श्रीराम सीताराम मोहिते

अंतरिक्ष फिरलो पण..



back

“तुजा आज्जा किशाबापू नुसत्या सदरान लंगूट्याव कोलापुरापातुर चालत कुस्त्या बघायला जायाचा. तुजी म्हातारी, आमची म्हातारी वडगावच्या बाजारला आंबं इकायला, टोकणनीतलं ऱ्हायल्यालं शेंगाचं बी इकायला, मूग-चवाळं इकायला..ईस्टीनं जायाच्या न्हाईत; चालतच जायाच्या. बोज्या टक्कुऱ्यांव घिऊन. चाराणे वाचवायच्या. पंडरपूरलासुदा आदिमदी माणसं चालतंच जायाची. येताना करगणीत न्हाईतर खरसुंडीत बैलं घ्याची रॉड पडल्याली, न्हाईतर बारकी पाडी आणायची इकत हिकडं. आणायची हजार-पंधराशाची; वरीसबर संबाळायची आणि नफ्यावं पाच हजाराला इकायची धड करून. तीबी दीशी गयांची पाडी. ह्या असल्या जर्सी-बिर्सी गयाच न्हवत्या तवा. पांढऱ्या गया हुत्या. आता पुना ती फॅशन आल्या दीशी गयांची. ‘एक का हुईना, गवाणीला पायजे.’ आयचं म्हायार आमच्या कोडली. पर ईस्टीनं कवा गीली नाय. दिवसभर खोरीत भांगलून पाचला उटायचं, ते तसंच खुरपं पाटीत घिऊन वाटंला लागायचं. दिवस बुडायला कोडलीत. तवा माणसं चालतच जायाची सगळीकडं. तुमच्यागत ढुंगणाखाली गाड्या कुठल्या आल्यात तवा! ईस्टीबिस्टीतसुदा लयसं माणूस बसायचंच नाही.. आणि ईस्टी तरी सारकी कुठली? कवातर एकादी. बरीसशी माणसं उब्या जल्मात कोलापूर बिन बगताच मरून गेली ! काय गरजच न्हवती तर जायाची! कामच काय वो ? रानातनं घरात आणि घरातनं रानात ह्येज्यातच आयुष्य जायाचं कैक जणांचं. कवा पै-पावण्याकडं वर्षा-सहा महिन्यातनं जायचं झालं, तर तीबी गावं आसायची लै-लै तर फर्लांगा-दीड फर्लांगातली.”

बेडवरच्या पांढऱ्या लोडाला टेकून बसलेल्या बापूंची म्हणजे आमच्या चुलत्याची बोलण्यात तंद्री लागलेली. बोलणं म्हणजे काय-फक्त आठवणी आणि आठवणीच. त्याही मनाला बरं वाटतीलशा निगुतीनं निवडून घेतलेल्या. वेचीव. तसा तो अलीकडे नॉस्टॅल्जिक मोडवरच असतो नेहमी. ऐकून घेईल असं माणूस भेटलं, की त्याचं सुरू होतं. लॉकडाउनच्या काळात तर त्याच्या अशा बोलण्याला एक आतला सूर लागलेला जाणवायचा. डोळ्यांपुढं झरझरणाऱ्या वर्तमानाची नजर चुकवत भूतकाळाचा हात घट्ट धरून असल्यासारखा वावरत असतो. एखादा नकोसा वाटणारा चित्रपट नाईलाजानं पाहायला लागल्यावर अलगद मन काढून घ्यावं आणि आतल्याआत स्वतःच रचलेल्या चित्रपटात गुंतवत जावं, अगदी तसं होत राहतं बापूंचं. त्याच्या विचारांच्या मुळ्या वर्तमानात रुजायचंच नाकारत होत्या. सतत आत मागं वळत, भूतकाळातली ओल शोधत, भटकत राहायच्या. यात त्याचाही दोष नव्हता म्हणा. बापू पंच्याहत्तरीत पोहोचलाय आता. भूतकाळाच्या गुबगुबीत मांजराला कुरवाळत बसण्यात त्याला एक वेगळं सुख मिळत असावं. म्हणून तर जुन्या दिवसांच्या थंड, हळव्या प्रवाहात सोडून दिलेले पाय त्याला आता सहजी आखडून घेता येत नाहीत. त्या पाण्यातल्या त्याच्या पायांना आठवणींच्या मासोळ्या लुचत राहतात. त्यांनी घेतलेल्या हळुवार चाव्यांमुळं तनामनाला हव्याहव्याशा गुदगुल्या होत राहाव्यात तसं त्याला होत राहतं आणि आतल्या आत तो सुखावतो. म्हणूनच जगण्याच्या या सगळ्या अटळ वैतागलेपणातून सुटण्याचा त्याचा जणू निकराचा प्रयत्न चाललाय. दिसेल त्या माणसाबरोबर त्याच त्या जुन्या गोष्टी उगाळत बसतो. कॉलेजचे दिवसच आयुष्यातले सगळ्यात मौजेचे दिवस – हा त्याच्या नॉस्टॅल्जियाचा सारांश असतो. कॉलेजला असताना लेक्चर बंक करून हॉस्टेलवर लोळत पडणं, घरून आयते येणारे डबे चापणं, हीच त्यातली काय ती मजा. पघळ खाणं-पिणं आणि वर चघळायला गावच्या उचापती यावर आख्खं आयुष्य एखादा माणूस कसा काढू शकतो, हे पाहायचं असेल तर त्याच्यासारख्या माणसाकडं पाहावं. नव्या गोष्टी धुंडाळण्याची आस रक्तातच असावी लागते काय? त्याचे बापजादे आणि त्याआधीच्याही कित्येक पिढ्या शहर नावाची गोष्ट न पाहताच मरून गेल्या. पावलांनी पायाळता येईल एवढ्याच भुईवर आयुष्यभर वावरून शांतपणे मरून गेल्या. त्यांना कधीही गावच्या सीमा ओलांडण्याची स्वप्नंच पडली नाहीत. शेतात पडेस्तोवर राबणं, धनधान्याची सगळी उस्तवार करणं, सणवार, लग्नं, बारशी, जावळं, द्यावधरम आणि पै-पाव्हणं सगळं येवंशीर सांभाळणं यापलीकडं डोकं वर काढायला त्यांनी वेळच ठेवलेला नव्हता. नाही म्हणायला गावजत्रा, कुस्त्या, तमाशे, लावण्या झालंच तर देवळातले सप्ते-भजनं-कीर्तनं हेच काय ते मनोरंजन आणि तुमचं ते सांस्कृतिक का काय ते विश्व! वैयक्तिक आकांक्षा, या प्रकारालाच या व्यवस्थेत स्थान नव्हतं. उभ्या गावात नोकरीसाठी गाव सोडणारी अवघी दोनचार माणसंच सापडायची. त्यातही बहुतेकांच्या नोकऱ्या जवळच्याच गावात. बाकीची माणसं खळ्यावरच्या बैलासारखी खुट्ट्यानं आखलेल्या रिंगणातच फिरत राहिली. आपल्याला नेमकं कुठं पोहोचायचं याचा पत्ताच नसणारी माणसं. किंबहुना जगण्यात कुठंतरी पोहोचायचं असतं, हेच ठाऊक नसणारी माणसं. मग कुठल्या वाटांनी त्यांना हाकारत नेलं असेल? वाटा निवडण्याइतके चॉईसेस तरी होते का त्यांच्याकडं? आणि त्यामुळंच वाट न सापडण्याचं फ्रस्ट्रेशनही नसेल का? की मग आपल्यासारखं कुठंतरी पोहोचायचं-बिचायचं नसेलच त्यांच्या डोक्यात? ते डंख फार नंतर आपल्या आयुष्याला डसले. आदिम माणसांच्या एखाद्या टोळीनं जमीन कसण्याचं तंत्र हाती लागून जो मुक्काम ठोकला असेल, त्यानं खंडंच्याखंडं ओलांडणारी काळपटावरची भव्य स्थलांतरं काहीशी मंदावली असतील. जमिनीशी घट्ट बांधलेल्या त्याच स्थिरतेशी नातं सांगणाऱ्या या आमच्या रांगड्या पिढ्या गावातच जन्माला आल्या आणि गावातच मेल्या. नवे प्रदेश धुंडाळत जाण्याच्या आकांक्षेची जनुकं जणू त्यांच्यात आलीच नाहीत कधी. त्यांनी नेमकं काय गमावलं असेल? आणि आपण ज्याला गमावणं म्हणतोय त्याची त्यांनी कल्पना तरी केली असेल का? गमावणं आणि मिळवणं याचे अर्थ प्रत्येक पिढीत किती झरझर बदलत गेले. प्रत्येक दशकात. आता तर अगदी क्षणाक्षणाला. गावानं नेमकं काय गमावलं?

शहराच्या नादी लागून गावं हळूहळू शहरांचे चमचमते ढगळ पोशाख चढवण्याच्या चढाओढीत गढून गेली. गावाचं ‘गाव असणं’ कशात आहे, हे गावाला उमगलं नाही आणि शहराचं ‘खरंखुरं शहरपण’ शहरांना झेपलं नाही, ही एक मोठीच गोची होऊन बसली. एकीकडं आपण तारुण्यात पाऊल टाकलं तसं गावही वेगानं बदलत गेलं. त्या बदलांनी भवताल टोकरत गेलं. अगदी आत्ता आपण जिथं बसलोय ते घरही झाडाझुडपांच्या गचपणानी भरलेलं होतं काही वर्षांपूर्वी. कदाचित पक्ष्यांच्या राहण्याच्या जागा असतील इथं. सापांची, बेडकांची, किड्या-मुंग्यांची वस्ती असेल. ती साफ करून इथं आमची ही घरं उभी राहिली. त्या पक्ष्यांनी, किड्यांनी आणि नावंही माहित नसणाऱ्या जिवांनी कुठं स्थलांतर केलं असेल ? त्यांचं न आपलं काही नातं होतं का? की ते आपल्या गणगोतातच नव्हते कधी? सत्तेची सगळी सूत्रं हातात आल्यामुळं आपल्या खिजगणतीतही नसणारे एक अख्खं जग आपण अगदी सहजपणे मुळापासून उखडलं. पक्षी कुठंतरी गेले असतील उडून. साप पळून गेले असतील. बेडकांना अखेरचंच भूमिगत होऊन जावं लागलं असेल. मुंग्या मात्र तिथंच आहेत. आई सांगते – या घरातल्या मुंग्या काही हटत नाहीत. अनेक पावडरी टाकून, औषधं मारून झाली. मुंग्या हललेल्या नाहीत. अवचित उगवल्यासारख्या कुठूनही अचानक दिसायला लागतात. एकाएकी लक्षात येतं, की आपलं हे भलंथोरलं घर मुंग्यांनी आतून काबीज केलंय. आता तर त्याची खात्रीच पटत चाललीय. काबीज केलंय, की त्या हक्क सांगतायत? स्वतःच्या वस्तीमधून हाककल्या गेल्यामुळं दुखावल्या गेल्या असतील काय? लाल मुंग्यांवर का कुणास ठाऊक आईचा फार राग आहे. बेसावध असता कुठंही चावत असल्यामुळं ती बहुधा हैराण होऊन गेलीय. काळ्या मुंग्यांबद्दल मात्र तिला आपलेपणा आहे. त्या चावत नसल्यामुळं कदाचित. माहित नाही- पण वारं मुंग्या चांगल्या अशी तिची परंपरेतून आल्यामुळं घट्ट झालेली समजूत आहे. तिच्या अशा अनेक समजुती आजही तितक्याच घट्ट आहेत. विज्ञानाची स्पष्टीकरणं किंवा जगण्यातले आटोकाट बदल त्या घट्टपणाला धक्काही लावू शकलेले नाहीत. तर काळ्या मुंग्या. जरा फुकलं तरी त्या निघून जातात असं ती म्हणते. वर त्या चावत वगैरे नसल्यामुळं भिडस्तही वाटत असाव्यात; एकूणात तिला काळ्या मुंग्यांबद्दल आस्था आहे. आपल्या आस्था म्हणजे आपली सोय असते की काय? आतली आणि बाहेरची सोय वाढली, की आस्थाही खोल होत जातात. स्वतःच्या जागेतून हाकललं गेल्यावरही मुंग्यांनी चिवटपणे त्या जागेवर उभं असलेलं घर ताब्यात ठेवलंय. मूळ वस्तीतून हद्दपार व्हावं लागूनही पुन्हा चिकाटीनं तिथल्याच नव्या व्यवस्थेत नव्या तडजोडीनिशी त्यांनी पुनर्स्थलांतर केलंय. स्थलांतरातून तडजोड वगळताच येत नाही. अंघोळीला बसल्यावर अचानक दिसतं, की बाथरूममधून छोट्या छोट्या गोगलगायी प्रकटतायत. रात्री घराजवळच्या जुन्या डबक्यातून बेडकांचे समूहगान रंगू लागलंय. शेतातल्या नव्या सुगीतल्या ताज्या पिकाबरोबर आलेले नाना तऱ्हेचे कीटक घरभर फिरतायत. घराच्या नव्या पर्यावरणात ते बावचळून गेलेत. तगून राहण्याच्या शक्य त्या वाटांचा निकरानं शोध सुरूय त्यांचा. आटोकाट धावपळ चालूय. मागं फिरण्याचे मार्ग मात्र बंद झालेत. यातल्याच त्यातल्या त्यात सोयीच्या वाटा निवडाव्या लागणार आहेत. जगायचं असेल तर या पर्यावरणाशी त्यांना जुळवून घ्यावंच लागेल. मुंग्यांसारखं. कुत्र्या-मांजरांनीही या जगाशी चांगलं जुळवून घेतलंय. त्यातही मांजरं त्यांच्या खास बेरकी स्वभावामुळं अँटिट्यूड राखून आहेत. व्याघ्रकुळी चालीतली त्यांची बेदरकार चाल, आपला किंचितही डौल हरवलेली नाहीये. हवं तेव्हा मालकाकडून लाड करवून घेणं, अंग घासणं आणि हवं ते पदरात पडल्यावर खुशाल एकांतात जाऊन मस्त अंग चाटत जगाला फाट्यावर मारणं, मांजरांना साधलंय. कुत्र्यांना ते नाही जमत. चेहऱ्यावरचा भोळेपणा आणि डोळ्यातली खोल जन्मजात व्याकुळता आड येते त्यांच्या. माणसाच्या बिलंदरपणाला त्याच्याच भाषेत उत्तर देणं त्यांना अद्यापही फारसं शक्य झालेलं नाही. त्यांच्या डोळ्यातली ती आदिम अपार आर्तता माणसांनी रचलेल्या या धूर्त धगीत किंचितही वितळलेली नाही. जराही ढळलेली नाही. माणसांच्या हातातला दृश्य-अदृश्य दगड मात्र त्यांना कळलाय. आपल्या हाताच्या एखाद्या चुकार हालचालीनंसुद्धा तो दिसू शकतो; दचकून कधीही पळ काढू शकतात ते. कुत्रा इतिहासातला आपला पहिला मित्र. आदिम सहजीवनाच्या प्रवासातला पहिला सोबती. एवढा काळ बरोबर चालूनही त्याला माणसाच्या वाटा आणि रस्ते मात्र अजूनही कळलेले नाहीत. रस्त्याच्या मधोमध बिनधास्त निवांत बसलेली कुत्री दिसली, की कळतं रस्ता नावाची व्यवस्था त्यांना कळतच नाही. त्यांच्या दृष्टीनं तो रस्ता नसतोच. सगळ्यांनी सारख्याच हक्कानं वावरायची जागाच वाटते ती त्यांना. आपल्याला हे नाही कळू शकत. असलं काही समजून घेण्याची इच्छा आपण गमावत चाललोय. आपण त्यांची अक्कल काढत शिव्या घालत राहतो. दगड मारत राहतो. त्यांच्या भांबावल्या डोळ्यांना कधीच नाही कळू शकत आपल्या या वैतागाचं आणि हातातल्या उगारलेल्या दगडामागचं कारण. ती पुनःपुन्हा रस्त्यावर येतच राहतात. माणसांच्या वाहनांखाली चिरडली जातात. सग्यासोयऱ्यांचे इतके जीव जाऊनही त्यांना आपली चूकच कळलेली नाहीये. त्यांची चूक एकच – स्वतःच्या पायांच्या ताकदीवर चोखाळता येतील अशा वाटाच फक्त कळल्या त्यांना; चाकांच्या निर्मम गतीचे शाप भोगणारे आणि अजस्र यंत्रांच्या धुडांखाली चिणलेले महामार्ग त्यांना कळू शकलेले नाहीत. माणसानं रस्ते घडवले आपल्या स्वप्नांच्या दळणवळणासाठी.. आणि स्वतःच्या स्वप्नाआड येणाऱ्या प्रत्येकावर बुलडोझर चालवण्याचे परवानेही मिळवले. अगणित झाडांच्या आणि किड्या-पाखरांच्या कत्तलींवर एक भुलवणारं पांघरूण म्हणजे माणसांच्या जगातले हे रस्ते. या रस्त्यांच्या आखीवरेखीव स्वप्नील देखणेपणासाठी लचके तुटलेल्या अनेक डोंगरा-टेकड्यांनी आपलं स्वत्व दिलंय. हे महामार्ग गावांना शहराकडं हाकारण्यासाठी चकाकत्या सुसज्जतेनं नटवून काढलेत. गतीच्या नशील्या मोहानं मढवलेत. लचके तुटलेल्या डोंगरांच्या कडेवर निसर्गरम्य गृहप्रकल्प साकारतायत. त्या प्रकल्पांचे होर्डिंग्जस पुन्हा याच रस्त्यांच्या कडेला ताठ मानेनं उभे ठाकलेत. ‘घ्या रे घ्या बंगले घ्या, निसर्गाच्या कुशीत जुमले घ्या.’ विकासानं निपचित पडलेल्या रस्त्यांवर आता बोलभांड होर्डिंग्जसची निरंकुश सत्ता आहे. या रस्त्यांवरून भरधाव निघालात तुम्ही, तर तुमची ‘लाइफ बनून’ जाईल. अवघी दुनियाच मुठ्ठीत येईल. शहरापासून फक्त पंधरा किलोमीटर लांब एकेकाळी कुसळं उगवणाऱ्या निसर्गरम्य मुरमाड ठिकाणी तुम्ही निदान वनबीएचके तरी नक्कीच घेऊ शकाल. भविष्यात हप्त्यानं का होईना i10 घ्याल. गाववेशीच्या डोळ्यांवर शहराची स्वप्नं टांगलीयेत.. आणि श्वास घुसमटून शहरं गावाकडं येण्यासाठी धडपडतायत. अर्ध्या-ओझरत्या पान्ह्याला सोडून कासरा ओढून धरलेल्या वासरासारखी अवस्थाय त्याची. या धडकी भरवणाऱ्या मोहात गावंच्यागावं बुडून गेलीयेत. माना वर काढायलाही त्यांना वेळ नाहीये सध्या.

गाव कधी सुटत गेलं आपल्यापासून? एका दिवसाची गोष्ट नाहीचंय ती. लहानपणापासूनच गाव टोचत राहिलं आपल्याला. आता यात गावाचा दोष अर्थातच नव्हता. असलाच तर आपल्यातच असला पाहिजे. गाव त्याच्या-त्याच्या चालीनं चालत होतं. आपल्याला त्यात पाऊल मिसळता नाही आलं. पुस्तकांचा नाद लागल्यावर तर गाव हळूहळू परकं-परकं होत गेलं. एकीकडं गावचा समृद्ध भवताल आपल्या घडणीचा अविभाज्य भाग होता. पण दुसरीकडं गावचं आतून कोसळत जाणं जाणवत होतं. तळ्याकाठच्या महादेव मंदिरासमोरचे पोरांचे खेळ ओस पडून काळ लोटलाय. वडाचं झाड हल्ली एकटंच उभं असतं खुळ्यासारखं. त्याच्या पारंब्यांच्या टोकाची कोवळीक राठ झालीय आताशा. झोके घेऊ शकणारी पोरं फ्रिफायरमध्ये बिझी असल्यामुळं पारंब्या एकट्याच झोके घेत राहतात वाऱ्याबरोबर. दूध घालायला जाताना प्रत्येक दारातून टीव्हीवर सेकंदा-सेकंदाला हलणाऱ्या फ्रेम्स दणाणून टाकणाऱ्या बॅकग्राउंडसह दिसत राहतात. तो दणदणाट हलवून टाकतोय आपल्याला आतून. एकाएकी लक्षात आलं, की गावातले काल-परवापर्यंत दिसणारे वाडे एकेक करून अदृश्य होतायत. किती वाडे होते या गावात! पोलिस पाटलाचा, जावलकरांचा वाडा, अंतू बुवाचा वाडा, जोती पाटलाचा वाडा, दौलू सरकारचा वाडा, घाटी पाटलांचा वाडा, चिकुर्डेकरांचा वाडा, बळी पाटलांचा वाडा. आणखी बरेच. सगळी नावंही एका दमात सांगता यायची नाहीत. बापरे! वाड्यांची सत्ताच होती या गावावर! एकत्र कुटुंबपद्धतीच्या थोर परंपरेचे भलेथोरले  वैभवशाली पाईक. त्यांच्यात रांगडा दिमाख होता आणि परंपरेच्या इमानातून अंगी मुरलेली जरबही. पण काळाच्या निर्मम टाचेखाली त्यांचे फक्त शेवटचे काही अवशेष उरलेत. त्या काळाच्या चाकावर आकार धारण गेलेली एकेक माणसं हळूहळू दिसेनाशी होत गेली. या माणसांची वीणच मोठी विलक्षण होती. गावातले नुसते वाडे कोसळत गेले असं नाही, तर त्याबरोबर एकमेकांशी निर्व्याज आणि रांगडा संवाद साधू पाहणारं जगण्याचं निमित्त हरवलं. कोसळणाऱ्या वाड्यांबरोबर तोंडभरून बोलणारी मायाळू म्हातारी माणसं गुडूप होतायत अज्ञात वाटेवर. गालावरून, केसांवरून फिरणारे त्यांचे मायाळू हात, आप्रुबाईनं आपल्या भेटीचा खराखुरा आनंद सांगणारे डोळे आता कधीच दिसू नाही शकणार या जाणिवेनं काहीतरी तुटत जातं आत-आत. वाड्यांचा दिमाख गेला आणि धाकही. वाड्यांनी हाती ठेवलेली सोबतीची आश्वस्त ऊब गेली, तसे अगणित बायकांचे कोंडवाडेही फुटले; ज्यांच्या चुलीत त्या आयुष्यभर स्वतःच्या बाईपणाची राख चिवडत राहिल्या. कोसळलेल्या वाड्यांच्या त्या दगडी भिंती वाळक्या गवतानं माखल्यात. त्या पडक्या भिंती आणि कमानी तेवढ्या का कुणास ठाऊक जपून ठेवल्यात गावानं. आठवणींच्या आधारानं काळाच्या निर्घृण आघाताला पुसण्याचा क्षीण प्रयत्न. बोअरवेल्स खुपसून आता गावांनी आपल्या अंगातलं पाणी उपसण्याचा वसा जिवापाड निष्ठेनं जपलाय. आभाळातून पडणारं पाणी धरून ठेवणारी माती पेविंग ब्लॉकच्या विटांखाली चिणून टाकलीय. ‘पाणी हुडका, पाणी उपसा, पाणी ओता, पाणी उधळा’ हा नव्या गावचा मंत्र बनलाय. पाण्याची ओंजळ मातीच्या ओठांपर्यंत जाण्याची दारं एकेक करत बंद होत गेली. भूमीच्या पदरात पाण्याची ओटी भरणं कधीच बंद झालंय. तिच्या उदरात पाणी साठणार कुठून? वरून चकचकीत कपडे घातलेल्या पण डिहायड्रेशन झालेल्या माणसासारखं मग मला गाव भासू लागतं. वाडे फुटले, घरं वाढली. प्रत्येकाला स्वतंत्र घर. घराघरांचे रूप आगळे. प्रत्येकाचे स्क्वेअरफूट वेगळे. घराचं गोकुळ, डोकी वाढवा; डोक्यांसाठी इन्कम वाढवा. खतांचे डोस हाणून ऊसाचं अँव्हरेज वाढवण्याची धडकी भरवणारी शर्यत गावानं आरंभलीये. इरिगेशननं आणलं पाणी, अँव्हरेज वाढलं सोन्यावाणी. जागा मिळेल तिथं ऊस लावा. बांध टोकरा जोमानं, खते ईस्कटा नेमानं. जय आधुनिक शेती. उसाचं अँव्हरेज जिंदाबाद. तेज्या ऊसाला एकोणचाळीस कांडी. माझ्या ऊसाला शेहेचाळीस कांडी. पंप खाली ठेवायचाच न्हाई. ‘तंतरली जरी कांडी ऊसाची,कुणी पंपतो इथे अँव्हरेज.’ पन्नास कांडी अब दूर नही. ‘थांबायचं न्हाय गड्या घाबरायचं न्हाय. खांद्यावरचा पंप खाली ठेवायचा न्हाय. दे धक्का.’

विहिरीवर रसायनांच्या रिकाम्या बाटल्यांचा तवंग तरंगताना दिसतोय. शेती-माती-नातीगोती. चला साकारूया एक नवी संस्कृती. उपसण्याची. ओरबाडण्याची. खुडण्याची. अँवरेजची. हाव ताब्यात न्हाय राहिली तर पन्नास एकर वावरबी कमीच पडल राजेहो. तहान ताब्यात न्हाई राहिली तर तहानेसाठी भरलेली प्रत्येक ओंजळ केमिकल होईल लेको. गावाला थोर आणि शहराला घोर मानण्याची आपली परंपराय. पण आपल्याला गावातलीबी बिळकं दिसत राहतातच.

गाव तुम्हाला एकटं जगू देत नाही. एकटं जगणं गावात माणूसघाणं मानलं जातं. गावाशी, म्हणजे खरं तर गावातल्या माणसांशी आपलं फारसं जमलंच नाही. ती वाईट आहेत असा याचा अर्थ नाही. किंबहुना ती सगळीकडं असतात तशीच आहेत. ती त्यांच्याजागी उभी आहेत. त्यांना हव्या त्या दिशेला तोंड करून. आपलीच वाट त्यांच्या पाठीमागच्या दिशेनं जाणारीय. त्यातूनच हळूहळू गावापासून आपण तुटत चाललो आहोत ही जाणीव होऊ लागली. पुस्तकांचा नाद लागल्यावर ती अधिकच घट्ट झाली. आठवीत गावातल्या वाचनालयात जाऊ लागलो. पुस्तकांचा नाद आधीपासूनच होता. एकटेपणामुळं तो जणू रक्तातच उतरला. त्याची कारणं बरीच सांगता येतील. एकतर शाळेतल्या बऱ्या मार्कांनी आपल्याला हुशार घोषित करून टाकलेलं. त्यात घरच्यांनी घरी-दारी पै-पाव्हन्यांच्यात ‘पोरगं अभ्यासू हाय’, ‘आपण बरं आपला अभ्यास बरा’ असं असतंय त्येजं’ असा बराच प्रचार करून ठेवलेला. मग निमूटपणे त्या भूमिकेला जागणं आलंच. अभ्यासात मुंडकं बोअर झालं, तर कथा कादंबऱ्यांच्या पुस्तकात घालू लागलो. दुसरं म्हणजे खेळात वगैरे आपल्याला फारसं कोणी घेतच नसे. त्यात मी सगळ्यात लहान. अर्धा लिंबू. मिळाली संधी, की सहज घ्यायचे पिळून सगळे. सारे बहीण-भाऊ माझ्याहून किमान पाच-सात वर्षांनी मोठे. सर्वार्थानं दादा आणि दीदी मंडळी. खेळताना वगैरे धूर्तपणे एकटं पाडायचे. डाव धरून तंगवायचे. असला बेरकी धूर्तपणा, आपल्याकडं फोफावलेल्या मोकाट राजकारणाचं बायप्रॉडक्ट म्हणून आमच्या पिढीच्या डीएनएमध्ये जाऊन बसलाय. त्या कोवळ्या वयात त्या धूर्तपणाची धडकी भरवणारी भीती बसली. त्याच्या आठवणी शरीर अद्याप विसरलेलं नाहीये. भीतीची एकेक तिरीप विजेसारखी चमकून जाते एकाएकी. कधी कधी वाटतं त्या नीलकंठासारखी वेटोळे घालून आहे ती आपल्या गळ्याभोवती. जिथं तिथं फणा काढून समोर येणारी. एकटं पडायची सुरुवात आणि सवय तिथूनच अंगात भिनत गेली. एकमेकांच्या कानात कुजबुजून खिदळणारे ते चेहरे आठवले की, ते एकटेपण एखाद्या इंजेक्शनसारखं अंगात भिनायचं. खेळात हमखास स्वतःचा डाव आणून तंगवायचे. नंतर नंतर तर त्यांनी आपल्याला खेळात घेणंच बंद केलं. काही गुपितं, खाजगी गोष्टी, गमती-जमती सांगायच्या असतील तर लांब-लांब चोरून बोलायचे. पोरवयात असं एकटं पडणं सगळ्यात क्रूर असतं. त्या न्यूनगंडाचे व्रण मग आयुष्यभर वागवावे लागतात. त्याच्या झिणझिण्या सतत मेंदूत घुमत राहतात आतल्याआत. गावाबद्दलचं नकोसेपण तिथंच कुठंतरी रुजत गेलं. गावाबद्दल आपलेपणा वाटत असला, तरी अशा लोकांमध्ये राहण्याची इच्छाच विझत गेली. यांच्यापासून शक्य तेवढं दूर-शहरात जाऊन राहायचं मनात बसलं.

शहरात पहिल्यांदा आलो कोवळ्या तारुण्यात. ‘नयी-नयी आंखे हो तो हर मंजर अच्छा लगता है’ असल्या छापाच्या स्वप्नाळू डोळ्यांना शहराचं पहिलंवहिलं रूप आपलंसं वाटू लागलं. विद्यापीठातल्या निर्जन हिरव्या रस्त्यांवर अनुभवलेला उनाड पाऊस, अनवट पायवाटांनी नव्यानव्या ठिकाणी हिंडणं, भरपूर वाचणं आणि त्यावर तासंतास गप्पा मारणं यानं आयुष्याला पहिल्यांदाच काहीतरी जिवंतपणा आल्यासारखा वाटला. इथं येण्याचे रस्ते मात्र तितकेसे रम्य नव्हतेच. पहिल्यांदा आलो, तेव्हा आपल्या साध्याशा बॅगची चेनही तुटकीच होती. आईने सेफ्टी पिन लावून बॅगमधून डोकावणारे कपडे लपवलेले आठवतायत. दोन रुपयांचा हाफ चहाही दोनदाच कसाबसा प्यावा, अशी खिशाची स्थिती होती. एक उदार चहावाला ओळखीचा झाल्यावर का कुणास ठाऊक आपल्याला रुपयात हाफ चहा देऊ लागला. त्यामुळं त्याच्या चहाचा दर्जा खालावल्यावरही त्याच्याकडंच चहा पिणं नाईलाजानं कंपल्सरी झालं. सहाशे-सातशे जेवणाचे मेसचे व्हायचे. राहण्याची वडिलांच्या ओळखीनं एका युनियनच्या कार्यालयात फुकट सोय झालेली. काटकसर करून महिना हजारभर रुपयेचा खर्चही परवडेनासा झाल्यावर काही दिवस गावाहून अपडाऊन करणं ठरलं. रोज सकाळी एसटीनं दहाच्या सुमारास शहरात आणि सायंकाळी सहा-सातला गावात असं सुरू झालं. शहरात सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. म्हणजे व्याख्यानमाला, फिल्म फेस्टिव्हल्स, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, शास्त्रीय संगीताच्या मैफिली, गाण्यांचे कार्यक्रम, काव्यवाचनं, सभा-संमेलनं हे बऱ्याचदा सायंकाळी असायचं. भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरू होणारे कार्यक्रम सुरू होता होता आपल्या शेवटच्या एसटीची वेळ होत आलेली असायची. सांस्कृतिक भूक पोटाच्या भुकेपुढं पराभूत व्हायची. नाईलाजानं उठून जाताना आपण या शहरात रहायला असतो तर किती बरं झालं असतं, असं वाटायचं. मोठे-मोठे वक्ते, कवी-लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार कलावंत इथं पाहायला मिळायचे. गावात एवढे मोठे लोक येण्याची काही शक्यताच नव्हती. त्यात असल्या प्रकारातली सांस्कृतिक भूक गावाला नव्हती. सायंकाळी शेवटच्या एसटीनं शहरातला चुकलेला कार्यक्रम मनात घोळवत गावात आलं, की प्राइम टाइम मराठी सिरीयल्सचं बॅकग्राऊंड म्युझिक आपली चरफड सिनेमॅटिक करायचं. गावची बरीचशी सांस्कृतिक भूक जत्रेच्या ऑर्केस्ट्रा आणि रेकॉर्ड डान्स स्पर्धेवरच भागायची. क्रिकेटमधलं झ्याट काही नॉलेज नसतानाही उगीचच आपली तज्ज्ञ तोंडं मोकाट सोडीत अनेक डोकी मॅचमध्ये घुसलेली असायची. झालंच तर रियालिटी शो आणि सणवार तर आहेतच. सणसमारंभ आणि कौटुंबिक सोहळ्यांमध्ये जवळपास पन्नास टक्के ऊर्जा संपते गावाची. उरलेल्या पन्नासात शारीरिक कष्ट आणि शेताबांधावरची भांडणं, एकमेकांची उणीदुणी आणि भाऊबंदक्या भागतात. या सगळ्यात सांस्कृतिक भुकेच्या विचाराला जागाच उरत नाही. त्यात गावाचा दोष काय म्हणा ! म्हणून पुन्हा शहरात राहायला येणं आलंच. पण हळूहळू शहराचाही चेहरा वेगानं बदलत गेला. ज्या बस स्टॉपवर दोन-चार वर्षांपूर्वी छान कौलारू टुमदार घरं दिसायची. तिथं अचानक पाच-सहा मजली कमर्शियल कॉम्प्लेक्स उगवू लागले. चौकाचौकांचे नकाशे बदलत गेले. बाहेरून सुस्त पण आतून वेगानं जमिनी गिळत पसरत जाणारं शहर एखाद्या अजगरासारखं भासू लागलंय. त्यात आपणही गिळंकृत होत चाललोय हे कळलंच नाही. गावातल्या माणसांच्या डोळ्यांत शहरात फ्लॅट घ्यायची स्वप्नं फुलतायत, त्यांना चारचाकी गाड्या फिरवायच्यायत, सरकत्या जिन्यांची – आयुष्य सार्थक वाटायला लावणारी मौज घेत मॉल्समध्ये खरेदी करून पिझ्झा-बर्गर ट्राय करायचाय. आपल्या बालपणातल्या पैशा-आण्यांनी भरलेल्या मुठी आठवत मल्टिप्लेक्समधले दीडशे-दोनशेच्या पॉपकॉर्नचे धक्के पचवायचेत. मसाला पिक्चर रिचवत आतून-बाहेरून स्वतःला ‘मॉडर्न’ करायचंय आणि शहरातल्या माणसाला घोंगड्यावर बसून चुलीवरची मटण भाकरी खायचीय. शेतातल्या मातीत अनवाणी पायांनी बागडायचंय. म्हैशी-बैलांबरोबर फोटो काढून घ्यायचेयत. एखाद्या डोंगरातल्या शेतात फार्महाऊस बांधून झोपाळ्यावर झुलत रानातली हवा खायचीय. एकूणात काय कुणीच आणि कुठल्याच ठिकाणी समाधानी नाहीय.

गावात गल्लीबोळात हल्ली वर्षाला पाचपन्नास भावी नेते उदयाला येतायत. वाढदिवसाच्या टिकटॉक अभिनयानं नटलेले स्टेटस ओसंडून वाहतायत. मळ्यातली डेरेदार चिंच गेली, वाटेवरची जांभूळ गेली ; जिच्या जांभळाची चव आजही त्या वाटेवरून गेलं तर अमर आहे. जांभूळ कापून तिथं ऊस लावलाय. खा. साखर खा. सगळे मिळून साखर खाऊ. हत्तीवरून साखर वाटू. विश्वाच्या अंतापर्यंत गोडवा अमर ठेवू. पुढच्या पिढ्यांना जांभळाच्या चवीचा टेट्रा पॅक काढू. उसाचा खुळखुळता ताजा पैसा घ्या आणि जांभूळ फ्लेवर मिल्कशेक प्या. आपण शहरात खड्डयांनी विव्हळणाऱ्या रस्त्यावरून धूळ खात गुदमरत फिरत राहिलो. सिग्नलभर भरून उधळणारा धूर फुप्फुसात साठवू लागलो. मुलूखभर आत्ममग्न पहुडलेल्या डोंगरांचे शहरांच्या रस्त्यांखाली गाडलेले अवशेष आठवत राहतात शहराकडं जाताना, शहरातून फिरताना. दिसू लागतात शहराभोवती उंच उंच होत जाणारे शहरानं रचलेले कचऱ्याचे नवे डोंगर. शहरातली बेपत्ता माणसं सापडत नाहीयेत कुठंच. ती या कचऱ्याखाली गुडूप झाली असतील काय? उपयोग आणि उपभोग संपला, की माणसाचाही कचराच होतो तसाही!

आपण आयुष्यभर खपून जमवला त्यात कचराच फार होता हे कळलंच नाही कधी आपल्याला. आपण फक्त भान हरपून ऊर फुटेपर्यंत धावत राहिलो दिशाहीन. यशाच्या रंगीबेरंगी रेडिमेड पोशाखामध्ये स्वतःला कोंबून घेऊन झिंगून नाचण्यालाच आनंद मानत गेलो. ‘रेडी टू ईट’ ‘फ्री होम डिलिव्हरी’ला चटावलो. फासत गेलो तोंडाला वाढदिवशी सेलिब्रेशनची क्रीम अधाशीपणानं. तृप्त झालो डोळ्यांनी फटाक्यांची कारंजी पिऊन. सणांच्या प्लास्टिक श्रद्धा सव्याज वाहू लागलो नदीला. अधूनमधून पुलावरून जाताजाता तिला हात जोडणं मात्र विसरलो नाही. खुले ठेवले नेहमीच पुण्य पदरात पाडून घ्यायचे एकेक चान्सेस.

आता शहरातून गावात आणि गावातून शहरात अशा येरझाऱ्यांचं एक नवंच चक्र सुरू झालंय. शहरात नोकरी करायची आणि अधूनमधून गावी जाऊन यायचं असं चालूय. पण अधेमधे कधी उठून चार आठ दिवसांसाठी गावाकडं जाऊन राहावं लागेल हे हातात नसतं. वरवर सरळसोट भासणारी, पण तितकीच विचित्र येरझार असते ही. कपडे कुठले घ्यायचे आतले, बाहेरचे, अलानेंफलाने आणि किती घ्यायचे इथून डोक्यातल्या जंत्रीची सुरुवात होते. गावाकडं द्यायच्या वस्तू भरून ठेवायच्या, कपडे, टूथब्रश, ATM कार्ड, आईला काहीबाही भरायला वर्तमानपत्राची रद्दी, पिशव्या, कॅरी बॅगा, रिकामे डबे, मोबाइल चार्जर घ्यायला तर अजिबात विसरायचं नाही ! बायकोचे प्रश्न वेगळ्याच लेव्हलवर चाललेत तिकडं. दूध फ्रिजमध्ये, सिंकमधली भांडी धुऊन जिथल्या तिथं. दोन चपात्या, थोडी भाजी आणि भातही राहिलाय शिल्लक. नेऊयात का डब्यातून. हो चालेल. भर तू बसतो मी. आता ती इस्त्री कशाला लागते गावाकडं? कोण बघणाराय तुमच्या कपड्यांकडं? नसती थेरं. आणि ओझं होतं तिचं विनाकारण बॅगेत. गॅस बंद केलाय ना नीट? आठवत नाही. चार मजले चढून पुन्हा चेक करून आता यायलाच हवं. दारं खिडक्या नीट आहेत ना बंद? वारा शिरला भनाणा की दणादण आदळत राहतात. निघताना इस्त्री प्लगमधून काढली ना आपण? की राहिलीय तशीच? छे!छे! पाहायलाच हवं जाऊन. अहो, हिरव्या बांगड्या चार राहिल्याच घरी. आईंनी बजावून सांगितलेलं. गावाकडं येताना घालत जा म्हणून. गावाकडच्या बायकांची नजर आणि जीभ फार तिखट त्या बाबतीत. पायाच्या नखापासनं केसाच्या टोकापर्यंत बारीक डोळा ठेवून असतात. काही म्हाताऱ्यांना तर सुनांनी ड्रेस घालणंही सहन होत नाही. साडी मस्ट. त्यासाठी “काय वाटंल त्ये झालं तरी घराण्याची चाल कवा सोडली न्हायी.. का कवा बॉट लागू दिलं न्हायी आमी.” अशा शब्दांत स्वतःची कामगिरी त्या व्यक्त करतात. स्वतःच्या नातींच्या लग्नानंतर जीन्स पॅन्ट घालून फिरण्यावर मात्र त्यांच्या तोंडून चकार शब्द निघत नाही. चतुर म्हाताऱ्या. सत्तर वर्षी खर्ची घालून गाठीशी बांधलेलं हुकमी शहाणपण कामी येतं. गावच्या मातीत आपली शहराळलेली पावलं पडली रे पडली टवकारल्या नजरांनी आपल्या उपरेपणाचा एक सरसरून शहारा येऊन जातो. तो कमी म्हणून आपण बोली भाषेचा आसरा घेतो. गावाच्या रंगात विरघळून जातील असे कपडे चढवतो. गावपणाच्या द्रवात स्वतःला भिजत घालतो. अचानक वाटायला लागतं, की अगदी तासाभरापूर्वी आपण वेगळेच होतो कुणीतरी. आता वेगळेच आहोत. गावात सांभाळावी लागतात नातीगोती. खोटंखोटं हसू ठेवावं लागतं ओठी. पटत नसणाऱ्या नाना गोष्टींना होकार भरावे लागतात. समूहभान व्यक्तिभानाहून सतत वरचढ ठरत राहतं इथं. त्यातूनच मग पुरुषी धारणांची सुटू लागलेली कात घट्ट होत जाईल की काय वाटत राहतं. फुलत चाललेले आत्मभानाचे धुमारे विझून जातील की काय वाटतं. गावातून शहराकडं निघताना पुन्हा मागच्याच भराभरीचं-जंत्रीचं-धांदलीचं थोड्या फार फरकानं आवर्तन घडतं आणि आपण शहराकडं निघतो. बॅगेत ताज्या भाज्या, दूध, लोणची, पापड कुरवड्या, चटण्या यांची भर पडलेली असते. गाडीच्या चाकांना आणि भाजीच्या मुळा-देठांना लागलेल्या मातीतून गाव शहरात सोबत येतं. नंतर अलगद गॅलरीतल्या कुंडीत विसावतं. त्यातल्या भाज्या, फुलांमधून पुन्हा अंकुरतं-फुलतं. एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तरीही गावाकडचं आकडी दूध तापवायला म्हणून बायको गॅस जवळ जाते तेव्हा तिचे हात लायटर शोधू लागतातच. इथल्या ऑटो इग्निशन शेगडीला पुन्हा भिडायला त्यांना थोडा वेळ लागतो. ‘लम्बी दूरी तय करने में वक़्त तो लगता है!’ कधी कधी मग आपल्याला शहरातही गावी असल्याचे भास होत राहतात आणि उलटंही होतं. मेंदू कधीकधी नीट सिग्नल पकडू नाही शकत. नेटवर्क गावचं आहे की शहराचं, की मग रोमिंग आहे की काय इथं वाटतं. शहरात आल्यावर गावच्या रानाशिवारातली मऊसूत हवा मनात तरळत राहते आणि गावात पोचल्यावर शहराचा मुक्त अवकाश हाकारत राहतो. दोन्हीच्या मधल्या वाटांवर आपण त्रिशंकूसारखे ताणले जात राहतो. तपशील बदलले तरी गमावलेपण आणि गवसलेपण अशी रोलरकोस्टर राइड दोन्हीकडं एकाच जातकुळीची असते. पण मग प्रश्न पडतो, की गावातून शहरात आपण ज्यासाठी आलो ते लागलं का हाताला? सांस्कृतिक बकालपणा आता शहरात भिनू लागलाय आणि शहराचा भौतिक बकालपणा गावात. जिकडं जावं तिकडं एक भेसूरपणाच दिसत राहतो. ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया’ छापाची एक आध्यात्मिक वळणाची हतबलता दाटून येते.

आपण हरखून जगायला जावं असं कुठलंच आदर्श ठिकाण अस्तित्वात नसतंच का कधी? किंवा असूही शकेल ते. असावं. शोध घेत राहायला हवा. पण आज याक्षणी तरी हाती नाही लागलेलं.

बूड स्थिर होणं हे खरं सुख की नाना वाटांच्या हाकांमागून फरफटत जात राहणं, याचं उत्तर सापडणंही बाकी आहे. आज इतकंच होतं-जिथं उभं ठाकतो आपण, तिथून फक्त पुढचं नाहीतर मागचंच दिसत राहतं सतत. इतकं धडपडूनही घट्ट असा तळच नाही लाभला पायांना. ते कायमच अंतराळात तरंगत राहिलेत असं वाटतं. 

अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
लागले न हाताला
काही अविनाशी

हे एवढं आकळायला इथवरचे दिवस खर्ची पडले. पुढचं माहीत नाही. सध्या तरी खेळायला गटात न घेणाऱ्या भावंडांसारखं कधी गाव कट्टी देतं. तर कधी फ्लॅटच्या ऑटोलॉक दरवाज्यासारखं शहर अचानक धाडदिशी दार बंद करून घेतं आणि आपल्याला बाहेर फेकून देतं. आपलं रिव्हर्स-मायग्रेशन चिरंतन सुरूच राहतं.

***

श्रीराम सीताराम मोहिते हे कोल्हापुरात राहतात. साहित्य, चित्रपट आणि माध्यम या विषयांचे अभ्यासक असणाऱ्या श्रीराम मोहिते यांनी कविता, ललितगद्य लेखन तसेच विविध दैनिके, वेब पोर्टल्समधून  नाटक, चित्रपट आणि साहित्यविषयक स्तंभलेखन केले आहे. सध्या ते नाइट कॉलेज, कोल्हापूर येथे मराठी विषयाचे तासिका तत्त्वावर अध्यापन करतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *