प्रकरण ८ वे
-:०:-
जलसे
भागवत धर्माचा प्रसार कीर्तनाच्याद्वारे होतो. वेदांताचे व पुराणाचे प्रतिपादन प्रवचनाच्याद्वारे करण्यात येते. त्याप्रमाणे सत्यशोधक तत्वाचा प्रसार मुद्दाम तयार केलेल्या जलशाकरवी करण्यात येतो. पुष्कळशा ब्राम्हणांना तर राहोच, पण ब्राम्हणेतरांनादेखील हा मार्ग शिष्टपणाच वाटत नाही. या जलशांना ते नाके मुरडताना दिसतात. पण ह्या लोकांना खेड्यापाड्यातील वस्तुस्थितीची जाणीव नसते. जलसा स्वत: पाहिलेला नसतो. त्यामुळे व सत्यशोधक समाजाची नालस्ती करणाऱ्याचे म्हणणे ऐकून हे लोक सत्यशोधक समाजाच्या जलशांना नावे ठेवतात.
जलसा म्हटला की या लोकांना चंद्री, पवळी, सोनबापू, पठ्ठे बापूराव यांच्या तमाशांची आठवण होते व त तमाशासारखेच हे तमाशे असावेत असे ते कल्पनेने ठरवतात. तमाशा म्हटला की अचकट-विचकट शृंगार कल्पनांनी खच्चून भरलेल लावण, अश्लील हावभाव याचे संमेलन. कृष्णाच्या नावावर शृंगार चेष्टा करून दाखवावाच. पाटलाची पोरगी एखाद्या तेल्याने अगर कुंभाराने काढून नेल्याचे व मुंबईस नेऊन डंकन रोडवर दुकान घालून दिल्याचे आख्यान असावयाचे. समाजातील सारे घाणेरडे प्रकार, जितक्या चावटपणाने, अश्लील हावभावानी रंगभूमीवर आणता येणे कायद्याच्या दृष्टीने शक्य तितक्या प्रकारे मांडले असतात. काम करणारे नट नटी हीही हलक्या प्रतीची असतात. सभ्यता, शिष्टपणा या गोष्टीशी त्यांनी काडीमोड केलेली असते. नटीचे काम करणारी बाई बहुशा शीलभ्रष्ट तरुणी असते. हलकट माणसानी तिला थापा गप्पा ठोकून धरून काढून आणलेली असते. अशा प्रकारे सर्व बाजूनी विचार केला तर तमाशची दुष्किर्ती झालेली आहे ती वास्तविक आहे.
एकाकाळी तमाशा निंद्य मानला जात नव्हता. सामान्य जनतेला वेदान्त व पुराणे यांची गोडी लावण्याचे काम तमाशाकडे असे. शिवशक्तीच्या वर्णनपर भेदीक लावण्या वाचल्या किंवा ऐकल्या तर त्यामधून पुराणातील अनेक गूढ गोष्टींची चर्चा केलेली आढळून येते. कलगी तुरेवाले आपसाआपसात झगडतात ते पहाणे मोठे गमतीचे असते मात्र ते कळले पाहिजे नाहीतर अरसिकेषु कवित्व निवेदनम् । व्हावाचे.
तमाशांचा दुर्लौकिक झालेला असल्यामुळे शिष्ट मंडळी तमाशाकडे ढुंकून पहावाची नाही. चोरून घरात अगर मळ्यात तमाशा करवितील ती गोष्ट वेगळी. पण थिएटरात पुढल्या खुर्चीवर कोणीही शिष्ट माणूस आढळावयाचा नाही. समाजातला चट सारा वहावलेला वर्ग तेथे जमावाचा, दारु पिऊन धुंद झालेले, नुकतीच कोठली तरी संपत्ती विनायासे मिळाल्यामुळे पागल बनलेले, गाणारणीची चेष्टा करून जमल्यास तिच्याशी लगट करू पहाणारे, व त्यासाठी आरडा-ओरडा दंगा करणारे असेच लोक तमाशाचे हमीचे पुरस्कर्ते आहेत!
तमाशांच्या या पुण्याईमुळे सत्याशोधक जलशांनाही तसेच लेखण्यात येते. पण ही चूक आहे. सामान्य तमाशाप्रमाणे हलगी, ढोलकी, तुणतुणे, हार्मोनिम, टाळ, तबला वगैरे वाद्ये; लावण्या वगैरे सारखे छंद वगैरे वेशभूषा सत्यशोधक जलशानी उचलली आहे, हे खरे. पण ती त्यांनी मुद्दाम उचलली आहे. आज व्याख्यान म्हटले की जेथे 10 लोक जमण्याची मारामार, तेथे हलगीवर थाप मारली की भराभर लोक जमा होतात. पुढे सरण्यास रीघ नाही इतकी बेसुमार गर्दी होते. डफ, डुलची ही महाराष्ट्री जनतेची प्यारी वाद्ये आहेत. हलगीची थाप ऐकली की ते मंत्रमुग्ध होतात. हार्मोनियम, फिडल सारंगी, तंबोरा ही त्यांना नकोत. असा प्रकार असल्यामुळे लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी सत्यशोधक जलशानी तमाशाची सर्व वाद्ये आपल सरंजामात दाखल करून घेतली.
लावणी हाही छंद त्यांना घ्यावावा लागला. आता आता लावणी ग्रामोफोन, सिनेमा वगैरेमधून लोकादराला पात्र झाली आहे. पण १५।२० वर्षांमागे लावणी हा ग्राम्य छंद समजला जात होता. अद्यापही हा समज रूढ आहे. पण सामान्य जनतेला, लावणी हाच छंद ठाऊक आहे. लावणीची कोमलता व सरलता त्यांना मोहून टाकते. लावणीची तान त्यांच्या हृदयाशी भिडते. चाल सरळ, भाषा सुबोध सोपी. शृंगार रस किंवा तशाच प्रकारचे रस या छंदात चटकदारपणे वर्णन करता येतात, वगैरे अनेक गोष्टी लक्षात घेऊन सत्यशोधकानी लावणी हा छंद आत्मसात केला.
सत्यशोधकांना जनरंजनासाठी जलसे करावयाचे नव्हते. त्यांना जलशाचा उपयोग लोकजागृतीसाठी करावयाचा होता. आपली तत्त्वे लोकांपुढे मांडण्यासाठी लोकांना प्यारे असे हे साधन यांनी जवळ केले; जलशाच्या मिषाने लोकांना जवळ बोलवावयाचे, व त्यांना त्यांची स्थिती पटवून द्यावयाची, या हेतूने समाजबंधूनी पोवाडे, लावण्या, पद्ये वगैरे रचली. आख्याने बसवली व अनेक संकटे सोसून, शत्रूपक्षाचा उपाहास, निंदा, छळ सहन करून ती लोकापुढे करून दाखविली!
सत्यशोधक कवीनी लावण्या, पोवाडे, अभंग वगैरे अनेक रचले आहेत. शेतकऱ्यांची सद्य:स्थिती, शेटजी व भटजी यांचा जुलुम सामाजिक विषमता, जातीभेदाचा दुष्परिणाम या विषयावर काव्य निर्माण केले आहे. हल्लीच्या जीवनकलहाच्या टकरीतून निभावून निघावयाचे तर विदयेशिवाय गति नाही, हे जाणून, विद्येची महती गाणारी पद्ये रचली. शेतकरी वर्गाच्या भोळेपणाचा खुळेपणाचा धर्मवेडाचा भटजी वर्ग कसा फायदा घेतात, हेही त्यांनी वर्णिले आहे. ढोंगघत्तुरे, देवदेवस्की ग्रहपीडा वगैरे बाबतीत भोळा बिचारा शेतकरी कसा नागवला जातो, हे त्यांनी कवनातून गोवले आहे.
हे कवी व्युत्पन्न नव्हते. काव्यशास्त्र त्यांनी अभ्यासिलेले नव्हते. त्यांच्या काव्यात अलंकार खच्चून भरलेले नाहीत. भाषेच्या दृष्टीने मयुरपंतासारखी अगर चिपळूणकरासारखी ठाकठिकीची संस्कृतप्रचूर अशी भाषाही त्यांना अवगत नाही. पण त्यांच्या काव्यात ओज आहे; प्रासाद आहे. परिस्थिती स्वत: अनुभवलेली असल्यामुळे अंत:करणास पीळ पडून त्यांच्या कंठातून सहज स्फुर्तीने आलेली असल्यामुळे त्यांची कवने ऐकणा-यांच्या हृदाशी भिडतात, व मनावर ताबडतोब इष्ट परिणाम करतात. भीमराव महामुनी, भाऊराव पाटोळे, तात्याबा पाटील कासेगावकर, शंकरराव पाटील येलूरकर, रामचंद्र घाडगे कालेकर, आबासाहेब साबळे शिवथरकर यांचे जलसे ज्यांनी समक्ष पाहिले व ऐकले असतील त्यांना आमचे म्हणणे खास पटेल. हजारो माणसापुढे विशेषत: ब्राम्हणांच्या आजवरच्या उपदेशाने आजवर गुलामगिरीस मान तुकविन्यास सवकलेल्या लोकापुढे एक जलसा झाला की त्यांच्या चित्तवृत्तीत केवढी क्रांति होते! ब्राम्हणाकडून लग्नविधी पूजा अर्चा करून घ्यावयाची नाही अशा निर्धाराने वागणारे गावचे गाव सापडतात, हा कशाचा परिणाम! केवळ ह्या हृदभेदी हाकांनी समाजभानावर आलेला आहे.
कविसंमेलनातून या कवीना कोणी आमंत्रणही देत नाहीत, मग त्यांचा गौरव करण्याची गोष्टच नको. आमच्या सुशिक्षित लोकांनाही या कवीचे नावही ठाऊक नाही. पण खेड्यापाड्यातील जनतेचे मनावर या कवींच्या आलापांनी आपला पगडा बसविला आहे. त्यांना याची चटक आहे. पांढरपेशा वर्गातील कवींचे बोल त्यांच्या कानावर कधीच पडत नाहीत. पण त्यांनी ऐकले तरी त्याचा उपयोग काय? जेथे शिकलेल्यांनाही सध्याच्या काही काही कवीचे काव्य कळत नाही तेथे अशिक्षिताची काय कथा? तेच सत्यशोधक कवीचे हृदस्पर्शी बोल त्यांना समजाण्यासारख्या सोप्या भाषेत असतात. भाषा सुबोध सोपी; विचार घरचे, पटणारे; विवेचन मार्मिक पण स्पष्ट. या काव्यात जे ओज आहे ते इतरत्र क्वचितच सापडेल.
सत्यशोधक जलशांना इतर जलशांप्रमाणे गणाने सुरुवात होते. गणपतीला नमस्कार करून मग कार्याला सुरुवात करण्याची परंपरा आपल्या हिंदुसंस्कृतीत फार पुरातन कालाची आहे. ही परंपरा इष्ट की अनिष्ट हा येथे प्रश्न नाही परंतु सत्यशोधकांनी या परंपरेला थोडे वळण दिले आहे. भिमराव महामुनींचा एक गण येथे देतो.
नमो अधितुशि भगवंता ।
चरणी ठेवि तुमच्या माथा ॥धृ.॥
दीन दाळा पुरवी लळा ।
दूर करी मम चिंता रे ॥१॥
जगचालका मज बालका ।
धरी हृदी दोही हस्तीरे ॥२॥
माबाप करी कृपा ।
रक्षिल ज्या तू आतारे ॥३॥
महामुनी, लोळे चरणी ।
संकटसमी धाव आतारे ॥४॥
वरील गणावरून एक गोष्ट वाचकांच लक्षात येईल ती ही की यात एकेश्वर वाद दिसून येईल. सत्यशोधक अनेकविध देवता मानित नाहीत. त्यालाच अनुसरून गण गाईला आहे.
सत्यशोधक जलशांची माहिती देणे जरूर असल्यामुळे त्याचा ऊहापोह पुढील प्रकरणात केलेला बरा.
प्रकरण ९ वे
-:०:-
जलशांचे स्वरूप
सत्यशोधक जलशाना गणाने प्रारंभ होतो. त्यानंतर शिवाजी महाराजांसंबंधी पोवाडा म्हणण्यात येतो. इंग्रज प्रभूचे आभार मानण्यात येतात व मग जलशाला प्रारंभ होतो.
ब्राम्हण समाजाचे खोटे स्तोम खेडेगावच्या लोकांच्या मनातून जोपावेतो कमी झालेले नाही तोपावेतो खेडेगावचे अशिक्षित लोक सुधारणेच्या कोणत्याच गोष्टी ऐकण्यास तयार व्हावयाचे नाहीत. त्यांच्या मनावरील पिढ्यान पिढ्यांचे, हजारो वर्षांचे संस्कार घालावावयाचे काम सोपे नव्हे. त्यांच्या मनोभूमीत रुजलेले अज्ञानरूपी तण उपटून दूर भिरकावून दिल्याशिवाय सद्विचाराचे बी त्यात रुजावाचे नाही, हे अनुभवाने सत्यशोधकांना पटलेले आहे. त्यामुळे प्रथम ‘मुले कुठार:।’ असा प्रारंभ करावा लागतो.
खेडेगावात पाहिले, तर शास्त्र सांगणारा ब्राम्हण पंचांग सांगणारा ब्राम्हण, धार्मिक सामाजिक जी काही शंका निघेल तिचे निरसन करणसाठी ब्राम्हण! ब्राम्हण म्हणजे सर्व वर्णांचे गुरू. जग मंत्राच्या स्वाधीन व मंत्र ब्राम्हणांच्या आधीन. ब्राम्हण म्हणजे साक्षात् भूदेव. त्यांचा संतोष असला तरच आपला उत्कर्ष होणार. ब्राम्हणांच्या अर्ध वचनात रहाणे हाच आपला कुलधर्म. त्यांची मर्जी मोडली की शाप देऊन ते आपला कुलक्षय करतील. त्यांचे सामर्थ्य केवढे एवढा विष्णु पण भृगुॠषीच्या लाथा खाऊन स्वस्थ बसला नाही उलट ॠषीच्या पायाला इजा झाली असेल म्हणून चोळीत बसला. ब्राम्हणाला साऱ्या विद्या जन्मत:च अवगत. खुद्द बह्मदेवाच्या तोंडातून तो आलेला. अशी समजूत असल्यामुळे खेडेगावचे लोक स्वत: विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही. तात्याने सांगावे व आमच्या लोकांनी ऐकावे. परशुराम देवाचा अवतार नव्हता अगर तो चिरंजीव नाही असे म्हटले की लोक कबूल करावयाचे नाहीत; कारण त्यांच्या तात्याला ते पसंत नाही. तात्या म्हणेल तो शास्त्रार्थ. इतरांना शास्त्रार्थ समजावयाचा नाही.
प्रार्थनासमाजाची चळवळ चांगल्या चांगल्या विद्वानांनी आज ६० वर्षे चालविली आहे, पण त्यांच्या अनुयायांची संख्या शेकड्यांनी मोजण्याइतकी नाही याचे कारण हेच. खेडेगावच्या ब्राम्हणावर जो गावच्या लोकांचा विश्वास तो इतरांवर नाही. इंग्रजी शिकलेले लोक भमिष्ट झालेले असा ग्रामजोशाने समज करून दिलेला. त्यामुळे त्यांच्या हिताचे काहीही सांगावयास गेलो तरी ते त्यांना पसंत नाही. अशा परिस्थितीत एकच मार्ग शिल्लक रहातो; तो म्हणजे ब्राम्हणांचा मोठेपणा बेगडी आहे; ब्राम्हण आपल्या सारखेच आहेत; आपल्यातीलच आहेत किंबहुना आपण ज्यांना निंद्य म्हणतो त्या वर्गातून हल्लीच्या ब्राम्हणांच्या काही पूर्वजांची भरती झालेली आहे. या व अशा गोष्टी प्रथम पटवून दिल्याशिवाय त्यांच्या मानगुटीवरील ब्राम्हण्याचे स्तोम नष्ट होणार नाही. सत्यशोधक जलशानी हे लक्षात घेऊन ब्राम्हणांच्या ब्राम्हण्यावर प्रथम कोरडा ओढण्यास सुरवात केली. ब्राम्हण्याचा बालेकिल्ला जमीनदोस्त झाला की सामाजिक व धार्मिक गैरसमजाचे राब जाळून टाकण्यास वेळ लागावयाचा नाही.
आम्ही पाहिलेल्या बऱ्याच जलशामधून प्रथम सत्याजीचे कथानक लावलेले पाहिले आहे. जत्रेनिमित्त पाहुण्याच्या गावी सत्याजी व त्याचा मित्र महादू पाटील जातात. घाटावर लोकांची मारे गर्दी असते. वरचा घाट मात्र मोकळा असतो. तिकडे हे दोघे अंघोळीला जातात. महादू पाटील भोळ्या वृत्तीचा. ब्राम्हणांच्या घाटावर जाण्यास त्याचे मन कचरू लागले. हजारो लोकांसाठी १ घाट व ४/२ माणसासाठी एक मोठा प्रशस्त घाट हा धडधडीत अन्याय नव्हे का? ब्राम्हण शाप देऊन भस्म कसे करतात ते तर पाहू असे सांगून सत्याजी त्याची समजूत करतो व ते दोघे घाटावर जाऊन आंघोळ करतात.
इतक्यात गावच्या ग्रामजोश्याची मुलगी यमुना पाणी भरण्यासाठी त्याच घाटावर येते. दोघे मराठे आपल्यासाठी खास राखून ठेवलेल्या घाटावर आंघोळ करतात हे दृश् तिला सहन कसे व्हावे? अरे कारे, म्हणून ती त्यांना टाकून बोलते. सत्याजी प्रथम तिच्याच प्रमाणे अगं कागं करून बोलतो. जशास तसे केल्याशिवाय निर्वाह नसतो. आपण जर नरमाईने बोलू लागलो तर प्रतिपक्षाचा जोर यत्किंचितही कमी होत नाही. उलट त्याला चेव येतो. सत्याजीच्या उत्तरानी यमुना नरमते व मग सत्याजी तिला तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरे. तुमचा मोठेपणा पोकळ आहे. तुमच्या तात्यालाच बोलावं म्हणजे ब्राम्हण् हे जन्मावर नाही, ब्राम्हण ही जात नव्हे हे मी त्यांना पटवून देतो असे सांगितले. यमुनेला वेळ झाला म्हणून तिला पाहण्यासाठी तात्या येतात. त्यांचा व सत्याजीचा ब्राम्हण्यावर वाद होतो. प्रथम ‘शिंच्या’ ‘रांडेच्या’ वगैरे नेहमीच्या शिव्या हासडून यमुनेसमोर आपली फजिती होऊ नये म्हणून सत्याजीबरोबर बुध्दिवाद करू लागतात परंतु थोड्या फार प्रश्नोत्तरानंतर तात्यांची लटपट उडते. शास्त्राधार बेताचाच असल्यामुळे ब्राम्हण्याचा बेगडी डोलारा कोसळू लागतो. वशिष्ट व्यास वगैरे अनेक ॠषी कोणत्या स्थितीत जन्मास आले ते वादात ओघाओघाने येत असते. या वादाचा परिणाम श्रोत्यांवर होतो व ब्राम्ह्ण्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही; स्वत:च्या मोठेपणासाठी ब्राम्हण वाटेल तो शास्त्रार्थ सांगून देण्यास कचरत नाहीत, हे श्रोत्यांना पटते.
धर्माच्या बाबतीत व सामाजिक आचारविचारात ब्राम्हण निष्ठूर असतो; त्याच्या हृदयाला देशाची अगर धर्मबंधूची दु:स्थिती कळत नाही. त्याचे वर्तन आपल्या घरातही अरेरावीचे असते. अशा प्रकारच्या माणसाबद्दल आशेचा किरण मागासलेल्या वर्गात असला तर तो फोल होय. हे दाखविण्यासाठी रोजच्या व्यवहारातील एक दृश्य दाखविण्यात येते.
गावच्या कुळकर्ण्याच्या मुलीचे लग्न निघते. सर्व गाव लग्नासाठी झटत असतो लग्न थाटात होते. भिमराव महामुनी यांनी या प्रसंगाचे छान वर्णन केले आहे.
थाळे तांबे मुले लेकरे आले घेऊन ।
पडक्या घरात जागा केली बसा जाऊन ।
कात्रीव पोळ्यानी मान उडविली तोंडे पाहून ।
गुळवण्याने कमाल केली खाती चुरून ।
केशरी भात थोडाथोडा वाढा ताटान ।
वडे भाज्या नाही उरल्या घ्या चालवून ।
शोधीव तुपाची धार वरती पाहून पाहून ।
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .
घ्या गोड करून । ब्रह्मप्रसाद म्हणून ।
केली मदत आपण । गेली तारांबळ होऊन . . . वि.प्र. ५२
प्रथम ब्राम्हणाच्या पंक्ति जेवून उठावयाच्या. ब्राम्हणांना जेवताना बेसुमार आग्रह व्हावयाचा. पानावरून लाडू, पोळ्या, भात, भाज्या असे पुष्कळ खरकटे उरावयाचे. हे मुद्दामच पानावरून ठेवण्यात येते. कारण याचा पुढे लगेच उपयोग करण्यात येतो. या खरकट्यापैकी बरे दिेसे खरकटे मराठे मंडळीच्या वाट्यास येते व अगदी बरबटलेले अस्पृश्याना दिले जाते. आमची मराठी माणसे अगदीच निर्बुद्ध ! त्यांचा ब्राम्हणांवर विश्वास. त्यांना खरा प्रकार काय माहीत. ब्राम्हण हे खरकटें इतरांना मुद्दाम वाढतात. आपल्या घरच्या सूनालेकी वगैरेंना इतर जाती आपल्यापेक्षा हलक्या आहेत; आपले अमंगळ खरकटे ते खुशाल खातात हे त्यांना दाखवून द्यावे व त्यांना हलके लेखण्यास शिकावे हा त्यांचा हेतू असतो. जैन व लिंगायत ब्राम्हणाकडचे खात नाहीत याचे मर्म कदाचित हेच असावे! ब्राम्हणेतर खेडवळ ब्राम्हणाच्या घरी जेवावयास राहिला तर त्याचा पाहुणचार कसा थाटात होतो हेही कधी कधी दाखविण्यात येते.
ब्राम्हणी अंत:करणाचा आणखी एक मासला दाखविण्यात येत असतो. कुलकर्णीबुवांचा जावई मुम्बईस असतो. एकाएकी तो प्लेगास बळी पडून निधन पावल्याची तार येते. बिचाऱ्या यमूवर आकाशाची कुऱ्हाडच कोसळ्यासारखे होते. तिच्या शोकास पार रहात नाही. दु:खाचा पहिला उमाळाहि ओसरला नाही तोच यमूला सोवळी करण्याचा विचार कुलकर्णीबुवांना सुचतो. तात्या हा विचार तिला ताबडतोब बोलून दाखवितात. हे शास्त्र आहे असे ते ठासून सांगतात, पण तिला बिचारीला हे शास्त्र समजत नाही. केस काही नवऱ्याचे नव्हते. हातपाय हे जसे लहानपणापासून मला आहेत तसे केस आहेत. नवऱ्याचा त्यावर हक्क काय? तात्या सांगतात “लग्नाने तू सर्वस्वी नवऱ्याची झालीस. तुझ्या देहाचा मालक नवरा.” हा युक्तिवाद तिला पटत नाही ती म्हणते “नवऱ्याची मी झाले हे खरे पण उपभोगासाठी दोघांनी एकत्र राहून संसार करावा म्हणून. नवऱ्याने माझे हात अगर पाय तोडण्याचा विचार केला असता तर ते कोणी मान्य केले असते का? धर्मेच अर्थेच कामेच अशीच शपथ असते, शिवाय माझा केशकलाप मृतपतीला काय उपयोगाचा?” या कथानकातील यमूच्या तोंडची विचारसरणी फार मार्मिक व करुणाजनक असते. तात्यांची शास्त्रार्थाची सारी लटपट व्यर्थ ठरते व अखेर ते अरेरावीचे धोरण पत्करतात. त्यावेळचे यमूच्या तोंडचे पद फार लोकप्रिय असलेले येथे देतो. भीमराव महामुनीनी ते केलेले आहे.
मी लाडकी, अण्णा तुमची लाडकी ।
मला कशी करिता हो बोडकी ॥धृ.॥
माझ्या स्वरूपाची तऱ्हा । जसा कोंदणी हिरा
करितो हा चमचमकी ॥1॥
मी किती सुकुमार । जसा फुलांचा हार।
वेणिला शोभति फुले फिरकी ॥2॥
तुम्ही सोडा हट्ट । लावा माझा पाट ।
करा बेत तुम्ही हाच की ॥3॥ (विद्याप्रकाश पान ३७)
तरूण विधवांचे केशवपन हा त्यांच्यावर मोठा जुलूम आहे. नवऱ्याचे छत्र तुटले की अबलांना कोणी वाली नाही. प्रत्यक्ष बाप पण तोही निष्ठूर. मुलीच्या हातचे अन्न त्याला चालत नाही का तर तिचे केश अद्याप डोकीवर आहेत. हा तिसरे चौथेपणाचे लग्न करील पण मुलीला वैराग्याचा उपदेश करील ! अशा प्रकारच्या निष्ठूर शास्त्रीपंडितांना बहुजन समाजाची काळजी वाटेल व त्यांना खर गोष्टी ते शिकवितील अशी आशा करणे व्यर्थ आहे. वरील प्रयोग ब्राम्हणभगिनींनी टवाळी करण्यासाठी केला जात नसतो तर जो ब्राम्हण आपल्या घरात खुद्द इतका जुलमी आहे त्याला इतरांची कधीकाळी कीव येईल का? हेच इतरांना पटवून द्यावयाचे. ब्राम्हणाबद्दल इतरांना जो आदर वाटतो तो आदर वास्तविक नाही. ब्राम्हण स्वार्थामुळे आपणास खऱ्या गोष्टी पढवित नाही. हे बहुजन समाजाला पटवून देण्यासाठी हे रोज घडत असलेले सामाजिक अन्यायाचे उदाहरण रंगभूमीवर दाखवावे लागते. याचा परिणाम ब्राम्हणवर्गावर इष्ट होऊ लागला आहे. केशवपन सशास्त्र मानणारे आता कमी झाले आहेत व विधवा केश काढीत तर नाहीच पण कुंकूही लावू लागल्या आहेत. म्हणजे अशिक्षित सत्यशोधकांची विचारसरणी सुशिक्षित लोकांना पटू लागली आहे असे नव्हे का?
सुशिक्षित सत्यशोधकांना नावे ठेवतात. ब्राम्हणांचा व्देष सत्यशोधक पसरवतात असा त्यांचा आरोप असतो. पण आपल्याच समाजातील लेकी बहिणी सूना वगैरे अबलांवर ब्राम्हण शास्त्राभिमानाने जो अनन्वित जुलूम करतात त्याचा प्रतिकार करण्यास त्यांचे बोटही उचलत नाही. अशाप्रकारचे लोक बहुजन समाजाच्या मानगुटीवर बसलेले ब्राम्हण्याचे भूत गाढण्यासाठी कसे बरे पुढे येतील? ब्राम्हण मग ते सुशिक्षित असोत, भक्तिमार्गी असोत किंवा कसेही असोत, जोपर्यंत सामाजिक अन्यायाची चीड त्यांना वाटत नाही, तोपर्यंत बहुजन समाजाच्या उन्नतीचे प्रयत्न त्यांच्याकडून होण्याची आशा नको. बहुजन समाज तर जवळजवळ मेलेला त्याला सौम्य गोंडस शब्दानी सांगून कळत नसते. सत्यशोधकाना जी भाषा वापरावी लागते तीच बहुजन समाजाच्या बाबतीत उपयोगाची असते. ब्राम्हण्याचे स्वरूप ब्रह्मद्वेषाच्या भूतास घाबरून उघडे केले नाही तर त्यांच्या मानेवरचे ब्राम्हण्याचे भूत झुगारून देण्याचे सामर्थ्य त्यांना कधीच येणार नाही.
केशवपनाचा फार्स जलशातून करण्यात येतो त्यामुळे आमच्या विधवांची विडंबना होते असा डांगोरा ब्राम्हण मंडळींकडून पिटण्यात येतो. पण ब्राम्हण समाजातील स्त्रीवर्गाबद्दल अनादर सत्यशोधकाच्या मनात कधीही नाही. साऱ्या स्त्रिया ब्राम्हणांच्या मताने शूद्रच आहेत. म्हणजे ब्राम्हण भगिनी व ब्राम्हणेतर याचा सामाजिक दर्जा एकच आहे. ब्राम्हण-स्त्रिया सुशिक्षित झाल्या म्हणजे ब्राम्हणांना त्या योग्य ते सवाल करतील, करतातही आहेत. ही आपत्ती टाळण्यासाठी स्त्रीशिक्षणाविरुद्ध हाकाटी करण्यात येत असते. म्हणजे स्त्री व बहुजन समाज ह्यांना ब्राम्हणाकडून एकाच प्रकारची जाचणूक व अरेरावी भोगावी लागते ही गोष्ट सत्यशोधक ओळखून आहेत म्हणून त्यांची कुचेष्टा निंदा अगर अपमान करण्याचा त्यांचा हेतू नाही. ब्राम्हण आपल्यावरील आरोप दुसरीकडे ढकलण्याचा हा प्रयत्न करतात. अधिकाऱ्याच्या कानाला लागून सत्यशोधक जलशाना अडथळा करतात. स्वत: विचार करतील तर त्यांनाच आपला वेडेपणा कळून येईल.
सत्यनारायण, वास्तुशांती उर्फ घरभरणी वगैरे निरनिराळ प्रसंगाचे फार्स करून दाखविण्यात येत असतात. भोळ्या भाबड्या लोकांवर ऐती वर्ग कसा चरतो; आर्थिक नुकसान करून शिवाय त्यांना पशुपेक्षा हलके कसे मानण्यात येते हे सत्य सृष्टीतले पण अंगवळणी पडल्यामुळे ध्यानात न येणारे सत्य प्रेक्षकांना दाखविण्यात येते. भीमराव महामुनीच्या विद्याप्रकाशातील घरभरणी हा उतारा येथे देतो :-
घरभरणी
यजमानाने नवे घर केले तयार
त्याची सर्व तऱ्हा सांगतो पहा चमत्कार ॥धृ.॥
भट लोक कावेबाज फार हुशार ।
यजमानाने वास्तुशांतिचा केला विचार ।
गावभटाकडे जाऊन मुहूर्त पहा बरोबर ।
शूभदायक वेळ घटका तीथ आणि वार
अहो तात्या चांगले पहा जोडितो कर ।
(चाल) घेतले पंचांग सत्वर ।
बोटे मोजून थोडी फार ।
मग शोधून अंतर ।
सवड साधून उत्तर ।
श्रावण महिना करार ।
माझे साल अखेर ।
आहे यजमान हुशार ।
देणगी मिळेल भरपूर ।
तुप-पोळीची बहार ।
धोतरजोडा करार ।
भट बोले फार उत्तम श्रावण महिना ।
किती ब्राम्हण किती सुवासिनी किती दक्षिणा ॥१॥
भटजीने दिला मुहूर्त महिना श्रावण ।
तीथ, वार, वेळ घटका सवड पाहून ।
त्या दिवशी गावात कोणाचे नाही आमंत्रण ।
तोच दिवस यजमानाला दिला नेमून ।
अहो यजमान घर स्वच्छ ठेवा सारवून ।
कणीक डाळ सर्व साहित्य नीसून ।
* * * * *
(पुढे तयारी झाल्यावर घरभरणीच्या दिवशी)
चाल शुभदायक मुहूर्तान
घरात बोडकी सुवासिन ।
लाटणे पोळपाट घेऊन ।
घरात शिरली सोवळन ।
मागून आले ब्राम्हण ।
आणा सर्पण जमान ।
आणा साहित्य जलदीन ।
शिवू नका ठेवा दुरून ।
करा होम हवन ।
आता खुशाल आनंदानं ।
दारी बसा यजमान ।
हाती काठी घेऊन
आत ब्राम्हण भोजन
करी एकमेका खूण
घ्या पोळी ऊन-ऊन
ब्राम्हण भोजन झाले आता विडा दक्षणा ।
कामगार दीलगीर चोरटे खुशाल उडविल चैना ॥2॥
* * * * *
घरधन्याने खर्च करून केली घरभरणी ।
तूपपोळची चंगळ उडविली भट ब्राम्हणानी ।
उष्ट्यामाष्ट्या पोळया खाल्या कामगार लोकांनी ।
राहिले तूप चोरून नेले तांब्यातांब्यांनी ।
गुळालाही हात मारला संधी साधुनी ।
* * * * *
तांदळालाही हात मारला डोळा चुकवुनी ।
फार भोळे घरधनी ।
भक्ति बसवली मनी ।
हरामखाऊ लोकानी ।
शास्त्राधार दाखवुनि ।
ठग महाधूर्तानी ।
वास्तुशांती करणी.
वास्तुशांति, केवळ फजिती, काही कळेना ।
खर्च करून निराश झाला आपुल्या मना ॥4॥
+ + + + +
आमचे मित्र रा. रा. भाऊराव पाटोळे यांचा जलसा-शिक्षक, रा. पांडुरंगराव लेवे यांचा जलसा-प्रकाश श्री. मोतीराव तुकाराम वानखडे सप्तथ-प्रदीप व श्री. हरीभाऊ लक्ष्मण चव्हाण यांची पुस्तके जलशाचे स्वरूप समजण्यास फार उपयुक्त आहे. श्री. वानखडे यांनी आपल्या पद्याना आधार दिले आहेत, व ते टीपेत छापले आहेत. श्री. तुकाराम भोसले यांनी पुष्कळ पदे लिहिली आहेत. काही प्रसिद्ध झाली आहेत, पण पुष्कळ अप्रसिद्ध स्थितीत आहे. श्री. भोसले यांच्या काव्यात मार्मिकपणा व ओज हे गुण फार आहेत. त्यांचा सज्जनगडाचा पोवाडा फार प्रसिद्ध आहे.
सारांश “स्वर्ग, मृत्यू अँड ब्रह्मांड वे कंपनीचे किमशन एजंटस् (जे) भट जोशी अँड सन्स्” यांच्या हातून बहुजन-समाजाला सोडविण्यासाठी “सत्य शोधा आणि भट सोडा” हे पटवून देणसाठी सत्यशोधकानी जलशे तयार केले. त्यात त्यांना पदरमोड करावी लागली. कित्येकाना कर्जे झाली, कित्येकांची शेतेभाते गेली. तमासगीर म्हणून इतरांकडून उपहास सोसावा लागला, पण बुडत जाणारे बंधु तारावे, त्याना सन्मार्ग समजावा म्हणून इतकही आपत्तीशी टक्कर दिली. खरे पाहिले तर ते खरेखुरे वीरपुरुष होत. त्यांच्या मनाला पटले ते लोकांना पटवून देण्यासाठीच इतक्या विपत्तीला तोंड दिले. त्यांच्याच प्रयत्नांनी ब्राम्हणेतर समाज सुबुद्ध झाला. त्यांच्याच प्रयत्नामुळे लोकांत जागृतीची ज्योत पेटली. त्यांच्याच प्रयत्नामुळे बौद्धिक, धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मोकळा होण्यासाठी समाज धडपड करू लागला आहे. स्वातंत्र्याची चव समाजाला त्यांच्याच बोधामुळे लागली आहे. म्हणूनच सत्यशोधक जलसेवाल्याचे समाजाला उपकार मानणे जरूर आहे.
जीर्ण अवस्थेत, वाळवी लागलेला हा हीरकमहोत्सवी ग्रंथ रस्त्याकडेला जुन्या पुस्तकांची विक्री करणा-या दुकानात आशुतोष पोतदार यांना सापडला.
या ग्रंथावर प्रकाशनवर्ष दिलेले नाही. परंतु, ग्रंथाच्या प्रास्ताविकात नामदार भास्करराव विठोजीराव जाधव २४/२७ सप्टेंबर, १८७३ मधे सत्यशोधक समाजाची मूळ कल्पना महात्मा जोतीराव फुले यांनी मांडल्याचे सुरुवातीलाच नमुद करुन पुढे लिहितात, “त्यास या वर्षी साठ वर्षे पुरी झाली. कारणाने समाजाच्या डायमंड जुबिलीचे समारंभ यावर्षी ठिकठिकाणी होणार आहेत.” यावरुन, सदरचा ग्रंथ १९३३ मधे प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथाचे मुख्य संपादक माधवराव खंडेराव बागल हे असुन रावसा. दत्तात्रय रामचंद्र भोसले, रामराव गोविंदराव शिंदे, दत्तात्रय सिवापा बन्ने यांचा ग्रंथाच्या संपादक मंडळात समावेश असल्याचा उल्लेख सुरुवातीला सापडतो.
‘हाकारा’ने मांडलेला हा ‘रुप-खेळ’ समजुन घेण्यास ‘सत्यशोधक’ या हीरकमहोत्सवी ग्रंथातील दोन प्रकरणांची मदत होईल असे वाटते.
Thank you team HAKARA for publishing this invaluable primary source for writing the History of Modernity in South Asia. Thanks a tonne!
हा लेख महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
सत्यशोधक चळवळीच्या संदर्भातील खूप महत्त्वाचा लेख आहे.हाकारा टिमला धन्यवाद.
सत्यशोधक समाजाची महत्त्वाची माहिती देणारे साधन आहे