१.
भीमा तीरावर केवढी ही घाई
एकात एक
मिसळले देह
सा-यांचा मिळून एक सदेह
भुमीसारखा अवजड
धावतोय भरारा परग्रह
पताकात पताका
आभाळाचे केशर
उतरली पताका वर
पिवळीजर्द
गर्भाळ दुपार
एकेका हाती
एकेक आभाळ
आभाळाचा देह
तोलला काठीवर
काठ्याच काठ्या
कनवाळू काठ्या
उभ्याउभ्या
फिरताहेत चहुकडं
एकेक आर्त
बांधलेय काठीशी
डोळ्यात भूमी
पायाखाली भूमी
भूमीआतली भूमी
गहिवरली आतल्या आत
थेट भिडली
उसळली कळसात
हरीनामाच्या जयघोषात
२.
नाही मी मिंधा
कवडीचा तुझा
कुठल्या खुणा दिसतात तुला
मिंधेपणाच्या माझ्या देहावर
तू बाळगतोस मात्र
आजन्म मिंधेपण
देह मासावर
तुझे हे काळेनिळेपण
तू मात्र भरत गेलास
हीनदीनांकडून भक्तीची कोठारं
त्या भक्तीचीही परत सावकारी
चक्रवाढ वाज भक्तांवर
आषाढी कार्तिकीला
भामट्या प्रमाणं
नित्य नियमानं वसुली
मृगाच्या पावसानं तरारलेले
खुडत गेलास मातीवरल ओले अंकूर
आषाढातच का लागावा तुला एवढा सोस
उठावी कळ बेंबीपाशी
आम्हाला सदेह भेटण्याची अंतर्बाह्य
ज्या काळाच्या भरोशावर
भरावं सालाभराचं पोट
तेच तर हे दिवस उठाउठीचे
तू तर आमचा पिढीजात शत्रु
घरभेदी
मतलबी
मानभावी उजळमाथ्यानं गाभा-यात उभा
सोडला पाहिजे गाभारा
आरत्या
महाआरत्या
धूप
दिवे
पंचामृत
कानाभोवती कायम कटकट वटवट
कंटाळ येत नाही कधी?
कळेल बाहेर पडल्यावर तुला
तुझ्या आशिकांचं जगणं-मरणं
नाहीस परतणार कधी गाभा-यात
३.
नदी वाहती राहू अखंड
माझ्या धमण्यातील रक्तासारखी
तुझ्या आदिअंताचा ठाव नाही लागला अजून
अभंग ओव्यांच्या भाऊ गर्दीत हरवलास कायमचा
ज्ञानोबा तुकाबोपासुन ते जान्होरकर उर्फ गाडगेबाबा पर्यंत म्हणतात
तू आहेस
तू नाहीस
आहे नाहीच्या कडयावर कायम उभा तू
आपणच बनवावा आपला विठ्ठल तसा
उभारेउभा विठ्ठल उभा
आभाळीचा गाभा विठू माझा ।
उभा रे उभा विठ्ठल उभा
जगण्याची शोभा विठू माझा ।
जागा रे जागा विठ्ठल जागा
फाकवीतो आभा विठू माझा ।
आपादमस्तक तू आहेस म्हणतात जीवंत
शतकानुशतकांचा सचेतन
एवढे तरतरीत डोळे की
नसावा ठाऊक
दुष्काळ उठला ओला सुका
दुष्काळाचा भोगवटा भोगला तुक्यानं
तावून सुलाखून निघाला बाहेर तुकोबा होऊन
आभाळभिड्या अभंगासह डोंगरमाळ फोडून
तसाच भिडला तुझ्या पायरीला
लागू नये कोतेपणाची वाळवी म्हणून तुला
तसा तर खरेपणानं तोच राहिला उभा
तुझ्या जागेवर कंबरेवरले हात सोडून
आपादमस्तक न्याहाळत तुझ्या वर्तमानाला
लावली मातीवरल्या पावलांना अभंगाची चाल
उरला मागं दुष्काळ तसाच तरीही
भेटला इंद्रायणीत उन्हाचा जाळ
भंडा-याला लागला वणवा
भीमा आणि चंद्रभागा
आभाळाकडे मागताना पाण्याचा जोगवा
दुष्काळाचे कोरडे दावे तू कधी
नाही लावुन घेतलेस गळ्याला
दुष्काळाची कोरडी मिठी
नाही अलिंगली कधी मनभरुन
कुठल्या बियाण्याची करावी पेरणी
आधी मूळ की आधी पान
जसे वाढते मूळ ओलाव्याच्या दिशेनं
तसे तटतटते पान
वाढत्या पानातुन काढता येतो अंदाज
मातीआडल्या सशक्त, नासल्या मुळांचा
मुळाने करावी
मुळांची पेरणी
पानांनी वाजवावी
वा-यावर टाळी
मुळांने गावे
मुळाचे भजन
पानाने नभाला भिडावे अलगद
४.
किती खोल रूतलीत ही माणसं भूमीत
सातबारा आपल्या नावाचा नसताना
भवताल पसरलाय निबीड काळोख
झाड फांद्यातून, मातीच्या कणाकणातून आरपार
चुलीच्या उजेडात भाकरी थापणारी बाई
किती शांतपणे पाहाते भाकरी थापताना
आभाळातल्या नितळ निळाई चंद्राकडे
सकाळी न्हालेल्या केसांच्या बटा
चमकतात हळूवार
चूल उजेडात सरकत्या भिंतीवर
सारवून रेखाटलेली निवळशंखीमाताळ
गेरूनं रंगवलेली चित्रं
गाय, बैल, माकड, झाडंझुडं, झोपडी
संसाराभोवती असेल ते
दूरवर कोल्हेकुई
पारावर रामकृष्ण भगवान की जय
ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर
मधेच चारा चिवडताना येणारा
बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळांचा
किनकिन आवाज
ती सांगते भाकरी थापताना
माणसांच्या वासानं उंदीर जातात पळून आडबाजूला
धान असताना मात्र न बुजाडतातही
कोरत राहातात रात्र रात्र
गाई बैलांच्या खुरांनाही कुरतडतात उंदीर
दिव्याच्या प्रकाशात तवंगासारखे माणसांचे पांढरे केस
एवढ्या अराजकातही ही माणसं किती शांत असतात झोपलेली
किती उसवून काढावं आपण आपल्याला आतल्या आत
५.
पहाटेच्या पहारी, विठू आला माझ्या दारी
रानी जायचा वखत, नाही वळखली स्वारी |
मी तं म्हणे विठोबाला, कोण गावाचा कोण तू
गाव पंढरी जोडाया, नाही बांधलास सेतू |
बिनासेतूचेच आम्ही, येतो आषाढ वारीला
कळीकाळाचा भार, बांधोनिया पासोडीला |
माझ्या पासोडीत काय, नको विचारू रे बापा
पासोडीत बांधलेल्या, साती जन्माच्याच हाका |
हाक बोलते कधीची, नाही हाती तुझा हात
राजा तुझ्याच राज्यात, सुडी पेटली रानात |
किती ओवाळू काकडा, तुझ्या महाआरतीला
माझ्या वखराचा दोर, गळ्याला का आवळला |
राज कोणाचंबी येवो, राज्याचा तू धुरकरी
आमच्या रे जिंदगीची, कशी फुटली बासरी |
तुझ्या दारावरी उभा, कोण राहे शिरजोर
त्याने हातात घेतला, तुझ्या गाभाऱ्याचा दोर |
वृंदावनी कृष्णहरी, तुझी पावन पंढरी
तुझ्या लेकरांची ओस, झाली राया रे पांढरी |
तुझ्या आसोशीचं बेनं, लावू कोणत्या रानात
कधी पडेल उजेड, रानी पांगल्या धुक्यात |
६.
चल आत भिऊ नकोस
आहेच मी तुझ्या पाठीशी
पूर्व पश्चिम
उत्तर दक्षिण
घे ठाव दाही दिशांचा
मार खोल जगबुडी मागे तुझ्या कोणी नाही
खूप लांब लांब कोसो मैल दूर
ढासळती भिंत पाठीशी उभी तुझ्या
विसर तिला आत्ताच
घे आठी दरवाज्यांचा ठाव
बघ डोळ्यात बोट घालून
आले रे आले | महाद्वार आले
देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी
जीव कणभरी | नासू नये
पहिली पायरी
पाहा डोकावून खोल
दिसेल ज्ञानाचा दीप पाजळणारा नामा
गाव कुसात नासलेला चोखोबा थोर
“धाव घाली विठू आता चालू नको मंद
मज मारिती बडवे काहीतरी अपराध
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला
शिव्या देवूनी मारा म्हणती देव का बाटला”
चोखा शेवटी विसावला पायरीशी
वैषम्याचे हलाहल पचवीत
खूप दिवसांनी साने गुरूजी त्याला भेटला
आमरण उपोषण चोख्याबरोबर करताना
समाधीत पाचवला असेल चोखा तेव्हा भरभरून
बाबासाहेबांनी केले जेव्हा समतेचे निरूपण
घेतली हातात समतेची महाआरती
तेव्हा गलबलून गेला असेल चोखा
देवाचे नाव घेत गावगाडा नासवणारे भूमीपुत्र
पेटवत दलित वस्त्या
काढीत दिंड्या
तेव्हाही किती हळहळला असेल चोखा आतल्या आत
महाद्वार
नामदेव दरवाजा
तेहेतीस कोटी देवांचे देवघर
तू असतानाही एवढी गर्दी कशासाठी?
सव्वाशे कोटीत तेहेतीस कोटी
हे गणित तसे बरेच आहे
वाढत्या खाणेसुमारीत भूक, दारिद्र्य, आत्महत्या पचवायला
हवाबाणे हर्डेंच्या ग्लोबल युगात
चला रे चला पुढे चला
गांधीजी की जय बोला
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
नगारखाना
मुखमंडप अर्थात मुक्तीमंडप समानार्थी शब्द शोधा
लावा जोड्या, जोड्या लावा
विठ्ठल = विठोबा = विठाई = विठूराया = माऊली
रूखमिणी = रूक्मिणी = रखुमाई = रूखमाई = रखमा = माऊली
कुठे फुलली जाईजुई
मोगरा फुलला | वेलू गगनावरी गेला
धोतराचा सोगा | चंद्रभागेत सुटला
तीस फुटी दीपमाळेवर लांब हजारो दिवे
किती नासलंय हे जग
कशानेच नाही उजळून येत
विठोबानेच पेरले होते म्हणतात शतकाशतकात
बुद्ध चक्रधर गांधी आंबेडकर लिंकन ज्ञानोबा तुकोबा नाका एका
बंका सेना जना मार्क्स फुले गाडगेबाबा भाऊराव
शतावतार विठोबाचे
तो मात्र राहिला कायम गाभाऱ्यात जगाची सूत्र हालवत
पाळण्याची दोरी हाती घेऊन त्यानं गायली अंगाई
नीज नीज माझ्या बाळा नीज नीज माझ्या बाळा
सभामंडपात कोण ही गर्दी
सारे देह विदेह झालेले सामील या गर्दीत
मालवून स्वतःला नखशिखांत
खांबाला खांब
सोळा खांब
खांबाच्या आत
गरूड खांब
चांदीनं मढवल्या गरूड खांबाला दे अलिंगन
पुत्रप्राप्ती झाल्यावर एका धनिकाने मढवले खांबाला
देण्याघेण्याचा सौदा कुठे नाही चुकत?
लाव पाठ
घे डोळे मिटून
पांडुरंग पांडुरंग ज्ञानोबा माऊली तुकाराम
रंग शिळेवरी हरी हरी
वासुदेव हरी
कुठे आलास तू
काय बोलतोस
काय चालतोस
नाही आठवत काही, विसरले देहभान
देह मनावरले दुष्काळ
दैन्य दारिद्र्याचे ओले वळ
गेले वाहून कायमचे चंद्रभागेच्या पाण्यात
हरीहरीहरी s s s वासुदेव हरी
दिसे सोनपरी अलंकापुरी
सोळा खांबानंतर चौखांब
थांब घे विसावा
विश्वाचा ठेवा समोर उभा
साडेतीन फुटाच्या पाषाणात सामावलंय विश्वाचं आर्त
नको जाऊ जवळ, मारू नको धोंडा
होशील वेडा
जाशील बडबडत चंद्रभागातीरावर
भिकाऱ्यांच्या गर्दीत होशील भिकारी
मूळ अौतकरी जाशील नासून
रूप पाहाता लोचनी, सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवूनिया
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख, आवडीने
ठ्ठोब्बा S S S रूखमाई ठ्ठोब्बा S S S रूखमाई
ठ्ठोब्बा S S S रूखमाई ठ्ठोब्बा S S S रूखमाई
अतिशय सुंदर कविता. वर्तमान भावविश्वात मिथक पध्दतीने जगण्यातील.आविष्कार.