Skip to content Skip to footer

पाणी: मूळ कानडी कथा: जयंत कैकिणी | मराठी अनुवाद: प्राजक्ता पाडगांवकर 

Discover An Author

  • Poet, Short Story Writer, Lyricist and Playwright

    Jayant Kaikini is a Kannada poet, short-story writer, columnist, and playwright. He has six poetry collections, seven short story volumes, five nonfiction volumes, and four adapted plays to his credit. He is also a film lyricist for Kannada films. Born in Gokarn, Kaikini is a biochemist by training. He worked in Mumbai for many years in pharma factories before shifting to Bengaluru. He did a series on literary legends for television and edited a literary magazine that was short-lived. He writes with a pen. He has received the Karnataka Sahitya Academy Book Award (1974, 1982, 1989, 1996), the Katha Award (1996), the Kusumagraj National Award (2010), and the Filmfare Award for Best Lyrics (2008, 2009, 2016, 2017, 2022). He also received the DSC Prize for South Asian Literature for No Presents Please, a selected collection of Mumbai stories translated into English by Tejaswini Niranjana (2018).

    जयंत कैकिणी हे कानडी कवी, लघुकथालेखक,स्तंभलेखक आणि नाटककार आहेत. सहा कवितासंग्रह, पाच निबंधसंग्रह, सात लघुकथासंग्रह आणि चार रूपांतरित नाटके अशी विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. ते कानडी चित्रपट माध्यमांत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. कैकिणी ह्यांचा जन्म गोकर्ण येथील असून शिक्षणाने ते बायोकेमिस्ट आहेत.  त्यांनी अनेक वर्षे मुंबईतील औषधनिर्मिती कारखान्यांमध्ये काम केले आणि नंतर ते बंगळूरुला स्थायिक झाले. त्यांनी दूरदर्शनसाठी साहित्यक्षेत्रातील दिग्गज लेखकांवर एक मालिका तयार केली आणि एका साहित्यविषयक नियतकालिकाचे संपादनही केले, जे फार काळ चालले नाही.  विशेष म्हणजे, लेखनासाठी कैकिणी पेनचा वापर करतात. त्यांना कर्नाटक साहित्य अकादमीचे पुरस्कार (१९७४, १९८२, १९८९, १९९६), कथा पुरस्कार (१९९६), कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार (२०१०), आणि सर्वोत्कृष्ट गीतांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड (२००८, २००९, २०१६, २०१७, २०२२) अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यानो प्रेझेंट्स प्लीज  (इंग्रजी अनुवाद: तेजस्विनी निरंजना, २०१८) या मुंबईवरील निवडक कथांच्या संग्रहासाठी त्यांना डीएससी प्राईज फॉर साऊथ एशियन लिटरेचर हा पुरस्कार मिळाला आहे.  

  • Writer and Researcher

    प्राजक्ता पाडगांवकर ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित लेखिका आणि संशोधक आहेत. त्यांना सहा भाषा अवगत असून, वृद्धसंगोपन आणि जराविज्ञान ह्या विषयांत त्या स्वतंत्रपणे संशोधन करतात. त्यांचे सांजवात हे पुस्तक २०२० साली राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. वृद्धसंगोपन आणि वृद्धसंगोपन-व्यवस्थापन ह्या विषयावर हे पुस्तक भाष्य करते. त्यांचे दोनशेहून अधिक लेख, भारतातील आणि अमेरिकेतील विविध वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. अक्षय भाषा ह्या अ‍ॅरिझोनास्थित संस्थेतर्फे त्यांच्या कथांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या सध्या अँटीओक विद्यापीठातून एमएफए ह्या पदवीचे शिक्षण घेत असून, कथासाहित्य, नाट्यलेखन आणि पटकथा लेखन ह्या विषयांचा अभ्यास करत आहेत.

    Prajakta Padgaonkar is an Indian American writer, researcher and polyglot. She has studied six languages and has been an independent researcher in geriatrics and gerontology. Her Marathi non-fiction book, Sanjwat has been published by Rajhans Prakashan in 2020. She has published over 200 articles in various magazines and newspapers in India and USA. Her short stories have been recognized by Akshay Bhasha Foundation Arizona. She is currently an MFA student at Antioch University, where she is studying Creative Fiction, Playwriting and Screenwriting.

“आपण साधारण वीस मिनिटांत मुंबई विमानतळावर उतरणार आहोत. सर्वांना विनंती  करत आहोत, कृपया तुमचे सीटबेल्ट बांधा.” चंद्रहासला विमान नेहमीपेक्षा थोडं जास्त हलत असल्याचं जाणवलं. त्याने चष्म्यातून  बाहेर आकाशाकडं पाहिलं. एव्हाना, त्याला ढगांच्या तलम पडद्यातून खंडाळा, माथेरान, कार्ला आणि लोहगड दिसायला हवं होतं. आता पर्यंत, त्या खाली असलेल्या डोंगरांमध्ये चंद्रहासने पूर्वी केलेली कोणतीतरी सहल, एखादा ट्रेक, कोणतीतरी ट्रिप किंवा प्रशिक्षण शिबिर यांची एखादी छान आठवण व्हायला हवी होती. पावसाळ्यात त्याच्या मित्रांना आणि त्याला घाबरवणारा कार्ला तलाव, एखाद्या लकाकत्या धातूच्या बिल्ल्यासारखा दिसायला हवा होता. पण त्याला ढगांच्या जाड भिंतींशिवाय काहीही दिसत नव्हतं, आणि विमान एका बाजूने दुसऱ्या बाजूला अंमळ जास्तच भेलकांडत होतं. या अशा परिस्थितीत विमान उतरू शकेल का, याबाबत चंद्रहासला खात्री नव्हती. विमानाच्या धक्क्याने हादरल्यावर त्यानं त्याच्या सहप्रवाशांकडे साशंक चेहऱ्यानं पाहिलं आणि तेवढ्यात घोषणा झाली, “खराब हवामानामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया आपापल्या सीटवर परत येऊन सीटबेल्ट बांधा.” “माय गुडनेस” चंद्रहासच्या शेजारी बसलेले वृद्ध गृहस्थ विमानाच्या धक्क्यातून सावरत उद्गारले. चंद्रहास त्यांचा हात थोपटत, त्यांना धीर देत हसला.

गेल्या दीड तासात, दोघांच्याही पुष्कळ गप्पा झाल्या होत्या, आणि आता एक अवघडलेली शांतता दोघांत पसरली होती. त्या गृहस्थांचं नाव संतोषन होतं. ते मल्याळी होते, भारतभर फिरून, कालांतराने तीस वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये त्यांनी स्वतःचा कारखाना उभारला होता. आता गेल्या दोन वर्षांपासून ते त्यांच्या एकुलत्या एक मुलीसोबत बंगळुरूमध्ये राहत होते. त्यांना बरं वाटत नव्हतं, आणि उपचारांसाठी ते नियमितपणे एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे मुंबईला येत असत. सामान्यतः त्याची मुलगी किंवा जावई त्याच्यासोबत यायचे. आज त्यांच्या जावयाला उशीर झाला होता, आणि तो पुढच्या फ्लाइटने येणार होता. ह्या वृद्ध गृहस्थांना जरा हुरूप यावा म्हणून आपल्या आवाजातला थकवा लपवत चंद्रहास म्हणाला, “तुम्ही नक्की बरे व्हाल. तुमच्या डोळ्यात बघून मला तशी खात्री वाटते आहे.” हसत-हसत ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, “तू म्हणत असशील तर मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. मी व्यवसायात असताना कधीच कोणावर विश्वास ठेवला नाही. फक्त पैशांवर विश्वास ठेवला. पण आजारी पडल्यापासून मी कोणाच्याही म्हणण्यावर विश्वास ठेवतो.”

संतोषनला त्यांच्या सहप्रवाशाबद्दल काहीही जाणून घ्यायचं नव्हतं, शेवटी काहीसं अवघडत चंद्रहास स्वतःहूनच सांगू लागला, “मी कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यावरील होन्नावरचा. गेल्या दहा वर्षांपासून मी मुंबईत काम करतोय. बंगळुरूमध्ये ह्याहून चांगल्या नोकरीसाठी माझी मुलाखत झाली. त्यांनी माझ्या प्रवासाचा खर्चही दिला. मला माझ्या सध्याच्या पगाराच्या दुप्पट पगार देणार आहेत. ही नोकरी मिळाल्यातच जमा आहे. पण आता मला काय करावं ते कळत नाहीये .” “काळजी करू नकोस रे,” संतोषन म्हणाले, “तू जिथं चांगलं काम करू शकशील तिथंच राहा. बाकी सर्व आपोआप नीट होईल. मग ते टिंबक्टू असो वा मायामी असो, मुंबई असो किंवा इतर कुठंही असो. जर तुम्हांला योग्य वातावरण मिळालं आणि तुम्ही स्वतःला कामात झोकून देऊ शकलात, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशाची आणि शहराची सेवा करता. उलटपक्षी, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्याच राज्यात किंवा शहरात राहून आळशी, भ्रष्ट किंवा दुष्ट राहिलात, तर तो सर्वांत मोठा विश्वासघात आहे.” चंद्रहासला सदिच्छा देऊन तो वृद्ध गृहस्थ जो झोपला, तो जेव्हा वादळी वाऱ्यांनी विमानाला धक्का बसला तेव्हाच जागा झाला. चंद्रहासला अंदाज आला की त्या वृद्ध गृहस्थाला, जावई वेळेत येऊ शकेल की नाही, त्याला पावसामुळे  उशीर होईल की काय, अशी काळजी वाटत असावी. तो म्हणाला, “काही काळजी करू नका , एअर-होस्टेस सर्व प्रवाशांनी त्यांचे सीटबेल्ट बांधले आहेत की नाही हे तपासण्यासाठी विमानातून फिरत होत्या, तेव्हा मी त्यांच्याकडे बघितलं होतं. जेव्हा जेव्हा टर्ब्युलन्स असतो, तेव्हा मी एअर-होस्टेसच्या चेहऱ्यांकडे पाहतो. जर त्या शांत दिसत असतील, तर सर्व ठीक आहे असं समजतो. पण जर त्या काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्यासारख्या दिसल्या, तर काळजी करण्यासारखं काही असू शकतं. पण बघा, ती तर चक्क हसते आहे.” संतोषननी मान डोलावली. विमानाचा आवाज वाढला आणि ते खाली उतरू लागलं. विमान जसजसं वेगानं खाली येऊ लागलं, तसा विमानातल्या सर्वांनी जो श्वास रोखून धरला, तो पार विमान धडधडत धावपट्टीवर उतरेपर्यंत सगळेच धास्तावलेले होते. 

मुंबई विमानतळ दुपारच्या उन्हात लख्ख चमकत होतं, जणू काही त्यांच्या भयावह प्रवासाची थट्टा करत होतं. विमानातून उतरण्याच्या घाईत प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करत होते. संतोषननी चंद्रहासला उतरण्यासाठी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रहास म्हणाला, “मला घाई नाही सर. जर तुम्हांला चालणार असेल, तर मी तुमचा जावई येईपर्यंत तुमच्यासोबत थांबतो बघा.” “खरंच?”  त्या वृद्ध गृहस्थाने अडखळत विचारलं. मग तो पुढे म्हणाला, “मग एक मदत करशील ? या हवामानात पुढची फ्लाइट वेळेवर पोहोचेल, अशी खात्री वाटत नाही मला. माझ्या जावयाची वाट पाहण्यापेक्षा मला थेट हॉस्पिटलमध्ये जावंसं वाटतंय. माझी अपॉइंटमेंट दुपारी तीन वाजता आहे. जर ते तुझ्या वाटेवर असेल, तर तू मला तिथे सोड आणि  मग पुढे जा.” “हरकत नाही,” चंद्रहास म्हणाला. “एखादी  रिक्षा पण चालेल,” संतोषन म्हणाले, पण चंद्रहासने टॅक्सी बोलावली आणि ते दोघेही आत बसले. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या पाण्याने चमकत होत्या, जणू मुंबई विमानतळ ही एकमेव जागा होती, जिथं पाऊस पडला नव्हता. चंद्रहास म्हणाला, “तुम्हांला हे काहीही वाटेल, सर, मात्र मुंबईत काही काळ राहिल्यानंतर किंवा प्रवास करून परत आल्यावर, इथं अगदी सुरक्षित वाटतं. इथले टॅक्सीवाले आणि ऑटोवाले पाहा, ते नेहमीच तुमची चिल्लर परत देतात, ती रक्कम कितीही कमी असली तरी पण. इथं काहीतरी खास आहे, जे आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवतं,” त्याने त्याच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि संतोषनला दिली. ते म्हातारे गृहस्थ जसे पाणी प्यायला लागले, तशा त्यांच्या मानेवरल्या नसा हलकेच चमकल्या. त्यांच्या मानेवर रेडिएशन थेरपीच्या  तपकिरी — भाजल्यासारख्या — खुणा पाहून, चंद्रहासने, त्या वृद्ध गृहस्थांना लवकर बरं वाटावं, अशी मनातल्या मनात प्रार्थना केली.

“तुझं अगदी बरोबर आहे. मलाही मुंबईत माझा व्यवसाय सुरू करायचा होता, आणि मी काही काळ इथं राहिलो देखील. पण ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, ती अहमदाबादची होती, आणि ती ते शहर सोडण्यास काही केल्या तयार होईना. मी तुला एक लोककथेतली गोष्ट सांगतो — एक राजा होता. तो शिकारीला गेला होता, आणि तिथं एका पक्ष्याचा त्यानं आवाज ऐकला. तो दैवी स्वर त्याला इतका आवडला की त्या राजानं तिथली ती फांदी, ते झाड, ते अरण्य, आणि ते राज्य सगळंच काबीज केलं. त्यानं तिथंच आपलं राज्य स्थापन केलं, आणि त्याच्या आधीच्या राज्यात परत कधीच गेला नाही. त्या कथेतल्या राजासारखं माझं झालं बघ,” मध्येच, संतोषन टॅक्सी ड्रायव्हरकडे मान वळवून म्हणाले, “आणि तू रे, हिरो, तू पडला आहेस का कधी प्रेमात ?” ड्रायव्हर हसला, “परवडता नही साब, ये सब प्यार-व्यार !” दोघांच्या संभाषणाने उत्तेजित होऊन तो पुढं म्हणाला, “बम्बई में पैसा पानी के माफिक बहता है, साब । किसी किसी को वो दिखता है, किसी को नहीं दिखता । जिस के हाथ मे पैसा खेलता है वो मस्त टॅक्सी से घुमते, और जिन को नहीं दिखता, वो सब टॅक्सी-ड्राइव्हर बनते हैं ।” “नाही, नाही,” चंद्रहास म्हणाला, “माझ्यासारखे लोक पण आहेत रे बाबा, ज्यांना पैसे दिसतात, पण ते तो पैसा पकडून ठेवू शकत नाहीत.”

टॅक्सी-ड्रायव्हरने त्याचं नाव कुंजबिहारी असल्याचं सांगितलं होतं. तो काळ्या भिंतीसारख्या दिसत असलेल्या आकाशाकडे बघत बोलला, “वो देखो, साब, आज खूप पाऊस पडेल, बहुत बारिश गिरनेवाला है ।” चंद्रहासला नेहमीच मुंबईतील पावसाला ‘पाणी पडणं’ असं संबोधणं गंमतीशीर वाटायचं. त्याला होळी आठवायची, जेव्हा वरच्या मजल्यावरून कोणीतरी खाली खेळणाऱ्यांवर बादलीने रंगीत पाणी फेकायचं. सांताक्रूझनंतरच्या फ्लायओव्हरवर टॅक्सीचा वेग मंदावताच आकाश आणखी गडद झालं. “ते बघ, कुंजबिहारी, आकाशात भरपूर पैसे जमा होत आहेत,” संतोषन म्हणाले.

हिंदुजा हॉस्पिटलबाहेर ड्रायव्हरला वाट पाहण्यास सांगून, चंद्रहास संतोषनसोबत डॉक्टर दस्तूर ह्यांना भेटण्यासाठी आत गेला. संतोषनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून, चंद्रहास त्यांच्यासोबत तिथेच थांबून वाट बघू लागला. त्याने, चर्चगेटला एका ऑफिसात काम करणाऱ्या आपल्या पत्नीला — सरयूला — फोन केला, आणि तिला कळवलं, “अगं, असं दिसतंय की खूप मुसळधार पाऊस पडणारे. तू ऑफिसमधून लवकर निघ बघू. मी काही तासांत घरी पोहोचेन … हो, मला माहिती आहे, आज आपल्याला कर्जाचा हप्ता भरायचा होता, उद्या नक्की भरू या … प्लीज, अगं, काही फरक पडत नाही … मला माहीत नाही, मला वाटतं की मला नोकरी मिळाल्यातच जमा आहे … हो, हो, मी त्यांना सांगितलं, मला तिथं घर द्यावं लागेल म्हणून … नाही, आपल्याला आता निर्णय घ्यायचा आहे. मला कळतंच नाही गं, सरयू, तू मला सांग, काय करायचं. आपल्याला हे शहर आवडतं, म्हणून आपण इथं किती काळ संघर्ष करायचा ?” काहीसं कुजबुजत, निरोप घेत, त्यानं फोन ठेवला. संतोषननी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, “हे अगदी बरोबर केलंस, ती सांगेल तसंच कर.” 

तेवढ्यात संतोषनचं नाव पुकारलं गेलं. त्यांनी लगबगीने पुढं होत, चंद्रहासला सोबत येणार का, विचारलं. पडद्यामागं त्या वृद्ध गृहस्थाची तपासणी केल्यानंतर डॉ. दस्तूर म्हणाले, “उत्तम ! मिस्टर संतोषन, तुमची तब्येत अगदी ठणठणीत आहे. बंगळुरूमध्ये तुमच्या डॉक्टरांकडून  होणारे उपचार योग्य आहेत. कदाचित तुम्हांला रेडिओथेरपीची अजून एक सायकल करावी लागेल, पण तुम्ही ती तिथंही करू शकता. आज तुमची मुलगी का नाही आली ? कशी आहे ती ? ती चालवते ती शाळा कशी चालू आहे ?” बोलता-बोलता, डॉक्टरांनी त्यांच्या लेटरहेडवर पुढच्या उपचारांचा तपशील लिहून काढला. पहिल्यांदाच, चंद्रहासला संतोषनच्या वागण्यात एक पराकोटीची असहाय्यता जाणवली. ते वृद्ध गृहस्थ, क्षीण आवाजात बोलू लागले, “डॉक्टर साहेब …”’

“’बोला ?” डॉक्टरांनी लिहिता-लिहिता विचारलं. 

“खरंच, तसं काही विशेष नाही, पण पुढच्या एप्रिलमध्ये माझ्या नातीचं लग्न असू शकतं — ते आत्ता ठरतंय …”

 “अरे देवा … लग्नाच्या वयाची नात आहे तुम्हांला ? तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही ! हरकत नाही. मी बघतो, बंगळुरूमध्ये एखादा सेमिनार असेल, तर त्या निमित्ताने मी तिकडं येईन आणि लग्नाला नक्की उपस्थित राहीन.”

“डॉक्टर, तसं झालं तर छानच होईल, पण मला ते म्हणायचं नव्हतं …”

“मग ?”

“फक्त सहा महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत तुम्हांला मला जिवंत ठेवावंच लागेल.”

“छे, काहीही काय ! तुम्ही तर शंभरी गाठाल.” 

“तुम्ही सर्वांची अशीच बोळवण करत असणार. तरी पण तुम्ही असं म्हणता, तेव्हा तुम्ही मला अगदी देवासारखे वाटता. मला तुमच्यावर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय तरी काय आहे म्हणा ? पण मला माहीत आहे की माझ्याबाबतीत काय चालू आहे ते …”

तेवढ्यात, संतोषनच्या जावयाचा फोन आला. त्याचं विमान अजून बंगळुरूहून निघालं नव्हतं. “’काळजी करू नका, मी डॉक्टरकडे आहे. मी तुम्हांला नंतर फोन करेन,” संतोषन फोन ठेवत म्हणाले. “डॉक्टर, काहीही करून एप्रिलपर्यंत माझं आयुष्य वाढवा. मी माझ्या नातीला वचन दिलंय की मी तिच्या लग्नात हजर असेन. कृपया प्रयत्न करा.” डॉ. दस्तूरने लटक्या रागाने त्यांना हळूच एक चापट मारली. “काय बरळताय ! तुम्ही तुमच्या नातीची मुलगी नक्की बघणार,” त्यांनी चंद्रहासकडे दुजोऱ्यादाखल पाहिलं. चंद्रहासच्या मनावर मळभ दाटून आलं. “मी बाहेर वाट पाहतो.” बाहेर पडत तो उद्गारला. संतोशनची ती आर्जवं, त्याला, एखादा असहाय्य भाडेकरू त्याच्या घरमालकाला आणखी सहा महिने राहण्याची परवानगी मागतो तेवढीच अगतिक वाटली. संतोषनची मागणी साधीशीच तरी मनाला भिडणारी होती. बाहेर लोकांच्या रांगाच्या रांगा होत्या, सगळेच त्यांची पाळी येण्याची वाट बघत होते. ते त्यांची आर्जवं मांडण्याची वाट पाहत होते. काहींसाठी काही महिने, तर काहींसाठी काही दिवस …

तेवढ्यात त्याला कुंजबिहारी त्याच्याकडे लगबगीने धावत येताना दिसला. तो ओरडत होता, “साब … बहुत बारिश गिर रहा है ! जल्दी निकलो, नही तो  आज हम घर नही पोहोचेगा. लोकल सब स्लो चल रही है । सायन और कुर्ला में पटरी पे पानी है । ट्रॅफिक भी स्लो है । अगर आप लोग को और ज्यादा रुकना है, तो मैं जाता हूं,” तो, संकटाची चाहूल लागलेल्या एखाद्या प्राण्यासारखा सावध होता. चंद्रहासनं त्याला धीर दिला, “नही निकलते है , बस एक मिनिट रुको, ऐसे मोसम में ये अंकल किधर जायेंगे अकेले ? उनको जिधर जानेको मंगता, उधर छोडते है और फिर निकलते है ,’ चंद्रहास आत गेला आणि कुंजबिहारी बाहेर पळाला. तो ह्या हॉर्न वाजवणाऱ्या वाहनांच्या चक्रव्यूहातून त्याची गाडी बाहेर कशी काढणार, ह्याच पेचात होता. 

जेव्हा टॅक्सी मुख्य रस्त्यावर आली, तेव्हा दिवस जणू अकाली रात्रीत बदलला होता आणि आकाशातून पाण्याचे लोट पडत होते. दूरच्या उपनगरात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांनी रस्ते भरलेले होते. “अरे, काय मज्जाए मुंबईच्या पावसाची !” संतोषन उद्गारले. “’मजा ? कैसी मजा ? अब देखोगे आप,” हात चोळत, बाह्या सरसावत कुंजबिहारी गुरगुरला. एखाद्या युद्धाची तयारीच करत असल्यासारखा त्याचा आवेश होता. टॅक्सी छोट्या गल्लीबोळांत घुसवत तो त्यांना माहीम खाडीकडे घेऊन जाऊ लागला. “तुम्ही मला कुठेही सोडू शकता. वांद्रे बँडस्टँडवर माझे मित्र आहेत. ते मला घ्यायला येतील,” संतोषन म्हणाले. कुंजबिहारी म्हणाला, “कोई नहीं आनेवाले, सब किधर किधर अटके हैं … खल्लास ! सब पुरे फस गयेले, इधर माहीम में किधर तो, और वो देखो,” कपाळावर हात मारत तो बाहेरच्या वांद्रे उड्डाणपुलावरील कोंडीकडे बोट दाखवत म्हणाला. तिथली  अडकलेली वाहने हजारो मुंग्यांसारखी भासत होती, तिथं कोणतीही हालचाल झाल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. या अक्राळविक्राळ, बधिर करणाऱ्या पावसात संपूर्ण शहरच बुडल्यासारखं भासत होतं. पुलावर, कुंजबिहारीच्या प्रवाशांना बसल्या ठिकाणावरून, खालच्या लोकल गाड्या, पाणी भरलेल्या ट्रॅकवर थांबलेल्या दिसत होत्या. काही धाडसी प्रवाशांनी कंबरेपर्यंत असलेल्या पाण्यात उड्या मारल्या होत्या आणि ते इकडे-तिकडे पोहत असल्यासारखे दिसत होते. लोक थांबलेल्या बसमधून उतरले होते आणि त्यांच्या घराकडे पायी निघाले होते. “अजून एखाद तासात पाऊस थांबेल आणि सर्व काही ठीक होईल.” “आणखी दोन तासांत ते पोलिस ट्राफिक ओक्के करतील.” चंद्रहास ही वाक्यं पुन्हा पुन्हा बोलून कंटाळला होता. 

टॅक्सीच्या एफएम रेडिओवरून त्यांना संपूर्ण शहर कसं ठप्प झालंय याबद्दल बातम्या ऐकू येत होत्या. लोकांकडून त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या मुलांना, आणि त्यांच्या मित्रांनाही रेडिओ स्टेशनवरून संदेश पोहोचवण्यात येत होते “आहो, तुमी कुठं असा ?”

“तुस्सी ऑफिसविच रुक ओय.”

“मी माझ्या मामीच्या घरी जाईन बरं.”

“हूं ठीक छू.”

“मी स्टेशन प्लॅटफॉर्मवरच थांबून राहलोय बे.”

तोवर, वीज ग्रिड आणि टेलिफोन कंट्रोल बॉक्समध्ये पाणी भरलं आणि शहराच्या फोन लाईन्स शांत झाल्या.

चंद्रहासने मोबाईलवरून सरयूला फोन करण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण फोन लागलाच नाही. चंद्रहास विचार करत राहिला, ‘कोणास ठाऊक, कदाचित ती अजूनही तिच्या ऑफिसमध्येच थांबली असेल. कदाचित ती चर्चगेट स्टेशनवर ट्रेनच्या डब्यात असेल. कदाचित ती पाण्यानं भरलेल्या रस्त्यांवरून चालत असेल.’ “फार काळजी करू नकोस,” संतोषन म्हणाले, “’ती नक्कीच सुरक्षित असेल.” अशी समजूत घालता-घालता त्यांना जाणवलं की त्यांचा जावई देखील मुंबईला येऊ शकणार नव्हता. कुंजबिहारी, एक काम कर. मला परत विमानतळावर नेऊन सोड. माझ्याकडं परतीचं तिकीट आहे. मी मिळेल त्या विमानानं परत जाईन.” “ये ट्रॅफिक छूटने तक अब हम किधर भी नही जा सकते, साब,” असं म्हणत ड्रायव्हर टॅक्सीतून उतरून पुढे काय चाललंय ते पाहण्यासाठी पाण्यातून वाट काढत जाऊ लागला.  

रात्र पावसाच्या अंधारात मिसळू लागली होती. पावसाच्या पाण्याचे लोट जणू जुन्या प्रतिमांचे सर्व रंग गढूळ  करत होते. पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर राहणारे प्रवासीही अडकलेल्या बसमधून पाण्यात उतरत होते, आणि लोक ठप्प झालेल्या वाहनांमधून हळूहळू वाट काढत निघाले होते. शहरात सर्वत्र पाणी वेगानं वाढत होतं. चंद्रहास विचार करत होता, ‘ज्या ढगांच्या गडगडाटाने विमान दुपारी हादरलं  होतं, तेच ढग आता फुटून बरसत होते.’ ते ढग आता युद्धासाठी सज्ज रणगाड्यांच्या तुकडीसारखे भासत होते. चंद्रहासला प्रश्न पडला, एवढा ‘प्रचंड पाऊस’ त्या बिचाऱ्या, मरणाला दूर लोटू पाहणाऱ्या वृद्ध गृहस्थांच्या मनात कोणत्या प्रकारचं वादळ निर्माण करत असेल ? “सर, मी आपल्यासाठी काहीतरी खायला आणू ? रेडिओ ऐकत राहा, मी लवकरच परत येतो,” असं सांगून चंद्रहास टॅक्सीतून उतरला आणि माहीम मार्केटकडे चालू लागला. रस्त्यांवरून जी मंडळी चालत निघाली होती, ती चिंब भिजली होती. त्यांच्यात एक निराळीच झिंग होती, गाडीत अडकून राहिलेल्या प्रवाशांना डिवचत, ओरडून चिडवत होती, “ही बस आज तरी अजिबात हलणार नाही, संपूर्ण हायवे पाण्याखाली आहे, बाहेर पडा, चलो निकलो.” 

“माहीम खाडीला पूर आलाय.”

“समिंदराचं पानी सखल भागात शिरून राहिलं बघ !”

“कलानगरच्या सर्व घरांचे तळमजले पाण्याखाली गेले म्हणतात.”

जमाव जेव्हा स्वतःशीच बडबडत निघाला, तेव्हा तुकड्या-तुकड्याने ही माहिती शहरातील प्रत्येकापर्यंत पोहोचली होती. मुसळधार पावसात शाळेच्या भिजलेल्या बॅगा घेऊन जाणारी लहानलहान पोरं दिसत होती, सगळी वाकलेल्या गिर्यारोहकांसारखी चालत निघाली होती. कुठे राहत असतील ही पोरं ? घरी कशी पोहोचणार ? कधी पोहोचणार, कोणास ठाऊक ? दुकानदार मुलांना हाका मारत होते आणि त्यांना बिस्किटं, ब्रेड आणि केळी वाटत होते. परिसरातील लोक मुलांना, त्यांच्या घरात येऊन पाऊस थांबेपर्यंत वाट बघायला सांगत होते. बसमधून उतरणाऱ्या महिलांसाठी आणि मुलांसाठी, शेजारच्या चाळींमधील आणि अपार्टमेंटमधील लोकांनी स्वतःची घरं खुली केली होती. 

चंद्रहासनं चिप्सबरोबर काही केळी विकत घेतली, आणि पाण्यातून वाट काढत टॅक्सीकडे परत गेला. संतोषननी नुकतंच कुंजबिहारीशी बोलणं संपवलं होतं. 

“बोरिवली तक ट्राफिक  है, साब. सब शॉर्टकट के चक्कर मे फस कर ट्रॅफिक जॅम हो गया है । पानी इतना भरा है की चलके भी नाही जा शकते, नही तो मैं आप को इधरसे चल के जाने को बोलता । एअरपोर्ट तक एखाद घंटे मे पोच जाते थे । चाचा को एयरपोर्ट पोहोचाके आप वही रुक जाते. कम से कम छत तो मिल जाती , मगर आज चान्स नही, अभी अपनी ये बसंती तुम्हारा इकलौता सहारा है ।

“बसंती ?”

“मेरे टॅक्सी का नाम, साब ।”

“तुझं घर कुठंय, कुंजबिहारी ?”

“काहेका घर, सिर्फ एक खोली है ओशिवरामे । मेरे बीवी-बच्चे सब उधर गावमे, यूपीमे.  मै इधर टॅक्सी चलाकर उनका पेट पालता हूँ ।”

अचानक संतोषननी विचारलं, “कुंजीभाई, तुम्हांला नरकात जायला आवडेल की स्वर्गात ?” 

“क्या टाइम मिला साब, ऐसा सवाल पूछने के लिये !” कुंजबिहारी म्हणाला, “पर देखो, ये पब्लिक को सलाम करना मंगताय, ऐसे टाइम मे भी लोग मजा कर रहे है, जत्रा के माफिक मस्तिमे चल रहे है । जैसे अपन सोचेंगे, उसपर है सब । मैने सोचा ना , सब मस्त है, तो फिर मै मस्त रहेगा; मगर मैं रोतलू के माफिक सोचेगा, कितनी  वाट लगी है आपुन की, तो फिर तो वाट लगेगीच ना ? क्या बोलता है, साब ?”

या ड्रायव्हरचं तत्त्वज्ञान किती सोपं आणि योग्य आहे, हे दर्शवण्यासाठी संतोषननी चंद्रहासकडे बघत भुवया उंचावल्या, आणि म्हणाले, “कुंजबिहारी, कोणीतरी म्हंटलंच आहे — स्वर्गात दुःखी राहण्यापेक्षा नरकात आनंदी राहणं चांगलं.” मग ते मागे टेकून केळं खाऊ लागले.

रेडिओवर त्यांना ऐकू येत होतं की सर्व प्रकारची वाहतूक — विमानं, ट्रेन्स, बसेस — सगळं रद्द करण्यात आलं होतं. त्याचबरोबर काही श्रोत्यांच्या फर्माईशी सांगण्यात येत होत्या :

“’दादर टीटी इथं अडकलेल्या पंकज, श्वेता आणि नोबिनसाठी हे खास गाणं — कजरा रे !”

“घाटकोपर आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान गेल्या सहा तासांपासून ज्योती पटेल आणि तिच्या मैत्रिणी ट्रेनमध्ये अडकल्या आहेत, त्यांच्यासाठी खास आम्ही वाजवत आहोत — दिल चाहता है !”

एवढ्या ताणात असूनही हे शहर अशा प्रकारे एकमेकांशी त्यांची आवडती गाणी शेअर करत होतं.

“अम्मा, मी शिवाजी पार्कमध्ये काकूच्या घरी राहतेय. माझी काळजी करू नकोस, मी उद्या घरी येईन. तू चिडू नकोस, पण माझं शाळेचं दप्तर पोर्तुगीज चर्चजवळच्या नाल्यात पडलं.”

जेव्हा संतोषननी या मुलीचा संदेश ऐकला, संतोषननी ‘अम्मा’ हा शब्द हलकेच पुटपुटला. चंद्रहासवर देखील त्याचा काहीसा परिणाम झाला, एक आवंढा गिळून तो बोलू लागला, “सर, मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. आमच्या जवळच्या कुटुंबातील एका जोडप्याला दोन गोंडस मुलं होती. अचानक तीन वर्षांपूर्वी तिचा नवरा आजाराने वारला. ती बाई आपल्या मुलांना वाढवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिची मुलगी पण अपघातात वारली. आता ती बाई पूर्णपणे खचून गेली आहे. तिला वाटतं की तिला आवडणारे सगळेच मरून जातात की काय. तिला भीती वाटते की जर ती तिच्या आठ वर्षांच्या मुलाशी प्रेमानं वागली, तर तो पण तिला सोडून निघून जाईल ! म्हणून ती त्याच्याशी खूप तुटकपणे आणि तुसड्यासारखी वागते. एक दिवशी हा मुलगा तिला म्हणतो कसा, “अम्मा, जर पेप्सीमध्ये कीटकनाशक असतं असं म्हणतात, तर तू आणि मी, हळूहळू करून दोन मोठ्या बाटल्या प्यायलो आणि स्वतःला मारून टाकलं  तर ?” किती बघा त्रास होत असेल त्याला ! एक आठ वर्षांचा मुलगा आत्महत्या करण्याचा विचार कसा करू शकतो? त्यांच्या पदरी इतकं दुःख ? आपण त्यांचं दुःख कसं कमी करू शकतो, सर ?” 

मध्यरात्र उलटून गेली होती. शहरातली वर्दळ थांबली होती. बसमध्ये आणि ट्रेनमध्ये असलेले लोकं त्यांच्या जागांवर झोपायला गेले. ऑफिस, दुकानं आणि टपऱ्या इथं असलेले लोकं जिथं बसले होते तिथंच पहुडले. ज्यांनी चालायला सुरुवात केली होती, त्यांना असं जाणवलं की ते आता पुढे जाऊ शकत नाहीयेत, आणि त्यांच्या आधीच्या ठिकाणी परतूही शकत नाहीयेत. हॉटेल्सनी त्यांची शटर्स उघडी ठेवली होती, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना आत येऊन झोपता येऊ शकेल. सरदारजींनी शक्य तिथं लंगर लावले होते आणि रस्त्यावर अडकलेल्यांना डाल-रोटी दिली होती. पण शहराचे पाय अजूनही पाण्यात बुडालेले होते. कुंजबिहारी जागा झाला. संतोषनच्या बाजूचं दार उघडून तो म्हणाला, “चाचा, चलो, हम लोग निकलते है.” अर्धवट झोपेत, ते वृद्ध गृहस्थ गाडीतून हळूहळू  लंगडत बाहेर पडले, त्यांच्या पायाला मुंग्या आल्या होत्या. चंद्रहास त्यांच्या मागे निघाला. 

ह्या अशा भीषण रात्री ते चालत निघाले होते. सभोवताली सर्वत्र पाणी, कुठूनसा येणारा प्रकाश, त्यात मिसळलेली भीती, अशात प्रवासामुळे आलेला शीण, अर्धवट झोप आणि खूपसं जागरण, अशा झिंगवून टाकणाऱ्या विचित्र स्वप्नवत अवस्थेत भारल्यासारखे चालत ते दोघे निघालेले. थकवा हाच त्यांच्यामध्ये एक जिव्हाळ्याचा दुवा होता. एकमेकांशी पूर्वापार ओळख असल्याप्रमाणे ते विश्वासाने कुंजबिहारी नेत असलेल्या मार्गाने काही लहानलहान गल्ल्यांमधून वाट काढत पाण्यात अर्धवट बुडालेल्या एका जुनाट घरापाशी आले. काही मुले बालद्यांनी जेवढं जमेल तेवढं पाणी काढण्याचा प्रयत्न करत होती. तिथं एक खाट, एक खुर्ची आणि कपाटं होती. बाजूच्या खुंट्यांवर एक कापडी पिशवी, एक छत्री, घड्याळ, एखाददोन साड्या टांगलेल्या दिसत होत्या. त्या सगळ्यांत एक बाई तव्यावर रोट्या शेकत होती. “कांचू बहन,  हम कुंजबिहारी, हसमुख का दोस्त, वही जो आप के मिस्टर का — प्यारेमोहनजी का दोस्त है । पहली बार मिलरे अपन । आज पुरी बम्बई फट हो गई ना , हम इधरीच माहीम में फसे।” “तनिक रुको, थोडी रोटी खा लो,” ती बाई म्हणाली, आणि प्रत्येकी दोन रोट्या असलेली प्लेट दिली. ते तशाच पाण्यात उभ्याने त्या विचित्र शांततेत जेवले. बाईच्या मुलांनी त्यांना पाणी दिलं. चंद्रहासला ते पाणी प्यावंसं  वाटलं नाही. संतोषननी एकाग्रतेने त्या पेल्याकडं  बघितलं, आणि नंतर हळूहळू घोट-घोट करत ते पाणी प्यायलं. चंद्रहासला चिंता आणि आश्चर्य दोन्ही वाटलं. त्यांनी त्या बाईचे आभार मानले, आणि तिघेही निरोप घेऊन तिथून निघू लागले. चंद्रहास कुजबुजला, “आपण त्यांना काही द्यायला हवं का ?” “ना, ना,” कुंजबिहारी म्हणाला, “हसमुख अली मारेगा मुझे ।” “कांचू बहन,” कुंजबिहारी त्यांच्या यजमानिणीला उद्देशून म्हणाला, “तुम्हारे पती आज सुबे दस बजे कुलाबा के उधर थे । उधर ज्यादा कुछ बाढ का पानी नही है । उस तरफ बहुत भाडा मिला रहेगा उस को । कल तलक पानी उतरेगा, तो वो लौटगा  । उस का टेन्शन मत लो !” ते निघण्यापूर्वी, कुंजबिहारीने शांतपणे तिथल्या मुलांच्या खिशांत थोडे पैसे टाकले. 

हजारो थांबलेल्या वाहनांमधून वाट काढत ते बसंतीपाशी परत आले, तेव्हाही पाऊस पडत होता. काही मदतीला उभी असलेली तरुण मुलं  चालणाऱ्यांना सावध करत होते, “ह्या रस्त्यानं जा. मिलन सबवे पाण्याखाली आहे. आणि सर्व गटारं उघडी आहेत. फक्त रस्त्यांवर चालण्याचा प्रयत्न करा.” इतर काहीजण गाड्यांमध्ये अडकलेल्यांना ब्रेड आणि फळं देत होते. रात्रीच्या शांततेला भेदत, पाण्यात उभ्या असलेल्या ट्रेनची मध्येच अचानक शिट्टी वाजत होती. चंद्रहासला खूप तहान लागली होती, आणि तो झोपूही शकत नव्हता. जवळच एक लहान किराणा दुकान होतं, तिथं सर्व काही विकलं गेलं होतं. चंद्रहासला बिसलेरीच्या बारा बाटल्यांचा एक क्रेट दिसला. जेव्हा त्यानं वयस्क दुकानदाराकडे पाणी मागितलं, तेव्हा त्याला एकच बाटली देण्यात आली. चंद्रहास म्हणाला, “आम्ही दोघेजण आहोत, एकाला बंगळुरूला परत जायचंय. आम्हाला माहीत नाही की आम्ही किती वेळ इथंच अडकणार. तुम्ही मला फुल्ल क्रेट का विकत नाही ? मी तुम्हांला दुप्पट पैसे देतो.” 

दुकानदार खिन्नपणे हसला. “तुला काय वाटतं की रस्त्यावर तू एकटाच अडकलेला आहेस ? तुला दिसत नाही का? बायका, पोरं, म्हातारे लोक — सगळेच अडकले आहेत. माझ्याकडे एवढंच आहे. तू तरुण आहेस, तंदुरुस्त आहेस, फक्त एक बाटली घे, आणि ही आणखी एक धर, तुझ्या मित्रासाठी. ही पैसे कमावण्याची वेळ आहे का ? हे घे, मला वीस रुपये दे. त्याच्यावरची छापील किंमत आहे ती.” चंद्रहासला अगदीच कानकोंडं झालं. त्यानं पैसे देऊन दोन बाटल्या घेतल्या आणि टॅक्सीकडे परतला.

ते बराच वेळ शांतपणे बसले. मध्यरात्रीनंतर, जेव्हा माणसांची गजबज कमी झाली, तेव्हा टॅक्सीतील मंडळींना असं वाटलं की जवळच असलेल्या समुद्राची गाज ऐकू येतेय. रस्त्यावरच्या  दिव्यांभोवती पावसाचे थेंब पडताना दिसत होते. कुंजबिहारी म्हणाला, “टेन्शन मत लो, साब, इस रात मे, मै दुवा करता है, तुम जल्दी ठीक होईंगा । वो तुम्हारे पोती के शादी तक तुम पक्का रहेगा ।” संतोषननी ड्रायव्हरचा खांदा दाबला, आणि म्हणाले, “तुला माहितीय, मला हा आजार का झाला ? या देशात सगळ्यांत पहिल्यांदा पाणी विकणाऱ्यांपैकी मी एक होतो. १९७०च्या दशकात, मी पाणी बाटलीत भरून विकणारी पहिली व्यक्ती होतो. माझं मन मला, तसं करू नको, असं सांगत होतं; पण मी हेक्याने तेच केलं. तू आधी म्हणाला होतास नं, की पैसे लपलेल्या पाण्यासारखे वाहतात; पण मी माझ्या डोळ्यांदेखत असलेलं पाणी विकलं. एखादी गोष्ट  चुकीची आहे हे माहीत असूनही ती गोष्ट करण्याच्या दुःखाच्या तुलनेत, तुम्हांला योग्य ते करून जो आनंद मिळतो तो अतुलनीय असतो. माहीत असून चुकीची गोष्ट करत राहणं पाप आहे. म्हणूनच मी आजारी पडलो. माझं शरीर मला शिक्षा करतंय, कारण मी तेव्हा माझ्या शरीराचं, मनाचं ऐकलं नाही. मला माझे भोग भोगलेच पाहिजेत.” संतोषननी खिडकीतून बाहेर पाहिलं, तेवढ्यात एका युवकाने  एक संत्रं त्यांच्या मांडीवर टाकलं, आणि त्यांनी ते दोन्ही हातांनी एका लहान मुलाच्या निरागस आनंदाने झेललं.  आणि संतोषन कुंजबिहारीला म्हणाले, “कुंजीभाई आज तुम्ही आम्हांला दिलेल्या रोट्या आणि आम्ही प्यालेलं पाणी हे माझ्या संपूर्ण आयुष्यात मी चाखलेले सर्वांत चविष्ट पदार्थ आहेत. ते अमृतासारखे गोड होते.” 

एफएम रेडिओ स्टेशनवरून जुनी हिंदी गाणी प्रसारित होऊ लागली, अजून काही नवीन संदेश ते देत होते. अधूनमधून, संतोषन चंद्रहासचा हात थोपटत म्हणत राहिले, “काळजी करू नकोस सरयूची. तिनं कर्जाचा हप्ता भरला असेल, आणि ती लोकलमध्ये बसलेली असेल. ती कुठंही असली, तरी ती ठीक असेल. यापेक्षा सुरक्षित वेळ असू शकत नाही.”

“हो, सर, याहून सुरक्षित जागा आत्ता दुसरी कोणतीच नाही. हे शहर कधीही तुमचा हात सोडत नाही.  सरयू बोलली ना, तसा माझी आत्ताची नोकरी करत राहतो आणि मुंबईतच राहीन मी.” 

कुंजीभाई रेडिओचा आवाज कमी करून, स्टीअरिंग व्हीलवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक त्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला. एक माणूस एक छोटीशी सायकल धरून चालत होता, ओरडत होता, “अमिताभ भैया जिंदाबाद !” त्याच्या मागे डझनभर लोक सायकली ढकलत होते, रंगीबेरंगी झेंडे घेऊन निघाले होते. त्यांच्या सायकलींना बॅगा, एकेक छोटी बादली आणि काही इतर वस्तू बांधल्या होत्या; ज्यामुळे असं वाटलं की ते लांबून प्रवास करून आलेले असावेत. चंद्रहास आणि कुंजबिहारी गाडीतून उतरले. ती मिरवणूक निघून पुढे जाण्याची ते वाट पाहत होते. तशा रात्रीच्या अंधारात, त्या पाणी साचलेल्या रस्त्यांवरून, थकलेले ते शूरवीर त्यांच्या प्रवासाचा उद्देश घोकत, घोषणा देत राहिले. “तो अमिताभ बच्चनचा जन्मजात चाहता आहे. जेव्हा त्याने ऐकलं की अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नाहीये, आमचा गगन भैया अलाहाबादहून पण करून निघाला की गंगा-यमुना संगमाचं पाणी सायकलवरून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. आमचा विश्वास आहे की जर कोणी हे पाणी प्यायलं, तर तो सर्व रोगांपासून मुक्त होईल. आणि आता ही किमया बघा ! आम्ही हजारो किलोमीटर सायकल चालवत पाणी घेऊन ह्या शहरापर्यंत आलो काय, आणि इथं आभाळ फाटून पाणी कोसळावं ! काय हा दैवी संकेत ! बाजूला व्हा, आम्हांला जाऊ द्या ! अमिताभ भैया जिंदाबाद ! लाँग लिव्ह अमिताभ! अमिताभ भैया जिंदाबाद !” गगन भैयाच्या चेहऱ्यावर अतीव आनंद दिसत होता. संगमाचं पाणी एका छोट्या तांब्यात हिंदकळत होतं. त्याच्या पायांच्या हालचालीत देखील पाण्यासारखा चपळ डौल होता. कुंजबिहारीने हाक मारली, “गगन भैया, सीधा जाव … खार आने पर बांए मुड़िए और फिर सीधा जुहू पडेगा । उधर ही अमिताभ भैया का घर है । जय हो …”

लाखो घरं आणि लाखो लोकांना बुडवणाऱ्या पुरानंतरच्या रात्री, शांतताभरल्या रस्त्यांवरून, उत्तररात्रीच्या शेवटच्या प्रहरी, गगन भैयांच्या प्रिय हिरोसाठी त्यांनी इथवर आणलेला संगमाच्या पाण्याने भरलेला छोटा तांब्या  जसजसा पुढे सरकू लागला, तसं संतोषनना जाणवलं — एका दैन्याच्या क्षणाचा दिव्यत्वाकडे होणारा प्रवास . ते चंद्रहासला म्हणाले, “आत या आणि थोडं झोपा दोघंही. आपण आधीच इथं चौदा तास घालवले आहेत. अजून किती वेळ लागेल हे माहीत नाहीये.” चंद्रहास गाडीत बसताच तो ड्रायव्हरला म्हणाला, “कुंजीभाई, तुम्हीही झोपायला जा. गुड नाईट.” कुंजबिहारी हसू लागला, “गुड नाईट ? गुड मॉर्निंग हो गया ! देखो !” हळूहळू उजाडत होतं. पूर्वेकडून येणारा कोवळा सूर्यप्रकाश रस्त्यावर अडकलेल्या हजारो वाहनांवर पडून चमकू लागला. आता लवकरच सगळी कोंडी सुटून वाहनं हलू लागतील आणि सगळं सुरळीत होईल, सूर्याच्या आभेमुळे असा भास होऊ लागला. 

मूळ कन्नड कथा: नीरु, ‘चारमिनार’, अंकित पुस्तक, गांधी बझार, बसवनगुड्डी, बेंगळुरू. २०१२.

प्रतिमा सौजन्य: प्राजक्ता पाडगांवकर

Post Tags

Leave a comment