त्या वृद्धाला एका जागी बसायची सवय नव्हती. थोडा वेळ भटकल्यावर तो दगडी बेंचवर बसला; पण लगेचच उठला. लोक इकडे-तिकडे पहात ये-जा करत होते. तोही न्याहाळत फिरू लागला.
इकडे-तिकडे पहाताना त्याचा हात खिशात गेला आणि त्याच्या बोटांत अडकून काडेपेटी बाहेर आली. तो ती काडेपेटी निरखू लागला. जणू काही पहिल्यांदाच पहात होता. तो आणि काडेपेटी अगदी त्याच्या बालपणापासूनचे सोबती होते. ही बाग त्यांची तिसरा मित्र होती. पण, ते तिघंच नव्हते. एकूण पाच होते. तो वृद्ध, ती काडेपेटी, बाग, वृद्धाचा मित्र आणि सिगरेटचं पाकिट. मित्राच्या आठवणीनं त्याचं मन भरून आलं. त्यानं दुसऱ्या खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं आणि एक सिगरेट शिलगावली.
त्याला आठवलं, तो दहावीत असताना त्यानं याच बागेत सिगरेट ओढायला सुरुवात केली होती. मित्रानं शिकवलं होतं. तो आणि मित्र सकाळीच भटकायला बाहेर पडायचे. बागेत येऊन थोडावेळ सुंदर पोरी पहात बसायचे आणि एखाद्या कोपऱ्यात जाऊन झाडाआड किंवा झुडपाच्या आडोशाला जाऊन सिगरेटचं पाकिट काढायचे.
‘अरे, मी काडेपेटी घरीच विसरून आलो,’ कधी कधी असं व्हायचं.
‘मी आणलीय,’ तो हसून म्हणायचा.
मग मित्र एक सिगरेट काढायचा. पक्का फुकाडा असल्यासारखं ती सिगरेट पाकिटावर हळूहळू ठोकायचा. सिगरेट सावकाश ओठांत धरून भिंतीला टेकायचा. तो काडी पेटवायचा आणि काडी विझू नये म्हणून एका हातांनं ती झाकत मित्राची सिगरेट पेटवायचा. मित्र सिगरेटचे कश घेऊन धुराच्या रिंगा काढण्याचा प्रयत्न करायचा. खूप प्रयत्न करूनही मित्राला त्याच्यासारखी सिगरेटच्या धुराच्या रिंगा काढणं कधी जमलं नाही.
मित्राची दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू होती. सगळ्यांनी ‘नको’ सांगूनही तो चोवीस तास मित्राबरोबर रहायचा.
मित्र ज्या दिवशी वारला, त्या दिवशी सकाळपासून तो खूप दु:खी होता. मित्राचा मुलगा हॉस्पिटलच्या बाथरुममध्ये आंघोळ वगैरे करत होता. सून जेवणाचा डबा आणण्यासाठी घरी गेली होती. मित्राची परिस्थिती खूपच गंभीर होती. डॉक्टरांनी तर डेडलाईनच दिली होती. फक्त काही तास किंवा काही दिवस… मित्राचा हात हातात घेऊन तो त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला. मित्रानं डोळे उघडले.
‘आता जायची वेळ झालीय असं वाटतंय,’ मित्र हसत म्हणाला.
‘नाही रे.. डॉक्टरांनी सांगितलंय अजून एक टेस्ट बाकी आहे. त्यानंतरच…’ त्याचा खोटं बोलण्याचा प्रयत्न उघडकीला आला.
‘बाबा, तू तरी खरं बोल रे…’
‘अरे तू तर..’ त्याचे डोळे पाणावले.
‘मला जाण्याचं दु:ख नाही वाटत रे. बरीचशी कर्तव्य पार पाडली मी. फक्त दोन गोष्टींचं वाईट वाटतंय. एक म्हणजे, तुझ्यासारखी सिगरेटच्या धुराच्या रिंगा काढायला नाही जमली आणि दुसरं…’ मित्र बोलायचा थांबला.
‘दुसरं काय?’ त्यानं विचारलं.
‘दुसरं म्हणजे, साल्या तुझ्या आधी नव्हतं जायचं मला. तुला पोहचवूनच मरायचं होतं,’ मित्र हसत म्हणाला.
त्या निराशाजनक वातावरणात वृद्धाला थोडं सैलावल्यासारखं वाटलं.
‘अरे जा रे.. चार दिवसांचा पाहुणा आहेस तू.. मी अजून बरंच जगणारे…’ त्यानं मित्राच्या हातावर हात ठेवत हसत सांगितलं.
‘म्हाताऱ्या बघच तू.. मी मेल्यावर तीन महिन्यांत तुलाही बोलावून घेतलं नाही ना, तर नाव नाही सांगणार…’ त्यावर दोघंही खूप हसले. हॉस्पिटलमधलं ते जड वातावरण त्यांच्या हसण्यानं कापरासारखं उडून गेलं.
दोन वृद्धांच्या गप्पा तिथल्या एका नर्सनं ऐकल्या. मृत्यूशय्येवर असलेला रुग्ण अशा गप्पा मारतोय? ती वृद्धाकडे विचित्र नजरेनं पाहू लागली.
ती बाहेर गेल्यावर मित्रानं त्याच्या दोन्ही नातवांना जवळ बोलावून त्यांना पैसे दिले.
‘पोरांनो जा, बाहेर जाऊन जिलबी खाऊन या…’
‘आजोबा, मी नाही जिलबी खाणार.. मी कॉमिक्स घेणार,’ मोठा नातू म्हणाला.
‘बरं.. हे घे अजून थोडे पैसे.. जा!’
दोघंही उड्या मारत बाहेर गेले.
‘एक गोष्ट मागू? देशील?’
‘जीव देतो हवंतर…’ त्यानं सांगितलं.
‘एक पेटव ना…’ मित्रानं विनंती केली.
‘अरे वेडा झालायस का? अशा परिस्थितीत सिगरेट नको ओढणं चांगलं नाही,’ त्यानं झिडकारत सांगितलं.
‘आता चांगल्या-वाईटाचा विचार करून काय उपयोग… शेवटची एक ओढतो ना तुझ्याबरोबर… पुढचं काय माहीत…’
वृद्धानं मित्राचं तोंड हातानं दाबून पुढचे शब्द अडवले. पटकन जाऊन त्या प्रायव्हेट रुमचा दरवाजा बंद केला आणि मित्राजवळ येऊन बसला. मित्र उठून बसण्याच्या स्थितीत नव्हता, तरीही स्वत:हून बेडला टेकून बसला. वृद्धानं सिगरेटचं पाकिट काढल्यावर त्यानं ते ओढून घेत त्यातली सिगरेट काढली. मग हळूहळू पाकिटावर ठोकून ओठांमध्ये धरली. वृद्धानं जड मनानं काडी ओढून सिगरेट पेटवली.
मित्र कश घेऊ लागला. मित्राचा शांत चेहरा पाहून वृद्धालाही समाधान वाटलं. दोघंही नेहमीप्रमाणे एकच सिगरेट शेअर करू लागले.
‘आपल्याला खरंतर काय काय करायचं असतं; पण नाही करू शकत. वाटलं होतं, रिटायरमेंटनंतर आपल्या मनासारखं काहीतरी करू. आम्ही दोघांनी सगळी कर्तव्य पूर्ण केली. तरीही, आयुष्याच्या अखेरच्या दिवसात एखाद्या हिल स्टेशनवर जाऊन रहायचं, या धावपळीपासून दूर राहायचं, निवांत आयुष्य जगायचं स्वप्न तर स्वप्नच राहिलं. या करंट्या आयुष्यानं वेळच नाही दिला. आपल्या मागे पळवत राहिली, स्वतः पुढे पळत राहिली… ‘ कश मारता मारता मित्र कुठेतरी हरवून गेला.
‘काही अडचण नाही रे… आपलं आयुष्य आता पुढची पिढी जगतेय. आपलं निश्चिंत असणं, आपली स्वप्न आता त्यांच्या डोळ्यांत आहेत…’ वृद्धानं मित्राचा हात प्रेमानं दाबत म्हटलं.
‘कुठे…? आता तर सगळंच बदललंय मित्रा… हवा बदलली… आपल्या पद्धतीनं, आपल्या अटींवर कोणीही जगू शकत नाही. मी सगळी कर्तव्य पार पाडली. मात्र, स्वत:साठी जो काही विचार केला होता, त्यातलं काहीच नाही करू शकलो!’
‘आपण आपल्या पद्धतीनं जगायचा प्रयत्न तरी केला हे काय कमी आहे?’ वृद्ध म्हणाला.
‘आयुष्य जगायचं सोड रे… मी तर तुझ्यासारखी साधी सिगरेटच्या धुराच्या रिंगाही नाही काढू शकलो कधी…’ मित्रानं ओठ गोल करत धूर सोडला.
‘ते सगळं जाऊ दे… मी तुझ्या मागोमाग येतोच आहे… तिथेच शिकवेन…’ त्यानं सांगितलं.
मित्राबरोबर ही त्याची शेवटची सिगरेट होती. त्या दिवशी मित्रानं कायमचे डोळे मिटल्यावर प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य होतं, ‘सगळी कर्तव्य पार पाडून गेले.’
‘सगळ्यांना मार्गी लावलं.’
‘जे जे करायचं होतं, ते सगळं केलं.’
‘नाही, वर्तुळं काढायला नाही शिकला… मनात खूप असूनही नाही जमलं त्याला,’ वृद्धाला गदगदून आलं. त्याचं हे म्हणणं त्याच्याशिवाय कोणालाही ऐकू गेलं नाही.
त्या दिवशी त्यांची बागेतली भेट थांबली. गेल्या दोन महिन्यात तो आज पहिल्यांदाच आला होता. वृद्धाची दोन मुलं माँट्रियलला, मुलगी मुंबईला आणि पत्नी स्वर्गात होती. कधीकधी मुलांचे ई मेल, मुलीचा फोन आणि बायकोची आठवण येऊन त्याला उदास करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र, तो त्यापासून अलिप्तच रहायचा. अशा परिस्थितीत आयुष्याचा खेळ नाट समजू लागतो. सगळंच येणं-जाणं असतं. मुलं-मुलगी आनंदात आहेत, आपण आपलं आयुष्य जगायचं, जास्त गुंतणंही त्रासदायक असतं. कोणीही कितीही आवडत असलं, तरी कधीही सोडून जाऊ शकतं. आयुष्य असंच असतं.
बायकोच्या मृत्यूनंतर वृद्ध मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडला होता. मात्र, मित्र गेल्यावर त्याला अजिबात रडू आलं नाही. त्याला वाटायचं, मित्र सिनेमा पहायला गेलाय. मित्र नेहमीप्रमाणे लवकर पोहोचलाय, आपण थोडं उशीरा जाऊ. त्यात रडायचं आणि दु:ख करत बसण्यासारखं काय आहे? कधी आठवण आल्यावर मात्र थोडी चलबिचल व्हायची.
तो पुन्हा सतराव्या वर्षाच्या आठवणीत रमून गेला. तिथूनच त्याचं आयुष्य सुरू झालं होतं.
‘इतका वेळ कुठे होतास? सिनेमा सुरू होऊन दहा मिनिटं होऊन गेली,’ थोडासा उशीर झाला तरी मित्र खूप नाराज व्हायचा.
‘अरे, आज बाबा ऑफिसला गेलेच नाही. किती थापा माराव्या लागल्या माहितेय…’ तो सांगायचा.
पूर्ण सिनेमादरम्यान ते दोघं दोन पाकिटं सिगरेट संपवायचे, तेव्हा मित्राला थोडी काळजी वाटायची.
‘हल्ली सिगरेट वाढलीय आपली. कमी करावी लागेल.’
‘हो, मलाही वाटतंय,’ तोही मित्राला दुजोरा द्यायचा.
मग एखाद्या दिवशी मित्र त्याचा निर्णय ऐकवायचा, ‘मी एक तारखेपासून सिगरेट सोडतोय. कायमची.’
‘एक तारखेपासूनच कशाला?’ एकदा त्यानं विचारलं.
‘सिगरेट कधी सोडली याचा सरळं हिशेब करता यावा म्हणून…’
‘सिगरेट कायमचीच सोडतोयस, तर हिशेब कशाला ठेवायचा?’
मग उद्यापासून सिगरेट एकदम सोडायची म्हणून मित्र ३० किंवा ३१ तारखेला रोजच्यापेक्षा दुप्पट सिगरेटी ओढायचा आणि त्यालाही द्यायचा. सिगरेट ओढायला शिकवण्याबाबतीत मित्र त्याचा गुरू होता आणि या बाबतीत तो मित्राचा गुरू होता.
दोघंही महिन्याच्या शेवटच्या दिवशी खूप सिगरेट ओढायचे आणि नव्या महिन्याची सुरुवात सिगरेट न ओढता करायचे. मग दोघंही तीन किंवा चार आणि चार ते पाच तारखेपर्यंत आपला संकल्प टिकवायचे. सहा-सात तारीख येताच कुणीतरी काहीतरी बोलेल या आशेनं दोघंही एकमेकांकडे पहायचे. कधी तो बोलायचा, कधी मित्र…
‘काल रात्रीपासूनच डोकं दुखतंय…’
‘हो, माझं थोडं डोकं दुखतंय. काही दिवसांपासून पोट साफ होत नाहीये.’
‘कदाचित आपण अचानक सोडली म्हणून…’
‘मग हळूहळू कमी करत सोडूया…’
सिगरेट हळूहळू कमी करण्याचा ते प्रयत्न करायचे. सिगरेट कमी करण्याचा हा प्रयत्न काही दिवस रहायचा आणि मग पहिले पाढे पंच्चावन्न… मात्र पुढच्या तीस किंवा एकतीस तारखेला ते नवा संकल्प करायचे.
‘या महिन्यात दिवसाला फक्त दोनच सिगरेट…’
‘डन.’
‘डन.’
त्यांचा हा ‘डन’ एखादा सिनेमा पहायला जाईपर्यंतच निभावला जायचा. ज्या दिवशी ते थिएटरला जायचे, पाकिटं संपायची.
तब्येत चांगली राखण्यासाठी वृद्धानं स्वत:च्या मर्जीनं सिगरेट सोडली. छातीत दुखू लागायचं आणि सिगरेट ओढायला डॉक्टर मनाई करायचे. वृद्ध आठवडाभर सिगरेट ओढायचा नाही. मात्र, पुन्हा छातीत दुखू लागल्यावर पुन्हा पाकिट हातात यायचं. यावेळी मागच्याच आठवड्यात डॉक्टरनं त्याला ताकीद दिली होती, की सिगरेट सोडली नाही तर जास्त दिवस जगू शकणार नाही. वृद्ध हलकंच हसला. एक दिवसही सिगरेट सोडली नाही.
सगळं किती भरभर होऊन गेलं होतं. आज विचार करताना वृद्धाला विश्वासच वाटत नव्हता, की सिगरेट सुरू करून पन्नास-पंच्चावन्न वर्षं लोटली होती. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, पोरंबाळं, रिटायरमेंटनंतर आयुष्यात एक-एक बदल झाला होता. नवीन अनुभव येत गेले. प्रत्येक प्रसंगात मित्राची सोबत होती. प्रत्येक प्रसंगाच सिगरेटचीही साथ होती. मित्रच एकटं सोडून गेला… एक उदास अनुभव मागे ठेवून… सिगरेटनं एकटं नाही सोडलं. आजही सोबत आहे. कदाचित तिची सोबत या शरीराबरोबरच सुटेल.
त्यानं सिगरेटचा एक दीर्घ कश घेतला आणि अर्धी सिगरेट झाडीत फेकून दिली. त्याला एकट्यानं सिगरेट ओढायची सवय नव्हती. एक सिगरेट एकावेळी ओढू शकायचा नाही. पण लगेचच दुसरी पेटवायचा. दोन महिने प्रयत्न करत होता, एकट्यानं सिगरेट ओढायला शिकयाचा. मात्र, पन्नास वर्षं जुनी सवय दोन महिन्यात कशी बदलणार? अर्धी सिगरेट ओढल्यावर ती फेकून द्यावी लागायची. कारण, उरलेली अर्धी सिगरेट मित्राची होती.
बागेत भटकणारे लोक वृद्धाला विचित्र नजरेनं पहात होते. सकाळची ताजी हवा घ्यायची सोडून हा सिगरेट ओढतोय, तेही एकामागोमाग एक… सतत! वृद्ध आठवणींत रमून चालत होता.
मध्येच त्याला वाटायचं, की आपण वृद्ध झालेलो नाही. सतरा वर्षांचा मुलगाच आहोत. दहावीतला मुलगा. मित्राबरोबर बागेत फिरणारा.
‘लग्नानंतर बायकोनं विरोध केला, तर सिगरेट सोडणार का…’ त्यानं कश मारत मित्राला विचारलं होतं.
‘माझं लग्न पद्माशी होऊ दे फक्त… तिला हवंतर जगही सोडून देईन…’
‘तिच्यात काय आहे एवढं…’
‘माझ्या नजरेनं पाहिलंस तर तुला कळेल… ओठ म्हणजे गुलाबाच्या पाकळ्याच, डोळे म्हणजे निळे मोती आणि फिगर… परी आहे रे परी.. आय लव्ह हर..’ मित्र हरवून गेला होता.
‘आणि समज, पद्माशी तुझं लग्न झालंच नाही तर…?’
‘तर, आयुष्यात लग्नच करणार नाही कधी… आणि पद्मालाही करू देणार नाही. हे बघ, आम्ही एकत्र जगण्या-मरण्याची शपथ घेतलीये.. ‘ मित्राचा कणखर इरादा होता.’
मित्राचं लग्न पद्माशी झालं नाही आणि दहावीतलं प्रेम यशाचं माप ओलांडू शकलं नाही. पद्माचं होणारं लग्न मित्र मोडू शकला नाही. उलट, वडिलांबरोबर जाऊन तिच्या लग्नात जेवून आला. त्या रात्री मित्र उदास होऊन खूप रडला. त्या रात्री पेटवलेल्या सिगरेटच्या साक्षीनं कधीच लग्न न करण्याची शपथ घेतली होती. मात्र, कालांतरानं त्याचं लग्नही झालं आणि गोड पोरंही झाली.
एकदा वृद्ध मित्राबरोबर आपल्या लेकीला भेटून परत येत होता. ती हॉस्टेलमध्ये राहून शिकत होती. स्टेशनवर मित्राची परी भेटली. लग्नाला पंधरा वर्ष झाली होती आणि पद्मा ओळखूच येत नव्हती. केस पांढरे होऊ लागले होते, गुलाबाच्या पाकळ्या कोमेजल्या होत्या, निळे मोती मोठ्या फ्रेमच्या चष्म्यात कैद झाले होते. एके काळी, त्याला वेडं करणारी तिची फिगर आता सगळीकडून एकसारखी झाली होती. तिचा नवरा तिच्या दुप्पट होता.
पद्माच्या भेटीनंतर मित्र खूप हसला होता. सिगरेटचा धूर सोडत म्हणाला, ‘काळ किती विलक्षण चीज आहे. प्रत्येकवेळी तो दाखवून देतो, की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही.’
आठवणींत हरवलेल्या वृद्धानं सिगरेट पेटवून बागेच्या गेटकडे जात होता. त्याच्या डाव्या हातात आजचा पेपर होता आणि उजव्या हातात सिगरेट होती. गेटवर पोहोचल्यावर त्याच्या मनात विचार आला, त्या झुडपाच्या मागे जरा डोकावून पहावं. तिथंच त्यानं मित्राबरोबर सिगरेटच्या धुराच्या रिंगा काढायला सुरुवात केली होती.
ती झुडपं आता दाट झाली होती. त्यावेळच्या रोपट्याचा आता वृक्ष झाला होता. चालता-चालता त्यानं पेपर एका वेलीला अडकवून ठेवला.
त्या झुडपात काहीतरी हालचाल होत होती. सोळा-सतरा वर्षांची दोन पोरं त्या झुडपात लपून सिगरेट ओढत होते. एक जण गुरू असल्याप्रमाणे आकाशाकडे तोंड करून धुराची वर्तुळं काढत होता. दुसरा, विद्यार्थी असल्यासारखा त्याचं अनुकरण करत होता. वृद्धाला पाहून ते दोघंही घाबरले. वृद्ध हसला. अचानक त्याला त्याच्या आठवणींनी खूप आनंद झाला. अर्धी सिगरेट संपली होती. त्यानं हसत ती सिगरेट टाकून दिली, पायानं विझवली आणि गेटच्या दिशेनं निघून गेला.
Very interesting short story. My favorite.
तुमच्या आमच्या वास्तववादि आजच्या जीवनातील घटना. वाचुन काही तरी मिस होण्यची जाणिव. मस्त
अनुवाद आवडला .
मनात रेंगाळणारा आहे .
मी मूळ कथा वाचलेली आहे .
फार पूर्वी .
ते आठवलं .
===
Cellphone +919822055799
http://www.praveenbardapurkar.com
blog.praveenbardapurkar.com
अनुवाद वाटतच नाही.मस्त