माळीच्या निम्म्या भागात अंधार भरून असतो. रेडिओ ठेवलेल्या दिवळीपासून सुरू होऊन सांदाडीकडं अंधारत गेलेला. अडीच हाती भिंतींनी त्याला गडद केलेलं असतं. सूर्य उगवून वरती आल्यावर दरवाज्यातून आत आलेलं ऊन सूर्य वरती चढेल तसं दरवाज्यातून निघून जातं. पण हे फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडते तेव्हाच दिसतं. तेव्हा सूर्य कितीतरी लांबवरुन, पार काळ्या कड्याच्या पलीकडच्या पळसाच्या झाडांमधून उगवतो. दिवाळी जवळ आलेली असते तेव्हा तो किसण्याच्या घरामागच्या पिंपरणीतनं उगवतो. तसं किसण्याचं घर पण काही जवळ नाही; पण सूर्य उगवला रे उगवला की दारातल्या लिंबाची सावली माळीवर पडते. तेव्हा माळीतला उजेड फिका असतो. दिवस मावळायला जातो तेव्हा माळीतला उजेड त्याहून फिका होतो. देव्हाऱ्यावरच्या सवण्यातून येताना उभ्या सळयांमध्ये अडकून तुटलेला उजेड दरवाजाच्या भिंतवर पडतो. आणि ती बाजू अधिक उजळते. सळयांच्या सावल्यांत अडकल्यामुळे तो उजेड फारसा विस्कटत नाही. आणि भिंतीवर पडून जाण्याची जागाही बदलत नाही. उन्हाळ्यातही तिथंच आणि पावसाळ्यातही तिथंच. सूर्य बेंदच्या कुरणाकडं खाली-खाली जात राहतो. तरी उजेड आपली जागा बदलत नाही. किंचित मान वरती करुन डोकावतो आणि विझून जातो. शेड्यापासलं लिंबाचं झाड त्याला पुसून टाकतं. माळीत काळोख पसरतो. उजेड संपून अंधार सुरू होण्याच्या रेषा पुसून जातात.
आई देवासमोर दिवा लावते. देव्हाऱ्याकडं उजेड पसरतो. दिव्याचा उजेड अंधाराला मागं सारतो. मग अंधार ताकद पणाला लावून दिव्याकडं झेपावतो. त्याच्या झेपावण्यानं ज्योत डळमळते. झुकते. कधी देव्हाऱ्यापासून लांब, कधी खांबाकडं तर कधी अंधाराला दुर्लक्षित करुन एकसारखी ताठ उभी. अंधार धडका देत राहतो. पण त्याला कधीच रेष ओलांडता येत नाही.
ज्योतीबरोबर हलत-हलत धुराच्या अंधारात विरघळून जाण्यानं, उदबत्त्यांच्या वासानं रोज-रोज नवा होत जातो तो. सांदाडीकडच्या अंधाराचा वास या अंधाराच्या वासाहून वेगळा आहे. कितीतरी गंध असूनही एक वाटणारा. आंबे पिकून झाल्यानंतर विरळत गेलेला पिकलेल्या आंब्यांचा, भिंतीला टेकवून रचलेल्या बाजरीच्या पोत्यांचा, त्यातल्या मेलेल्या आणि काही जिवंत मकोड्यांचा, पावसानं भिजवलेल्या करलाचा, संक्रातीला उतरंडीवर चढलेल्या गाडग्यांचा, मांजरीच्या बाळंतपणांनी उबदार झालेला.
अंधाराची पहिली मैत्री झाली ती उतरंडीवरच्या गाडग्यांशी. अंधारानं धारलेल्या प्रत्येक वासाचं साक्षीत्व उतरंडीवरल्या गाडग्यांनी केलंय. वरती चढलेल्या नव्या गाडग्यांनी नववीलेल्या वासाला आपल्या मुरलेल्या वासानं श्रीमंत केलंय.
माळी बांधली तेव्हा थोरल्यायनं तळातल्या डेऱ्यावर पहिली सात गाडगी चढवली. आणि पुढच्याच संक्रातीपासून तिचं नऊवारी नेसून देवाला ओवाळायला जायचं बंद झालं. त्या वर्षी आजोबा मेला. तिचा नवरा. पण तरीही ती गाडगी रचत राहिली. एक उतरंड पूर्ण झाल्यावर नवा डेरा तळाला. नवी उतरंड. भिंत भरली उतरंडींनी तरीही रचत राहिली.
दिवसाही तिकडंच बसलेली असते. झरोक्यातनं जमिनीपर्यंत पोचलेल्या उजेडाच्या गोलाकडं बघत. त्यातून विखुरले अंधाराचे कण स्पष्ट दिसतात. काही गोलातून दूर दूर जातात. काही नव्यानं येत राहतात. काही कान टवकारुन कानोसा घेणाऱ्या सशासारखे स्तब्ध उभे. कुणी जवळ आल्याचा सुगावा लागताच बिथरून धावणारे. त्या कणांना मुठीत पकडण्याचा अट्टाहास कितीतरी वेळा केला. ते नेहमी सापडल्यासारखे वाटले. पण सापडले नाहीत. थोरल्याय त्या कणांकडं फक्त पाहत बसते. मोठ्या माणसांना सगळं कळतं. ते कण आपल्याला सापडणार नाहीत हेही तिला कळालेलं असावं.
कडुसं पडतं. समाधीला झाकलेल्या लिंबा-चिल्लारींवर रात्रवस्तीला आलेल्या चिमण्यांचा आवाज कमी होत जातो. वरून चकरा मारणारे बगळे लिंबावर इथं-तिथं बसून जातात. काळ्या रानाच्या मेंढरांना हाकारण्यासाठी उठलेल्या ललकाऱ्या विरून जात. मारुतीनानाच्या रेडिओवर लागलेल्या संध्याकाळच्या बातम्या संपतात. सगळं शांत शांत होतं. मग हळू-हळू वळचणीला बसून किरकिरणाऱ्या रातकिड्यांची किरकिर जाणवू लागते. त्यांच्या आवाजांचे सावळे प्रवाह सापांसारखे वळवळत अंधारातून वाहू लागतात. पाठीमागचा अंधार त्यांच्या फरफटी फिक्या करतो. मग असंख्य फरफटी अंधारातून एकमेकींवर चाल करुन जाणाऱ्या. एकमेकींत मिसळून पुन्हा वेगळ्या होणाऱ्या. त्यांच्या टक्करींनी अंधार विस्कळून जातो. पुन्हा शांत होतो. अंधाराहून अधिक सावळ्या फरफटींच्या गुंताड्यात भोवताल अडकून जातो. मग असं गुंतून जाणं कितीतरी वेळ. दिलासा मिळतो तो बोडकीच्या डोहावरचा अंधार भेदून आपल्यापर्यंत पोहचलेल्या डिक्वलवर पेटलेल्या दिव्याचा उजेड शाबूत ठेऊन पसरलेल्या चंद्रप्रकाशाचा. आणि असंख्य चांदण्यांचा. यात कुठेतरी म्हाताऱ्यायची, बंडूदादाचीही चांदणी असेल. बंडूदादा अधिक उजेड असेल तिथं असेल. त्याला अंधार कधीच मानवला नाही. पोटात होता तेव्हा ग्रहण झालं. आणि वाकडं पाय घेऊन जन्मला. सगळे म्हणायचे ‘गिरणात घावलाय’. मोठा झाला पण उभा नाहीच राहता आलं त्याला.
तायडीचं लग्न जमलं तेव्हा दरण्याभावची वहिनी त्याला चिडवायची. म्हणायची, “नव्हं, आत्याबायनं थोरल्याचं सोडून धाकल्याचं कसं व्ह जमीवलं लगीन ! का आमच्या रावसायबास्नी का नकोय हुय बायकु !” तेव्हा बंडुदादा लाजायचा. पण मग गंभीर व्हायचा. “आमाला कोण देतंय वं पुरगी? आमचं आपलं असंच.” आणि मग बघत रहायचा एकटक कुठेतरी. आपल्याला न कळणारं असं काहीतरी म्हणायचं होतं त्याला. पण आपल्याला नाही कळालं ते.
तायडी सारखी म्हणायची, “या भित्र्याला कोण देतंय पुरगी? नुस्तं सांदाडीत जायचं म्हटलं तर हवा जातीय याची !” आणि तो तसाच मेला. बिनलग्नाचा. बाहेर पाऊस पडत असलेल्या अंधाऱ्या रात्री. माळी गळत होती. थोरल्याय कितीतरी वेळा म्हणालेली, “आरं, केरापा कराल तेवढं आणून टाक की गाडीभर. धा वर्स काय हुयाचं नाय.” पण आई म्हणायची, “कराल टाकून उपीग नाय. भितीला पार खंडी पडल्यात्या.” पाणी गळत राहिलं. गाडग्यापसल्या भिंतीवरून ओघळून खाली साठलं. भिजलेल्या गाडग्यांचा वास करलाच्या वासात मिसळून अंधारातून पाझरत राहिला.
माणसांनी पाऊस उघडण्याची वाट पाहिली. आणि रॉकेल ओतून-ओतून ओल्या लाकडावरच जाळला त्याला.
म्हाताऱ्याय मात्र या सगळ्या चांदण्यात कुठंतरी कोपऱ्यात असणार. “माझं बापडीचं कोण एकतंय!” असं म्हणून कोपऱ्यात बसून रहायची. ‘ये म्हातारे, तुला काय कळतं यातलं!’ असंच म्हणायचे सगळे तिला. पण तिला काहीतरी वेगळं कळत होतं. वट्याजवळच्या चिल्लारीखाली तासगावच्या पानाड्यानं पाणी दाखवलं. तेव्हा दादानं ती तोडून टाकली. म्हाताऱ्याय तेव्हा वट्यावरच बसून होती. ती सतीची गोष्ट सांगायची.
“सती उलाटली तवा मी चांगली थ्वॉर व्हुती. चांगलं कळत व्हुतं मला. न्हानी हाय तिथं खोपाट व्हुतं. तुमच्या पंज्यानच चिल्लार तुडून तुडून रान मोकळं केल्तं. ही चार झाडं त्यातलीच ठिवल्याली हायती. आता दुसरी सती उलाटली तरी अजून हायती. केरापा थ्वॉर झाला तवा माळी बांधली. धुंडीबा आलदरानं समंध जांभळ तुडून दिलं. एक पैका नाय घेतला. गाठ पडला की म्हणायचा, “म्हातारे किती दिस काढतीयास या आयचानात पोरांना घिवून! बांध की एखादं माळवाद. लय उपकार हायतं बापड्याचं”
सतीची गोष्ट खूप मोठी आहे. पण म्हाताऱ्यायनं ती कधीच पूर्ण सांगितली नाही. सांगता-सांगताच शांत होऊन जायची. तेव्हाच तिला काहीतरी वेगळं सांगायचं असायचं. पण आपण बारकं असल्यानं आपल्याला ते कधीच कळालं नाही. चिल्लार तोडल्यानंतरही ती तशीच शांत झालेली. घरातले सगळे आनंदात होते. बोअरला पाणी लागलं होतं. पाणी आणण्यासाठी विहिरीला जावं लागणार नव्हतं. चिल्लारीखालची म्हैस बांधण्याची जागा फक्त बदलली. चरवीवर आपटून होणाऱ्या काकणांच्या आवाजात मिसळून वट्यावर ऐकू येणारा चरवीत पडणाऱ्या दुधाचा एकसारखा आवाज दूर गेला. आणि एके दुपारी म्हाताऱ्यायही अशीच अनमानधपक्या निघून गेली. झोपलेल्या जागीच. मग त्यानंतर खूप ऐकलं तिच्याविषयी.
“म्हातारीनं लय दिस बघितलं. घरात आन नव्हतं तवा पिठाचं पाणी करून पोरं जगवली. पोटाला चिंध्या बांधून दिस काढलं.”
“पण एवढं सोसल्यासारखं मरान चांगलं आलं म्हातारीला. एकादशी दिवशी मिली.”
“एकवार पैसं घेतलं व्हुतं माझ्याकडनं, निलाला लुगडं घ्यायला. पण म्हातारीनं हटकायच्या आधी आणून दिलं.”
” व्हय! येव्हाराला चांगली व्हुती म्हातारी.”
“आवं धाच मिन्ट झाली मला जावून. हाक मारुन ईचारलं तर ; करडु पडलं का नाय म्हणून.”
आत्तासुद्धा या गच्च चांदण्यांमधून नाहीच दिसणार ती.
आपण बारकं असल्यानं आपल्याला खूप काही कळायचं राहून गेलंय. कितीतरी गोष्टी तशाच अर्ध्या राहून गेल्यात.
समाधीपसल्या लिंबापलीकडून निळा उजेड सोडणारा चंद्र आणि किरकिरीच्या आवाजाला साठवून राहिलेला त्याखालचा गच्च अंधार यांच्यामधे बसलेली थोरल्याय कुठं नजर लावून असते एकटक. युवराजनं तिला विचारलं, “थोरल्यायं, आपलं नवं घर हुईपर्यंत मामाच्या तिकडं रहायला जाणाराय ना आपण ! मग तवा पण तू मलाच पुढं घिवुन झोपणार ना गं ?” तिला ते गेलंच नसावं ऐकू. नजर तशीच एकटक. डिक्वलवरचा दिवा मंद मंद होत असतानाही गालांवरुन ओघळलेला थेंब दिसला फक्त आपल्याला. आपल्याला नाहीच कळत मोठ्या माणसांचं असं वागणं.
आपल्याला तर मामाच्या तिकडं जावं असंच वाटतं. तिकडं गेल्यावर साखरेचा काला खायला देणारी जानकाय आहे. बिंटा मामा आहे. शिवण्याच्या फॉरीस्टात नेणाराय तो आपल्याला. मळईत पेरुचं झाड आहे. घरामागं सिताफळाची झाडं आहेत.
मोठी माणसं बोलत नसतात तेव्हाच त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असतं.आणि त्यांचं सांगणं न बोलताही कळतं एकमेकांना. आपल्याला फक्त त्यांचं शांत बसणं दिसतं. नाहीच कळत आपल्याला त्यातलं काही.
वाह..!
सतपाल, अप्रतिम..
प्रसंग वाचलाच नाही तर पाहिला.
Khup Sundar lekhan ahe…. Satpal apnas bhavi career sathi Khup subhecha
Nice bro…
खूपच सुंदर सतपाल
खरंच सतपाल जिवंत लेखन आहे तूमचं…!
कौतुक करावं तेवढं थोडंच.
धन्यवाद !