एका नटाची नटराजाची प्रार्थना ..
आसपास असू दे भारलेला
नाटकाचं पहिलं वाचन ऐकण्या आधीच
शरीराभोवती माझ्या अनोळखी
सळसळू दे काही खळबळू दे
का कोण कशासाठी कुठवर
अशा अनेक प्रश्नांसोबत वाचनात
कंसानी साऱ्या घेऊ दे कवेत आपोआप
शिरताना रिहर्सलच्या घनदाट अरण्यात
घड्याळाचे काटे अडकूदेत एकमेकात
रिकाम्या खिशातली पोकळी
विसरू दे घराचा चौकोन
राहू दे सारं उभं ठेवण्यापल्याड अरण्यांच्या
धावू दे शोधत मृगजळ तरी
सापडू दे निदान एकतरी ठिकाण रोज नवं
प्रयोगा आधी नेहेमीच
ध्यानस्थ मिळू दे थिएटर
गर्भागारात त्याच्या फिरता येऊ दे अपार
जाणून घेता येऊ दे त्याचा गडद अंधार
तडकलेले नसूदेत आरसे कधीच
आहे तसाच चेहेरा दिसू दे
चिकटू दे दाढी मिशी उगवल्यागत
रिहर्सलचा काळ
तप होऊन पाठीशी उभा राहू दे
पहिल्या घंटे आधीच खूप
एकाग्र होऊ देत केंद्रं सारी
एकांत माझा प्रकाशमान होऊ दे
प्रयोगात
पात्रासकट गात्रं सारीं
पहाटफूल होऊन उमलू देत
स्पर्शाला फुटू दे पालवी
नाकाला सुगंध दिसू दे
जिभेला होउ दे शब्द
अर्थ लाळेत भिजून जाऊ देत
ओलेचिंब होऊदेत पॉजेस सारे
राहू देत ओमकार वाणीत आणि
पाणी होऊन हालचाली साऱ्या सहज वाहू देत
शंभराव्या प्रयोगाची मांड
पाहिल्यातच बसू दे
फुटू दे इंद्रधनुष्य तरी नवनवीन
प्रयोगा प्रयोगी
एकतरी क्षण जिवंत होऊ दे
असू दे भान सतत जागं
माझं मलाच विंगेतून पहाता येऊ दे
घडता घडता शेवट सहज घडू दे
पडदा नेहेमीच नेमका पडू दे
दिपऊ नकोस डोळे अंधारातून प्रकाशात
जगण्याच्या गदारोळात सहज मिसळता येंऊं दे
रस्ता आणि पाय दोन्ही मला आवडू दे
शेवटी माझा मला मी
पुन्हा एकदा सापडू दे .
***
पुस्तकं..
मी गेल्यावर
तूला वाटेल कि आपल्या बाबांनी
वाचलीयेत ही सारी पुस्तकं.
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय
येणारही नाही हे ठाऊक होतं मला
मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर ओळख सोडून फक्त.
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर
तुला सांगण्या समजावण्यासाठी कि
मलाही सोडता येणार नाही मागे
काहींच स्थावर जंगम तुझ्यासाठी.
ही काही पुस्तकं आहेत फक्त
जी तुला दाखवतील वाट चालवतील थां
निःस्तब्ध करतील बोलतं करतील
कधी टाकतील संभ्रमात सोडवतील गुं
वाढवतील पायाखालचा चिखल
ज्यात बुडवतील
अडवतील तुडवतील सडवतील
हरवतील कधी सापडतील
तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं
तू समोर आल्यावर नेहमीच
कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्न करतो.
तशीच ही पुस्तकं
उघडतील मधोमध पसरतील हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतील हृदयाचे ठोके.
यांच्यात रहस्यं आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमध्ये कदाचित प्रश्नही
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितीक पल्प फिक्शन कधी क्लासिक
किचकट पण तितकंच सोपं असतं.
या सगळ्यात वाईट काहीच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्या वेळची गरज असते समजत नसतं.
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असती
जी नेतील तुला जायचं आहे तिथं
फक्त
मी असेन तिथे मात्र
तुला पोहोचता येणार नाही कारण.
मी आधीच होऊन गेलेलो असेन
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तकातली
माझी अनावर आठवण आली
की या प्रचंड ढिगाऱ्यातलं
‘ते’ एखादं पुस्तक शोध.
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होऊन जाईल.
***
सायकिक ..
अचानक मध्यरात्री उत्तररात्री
आपोआप जाग येते हल्ली
कुठल्याशा तंद्रीत मी
पुस्तकांच्या कपाटाशी जातो
विनोदी चुटक्यांची
किश्श्याची पुस्तकं शोधतो
त्यातले विनोद वाचून
गालातल्या गालात कधी सांभाळून
कधी मोठ्ठ्याने हसत राहातो
परवा माझ्या हसण्याने सारेच उठले
घाबरून माझ्याकडे पाहात राहिले
सायकिऍट्रिस्टकडे न्यावं म्हटलं
तर दिवसा मी नॉर्मल दिसतो
अधून मधून रात्री अपरात्री उठून बसतो
खदाखदा हसतो
पुन्हा झोपी जातो
सकाळी पुन्हा प्रसन्न
प्रफुल्ल टवटवीत उठतो
हे आता नेहेमीचंच झालंय
बाकी ?
तुम्ही कसे आहात ?
***
Kititari velaa vachalyaa aahet hya kavita..