– हॅलो…
– (शांतता.)
– हॅलो, कोणी आहे का ?
– (पुनःश्च शांतता.)
– हॅलो ? माझ्या आवाजाचं नेमकं काय होतंय ? तो पोहोचत नाहीये का ? की असाच विरून जातोय ?
– (ना आवाज, ना श्वास, ना व्यत्यय.)
– हॅलो… मी अशा क्षणाची वाट पाहतोय, जो कधी येणारच नाही !
हॅलो… मनात गुंजत राहतो. तो एखाद्या विरळ धाग्यासारखा आसमंतात विरून जातो. हॅलो… हे फक्त केवळ नमस्कारापुरतं राहत नाही. हॅलो…नंतर असतं वाट पाहणं. थांबणं. दडपण. ज्यापासून पलायन करूच शकत नाही, असं काहीतरी जड आणि अशक्य. यामध्ये काही सांगण्याआधीच प्रश्न विचारणं आहे. याच्या निव्वळ उल्लेखातच विरहाची हुरहूर आहे. यामध्ये अंतर हे अध्याहृत आहे.
– हॅलो…
– असं आपण सहजच म्हणू शकतो. या शब्दापर्यंत पोहोचण्यासाठी नेमका किती वेळ लागतो ?
– हॅलो…
– तुला उत्तर देताना जणू मी मलाच उत्तर देतोय.
– हा छोटासा शब्द जितकं वजन पेलू शकेल, त्यापेक्षा जास्त भार मी त्यावर देतो. अदृश्य परवाने आणि नाक्यांवरच्या रांगेत
मी उभा असल्याचं मला भासतं.
– हॅलो ?
– आपल्यात पुन्हा अंतर पडलं आहे.
– मला तू काय म्हणतोयस ते ऐकायला येतंय. या हवेत तुझा आवाज अजूनही आहे.
अंतर हे केवळ स्थळाशी निगडित असतं काय ? आता काश्मीर म्हणजे कर्फ्यू, निर्बंध आणि इंटरनेटवरच्या बंदीचा प्रदेश. हे काही दिवस राहतं. दिवसांचे महिने होतात, आणि महिन्यांची वर्षं. या कर्फ्यूमुळे, बंदीमुळे, नाकाबंदीमुळे आणि बंकर्समुळे अंतरं निर्माण होतात. ही अंतरं काही मैलांची नसतात, पण आपण कुठे पोहोचूच शकणार नाही, या भावनेची असतात. ही भावना आमच्या रोजच्या आयुष्यात बळकट होत जाते… त्यासाठी आहेतच सत्ताधारी, परवानग्या आणि सरहद्द. कोण बोलू शकतं आहे, कोण नाही. कोणाचं ऐकलं जातं, आणि कोणाचं नाही. कोणाचं म्हणणं मान्य केलं जातं, आणि कोणाचे शब्द हवेत विरून जातात… जेव्हा कोणत्याही संवादाला आणि संपर्काला बंधनांची, पाळतीची आणि जाचक निर्णयांची झालर असते, तेव्हा अंतरं अधिकच बळकट होतात. हा एक असा अनुभव असतो, जो आपल्या असण्यात उतरतो, आणि ती मग केवळ एक अवस्था राहत नाही; ती शरीरात, काळात आणि प्रतीक्षेच्या लयींमध्ये जाणवणारी अनुभूती बनते.
तुला आठवतंय का, की पूर्वी आपण कुठलीच सुरुवात नसलेला संवाद कसा करायचो ? ‘हॅलो’शिवायचा. वाट बघण्याशिवाय. प्रश्नांशिवाय, उपस्थित असण्याच्या सक्तीशिवाय.
मला आठवतंय, जेव्हा म्हटलं जायचं, “मला माहितीये तुम्ही ऐकताय…”
आपण सगळं असं मोजूनमापून बोलायचो काय ? मला आता सगळंच विसविशीत झाल्यासारखं वाटतंय.
हॅलो !
मी तुला त्या रात्री संपर्क केला होता. त्यानंतरच्या अनेक रात्री मी तुला फोन करतच राहिलो. माझ्यासाठी जणू ती परतीची वाट होती, पुन्हापुन्हा तिथेच येण्यासाठी. एक रेषा आहे, जी आपल्याला वेगळं करते. पण तरीही, मी तुला पुन्हापुन्हा संपर्क करत राहतो.
हुरहुरीने आणि तटस्थतेने भरलेल्या काळातल्या या सगळ्या प्रतिमा माझ्या मनात गोठल्या गेल्यात. मी तुला पुन्हापुन्हा आठवत राहतो.
पुन्हापुन्हा आठवत राहतो.
पुन्हापुन्हा आठवत राहतो.
प्रत्येक वेळेस शांततेची आकृती काहीशी निराळी असते.
– हॅलो, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये !
– हॅलो, मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये !
– कोणीतरी मुद्दाम ठरवतंय की मी कसा तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.
– हॅलो.
कनेक्टिंग | माध्यम : स्टॉप-मोशन व्हिडिओ | परिमाणे : (१९२० × १०८० पिक्सेल) | कालावधी : ६७ सेकंद | वर्ष : २०२०
फोनवर नंबर फिरवणं ही साधीशी कृती अनिश्चिततेने भारलेली आहे. ती रोजच्या आयुष्याचा सहज भाग नाही. ती एक सततची तडजोड आहे, अभावग्रस्तता आणि तणाव झेलत केलेली. केलेल्या प्रत्येक कॉलमध्ये लादलेलं अंतर आहे. मूक, स्तब्ध आणि कंटाळवाणं. प्रत्येक वेळेस या अंतराची अंमलबजावणी कशी होईल, हे पाहिलं जातं. प्रत्येक फसलेल्या कॉलमध्ये जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे… पण तो कोणाच्याही कक्षेपलीकडे आहे.
पलीकडून येणाऱ्या यांत्रिक आवाजाची पुनरावृत्ती होत जाते. जणू काही पुन्हापुन्हा तेच बोललं गेल्याने निश्चितता येणार आहे. भाषाही आता ओळखीची वाटत नाही. जर कोणी सातत्याने प्रतिसाद देत असेल, तर तो आहे हा सपाट आणि भावनाहीन आवाज. हा आवाज मला फोन करणारी व्यक्ती म्हणून ओळखत नाही. तो मला फक्त सांगतो — “नॉट रिचेबल.” तो अनिश्चिततेची ग्वाही देत राहतो, सौम्यपणे. तीच ती प्रतिक्रिया येत राहते, तोच क्षण मात्र पुन्हा कधीच निर्माण होत नाही. पुढे-पुढे ढकलत जाणाऱ्या काळात वेळ गोठत जाते. ‘हॅलो’ हा जणू कधीच न बोललेला शब्द रेंगाळत राहतो. नंबर डायल करण्याच्या कृतीतच त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात.
– तुझ्यासाठी मी स्वतःस अर्पण करीन, माझ्या बाळा.
साक्षी… साक्षी… साक्षी…
मला वचन पाळायचं होतं, बाबा. तुम्हांला मला काही सांगायचं होतं.साक्षी… साक्षी… साक्षी…
– मला माफ करा, बाबा. तुम्ही समाधानी असाल तर माझा देवही समाधानी राहील. माझ्यावर प्रसन्न राहील.
– मी काही करू शकतो का तुझ्यासाठी ?
– नाही.
साक्षी… साक्षी… साक्षी…
– माझा आवाज कापतोय. माझ्या कपाळात बंदुकीची गोळी शिरली आहे. तुझ्याकडे माझ्या वडिलांचा दूरध्वनी क्रमांक आहे का रे ? मला तुझी आणि त्यांची माफी मागायची आहे.
साक्षी… साक्षी… साक्षी…
– तू रडलीस ना आई, तर मी कोसळेन गं. धीट हो आणि आमच्यासाठी प्रार्थना कर.
साक्षी… साक्षी… साक्षी…
– मी काय करू तुझ्याशिवाय ?
– संयम पाळ.
साक्षी… साक्षी… साक्षी…
– हॅलो… (लहान मुलाचा रडका आवाज.)
– (तसाच काहीसा आवाज.)
हॅलो, माझ्या काळजाच्या तुकड्या, कशाला रडतोयस ? नको रडूस, माझ्या डोळ्यांचा प्रकाश आहेस तू ! तुझं असं रडणं माझ्या शेवटच्या क्षणांमध्ये मला वेदना देऊन जाईल, ओझं निर्माण करील.
साक्षी… साक्षी… साक्षी…
– हॅलो… (शांतता.)
– हॅलो… (मुसमुसणं.)
– हॅलो… (काळीज चिरणारं रडणं.)
– तू काही खाल्लंस का ?
साक्षी… साक्षी… साक्षी…
– तुला दुसऱ्या जगात, दुसऱ्या जन्मात भेटण्याचं पक्कं वचन देतो.
– तुझ्यासाठी माझ्या आयुष्याचं बलिदान, माझ्या भावा.
कॉल संपतो.
लास्ट कॉल्स | माध्यम : श्राव्य (ऑडिओ) | वर्ष : २०२०
जेव्हा एखादा शब्द हा शेवटचा शब्द बनतो, तेव्हा त्याचं नक्की काय होतं ? जी माणसं कधीही ‘रिचेबल’ नसणार आहेत, त्यांचा शेवटचा ‘हॅलो’ कसा पचवायचा ? या तारा निरोपाचे शब्द वाहत नेतात, पण ही अंतरं पार करताना ती अजूनच पक्की होत जातात, कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते. कोण जिवंत आहे आणि कोण मेलंय ? प्रत्येक शब्द निरंतर… त्याचा नाद देहापलीकडे जातो, राहतो. ऐकणं म्हणजे केवळ जोडलं जाणं नव्हे, तर साक्षी असणं, शोक करणं.
हे अंतराचं राजकारण फक्त सत्तेसाठी नाही. अंतरांना काबूत ठेवणं म्हणजे नात्यांनाही नियंत्रित करणं. मी इथे आहे, हे मी कसं म्हणू… आणि तू तिथे आहेस हे मला कसं कळेल !? कोणीतरी कुठेतरी आहे ही खात्री अस्तित्वाला अधोरेखित तर करते, पण त्यामुळे अजूनच अस्थिरता येते, कारण ती दुसऱ्या कोणीतरी दिलेल्या ग्वाहीवर अवलंबून आहे.
जर मी तुला सांगितलं की तुला कोणाशी तरी संपर्क करायचा आहे… शेवटचा, तर काय होईल ?
कल्पना कर. तू फोन हातात घेतलायस, आणि तुला कळत नाहीये की पहिल्यांदा काय बोलावं —
हॅलो…
(किंवा) मला माफ कर…
(किंवा) मी तुला हे कधी सांगितलंच नाही…
(किंवा) मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो…
(किंवा) काहीच नाही.
(किंवा) अश्रू वाहतायत,
(किंवा) भूतकाळ झरझर डोळ्यांसमोरून जातोय,
(किंवा) अपराधभाव, पश्चात्ताप आणि संकोच,
(किंवा) काहीच जाणवत नाहीये, सुन्नपणा,
(किंवा) काहीच नाही.
आणि ऐक
हा आवाज
तिथे असण्याचा
या तारा जोपर्यंत परवानगी देतील
तोपर्यंत.
हॅलो…
– अंतर फार जास्त नाही. आम्ही परवानग्यांची वाट पाहतोय. या अंतराने आमच्या सवयी आत्मसात केल्यात.
– आपण तिथूनच सुरुवात का करतो ? त्या क्षणाला का धरून ठेवतो ?
– माझा आवाज बदललाय, उशिरा पोहोचतोय आणि विरून गेलाय. आपल्यातल्या या अंतराचा नेमका अर्थ काय ?
काळ इतका ताणला गेलाय की मलाच माझ्या आठवणींवर शंका येतेय.
मी तुला कुठल्या परतीचं वचन दिलं होतं का ? किंवा कुठला चौरस्ता ओलांडण्याचं ?
– हॅलो… (हे तुझ्याशी बोलताना जणू मी माझ्याशीच बोलतोय.)
माझ्यापाशी आता एवढंच उरलंय, या अंतराला थोपवत राहणं…
जे सर्वदूर आहे, पण तरीही अदृश्य आहे.
मी फोन करत राहतो.
तुझ्यापर्यंत पोहोचताना त्या शब्दांचं काय होतं, हे पाहण्यासाठी.
हॅलो…
जर मी स्वतःसोबत हरलो, तर तू येशील का वाचवायला ?
लास्ट कॉल | माध्यम : परफॉर्मेटिव्ह इन्स्टॉलेशन वर्ष : २०२६ (आगामी)
युद्धोत्तर जगातल्या पाळतीवरची कविता
– हॅलो, वाराय चुका ? (तू बरा आहेस का ?)
प्रार्थनेसारखा भासणारा तो आवाज मला हे विचारत राहतो,
पण उत्तर तर कायम तेच राहतं.
– ठीकच, कदाचित…
– तुम्ही पाहुण्यांची वाट पाहत होता का ?
– हो, पाहुणे येत आहेत.
पण दुसरेच कोणीतरी पाहुणे आले,
कोरीव लाकडी दारावर धडका देत
विचारतायत, “कुठे आहेत ते ?”
– कोण?
– आतंकवादी !
– पण, माझ्या मुलीचा साखरपुडा आहे !
मेहमान — गैरसमजातून
भाषांतराच्या चुकांतून जन्मलेले राक्षस बनतात.
– हॅलो, ते पुन्हा फोन करत होते काय ? काय करायचं आपण ?
– पगाह हसा तुलुएक ताअेसराय, ते मकलावोख. (उद्या आपण त्यांचं दमन करू, आणि आवाजही दाबून टाकू.)
आणि ते पाहुणे पुन्हा आले
बुटांनी आणि लाथांनी
सत्याची मोडतोड करत.
– तुमचा प्लॅन काय आहे ?
– फक्त पावसापासून बचाव.
लाकडी आधारांवरची ताडपत्री
वाट पाहत उभी आहे,
जणू काश्मीरमधल्या बापाविना राहिलेल्या मुलांसारखी.
काश्मीरला कान आहेत, पण चेहरा नाही.
डोळे आहेत, पण अश्रू नाहीत.
नुरलं आहे
छत, किंवा घर,
किंवा प्रेमाची आणि श्रमाची भाषा.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
