तनफुगी
(अर्थात गवतावर जगणारा घोडा)
“हे माझ्या गवताच्या पात्या”
तू कायम ताठ राहा, या हवापाण्यावर जीव लाव
तुझ्यात अन्न आहे मुक्या जीवांचे म्हणून तुझ्या असण्याला मरण नाही
तुझा कोवळा लुसलुशीतपणा जन्म घेत राहील या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर
तु उगवशील पुन्हा पुन्हा
अश्या किती तनफुग्या जगतील तुझ्या जीवावर बदलतील आपल्या झुली
कोवळेपणात राखतील तुझ्यातील हिरवेपणा
तुझ्या पिवळ्या-पिवळ्या लयीतही ते जगतील तुझा पिवळा पाचोळा पांघरून
कारण त्याचे अन्न विखुरले आहे तुझ्या अंगाखांद्यावर
ते पॅरासाईट आहेत
तुझ्या कुशीत त्यांच्या जगण्या-मरणाचे प्रहर अबाधित
ते सुरक्षित आहेत तुझेच कवच पांघरूण
ते गोचिड असतात रक्तपिपासु
ते सोडत नाही
तू निर्माण केलेल्या जनावरांच्या घासातही असतात मौजूद
तुझ्यासारख्याच हुबेहूब रंगाच्या मॅचिंग पेहरावात
त्यांच्या अन्नाची तजवीज करतात ते तुझ्यात नकळतपणे
ते शिकारी असतात तुझ्यावर मुक्तपणे बागळणा-या जीवजंतूचे
भक्षक बनून
कीटकांना कळत नाही तुझ्याशी एकरूप झालेली त्याची काया
जगण्यासाठीचा मायाबाजार तुझ्या संरक्षक कुशीत चाललेला
ते उपद्रवी असतात परजीवी
द्रवत नाहीत थोडेही
आपला जीव धोक्यात असूनही ते विसरत नाहीत दुसऱ्याला सल देवून मरणाचा व्देष
ते सगळीकडेच असतात
गायीबैलांच्या वैरणीत
घासांबरोबर जठरात
तुझ्यामाझ्यात सारख्या-सारख्या पेहरावात वावरतात
ते ओठातून पोटात आपल्या अन्नातही असतात सर्वत्र
मुकपणे आपली भूक शमविणाच्या जनावरांच्या घासात जातात
त्यांचे पोट फुगवून मृत्यूच्या दारातही घेवून जातात
त्यांचा वावर आपण आवरू शकत नाही
हा तनफुगीचा घोडा सभोवताल असतो
दौडत स्वार्थाची झापडं बांधून
अंतिम: आपल्यासह मारण्यापर्यंत जगणे त्याचे ध्येय आहे.
***
चित्र : १
सरडा सरसर झाडावर झाडांवरून खाली सरसर
बुबुळात सीसीटीव्हीसारखी हालचाल संशयास्पद
अवघा अवकाश न्याहाळणारी महत्वाच्या व्यक्तीच्या संरक्षकासारखी नजर
अंगावर बदलणारी रंगाची ठिगळं कातळीच्या कॅनव्हासवर उठून दिसणारी
मानेवरली राठ आयाळ शहारलेली
सावध हालचाल सरड्याची.
चित्र : २
दिवसाचा दुसरा प्रहर
अजानातून रिकामी झालेली काही मुलं
त्यांच्या गोल गोल नक्षीदार हाजी टोप्यांच्या झाकणात छान सजलेली
खेळकर कोवळी कोवळी
कुराणाच्या वचनात आकंठ हरवलेली
रस्त्याच्या कडेकडेवर चालताना हातात हात गुंफून.
चित्र : ३
पांदणीत सरड्याची सळसळ आणि जथ्यांच्या नजरेतील चमक दोन्ही एकत्र तयार झालेली परस्परांतील सावधता
त्याच वेगाने हाती आलेले दगड
क्षणात त्याची रंग बदलणारी सळसळ हिरवी होत गेली
हातातील दगड हातातच मऊ झाले
व्देषावर विरघडले पाणी
आणि रंगाची किमया विजयी होत गेली
दोघांची दोन्हीकडे सारवासारव
काहीही न घडल्यासारखी
***
छायाचित्र सौजन्य: हिमांशू भूषण स्मार्त
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
3 Comments
Nita Kachave
किती अर्थगर्भ ! केवळ अन् केवळ अप्रतिम ! इतकं सुक्ष्म निरिक्षण आणि त्यास जोडलेले संदर्भ सोपं नाही असं चित्रातील भावांना संदर्भ देणं .
दा.गो.काळे
धन्यवाद Nita
तुला कविता समजली यातच माझे यश आहे.अवतीभोवती विचार करायला लावणाऱ्या खूप गोष्टी घडतात.त्या फक्त आणि फक्त कवितेतच मावतात.त्यासाठीच कविता लिहिणे व ती कळणे ही सुंदर गोष्ट आहे.आशुतोष सारख्या मित्राने त्यासाठी हृदयात असावी एवढी स्पेस निर्माण करणे,ही गोष्टही कवितेसाठी तितकीच महत्वाची आहे.
शशिकांत हिंगोणेकर
दा.गों.ची कविता अर्थवाही आणि चिंतनशील आहे. तेवढीच ती संयत परिवर्तनाची कास धरणारी आहे.