पूर्वी : आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल काही सांगा. तुमच्या सभोवतालचे जीवन आणि कला यांकडे तुम्ही कसं बघत होतात?
इंद्रजित : माझा जन्म १९८१ साली झाला. महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ असलेल्या कणकवली नावाच्या गावात मी अतिशय साधे जीवन जगलो. मी १०-१५ वर्षांचा होतो तेव्हा मला चित्रकलेची खूप आवड होती. मला नेहमी वाटायचं की मी कलाक्षेत्रात करिअर करेन, पण घरचं वातावरण फारसं अनुकूल नव्हतं. माझे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आणि त्यांना कलेची खूप ओळख अशी नव्हती. मी २००१ मध्ये कॉलेजमधून पदवी घेत असताना संगणक शिकण्यात मला अचानक रस निर्माण झाला आणि त्या वेळी मी माझा स्वतःचा संगणक विक्री आणि इतर सेवा पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला; मला ह्यातून चांगलं उत्पन्न मिळत होतं.
त्याच काळात मी माझ्या गावातील एका थिएटर ग्रुपमध्येही सामील झालो. संगणकविषयक व्यवसायाबरोबरच मला नाटक करायलाही आवडायचं. जवळपास ८-१० वर्ष नाटकाच्या ग्रुपबरोबर काम केल्यानंतर मला दोन गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे, एकाच वेळी दोन क्षेत्रांत राहणं मला शक्य नव्हतं. मी एकतर थिएटर करू शकत होतो किंवा पूर्ण वेळ माझा व्यवसाय सांभाळू शकत होतो. जर मी माझं निवांत चाललेलं आयुष्य सोडलं नाही तर मी थिएटरमध्ये फारशी प्रगती करू शकणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं म्हणजे, चित्रकला हा फार ‘एकाकी’ किंवा एकट्याने व्यक्त करावा असा कलाप्रकार आहे. तुम्ही तो एकट्यानेच करता आणि तुम्ही यात जे काम कराल ते पूर्णपणे तुमचं असतं. याउलट थिएटरमध्ये असताना मी इतर दहा लोकांसोबत काम करत होतो; त्यामुळे मी अशा प्रकारचं माध्यम शोधत होतो, जिथे मी एकटा काम करू शकेन.
पूर्वी : तर, एकट्याने काम करता येईल असा कलाप्रकार तुम्ही का शोधत होतात?
इंद्रजित : थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही इतर दहा लोकांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला त्या दहा लोकांची मानसिकताही लक्षात घ्यावी लागते. आणि बहुतेक वेळा सर्वांची मानसिकता जुळेलच असं नाही. त्या काळी थिएटर हा माझ्यासाठी फक्त एक छंद होता. पण जरी माझी इच्छा असती तरी त्यात मला आणखी काही करता येणार नाही याची मला जाणीव झाली. जर मी दररोज फक्त एकच तास देऊ शकणार असेन, तर मी या क्षेत्रात फारसं काही करू शकणार नाही हे मला समजत होतं; पण त्याच वेळी मी माझा व्यवसायही चालवत होतो.
छायाचित्रकला हे एक चांगलं माध्यम आहे असं मला वाटलं. माझ्याकडे दोन दिवसांचा वेळ असेल तर मी दोन दिवस छायाचित्रण करू शकतो आणि दोन तास असतील तर मी दोन तास छायाचित्रण करू शकतो; ही लवचिकता मला आवडली. त्या वेळी मी इतर लोकांचं काम फारसं पाहिलं नव्हतं आणि एक माध्यम म्हणून छायाचित्रकलेबद्दल मला फारसं माहीत नव्हतं. पण मी फक्त एक कॅमेरा सोबत घेऊन फिरू शकतो, छायाचित्रं घेऊ शकतो ही कल्पना मला खूप आवडली.
पूर्वी : म्हणजे तुम्ही छायाचित्रण करत गेलात आणि तुम्हाला त्यात अधिकाधिक रस वाटत होत गेला असं न म्हणता तुम्ही ठरवून किंवा जाणीवपूर्वक निवडलेलं हे माध्यम आहे.
इंद्रजित : होय, मी मुद्दाम ठरवलं. मी ह्याच्याबरोबर माझा व्यवसायही चालवत राहिलो. मी थेट कॅमेरा विकत घेतला आणि स्वतःला एक वचन दिलं : किमान १० वर्ष तरी मी तो सोडणार नाही. कारण कोणताही कलाप्रकार सोपा नसतो हे माझ्या नाटकाच्या प्रॅक्टिसमुळे मला जाणवलं होतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठी १० वर्ष लागत असतील तर कला आत्मसात करण्यासाठीही एक-दोन वर्षे पुरेशी नाहीत. यासाठीही तेवढ्याच कष्टाची आणि चिकाटीची आवश्यकता असते.
पूर्वी: एक कलाप्रकार अभ्यासण्याची प्रेरणा कुठून मिळाली असं तुम्हाला वाटतं?
इंद्रजित : मुळात मला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. पण आता मागे वळून पाहताना प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा कलाकारांना असं वाटतं की कला आपल्याला अभिव्यक्त करते. मी माझ्या कामातून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केला किंवा काही सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक ते ऐकतील, असा माझा विश्वास होता. लहान शहरातून आलेलं असण्याचा मानसिक अडसर (किंवा गंड म्हणूया) मला दूर करायचा होता आणि अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत काहीतरी पोहोचवायचं होतं.
पूर्वी : म्हणजे तुम्ही असं काहीतरी शोधत होतात ज्यातून तुम्हाला अभिव्यक्त होता येईल… त्यावेळेस तुम्हाला असं काय सांगायचं होतं जे ह्या कलेशिवाय सांगता आलं नसतं?
इंद्रजित : त्यावेळी, मी तिशीत असताना, माझ्या आजूबाजूला घडणार्या काही सामाजिक आणि राजकीय घटनांमुळे मी खूप अस्वस्थ होतो. सुरुवातीला मला वाटलं की मी माझ्या कलेतून सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकेन. उदाहरणार्थ, सगळीकडे एवढी गरिबी का पसरलीय? एखाद्या गर्भवती महिलेच्या मृत्यूबद्दल ऐकलं तर मला खूप त्रास व्हायचा. मला प्रश्न पडायचा की तिला वैद्यकीय सुविधा का मिळू शकल्या नाहीत ? आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या धार्मिक उन्मादानेही मी अस्वस्थ व्हायचो: लोक धर्माबद्दल इतके आक्रमक का असतात ?
मला आजही असंच वाटतं; पण आज माझी अगतिकता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे एक माध्यम आहे. मी जसजसं काम करत गेलो तसतसं आता माझ्या कामात अनेक गोष्टी येऊ लागल्या. आता मला वाटतं की माझ्या कामाला जसा सामाजिक दृष्टीकोन आहे, तशीच एक कलात्मक बाजूही आहे.
पूर्वी : या विषयी तुम्ही अधिक सांगू शकाल? तुमचं काम ‘कलात्मक’ आणि ‘सामाजिक’ दोन्ही आहे असं तुम्ही का म्हणता?
इंद्रजित : सुरुवातीच्या वर्षांत, मी प्रामुख्याने माझ्या सभोवतालच्या सामाजिक समस्यांचे दस्तऐवजीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केलं. २०१२ साली मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा मी तिथे गेलो आणि या घटनेचे दस्तऐवजीकरण (चित्रीकरण) केले. पण, जसजसा मी एक कलाकार म्हणून विकसित होत गेलो, तसतसं मला जाणवलं की कलात्मक अभिव्यक्तीकडे माझा कल अधिक आहे. कलेच्या थेट किंवा अतिस्पष्ट सादरीकरणापेक्षा मला अधिक ‘स्वार्थी’ (किंवा माझ्या दृष्टिकोनातून प्रकट होईल अशी) कला निर्माण करायची आहे – ज्यात तुम्ही ‘माझे’ जग पाहू शकाल.
गेल्या काही दिवसांमधील माझं काम बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि या कामाला माझा असा एक स्पर्श आहे. मी एकटाच बाहेर पडतो आणि मग मला दिसलेलं जग तुम्ही सोशल मीडियावर बघता. त्यामुळे एका वेळी अनेकानेक सामाजिक विषय मांडण्यापेक्षा तुम्ही माझं असं काम बघत आहात.
सुरुवातीला माझ्या मनात याबद्दल एक प्रकारचा अपराधीपणा नव्हे तर संभ्रम होता. मात्र, काही काळानंतर मला प्रतिसाद मिळू लागले. उदाहरणार्थ, एक दिवस मला दानिश सिद्दीकीकडून एक लांबलचक संदेश आला. दानिश म्हणजे ज्याने नंतर अफगाणिस्तानमध्ये छायाचित्रण करताना, तालिबान्यांमुळे आपला जीव गमावला. त्याने मला लिहिलं होतं की जेंव्हा तो युद्ध किंवा कोविडशी संबंधित मृत्यू या सारखं वेदनादायी वातावरण कव्हर करून परत येतो तेव्हा तो माझ्या वेबसाइटवर जातो आणि माझं काम पाहतो.. आणि त्यामुळे त्याला शांत झोप लागायला मदत होते. माझं काम ही त्याच्यासाठी एक प्रकारची साह्यभूत थेरपी होती.
आणि त्या दिवशी माझ्या मनातला गोंधळ कमी झाला. तुम्ही कोणतंही काम करत असलात तरी त्यात प्रामाणिकपणा असायला हवा, हे माझ्या लक्षात आलं. तुम्हाला तुमच्या कामाची इतर लोकांच्या कामाशी तुलना करण्याची गरज नाही. मी ज्या वातावरणात वाढलो ते अतिशय शांत आणि संथ वातावरण होतं. जर मी युद्धाचं चित्रीकरण करायला गेलो, किंवा दंगल किंवा राजकीय रॅली… मी जर पत्रकारितेच्या गोष्टींचं चित्रीकरण करायला गेलो, तर मी ते करू शकत नाही. कारण असं काम करण्यासाठी लागणारी हिंमत किंवा मानसिकता माझ्याकडे नाही.
पूर्वी : मला तुमची ‘हंपी’ छायाचित्र-मालिका खूप आवडते. तुम्हाला हंपी ही जागा का आवडली आणि पुन्हा पुन्हा तिथे जाण्याची ओढ तुम्हाला का जाणवते?
इंद्रजित : हंपी मालिका सुरू झाली २०१८ साली. तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या कुटुंबाबरोबर हंपीला गेलो होतो. तिथे जाण्यापूर्वी मी हंपीची बरीच छायाचित्रं पाहिली होती. ती सगळी एका निर्जन ओसाड जागेची, वाईड अँगल मधली छायाचित्रं होती. त्यामुळे मला हे माहीत होतं की मला अशा प्रकारचं छायाचित्रण करायचं नाही. मी माझ्या कुटुंबासोबत गेलो असल्याने मला दिवसभर चित्रीकरण करता आलं नाही. मी संपूर्ण ट्रिपमध्ये एकूण ६-८ तास चित्रीकरण केलं. तरीही, माझ्या नजरेतून समोर आलेलं हंपी, हे मी इतरांच्या छायाचित्रांमध्ये पाहिलेल्या हंपीपेक्षा वेगळं होतं. माझ्यासाठी ही खूप मोठी शिकवण होती. माझ्या लक्षात आलं की जरी अनेक लोकांनी एखाद्या विशिष्ट विषयावर अनेक वेळा चित्रीकरण केलेलं असलं तरीही तुम्ही तुमच्या अशा अनोख्या दृष्टिकोनाने त्याकडे बघू शकता. त्यानंतर मी माझ्या वर्कशॉप्स किंवा सोलो ट्रिपसाठी हंपीला जात राहिलो. अनेकदा एखाद्याला असं वाटतं की सतत नवीन ठिकाणं शोधत राहावीत. पण ते काही खरं नाही. मला असं वाटतं की एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा जावं. तुम्हाला एखादं ठिकाण कंटाळवाणं वाटायला लागलं की मग त्याच्या खोलीची जाणीव होते. मी म्हणतो, एखाद्या ठिकाणी इतक्या वेळा जा की तुम्हाला त्याचा कंटाळा यायला हवा. आणि मग एका चांगल्या क्षणाची वाट पहा. हा माझा हंपीचा अनुभव होता. जर तुम्हाला एखाद्या विषयावर भरीव काम करायचे असेल, तर तुम्हाला त्या जागेची सवय करून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळातला उत्साहाचा भर ओसरल्यावरच अर्थपूर्ण छायाचित्रं हाती लागतील.
पूर्वी : हंपीमध्ये तुम्हाला काय नवनवीन लक्षात यायला लागलं, जे तुम्ही पहिल्या काही भेटींमध्ये पाहिलं नव्हतं?
इंद्रजित : मी हंपीतला निसर्ग शोधायला लागलो, म्हणजे थोडक्यात तिथले कातळ आणि शिल्प – जे खूप इंटरेस्टिंग आहे. त्या निसर्गाचं आणि तिथल्या लोकांच्या नात्याचं मला कुतूहल वाटलं. एका ठिकाणी अगदी लहानशा आधाराने उभा असलेला एक भलामोठा खडक मला दिसला. आणि त्या खडकाखाली एक ६-७ वर्षाची मुलगी उभी होती. त्याखाली जाऊन उभं राहण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण त्या भागातील लोक त्या खडकाखाली झोपले होते, काहीजण त्याखाली स्वयंपाक करत होते. तो खडक आपल्या अंगावर पडणार नाही याची तिथल्या लोकांची ठाम खात्री बघून मी थक्क झालो. तो अगदी लहानशा आधारावर उभा असला तरी ह्या लोकांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या आयुष्यात तो कधीही पडला नव्हता; आणि हीच बाब त्यांना खात्री द्यायला पुरेशी होती.
पूर्वी : मी जेव्हा ही चित्र बघते तेव्हा मला जाणवतं कि विरोधाभास टिपण्यात तुम्हाला विशेष रस आहे. उदाहरणार्थ एका प्रचंड खडकापाशी उभा असलेला एक बुटका माणूस वगैरे…
इंद्रजित : अगदी अगदी.
पूर्वी : अनोळखी लोकांचं छायाचित्रण करणं मला खूप भीतीदायक वाटतं. त्यांना त्यात सहजता वाटेल ह्याची काळजी तुम्ही कशी घेता? तुम्ही आधी त्यांच्याशी नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करता का?
इंद्रजित : संबंध किंवा नाती ही कालांतराने विकसित होतात. छायाचित्रकार म्हणून तुम्हाला याकडे दोन बाजूंनी पाहावं लागतं. तुम्हाला लोकांशी नातं निर्माण करायचं असलं तरीही तुम्हाला त्यांच्यापासून काही अंतर सुद्धा राखावं लागतं जेणेकरून तुम्हाला तुमचा विषय वस्तुनिष्ठपणे पाहता येईल. जर तुमचा विषयांशी, लोकांशी खूप जवळचा संबंध निर्माण झाला, तर प्रत्यक्ष छायाचित्रण करण्याची वेळ आल्यावर कदाचित संपूर्ण चित्र तुमच्या नजरेस येणार नाही.
डोळ्यांनी आणि देहबोलीतून छायाचित्रकाराला लोकांशी संवाद साधावा लागतो. तुम्ही जाऊन त्यांच्याशी शाब्दिक संवाद साधलाच पाहिजे हे जरुरी नाही. उदाहरणार्थ, हंपीमध्ये लोक कन्नड बोलतात त्यामुळे मला तिथल्या स्थानिकांशी बोलता येत नाही. पण तरीही मी माझ्या देहबोलीतून त्यांच्याशी संबंध जोडतो. एखादी व्यक्ती त्यांच्या दृष्टीने सुरक्षित आणि संवेदनशील आहे की नाही हे त्यांना देहबोलीतून समजतं. तुम्ही स्वत:ला कसे दाखवू पाहताय, तुम्ही किती शांत किंवा निवांत आहात हे तुमची देहबोली सांगते.जेव्हा मी गावातल्या कुठल्यातरी अगदी आतल्या भागात जातो, तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांना बाहेरचा माणूस अचानक कॅमेरा घेऊन येण्याची सवय नसते. त्यामुळे ते करत असलेल्या गोष्टींचं दुरून निरीक्षण करावं लागतं, त्यांच्याकडे बघून थोडं हसावं लागतं, डोळ्यांतून त्यांच्याशी बोलावं लागतं. तुम्हाला तुमच्या देहबोलीतून सहजता आणि प्रामाणिकपणा दाखवून द्यावा लागतो.
परंतु त्याच वेळी आपण त्यांच्यात इतकं गुंतू नये की आपल्याकडे छायाचित्रणासाठी वेळच उरणार नाही. इथे जर लोकांना तुम्ही आवडू लागलात तर ते तुम्हाला त्यांच्या घरी बोलावतात आणि त्यांना तुमच्याबरोबर खूप वेळ घालवावासा वाटतो. पण छायाचित्रकलेत तुम्हाला दुसरी संधी मिळत नाही. माझ्याकडे दोन तास असतील तर ते दोन तास मला छायाचित्रण करण्यासाठी वापरावे लागतील. मी त्यांच्याशी बोलत असलो तरी मी त्याच वेळी त्यांचं निरीक्षणही करत असतो. त्यांनी टॅटू काढला आहे का? किंवा मी छायाचित्रं घेण्यासाठी वापरू शकेन असा काही दागिना आहे का? मी त्यांच्याशी बोलत असलो तरी अलिप्ततेची एक रेघ मध्ये आखलेली असतेच. मी त्यांचं बोलणं ऐकता ऐकता माझ्यासमोर असलेल्या दृश्याच्या आधारे कोणत्या प्रकारच्या प्रतिमा तयार करत येतील, याचा विचारही करत असतो. सुरुवातीला मी असा नव्हतो. कधी कधी तर मी नवीन ठिकाण आणि तिथल्या माणसांत इतका गुंतून जायचो की मी छायाचित्रण करायचंच विसरायचो.
पूर्वी : उदाहरणार्थ, पहेलवान (कुस्ती) मालिकेतून, तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचा हेतू स्पष्ट केला होता का? तुम्ही पैलवानांना सांगितले होते का की तुम्ही त्यांचा फोटो काढण्यासाठी तिथे होता?
इंद्रजित : बघ, तुम्ही कुठेतरी जाऊन तुमचा कॅमेरा लोकांकडे दाखवू शकत नाही. माझं धोरण असं आहे की मी आधी एखाद्या ठिकाणी जातो आणि अर्धा तास तिथे बसतो. मी त्यांचे निरीक्षण करतो, आणि खऱ्या कुतूहलाने त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आहारात काय समाविष्ट आहे? हा आहार टिकवून ठेवण्यासाठी दर महिन्याला किती खर्च येतो? शेतीच्या पार्श्वभूमीतील 20 वर्षांचा मुलगा दर महिन्याला त्याच्या जेवणावर १५,००० रुपये खर्च करतो, तर तो हे कसं सांभाळतो? त्यांच्या प्रेरणा काय आहेत? त्यांच्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत? एकदा तुम्ही हा संबंध तयार केल्यावर, एकदा त्यांनी तुमचा चेहरा ओळखायला सुरुवात केली की, तुम्हाला प्रत्येक वेळी हे करण्याची गरज नाही.
पण सातत्य खूप महत्वाचे आहे. मी आज गेलो आणि वर्षभरानंतर परत गेलो तर त्यांना माझी आठवण येणार नाही. पण मी दर आठवड्याला गेलो तर ते फक्त हाय म्हणतील आणि कामाला लागतील. आणि मी माझ्या कामाकडे जाऊ शकतो. त्यामुळे शेवटी तुम्ही अशा प्रकारचे नाते विकसित कराल जेथे ते तुमच्या आसपास सहजपणे वावरतील आणि मलाही फोटो काढणं सोयीचं वाटेल. त्याच वेळी, आम्हाला प्रत्येक वेळी एकमेकांशी जास्त मैत्री करण्याची गरज नाही.
पूर्वी : ठिकाणांबाबत तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही एखाद्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याच्या उद्देशाने जाता की उत्स्फूर्तपणे एखाद्या ठिकाणी छायाचित्रं घेतली जातात?
इंद्रजित : सुरुवातीला मी आधीच ठरवायचो की मला कुठे काय चित्रीकरण करायचं आहे आणि त्या उद्देशाने एखाद्या ठिकाणी जायचो. पण काही काळ गेल्यानंतर मला जाणवलं की खरं तर हे आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांना, अनपेक्षितांना प्रतिसाद देणं आहे. तुम्ही कोर्या मनाने एखाद्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला काहीतरी अनपेक्षित जाणवू, सापडू शकतं. आणि हा अनपेक्षित क्षण टिपण्यात आनंद आहे. त्यामुळे आता मी मुद्दाम ठरवून एखाद्या ठिकाणी जात नाही. माझ्या घराच्या आजूबाजूला ३-४ गावं आहेत, ती माझी ठरलेली ठिकाणं आहेत आणि मी तिथे पुन्हा पुन्हा जातो
पूर्वी : आणि या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना तुमच्या कामाबद्दल उत्सुकता असते का?
इंद्रजित : कधी कधी मी परत जाऊन त्यांना छायाचित्र दाखवतो किंवा चांगलं छायाचित्र असेल तर मी प्रिंट काढून त्यांना देतो. पण अन्यथा, माझा त्यांच्याशी फारसा संबंध नाही. इथे लोकांना मी छायाचित्रकार आहे हे माहीत नाही. आमच्याकडे टिपिकल छायाचित्रकला संस्कृती किंवा कलेला प्रतिसाद देण्याची संस्कृती नाहीये. पण लोक कलात्मक असतात, फक्त त्यांची कला वेगळ्या स्वरूपात असते. लोक त्यांची घरं आणि अंगणं ज्या प्रकारे सजवतात त्यावरून त्यांची सर्जनशीलता दिसून येते. त्यांच्यावर दशावतार रंगमंचाचा मोठा प्रभाव आहे, पण रूढार्थाने “कला संस्कृती” अशी नाही. आणि मी त्यांना काही मुद्दाम शिकवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. कारण मला इथले लोक जसे आहेत तसे आवडतात.
पूर्वी: छायाचित्रणासाठी तुम्ही किती वेळा बाहेर पडता?
इंद्रजित : वर्षातील ३६५ दिवसांपैकी किमान ३०० दिवस मी बाहेर जाऊन छायाचित्रं घेतो. आणि या ३०० दिवसांपैकी मला कदाचित ३० दिवस काहीतरी खरंच छायाचित्रं घेण्यासारखं किंवा चित्तवेधक असं गवसतं. इतर २७० दिवस मी काहीही विशेष असं न करता परत येतो. काही काळानंतर छायाचित्रणाबद्दलचा उत्साह मागे पडतो. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बाहेर पडणं, विविध प्रकारचे गंध अनुभवणं आणि निसर्गाचे निरीक्षण करणं यासारखे आनंद घेतले जाऊ लागतात. आणि मग काही वेळा तुम्ही नशीबवान ठरता, तुम्हाला काहीतरी मनापासून आवडतं आणि तुम्हाला ते नोंदवताही येतं.
मला रोज बाहेर जावंसं वाटत नाही आणि हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. पण हे ही खरं आहे की जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला स्वतःला थोडं प्रेरित करत राहावं लागतं. तुम्हाला १० पैकी ९ फेऱ्यांमध्ये काहीही विशेष हाती आलं नसेल, तरीही १०व्या दिवशी, पुन्हा एकदा आपल्याला स्वत:ला प्रेरणा देणं आवश्यक असतं. मी रोज माझ्या घराजवळच्या ३-४ गावांत जातो. हे कंटाळवाणं होऊ शकतं, पण आपण त्याच जागी पुन्हा पुन्हा जात असलो तरीही आपण दररोज काहीतरी नवीन अनुभवतो. आणि हीच गोष्ट मला बाहेर पडण्यास प्रवृत्त करते.
पूर्वी : तुम्ही छायाचित्रण करायला सुरुवात करून एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. ह्या कलाप्रकाराशी असलेल्या तुमच्या नात्यात गेल्या काही वर्षांत काय बदल झाले आहेत?
इंद्रजित : सुरुवातीला माझी अशी प्रांजळ कल्पना होती की कलेद्वारे आपण जग बदलू शकतो… आता मी अशी कोणतीही धारणा ठेवत नाही. तुम्ही तुमच्या कलेने जग बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमचे जग बदलू शकता. तुम्हाला पाठिंबा देणारी चांगली माणसं तुम्ही जोडू शकता. एका छोट्या गावात राहूनही मी बाहेरच्या जगाशी जोडला गेलो आहे. आणि त्याचबरोबर मी समाजातल्या सर्जनशील वर्गाशीही जोडला गेलो आहे. माझ्या कामातला हा भाग मला खरोखर आवडतो.
सुरुवातीला मला माझ्या कामातून काही गोष्टी मांडायच्या होत्या. पण आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला काहीही सांगायचं नाहीये. त्याऐवजी, पाहणाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे मला ऐकायचं आहे. माझ्या कामातून निश्चित विधान करण्याऐवजी, इतर लोक ते कसं समजून घेत आहेत हे पाहण्यात मला रस आहे. आता मला बाहेर पडून छायाचित्रं घ्यायला आणि मग इतर लोक त्याला कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहायला मजा येते.
पुर्वी : आता तुमच्याकडे असा काही प्रोजेक्ट आहे का ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहताय?
इंद्रजित : नाही, मी आता उत्साहाच्या टप्प्यात नाही. तुमच्या कामाच्या आसपासच्या सुरुवातीच्या उत्साहाची तीव्रता काही काळानंतर कमी होते. आणि मग तुम्ही एकतर आर्टफॉर्म म्हणून फोटोग्राफीचा पाठपुरावा करणे थांबवता किंवा उत्साह नसतानाही तुम्ही ते सातत्याने करत राहता. आणि सातत्याचा आलेख खूप कंटाळवाणा आहे. कारण तुम्ही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहता.
माझ्यासाठी आता दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे पुढील १०-२० वर्षांसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. कारण बऱ्याच सामाजिक-राजकीय गोष्टींचा तुमच्यावर मानसिक प्रभाव पडतो, परंतु काम सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवावे लागते. आणि दुसरे म्हणजे, तुमचे कार्य जगाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही प्रसिद्ध असलात तरीही तुम्ही नवनवीन गोष्टी करत राहता. उदाहरणार्थ, नुकतेच मी एक फॅशन शूट केले, जे मी नुकतेच सुरू केले असते तेव्हा केले नसते. आता, मी खूप मोकळा आहे, म्हणून मी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आणि हा नवनवीन गोष्टी करून बघण्याचा उत्साह भविष्यातही कायम राहो असं मला वाटतं.
पूर्वी : आणि एक शेवटचा प्रश्न. तुम्ही तरुणांसाठी क्लासेसपण घेता ना? तुम्ही जेव्हा काम सुरू केलंत तेव्हाचा ह्या माध्यमाकडे पाहण्याचा तुमचा विचार आणि आत्ताच्या तरुणांचा दृष्टिकोन ह्यात तुम्हाला काय फरक वाटतो?
इंद्रजित : आज लोकांना, विशेषत: शहरी भागात ज्या प्रमाणात मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवतात, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. खेडेगावात तुमचं जीवन इतकं गुंतागुंतीचं नसतं. तुमच्याकडे मर्यादित साधनं असतात. परंतु शहरात, अधिकाधिक लोक इंटरनेट आणि सोशल मीडियावर असल्याने, लोकांच्या ताणाची पातळी वाढली आहे. आणि या समस्यांना सामोरं जाण्यासाठी लोकांना छायाचित्रण करायचं आहे. त्यांना ह्यात करिअर घडवायचं नाहीये तर छायाचित्रणाचा उपयोग त्यांच्या चिंता आणि नैराश्याला वाट करून देण्यासाठीचा एक कला प्रकार म्हणून करायचा आहे. सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी, छायाचित्रणाचा पत्रकारितेसारखा वापर करण्याऐवजी अभिव्यक्त होण्यासाठी म्हणून लोक ही कला वापरत आहेत. येत्या काही वर्षांत छायाचित्रण हा कलाप्रकार म्हणून कसा वाढेल हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
छायाचित्र सौजन्य : इंद्रजित खांबे
संपादन सहकार्य : सृजन इनामदार