नद्यांचं मला खूप आकर्षण. बंगालमधली हुगळी नदी, झारखंडमधली दामोदर नदी, गडचिरोलीतली इंद्रावती आणि पर्लकोटा सुरतमधल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर मी तासनतास घालवले आहेत. नद्या आणि माझं नातंच अनगिनत संदर्भ असलेलं आहे.
मागच्या वर्षभरात मात्र करोना आणि पाठोपाठ लॉकडाऊनमुळे कंपल्सरी घरातच बसावं लागलं. त्यामुळे परिस्थिती सुधारताच मी बॅग उचलून बाहेर पडले. यावेळचा अनुभव मात्र नुसता रोमॅंटिक नव्हता तर येतानाही मी बॅग भरून प्रश्न घेऊन आले. नदी काही नुसती सुंदर नसतेच. पुरांमुळे आपल्याला नद्यांच्या रौद्र रुपांचं- बातम्यांमधून दर्शन घडत असतं. पण नर्मदा नदीवर सरदार सरोवर बांधल्याने हजारो गावं विस्थापित झाली, लाखोंच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. अर्थात नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल आणि या विस्थापनाबद्दल मी थोडंफार ऐकून आणि तुकड्या-तुकड्यात वाचून होते, पण यावेळी हे चित्र प्रत्यक्ष पाहिलं.
महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सीमेवर आणि तिथून पुढे मध्य प्रदेशात प्रवास करताना, जितकी नर्मदा आणि तिच्या भोवतालचं जनजीवन जाणून घेता आलं, जे अनुभवलं त्याचं हे कोलाज.
यावर्षी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या नर्मदा जीवनशाळाच्या बालमेळ्यासाठी मी नंदुरबारमधल्या चिखली गावात गेले होते. हा बालमेळा म्हणजे नर्मदा जीवनशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा वार्षिकोत्सव! राज्यभरातून विविध क्षेत्रातले लोक हा बालमेळा पाहायला दरवर्षी जातात. यावर्षी मी ही या बालमेळ्याला गेले होते.
शहाद्याच्या आसपासच्या डनेल, थुवाणी, सावऱ्यादिगर, खाऱ्याबादल, मनीबेली या गावांतून जीवनशाळांमध्ये शिकणारी मुलं-मुली आली होती. दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरणारी, एरवी अंगाला नवा कपडाही मिळणं दुरापास्त असलेली ही पोरं त्यादिवशी पी.टी.चे रंगीत कपडे घालून जीव तोडून खेळत होती. खेळाच्या कसल्याही सुविधा नसलेल्या मुला-मुलींची खेळातली चपळाई डोळ्यांचं पारणं फेडणारी होती.
नर्मदा जीवनशाळांबद्दल
नर्मदा नदीवर सरदार सरोवर बांधताना आणि त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांतील शेकडो गावं पाण्याखाली गेली. हजारो नागरिकांचं जीवन यामुळे उध्वस्त झालं. यात अधिक भरडले गेले ते गरीब आदिवासी. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेली तीस वर्षे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळालं असलं तरी अजूनदेखील हजारो नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते त्याकरता झटत आहेत.
सप्टेंबर २०१७ मध्ये नर्मदा नदीवर सरोवर बांधण्याचं काम पूर्ण झालं. सरोवरामुळे बाधित झालेल्या महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सीमाभागातल्या गावांत १९९० पासून नर्मदा बचाव आंदोलनानं जीवनशाळा सुरू केल्या. ही बाधित गावं विस्तीर्ण पाणलोटामुळे नि दुर्गम डोंगराळ भागात असल्याने मुख्य प्रवाहापासून तुटलेली आहेत. यातल्या अनेक गावांत शासनानं करोडो रुपये खर्चून शाळा बांधल्या आहेत, पण या शाळा उघडतात वर्षातून तीन दिवस. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि १ मेला कामगारदिनी. साहजिकच अशा अतिदुर्गम भागात जाऊन शिकवायला कोणी शिक्षकच तयार नसल्याने शाळा फक्त कागदावर चालतात. बाकी त्यांच्या इमारती म्हणजे नुसते खंडहर!
या आव्हानांतून मार्ग काढत मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांनी मणिबेली, थुवानी, डनेल, जीवननगर, खाऱ्याबादल, सावऱ्यादिगर या गावांमध्ये निवासी शाळा बांधल्या. मोठमोठ्या वर्गखोल्या, खेळाचं मैदान शहरी शाळांमधल्या सुविधा इथं नाहीत, कारण शासनमान्यता असली तरी या शाळांना शासनाचं अनुदान नाही.
बालमेळ्यानंतर बाधित गावांना भेट देण्यासाठी मी २२ जानेवारीला चिखली गावातून निघाले. बालमेळ्यासाठी खाऱ्याबादलहून चिखलीला आलेली शाळेची मुलं ट्रकमधून परत जाणार होती. त्यांच्यासोबत मी निघाले. जानेवारी महिना असला तरी भाजून काढणारं ऊन होतं. तीनेक तासांचा ट्रकमधून प्रवास, पुन्हा पुढे अडीच तास सरकारी बार्जमधून पाण्यातून पलीकडे जायचं.. की मग लागणार होतं महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचं खाऱ्याबादल गाव.
मुलांसोबत ट्रकमधून प्रवास सुरु झाला. वाटेत सातपुड्याच्या डोंगरातले नागमोडी रस्ते, भाजणारं ऊन होतं. मध्येच डोळे निवतील असं लालभडक फुललेल्या गुलमोहराच्या, पळसाच्या झाडांचं दर्शन होत होतं. ट्रकचा प्रवास संपल्यावर आम्ही खाऱ्याबादलला जाणाऱ्या बार्जमध्ये बसलो. ही बार्ज म्हणजे इंजिनावर चालणारी बोटच असते. नावांपेक्षा मोठी आणि जहाजापेक्षा लहान. नर्मदेच्या पाण्यातून अनेक ठिकाणी प्रवास करण्याकरता, विशेषत: शाळकरी मुलांना ही बार्ज मोफत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडते. कारण प्रवासासाठी रस्तेमार्गच नाहीत.
संथ गतीने बार्जचा प्रवास सुरू झाला. आता चोहोबाजूंनी सातपुड्याच्या डोंगररांगाच दिसत होत्या. मध्ये नुसतंच पाणी, नर्मदेचं विशाल पात्र, सरदार सरोवराचं विस्तीर्ण बॅकवॉटर. डोंगर- मातकट, वसंतातल्या पानगळीनं निष्पर्ण झालेले उघडेबोडके दिसत होते. तुरळक हिरवी झाडं आणि मध्येच पळसाची लालबुंद झाडं दिसत होती. दूरदूरपर्यंत माणसाचा मागमूस नव्हता. छोट्या छोट्या काही झोपड्या दूर डोंगरावर दिसत होत्या पण त्याही एकमेकींपासून खूप अंतरावर होत्या. आमच्या बार्जशिवाय एखादंदुसरीच छोटी नाव जाताना दिसत होती. तासाभरानं एका टेकडीवरच्या घरातून चार मुली हंडे घेऊन डोंगरउतारानं खाली पाण्याकडे येताना दिसल्या. टेकडीवर मधूनच चरताना दिसणाऱ्या तीन चार मेंढ्या, बकऱ्या- मातकट मळकट डोंगरावर मध्येच उगवून आलेल्या भूछत्रासारख्या दिसत होत्या. कुठेतरी एखादा पाणपक्षी, बगळे तर कुठे टेकडीवर, किनाऱ्यालगत मच्छिमारानी टाकलेली मासे पकडण्याची जाळी दिसत होती.
साधारण तीन तासांनी आम्ही खाऱ्याबादलला पोहोचलो. डोंगरावरच मुलांची झोपडीवजा शाळा. शाळेत एक दोन फळे, वारली-गोंडी बोलीत लिहिलेले काही तक्ते याशिवाय काहीही ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ नव्हतं.
दुसऱ्या दिवशी मी खाऱ्याबादलहून बडवाणीला गेले. बडवाणी या मध्यप्रदेशातल्या जिल्ह्यात ‘नर्मदा बचाव आंदोलना’चं मोठं कार्यालय आहे. त्यादिवशी आंदोलनाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची भेट झाली .सरोवर प्रकल्प, विस्थापनावर भरपूर चर्चा झाली.
त्यानंतरच्या दिवशी सकाळी आम्ही (मी आणि नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्ता रोहीत सिंग) बडवाणीतल्या राजघाट गावात गेलो. हे गाव राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. तिथं गेलो तर महामार्गही पाण्याखाली गेलेला दिसला. किमान चाळीसेक फूट तरी पाणी असावं. पाण्यावर झाडांचे बुडखे पंधरा वीस फूट उंचीचे दिसत होते आणि जिथून पाणी लागायला सुरूवात होत होती, (किनाऱ्याजवळ) तिथे दोन तीन प्रसाद-अगरबत्तीची दुकानं होती. काही लोक गुडघाभर पाण्यात जाऊन नर्मदेला नमस्कार करत होते. रोहितनं सांगितलं, मध्यप्रदेशात जिथे जिथे नर्मदा नदी दिसेल, तिथे अनेक काठांवर लोक नर्मदामय्याची पूजा करण्यासाठी येतात.
आम्हाला पलीकडच्या राजघाट गावात जायचं होतं. छोट्याशा लाकडी नावेतून आम्ही पलीकडे गेलो. नाव खूप हेलकावत होती आणि बारा-तेरा वर्षांचा मुलगा महेश ती वल्हवत होता. दहा मिनिटात आम्ही गावात पोचलो. गाव तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आणि मुख्य रस्त्यापासून तुटलेलं. गावातली घरं सगळी रिकामी, भकास. पुराच्या खुणा जागोजागी. अंगणवाडी, प्राथमिक शाळा खंडहर झालेली. पूर ओसरल्यावर सगळीकडे विखुरलेले अवशेष असं सगळं ते उदास चित्र होतं.
तिथं खूप फिरलो पण एकाच कुटुंबातली माणसं घरी सापडली. पन्नाशीच्या पुढच्या भीमसिंग सोळंकींनी आमचं स्वागत केलं. त्यांना तीन मुलं, एक मुलगी. सगळ्यांची लग्न झालेली. त्यांच्या घरात चार-पाच नातवंडंही खेळत होती. बारा-तेरा वर्षांच्या त्यांच्या नातीला, ‘शाळेत जातेस का?’ असं विचारलं..तर ती खुणेनंच ‘नाही’ म्हणाली. तिच्या आजीनं मग पुराच्या पाण्यामुळे तिची शाळा बंद पडल्याचं सांगितंलं.
सोळंकी त्यांची कहाणी सांगू लागले, “आम्ही पिढ्यानपिढ्यांपासून राजघाटचे रहिवासी…त्यामुळे मरण रोज शेजारी दिसत असूनही इथं राहिलो. जमीन गेली पण काही मिळालं नाही. आता तरी पाणी कमी आहे पण कधीही पूर येऊन, पाण्यात बुडून आम्ही मरू शकतो.” जितक्या सहजेतेने ते मरणाच्या गोष्टी करत होते, ते ऐकून अंगावर काटा आला.
सोळंकी रोज छोट्या लाकडी नावेने त्यांच्या टापूमधल्या शेतीत जातात. दिवसभर शेतात काम करून मग पुन्हा नावेने घरी परतात. पाचच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी रोज नावेतून प्रवासाला पर्याय नाही. पीक आल्यावर धान्याच्या मोठ्या गोण्या, छोट्या नावेतून घरी आणताही येत नाहीत, नि बाजारात विकायलाही नेता येत नाहीत. त्यामुळे धान्य शेतातच साठवून, लागेल तसं थोडंथोडं घरी आणायचं.
सोळंकींची बरीच जमीन दहा वर्षापूर्वी सरोवराच्या पाणलोट क्षेत्रात गेली, पण त्यांना आजतागायत योग्य पुनर्वसन मिळालं नाही. सरकारनं त्यांना गुजरात राज्यात भरूचमध्ये पाच एकर जमीन दिली खरी, पण ती जमीन पाणथळ आणि खारी असल्याने नापीक. त्यामुळे ते कधी तिकडे गेलेच नाहीत. दोन मुलं बडवाणी आणि आसपास लहानशा नोकऱ्या करून गुजराण करत होती पण लॉकडाऊनमुळे त्यांच्याही नोकऱ्या गेल्यात.
या कुटुंबासारखीच स्थिती जवळपास प्रत्येक कुटुंबाची आहे. पुराचा खूप धोका असल्याने या गावातली पंधराएक कुटुंबं, तात्पुरत्या राहायला दिलेल्या ‘टीन शेड’ वसाहतीत गेली. या लोकांना तिथे जाऊन भेटावं म्हणून आम्ही तिथून निघालो. वाटेत पवन केवट भेटला. तो छोट्या बोटीतून लोकांची ने-आण करण्याचं काम करतो. त्याचं वय ३५ वर्षं. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. खासगी बोटीवर सतत काम करून – पाणी-बोट-किनारा एवढ्यापुरतंच त्याचं आयुष्य सीमित होऊन गेल्याने त्याला या जंजाळातून बाहेर पडायचं होतं. तसा तो पडलाही, मात्र पुन्हा एकदा परिस्थितीने त्याला पाण्यातच ओढून आणलं. आठ हजार रुपये महिना कमावणाऱ्या पवनचं लग्न झालेलं नाही. म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी पार पाडता पाडता तोच अकाली म्हातारा झाल्याच्या खुणा त्याच्या डोळ्यात आणि अंगावरच्या रापलेल्या त्वचेत दिसत होत्या. हे सगळं पाहताना हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ची आठवण आली नसती तरच नवल!
किनाऱ्याला आलो, तोच आम्हाला राजघाट गावातलाच मनोजसिंह सोळंकी भेटला. तो या गावातला पहिला ग्रॅज्युएट मुलगा. बी.एस.सी केल्यावर त्याला शेतकी उत्पादनांच्याच क्षेत्रात निमसरकारी नोकरी मिळाली. त्यामुळे कुटुंबांची स्थिती सुधारली, पण मनोजला एवढ्यावरच थांबायचं नाही. त्यानं शिक्षणाधिकारी बनण्यासाठी राज्यसेवा परिक्षेचा अभ्यासही सुरू केला होता. किंबहुना फेब्रुवारीअखेर त्याची परीक्षा होती, अभ्यासासाठीच तो सुट्टी घेऊन गावाला आला होता. आजूबाजूच्या इतक्या डिस्टोपियन वातावरणात अभ्यास कसा होतो? असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘हे बदलायचं आहे, म्हणूनच तर धडपडतो आहे.’ हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला निरोप देणाऱ्या आणि सकारात्मक ऊर्जेनं भारलेल्या मनोजसिंह सोळंकीची भेट वाळवंटात अवचित दिसलेल्या एखाद्या फुलासारखी होती.
पुढे किनाऱ्यावरच्या दुकानात अनिता मोहनला भेटलो. तीही राजघाट गावातच राहते. २०११ मध्ये तिच्या पतीचं- मोहनचं निधन झालं. तेव्हापासून ती चार मुलांना एकटीच सांभाळते. रेणुका, आणि कुमकुम या तिच्या चौदा- पंधरा वर्ष वयाच्या दोन मुलींची शाळा तर कधीच सुटली. आणि आता धाकटी दोन मुलं तिला नारळ-प्रसादाच्या विक्रीत मदत करतात. या चारही मुलांची शाळा सुटली आहे.
पूर्वी राजघाट गावात असलेलं तिचं शेत आणि दुकान आता पाण्याखाली गेलं आहे. त्यात नवऱ्यापाठोपाठ सासऱ्यांचाही मृत्यू झाला. पण ती न डगमगता स्वत:ची पुनर्वसनासाठीची केस अजूनही लढतेच आहे. तिला जमीनही मिळाली पण ती धार जिल्ह्यात बालोदा बुजुर्ग गावात. पुनर्वसन अधिकाऱ्यांनी नियमानुसार आधी तिला ही जमीन दाखवून तिची मंजुरीही विचारात घेतली नाही. शिवाय ही जमीन आधीच कुणीतरी बळकावलेली आहे. “मी तिथे जायचा खूप प्रयत्न केला, पण तिथल्या गुंडांनी मला शिवीगाळ करून, मारहाणीच्या धमक्या देऊन पळवून लावलं. म्हणून आता मी तिथं जातच नाही. काय करणार, विधवा बाईला कोण विचारतं?” ती उद्विग्नपणे सांगत होती.
अनिताशी बोलून मी निघाले, तितक्यात तिच्या दुकानात आलेल्या माणसानं तिच्या हातात, पाच किलो तांदळांची पिशवी दिली. मला वाटलं, त्या व्यक्तीनं मदत म्हणून तिला ते तांदूळ दिलेत, तर पुढच्याच क्षणी तो माणूस म्हणाला, ‘रोज मछलियो को डालना’. अनितासारख्या कित्येकजणी आजही भुकेसाठी संघर्ष करत आहेत. या हाडामांसाच्या माणसांपेक्षा, माशांच्या भुकेसाठी तांदूळ तिच्या हातात सोपवणाऱ्या माणसाची मानसिकता काय असावी, याचा विचार करतच मी तिथून निघाले.
अनिताचाच बारा वर्षांचा मुलगा मला नावेतून पलीकडे घेऊन जात होता, मध्यावर गेलं असताना तो म्हणाला, “इधरही हमारा खेत हैं, इसके नीचे. दुकान, घर सब है. ऐसे मत देखो, नही दिखेगा नीचे का कुछ, अब तो सिर्फ पाणीही दिखेगा” तो खूप सहजपणे, इथे पाण्याखाली आमचं सगळं आहे, असं सांगत होता. मी पाहिलं, पण चोहीकडे नुसतंच पाणी दिसत होतं.
दिवसभर अनेक गावांत फिरून संध्याकाळी मी एनबीए (नर्मदा बचाव आंदोलन)च्या ऑफिसमध्ये परतले. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा रोहित आणि मी चर्चा करायला बसलो, आता महेंद्रही सोबत होता. त्यांनी मला ऑफिसमधल्या बऱ्याच फाईल्स दाखवल्या, अनेक प्रकरणांतल्या कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्या फाईल्सचा पसारा आणि रोहित आणि महेंद्रनं सांगितलेल्या माहितीवरून एवढं मात्र नक्की कळलं की सरोवर प्रकल्पामुळे तयार झालेल्या विस्थापितांच्या आणि पर्यावरणीय प्रश्नांचा आवाका नर्मदेइतकाच अवाढव्य आहे. या प्रश्नाचे अनेकविध कंगोरे हे कधी न संपणाऱ्या भुयारासारखे आहेत. एखाद्या माणसाने आयुष्य जरी नर्मदेला द्यायचं म्हटलं तरी सगळी गावं, सगळ्या विस्थापितांना भेट देणं आणि या सगळ्यांच्या कथा लिहिणं अशक्यच. त्यामुळे नर्मदा समजून घ्यावी लागते ती तुकड्या-तुकड्यांतूनच.. तुमच्या समोर येणाऱ्या प्रातिनिधिक माणसांतून.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी चालायला म्हणून बाहेर पडले. बडवाणी शहर तसं छोटंसं. पण सकाळी सकाळी गजबज होती. बस स्टॅंडच्या पुढे एक किलोमीटरभर अंतरावर असलेल्या स्वामी विवेकानंद कॉलेजच्या सभागृहाच्या बाहेर मोठं महिरपी पोस्टर होतं. आदल्याच दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली युवा रोजगार मेळावा पार पडल्याचं त्या पोस्टरवरून कळत होतं. मी उत्सुकतेनं आत गेले, पण कुणी त्याबद्दल बोलायला राजी नव्हतं. एकीकडे बेरोजगारीनं त्रस्त झालेल्या अनेकांशी मी तोवर बोलले होते, त्यामुळे या रोजगार मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळाला, याची उत्सुकता होती. बाहेर आल्यावर समोरच स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसची मोठमोठी होर्डिंग्ज दिसली. तिथे मी काही कॉलेजवयीन आणि इतरही तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यापैकी कुणालाही त्या रोजगार मेळाव्याबद्दल काहीही माहिती नव्हती.
चार-पाच किलोमीटरच्या त्या वॉकमध्ये मला बडवाणी शहर कळलं असं म्हणता नाही येणार, पण थोडासा त्याचा फ्लेवर समजला. भारतातल्या कुठल्याही निमशहरी पट्ट्यात असावा, असा हा भाग. बहुतेक सगळी कष्टकऱ्यांची वस्ती. इथून इंदौर, भोपाळला जाण्यासाठी खूप बसेस सुटतात, त्यामुळे इथे चहलपहल जरा जास्त. आणि आसपासच्या अर्धबुडीत गावांकरता हेच त्यातल्या त्यात बाजारहाट करण्याचं जवळचं ठिकाण आणि प्रवासाचा मोठा थांबा. त्याव्यतिरिक्त शहरांना असतो तसा सांस्कृतिक, पौराणिक इतिहास बडवाणीला नाही, आहे तो पुराने बेचिराख होण्याचाच इतिहास. इथल्या बाजाराचं, लोकांचं निरीक्षण करता करता मी पुन्हा बस स्टॅण्डजवळ पोहोचले. रोहितने आणि मी इंदौरी पोहे खाल्ले. खूप भारी चवीचे पोहे खूप स्वस्त. कचोरी, पोहे, जिलब्या खाऊनही दोघांचं बिल झालं चाळीस रुपये. कुठेही मिळणारं कमी पैशातलं खाणं मला आवडतं, कारण ते त्या शहरातल्या कष्टकऱ्यांचं विनासायास पोट भरतं.
आज आमचा दौरा होता, बडवाणीहून वीस किमी असलेल्या बीजासनला. हे गावही सरोवराच्या पाणलोटात अर्ध बुडालेलं. पाण्यापासून बचावलेल्या भागात लोकांची अर्धपडकी घरं होती. माझ्यासोबत जितेंद्र मांझी हा मासेमार तरुण होता. लहानपणापासून मासेमारी करणारा. त्याच्या घरी त्याचे दोन भाऊ, पत्नी आणि आई-वडील अशी एकूण सहा माणसं. बीजासनमधलंच त्याचं घर २०१९ च्या पुरात पाण्याखाली गेलं. तेव्हा सरकारी यंत्रणेनं त्याच्या कुटूंबाला राहण्यासाठी गावातलीच अंगणवाडी दिली. जितेंद्रनं मला अंगणवाडीत थाटलेला त्याचा संसार दाखवला. त्याचं जुनं पाण्यात गेलेलं घर, जिथे तो मासेमारी करतो ती जागाही त्याने दाखवली. पुन्हा पाण्यातून प्रवास करताना अरविंद नावाडी भेटला, त्याचीही अवस्था पवन नावाड्यासारखीच.
जितेंद्र आणि त्याचे दोन भाऊ दररोज मासेमारी करतात. हे दोघे भाऊ सकाळी मासेमारी झाल्यानंतर शहरात जाऊन इतर नोकऱ्याही करतात. सोनू एका सायबर कॅफेत तर मोनू चिकूच्या गोडाऊनमध्ये काम करतो. जितेंद्र सांगतो, ‘मेरे दो भाई शहर में जाके काम करने लगे है, क्यूकि यहा मछवारो को कोई लडकी नही देता. पचास लडकियाँ देखने के बाद मेरी शादी हुई. और अभी भी मेरी पत्नी मायके गई हैं.. हमारा थोडा झगडा हुआ था.. वो कहती हैं कि तुम मछवारो के शरीर से बू आती हैं. तुम ये काम छोडके कोई दुसरा काम करो.” किनाऱ्यावरून चालता चालता आम्ही बोलत होतो. सूर्य कलत आला होता, आसपास कुणीच नव्हतं. जितेंद्रच्या मनातलं एकाकीपण असं दुथडीभरून वाहत होतं.
जितेंद्रसारख्या अनेक मासेमारांना (त्याच्या आधीच्या पिढीला) नव्वदीच्या आसपास नर्मदा नदीची उपनदी असलेल्या गोलई नदीच्या पात्रात सरकारकडून अल्प भाडं आकारून जागा दिल्या होत्या. उन्हाळ्यात पाणी कमी असेल तेव्हा नदीपात्रातल्या रेतीत या मासेमारांनी कलिंगडांची, घोसाळ्याची शेती करावी, असा उद्देश होता. कहार, भोय, केवट जामातीच्या मासेमारांना या शेतीतून वरकड उत्पन्न मिळत असे. १९९५ पासून मात्र हे सगळं बंद झालं. आता दोन दशकं तरी झाली, कलिंगडांच्या शेतीचं कौशल्यं विसरून. मासेमारांचे असे पारंपरिक उत्पन्नाचे मार्ग हिरावल्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर किती खोलवर झालेला आहे, यापासून धोरणकर्ते अनभिज्ञ आहेत असं नाही, पण त्याची चर्चाच मुख्य राजकीय प्रवाहात नाही.
बीजासनहून निघेपर्यंत सूर्य मावळला होता. शहरात जाऊन आम्ही जितेंद्रच्या भावांना भेटायला सायबर कॅफेत गेलो. फॉर्मल कपड्यांत वावरणारे आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले हे दोघं दररोज पहाटे मासेमारी करत असतील, असं त्यांच्याकडे बघून कुणालाही वाटलं नसतं. त्यांच्याही बोलण्यातून लग्नाबद्दलची चिंता आणि निराशा डोकावत होती.
टीन शेड – एक वसाहत
तिसऱ्या दिवशी आम्ही राजघाट गावातून विस्थापित झालेल्या लोकांना भेटायला टीन-शेड वसाहतीत गेलो. टीन-शेड हे वसाहतीच नाव आणि त्याचा शब्दशः अर्थ पत्र्याचं छप्पर. या वसाहतीत दहा बाय पंधराच्या पत्र्याच्या खोल्या ओळीनं बांधलेल्या होत्या चाळीसारख्या. राजघाटवरून माणसं इथं येऊन राहिलेली. खोलीच्या चारी भिंती आणि छप्परही पत्र्याची. जानेवारीतच अंगाची लाही लाही होत होती, तर पुढचे उन्हाळ्याचे तीन महिने ते कसे काढणार होते, याची कल्पनाच केलेली बरी.
आम्ही भावना सोळंकी यांच्या घरात गेलो. त्यांनी बसायला खुर्ची दिली. मी त्यांनाही बसायचा आग्रह केला तर पदर डोक्यावर घेत त्या म्हणाल्या, ‘आमच्या सासरी आम्ही कोणी खुर्चीवर बसत नाही. दरबार समाजात असं पाहुण्यांसमोर तोंड वर करून बसलेलं चालत नाही. मला खूपच अवघडल्यासारखं झालं होतं. पण त्यांनी काही बसायचं ‘धाडस’ केलं नाही.
भावनाताई दीड वर्षापासून टीनशेडमध्ये राहतात. राजघाटमध्ये त्यांची आठ-दहा एकर शेती आणि घर होतं. घर पूर्ण बुडालं नाही, मात्र शेती पाण्याखाली गेली. तिच्या कुटूंबात दोन मुलं, नवरा, सासू-सासरे. कुटूंब मोठं असल्याने तिला टीनशेडमध्ये दोन खोल्या मिळाल्या खऱ्या. पण पाणी, वीज कशाचीही सोय नाही. पाण्यासाठी रोज टॅंकर येतो. विस्थापितांची जबाबदारी घेतलेल्या प्राधिकरणानं वीजबील थकवलं म्हणून वीजही कापली गेली होती. आताही आकडा टाकून चोरून वीज घेतल्याचं, भावनाताईंनी सांगितलं. घरात आंघोळीसाठी साधी मोरीही बांधून दिलेली नाही. कचऱ्याची, सांडपाण्याची व्यवस्था धड नाही, सार्वजनिक शौचालयं पाण्याविना अतिशय घाणेरड्या अवस्थेत आहेत. बाहेर लहान मुलांना खेळायला पुरेशी आणि स्वच्छ जागा नाही. लहानग्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये दिवसभर बसवत नाही, म्हणून सगळीच माणसं दिवसभर उंबऱ्यावर घराबाहेर बसून असतात. असं हे विस्थापन.. ज्यांचं सगळंच ‘विकासा’साठी हिरावून घेतलं, त्यांचं हे पुनर्वसन! सरकारी अधिकारी मात्र ‘होईल’, ‘मिळेल’ अशी खोटी आशा दाखवून त्यांची बोळवण करतात.
विस्थापितांची वसाहत, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, गावागावांमधून दिसलेली उध्वस्त घरं हे सगळं इतकं डिस्टोपियन असलं तरी ही माणसं चिवटपणे आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. या माणसांना भेटून मी परतीच्या प्रवासाला लागले. पाण्यातल्या मासोळ्यांसारखे मनात विचार उडया मारत होते. चिखलीत भेटलेली अगत्यशील मेहली पावरा, संतोष पावराचं घर, खाऱ्याबादलला महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर पाहिलेला सूर्यास्त हे सारं मनात घर करून राहिलं. बालमेळ्यात मुलांनी सादर केलेलं तारपानृत्य, निसर्गसंवर्धनावर आधारित नाटुकली या आठवणी आजही रुंजी घालतात. इथला विस्थापित आदिवासी शोषित आहेच, पण तो मनाने कडवट झालेला नाही तर इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या घासातला घास देणारा आहे. ही माणसं समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा तिथं जावं, असं अजूनही वाटतं. या सगळ्या आठवणींसह मला समृद्ध करणारं एक चित्र कायमचं माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. बालमेळ्यादरम्यान अनेकदा शेकडो मुलांचा समूह मेधाताईंसोबत ‘जीवनशाळा की क्या हैं बात, लढाई पढाई साथ साथ’ अशा घोषणा देत होता. या मुलांनी हाताच्या मुठी वळून दिलेली ‘आमु आखा एक से’ ही घोषणा सातपुड्याच्या खोऱ्यात गुंजत होती, तिचा आवाज अजूनही मला ऐकू येतो. नर्मदेच्या, माणसांच्या अस्तित्वासाठी पोरासोरांनीही एकदिलानं दिलेला हा नारा ऐकून सातपुड्यासह नर्मदेलाही भरून येत असेल.
Awful reality. Each blessing is accompanied with hidden layers of misery and anguish. Vested interests, corruption etc. override and obstruct any meaningful, prompt and effective remedies to lingering issues impacting ordinary folk. Sincere appreciation of those who are working tirelessly to rehabilitate families that have been displaced.
The reality experienced and graphically described by Priyanka Tupe needs to be highlighted as much – if not more – as the heavily publicised Sardar Sarovar project. The ‘travel’ here though adventurous is incidental to the finding of the truth which the traveller has admirably done. I liked the piece.