शर्मिला रानडे

‘बाबाचं भूत’ आणि इतर कविता

back

 

आहे

खरंतर सगळं स्तब्धच असतं.
आपण, करिअर्स, रिलेशनशिप्स, होप्स आणि ड्रीम्स.
पण आपण त्याला जोपर्यंत ‘आहे’ चा व्हेंटिलेटर लावलेला असतो
तोपर्यंत ते सगळं श्वास घेत असतं. कसंबसं.
बुडत्याला काडीचा आधार असावा तसं.
सगळे पेशंट्स आहोत आपण; पेशंटली वेटींग फॉर डेथ.
सिस्टम्स आर फेलिंग वन बाय वन
ओढून बघ ट्यूब, कट द ऑक्सिजन.

 

*************************************

 

बिलॉंग

बिलॉंग हा शब्द डिक्शनरीतून उतरून माझ्यापर्यंत पोहोचतच नाही.
तसंच, रिलेट, को-ऑपरेट, असोसिएट.
ज्यांच्यापर्यंत हे शब्द पोहोचतात,
ते ग्लासला ग्लास लावतात
आणि मांडीला मांडी.
बाकीची लोकं घराची दारं-खिडक्या घट्ट बंद करतात.
बाहेरची हवा आत यावी म्हणून उघडी ठेवतात टीव्हीची एक फट
आणि बेल वाजलीच तर ऐकू यावी म्हणून फोनची रिंग.
असं एकटं एकटं होत जातांना शंभर वर्षांनी
दूर गेलेल्या लोकांची फाॅसिल्स होतात
आणि जवळ न येऊ दिलेल्या लोकांचे ..एलियन्स.

 

****************************************

 

अंधाराकडे बघणारी माणसं

सिटीजच्या ग्लिट्झ मधून बाहेर पडत
माणसं अंधाराच्या दिशेने जातात.
ती बसतात टक लावून
हातात हात न घेता
अंधारात.
ती प्रेमं करत पडू शकतात,
पण करत नाहीत
फक्त सरेंडर करतात स्वत:ला
विळख्यात अंधाराच्या.
जेव्हा नि:शब्दतेचा पाऊस कोसळू लागतो धुंवाधार,
तेव्हा ही माणसं आधार घेतात
अंधाराचा
आणि दाखलाही देतात
अंधाराचाच.
सिटीजकडे परततांना मात्र अशा माणसांच्या सावल्या स्लो होतात.
अंधाराकडे बघणारी माणसं अंधारातच ग्लो होतात.

 

*************************

 

आवरा आवर

तुझ्या इतक्या दिवसांच्या सहवासाने; पोटात खड्डा पडलेला बेड,
खिडकी जवळच्या तुझ्या आवडत्या खुर्चीची वाकलेली पाठ,
खाली वाट बघत थकून उभी असलेली तुझी निळी गाडी
आणि दुःखाने आतल्या आत जळत राहिलेला तुझा पाईप.
आज एक वर्षानंतर सगळ्या गोष्टी जिवंत होऊन बोलतायत माझ्याशी.
थोडं मनमोकळं होऊन. थोडं निर्धास्त होऊन.
त्यांना भीती होती तू गेल्यानंतर
होणाऱ्या आवरा आवरीची.
सजीव गेल्यानंतर लागणाऱ्या निर्जीवांच्या विल्हेवाटीची.

 

***************************

 

पॉसिबिलीटीज्

पॉसिबिलीटीज् क्षितिजासारख्या असतात.
अंधुक, अनटचेबल तरीही आश्वस्त.
किंवा समुद्रासारख्या..
वर-खाली होणाऱ्या
पायाशी येतायत असं वाटत असतानाच
मागे सरणाऱ्या.
जेव्हा पॉसिबिलीटीजच जातात
क्षितिजाकडे समुद्राबरोबर वाहून,
तेव्हा मला दिसतो किनाऱ्यावर
कोसळणारा धुंवाधार पाऊस.

 

***************************

 

बाबाचं भूत

लहानपणी तूच सांगायचास गोष्ट, भूतांची.
पांढरे झगे, वाढलेले केस, उल्टे पाय
आणि ट्रॅफिक लाईट्स सारखे
रोखलेले दोन डोळे असतात असं म्हणायचास, भुतांचे.
मी मग घरातल्या प्रत्येक माणसाला
घालून बघायची भुतांचा तो वेष.

आज किर्रर्र रात्री आॅरोव्हीलच्या रस्त्यावर
एकटी चालत असतांना तुझी आठवण आली. खूप.
आणि घालून बघितला तुला परत एकदा भुतांचा तो वेष
भीती नाहीच पण भेटावसं वाटलं तुला
गच्च मिठी मारून सांगावसं वाटलं
की
आपल्या माणसांची भुतं होत नसतात.
पण ती हॉन्ट करत राहतात आपल्याला,
आपण भूत होईपर्यंत.

 

*************************

 

येतात

घराच्या खिडक्यांत कबुतरं
येतात.
दारात कुरियर्स.
दुध येतं
मग, न्युजपेपर्स.
हवा थोडी, उन येतं,
ते ही आपणहून येतं.
बाई येते. बील येतं.
लाॅन्ड्री येते लोंबत लोंबत.
चपला येतात, चपला जातात.
टीव्हीमधून भुतं येतात.
आठवणी; येस्स. आवाज पण.
ताप येतो, तलफ येते
झोप आली तर जाग येते.
विचार येतात सारखेच.
मित्रं आणि पत्रं
रेअरली मात्र.
घरात धुळ, भिंतीवर ओल, कपाटात वाळवी.
नाकात दम, पोटात गोळे पायाला मुंग्या, डोक्याला भुंगे.
उंदीर, पाली, माशा, मुंगळे
सगळी सगळी येतात तरी
घरात कुणीच नाही रहात
एखादीच पाल बेडवरती पडून आढ्याकडे बसते पहात.

 

*******************************

 

माणसं नावाच्या मुंग्या

आपण असे निर्धोकपणे एकटे बसलेले असतो. मजेत.
तेवढ्यात शेजारी माणसांची मोठ्ठी रांग.
एकासारखे एक. एकच ओळ धरून चाललेले. एकामागून एक.
सरळ का माहित नाही पण एकमार्गी. मोनोटोनस.
आेळ सोडून बाजूला जायचं, तर गट्स नाहीत.
मग ओळीत नसलेल्या,
मजेत एकटं बसलेल्या मुंगीवर सामूहिक हल्ला.
आपल्यावर चढून येतात, डसतात.
पण आपण काय करणार?
आपण शेवटी मुंगी.
माणसं आपल्या वरचढ असतात.

 

**************************

 

क्विक कन्फेशन आॅफ माय गाॅड

 

ओ माय गाॅड, म्हणायचा अवकाश
की
येतोसच.
जेव्हा देवळातील भडवे err..आय मीन, बडवे
विकायला ठेवतात तुझी भेट
तुझी पायरी उतरून, तू मला भेटतोस, फुकटात थेट.
टाळ्या देत आपण खेचतो त्यांची.
देवळाच्या पायऱ्यांवर बसून ठेचतो
त्यांची.
आपण करतो बिडी काडी, चहा पाणी
आणि इतरही बरंच काही.
आज आलोय मी पायउतार होऊन,
तू म्हणतोस.
तुझ्याकडे एक कन्फेशन घेऊन.
तुला सांगतो,
सेंटपेक्षा सीनर बरा.
पायऱ्यांवर बसणारा माणूस खरा.
Hey, आपण बाॅक्समधे नाहीओत हं पण.
माझं हे वाक्य इथेच खोड.
या बडव्यांना समजणार नाही
दगडातून मातीत येण्याची ओढ.
चल्, गाॅट्टुगो. कॅच यु लेटर.
भडवे err..आय मीन, बडवे आलेत.
आता शेजारती.
टाइम टु हिट द सॅक, व्हॅाट आय मीन.

 

****************************

 

पावसात पायाखाली आलेली कविता

घरी घेऊन आले. आयतीच मिळाली होती. लेबर पेन्स शिवाय.
आय फील होमलेस हिअर
पावसातली कविता घरात येताच म्हणाली.
टू ड्राय.
गेट अ कप आॅफ इमोशन्सआय मे सर्व्हाइव
इफ यु ट्राय.
खूप शोधलं.
बाहेर धुवांधार पाऊस.
आत सगळं कोरडं.
इमोशनचा कप शोधत
कविता घरभर भटकली.
इतरवेळी जळवे सारखी चिकटते ती,
पावसात पाऱ्यासारखी सटकली.

 

शर्मिला रानडे या पुणेस्थित कवी आहेत. त्या इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषांमध्ये लिखाण करतात.

 

One comment on “‘बाबाचं भूत’ आणि इतर कविता: शर्मिला रानडे

  1. Milind Joshi

    ही प्रत्येक कविता मनाला भिडली, कारण त्या कवितांमधल्या इमोशन्स अगदी ओरिजनल आहेत हे जाणवतं. आज आपण रोजच जी मिक्स भाषा बोलतो, तीच भाषा कुठलाही आव न आणता , अगदी ओघवतेपणानं कवितेत उतरली आहे.या कविता म्हणजे ,मनात उमटून गेलेल्या भावनांचे सुंदर सेल्फीज़ आहेत.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *