१.
शोध
रस्त्यात मला एक
बेवारस जीन्स पॅन्ट दिसली.
पॅन्टीवर रक्ताचे डाग होते.
मी म्हटलं ह्या पँटीतला ढग कुठं गेला?
ढगाचा मर्डर म्हणजे
असंख्य कवितांचं शिरकाण.
मी कडक उन्हात उभा राहिलो,
व्हॅनगॉगच्या.
माझी काही वाफ झाली नाही.
मी हवेतच कल्पनेनं
पँटच्या मालकाचं चित्र काढू पाहिलं.
मला दिसू लागलं एक चलतचित्र
पॅन्ट आत्महत्या करतेय
कवितेतल्या दोन ओळींच्या मध्ये
तिनं उडी घेतली आहे
खोल खोल जातेय नि
पँटीतला ढग अश्रू ढाळत
वर वर जातोय.
म्हणजे मी
बिटवीन द लाईन्स
उभा आहे
नि पॅन्ट पाहातोय.
२.
बुद्ध
अखेर मी जोश्यांच्या खिडकीची वळचण शोधली.
कबुतरांना म्हटलं माझ्यासाठी तिथं घरटं बांधा.
नुकताच जोश्यांच्या कॉम्प्लेक्सचा बिल्डर मेला होता.
खाली त्याच्या प्रेतयात्रेची तयारी चालली होती.
कबुतरं म्हणाली आम्ही आधी फ्युनरलला जाऊन येतो
तिथं चितेवर ठेवायच्या लाकडांच्या काटक्या तोडून
घेऊन येतो..मी जोश्यांच्या वळचणीत बसून राहिलो.
दिवास्वप्नात मला एक प्रसूती गृह दिसलं नि
एका बाईच्या पोटातून बाळ येताना पाहिलं
लालबुंद कोवळ्या हातापायांचं.. मी हरखून गेलो
खाली उतरलो नि बिल्डरच्या फ्युनरलसाठी
रडत रडत पळत सुटलो..अग्नी दिला होता
कवटी फुटेस्तोवर थांबलो..कवटी फुटल्याच्या आवाजात
मला नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं रडणं ऐकू आलं.
घरटं बांधण्याचा विचार सोडला नि नि:संग झालो
विरक्त झालो..वाट फुटेल तसा चालू लागलो.
३.
गंगा
दरम्यानचे अंतर दुकानात विकायला ठेवलं
दुकानदाराने ते वजनकाटा म्हणून वापरलं
मी चपलाना वाट विचारली..
नि अनवाणी निघालो.
वाट पळत होती तिला लोंबकळलो मी
लोकल मागे मागे धावत होती.
माझ्या विरुद्ध दिशेने एक गिधाडांचा थवा
उडत गेला..त्यांच्या पंखांची वादळी फडफड
मी शिताफीनं चोरली नि गिळून टाकली.
वाटेवरचे लोक मला अचानक नमस्कार
करू लागले..मला साधू किंवा संत समजून.
मी निघालो हिमालयाकडे..गंगेच्या उगमात
डुबकी मारून मला गंगा शुद्ध करायची होती.
वाटेत एका महावृक्षांनं मला रोखलं..
अरे तू माझ्या मुळांत शीर
तू गंगा यमुना सरस्वती सर्वांना एकाहाती
शुद्ध करशील..महावृक्ष म्हणाला.
मी तसं केलं नि मला तिथं माझी बायको
आधीच आल्याचं दिसलं..
मी नाद सोडून दिला प्रवासाचा
तिच्यामाझ्या मधलं अंतर गिधाडांच्या
फडफडीबरोबर बाहेर आसमंतात
विलीन झालं..नि गंगेआधी मी शुद्ध झालो
स्वत:ला असंख्य असंख्य व्यालो.
४.
दृष्टी
म्हातारपणाला आलंय घर.
पाण्यात डोळे लोटावेस
जातील तिथं जातील.
आठवणींच्या वाळवणाची काळजी
कावळे चिमण्या करतील.
केसात आले ना तुझे दात
पांढरेशुभ्र.
आरश्यातल्या घरात
वावरणारे तुझे श्वास
लटकव तुझ्या दारावर
नेमप्लेट म्हणून.
रस्ते येतील आत शिरतील
तू नाही पाहून परत जातील.
प्रेमात बुडून हाका मरतात
तुला काय त्यांची प्रेतं हवीत?
दुडूदुडू पळायचास तेंव्हा
तेंव्हा लोक प्रेम करायचे
तुझ्यावर..आठवतं का?
नाही ना? मग!
नसलेल्या डोळ्यांवरचा चष्मा
फेकून दे
नुसत्या खाचानी बघ हे जग
जगणं तुझं साठेल खाचात
एक वेगळीच दृष्टी लाभेल तुला.
म्हातारपणाला आलंय घर..
स्वतःला लोटून द्यावस जगाच्या
अखिल दु:खात..तुझी दृष्टी
राहील तुझ्या मागे.
५.
लग्न
येऊन ठेपलेल्या वेळेवर
मी दालीचं घड्याळ वाहिलं.
नि सामोरा गेलो
बाहुला बाहुलीच्या लग्नाला.
काळाच्या अक्षता वाहिल्या
नि लग्न लागल्यावर
वाजणाऱ्या टाळ्यांच्या मधली हवा
मी बाहुला बाहुलीला प्रेझेन्ट दिली.
बाहुलीने ती हवा कडेवर घेतली
येऊन ठेपलेली वेळ
एका बादलीत घेऊन
हवेला आंघोळ घातली.
हवेचे बुडबुडे
बाहुला बाहुलीच्या संसारात
दालीच्या घड्याळाशी
पुढे खेळत राहिले.
६.
खिडकीचं घर
ही खिडकी
नाहीय माझ्या घराची.
खिडकीतून येणारा प्रकाश मात्र
माझा ताबा घेतो.
खिडकीतून जे दृश्य मी पाहातो
ते माझ्या शहरातलं नाहीय.
पण ते दृश्य मला ओळख असल्याचं
स्माईल देतं.
मी चकित होऊन खिडकीजवळ जातो.
प्रयत्न करतो खिडकीतून बाहेरच्या
अनोळखी प्रदेशात जाण्याचा.
माझ्यावर खटाखट आपटतात
खिडकीची दारं, दिसत नसलेली.
हा अनुभव मला आकाशात फेकतो.
आकाश,
खिडकीतून आलेल्या प्रकाशातलं.
ज्या खिडकीचं घर
कुठे आहे ते मला माहित नाहीय.
आता मी
खिडकीचं घर शोधण्याच्या
एकमेव ध्येयात
वणवण भटकतोय..
७.
अरुण आज समजेल तुला ही कविता.
हा डेंजर वारा
विस्मरणात ढकलतो
माझं असलेपण.
उरलेल्या नसलेपणात
जोजवत राहातो दृश्य
जगाचं.
जग गाढ झोपेस्तोवर.
हा डेंजर वारा तुझा नाहीय.
तरी हाही उडवून लावतो
नकाशा, पण मेंदूचा.
कोरी ठेवतो जागा
वाव ठेवतो मालक व्हायला
माझ्या हालचालींचा.
हा डेंजर वारा
आणतो जवळ एक
अव्यक्त तारा,
व्यक्त आकाशातला.
जो धारण करतो लुकलूक
माझ्या हृदयाची
पाडतो थंड माझं हृदय
तरीही जिवंत ठेवतो मला.
देतो जन्मपूर्व अवस्था.
हा डेंजर वारा
उधळतो देवघर
करतो अमूर्त देवांना
भिंती कोसळवून माझ्या घराच्या
देतो घरपण मला
अनिकेत करतो माझ्या
आयुष्याला.
काय हा डेंजर वारा.