अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’ : तुम्ही मूळचे इंजिनियर — म्हणजे, बऱ्याच वाचकांना हे ठाऊक नसेल, कारण ते कधी समोर आलेलं नाही — त्यानंतर मग लेखक आणि आता फिल्ममेकर. अशा सगळ्या प्रवासाचा सुरुवातीचा बिंदू पकडायचा तर तो म्हणजे बालपण! तुमचं बालपण कोकणातील नागोठण्यात गेलं. तर तुमची तुमच्या बालपणातील पुस्तकाबाबतची पहिली आठवण कुठली सांगाल ?
हृषीकेश गुप्ते : माझ्या मनात पुस्तकाबाबतची पहिली आठवण एक अशी नाही, दोनतीन आहेत. मी बालवाडीत असताना माझ्या एका दूरच्या बहिणीने भाऊबीजेला मला दोन पुस्तकं दिली होती. मला त्यांची नावं देखील स्पष्ट सांगता येतील —राजकन्या चारुशीला आणि जादूची अंगठी आणि माझ्या बाबांनी मला एक पुस्तक आणलं होतं, ज्याचं नाव होतं राक्षसाची पेटी! या पुस्तकाचं तर मुखपृष्ठ देखील मला नीट आठवतं. पुढे एकदा बहिणीने मला एका पुस्तकातली गुलबकावलीची गोष्ट वाचून दाखवल्याचं स्मरतं, तीही आठवण आहेच. या साधारण एकाच काळातल्या घटना आहेत. आठवणी म्हणाव्या तर या आहेत — पहिल्या — जितकं आपण मागे जाऊ तितक्या पहिल्या ! आता यावरून कुणी माझ्या लिखाणाचं माझ्या लहानपणीच्या या आठवणींशी एकास एक नातं वगैरे जोडून पाहू नये म्हणजे झालं !
अनिरुद्ध : पण तुमच्यासोबत तुमचं वाचन किंवा पुस्तकांविषयीची आवड वाढली, विकसित झाली की मध्ये खंड पडला आणि पुन्हा कधीतरी वाचन परत सुरू झालं असं काही घडलं ?
हृषीकेश : नाही, ! पुस्तकांच्या आवडीत आजतागायत खंड पडलेला नाही; म्हणजे काहीतरी वाचणं हा रोजचा उद्योग असतोच ! पूर्वी कसं की बहुतांश वेळेस उजव्या हाताला जेवणाचं ताट आणि डाव्या हाताला पुस्तक अशी अवस्था असे — अर्थात, आताही असं असतंच, पण आता पुस्तक जाऊन किंडल आलं आहे. अगदी हार्डकव्हर पुस्तकं घेऊन ठाण मांडून बसलोय हे आता कमी झालं आहे, हा काय तो फरक आहे. बाकी पुस्तकांचं वाचन सुटलं नाही, कधीचं नव्हतं ! तेव्हा (बालपणी) पुस्तक वाचणं हा नियमित उद्योग असे. शाळेतून आलं की आधी शाळेच्या लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचून संपवायचं ! लायब्ररीमधून वा विकत घेऊन पुस्तकं आणली की बाकी सगळं बाजूला ठेवून ती आधी वाचून काढायची. हे अगदी अलीकडेपर्यंत — दहा वर्षं पूर्वीपर्यंत असंच होतं. त्यानंतर माझं वाचन डिजिटल माध्यमाकडे वळलं. म्हणजे, मी आता रोज किमान अर्धा तास ते तीन तास असं वाचन करतोच, पण किंडलवर. बऱ्याच वेळा असंही होतं की वाचताना तंद्रीत संपूर्ण रात्र वाचन चालतं आणि अशाच दोनतीन रात्रींत ते पुस्तक संपवलं जातं. थोडक्यात, माझ्यासोबत पुस्तकांविषयीची माझी आवड वाढलीच, फक्त त्याचं माध्यम बदललं इतकंच !
अनिरुद्ध : तुमच्या घरात, कुटुंबात तुम्ही वगळता अजून कुणी वाचक होतं का ? म्हणजे तुमच्या घरात वाचनाचा वारसा होता असं म्हणता येईल का ?
हृषीकेश : माझी आई खूप वाचायची — म्हणजे अगदी चारपाच वर्षांपूर्वीपर्यंत वाचत असे. अर्थातच, तिचे वाचायचे विषय वेगळे होते, ती स्त्री-प्रधान कादंबऱ्या, दिवाळी अंकांतल्या कथा वाचत असे. ज्याला आपण अभिजात साहित्य म्हणतो ते तिच्यापर्यंत पोहोचलं होतं असेल असं मला वाटत नाही; किंवा काय माहीत, पोहोचलं असेलही, तिने ते वाचलंही असेल — मला नक्की ठाऊक नाही. माझी बहीण लहानपणी फार वाचत असे. पुढे वाढत्या वयासोबत तिची सवय सुटली.
अनिरुद्ध : म्हणजे मग, तुम्हा भावंडांत वाचनाचा हा जो ‘धागा’ आला तो आईकडून आला असं म्हणता येईल, नाही का ?
हृषीकेश : भावंडांमध्ये म्हणण्यापेक्षा तो फक्त माझ्याकडेच आला, टिकला, हे एक; आणि दुसरं म्हणजे, वाचन आईकडून आलं असंच नक्की म्हणता येणार नाही, कारण मला आठवतं की माझ्या लहानपणी सगळेच वाचत. पुस्तक वाचणं हे खूप सहज होत असे. उदाहरण द्यायचं झालं तर, माझा एक मित्र आहे, आम्ही सातवी-आठवीपर्यंत एकत्र होतो. आज तो भंगाराच्या व्यवसायात आहे. अर्थात, यावरून त्याची जी प्रतिमा कोणाच्याही मनात तयार होईल, त्यापेक्षा त्याचं बालपण खूप विरुद्ध स्वरूपाचं होतं; तो देखील लहानपणी खूप वाचत असे ! सांगायचा मुद्दा असा की मी गावाकडे वाढल्यामुळे कष्टकरी-कामकरी वर्गातली मुलंच माझ्यासोबत शाळेत होती, पण त्यांतली जवळपास सगळीच मुलं वाचत असत. अर्थातच, प्रमाण कमीजास्त असेल, पण सगळी वाचत असत, हे नक्की ! त्यांत चांदोबा असेल, ठकठक असेल, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकं असतील …
अनिरुद्ध : सुहास शिरवळकर असतील ?
हृषीकेश : शिरवळकर थोडे उशिराच्या टप्प्यावर आले — आठवीत किंवा नववीत; पण अर्नाळकर आम्ही तिसरी-चौथीत वाचायचो. काही-काही गोष्टी समजायच्या नाहीत, पण वाचायचो.
अनिरुद्ध : आणि भा. रा. भागवत वगैरेही वाचायचात का ?
हृषीकेश : भा. रा. भागवत तर नेहमी सोबतच होते. दुसरीत किंवा तिसरीत असताना गावातल्या लायब्ररीमध्ये ते सापडले होते. माझ्या सुदैवाने शाळेतली लायब्ररी समृद्ध होतीच, पण गावातली लायब्ररीसुद्धा समृद्ध होती. मी सहावीत किंवा सातवीत असताना गावात महापूर आला आणि त्यात ती लायब्ररी संपूर्णपणे गेली. मग पुन्हा सगळं वसवताना जी पुस्तकं आणली गेली, ती जेमतेम दोन हजार वगैरे इतकीच होती, आणि वाईट म्हणजे, आजही तिथल्या पुस्तकांची संख्या ही साडेतीन हजार इतकीच आहे. एके काळी त्या लायब्ररीत बारा ते पंधरा हजार पुस्तकं होती, ती महापुरात गेली, आणि मग त्या लायब्ररीने कधी जीवच धरला नाही. पुढे तर मग वाचनाचा ट्रेंड कमी झाला. खरं तर, ‘ट्रेंड’ हा शब्द सुयोग्य नाही, त्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधायला हवा; पण सध्या हाच योग्य वाटतोय. पुढच्या काळात डिजिटल वेळकाढूपणाचा जो एक स्फोट झाला, त्यात लायब्ररीसारख्या गोष्टी कोलमडूनच गेल्या. तेव्हाही पेण, अलिबाग, रोहा, पाली या आमच्या शेजारच्या गावांतल्या लायब्ररींपेक्षा आमच्या गावची लायब्ररी खूपच अशक्त होती; पण त्या वेळेस त्या लायब्ररीने जवळ घेतलं, हेही खरंच ! सांगायचं इतकंच की वाचनासाठी पोषक असा सभोवताल तेव्हा होता, ज्याचा प्रभाव माझ्यावर पडला.
अनिरुद्ध : तुमचं शिक्षण आणि वाचनाची सुरुवात साहजिकच मराठीमधून झाली, इंग्रजी वाचनाकडे कधी आणि कसे वळलात ?
हृषीकेश : इंग्रजी पुस्तकं कशी मिळवायची, कुठे मिळतील, हे खूप उशिरापर्यंत माहीतच नव्हतं. मुळात इंग्रजीची फार भीती होती. तेव्हा आजइतकं इंग्रजी भाषेचं उपलब्ध असणं सहज नव्हतं. माझी इंग्रजीशी पहिली ओळख पाचवी इयत्तेत असताना झाली. आमच्या शाळेत चौथीपर्यंत इंग्रजी हा विषय नव्हताच. पाचवीत तो विषय येऊन, आणि कठीण असूनही माझं इंग्रजी चांगलं होतं. पण फरक असा की मी बारावीत असताना मराठी साहित्यामध्ये जी. ए. वाचत होतो, किंवा माझी कोसला वाचून झाली होती — म्हणजे, आपण ‘जड’ प्रकृतीची पुस्तकं म्हणू, अशी पुस्तकं मराठीत वाचत होतो; पण त्याच वेळी इंग्रजीमध्ये ज्याला परीकथा म्हणू, तेही सलग वाचणं जड जात होतं. पण एक वेळ अशी येते की आपल्या आजूबाजूचं आपल्याला हवं असलेलं सगळं वाचून संपतं आणि आपल्याला वाचायचं तर असतंच, त्यातूनच आपण दुसरीकडे वळतो. माझं इंग्रजी वाचन त्यातूनच सुरू झालं. मला आठवतं तसं, मी आठवीमध्ये असताना माझी एक आत्तेबहीण मुंबईहून आमच्याकडे आली होती. ती एक पुस्तक वाचताना खूप एक्ससाईट होत होती, मला कुतूहल वाटलं. तिने मला नंतर सगळी कथा वगैरे सांगून, ‘तू वाचलं पाहिजेस, सोप्पं असतं !’ वगैरे म्हणत पुस्तक वाचायला म्हणून हातात दिलं; पण मी काही एका उताऱ्यापेक्षा अधिक वाचू शकलो नाही. ते पुस्तक होतं जेफ्री आर्चरचं शाल वूई टेल द प्रेसिडेंट? ! हेच दुसऱ्या एका बहिणीसोबत झालं. तिने मला अगाथा ख्रिस्तीच्या द क्रूकेड हाऊसची कथा सांगत ते मला वाचायला लावलं; पण त्या काळात मला तेही जमलं नाही. मुळात तो एक न्यूनगंड होता की इंग्रजी वाचन काही आपल्याला जमणार नाही. गंमत म्हणजे, पुढे एका दिवशी माझ्या हाती सिडने शेल्डनचं एक पुस्तक आलं —टेल मी युअर ड्रीम्स! त्याची भाषा खूपच सोपी आणि शैली ओघवती आहे. ते वाचताना मला कळलं, इंग्रजी वाचन काही तितकंसं कठीण नाही. तिथून सुरुवात झाली. मग तो प्रवास फ्रेडरिक फोरसिथ, रॉबर्ट लुडलमपासून ते इंग्रजीतल्या गाजलेल्या क्लासिक्सपर्यंत असा सुरू राहिला आहे.
अनिरुद्ध : असंही झालं आहे का, किंवा होतं का, की आज एखादं पुस्तक वाचायला घेतलं किंवा सिनेमा बघायला घेतला आणि जमत नाहीये किंवा आवडत नाहीये म्हणून सोडून दिला, आणि नंतर काही काळाने — जसं की सहा महिने, वर्ष किंवा अधिक — तो सिनेमा किंवा ते पुस्तक परत सापडलं आणि पूर्ण संपवलं गेलं ?
हृषीकेश : मला असं ठामपणे वाटतं की वाचन किंवा सिनेमा किंवा कुठलीही कला ही आपल्याला परपेच्युअली आवडत राहू शकत नाही. तो एक विशिष्ट काळ असतो, ती एक विशिष्ट वेळ वेळ असते; त्यात तू कुठे, कशा परिस्थितीत, काय, आणि कसा आहेस, काय बघतो किंवा वाचतो आहेस, त्यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळे तू म्हणतोस तसं ते होतंच.
अनिरुद्ध : आपल्याकडे अलीकडे एक नवीन ‘टोटल कॅन्सल’ किंवा संपूर्ण फुली मारायचं ‘कल्चर’ आलेलं आहे, कुठल्याही पातळीवर, हे माझ्यासाठी नाही म्हणून ते सोडून दिलं जातं. असं सतत वाचणाऱ्या / बघणाऱ्या लोकांबाबत होत नाही. त्यांच्याकडून कशावरही संपूर्ण फुली मारली जात नाही …
हृषीकेश : अरे, नाहीच मारली जात, आणि ती तशी मारली जाऊही नये ! पूर्ण फुली मारणं हे ज्यांना करिअरच फुली मारण्यात किंवा टीका करण्यात करायचं आहे, त्यांच्यासाठी आहे. टिप्पणी करणं हा ज्यांचा व्यवसाय आणि काम आहे, ते या गोष्टी करतात.
अनिरुद्ध : तुम्ही एकाच वेळी समीक्षक आणि आस्वादक या दोघांकडेही बाण सोडलेला आहे.
हृषीकेश : मी समीक्षक किंवा आस्वादक हा शब्द वापरला असता, पण ते त्यांच्यापुरतं मर्यादित नाहीये, मला ते तसं ठेवायचंही नाहीये. म्हणजे साधी माणसंदेखील अघोषित समीक्षक असतातच! एक सिनिसिझम प्रत्येकात असतो. न वाचता किंवा बघता टिप्पणी करणं हे खूप सहज आहेच. आणि हे सगळीकडे आहे. ही वृत्ती सगळीकडेच आहे, आपल्याकडेच आहे असं नाही. आपल्याकडे जे होतं, ते थोडं वेगळं आहे. म्हणजे एखादा सिनेमा किंवा साहित्यकृती किंवा लेखक संपूर्णत: नाकारणं, त्यावर फुली मारणं / डिस्कार्ड करणं हे अतिशय जबाबदारीचं काम आहे. आपल्याकडे ते फॅशन म्हणून होतं.
अनिरुद्ध : पण हे सार्वजनिक पातळीवर किंवा समूह म्हणून निरीक्षण किंवा मत असावं. याउलट, आपण जेव्हा वैयक्तिक पातळीवर निवडी करत असतो, तेव्हा आपापल्या फुल्या मारत असतोच की, हा माझा विषय नाही किंवा हा माझा प्रकार नाही इत्यादी!
हृषीकेश : अर्थातच करतो! म्हणजे मीदेखील हे करतोच की! पण तरीही मला असं वाटतं की हे जबाबदारीने केलं पाहिजे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट तुमच्या आवडीची नाही, याचा अर्थ ती दुय्यम आहे असा होत नाही. हे विधान मी अत्यंत गंभीरपणे आणि अनेक निरीक्षणं-चिंतनं-विचारांनंतर करतोय, ते कुणी सहज केलेलं विधान समजू नये ! हे येताजाता कट्ट्यावर बसून केलेलं उथळ विधान नाही. तुमचा-तुमचा एक आवडता जॉनर असतोच, ज्यात तुम्ही रमता आणि पुढे जाता. त्यातही, तुम्ही निर्माते (कलाकार / लेखक) असता तेव्हा या आवडीनिवडी अजून थोड्या मर्यादित होत जातात. सिनेमा किंवा साहित्य — कुठलंही लिखाण करत असताना ज्या विषयावर तुम्ही काम करत आहात, त्याबाबत वाचणं किंवा पाहणं किंवा निवड करणं जास्त सहज आणि सोईस्कर असतं. उदाहरणार्थ, मी सध्या थ्रिलर लिहीत असेन, तर मला त्या संदर्भातलं साहित्य वाचणं-पाहणं जास्त सोईस्कर असेल. या काळात माझ्याकडून इतर काही वाचलं किंवा बघितलं जाणार नाही, किंवा ते कमी प्रमाणात केलं जाईल. मला त्यात रुची वाटत नसेल, पण म्हणून त्या इतर गोष्टी दुय्यम ठरत नाहीत, ठरणारही नाहीत. हे सगळं एकाच वेळी अनेक विषयांना आणि अनेक पातळ्यांवर स्पर्श करणारं आहे, आणि त्याची सहज शब्दांत मांडणी करता येईल, असं नाही.
अनिरुद्ध : आणि ते तसंच्या तसं मांडणं शक्य नाही. म्हणजे तसंच्या तसं कसं मांडता येईल ?
हृषीकेश : हा मुद्दा आहेच. मी कदाचित बोलताना त्याची नीट मांडणी करण्यात थोडा अडखळेन, पण मला तू जर हे लिहून मागितलंस तर मी नीट लिहून देऊ शकेन. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ‘हार्ड-वायर्ड’ असतो …
अनिरुद्ध : ‘हार्ड-वायर्ड’ ही छान संकल्पना आहे !
हृषीकेश : होय, म्हणजे बघ, मी लिखाणासाठी जास्त ‘हार्ड-वायर्ड’ आहे. म्हणजे, मी वक्ता असतो तर मी बोलून व्यक्त होण्यासाठी ‘हार्ड-वायर्ड’ असतो आणि तसं व्यक्त झालो असतो. मी बर्यापैकी बोलू शकतो; पण तरीही लिखाण हे माझं माध्यम आहे.
अनिरुद्ध : मग हे तुमच्या कधी लक्षात आलं, की तुम्ही लिखाणासाठी ‘हार्ड-वायर्ड’ आहात ? लिहिता येणं हा कौशल्याचा भाग मान्य केला, तर सरसकट सगळ्यांनाच लेखक म्हणावं लागेल. तर ते तसं नसून, लिखाण या पातळीवर आपण एक कथा किंवा कादंबरी किंवा स्वत:ची अशी खास मांडणी करू शकतो — आपण लिहू शकतो — हे कधी कळलं ?
हृषीकेश : हा प्रश्न तू तसा अवघड वेळेस विचारला आहेस. मी सध्या ‘लिखाण ही अतिशय कठीण गोष्ट आहे, आणि आपण कदाचित लेखक नाही — आपल्याला लिहिता येत नाही’ असं वाटण्याच्या फेजमध्ये आहे. दोन-एक महिन्यांपूर्वी मला हा प्रश्न विचारला असतास, तर त्याचं उत्तर मला सहजपणे देता येण्यासारखं होतं.
अनिरुद्ध : पण तुम्हांला हे असं वाटणं हे दोन दशकांच्या सातत्यपूर्ण लिखाणानंतरचं आणि जवळपास बारा पुस्तकांच्या लेखनानंतरचं आहे. हा सगळा काळ आपण कसा वगळू शकणार आहोत ?
हृषीकेश : हो! म्हणजे मला लिहिता येऊ शकतं हे मला दुसर्या-तिसर्या इयत्तेत असल्यापासूनच ठाऊक होतं ! पण एक कल्पना मनात येणं, ती पूर्ण सुचणं, ती संपूर्णपणे मोल्ड करणं, आणि ती आपल्याला हव्या त्या पद्धतीने कागदावर मांडता येणं, हा माझ्यासाठी खूप ट्रायल आणि एररचा भाग होता. खऱ्या अर्थाने आपण लिहू शकतो हे मला दोन वेळा वाटलं — एक, माझी परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष ही कथा लिहून झाली (२००९) तेव्हा. ती कथा उशिरा प्रकाशित झाली, आणि तेव्हा मी हाती लिहीत असे. त्यात मला जे विशिष्ट निवेदन, विशिष्ट फॉर्म हवा होता, जो मला कथा लिहिताना सापडला देखील, पण तो संपूर्ण कथाभर राखणं कठीण होतं; ते मला जमलं आणि कथा लिहून पूर्ण झाल्यावर मला पहिल्यांदा वाटलं की आपण लिहू शकतो. आपल्याला हवं तसं कथानक आणि हवी तशी मांडणी पेलवू शकतो. ती जाणीव नव्हती, तो आनंद होता. हां, आता मला कळलं की गाडी अशी चालवतात आणि मला गाडी चालवणं आता येतं’ अशी ती भावना नव्हतीच ! आणि दुसऱ्यांदा असं झालं, जेव्हा मी दंशकाल लिहिली तेव्हा ! ती मी चार-साडेचार वर्षं लिहीत होतो. ती पूर्ण झाल्यावर मला वाटलं, हे बरं लिहून झालं आहे. हे मी त्याच्या साहित्यिक गुणवत्तेबाबत बोलत नसून, मला वाचताना जे जाणवत होतं त्याबाबत म्हणतो आहे. म्हणजे, ते माझं आहे म्हणून माझ्या सगळ्या संवेदना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत म्हणूनही असेल; पण मला ते लिहून झाल्यावर पुन्हा एकदा वाचताना असं वाटलं की, हो, आपण लिहू शकतो ! आणि हीच दंशकाल वाचून अनेक लोकांची — अगदी सामान्य वाचक ते सुजाण समीक्षक — सगळ्यांची प्रतिक्रिया उमटली होती. या दोन घटनांवरून मला वाटलं, की आपण नक्की लिहू शकतो !
अनिरुद्ध : यावरून एक विचारावंसं वाटतं, ते असं, की मधल्या काळात ‘हृषीकेश गुप्ते म्हणजे हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ असंसुद्धा एक समीकरण फार प्रसिद्ध झालं होतं, त्याकडे तुम्ही कसं बघत होता ?
हृषीकेश : हो, पण त्याचं मला नवल वाटतं, आणि आनंदही होतो, की हजार वेळा शोले पाहिलेला माणूसनंतर दंशकाल आलं आणि ‘हृषीकेश गुप्ते म्हणजे दंशकाल’ हे समीकरण झालं. त्यानंतर गोठण्यातल्या गोष्टी आलं आणि त्यासोबत माझी सांगड घातली गेली. त्याआधी गानू आजीची अंगाई या कथेसोबत देखील हेच झालं होतं की ! मी म्हटलं तसं, मला नवल आणि आनंद दोन्ही वाटतात.
अनिरुद्ध : यावरून एक गंमत म्हणू किंवा फॅक्ट म्हणू, सांगावीशी वाटते, ती अशी की माझ्या व्यवसायानिमित्त माझं महाराष्ट्रभर फिरणं होतं, जिथे कुठे असेन तिथल्या वाचकांशी बोलताना ‘काय वाचता ?’ या प्रश्नावरचं उत्तर म्हणून जी काही नावं येतात, त्यांत तुमचं नाव आणि हजार वेळा शोले पाहिलेला माणूस किंवा गानू आजीची अंगाई या दोनपैकी एक कथा असतेच.
हृषीकेश : खरं सांगायचं, तर मला भीती हा प्रकार फार आवडतो. गानू आजीची अंगाई ही तशी पारंपरिक ढंगाची कथा आहे. ती लिहितानाच मला फार मजा आली होती, आणि ती फार लोकांपर्यंत पोहोचली. अनेक लोकांनी ती ब्लॉगवरून प्रसिद्ध केली, कॉपी-पेस्ट करून पाठवली, ईमेल केली, आणि त्याचमुळे ती वाचली पण खूप गेली. त्याचमुळे ते समीकरण तयार होणं किंवा तशी माझी ओळख तयार होणं हे साहजिक आहेच.
अनिरुद्ध : तुम्ही पहिली कथा कधी लिहिलीत ? कॉलेजमध्ये असताना ?
हृषीकेश : हो !
अनिरुद्ध : आणि ती कुठे छापून आली ? कॉलेजच्या मासिकात का ?
हृषीकेश : कुठेच नाही ! माझ्या जवळपास सत्तर-ऐंशी कथा अशा आहेत, ज्या कुठेच छापून आलेल्या नाहीत ! त्यांतल्या बऱ्याच अजूनही माझ्याकडे आहेत, काही गेल्या, हरवल्या ! मधल्या काळात तर मी असंही ठरवलं होतं की सगळ्यांना काडीच लावावी. ते असं काही आठवणीत वगैरे ठेवावं, असं नाहीये. म्हणजे, माझी दहावीतली फाटकीतुटकी चप्पल असेल तर एक वेळ मी ठेवेनही; पण जिथे मला मी लिहिलेलं वाचायलाच संकोच वाटतो त्याचं काय कौतुक किंवा अजून काही करावं ना ? म्हणजे, एखादी प्रेमाची गोष्ट किंवा तत्सम काही, ज्याचं काही होऊच नये असंच वाटतं. काही लोक असतात, ज्यांना वाटतं की लिखाणातला हाही टप्पा वाचकांना वाचायला मिळायला हवा. माझे काही वाचक मला या कथाही प्रकाशित करण्याविषयी सांगतात; पण मला अजिबात असं वाटत नाही की याचा काही प्रपोगंडा करावा, आणि माझा इतका काही मोठा वाचक-बिचक आहे असंही वाटत नाही. प्रत्येकाचंच लिखाण आज ना उद्या काळाच्या पडद्याआड जाणार आहेच !
अनिरुद्ध : तुम्हाला असं कधी आणि का वाटलं, की गूढकथा लिहाव्यात ?
हृषीकेश : मला गूढकथाच सुचत असत ! म्हणजे, आजही माझा (माझ्या लिखाणाचा) आत्मा बघितलास तर तो गूढकथाच आहे ! मुळात माणूस हीच किती मोठी गूढकथा आहे, याचा आपल्याला अंदाज नाही. आपण काय आहोत हे कधीच कळत नाही, आणि मला त्यात रस आहे. आपण जसे आहोत, जसे कसे विचित्र आहोत, ते तसं सहसा समोर येतच नाही. माझ्या सगळ्या लिखाणात वाचक हा विचार बघू शकतात. लोक म्हणतात की, मानवी मनाचं गूढ वगैरे गुप्ते करतो; तर ते तितक्यापुरतं मर्यादित नाहीये, त्याहीपलीकडे अनेक गोष्टी माझ्या लिखाणात आहेत, ज्या वाचकांनी बघायला हव्यात, असं मला वाटतं.
अनिरुद्ध : तुमची पहिली कथा कधी छापून आली ? ती काय आठवण आहे ?
हृषीकेश : पहिलं लिखाण दिवाळी अंकातच आलं होतं.
अनिरुद्ध : इतकी जुनी घटना आहे की आठवत नाहीये ?!
हृषीकेश : माझ्या दोन-चार कथा गावीच असताना तिथल्या स्थानिक दिवाळी अंकात छापून आल्या होत्या, साल असेल २००४-०५. पुढे २००८ साली लोकमतच्या दिवाळी अंकात माझी कथा छापून आली — मंगळावरचे हत्ती ! चांगली कथा होती ती, मला आवडते. मला कधी कधी वाटतं की मी सुरुवातीच्या काळात खूप हात आखडता घेतला. म्हणून मला असं वाटतं की मी पुरेसं लिहिलेलं नाही. या दोन दशकांत जितकं मी लिहिलं आणि छापून आलं, त्याहीपेक्षा किमान दुप्पट काम आजवर व्हायला हवं होतं.
अनिरुद्ध : तुम्ही लेखक म्हणून केलेल्या प्रवासाचे टप्पे सांगता येतील ? म्हणजे, जेव्हा लिहायला सुरुवात केली असेल तेव्हा सुचतंय तसं लिहीत जाणं, इथपासून ते आज, आपल्याला जे कथाबीज सुचलं आहे ते अमुक अशा पद्धतीत मांडता येईल हा विश्वास येईपर्यंतच्या काळातला आलेख बघताना टप्पे ठरवता येतात का ? याचं उत्तर ‘हो’ असेल, तर ते टप्पे कोणते असतील ?
हृषीकेश : मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू का ? तर मला हे असं पॉइंट आउट करता येणार नाही. कारण सांगतो, परवा मी दैत्यालय वाचत असताना लक्षात आलं की माझी भाषा तेव्हाही स्ट्राँगच होती की ! किंवा कानविंदे हरवले हे काठिण्यपातळीवर आणि नकळत झालेला प्रयोग म्हणून बघताना माझं मलाच आवडणारं काम आहे, असं म्हणता येईल. अनेक कारणांनी मला माझ्या प्रवासातले टप्पे सांगता येणार नाहीत, कदाचित ते तू किंवा इतर सांगू शकतील. मला असंही वाटत नाही, की माझ्या लिखाणाला अमुक एक आलेख आहे, म्हणजे, निदान मला तरी तो सापडत नाही.
अनिरुद्ध : पण म्हणजे, लेखक म्हणून तुम्ही कसे वाढलात, मोठे झालात, हे कसं बघता ?
हृषीकेश : नाही, मी लेखक म्हणून बदललो, असं म्हणता येत नाही. मी तेव्हाही आजसारखाच होतो किंवा आजही तसाच आहे. मला असं वाटतं की आपल्या मनात जे चाललं आहे किंवा आपल्या मनातल्या ज्या फॅंटसीज आहेत, तशा प्रकारच्या फॅंटसीज आधीही कधीतरी कुणीतरी लिहिल्या आहेत, हे माझ्या जसं लक्षात आलं, तसंतसं मी अधिक लिहू लागलो. हजार वेळा शोले पाहिलेला माणूसचं उदाहरण देतो. १९९५ साली माझ्या भावाचं लग्न झालं आणि त्याला शोलेची व्हिडिओ कॅसेट भेट मिळाली. माझे वडील आधीच निर्वतले होते, आई मामाकडे मुंबईला गेलेली, बहिणींची लग्न झाली होती, आणि भाऊ फिरायला गेला होता, अशात घरात मी एकटाच होतो. माझी बारावीची परीक्षादेखील होऊन गेली होती. मला धर्मेंद्र आवडत असे. म्हणून मग धर्मेंद्रला पाहण्यासाठी मी रोज शोले बघू लागलो. आणि गंमत म्हणजे, मला तेव्हापासून पुढचे अनेक दिवस स्वप्नात, गब्बर मला मारतोय किंवा माझ्यावर कुणी सिनेमातला व्हिलन गोळ्या झाडतोय, मी लपतोय, असं दिसे. आता याचं काय करायचं, हे तेव्हा कळलं नाहीच. पण हे कथारूपात २०१३ साली लिहिलं गेलं. मी त्याआधी का लिहिलं नाही? याचं उत्तर म्हणजे हे मोठं होणं असावं. या मधल्या काळात मी वाचत राहिलो. याच काळात मला हे ठामपणे कळलं की कुठलीही कल्पना अशी उतरवता येते, लोक ती उतरवतात, आणि ती उतरवलेली कल्पना लोक वाचतात सुद्धा !
अनिरुद्ध : या तुमच्या उदाहरणावरून मला मार्क्वेज आठवला. तो काफ्का वाचल्यावर म्हणाला होता की, ‘हे असं लिहिलेलं चालतं हे मला आधी कळलं असतं, तर मी वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड खूप आधी लिहिली असती ! मला वाटायचं की अशा कल्पना विचित्र किंवा विक्षिप्त म्हणून लोकांना आवडणार नाहीत !’
हृषीकेश : मला वाटतं की लिखाणाचा हा प्रवास असा असतो — आपण वाचत राहतो, सभोवताली काही ना काही (साहित्य) तयार होत असतंच, मग ते तयार होतं आहे हे पाहून आपल्याला चांगल्या लिखाणाचा हेवा वाटू लागतो, सुमार लिखाणाची चीड येते. ही क्रिया चालत राहते. यात प्रभाव पडतात, पाडले जातात, इत्यादी होत राहतंच.
अनिरुद्ध : मला यावरून तुम्हांला विचारावंसं वाटतं की तुमची नवेपणाची व्याख्या काय आहे ?
हृषीकेश : चांगला प्रश्न आहे ! (साहित्याच्या बाबतीत) आजवर जे वाचलेलं नाहीये ते म्हणजे नवं !
अनिरुद्ध: ही व्याख्या कशी करायची? कारण हे तुमचं विधान तसं वैयक्तिक पातळीवरचं आहे असं म्हणता येईलच!
हृषीकेश: आपल्याकडचा एक प्रॉब्लेम सांगतो, म्हणजे जरा सोपं होईल. आपल्याकडे आजवर न वाचलेलं या प्रकारात जे लिहिलं गेलं, ते म्हणजे फक्त फॉर्ममधले प्रयोग होते. घटना-प्रसंगांत, काळात बदल, इकडे-तिकडे करणं किंवा ‘गुलाबी’ लिहायचं असेल तर ‘लाबीगु’ लिहिणं वगैरे. प्रयोग हा फक्त मांडणीत आणि रचनेत असून उपयोगाचा नाही. प्रयोग-नावीन्य हे कल्पनेत असायला हवं. आता वाचन हा खासगी परिप्रेक्ष्यातील विषय आहे हे मान्य करूनही, ही मांडणी कुणाच्या व्यक्तिसापेक्षतेवर अवलंबून असलेली चालेल का ? किंवा ती अशा सापेक्षतेने केलेली चालेल का ? तर, अर्थातच नाही. ती तशी नसतेच ! सरसकट एक समूह काय प्रकारचं वाचन करतो ते महत्त्वाचं आहे. नवं म्हणजे ते सगळं, जे ताजं असेल, वेगळं असेल, आणि आता या काळात जगणाऱ्या (वाचणाऱ्या) प्रत्येकाला ‘रिलेट’ होईल असं ! प्रयोग करताना आशयातला प्रयोग हवाच, आणि तेच नवं आहे, आणि असेल.
अनिरुद्ध : सतत लिहीत राहताना येणाऱ्या अडचणी कुठल्या असतात ? आणि त्या लेखक म्हणून सगळ्यांसाठी सारख्या असतात, असं वाटतं का ?
हृषीकेश : मी आता खूप स्तर असलेली आणि एकाच वेळेस अनेक पातळ्यांवर घडणारी कादंबरी लिहीत आहे. ती कादंबरी मला एकाच वेळेस अनेक दृष्टिकोनांतून लिहावी लागत आहे, ती या कथानकाची मागणी आहे. त्यातल्या एका प्रकरणात मला दहा ठिकाणच्या एकाच वेळी घडणाऱ्या घटना सांगायच्या आहेत. उदाहरणार्थ, मला एकाच वेळी पुणे, नागोठणे, मुंबई, राजस्थान, आणि अजून कुठेतरी घडणाऱ्या घटना सलग सांगायच्या आहेत, आणि त्याही वेगवगेळया दृष्टिकोनांतून (परसेप्शन) सांगायच्या आहेत. मला वाटतं, लेखकाला हे दृष्टिकोन नीट बदलवता येणं, किंवा सतत बदलत राहणं पेलवता येणं हे सगळ्यांत मोठं आव्हान असतं. हे ज्या लेखकांना जमलं, तेच लेखक मोठे झाले, मग ते दळवी असतील, पेंडसे असतील ! असं दृष्टिकोन बदलत लिहीत राहणं फार कठीण असतं.
अनिरुद्ध : कधीतरी आपल्या लिखाणाकडे ‘प्रॉडक्ट’ म्हणून बघता यायला हवं, असं वाटतं ? कारण सतत लिहीत राहणं ही तशी उत्पादनशील प्रक्रिया आहे.
हृषीकेश : निश्चितच ! आपल्या लिखाणाकडे आपल्याला ‘प्रॉडक्ट’ म्हणून बघता यायला हवंच. माझं लिखाण, माझी कलाकृती असं म्हणण्यापेक्षा ते एक प्रॉडक्ट आहे आणि आपल्याला ते डिलिव्हर करायचं आहे, हा अप्रोच हवाच.
अनिरुद्ध : हाच दृष्टिकोन तुम्हांला चित्रपटकार म्हणून उपयोगी पडतो, असं वाटतं ?
हृषीकेश : अर्थातच ! कारण तिथे आपण केलेलं काम ‘कलाकृती’ नंतर बनतं, आधी आणि तोपर्यंत ते एक ‘प्रॉडक्ट’च असतं.
अनिरुद्ध : तुम्ही अचानक चित्रपट-व्यवसायात कसे आलात ? का यावंसं वाटलं ? कारण, त्याबाबत सामान्यत: असते तशी कुठलीही पार्श्वभूमी तुम्हांला नाही.
हृषीकेश : जसा मी लिखाणात आलो, तसाच मी सिनेमात आलो. लिखाण हे कौशल्य म्हणून आपल्याला शाळेत शिकवलं जातं. पुढे जे डोक्यात-मनात सुरू आहे, ते असं लिहिलं जातं, जाऊ शकतं हे कळलं तसं मी लिहू लागलो. तसंच, सिनेमा असा बनवला जातो हे कुतूहल शमलं, आणि मग ते तंत्र काहीसं अवगत झालं, आणि मी सिनेमा बनवण्याकडे वळलो. जेव्हा मी पुस्तकं वाचत होतो, तेव्हा माझ्याकडे सांगायला एक गोष्ट होती. त्याचप्रमाणे, जेव्हा मी सिनेमा बघत होतो, तेव्हाही माझ्याकडे सांगायला म्हणून एक सिनेमाची गोष्ट होतीच, आणि दोन्ही वेळेस माध्यम वेगळं होतं. फक्त लिहिणं काय असतं, आणि कसं असतं, हे कळणं सोपं होतं. सिनेमा कसा बनवतात, तो कॅमेऱ्यात शूट होतो, तेदेखील लहानपणी ठाऊक नव्हतं. जेव्हा हे कळलं, लक्षात आलं, शिकलो, तेव्हा सिनेमा बनवला. कशासाठी, तर कारण तेच — गोष्ट सांगायची तर आधीपासून होतीच ! मी जितकी पुस्तकं वाचली आहेत, त्याहीपेक्षा जास्त मी सिनेमे पाहिलेत,- त्या जगात प्रचंड आयुष्य घालवलं आहे.
अनिरुद्ध : तुमच्या कानविंदे हरवलेमध्ये तुम्ही जगलेलं हे सिनेमाचं जग दिसतंच.
हृषीकेश : आहेच ! ते माझंच जग आहे. म्हणूनच मला ती कादंबरी ग्रेट वाटते. पण अजूनही मला वाटतं की मला जे फिल्मविषयी लिहायचं आहे, ते कानविंदे हरवलेमध्ये संपूर्णत: आलेलं नाही; तिथे शेवटी सिनेमाबाबतचं तत्त्वज्ञानच आलेलं आहे. फिल्मचं जे जगणं आहे, ते खूप थोडक्यातच आलेलं आहे. म्हणजे बरेच लोक त्या माळ्यावरच्या डायरी शोधण्याच्या प्रसंगाविषयी कौतुकाने लिहितात; पण त्याआधी ताम्हिणी घाटात घडणाऱ्या एका प्रसंगात मी सिनेमातल्या ‘साऊंड’विषयी लिहिलेलं आहे, हे कुणाच्या लक्षात आलेलं नाही. तो प्रसंग मी साक्षात अनुभवला आहे. आता हेही आहे की काही लोकांनी त्या सगळ्या जगाची टिंगलदेखील केली — काय तो डॉक्टर ‘सारा जमाना’ या गाण्यावर नाचतो वगैरे — पण मला त्याला तसं नाचवायचं होतं. मी आता कोण काय म्हणतं यापलीकडे गेलो आहे, आणि मी हे अहंकाराने म्हणत नाहीये. माझ्यासाठी हे असं आहे, आणि मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत. म्हणजे मी मार्क्वेज होऊ शकत नाही हे मला ठाऊक आहे, पण मी हृषीकेश गुप्ते आहेच, हेही खरं आहे ! असो. एकूणच सिनेमाविषयी फिक्शनमधून लिहिणं अजून बाकी आहे. या विषयावर अजून दोन-तीन पुस्तकं येतील, हे नक्की.
अनिरुद्ध : कानविंदे …च्या शेवटाकडे असं ठळकपणे वाटतं की याचा दुसरा भाग येईल, येतोय का ?
हृषीकेश : शेवट लिहिताना मी स्वत:ला हेच म्हणालो होतो की आपल्याला याचा सिक्वेल लिहायचा आहे, पुढे सिक्वेलचाही सिक्वेल लिहायचा आहे, -आणि हेच कारण देऊन ती कादंबरी तशी संपली. आता पुढे लिहायचं म्हटलं तर ते काही साधं काम आहे, असं मला वाटत नाही. सिक्वेलची घटना-प्रसंग म्हणून मांडणी सोपी आहे, पण मला तो हॉलीवूडमध्ये घडणारा असा लिहायचा आहे; आणि त्यासाठी लागणाऱ्या संशोधनाची प्रक्रिया मोठी असणार आहे. पण तो लिहिणार, हे नक्की.
अनिरुद्ध : लेखक म्हणून किंवा आयुष्याचा भाग म्हणून सामोरं जावं लागणाऱ्या सगळ्या प्रतिकूल घटनांमध्ये किंवा परिस्थितींमध्ये सुचणं, कल्पना येत राहणं, दिसत राहणं किती कठीण असतं ? हे कसं जमवलं जातं ?
हृषीकेश : अतिशय कठीण असतं ! म्हणजे, अनेक भयानक घटना घडत असतातच, पण त्या काळात आपल्याला एकटं पडू न देणारी माणसं सोबत असणं फार महत्त्वाचं असतं. आणि मला असं ठाम वाटतं की ज्याला लिहायचं असतं, तो लिहितोच ! त्याच्यात ते अंगभूत असतंच, फक्त तो मधला काळ सरेपर्यंत स्थिर राहता येणं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. शेवटी काळ हाच सर्वोत्तम उपाय असतो, तो बदलला की गोष्टीदेखील बदलतातच.
अनिरुद्ध : तुमची चांगल्या कलाकृतीची व्याख्या काय आहे ?
हृषीकेश : माझ्यासाठी हे अगदी सहज आणि साधं आहे. पाचशे पानांच्या पुस्तकात मला दोन पानं जरी हरखून टाकणारी मिळाली, तरी ती कलाकृती मी अव्वल मानतो. आपल्याकडे शेवट, मांडणी, क्रम यांवरच जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. मला स्वत:ला हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या माझ्या कथेचा शेवट आवडत नाही, त्यावर अजून जास्त काम करायला हवं होतं, असं वाटतं. पण तरीही लोकांना ती खूप आवडली, कारण तिचा विषय लोकांच्या जवळचा वाटेल असा होता. कलाकृती तर त्याहीपुढे असते. तिच्या चांगलेपणाची व्याख्या ही सुरुवात, शेवट, मांडणी अशा दुय्यम गोष्टींवर आधारलेली नसते, असं मला वाटतं.
अनिरुद्ध : लेखक म्हणून तुम्ही आजच्या मराठी साहित्यव्यवस्थेकडे कसे बघता ? काय बदल हवा, असं वाटतं ?
हृषीकेश: पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली, तर पुस्तकं संपतील. पण त्यासाठीचे नवीन कालवे ही व्यवस्था खणत नाही, ते खणायला हवेत. रूढ व्यवस्थेतले प्रकाशक हे करत नाहीत, त्यांनी आजच्या ठरलेल्या विक्रीव्यवस्थेच्या पलीकडे जायला हवं. दुसरं, त्यासोबतच नवं काही लिहिलं जायला हवं, म्हणजे त्यासोबतच ते पोहोचवायचं कसं याबाबत देखील नवीन दृष्टिकोन मिळतील. वाचकांशी संपर्क वाढवून त्यांच्या मतांवर, मागण्यांवर विचार केला पाहिजे. आपल्याकडे मुळात अशी वाचनसंस्कृती नाही, ती तयार होण्यासाठी हे गरजेचं आहे. आता जो आपल्याला सोशल मीडियावर वाचनाचा ट्रेंड दिसतोय, तो तात्कालिक आहे, आणि तो फार काळ टिकेल असं नाही. त्यासाठी काम करावं लागेल हे नक्की !
अनिरुद्ध : शेवटचा प्रश्न, दोनच शब्दांचा आहे, ‘पुढे काय ‘ ?
हृषीकेश : पुढे खूप आहे — खूप आहे ! म्हणजे आतापर्यंत लिहिलंय, ते खूप कमी आहे. मनात रेंगाळणार्या कल्पना, अर्धवट लिहून पडलेलं लिखाण, किंवा सुरुवात करून बाजूला ठेवलेलं लिखाण यांपैकी पन्नास टक्के लेखन जरी पूर्ण झालं, तरी पुष्कळ काम होईल. हाकामारीच्या काळात घडणाऱ्या अजून दोन पुस्तकांवर काम करायचं आहे. गोठण्यातल्या गोष्टींसारखा एक अजून प्रयोग करायचा आहे. जग फिरायचं आहे, जमलं तर अनेक सिनेमे लिहायचे, बनवायचे आहेत. आणि मला काही काळ निवांतपणा अनुभवायचा आहे, पूर्ण निवांतपणा — आज वाटलं, तुला भेटावं – भेटलो, उठून दुसरीकडे कुठे जावंसं वाटलं – गेलो, किंवा वाटलं, आराम करावा – काही दिवस आरामच केला — या अर्थाने निवांतपणा. असं बरंच आहे पुढे ! खूप आहे !
प्रतिमा सौजन्य: अनिरुद्ध प्रभू ‘असद पुस्तकवाला’
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram