Skip to content Skip to footer

खंदाकर ओहिदा ह्यांच्याशी संवाद : पूर्वी राजपुरिया।अनुवाद : गौरी जोगळेकर-तळेगांवकर

Discover An Author

  • Visual Artist

    Khandakar Ohida is a visual artist and film practitioner working in Hooghly and Kolkata, West Bengal. Her practice spans drawings, paintings, and installation art influenced by her surroundings, including personal memories, rural marginalized voices, post-colonial imagination, and non-linear narratives that interact with various societal layers. Ohida amplifies hidden stories, particularly those empowering women, by examining power dynamics shaped by class, gender, and belief systems. Her work often explores escape pathways, infused with magical realism elements.

    खंदाकर ओहिदा दृश्य माध्यमात काम करणाऱ्या कलाकार व चित्रपटकर्मी आहेत. त्या पश्चिम बंगालमधील हुगळी आणि कोलकाता येथून काम करतात. त्यांच्या चित्रांवर तसेच मांडणशिल्पांवर (इन्स्टॉलेशन), वैयक्तिक आठवणी, दबलेली ग्रामीण अभिव्यक्ती, वसाहतोत्तर कल्पनाशक्ती आणि विविध सामाजिक स्तरांशी संवाद साधणारी अरेषीय कथने ह्यांचा समावेश असलेल्या त्यांच्या भवतालाचा प्रभाव दिसून येतो. ओहिदा, वर्ग, लिंग आणि श्रद्धा-प्रणालींद्वारे आकार घेणाऱ्या सत्ताकारणाचा अभ्यास करून, विशेषत: स्त्रियांचे सबलीकरण करणार्‍या अलक्षित राहिलेल्या कथा ठळकपणे आपल्यासमोर आणतात. त्यांचे, जादुई वास्तववादातील घटक अंतर्भूत असलेले काम अनेकदा सुटकेचे मार्ग शोधू पाहते.

  • Illustrator, graphic designer, writer

    Purvi is an illustrator, graphic designer and writer from Kolkata. She currently works at a design studio in Bangalore.

    पूर्वी ह्या लेखचित्रकार (इलस्ट्रेटर), आलेखी अभिकल्पक (ग्राफिक डिझायनर), आणि लेखक आहेत. त्या मूळच्या कोलकात्याच्या असून, सध्या बेंगळुरूमधील एका डिझाइन स्टुडिओमध्ये कार्यरत आहेत.

  • Poet, Writer and Translator

    Gauri Talegaonkar is a Computer engineer by profession. She writes short articles and poems on social media platforms and for journals. Gauri works on translation projects, volunteers for NGOs as per their requirements. Performs light music as a well pursued hobby. She strongly believes that we all should have a life beyond work and our homes.

    गौरी जोगळेकर-तळेगांवकर ह्या संगणक-अभियंत्या आहेत. त्या ललितगद्य व कविता लिहितात, आणि अनुवादही करतात. त्या सुगम संगीताच्या कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करतात. निसर्ग आणि भटकंती ह्या गोष्टी त्यांना विशेष आवडतात. आपल्या व्यावसायिक कामाव्यतिरिक्त आणि घरापासून वेगळे असे काहीतरी आयुष्यात नक्की असायला हवे, असे त्यांना मनापासून वाटते.

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल २०२३-मध्ये मी खंदाकर ओहिदा ह्यांचं ‘ड्रीम युवर म्युझियम’ नावाचं प्रदर्शन पाहिलं. हे प्रदर्शन म्हणजे एक चित्रपट आणि त्याबरोबर परफ्यूमच्या काही रिकाम्या बाटल्या, जुनी पत्रं, सिगारेटचे बॉक्स आणि बसची तिकिटं अशा विविध वस्तू. ओहिदांचे चाचा खंदाकर सेलीम, आणि त्यांची वस्तू जमा करून प्रेमाने त्यांची काळजी घेण्याची आवड हे ह्या प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी आहे. सेलीमना निर्जीव वस्तूंच्या ह्या जगाप्रती वाटणारं प्रेम आणि ह्या वस्तूंचं संग्रहालय बनवण्याचं त्यांचं स्वप्न ह्यांविषयी जाणून घेताना मी भारावून गेले होते. ओहिदांची मुलाखत घेऊन, त्या ह्या विषयाकडे कशा आकृष्ट झाल्या ह्याबद्दल आणि त्यांच्या काकांच्या वस्तुसंग्रहाच्या आवडीबद्दल (जिला ते ‘व्यसन’ म्हणतात !) मला जाणून घ्यायचं होतं. 

’ड्रिम युवर म्युजियम’ हे ओहिदांचे बर्लिन बिनाले २०२२ मधील प्रदर्शन. छायाचित्र सौजन्य : Dotgain.info

पूर्वी : मला तुमच्या ‘ड्रीम युवर म्युझियम’ ह्या प्रकल्पाबद्दल सांगा. तुम्ही ह्याचं काम कसं सुरू केलंत ?

ओहिदा : कोव्हिडच्या काळात जेव्हा मी केलेपाराला गेले होते तेव्हा ह्याची सुरुवात झाली. केलेपारा हे पश्चिम बंगालमधलं एक गाव आहे. तिथेच मी लहानाची मोठी झाले. माझे कुटुंबीय अजूनही तिथे राहतात. मी तेव्हा नुकताच एक नवीन कॅमेरा विकत घेतला होता, आणि माझ्या मोकळ्या वेळात डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आर. व्ही. रमाणी ह्यांच्याकडे मी एक ऑनलाईन फिल्म कोर्स करत होते. त्यातला स्टोरी-टेलिंगचा भाग मला खूपच आवडला होता.

मला आठवतंय, त्याच वेळी माझ्या घरी काही वस्तूंवरून खूप मोठा वाद चालू होता. त्यांना ह्या वस्तू नदीत फेकून द्यायच्या होत्या. माझ्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग होतं. मी विचार करू लागले की नक्की काय झालंय ? माझ्या घरच्यांना ह्या वस्तू नदीत का टाकायच्या आहेत ?

पूर्वी : आणि ह्या वस्तू तुमच्या चाचांच्या होत्या ? खंदाकर सेलीम ह्यांच्या ?

ओहिदा : हो, ह्या त्यांनी अनेक दशकांपासून जमा केलेल्या वस्तू होत्या. कोव्हिड लॉकडाऊनमध्ये दुसरं काही विशेष करता येण्यासारखं नव्हतं, तेव्हा मी आणि चाचा (खंदाकर सेलीम) आम्ही खूप बोलत असू. एके दिवशी मी त्यांना सुचवलं, “मी तुमचा हा संग्रह डिजिटली संग्रहित करण्याचा प्रयत्न करू का ?” घरातल्या बहुतेकांना ह्या वस्तू फेकून द्यायच्या होत्या, पण एक कलाकार म्हणून ते मला प्रचंड अस्वस्थ करणारं होतं.

माझ्या असं लक्षात आलं की जरी मी वस्तू भौतिकरीत्या जतन करू शकत नसले तरी मी माझ्या कॅमेऱ्याने त्यांचं दस्तऐवजीकरण आणि संग्रहण करू शकते. चाचासुद्धा हे ऐकून खूप उत्साहित झाले. माझ्याकडे माझा कॅमेरा होता आणि मी माझ्या घरीच होते; त्यामुळे मी दररोज फुटेज शूट करायचे, ते माझ्या लॅपटॉपवर कॉपी करायचे, आणि अजून शूट करायचे. ह्या वस्तू संग्रहित करण्याच्या एकमेव हेतूने हे सर्व आपोआप सुरू झालं.

ओहिदांचे चाचा खंदाकर सेलीम.

पूर्वी : अच्छा. आपण थोडं मागे जाऊ … मला ह्या वस्तूंबद्दल अजून माहिती सांगू शकाल का ? तुमचे चाचा कधीपासून ह्या वस्तू जमा करत होते ?

ओहिदा : आमच्या लहानपणापासून आम्ही ह्याबद्दल ऐकत होतो. आणि गावातले लोक त्याला ‘संग्रह’ म्हणत नसत. ते म्हणायचे, तुझे काका शहरातून ‘कूडा’, म्हणजे रद्दी किंवा कचरा आणत आहेत. ते रस्त्यावरून वस्तू उचलून घरी आणतात, असं आम्ही ऐकायचो.

मी लहान असताना लोक म्हणत, “चाचा कचरा गोळा करतात, त्यांच्याजवळ जाऊ नकोस.” मी सातवीत किंवा आठवीत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. पण नंतर, जेव्हा मी कला महाविद्यालयात शिकण्याचा निर्णय घेत होते, तेव्हा मला प्रोत्साहन देणाऱ्या मोजक्या लोकांपैकी ते एक होते. ते मला आर्ट कॅटलॉग्जसह इतर अनेक पुस्तकं देत आणि त्यातून माझा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन पूर्ण बदलून गेला. आता त्यांनी जमवलेल्या वस्तू माझ्यासाठी कचरा नव्हत्या,  तो एक अमूल्य खजिना होता. इतर लोक काय बोलत आहेत ह्याकडे मी लक्ष देणं बंद केलं, आणि चाचा किती महत्त्वाचे आहेत हे मला कळलं.

१९७०पासून चाचा कोलकात्यात एकटेच राहत होते. पार्क सर्कसमधील इम्प्लांट हाऊसच्या नेत्र-विभागात ते कामाला होते. त्यांचं काम तांत्रिक होतं — ते डॉक्टरांचे साहाय्यक होते. दर रविवारी सकाळी ते गावी परत यायचे आणि आमच्यासोबत दिवसभर राहून सोमवारी सकाळी कोलकात्याला परत जायचे. त्यावेळी ते तेवीस-चोवीस वर्षांचे असतील.

ते ह्या वस्तू गोळा करायचे, गावात घरी आणून ठेवायचे, आणि पुन्हा कोलकात्याला परत जायचे. त्यांच्या अनुपस्थितीत वस्तूंची काळजी घेणारं कोणीही नसल्यामुळे त्यांचा संग्रह हळूहळू हातपाय पसरू लागला. आधी पलंग, नंतर टेबल, आणि शेवटी संपूर्ण घर. काही जागाच उरली नव्हती. ते मात्र जमा करतच राहिले. अनेकदा ते काय जमा करत आहेत हे त्यांच्या गावीही नसे. तरीही, ते अभिमानाने म्हणत, “हा माझा संग्रह आहे आणि मला संग्रह करायला आवडतं.” हे सगळं असं सुरू झालं.

आणि कोणालाही त्यांच्या ह्या संग्रहाची काळजी घ्यायची नसायची आणि त्या वस्तू घरातही ठेवायच्या नसायच्या. चाचा दर रविवारी परत यायचे आणि वस्तूंची काळजी घ्यायचे. ते प्रत्येक वस्तू तीन वेगवेगळ्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅक करतात. असं इंटरेस्टिंग पॅकिंग करताना मी कधीच कोणाला पाहिलं नाहीये. काकांना प्रत्येक वस्तू स्वतःच्या हाताने पॅक करताना मी पाहिलं आहे — आणि केवळ एकदोन वस्तू नव्हे तर तब्बल दहापंधरा हजार वस्तू. आपण त्या मोजूच शकत नाही. हा प्रचंड मोठा आकडा आहे. त्यांच्याकडे पाच ते सात हजार स्टॅम्प्स आणि जवळजवळ आठ स्टॅम्प्सची पुस्तकं, एक ग्रामोफोन, असंख्य जुन्या कॅसेट्स, काही जुने फोन आणि एक जुना दगडी फोन आहे. पण त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंमधल्या ह्या केवळ पन्नास टक्के गोष्टी आहेत. बाकी पन्नास टक्क्यांमध्ये काहीही असू शकतं, म्हणजे इतर लोकांनी फेकून दिल्या असत्या अशा कोणत्याही वस्तू. १९७३ ते २०२४ ह्या काळात त्यांनी कोलकात्याहून खरेदी केलेल्या एकाही वस्तूची पावती कधीही फेकली नाही. त्यांनी प्रत्येक पावती एवढी वर्षं सांभाळून ठेवली आहे. त्यांनी कधी स्वतःची कापलेली नखंही टाकून दिली नाहीत. त्यांच्याकडे त्यांच्या नखांनी भरलेला एक डबा आहे ! तुम्ही कल्पना तरी करू शकता का ? एकदा मी चाचांना विचारलं, “ही कोणाची आहेत ? कशासाठी आहेत ?” ते मला म्हणाले, “ही माझी नखं आहेत आणि हा माझ्या संग्रहालयाचा भाग आहे.”

आणि मग ते प्रत्येक वस्तूमागची कहाणी सांगायचे. त्यांना कोणी, कोणत्या तारखेला काय आणि का दिलं, एखादी वस्तू कोणीतरी कशी फेकून देणार होतं आणि ती त्यांनी कशी मिळवली, … तुम्हांला माहितीये, त्यांनी कधीही, कुठलीही वस्तू फेकली नाही. जेव्हा मी ह्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा मला असं वाटलं की, जरी कला शाखेतून मी पदवीधर झाले असले, तरी खरे कलाकार ते आहेत. 

ह्याच वेळी मी माझ्या चाचांकडे एक व्यक्तिरेखा म्हणून पाहू लागले — एक अशी व्यक्तिरेखा जिला कथा सांगायच्या आहेत. मी त्यांना एका वेगळ्याच जगात बुडून गेलेल्या व्यक्तीच्या रूपात पाहिलं. ते जगाकडे, वस्तूंकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांची कल्पनाशक्ती खूप निराळी आहे. त्यांना निर्जीव वस्तूंबद्दल वेड्यासारखी ओढ आहे ! साहजिकच, त्यांना सजीव वस्तूंबद्दल फारच कमी समज आहे !

पॉलिथिन पिशवीत पॅक केलेली पुस्तकं. छायाचित्र सौजन्य : खंदाकर ओहिदा

पूर्वी : तुमच्या मते, ते वस्तू का जमवायला लागले असावेत ?

ओहिदा : जेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांनी ह्या वस्तू जमवायला कधी सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना ही आवड लहानपणापासूनच होती. पण जेव्हा ते शहरात गेले तेव्हा लोक किती वस्तू फेकून देतात हे त्यांनी पाहिलं, आणि त्या वस्तू जमा करायला सुरुवात केली. म्हणजे, एखादा शो-पीस तुटला तर लोक तो टाकून देतात. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक अशा वस्तू फेकून देतात आणि त्यांची काळजी कोणीच घेत नाही, तेव्हा त्यांनी ह्या वस्तू जमा करायला सुरुवात केली.

हे मानसिक सुद्धा आहे. काही लोकांना गोष्टी फेकून देताना त्रास होतो. उदाहरणार्थ, माझ्या घरात आजही माझ्या आजोबांची अनेक वर्षांपूर्वीची शेतीची अवजारं आहेत. हे आनुवंशिक आहे, असं मला वाटतं.

एकदा मी गमतीने चाचांना विचारलं की ते मद्यपान किंवा धूम्रपान करतात का ? कारण त्यांच्या संग्रहात दारूच्या अनेक रिकाम्या बाटल्या आणि फ्रान्स वगैरे ठिकाणांहून आलेले ॲश-ट्रे आहेत. त्यांनी साफ नकार दिला आणि म्हणाले, “काही लोकांना मद्यपान करायला आवडतं आणि काही लोकांना धूम्रपान करायला — पण ती माझी व्यसनं नाहीत. माझं व्यसन वस्तू गोळा करणं हे आहे.”

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल २०२३ मधील ‘ड्रिम युवर म्युजियम’ या प्रदर्शनात मांडलेल्या वस्तू. छायाचित्र सौजन्य : खंदाकर ओहिदा

पूर्वी : जेव्हा तुम्ही शूटिंग सुरू केलं तेव्हा तुमच्या काकांना त्यातून काय निष्पन्न होईल असं वाटत होतं ? किंवा हा चित्रपट काय रूप घेईल असं त्यांना वाटत होतं ?

ओहिदा : जेव्हा मी त्यांच्या वस्तूंचं दस्तऐवजीकरण करत होते, तेव्हा त्यांनी त्यात स्वारस्य दाखवायला सुरुवात केली. हा उपक्रम कालांतराने कुठवर जाईल ह्याची मला खात्री नव्हती. त्या वेळी, इतर कोणीही ह्या वस्तूंची काळजी घेत नव्हतं, आणि त्यांच्याकडे आपल्या वस्तू संग्रहित करून ठेवता येतील आणि प्रदर्शित करता येतील अशी जागा तयार करण्यासाठी पैसे नव्हते. ग्रामीण भागात ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्या संग्रहाचं दस्तऐवजीकरण करत आहे हे त्यांना आवडलं.

आमच्या रोजच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं मातीचं घर चक्रीवादळाने (अम्फान) उद्ध्वस्त होणार असल्याने ते थोडे निराश झाले आहेत. ह्या आपत्तीपासून आपल्या संग्रहाचं रक्षण करायची त्यांची इच्छा होती. चक्रीवादळात त्यांच्या संग्रहाचं नुकसान झालं तरी त्यांचा संग्रह माझ्या चित्रपटात डिजिटल पद्धतीने संग्रहित केला जाईल ह्याचा त्यांना आनंद झाला.

पूर्वी : तुमच्या चित्रपटात तुम्ही असं दाखवलंय की त्यांना त्यांच्या वस्तूंचं एक संग्रहालय उभारायचं आहे. ह्याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का ? ते तयार करू पाहत असलेल्या संग्रहालयाची त्यांची कल्पना काय होती ? आणि संग्रहालयाच्या परंपरागत वसाहतवादी कल्पनेपेक्षा ते कसं वेगळं होतं असं तुम्हाला वाटतं ?

ओहिदा : सामान्यत: जेव्हा आपण एखाद्या संग्रहालयाचा विचार करतो, तेव्हा प्रामुख्याने त्यात असलेल्या वस्तूंचा विचार होतो. मी माझ्या बाबतीतही हे पाहिलं आहे. अलीकडेच मी माझं काम एका मोठ्या संग्रहालयात प्रदर्शित केलं. मी एप्रिल २०११मध्ये पहिल्यांदा संग्रहालय पाहिलं — कोलकात्याचं इंडियन म्युझियम. ते माझ्या महाविद्यालयाला — गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टला — जोडूनच आहे. कॉलेजचा प्रवेश अर्ज घेण्यासाठी मी काही भावंडांसोबत तिथे गेले होते. त्या वेळी मी फक्त सतरा वर्षांची होते.

ग्रामीण भागात वाढल्यामुळे मला तोपर्यंत कधीही संग्रहालय पाहण्याची संधी मिळाली नव्हती. माझ्यासाठी संग्रहालयाची कल्पना एखाद्या जादुई घरासारखी होती. जेव्हा मी इंडियन म्युझियममध्ये गेले, तेव्हा पहिल्यांदाच इतका मोठा डायनासोरचा सांगाडा किंवा हत्तीचा दात पाहिला. मला त्या वस्तूंच्या इतिहासापेक्षा त्या संग्रहालयाबद्दल एक कल्पनारम्य जागा म्हणून आकर्षण आणि आश्चर्य वाटलं होतं. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला संग्रहालयाची पहिली ओळख अशी घडली.

कालांतराने, मी कला महाविद्यालयात गेल्यानंतर, संग्रहालयांबद्दलची माझी समज प्रगल्भ झाली. मला वाटतं की आज जगात जवळजवळ पंचावन्न हजार संग्रहालयं आहेत. त्यांचं महत्त्व बहुधा त्यांच्या प्रदर्शित वस्तूंच्या मूल्यामध्ये असतं — मग ते मूल्य कलात्मक, सांस्कृतिक किंवा आर्थिक असो.

पण जर तुम्ही माझ्या चाचांची संग्रहालयाची कल्पना पाहिली तर ती पूर्णपणे वेगळी आहे. ते त्यांच्या नखांसारख्या आणि केसांसारख्या वैयक्तिक वस्तू गोळा करतात आणि त्यांचाही त्यांच्या संग्रहालयात समावेश करतात. त्यापलीकडे, चाचांच्या संग्रहात काही मौल्यवान वस्तूदेखील आहेत, ज्या त्यांना मोठमोठ्या किमतींना विकता आल्या असत्या. पण त्यांनी तसं करण्याचा विचारही केला नाही. त्यांच्यासाठी ह्या वस्तूंची पैशांतली किंमत महत्त्वाची नाहीये. लोकांनी यावे आणि त्यांच्या वस्तू पाहाव्या, त्यांना स्पर्श करावा, व त्यांच्याशी नातं जोडावं, अशी त्यांची इच्छा आहे. तो संवाद त्यांना आनंद देतो. त्यांचा दृष्टिकोन औपचारिक वातावरण तयार करण्याचा किंवा वस्तूंचं काटेकोरपणे जतन करण्याचा नाहीये. नाती जोडणं आणि त्यांचा संग्रह इतरांसाठी खुला करणं असा त्यांचा उद्देश आहे.

पूर्वी : तुमच्या चित्रपटात तुम्ही असं दाखवता की त्यांना त्यांच्या वस्तूंचं एक संग्रहालय उभारायचं आहे. आपण ह्याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल का ? ते तयार करू पाहत असलेल्या संग्रहालयाची त्यांची कल्पना काय होती ? आणि संग्रहालयाच्या परंपरागत वसाहतवादी कल्पनेपेक्षा ते वेगळं कसं होतं असं तुम्हाला वाटतं ?

ओहिदा : सामान्यत: जेव्हा आपण एखाद्या संग्रहालयाचा विचार करतो, तेव्हा प्रामुख्याने त्यात असलेल्या वस्तूंचा विचार होतो. मी माझ्या बाबतीतही हे पाहिलं आहे. अलीकडेच मी माझं काम एका मोठ्या संग्रहालयात प्रदर्शित केलं. मी एप्रिल २०११ मध्ये पहिल्यांदा संग्रहालय पाहिलं. कोलकात्याचं इंडियन म्युजियम. ते माझ्या महाविद्यालयाला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्टला जोडूनच आहे. कॉलेजचा प्रवेश अर्ज घेण्यासाठी मी काही भावंडांसोबत तिथे गेले होते. त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची होते.

ग्रामीण भागात वाढल्यामुळे मला तोपर्यंत कधीही संग्रहालय पाहण्याची संधी मिळाली नव्हती. माझ्यासाठी संग्रहालयाची कल्पना एखाद्या जादुई घरासारखी होती. जेव्हा मी इंडियन म्युजियममध्ये गेले तेव्हा पहिल्यांदाच इतका मोठा डायनासोरचा सांगाडा किंवा हत्तीचा दात पाहिला. मला त्या वस्तूंच्या इतिहासापेक्षा, त्या संग्रहालयाबद्दल एक कल्पनारम्य जागा म्हणून आकर्षण आणि आश्चर्य होतं. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला संग्रहालय असं सादर झालं.

कालांतराने, मी कला महाविद्यालयात गेल्यानंतर, संग्रहालयांबद्दलची माझी समज प्रगल्भ झाली. मला वाटतं की आज जगात जवळजवळ ५५,००० संग्रहालयं आहेत. त्यांचं महत्त्व बहुधा त्यांच्या प्रदर्शित वस्तूंच्या मूल्यामध्यं असतं मग ते कलात्मक, सांस्कृतिक किंवा आर्थिक असो.

पण जर तुम्ही माझ्या चाचांची संग्रहालयाची कल्पना पाहिली तर ती पूर्णपणे वेगळी आहे. ते त्यांची नखं आणि केसांसारख्या वैयक्तिक वस्तू गोळा करतात आणि त्याचाही त्यांच्या संग्रहालयात समावेश करतात. त्यापलीकडे, चाचांच्या संग्रहात काही मौल्यवान वस्तूदेखील आहेत ज्या त्यांना मोठमोठ्या किमतींना विकता आल्या असत्या.  पण त्यांनी तसं करण्याचा विचारही केला नाही. त्यांच्यासाठी ह्या वस्तूंची पैश्यातली किंमत महत्त्वाची नाहीये. लोकांनी यावे आणि त्यांच्या वस्तू पाहाव्यात, त्यांना स्पर्श करावा आणि त्यांच्याशी नातं जोडावं अशी त्यांची इच्छा आहे. तो संवाद त्यांना आनंद देतो. त्यांचा दृष्टीकोन औपचारिक वातावरण तयार करण्याचा किंवा वस्तूंचं काटेकोरपणे जतन करण्याचा नाहीये. नाती जोडणं आणि त्यांचा संग्रह इतरांसाठी खुला करणं असा त्यांचा विचार आहे. 

सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल २०२३ मधील ‘ड्रिम युवर म्युजियम’ या प्रदर्शनातील चित्रपट. छायाचित्र सौजन्य : खंदाकर ओहिदा

पूर्वी : तुम्ही बर्लिन बिनाले आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्यांच्या संग्रहातला काही भाग प्रदर्शित केला होता. लोकांना त्यांच्या संग्रहाची ओळख करून देण्याच्या हेतूने तुम्ही अजून काही विचार करत आहात का ? 

ओहिदा : लोकांना ह्या वस्तूंच्या जवळ आणायचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील लोकांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास मदत करू शकेल अशी जागा तयार करावी असा माझा आताचा उद्देश आहे. त्यांना काही शिकवावं म्हणून नाही, पण ते रमू शकतील, चर्चा करू शकतील अशी जागा तयार करण्यासाठी माझ्याकडे खूप कल्पना आहेत. एक म्हणजे, पर्यायी संग्रहालय तयार करणे, जिथे लोक सहज भेटून चहा वगैरे घेऊ शकतील, त्यांना हवं असल्यास वस्तू तात्पुरत्या घेऊन जाऊ शकतील आणि वापरून झाल्यावर त्या परत करू शकतील. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या संवादामुळे लोकांना आनंद मिळू शकेल आणि एक सामूहिक मालकीची भावना निर्माण होईल.

शाळांमध्ये घेऊन जाता येईल अशा व्हर्च्युअल रिॲलिटी म्युझियम ह्या संकल्पनेचाही मी विचार करत आहे, ह्याद्वारे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इमर्सिव्ह पद्धतीने ती जागा अनुभवता येईल. आम्ही सुरुवातीला एका मातीच्या घरात प्रत्यक्ष भौतिक संग्रहालय दाखवण्याचाही विचार केला होता, परंतु काही कारणांनी हा प्रकल्प रेंगाळला.  ही संपूर्ण संकल्पना म्हणजे एक कल्पनारम्य अवकाश आहे. माझं त्यावरचं काम सुरू झालं आहे, परंतु ते पुढे नेण्यासाठी मी अजून निधी मिळण्याची वाट पाहत आहे.

कला महाविद्यालयात शिकायला मिळणं आणि माझ्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जागा, लोक आणि मार्गदर्शक ह्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणं ह्या दोन्हींबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते. आता मला वाटतं की, एक कलाकार म्हणून समाजाचं देणं देण्याची वेळ आली आहे. मी माझी वैयक्तिक कारकीर्द पुढे चालू ठेवणार आहेच, त्याचबरोबर, मला एक वेगळ्या पद्धतीचं संग्रहालय बांधून समाजासाठी योगदान द्यायचं आहे.

अजून एक कल्पना म्हणजे, लोकांना, विशेषत: ग्रामीण महिलांना त्यांच्या आकांक्षांचा पाठपुरावा करता येईल अशा संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणारी जागा निर्माण करणे. अशी जागा, जिथे त्या एकत्र येऊ शकतात, इतरांसमोर मनातल्या कल्पना मांडू शकतात आणि अर्थपूर्ण चर्चा करू शकतात. कदाचित, असं एक संग्रहालय, ज्याचं स्थानिक संस्कृतीशी घट्ट नातं आहे —  एक वेगळ्या प्रकारचं संग्रहालय. माझ्याकडे अनेक कल्पना आहेत … त्या कशा विकसित होतात, ते पाहू या !

पूर्वी : ओहिदा, खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचा प्रकल्प मला खूप भावतो आणि अर्थपूर्ण वाटतो. त्याद्वारे तुम्ही करू इच्छित असलेल्या सर्व उपक्रमांसाठी तुम्हांला शुभेच्छा.

ओहिदा : धन्यवाद !

’ड्रिम युवर म्युजियम’ हे ओहिदांचे बर्लिन बिनाले २०२२ मधील प्रदर्शन. छायाचित्र सौजन्य : Dotgain.info

Post Tags

Leave a comment