१.
मनावर ताण असलेला माणूस
निरंतर चिंतातूर असतो
शंका साठवत असतो
पुरावे गोळा करत असतो
पाहिलेल्या प्रत्येक दृश्याला
झटकून-दुमडून-मुडपून पाहत असतो
तऱ्हेतऱ्हेच्या micro घड्या घालून
अदृश्याला आकार देत असतो
घड्या उलट-सुलट दुमडताना
नेणिवेचं multidimensional
कोडं सोडवत बसतो
(तेव्हढीच काय ती कलात्मक चौकशी)
हा माणूस तरंगत्या, विस्कळीत
बिंदुमय अवकाशात वावरत असतो
भितींवर सतत विविधाकाराची
भोकं करत असतो.
(त्याला स्वतःच ‘प्रयोग’ म्हणतो)
मनावर अनाकलनीय ताण असलेला माणूस
संवादांचे shortcuts design करतो
माध्यमांना कुरवाळतो – गच्च धरतो.
आणि निरंतर संवादी राहण्याला
भौतिक-पारमार्थिक-लैंगिक अभिव्यक्ती मानतो.
हा अखंड संवादांतून
अखंड शंकांची बीजधारणा करून घेतो
म्हणतो ओळख मिटवायचीय. (स्वामित्वाची शेंडी घट्ट बांधून)
सततच्या ताणा-ताणीतून आलेल्या
दुभंगलेपणावर तो
बुद्धीजीवितेचं आरोपण करत असतो.
विचारांचं रम्य ओझं बाळगणारा माणूस
सूत्र शोधत असतो गणिती-
कर्मविपाकाच्या सापशिडीत रंगलेला असतो.
हा माणूस
शंकांची projections करत असतो भवतालावर
लाभणाऱ्या landscapeवर चिंतेची रोपं लावत असतो.
ताणांचं वितरण कसं
सगळीकडे समसमान राहावं
चिंतेचं विश्लेषण
कसं खाजगी राहावं
ह्याकडे लक्ष ठेवून असतो.
चिंता-शंकांच्या झोक्यांतून
वेगाचा भास तयार करत असतो हा माणूस
ह्या माणसाला
डायनोसोरची रूपके सुचतात
तणावाखाली/साठी
डायनोसोरची मृत अंडी
भटक भटक शोधत असतो.
डायनोसोर ते drongo प्रवास
त्याला रोमांचक वाटतो.
पण करायचा नसतो.
२.
मला जसा दिसला पक्षी
पंख पाण्यावर विसावलेला
मग पाणीदार पंखांचा
वलयांत विखुरलेल्या
रक्त श्वेत बिंबांचा –
आकाशाचाही
मग डोहांचा.
३.
फडताळावर पडलेला
एक डाग पाहतोय
काळपट – जळकट. जळमटांत.
वर्षानुवर्षे छ्तातल्या छिद्रांतून
क्षणभर पडणाऱ्या प्रकाशाचा
साचलाय जसा गाळ
ह्या गाळातही जगतात म्हणे सजीव
सजीवांची अशी किती विवरे
घरभर लागलीत माझ्या
४.
दुपार ढवळत निघालीय
सावल्यांना टोके काढत
पोरक्या हाकेची –
एक शीर तणतणत
माळावरल्या कहारात
विरत विरत संपली..
अशाच वेळी कदाचित..
कुळवातून सांडणाऱ्या
अस्वस्थ सूर्याची
धांदल टिपायला
पाठीवर इजल टाकून
विन्सेंट दुपार ढवळत निघालाय.
५.
आपण फार खुरटलेले आहोत
आपण पुरूष आहोत
आपल्याला अस्तित्व हवंय
नदीसारखं
की वाळवंटातील गाव हवंय?
आपल्याला भुयार खोदावंसं वाटत राहतं
आपल्या सोबत काही स्फोटकं, काही अवजारं,
काही मिथकं असतात कायम.
आपल्याला रुजता-उगवता येत नाही
म्हणून आपण रडलेलो आहोत जाम.
आपल्याला नीट वाहता येईना म्हणून
रक्तपात केलेलेत जाम.
आपण कुठंकुठं सुरुंग पेरलेले आहेत
आपल्याला आता आठवत नाहीय.
आपण शब्दांच्या थोर गाठी मारून ठेवल्या
शब्द उलटलेत फुत्कारून जिथं जिथं.
आपल्याला नीट ऐकू येत नाहीय.
ऐकायचं कुणाचं नक्की?
कुठल्या स्पर्धेत नाव नोंदवायचं?
कुठल्या शक्तीने सत्तापद
भोसकून घ्यायचं.
कुठल्या नावेत बसायचं?
कुठल्या नावेला उलटू द्यायचं?
आपल्याला नदीचं आश्वासन दिलं होतं
आपल्याला पुरूष बनवून ठेवलं कुणी?
६.
धर्मखुणा लोंबकळतायेत
विखारी देहांवरून.
वेटोळे टाकून बसतात
त्या अस्तित्वांवर.
सनातन स्वामित्व
पावित्र्याचे
बुद्धिभेदी मंत्र उच्चारून
जुनेच खून
नव्याने करतंय.
७.
हा असा आहे
दोन शब्दांमधला
मिणमिणता पैस
अगदीच निराकार
अव्याख्येय.
जर्द चेहऱ्याला
ह्या पैसात
लपवावे
विरघळून जावे.
पाणी व्हावे.
पाणी.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
4 Comments
Jaising Gadekar
योगेश,
छान छान घरांची डिझाइन्स बनवता बनवता तू छान छान शब्दांची डिझाईन्स तयार करून त्यातून सुंदर कविता निर्माण करत आहेस. तुझ्या सर्व कविता वाचल्या. तुझ्या कविता या सर्वस्वी तुझ्याच आहेत. तुझे स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आहे. छान लिहित आहेस लिहित राहा.. खूप खूप शुभेच्छा..
योगेश कुऱ्हाडे
धन्यवाद सर! 🙂
योगेश कुऱ्हाडे
खुप धन्यवाद सर 🙂