एका नृत्याचा जन्म
समेचा नियम
फिरून पुन्हा तिथेच येणे
ओंजळभर देऊन-घेऊन
नक्षत्रांचे देणे
हाताध्ये हात
ठेक्यात पावलांची जोडी
वावटळीचे मन
देहात पावसाची झडी
त्याचा श्वास, श्वास तिचा
वीण गुंफलेली
जगात जणू दोघेच
नजर घट्ट गुंतलेली
क्षण कण-कण
वाट सरळ आड, जरी
थांबून राही काळ
श्वास रोखुनिया उरी
परतण्या सज्ज
ओढ लागे उगमाची
तेच मूळस्थान
नवी रीत परतीची
दोघे राहिले ना
नृत्य अद्वय रूपाने
सारे आवर्तन होई
नक्षत्रांचे देणे
***
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा…
त्याच गल्लीबोळांत, त्याच रस्त्यांवर
तेच हसू, तेच दुःख त्याच चेहऱ्यांवर
काही कोरीव लेणी, काही दगड
कसा फुटावा पाषाणाला पाझर
मरणोन्मुख संस्कृतीच्या जिवंत संग्रहालयात
पुतळ्यांच्या, मुखवट्यांच्या गजबजाटात
पुन्हा येते मी पारदर्शी, भूतासारखी
फिरत राहते मी नीरव, सावलीसारखी
केव्हाही अंधारात विरघळून जाईन
केव्हाही प्रकाशात वितळून जाईन
शेवरीचं माझं अस्तित्व
झुळकीबरोबर वाहत जाईन
नवं बीज घेऊन ओटीत
ओलसर माती अन् किलबिल शोधीत
तीच गल्ली, तोच रस्ता, तीच वाट
भुतासारखी, सावलीसारखी, शेवरीसारखी
चालत राहीन
पुन्हा एकदा…
***
कृष्णा
विटंबनेची लक्तरं महाद्वारी वाळत घालून
उंबऱ्याबाहेर पाऊल टाकत ती म्हणाली,
येईन मी तेरा वर्षांनी, याच लक्तरांचा
करून युद्धध्वज आभाळात फडकवेन
सुरकुतलेल्या नजरांना चढेल भिवईने
एका क्षणात खाली झुकवत ती म्हणाली,
येईन मी तेरा वर्षांनी, षंढ पुरुषार्थाला
अन् अंध अहंकाराला एकाच मापात तोलेन
तळपणाऱ्या सूर्यालाही लाजवेल अशा
चटके देणाऱ्या सुरात ती म्हणाली,
येईन मी तेरा वर्षांनी, माझ्या अग्निगर्भी
जो वाढतोय, तो सूड बरोबर घेऊन येईन
काळरात्रीहूनही गहिरा केशसंभार
हवेत उडवीत फटकारत ती म्हणाली,
येईन मी तेरा वर्षांनी, या कुळाच्या
उष्ण मत्त रक्तात मनसोक्त स्नान करीन
नगराच्या तटांनाही जिने तडे पडतील
अशी नाजूक तर्जनी उचलून ती म्हणाली
येईन मी तेरा वर्षांनी, ज्याने आज
लाज राखली, तो कृष्ण तेव्हा मीच होईन…
छायाचित्र सौजन्य : उन्नी पुलिक्कल एस.
(हाकारा । hākārā | आवृत्ती २२ | स्पर्श | मे २०२५)
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram

1 Comment
Vikram
Nice.