माया डॉड: फाळणीबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत?
श्री. के.बी.सिंग: फाळणी हि काँग्रेस पार्टीची ऐतिहासिक चूक होती. स्वतःच्या आयुष्यात भारत स्वतंत्र झालेला बघण्याची एक वेगळीच घाई त्यांना झाली होती. त्याकाळी निवडणूक ही प्रौढ मताधिकारांवर आधारलेली नव्हती. निवडक मतदारसंघ निवडणुकीचे प्रभार होते. सामान्य जनतेला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा कोणताही अधिकार नव्हता, तो फक्त नेतृत्त्वाला होता. सगळ्यात मोठा मूर्खपणाचा भाग म्हणजे गांधी, नेहरू आणि इतर काही नेत्यांना स्वातंत्र्य मिळवण्याची खूपच जास्त घाई झाली होती.
मी लाहोर शहरात राहत होतो आणि पंजाब मध्ये मुस्लीम लीगचे सरकार नव्हते. हिंदू, मुस्लिम आणि अकाली यांनी एकत्र येऊन काढलेल्या युनियनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालील ते सरकार होते. ते आघाडी सरकार होते. माझ्या शाळेसमोर, साधारण दहा लोक एका गाढवाला घेऊन येत असत. त्या गाढवाच्या डोक्यावर पगडी असे आणि पाठीमागे केरसुणी असे. पगडीची शैली खजिर हयात खल तिवाना (राज्याचे पुढारी) यांच्यासारखी असे कारण ते फाळणीच्या विरुद्ध होते.
१९४६ मध्ये शहरात दंगल नव्हती. अर्थात काही निर्वासित लोक होते. पश्चिम पंजाब मधून आलेले हे निर्वासित लाहोर रेल्वे स्टेशनच्या बाहेर राहत होते. ३ मार्च १९४७ रोजी जेव्हा मी माझ्या शाळेतून बाहेर पडलो, तीच शाळा जिथे मी इयत्ता ९वी ची परीक्षा दिली होती आणि माझ्या लक्षात आले की रोजची असणारी घाई गडबड आणि रहदारी आज दिसत नव्हती. तेवढ्यात, एका प्रौढ व्यक्तीने माझ्या जवळ येऊन मला लगेच घरी जाण्यास सांगितले कारण परिस्थिती तणावपूर्ण होती. नंतर माझ्या लक्षात आले की त्या दिवशी अकाली दलाचा नेता मास्टर तारा सिंग याने विधानसभेबाहेर मुस्लिम लीगचा ध्वज फाडला होता आणि त्या दिवसापासून दंगल सुरू झाली.
डॉड: फाळणीची तुम्हाला आधीच चाहूल लागली होती का ?
सिंग: इस्लामिया कॉलेज लाहोर माझ्या शाळेत जाण्याच्या मार्गावर होते आणि मी नेहमी बघायचो की लोक हातात लाकडाच्या बनावट बंदुका घेऊन असायचे. एप्रिल आणि मे मध्ये शाळा बंद असायच्या. जेव्हा मी इयत्ता ८वी च्या वर्गात होतो तेव्हा माझ्या शाळेत एकमेव मुस्लीम मुलगा होता आणि तो शाळेत पहिला आला होता. त्यानंतर काही कर्मठ ब्राह्मण शिक्षकांनी संघटित होऊन त्याला मारहाण केली त्यानंतर तो शाळेत कधीच परतला नाही.
आमच्याकडे झैना नावाची मुस्लीम मोलकरीण होती. सगळेजण झैना बेबे (म्हणजे आजीसारखी ) म्हणत असत. ती आमच्याकडे ४०वर्षापेक्षा जास्त काळ काम करत होती. ६० – ७० वर्षांची ती वृद्ध बाई आम्हा लहान मुलांची दाईही होती. फाळणीनंतर आमचे एक काका, श्री. अमीर चांद पठानिया यांची नेमणूक लाहोरमध्ये अपहरण झालेल्या हिंदू महिलांना परत भारतात आणण्यासाठी झाली. झैना बेबे रडायची आणि म्हणायची ‘कृपया, मला भारतात परत घेऊन चला, कारण ते मला इथे काफिर म्हणतात आणि म्हणतात जा तू तुझ्या भारतातल्या काफिल्यांमध्ये सामील हो.’
श्री. पठानिया यांनी अशी बनावणी केली की ते तिला भारतात घेऊन जातील पण ते त्यांच्या मनात कधीच नव्हते. कारण तसं केल्याने दोन्ही बाजूस गोंधळ उडाला असता. दोन्ही बाजूस कर्मठपणा आणि कट्टरता होती. आमच्या कुटुंबातील महिला आणि मुलांना आमचे काका श्री. पठानिया यांच्या लुधियानाच्या घरी हलवण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत लुधियाना पूर्णपणे शांत होते. अमृतसर आणि लाहोर सोडून पूर्व पंजाब शांत होता. पाकिस्तानातून येणाऱ्या ट्रेनचे डबेच्या डबे मृतदेहांची भरलेले असत. फाळणीनंतर अश्या दृश्यांमुळेसुद्धा पूर्व पंजाब मध्ये दंगली सुरु झाल्या होत्या.
डॉड: अश्या काही ठळक अडचणी ज्यांचं तुम्ही वर्णन करू इच्छिता…
सिंग: मुळात आम्हाला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत कारण तिथे दंगली कमी होत्या आणि आम्ही सगळे लुधियानाला आरामदायी ठिकाणी आलो होतो. म्हणून लुधियाना म्हणजे जवळजवळ सुट्टी घालवण्यासारखंच होतं आणि आमचे वडील बँकेत मॅनेजर होते. म्हणजे तश्या काही रूढ अर्थानी अडचणी आल्या नाहीत. फक्त तेथे परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि तिथल्या वातावरणाची सवय होण्याची गरज होती. लुधियानात सारखीच परिस्थिती होती, हिंदू कुटुंब संस्कृती होती त्यामुळे जास्त समस्या नव्हती आणि परिस्थिती सुधारल्यावर आम्ही पुन्हा लाहोरला जाण्याचा विचार करत होतो. पण फाळणीच्या काळात हे स्पष्ट झाले होते की आम्ही पुन्हा परत जाऊ शकत नाही. आमचे सगळे कपडे, गाद्या वगैरे लाहोर मधेच राहून गेले होते. २० ऑगस्ट रोजी आम्हाला आमचे घर मिळाले. ते एका मुस्लीम कुटुंबाने सोडले होते. त्यामुळे काफिल्यानी प्रवास करताना येणाऱ्या अडचणींना देखील आम्हाला कधी तोंड द्यावे लागले नाही.
डॉड: अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मागे सोडून आला आहात आणि ती तुम्हाला सगळ्यात जास्त आठवत राहिली?
सिंग: लुधियानात आम्ही आमचे कपडे धुलाईसाठी दिले होते आणि ते कपडे धुलाईचे दुकान हे मुसलमानांचे होते. फक्त एवढेच झाले कि ते कपडे धुलाईचे दुकान लुटले गेले आणि आम्ही आमचे सगळे कपडे गमावले. त्यामुळे आम्हाला एक नवीन सुरूवात करावी लागली. जेव्हा फाळणी झाली तेव्हा मी १४ वर्षांचा होतो त्यामुळे माझा अनुभव मर्यादित आहे. ही दुर्घटना खूप मोठ्या प्रमाणावर घडल्याकारणाने आणि आम्ही स्वतःला ह्या दुर्घटनेतून पळून गेलेले निर्वासित समजत असल्याकारणाने, आम्ही कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की आम्ही आमच्या लाहोरच्या घरी परत जाऊ. लाहोरमधील मोहल्ला जिथे आम्ही राहत असू तिथे आजूबाजूला सगळे नातेवाईक होते आणि लुधियानात आल्यानंतरही आजूबाजूला तेच नातेवाईक होते. म्हणजेच कोणीही मागे राहिले नाही आणि त्यामुळे कोणतीही व्यक्तिगत शोकांतिका नव्हती.
डॉड: छावणीमधल्या तुमच्या काय आठवणी आहेत?
सिंग: विस्थापित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी इतर कुटुंब यामुळे एकत्र आली. प्रत्येकजण तिथे मदतीसाठी हजर होता. मी निर्वासितांच्या छावणीमध्ये मदत करत होतो. आम्ही लहान होतो त्यामुळे शिधावाटपाचं काम करत होतो. आम्ही पहाटे ३ किमी लांब चालत जायचो आणि आम्हाला २ ते ३ तासांचं काम दिलं जायचं. आम्ही शाळकरी मुलं होतो त्यामुळे काम झालं की आम्ही विटीदांडू वगैरे खेळायचो.
डॉड: फाळणीबद्दलची सगळ्यात चमत्कारिक गोष्ट कोणती?
सिंग: कुठलाही सांस्कृतिक धक्का नव्हता. सामाजिक जुळवाजुळव नव्हती. शाळापण तीच होती. सांस्कृतिक वातावरण अगदी सारखे होते. थोडंसं शत्रुत्व होतं पण ते म्हणजे प्रेम आणि तिरस्कारयुक्त संबंध होते. पण तरीही ते त्यांची स्वतंत्र आयुष्यं जगत होते आणि आम्हीही आमची स्वतंत्र आयुष्य जगत होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जास्त करून राष्ट्र उभारणी कार्य करणारा आणि लहान मुलांसाठी खेळासारखे मनोरंजक उपक्रम राबवणार होता. गांधींची हत्या झाली नव्हती. शाळा कमी अधिक प्रमाणात धार्मिक गोष्टींवर चालायची. धार्मिक कारणांसाठी सनातन धर्माची शाळा काढण्यात आली होती. आर्य समाज आर्य शाळा चालवत होता, शीख खालसा शाळा चालवत होते, तर मुस्लीम इस्लामिया शाळा चालवत होते. मुलं साधारणपणे त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार त्या त्या शाळेत जात असत. त्यांच्या फूट पडली ती फाळणीमुळे. फाळणीच्या आधी देखील हिंदू आणि मुसलमान हे विभाजित समुदाय होते. खेडेगावात लग्नात वगैरे हिंदू मुसलमानांच्या लग्नात जेवणार नाहीत हे सर्वमान्य होते. म्हणून लग्नाआधीच शिधा पाठवण्यात येत असे ‘खुद बनाओ और खाओ.’ जेव्हा माझे वडील झेलमला गेले तेव्हा तिथे रूपांतरित झालेले मुसलमान लग्नासाठी आधी पंडित आणि मग मौलवीना बोलवत असत. तिथे फक्त रूपांतर हे हळूहळू घडत होते. ते सुरूवातीला रितीरिवाजांकडे वळायचे आणि मग हळूहळू वेगवेगळ्या समुदायाचा भाग बनायचे. फाळणीनंतर मशिदींच्या जागी गुरूद्वारे उभारण्यात आले.
त्याआधी आम्ही सगळे स्वातंत्र्यासाठी लढत होतो. मला आठवत मी पंजाब काँग्रेसचा सदस्य होतो आणि आम्ही ‘आयएनए’साठी पैसे गोळा केले होते. त्या काळात आमच्या गटांनी ५०० रुपये गोळा केले होते. बंड केल्याबद्दल सेहगल, धिल्लोन आणि शाह नवाज यांच्यावर दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर कारवाई करण्यात आली होती आणि तेव्हा घोषवाक्य अशी होती की “सेहगल, धिल्लोन, शाह नवाज, लाल किले से हूए आजाद.” नेताजी सुभाषचंद्र यांचा जन्मदिवस २३ जानेवारीला असे आणि १९४५ ते ४७ मी काँग्रेसचा ध्वज माझ्या घरावर झळकावत असे.
१५ ऑगस्टच्या कार्यक्रमात आम्ही उपस्थित होतो. त्यावेळी लुधियानाचे उपायुक्त नरोत्तम सहगल (नयनतारा सहगल यांचे पती) यांनी तिथे ध्वजारोहण केलं. आमचे काका अमीरचंद पठानिया यांनी परेडचे नेतृत्त्व केले. त्यावेळी पूर्व पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा दंगली अजिबात नव्हत्या. जेव्हा जेव्हा ट्रेन मध्ये हिंदूंचे मृतदेह भरून आले तेव्हाच पूर्व पंजाबमधील दंगली उसळल्या.