Skip to content Skip to footer

दोन कविता : हेमंत दिवटे

Discover An Author

  • Poet and Editor

    हेमंत दिवटे यांचे चार मराठी कवितासंग्रह, तीन कवींच्या अनुवादाची पुस्तके. अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये (पाच इंग्रजी, दोन स्पॅनिश, प्रत्येकी एक अरेबिक, जर्मन, आयरिश, इस्टोनियन आणि कन्नड ) कवितांची अनुवादित पुस्तकं प्रकाशित. भारतासह आशिया, युरोप, लॅटिन-अमेरिकन देशांमधल्या अनेक ‘पोएट्री फेस्टिवल्स’मध्ये कविता वाचन. कविता लेखनासाठी भारतीय भाषा परिषद, कोलकाता, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, जालना, दैनिक ‘लोकमत’चा ‘अक्षररंग पुरस्कार',महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार, संपादनासाठी महाराष्ट्र फौंडेशन अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित. ‘अभिधा’ आणि ‘अभिधानंतर’च्या माध्यमातून नव्वदनंतरच्या कवितेसाठी व्यासपीठ निर्माण केले. १९ वर्षे अंकाबरोबरच सुरुवातीला ‘अभिधानंतर’ व नंतर ‘पोएट्रीवाला’ या प्रकाशनाच्या वतीने मराठी, इंग्रजी, भारतीय व जागतिक भाषेतल्या कवितासंग्रहांचे इंग्रजी अनुवाद गेली २3 वर्षे प्रकाशित करणं सुरू आहे.

    Hemant Divate is a Marathi poet, editor, publisher, translator and poetry activist. He is the author of eight poetry collections in Marathi. His most recent book in Marathi is Paranoia which was awarded by Govt. of Maharashtra’s Kavi Keshavsut Award. Divate’s poems have been translated into more than thirty international languages. In translation, he has a book in Spanish, Irish, Arabic, German, Estonian and Kannada apart from four in English. His poems have appeared in numerous anthologies in Marathi, English and Slovenian. He is the founder-editor of the Marathi little magazine Abhidha Nantar. Divate has participated in numerous international poetry and literature festivals across the globe. His publishing house, Paperwall Publishing has published (under its imprint Poetrywala) more than 150 poetry collections. Hemant is the founder and director of the Mumbai Poetry Festival. Hemant lives in Mumbai.

लॉरेम इप्सम

कळलं की मी स्वतःच आहे एक लॉरेम इप्सम
माझ्यातूनच होते दुःखाची सुरुवात आणि अखेर
मला पडणारी स्वप्नं नपडलेली स्वप्नं असतात,
दिवास्वप्नं, सताड उघड्या डोळ्यांनी पाहिलेली
ती कधीच अपलोड होत नाहीत
त्यांची स्वप्नं बनण्याची स्वप्नं नसतात
स्वप्नं नसलेला माणूस एक प्रेत असतं
तशीच माझ्या स्वप्नांची प्रेत पडलीहेत

तुम्हाला ती प्रेत दिसत नाहीत
मी एकटाच ती प्रेतं खांद्यावर घेऊन चाललोय
मला तुम्ही नुसतं मनात आणलंत तरी
दुःखाचं प्रेत तुमच्या उरावर बसेल तुमच्याही नकळत
मी डिझायनर आहे लॉरेम इप्सम
स्वतःच स्वतःच्या दुःखाची प्रतिकृती
मी सेल्फीये म्हणजे मी स्वतःच स्वतःची घेतो
मी सोशल मीडियावरचा एक बॉट आहे
तुम्हाला दुःखात ढकलणारा
दुसऱ्यांच्या मजेदार सेल्फी दाखवून
तुमच्यावर डिझायनर दुःख लादणारा लिप्सम

*

कविता

(आदिल जस्सावालासाठी)

घाबरत घाबरत मांजराच्या पावलांनी
ज्यांनी तुझ्या दारी बेरात्री पाऊलं ठेवली
ते होते दोन स्वतःच्याच भाषेचे गुन्हेगार

दोन गुन्हे होते या बेजबाबदार समाजात त्यांच्यावर
एक अश्लीलतेचा आणि दुसरा धार्मिक भावना दुखावल्याचा
हा एक कॉन्ट्रास्ट आहे जगण्याविरोधात

तू ज्या स्त्रियांचं सौन्दर्य दाखवलस त्यांच्या ओठातल्या
गवताच्या पात्यासारखे आम्ही किरकोळ लोक
डायरेक्ट पोहोचलो तुझ्या लिविंगरूममध्ये
जिथून समोरचा समुद्र सताड पसरलेला
त्यात पहिल्यांदा पाहिलं सूर्याच्या गोळ्याला
पाण्याखालून वर डोकं काढतांना

.

तूझ्या टेबलावर कोरे कागद, पेन, ऍश ट्रे, अर्धा रिकामा व्हिस्कीचा ग्लास
काही पुस्तकं पडलेली
तू सकाळीसकाळी काहीतरी विचार करीत फिरत होतास घरभर
टेबलावर पडलेल्या कागदावर तू एक एक शब्द लिहीत होतास
सिगारेटचे झुरके घेत आणि मध्येच एक एक सिप मारत
रचत होतास शब्दांचं पिरॅमिड
किती हळुवार, जणू समोरच्या समुद्रातलं दिसणारं चक्रिवादळ
मनातून मनगटात आणि तिथून  कागदावर घडवत होतास
मला तुझा हा रिदम सुफी दर्विश सारखा भासला
तुझं रूमभर भिरभिरणं
मध्येच थांबून विचार करणं
एक सिप घेणं
एक झुरका घेणं
हे कसं स्वप्नवत होतं मला
मला वाटलं
मीच हे करतोय स्वप्नात
पण आवरलं स्वप्न
मागावर असलेले पोलीस
मला स्वप्नातून ओढून
वारंवार खाली ओढत होते
आता २८ वर्षांनंतरसुद्धा
हाच सीन पुन्हा पुन्हा उपलोड होतोय मनात

.

तुला ठाऊक होतं एकेक अक्षरांचं वजन
अजूनही तुझा एकही शब्द ओळीतून हलवला तरी
ताल बदलतो त्यांचा
तुला तर एक चुकीचा स्वल्पविरामही डोंगरासारखा
मध्ये आल्यासारखा वाटत असेल
आम्ही लोकल मधल्या खडखडाटात ऐकलं
ॲसबेस्टसच्या चिपळ्यातलं संगीत

लिहिल्या जगण्यामरण्याच्या किंचितशा फटीला
ओलावा देणाऱ्या काही ओळी कोणालाही समजणाऱ्या भाषेत,
त्या भाषेत अजूनही तेचकाय झाडं, काय डोंगर, काय हाटेल
म्हणजे कविता
तू जसा एकटा स्वतःला सामोरा जातोस
अठराव्या माळ्यावरून उडी घेत नाहीस  
तसा माझा तोल नाही गेला अजून एकटा पडून,
मला शब्दच देतात बळ जगण्याचं
शब्द मला वाटतात एका स्वप्नसुंदरीच्या चेहेऱ्यासारखे
अलगद ओंजळीत घ्यावे आणि ओठांना लावावे

त्या स्पर्शाअगोदरचा असह्य जाळ
कवितेत पकडता आला की मी माझं डिप्रेशन विसरून जातो
पुन्हा तुझ्यासारखाच शब्दांच्या मागावर जातो.

*

Post Tags

Leave a comment