Skip to content Skip to footer

राक्षस: दिनकर मनवर

Discover An Author

  • Poet and Artist

    दिनकर मनवर कवी आणि चित्रकार असून त्यांचे ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’, ‘अजूनही बरंच काही बाकी’ व ‘पाण्यारण्य’ हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते दागो काळे यांचे समवेत ‘अतिरिक्त’ या अनियतकालिकाचे संपादन करतात. कवितालेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

Rajib Chowdhury, In the land of Roses, Apple trees and Corpses – I, 2016

१.

तू मिश्या पांढऱ्या करतोस
यातच सगळं काही आलं

२.

तुला अख्खंच्या अख्खं शेत हवं आहे
पिकलेल्या वा वाळलेल्या पिकासह
नि सावलीसकट संपूर्ण झाडही 

केवळ ही दोन वाक्यं 
लिहिली असती तरी 
पुरे झाले असते
तुझ्याबद्दलचे सांगणे माझे

पण तू तर
सरतेशेवटी सर्वव्यापी 
होत चालला आहेस
तुझाच वास येतो आहे
जळी स्थळी काष्ठी पाषाणी

मी तो अनुभवतो आहे
इथे बसून
या पृथ्वीवरल्या अडगळीत 

३.

एक एक पापुद्रा
सोलून काढल्यासारखं
मी तुला सोलून पाहिलं
तर तुझा लिबलिबीत जीव
व्याकूळ होताना दिसतो

कशाकशासाठी तू एवढा 
होतो आहेस कासावीस 

कधीकाळी तू पृथ्वीसाठी झुरणारा
गायीच्या डोळ्यात करुणा पाहणारा
आज मात्र
किती किती चिखलात
हात माखून घेतो आहेस
किती माती गोळा करून
भरून गेले आहे तुझे असणे

काय हवंय तुला?

ही अख्खी पृथ्वी 
पादाक्रांत करायला निघाला आहेस 
हे ठीकच आहे 
पण साध्या साध्या गोष्टींना
तू टिकवून ठेवू शकत नाहीस 

तुला माहीत नाही का
पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यापेक्षा
मित्रांच्या हातात हात दिला असता तर
पूर्ण झाली नसती का तुझी प्रदक्षिणा
नि मग तुला अख्खीच्या अख्खी 
अहिल्या मिळाली असती
उद्धारासकट

मात्र तुला झालं तरी काय आहे?
की तू एकटाच उडत निघाला आहेस
आपला खोपा सोडून कुणा दूरदेशी 
त्या महाकाय अमृताच्या घड्यासाठी.

४.

तू ज्या झाडाखाली बसतोस
त्या झाडाची पानगळच होत राहते
तू ज्या नदीपात्रातून जातोस
ती नदी कोरडीठाक होत जाते
तू चालतो तो रस्ता गुंडाळून घेतोस
दुसऱ्यांना अनवाणी करून

अशा कोणत्या तृष्णेचं बी
रुजू पाहते आहे तुझ्या आत
की आता ताजमहालासाठी
तुझे डोळे दुखत राहतात

ही समूळ जमीन
तुझीच तर होणार होती
पण तुझ्या आत
विकल्पाने प्रवेश केला आहे
अन् तू भाग पाडत आहेस सगळ्यांना 
वनवास भोगण्यासाठी

तुझं काळीज 
लांडग्याचं होत चाललं आहे की काय 
काही काही कळत नाहीये मला

५.

मैत्री आणि शत्रुत्व
ही परस्परांची भिन्न टोकं आहेत दोन

तू टिकवू शकत नाहीस मैत्रीचं मडकं कायम
ते पुरेसं भाजण्याआधीच तू फोडून टाकतोस 
नि भिरकावून देतोस खापरं मैत्रीच्या स्मशानात

६.

अलीकडे तू मैत्रीची 
नव्याने व्याख्या करतो आहेस

पाण्यात चेहरा पाहून
नसतो अंदाज येत पाण्याच्या खोलीचा
तू तुझ्या चेहर्‍याच्या आड
आणखी किती दशासने घेऊन
तू उभा आहेस या मैत्रीच्या शेतात

मैत्रीचा गहू उगवण्याआधीच
तू त्याच्या ओंब्या ओरबाडून 
घेत राहतोस स्वतःच्या ओच्यामध्ये 

तसं तर एकाच ताटात
भाकर मोडून खाण्याची 
गोष्ट होती आपली
तर तू भाकरीसकट ताट उचलून
एकट्यानेच खात बसला आहेस
आतल्या घरात

काय खरं आणि काय खोटं
याच्या सीमारेषा
तू स्वतःच्या स्वतः ठरवतो आहेस

तुला माहीत असायला हवं होतं
त्याही पलीकडे एक अनभिज्ञ प्रदेश
असतोच असतो प्रत्येकाचा आपला
तिथे आपण भेटलो असतो खरंतर संपूर्ण

पण तुला कसली तरी घाई झाली आहे 
अज्ञात आणि कल्पिताच्या मधोमध
घर उभं करण्याची तुझं

७.

काय असतं ना
प्रत्येकालाच हा पहाड पार करायचा असतो
प्रत्येकालाच पलीकडच्या प्रदेशात जाऊन
पहुडायचं असतं शेषशायी
पहायचाच असतो रात्री खेळ चांदण्यांचा
परतून परत यायचं नसतंच कुणालाही
हात सुटून मागे पडलेल्या घराच्या वाटेनं

तशा पेशीच जन्म घेत राहतात 
प्रत्येकाच्याच आतमध्ये

याचा अर्थ असा नाही की
परतीचे दोरं कापून
मागच्यांना मागे टाकून 
पुढे निघून जायचे असते

सगळेच काही तुझ्यासारखे
उजेडावर स्वार होऊन
चालू शकणारे नसतात
नसतात तुझ्यासारख्या वाटा
फुटून आलेल्या प्रत्येकाच्या पुढ्यात

जो तो चालतच असतो
आपापल्या परीने लांघून जात असतो
त्यांच्या पुढ्यात उभा ठाकलेला पहाड

तू मात्र त्यांच्या डोळ्यातली
फुलं खूडून
निघाला आहेस एकटाच

तुला कुठे पोहचायचे आहे 
त्या पलीकडच्या बाजूला
की त्याही पल्याडाच्या पलीकडे 
जे तू आम्हाला कळू दिले नाही 
आजवर 

८.

बांधकाम करायचं होतं
पण एकट्यानेच नाही

तर तू बांधत बसला आहेस 
एकट्यानेच
मजल्यावर मजले

तुला एकट्यानेच पहुडायचं होत
सगळया मजल्यांवर
ते तू कळू दिले नाही कुणालाही
की भिंतींनाही

प्रत्येकालाच थकवा आल्यावर
आरामदेही मजला हवा असतो
हे तू सोयीस्करपणे
विसरत चालला आहेस

तुझ्या शर्टाला आता
हजार खिसे फुटत आहेत

हे आता शर्टाला सुद्धा
कळत चालले आहे

९.

प्रत्येकाचीच वाट वेगळी असते
प्रत्येकाचीच नाळ तुटलेली असते 
प्रत्येकालाच मोह होत राहतो
प्रत्येकालाच हत्तीवर बसून
मुंग्यांना साखर वाटायची असते
प्रत्येकाच्याच मुठीत दगड असतात 
भिरकावण्यासाठी
प्रत्येकालाच हवा असतो 
हवाहवासा आधार 
उभं राहण्यासाठी

म्हणून तू काय
वाट वाकडी करून
सगळे शब्द गोळा करत
दुसऱ्यांच्या जीभेवर खडे पेरत राहशील

तू मोहमयी मनोहर आहेस मदमस्त
तुला मोह झाला आहे

तुला निर्गुण निराकार
होता येत नाही

हे सगळे शब्दांचेच खेळ समजून
खेळत बसला आहेस 

कवितेच्या जाळाशी
तो जाळ भयानक असतो
भाजून काढणारा

हे तुला माहीत असले तरी
तू मुठ उघडायला 
तयार नाहीयेस

१०.

माया

मोहमाया

ती कुणालाही डोळे उघडून
पाहू देत नाही स्वच्छपणे
ती भुलवते सगळ्यांना
कुणालाही तिचा थांग लागत नाही

तमोगुणाने तन्मात्रा निर्माण केल्या
असे म्हणतात

तुझ्या माझ्यात कोणती माया
उत्पन्न होत चालली आहे सांप्रतकाळी
की तू मी स्वतःच्याच प्रेमात 
पडत चाललो आहोत स्वतःहूनच

हा शाप आहे
स्वतःवरच प्रेम करण्याचा
हळूहळू आपण वाकडे होत जाऊ
अष्टावक्रासारखे

या वक्राकाराला उ:शाप नाहीये
तरीही खोड उगवते आहे 
आपल्या आत
बिन मुळाचे

११.

सैरभैर होणं
हे मी समजू शकतो
पण वैर

वैरणासारखं चघळत चघळत
रवंथ करता यायला पाहिजे होतं
नि पचवता यायला पाहिजे होतं 
हलाहल अख्खं

एक तो नीळकंठ
सगळं हलाहल पचवून
काळानिळा होणारा

आणि तू मोहमयी मनोहर
सगळ्या चराचराचा
विलयच करायला निघाला आहेस

थांब थोडा
थकला असशील तर
तुझे पाय चेपून देतो

मग निघ तू तुझ्या प्रवासाला
मी माझ्या निघेन

पृथ्वी गोल आहे
हे तुला अन् मलाही
माहीत आहे

जाताना मात्र तेवढे शर्ट
टांगून ठेवशील
एखाद्या झाडावर

अजूनही विकल्प कुणाची तरी
वाट पाहत उभा आहे
उभा राहणार आहे

Post Tags

11 Comments

  • Dinkar Manwar
    Posted 14 मे , 2020 at 12:56 pm

    प्रिय संपादक,
    माझी ‘राक्षस’ नावाची दीर्घ कविता प्रसिद्ध केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

  • दागो.काळे
    Posted 14 मे , 2020 at 12:57 pm

    स.न.
    दिनकरची ” राक्षस ” या दीर्घ कवितेचा प्रकाशीत भाग वाचला.हाकारात आल्यानंतर तीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.ख-या अर्थाने ही रुपक कविता आहे.राक्षस या अमानविय घटितांतून आजच्या माणसातील वृत्ती-प्रवृत्तीचे साधांत्त दर्शन घडविले आहे.सगळ्या राक्षसी प्रवृत्तीचे मूळ मानवी असंस्कृतपणात दडलेले आहे.ती असंस्कृतीक जाणिव त्याच्या हडेललप्पी पणात मुरलेली आहे.म्हणून या कवितेत येणारा दशासन आपल्या अनेक बाजूंनी सज्जनतेला घेरुन राक्षसीपणाचे साम्राज्य वाढविण्याच्या प्रयत्न करतो.आणि ध्वस्ततेकडे सगळे मानवी जीवन घेऊन जातो.
    दागो.काळे

    • Dinkar Manwar
      Posted 14 मे , 2020 at 1:12 pm

      दागो
      धन्यवाद

    • Dinkar Manwar
      Posted 14 मे , 2020 at 2:57 pm

      धन्यवाद

      • मंगेश घोडके
        Posted 19 मे , 2020 at 11:12 pm

        हीच ती तृष्णा
        ही आसक्ती, ही मोहमाया आहे जी माणसाला स्वस्थ बसू देत नाही, कायम शोषक म्हणून उभी करते… सर्व माझंच आहे ही हाव आणि
        अहंकारी मनोवृत्ती राक्षस होण्यास पुरेशी आहे… एव्हढ्यात तरी माणूस माणसांत येईल असे वाटत नाही.. विकल्प आहे अशीही शक्यता नाही…

        • प्रेमानंद शिंदे
          Posted 23 मे , 2020 at 7:42 am

          हरणाने गवत खावे
          वाघाने हरणाला खावे
          हा निसर्गनियम आहे, हेच अन्नचक्र आहे. पण माणसाने सगळे निसर्गनियम पायदळी तुडवलेयत. माणूस गवतही खातोय, हरणही खातोय, वाघालाही संपवतोय अन् माणूस माणसालाही संपवतोय… माणसाचा हिंस्त्रपणा हा नैसर्गीकच असावा पण निचपणा नक्कीच नैसर्गीक नाही…. हल्ली माणसातल्या निचपणाने कळस गाठलाय… या कवितेतल्या दशाननाने याची तिव्र जाणीव करून दिली….

    • दागो.काळे
      Posted 14 मे , 2020 at 3:35 pm

      चुकीची दुरुस्ती
      ————–
      राक्षस या दीर्घ कवितेतील ” दशासने” हा शब्द ” दशानने ” असा समजावा.(कवीच्या वतीने)
      माझ्या अभिप्रायात आलेले दोन शब्द त्यातील ” दशासन”ऐवजी “दशानन” हडेललप्पी ऐवजी “हडेलहप्पी” असा समजावा.

    • Hrushikesh
      Posted 17 मे , 2020 at 8:08 am

      तुझं तू माझं मी असं ठरलेलं होतं
      आता तुझं तर तुझं आहे
      माझंही तू घेऊ बघतोएस
      ….

      ही रूपक कविता मस्त झालीये.

    • प्रसाद महाजन
      Posted 22 मे , 2020 at 11:05 am

      आजच्या जगात अशी एकही जागा उरली नाही जी भयानक भूक असलेल्या भस्म्या राक्षसाने व्यापलेली नाही .
      म्हणतात की या सृष्टी चा निर्माता सर्वव्यापक आहे…..यापेक्षा हवस असलेली लालसा मात्र सर्वत्र आहे यावर जास्त दृढ विश्वास ठेवावा अशी स्थिती आहे . जो तो दिसेल ते ते ओरबाडून त्याचा संग्रह करू पाहतो आहे , पण , तो स्वतः एका जगव्यापी राक्षसी लालसेकडून शोषला जातो आहे हे फारच कमी लोकांच्या ध्यानात येतं हे खरं आहे.
      माझे मित्र दिनकरजी यांनी ह्या अक्राळविक्राळ राक्षसाचे मनसुबे बरोबर ओळखून त्याला प्रतिकात्मक रूपात समर्थ पणे शब्दबद्ध केले आहे यात शंकाच नाही.
      दिनकर एक संवेदनशील व महान कवी आहेतच…….त्यांच्या नवोन्मेष प्रतिभेतून अशीच रत्ने निर्माण होवो ही शुभेच्छा !

      प्रसाद

  • दिवाकर कृष्ण आचार्य
    Posted 16 मे , 2020 at 11:45 pm

    खंतावलेल्या, दुखर्‍या, प्रेमळ ह्रदयाची परीपक्व, संयत कैफियत : राक्षस !
    दिनकर मनवरांची ‘ राक्षस ‘ ही कविता खरं तर एका लेखाचा विषय आहे .
    तरीपण ‘ डोरोथी पार्कर ‘ च्या एका कोटेशनची उचलेगिरी आणि माझ्यापुरती सुधारणा करण्याआधीच क्षमा मागतो आणि म्हणतो …
    ‘This is not a poem ( novel ) to be tossed aside lightly . It should be thrown with great force ! … ( If somebody at all wishes to …)

Leave a comment