मूळ हिंदी कविता: उदयन वाजपेयी

मराठी अनुवाद: प्रफुल्ल शिलेदार

फक्त काही वाक्यं 



back

आगमन

घर असं छान सजव की प्रसन्न वाटायला हवं. ती म्हणाली किंवा कदाचित मला हे ऐकू आलं. मी तापात, ती दिवसभराची थकलेली. तिच्या माथ्यावर आणि कोसळत्या पावसावर अंधार दाटून आलेला. पाहुण्यांमध्ये असं कुणीच नव्हतं, ज्यांनी आम्हा दोघांना भांडताना कधी पाहिलं नसेल. घर असं सजव की प्रसन्न वाटलं पाहिजे. ती पुन्हा पुन्हा सांगत होती. शेगडीवर पाणी विनाकारणच उकळत होतं. रेल्वे यायला अजून वेळ होता. रस्त्यांवर दारुडे बडबडत होते. शहराकाठच्या घाणेरड्या जागी जाऊन झोपले होते भिकारी. काळ्या निंबावर कोळी रात्र विणत होता. स्वयंपाकघरातून तिची हाक आली. बघ, बघ, भिंतीवरची मेलेली पाल जिवंत होऊन सरकू लागलीय ! उठा, उठा, आमच्या भिंतींवर अजूनही साचलेली आहे धूळ आणि जाळे !!        

घर

सकाळी घराबाहेर खुर्ची टाकून बसता येऊ शकतं. वडील तिथं बसले आहेत, नेहमीपासून नेहमीपर्यंत; त्यांच्याकरता समोरून तंबाखू घेऊन येणारा बलदेवसिंग दगडी शिल्पासारखा एकसारखा पुढे येतोय; नसल्यासारखा, त्यांच्याकरता जेवण घेऊन येणारी आई वाटेतच देह सोडून तीर्थयात्रेला निघून गेलीय. पारिजातकाचा सडा पडलेल्या अंगणात झोपता येऊ शकतं. सकाळी पडलेली शुभ्र फुलं दिसताच मला ती वेचायला सांगून वडील अंघोळीला निघून गेले. चुन्यानं बांधलेल्या दोन भिंती मातीनं सारवलेल्या चौकाच्या कोपऱ्यात जिथं एकमेकांच्या आधारानं स्वतःला कोसळण्यापासून सावरत आहेत, तिथं पहुडता येऊ शकतं. तिथे ती पहुडलेली आहे, जी तिथून उठून माझ्यासोबत थोडा वेळ खेळून पुन्हा तिथेच निजायला निघून गेली.

परतणं

वडील टेबलाच्या दुसऱ्या बाजूनं बसले होते. अंगणात दोन चंद्र होते – एक लाल, दुसरा पिवळा. मी धावतच तिथं पोहोचलो. भाऊ टेबलाच्या या बाजूनं बसला होता. आपल्या मृत्युच्या तब्बल बारा वर्षांनी ते त्या संपूर्ण नष्ट झालेल्या घरात आले होते. मला ठाऊक होतं जिथे आम्ही आहोत तिथे ते नव्हते. त्यांच्या मृत्युपूर्वी ते पारदर्शी नव्हते. आम्ही बारा वर्षे पहाडांमध्ये त्यांचा शोध घेत होतो. त्यांनी आम्हाला शोधलं नाही. ते खात नव्हते, बोलत नव्हते, ते नव्हतेच मुळात. ते आपल्या जुन्या घरात अशा तऱ्हेनं परतून आले होते जणू काही ते नष्ट झालं नव्हतं आणि ते मेलेही नव्हते. मी त्यांच्या दिशेनं धावलो आणि ते माझ्या दिशेनं. भाऊ नाहीसा झाला होता. मी त्यांच्या दिशेनं धावतो आहे. ते माझ्या दिशेनं. भाऊ आकाशमार्गानं त्यांचा स्पर्श घेऊन परततो आहे.  

ते त्याच वाटेनं परत निघाले आहेत.

बाबा

टेलिफोन फरशीवर विखुरलेला आहे. त्याचे काळे तुकडे वडील एका टोपलीत गोळा करताहेत. आई महाराणीसारखी सूचना देत सुटली आहे. ती पदरानं तोंड झाकून घेत वडिलांकडे बघत लाजते आहे. ओसरीत पलंग टाकले आहेत. मी अमरिंदर कौरच्या विचारात पडल्या पडल्या गुंगलो आहे. ओसरीच्या वर एक खोली आहे. आमच्या कुटुंबातील मृतक तिथेच राहतात. आई रोज त्यांच्याकरता जेवण ठेवत असते. ते माझी अडचण सोडवू शकतात. आई मला तिथे कधी नेत नाही. मी आज गुपचूप तिथे जातोय. ‘बाबा, तुम्ही तिला उचलून इथे घेऊन येऊ शकाल, थोड्या वेळाकरता. नाही, नाही, मला तिला फक्त बघायचं आहे.’ ते गालातल्या गालात हसत आहेत. मी अमरिंदर कौरच्या दारात उभा आहे. ‘तिला आताच कुणी शुभ्र दाढीवाले बाबा घेऊन गेलेत.’ मी परततो.

घरी कुणीच नाहीए. अंगणातल्या दुधाळ चांदण्यात चमकतोय तिचा शुभ्र देह.    

पायऱ्या

सगळ्यात वरच्या पायरीवर आजी आणि सगळ्यात खालच्या मी. मधोमध बावीस लाकडी पायऱ्या आणि अकाली मेलेल्या एका माणसाच्या पावलांचा आवाज. आजीच्या हातातील दुधात  काळे तीळ. मंजू गालात हसत होती. आजोबा बाजूच्या अंधाऱ्या खोलीत आपला जाड चष्मा शोधत होते. ती खाली उतरत नाही. माझ्यापासून दहा पायऱ्यांच्या अंतरावर एक जाड चष्मा ठेवलेला होता. मंजू प्रसाद पहाडी मुलगी होती. फाडफाड इंग्रजी बोलायची. तिच्या दृष्टीनं मी जगात नसल्यासारखाच होतो. ती आजीच्या खालच्या बावीस पायऱ्यांवरून उतरत एकसारखी खाली येत होती. मी ऐकत होतो एका अकाली मेलेल्या माणसाच्या पावलांचा थपथप आवाज.

पलंग

मी पलंगाच्या कोपऱ्यावर बसलो होते. आज मला ठाऊक आहे, ते एका आठवड्यानं मरणार होते, त्यांना ते तेव्हाच कळलं होतं. ते जंगलातल्या वाटेनं शाळेतून परतत होते. त्यांच्या हातातून रक्त वाहात आहे. अंधाऱ्या रात्री त्यांचे वडील त्यांना बघून रडू लागतात. त्यांना हे कसं दिसलं कुणास ठाऊक. आई स्टीलचा ग्लास घेऊन उभी आहे. ती माझ्याकडे बघते. तिचे  वडील शिकलेसवरले नसतानाही अलाहाबादेतल्या वकिलांशी सल्लामसलत करत असत. मरण्यापूर्वी सिगारेट प्यायची त्यांची इच्छा आहे. ते वळून आईकडे बघतात. आई बाजूला होते. मागे एक खिडकी आहे. तिथे मरण नाहीय.

ती भोपाळ स्टेशनावर सिगरेट फुंकत त्यांची वाट बघते आहे.

विहीर

हिरव्या पेटीत आईचे पैसे एका कागदाखाली तळाशी लपून बसले आहेत. वडील काळ्या आलमारीच्या पुढे उभे आहेत. भाऊ अपरात्री विहिरीत डोकावून बघतोय. माठाजवळ तो ग्लास शोधतोय जो त्याला कधीच सापडत नाही. शेतातले लाल टोमॅटो पाहून वडील आनंदित होतात. त्यांच्या मागे ओढल्यासारखा चालतोय एक माळी. माळीण शेताच्या कोपऱ्यात मुलाला काळ्या मातीवर निजवत आहे. झोपेत चालणारी आई विहिरीजवळ पोहोचते. ते एकमेकांना ओळखू शकत नाहीत. ‘विहिरीतून अपरात्री प्रेतं पाणी भरतात.’ आजी पुटपुटते. मला कधीच ग्लास सापडत नाही – तो गळा पिळवटून ओरडतो. आई जगाच्या जागीच उभी राहते.

अंगणातला पारिजातक शुभ्र फुलांनी वडलांचे शव पूर्णपणे झाकून टाकतो.  

गुरुजी

लाल मैदानातून एक दारुड्या जातोय. मुलं खेळत आहेत. ते त्याला मारतात. त्याच्या कानशिलातून रक्त वाहू लागतं. आई मैदानाच्या मागील मारुती मंदिरात दर मंगळवारी पूजेला जाते. इतक्या बायकांमध्ये तिच्या शेजारी असूनदेखील तिला ओळखणं कठीण होऊन बसतं. मी आजीसोबत एका गुरुजींपुढे उभा आहे. त्यांच्या पाया पडावं असं आजीला वाटतं पण मला नाही वाटत. खोलीत उग्र गंध आणि धूर वाढत जातो. आई माझ्याकडे दरडावून बघते. ती मला गुरुजींच्या दिशेनं अशा प्रकारे ढकलते की मी तिकडे जाऊनही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही.

सुरे

वडील ऑफिसातून घरी परतलेत. रस्त्यावर लोकांच्या हातात सुरे चमकत आहेत. वडील आपली कागदपत्रं वरखाली करतात. मरण्यापूर्वी ते एकमेकांच्या कामात येत असतात. त्यांच्या शर्टवर कागदांमधून धुळीऐवजी शब्द पडतात. सुनसान चौकात एक म्हातारा रात्रभर शेंगदाणे विकतो आहे. भावाच्या हातात बंदूक आहे. वडील त्याला बाहेत जाण्यापासून अडवतात. मी दाराअडून बघतो, ते लोक दारापर्यंत पोहोचले आहेत. विधवा आई स्वयंपाकात गुंतली आहे. चमकत्या सुऱ्यांमुळे वडलांचे थरथरते हात चमकतात. ते जीव तोडून ओरडतात.

ते त्यांना मारून टाकणार तर नाही ना याची त्यांना भीती वाटतेय.

रात्र 

तिसऱ्या दिवशीच्या रात्री आजीच्या घरातून आई आपल्या घरी पळून जाते. ओसरीतल्या तक्तपोसावर कुणीतरी झोपलं आहे. त्याला ठाऊक नाही की वडील झोपून गेले आहेत. आजी पदोपदी त्याला रागवते आहे. ती मलाही काही उत्तर देऊ देत नाही. मातीची पार्वती फुलांनी झाकलेली आहे. स्त्रिया भजन गात आहेत. वडील हातांनी गुढगे पकडून चालत आहेत. त्यांना मरण्यापुर्वीच पुन्हा जन्माला यायचं होतं. आईला भजनामधे दबून गेलेली एक उचकी ऐकू येते. ती पाण्याकरता तोंड उघडते. वडील कूस बदलतात.

आजीच्या पारदर्शी त्वचेच्या आत आईचं अदृश्य जीवन दिसू लागतं.

हॉस्पिटल

आईची बोटं एकमेकात अडकली आहेत. मी ती सोडवायचा प्रयत्न करतो. ती पडून आहे. तिला ठाऊक नाही पण आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. भाऊ तिला रामाचा फोटो दाखवतो. आपल्या एका म्हाताऱ्या मैत्रिणीला आई दुपारी पुराण वाचून दाखवते आहे. तिचा चष्मा नाकाच्या टोकावर ठेवलेला आहे. हॉस्पिटलच्या व्हरांड्यात बसून मी पुस्तक वाचतो आहे. भावाची कार रस्त्यात बिघडून पडलेली आहे. आई खिडकीकडे बघते. बाहेर मोकळा रस्ता आहे. भाऊ खिडकीच्या हिरव्या पडद्याआडून डोकावून बघतो.

त्याचा चेहरा आईच्या थिजलेल्या चेहऱ्यात जाऊन थिजून जातो.  

प्रश्न

चौक ओलांडून मी त्या उजेड असलेल्या घरात पोहोचलो. स्वयंपाकघराच्या पुढ्यातल्या रिकाम्या ओसरीत एक विधवा अंग चोरून बसलेली आहे. आपल्या दोन्ही गुडघ्यांवर तिनं डोकं ठेवलेलं आहे. ती आपल्या बहिणीच्या घरी कुठल्याशा लग्नाकरता आलेली आहे. ती थेंब थेंब डोळ्यांनी माझ्याकडे बघते आणि मला बाहेर जाण्याची खूण करते. तू तिला ओळखू शकतो आहेस काय. ती माझी आई आहे. नाही, नाही, ती तिथे तशी कां आहे हा प्रश्न विचारू नका. ती सगळं ऐकून घेते. ती आतल्या आत इतकी आक्रसून गेलेली आहे की तुम्ही विचारलेला एखादा प्रश्नदेखील, मग तो कुतूहलानं विचारलेला कां असेना, तिला तिथेही स्वस्थपणे बसू देणार नाही.

दोन

स्थिरावलेल्या नदीच्या पात्रात दोन नावा डुलत आहेत, तिथेच तिचे दोन पाय तिचं शरीर चपलांवर तोलून धरत आहेत. आकांक्षेचं स्थापत्य आहे ते. मी आणि एक वृद्ध पायऱ्या उतरत आहोत, ती चढते आहे. ती थांबते. मोकळ्या केसांच्या झिरझिरीत पडद्याआडून दोन डोळे माझ्याकडे बघतात. मी थांबतो. वृद्ध सांगतो. ‘माझ्या आईचं शव चालवत घराबाहेर आणलं गेलं होतं.’ त्याचा पिवळा वेश सोन्याचा असल्यासारखा वाटतो. हा तोच आहे ज्याच्याशी माझी शाळेच्या मैदानात टक्कर झाली होती, किंवा हा त्याचा अवतार असावा ! ‘जेव्हा तू त्याच्याकडे बघू लागला तेव्हा तुझी आई तुला घेऊन तिथून दूर निघून गेली’ तो म्हणाला. मी दोन पावलं हललो.

ती संपूर्ण आत्मभानानं आपल्या देहावरून घसरते आहे ज्याच्या काठावर मी तिची वाट बघतो आहे.

शून्य

आजोबांना रोज विलायतेहून एक पत्र येत असतं. त्यांचा मुलगा तिथून परतून येऊ शकत नाही. आई हे दु:ख आजोबांचंच दु:ख समजून दु:खी होते. ती गच्चीवर जाऊन आपल्या भावाला, नव्हे आजोबांच्या मुलाला, आपल्या इवल्याशा हातानं बोलावते. वडील आईला आपल्या वेदना सांगत नाहीत. आईचं दु:ख ऐकून घ्यायला ते जिवंत राहत नाहीत. ते जेव्हा परततात, आईदेखील परत येते. त्यांची वेदना आईच्या दु:खासोबत स्वर्गाचं दार चाचपडून पाहते.

आजीच्या शवावर आजोबांचं शव फुलं वाहतं. वडिलांच्या दूर उभ्या असलेल्या शवाकडे आईचं शव बघतं. भाषा डमरूसारखी वाजू लागते – शून्य शून्य, शून्य-शून्य.

कोरी पानं

वडिलांची कार एका इमारतीपुढे उभी आहे. मी वडिलांसोबत आत आहे. वडिलांनी इमारतीच्या बाहेर मला दिलेला बिस्किटांचा पुडा माझ्या हातात आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस असलेल्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. मुलीनं नवा चमचमणारा ड्रेस घातला आहे. आई रोज सकाळी मला उठवत असते. मी शाळेत न जाण्याची  अगणित कारणं आठवत अंथरुणातून बाहेर येतो. ओल्या कपड्यानिशीच ती रामचरितमानसापुढे जाऊन बसते. तिच्या काकडण्यातून चौपाई  झरतेय. मी मुलीला भेटवस्तू देताना काही चूक करणार नाही याचा वडलांना अजिबात भरवसा वाटत नाही. मुलांच्या गर्दीत ते मला क्षणभरही एकटं सोडत नाहीत. तिथे मला वडील माझे न वाटता दुसऱ्याच कुणाचे तरी वाटतात.    

आई दचकून झोपेतून उठते. तिला तिथे रामचरितमानसाची पाने कोरी दिसतात.

म्हातारे मित्र

आजोबा आपल्या म्हाताऱ्या मित्रांसोबत टेबलावर पत्त्यांचा डाव जमवत आहेत. अंधाऱ्या खोलीत सगळ्यांच्याच माना हळूहळू डोलत आहेत. बाबा सांगतात की त्यांच्या मुलाजवळ अफाट बुद्धिमत्ता होती. आई आजीची वेणी घालून देते. गच्चीवर ढळणाऱ्या चंद्राच्या पिवळ्या प्रकाशात कोजागिरीचं दुध वितळत आहे. काश्मिरातील एक ज्योतिषी वडलांचा मित्र आहे. तो त्यांना त्यांच्या मृत्यूची तारीख सांगतो, जी ते पिढीजात ओळखीसारखी लाकडी कपाटात लपवून ठेवतात. सूर्य मावळलेला आहे.

वडील घराच्या दारात उभे आहेत. पांढऱ्या वस्त्राखाली बाबा डोळे मिटून घेतात.  

दोन घरं – १

मांजर कोनाड्यातून बाहेर येऊन रस्त्यावर फिरायला निघते. पाऊस पडून गेल्यानंतर सूर्य आपल्या प्रकाशात चमकतो आहे. झाडं आपल्या हिरव्याजर्द तेजात. पलंगाच्या बाजूला लागलेल्या एका पूर्ण आकाराच्या आरशात घरातील वधू आपला नग्न देह न्याहाळत असते. ते एकमेकांसमोर बसले आहेत. एक, दोन, तीन…दहा, एक नातू तिच्या चेहरावरील सुरकुत्यांवरून अंकलिपी शिकतो आहे. रात्रभर एकमेकांचा हात घरून ते ओसरीत बसून राहतात. रिकाम्या घरभर पसरलेली शांतता कधी विस्तारते तर कधी अंग चोरून घेते. ते आपल्या डोळ्यांच्या जाळीतून बाहेर डोकावत मनात एक शब्द स्थिर करतात आणि पुटपुटतात : पाप !

दोन घरं – २

वडिलांच्या घरासमोर आजोबांनी मृत्युपूर्वी सोडलेलं आजीचं घर आहे. आजी त्याच इस्पितळात जाऊन मेली जिथे आजोबा मरणार होते. वडील त्याच घरात रहात आले ज्या घरात आई त्यांच्या मृत्युनंतर आणि तिच्या मरणापूर्वी मला परीक्षेच्या अभ्यासासाठी पहाटे तीन वाजता उठवून मगच झोपी जात असे. तिच्या निजेच्या थरथरत्या पृष्ठभागावर बेवासार प्रेतासारखं एक वाक्य तरंगत आहे – मी खरोखरच आहे काय ? मी खरोखरच आहे काय ??

उजाडेपर्यंत विहिरीच्या उबदार पाण्यात ती अंघोळ करत आहे. उघड्या पुस्तकावर माझं डोकं टेकलेलं आहे आणि माझे हात सकाळ झाल्यासारखे हवेत हळूहळू हलत आहेत.

खोटं

माझ्या पायातून निघत असलेलं रक्त घरातला नोकर बघतोय. ते लाल आहे. वडील रागावून मला मारत आहेत. नोकर सांगतोय, मी त्याला वाचवायला खोटं बोललो होतो. माणूस प्रयत्न करूनही बोललेलं सगळं खोटं नीट आठवू शकत नाही. आत्या स्वयंपाकघराच्या दारामागून पुटपुटते, ‘तुझा बाप डोकं भादरून घरी आला आणि म्हणाला तुझी बाहुली मी फेकून दिली म्हणून हे मुंडन केलंय.’ आई दूर उभी राहून माझ्याकडे बघतेय.

दिल्लीहून भाऊ माझ्याकरता नवे बूट घेऊन येतो. आई स्वेटर विणते. मी बूट घालून उभा राहतो आणि घसरून खाली पडतो. 

अखेरचा उपाय

दोन्ही हात मागे बांधून घराच्या दारात आई उभी आहे. वडील आकाशाची निळी खिडकी उघडून खाली डोकावतात. ते एकमेकांना बघू शकत नाहीत. वडलांच्या आलमारीचं कुलूप उघडून भावाच्या हाती काहीच लागत नाही. वटवाघूळांचा पंख फडफडवण्याचा आवाज ओसरीच्या हवेत पसरतो आहे. एक न्हावीण वेगाने आत येते आणि वडलांना वाचवायचा अगदी अखेरचा उपाय आईला सांगते. वडील तोंड उघडतात. बहीण तिथे राख उडवून देते. आई सुंदरकांड वाचणं संपवून आपल्या अधू डोळ्यांनी आपल्या तुटलेल्या चष्म्याकडे बघते. वडील डोळे मिटून घेतात आणि आकाश पुन्हा आपल्या पारदर्शी निळाईत विरघळू लागतं.

उदयन वाजपेयी यांच्या ‘केवल कुछ वाक्य’ या हिंदी कवितासंग्रहातील असलेले आणि नसलेले घर, घरातील माणसे, घरात नसलेल्या तसेच या जगातही नसलेल्या माणसांचा आभासी वावर, नातेसंबंधातले ताणेबाणे, असलेल्या-नसलेल्यांबद्दलची गडद ओढ, स्मृतींच्या एकमेकांमागून येणाऱ्या लाटा, अशा केंद्राभोवती एकमेकात गुंतलेल्या पन्नास कवितांच्या मालिकेतील सुरुवातीच्या वीस कवितांचा हा मराठी अनुवाद. – अनुवादक

उदयन वाजपेयी हे भोपाळस्थित प्रसिद्ध हिंदी कवी आणि विचारवंत आहेत. त्यांचे पाच कविता संग्रह, चार कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली आहेत. कला, साहित्य आणि संस्कृतीवरील चर्चेला वाहिलेल्या ‘समास’ या नियतकालिकाचे संपादन उदयन वाजपेयी करतात.

प्रफुल्ल शिलेदार हे मराठीतील महत्त्वाचे कवी-अनुवादक आहेत. त्यांचे मराठीत तीन कवितासंग्रह, हिंदीत एक कवितासंग्रह, चार अनुवादित पुस्तके आणि तीन संपादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अनुवादाच्या ‘साहित्य अकादेमी’ पुरस्काराने तसेच इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कवितेला आणि अनुवादांना गौरविण्यात आलेले आहे. सध्या ते मराठीतील ‘युगवाणी’ या महत्त्वाच्या  वाड़मयीन नियतकालिकाचे संपादक आहेत.

2 comments on “फक्त काही वाक्यं: उदयन वाजपेयी/ प्रफुल्ल शिलेदार

  1. सुचिता खल्लाळ.

    कविता आणि अनुवाद दोन्ही अप्रतिम !

    Reply
  2. भास्कर हांडे

    कविता भाषांतर अगदी सोप्या शब्दात झाले आहे जे विषयाला पूरक आहे. कवितेचा आशय सामान्य घरातील वातावरण, माणसे, सभोवताल जो दररोजच्या जगण्याशी निगडित आहे. सहजता यातून सतत दृष्टीस पडते. आठवणी आणि समकाल यांची शक्यता कमीजास्त करत शब्दप्रयोग काव्य समोर येते.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *