसकट उतरतात. आपणच एकमेकांच्या मदतीला जायला हवं हे तत्त्व ते पाळताना दिसतात. याचा अनेकांना आधार मिळालेला आहे आणि तिथेही ते संपूर्ण शक्तीनिशी कार्यरत असल्यामुळे त्या कामांना मोठीच ऊर्जा मिळते यात शंका नाही. डॉ दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांनी केलेला रिंगणनाट्य प्रकल्प त्याचं एक उदाहरण आहे. किनाऱ्यावर की प्रवाहात हा विचार करणाऱ्या माझ्यासारख्याला यामुळे कायम एक reference point मिळतो.

आता माझ्या या सुपर सिनियर नाटकवाल्याकडे आम्ही कसे पाहतो? अतुल सर गेली तीस वर्षं नाटक करतायत. फक्त नाटक करतायत. आपल्याला संपूर्णपणे व्यक्त करणारं माध्यम हे त्यांच्यासाठी नाटक आहे. आज आम्ही सगळे माध्यमपेचात आहोत. संभ्रमात आहोत. नाटक आपल्याला आत्ता फार मज्जा देतंय पण पुढची खात्री नाही असं वाटतं. अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत पण निवडीचं स्वातंत्र्य आहेच असं नाही. कधी अपरिहार्यता आहे तर कधी आशा आहे.अशा वेळेला आतूनच conviction असलेला आणि फक्त प्रायोगिक नाटक करणारा, ते गावोगावी हिंडवणारा माणूस museum piece होईल का असं वाटतं. मला आवडतं आहे पण कदाचित जमणार नाही असं एक फिलिंग मला त्यांच्याबद्दल तयार होताना दिसतं. पण तरीही अतुल पेठ्यांकडे आम्ही कुठलंही नाटक घेउन जाऊ शकतो, नाटकाची मज्जा, excitement share करू शकतो. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते nostalgia मुक्त आहेत. गोष्टीवेल्हाळपणे ते जुने किस्से सांगतायत, त्यांचंच नाटक कसं खरं, तोच काळ कसा महत्त्वपूर्ण होता हे ते सांगतायत, स्मरणरंजन करतायत असं घडत नाही. याचा अर्थ असा नाही की सर्व नवीन गोष्टी, व्यवहार ते अत्यंत आनंदाने स्वीकार करतायत. आत्ता होणारं नाटक, त्याचा आशय, शैली, commitment, नाट्यव्यवहार या सगळ्याबाबत त्यांना शंका आहेत, आक्षेप आहेत आणि अत्यंत टोकाच्या तीव्र आवडी निवडी देखील आहेत. पण ‘how green was my valley’ हा भाग मला त्यात दिसत नाही. अर्थात, त्याचं वय तितकंही जास्त नाही हे खरंच. पण एका एकसंध काळाचे ते प्रतिनिधी आहेतच. आणि आपल्यापरीने ते या बदलत्या काळाचा अर्थ लावत आहेत. त्याच्यामधल्या agonies आणि ecstasies समजून घेता आहेत. पण हे सगळं नाटक ही गोष्ट सर्वात महत्त्वाची मानून. ही फारच कमाल बाब आहे.

अर्थात, त्यांच्या आत्यंतिक उत्साहाचं अपरिहार्य पर्यवसान निराशेत होतं किंवा खिन्नतेत. पण यात व्यक्तिगत achievement चा भाग मला फार कमी दिसलेला आहे. मूल्यमापन, समीक्षा, संवाद, प्रेक्षक आणि overall अनास्था या गोष्टी त्यांना निराश करताना मला दिसतात. आणखी काही सामाजिक अस्वस्थता त्यात आहेच. आपल्याला अपेक्षित उंची आपण गाठली की नाही हा त्यांचा सततचा विचार करण्याचा विषय असतो.

या निराशेतून ते उसळून येतच असतात, स्वत:ची संपूर्ण क्षमता वापरून पूर्ण विश्वासानं काम करतच असतात. पण हे करताना एक प्रकारचं हौतात्म्य येतं का? अत्यंत तीव्रता आपली मूळची मजा घालवते का? हे तर प्रायोगिक नाटक करणाऱ्यांचे कळीचे प्रश्न आहेत. कायमच. पण आत्ता तर हे कोपऱ्यात लोटलं जाणं अजूनच तीव्र झालेलं आहे.अतुल सर याच्याशी झगडतच असतात. त्यांना तसं पहाणं हा पण एक कमाल अनुभव आहे. त्यांनी कधी कधी उत्तरं न देता आपल्या नाटकांतून जरा जास्त प्रश्न विचारले तरी चालतील असं पण क्वचित वाटतं. पण हा त्यांच्या अंतर्गत रेट्याचा प्रश्न आहे आणि ज्याचा मी आदर करतो. आज या संध्याकाळी त्यांच्या नाट्यप्रेमाला मी दंडवत घालतो. गेली ३५ वर्षं निधर्मी राहून फक्त नाट्यधर्म जगणाऱ्या माझ्या ज्येष्ठ मित्राला पुन्हा एकदा सलाम. अतुल सर, congratulations ! धन्यवाद.

चित्र सौजन्य: सत्यशोधक नाटकाचे पोस्टर


ओंकार गोवर्धन हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे, स्तानिस्लावस्कीच्या ‘द आर्ट अॉफ द स्टेज’  या पुस्तकाचे त्यांनी केलेले ‘रंगमंचकला’ हे भाषांतर राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

One comment on “अखंड, प्रचंड, सतत आणि सुस्पष्ट: ओंकार गोवर्धन

  1. Vinay Shukla

    Very good article .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *