प्रशान्त बागड

अनाठाय


back

अरूप आता मोठा झाला होता. मोठा म्हणजे वयाने मोठा. थिसीस पूर्ण करून, डॉक्टरेट पदरात पाडून, दरम्यानच्या काळात एक-दोन लहान-मोठ्या विद्यापीठांमधे छोट्या-मोठ्या तात्पुरत्या नोकर्‍या करून, चेहर्‍यावर थोडासा प्रौढपणा घेऊन तो उत्तरेकडे निघून आला होता. त्याला पहिल्यापासून वाचनाची आवड होती. सर्व जण ते बघायचे. वादविवाद, कथाकथन वगैरे गोष्टीही तो करायचा. नंतर तर तो सायन्स सोडून आर्ट्सलाच गेला होता. नातेवाईक म्हणायचे, “हा संन्यासी होईल, याच्या स्वभावात विरक्ती आहे; याला पैशाचं वेड नाही; असे लोक कुटुंबाची, घरादाराची पर्वा करत नाहीत.” आता तो खरोखर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यात झोपडी बांधून राहू लागला आहे, अशी अफवा या बेरकी नातेवाईकांनी फराळ करता करता उठवून दिली. पुण्याला थिसीसच्या कामानिमित्त राहत असताना चांभारचौकशा करणारे, नाक खुपसणारे लोक म्हणायचे, “हा सांगतो खरा युरोपात पीएचडी करतोय म्हणून, पण राहतो तर इथेच रिकामटेकडा; चेहर्‍यावरून तर तसं काही वाटत नाही.” विद्यापीठातले काही टोळभैरव अकादमिक आवेशात कुत्सितपणे म्हणायचे, “अशा पेरिफेरल विषयांना फारसा स्कोप नाही हल्ली.” या अफवांच्या, टोमण्यांच्या गर्दीतून वाट काढत, वैतागत, लोकांना वारेमाप शिव्या देत, आबोदाना धुंडत तो उत्तरेला आला होता. दिल्लीच्या छायेतल्या एका गावात त्याला प्राध्यापकी मिळाली होती. हिमालय इथून फारच दूर होता. बनारसही दूरच होतं. दिल्लीही तसं जवळ नव्हतं; ट्रेननेसुद्धा आठ-दहा तास लागायचे. त्याला दिल्लीला, पुण्यामुंबईला रहायचं नव्हतं. किड्यामुंगीसारखं जगायचं नव्हतं. नळाच्या तोटीतल्या तोतर्‍या धारेत आंघोळ करत तर मुळीच जगायचं नव्हतं. असे किडेही त्याच्या अंगात होतेच. उत्तरेकडे जात असल्याचं त्याने कुणाला कळवलं नाही. मित्र फार नव्हतेच. इंग्लंडच्या अंधार्‍या, उदास, ठप्प हवेत थिसीसचं वेटोळं स्वतःभोवती पडत असताना भारतातले, महाराष्ट्रातले, गावाकडचे, पुण्यामुंबईतले थोडे मित्र आणि जराशा वा लांबच्या परिचयाचे समवयस्क लोक नोकरीला लागून, लग्न करून मोकळे झाले होते. इंग्लंडमधल्या वास्तव्यात हे लोक विचारात कधीकधी अगदी जवळ आल्यासारखे वाटायचे. प्रत्यक्षात त्यांना जवळ घेणं शक्य नव्हतं, परवडणारं नव्हतं. असा तो उत्तरेकडे निघून आला होता. 

तर इकडे प्रचंड ऊन पडायचं. वेड्यासारखं ऊन. सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्रीपासून पहाटेपर्यंत सतत गरम व्हायचं. त्यात अफाट ह्युमिडिटी. भयंकर घाम यायचा. मुंबईच्या हवेची आठवण यायची. मुंबईच्या हवेचा त्याला थोडाफार अनुभव होता. पण ही ह्युमिडिटी मुंबईच्या ह्युमिडिटीला मागे टाकणारी होती. गंगेचा आणि या दमट हवेचा काही संबंध नव्हता बहुतेक. हा विचित्र सब-ट्रॉपिकल रिजन होता. अशा प्रदेशात म्हणे अशीच हवा असते. घाम पुसून, हाशहुश करून, आता बरं वाटेल, जरा वेळाने बरं वाटेल अशी आशा बाळगून बाळगून माणूस बेजार व्हायचा. तो कायम पाणी पित असायचा. माठच्या माठ आपण रिते करत असू असं मनात यायचं. पाणी पिताना वाटायचं, मघाशीच तर आपण पुष्कळ पाणी प्यायलो. तरी तो वरकड पाणी प्यायचा. संस्था, वर्ग, रस्ते, कॅँपस दिवसाउजेडी मोकळेपणाने फिरून बघावंसं वाटायचं; पण थोड्याच वेळात जरासं चालल्यावर उत्साहाला ग्रहण लागायचं. ए.सी. असलेलं ऑफिस त्याला दिलं होतं. त्या गार कोठडीत पाणी पित तो बसून रहायचा. आपल्यालाच निःसत्त्व वाटतंय की इतरांनाही असंच वाटतंय असा प्रश्न पडायचा. सुखवस्तू कैद्याप्रमाणे तो काळ कंठायचा. जेवायला, गरजेचं काही विकत घ्यायला, या नाहीतर त्या ऑफिसमधे जॉइनिंगविषयक कामं करायला फक्त तो बाहेर पडायचा. 

अजून उन्हाळ्याची सुट्टीच चालू होती. कॅँपस ओकंबोकं होतं. तुरळक विद्यार्थी इकडे तिकडे दिसायचे. होस्टेलच्या मागच्या बाजूला क्रिकेट, बॅडमिंटन खेळत असायचे. एखादा विद्यार्थी धडपडून कॅच घेताना दिसायचा. बॅटवर आदळणार्‍या बॉलचा आवाज यायचा, चमकायचा. एका गर्ल्स होस्टेलच्या जाळीतून दिसणार्‍या, आतल्या, खाजगी वाटेल अशा कॅँटीनमधे एखाददोन मुली लाल सरबत किंवा तसलं पेय पिताना दिसून जायच्या. वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीची खिडकी, तिला लावलेला वर्तमानपत्राचा कागद, पडद्याचा भाग, दिव्याचा पिंगट प्रकाश दिसायचा. एकदा संध्याकाळी मुलामुलींच्या अशा होस्टेलजवळून हैराण होऊन चालताना बॅडमिंटनची जाळी, आंब्याचं भलंमोठं झाड, बोगनवेलीचा पसारा, कॉरिडॉरमधल्या एक-दोन तुटक्या खुर्च्या, चंद्राच्या दिशेने भुंकणारा कुत्रा बघून, ऐकून त्याला नॉस्तॅल्जिआची की कशाची तरी बाधा झाल्यासारखं होऊन गेलं होतं. सुने दिवस होते. तो दिशाहीन वैराण उकाड्यात असा चालत जायचा. 

एकदा एक कलीग लेक्चर-हॉल्स वगैरे दाखवायला घेऊन गेला. मोठा वर्ग होता. माइकची सोय होती. हिरवा फळा होता. स्वच्छ हिरव्या टणक पाण्यासारखा तो दिसत होता. त्याने टकटक करून पाहिलं, खडूने लिहून पाहिलं. आरामशीर खुर्च्या होत्या. खुर्च्यांच्या रांगा उतरणीनुसार लावलेल्या होत्या. वर्गात भरपूर प्रकाश होता. डावखुर्‍यांसाठी वेगळ्या खुर्च्या होत्या. प्रोजेक्टर होता, त्याचा रिमोट कंट्रोल होता. विचारपूर्वक सगळं काम केलेलं होतं. कलीग त्याची बॅकग्राउंड, इंटरेस्ट्स वगैरे विचारत होता. इंग्रजीत बोलणं चाललं होतं. अधूनमधून हिंदी. अधूनमधून सभ्य जोक, हास्य. कलीग तुंदिलतनू होता. त्याचं पोट त्याचा चेहरा होता. अर्थात बोलण्याबोलण्यात त्याकडे दुर्लक्ष होत होतं. इमारतीच्या बाहेर आल्यावर एका भिंतीवर एक अमूर्त चित्र दिसलं. दोघं तिथे थांबले. चार लोखंडी रंगांची पाती इकडून तिकडून जोडलेली होती. शोभा म्हणून, प्रतीक म्हणून हे चित्र इथे काढलेलं असावं. असं एक चित्र कुठेतरी पाहिलंय, अमेरिकन कलेवरच्या कोणत्यातरी पुस्तकात पाहिलंय, असं त्याला अंधुक अंधुक वाटून, आठवून गेलं. म्हणजे ही कॉपी असेल कदाचित. निदान प्रेरणा तिथून घेतली असावी. त्याने कलीगला मोकळेपणाने हे सांगितलं. कलीग म्हणाला, “चांगल्या कामाची प्रेरणा घ्यावीच लागते, घेतलीच पाहिजे; प्रेरणास्थान मोठं पाहिजे मात्र, ते नीट जज करता यायला पाहिजे; तू तर या विषयातला आहेस, तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे.” कलीगने त्याच्याकडे रोखून पाहिलं होतं. विषय तिथेच थांबला होता. 

जून असेल नाहीतर जुलैची सुरुवात असेल. कडक ऊन होतं. जेवून तो ऑफिस-ओॲसिसकडे तडक परत चालला होता. मनात विशेष विचार नव्हते. तेवढ्यात त्याला पाऊस आठवला. इथे पाऊस पडलाच नव्हता. एकदाही पडला नव्हता. ढगसुद्धा जमले नव्हते कधी. कधीच भरून-बिरून आलं नव्हतं. पावसाआधीचा थंड वारा सुटला नव्हता. महाराष्ट्रात मान्सून आला असेल आतापर्यंत. झिमझिम पावसाच्या आठवणीने तो व्याकूळ होऊन गेला. घाम पुसत, सुस्कारे टाकत ऑफिसमधे शिरला. रजा काढून परदेशी गेलेल्या बुजुर्ग प्रोफेसरचं हे ऑफिस होतं. सध्या त्याला दिलं होतं. त्या प्रोफेसरमहोदयांचं टेबल अवाढव्य होतं आणि त्या टेबलाचे पाय बेढब होते. शिवाय परकेपणा, उपरेपणा वाटत रहायचाच. असा चरफडत तो त्या बराकीसारख्या, लहान परातीसारख्या गारव्यात बसला होता. ‘नशीब’ ही गोष्ट अशा दशेत मनुष्याच्या विचारात दाखल होत असेल असं वाटून तो स्वतःशी हसला होता. 

एकदा चप्पल तुटली. उजवा अंगठा तर तुटलाच, पण डाव्या पायातल्या चपलेचे सरळ दोन तुकडे झाले. थिसीसचा, पीएचडीचा, निराशेचा, या गरमीच्या जंगलात येऊन पडल्याचा हा एकंदर परिणाम असावा. मग ठरवून, बस पकडून, कुठल्यातरी चौकातल्या स्टॉपवर सिक्ससिटर टेम्पो पकडून, रस्त्यावरच्या आवळ्याच्या नि चाटच्या गाड्या बघत, टेंपोतल्या भोजपुरी गाण्यांच्या मसाल्यात दाटीवाटीने बसत, बाहेर लहानमोठ्या घंटा बांधलेली हनुमानाची मंदिरं बघत, ‘अंग्रेजी दवाइयां’ अशा मोठमोठ्या पाट्या असलेली मागे पडणारी मेडिकल दुकानं पाहत, मजल-दरमजल करत तो गावात गेला. गावात म्हणजे शहरात. हिंदीत एवढ्या मोठ्या शहराला गाव म्हणायला कुणी तयार नव्हतं. गाव गावाकडे असतं असंच सर्वांचं सुप्त आकाशी म्हणणं होतं. ते त्याला आवडलं. मध्यवर्ती भागातल्या ‘बाटा’च्या दुकानातून चपला विकत घेऊन, नव्या चपला पायात घालून, जुन्या स्लिपर्स खोक्यात ठेवून, खोकं पिशवीसकट हातात धरून; रस्ते, बाजार, गोंधळलेली रहदारी, बंदुका खांद्यावर लटकवून फिरणारे सामान्य लोक, एखाद्या झाडावरचं माकड, गुटखा खाणारे पोलिस, शिवालयाजवळची बांगड्यांची दुकानं बघत तो फिरत होता, तेव्हा अचानक पाऊस आला. काहीच पूर्वकल्पना नव्हती. छत्री बरोबर घेण्याचा प्रश्नच नव्हता. पाऊस स्वप्नीसुद्धा नव्हता. दहा-बारा मिनिटं थोडा थोडा कंजूस पाऊस पडला. नंतर गजमजायला लागलं, भलंमोठं ऊन पडलं, आकाश उघडं पडलं. तरी एक-दोन रस्त्यांवर पाणी वाहताना दिसलं. रस्त्यांवरचे व्यवहार थोडे शिथिल झाल्यासारखे वाटले. शीतलतेसाठी शैथिल्याचा नवस केल्यासारखं हे प्रकरण होतं. तो चालत कोतवालीजवळच्या चौराह्यावर गेला. कोतवालीची बिल्डिंग ब्रिटिशकालीन असावी. दीडशे रुपये भाडं ठरवून तो ऑटोरिक्षाने परत आला. गावातली-शहरातली गर्दी, गजबज आणि कॅँपसवरची हिरव्याच रंगाच्या विविध छटांमधे लपलेली सोपी विरळता ही विषमता मनात ठेवण्याची कोशीस करत तो खोलीत शिरला. कॅँपसवर बहुतेक पाऊस आलाच नव्हता. तशी एकही खूण येताना दिसली नव्हती. एका शेतात पाऊस पडतो पण शेजारचं, मोठ्या भावाचं शेत कोरडंच राहतं, ही ऐकीव गोष्ट आठवली होती.  

एक कलीग मजेदार होता. त्याला चहा प्यायची, चहा पित कॅँटीनमधे बसायची प्रचंड आवड होती. तो त्याचा एकमेव विरंगुळा असावा. वाटेत कुणी भेटलं रे भेटलं की तो म्हणायचा, “चल चहाला, सुट्टी आहे तोवर चहाकॉफीची मजा, चल.” मग उकाड्यातलं, गरीब झाडाखालचं, हक्काचं कॅँटीन. तासभर तरी ते लोक बसायचे. गप्पांचे विषय सटरफटर. टीव्ही, चॅनल्स, स्मार्टफोन, कपडेलत्ते, ऑनलाइन शॉपिंग ऑफर्स. नवखा असूनही तो हे टाळायचा. एकदा मात्र त्याला जावं लागलं. दोघातिघांनी आग्रह केला. गप्पांमधे काही जान नव्हती. सर्वांना जेमतेम हिंदी येत असल्याचा किंवा निव्वळ औपचारिक इंग्रजी येत असल्याचा तो परिणाम असावा. निरर्थक गप्पांना गप्पिष्टांच्या स्वभाषेची चाह असते. तास-दीड-तास तो मख्ख बसून होता. वर्तुळाच्या आत कोन नसतात, असं काहीतरी आपल्या मनात विचारवंताच्या पोरस्वभावानुसार येतंय का, असं त्याला वाटत राहिलं होतं. तशात अजस्र भूक लागत होती. मग अंधार पडायला लागल्यावर त्याने निरोप घेतला होता. त्या कलीगला तो ‘चहा वसुली अधिकारी’ म्हणायला लागणार होता. त्याच्या कल्पनेतल्या गप्पांमधे तो कलीग हवेत बोट नाचवत म्हणत होता, “चाय ही मेरा उसूल है.” बाकीचे दोघंतिघंही वेळ काढत ठोंब्यासारखे बसून होते असं त्याच्या लक्षात आलं होतं. 

खिडकीत जमलेल्या चांदण्या पाहताना त्याला गावात पाहिलेल्या किरकोळ पावसाची आणि पीएचडीचं संथ काम चालू असताना डिग्री मिळाल्यावर थिसीस बासनात गुंडाळून खोल कुठेतरी दडवून ठेवायचा नाहीतर विहिरीत वगैरे बुडवायचा या अनेकदा केलेल्या खिन्न विचाराची आठवण यायची. मग बायकोला आणि बाळाला इकडे कधी यायला सांगायचं, सामान तिकडून कधी हलवायचं, याचं गणित तो मांडायचा.  

घामाने अंगावरचे कपडे अक्षरशः ओले व्हायचे. दुपारी जेवून ऑफिसकडे परत जाताना शर्ट, बनियन गच्च ओला व्हायचा. ते वाळायला खूप म्हणजे खूपच वेळ लागायचा. काय करावं, काय वाचावं, शिकवायच्या कोर्सची आखणी, तयारी कशी करावी, हे धड लक्षात यायचं नाही. थिसीसपासून, भूतकाळापासून फारकत कशी घ्यावी हे समजायचं नाही. घाम पुसत, पाणी पित इमेल्स, युट्यूब बघून व्हायचं. छोटेखानी फिल्म-रिव्ह्यूज वाचून व्हायचे. कुठल्याशा मासिकात एक लहानसं वर्णन वाचलं. लेखकाने एक तरंगतं फूल पाहिलं. उंच इमारतीतल्या एका घराच्या बाल्कनीतून बाहेर डोकावणारं. त्यामुळे ते तरंगताना दिसत होतं. त्याचा रंग हवेवर किंचित लहरत होता. अवकाशाने फुलाचा आकार, फडफडता रंग अध्धर धरून ठेवला होता. त्याच मासिकाच्या अर्काइव्हमधल्या एका अंकातल्या एका लेखात एक प्रसंग होता. ती त्या लेखकाचं पुस्तक दुकानात पाहते. कव्हर लक्ष आकर्षून घेतं. पहिला परिच्छेद वाचते. सगळं समजत नाही, कवेत येत नाही, पण दरवळत राहतं. एकंदर ड्रिफ्ट, डिक्शन, इमोशन तिला ओढून घेते. ती नकळत त्या काठिण्याला शरण जाते. यात अघोरी इरॉटिक ट्रेस होता. असं वाटण्यासाठी, अनुभवण्यासाठी, लिहिण्यासाठी आपण कधी मोकळे होऊ असा प्रश्न पडून तो भांबावून, कावून गेला होता. भावनांचा काच त्याला या स्थितीत नको नको वाटला होता. ‘द फ्लटर ऑफ द कलर.’ 

पोस्टामागे दुकानं होती. एका स्टेशनरीच्या दुकानात चक्क लिटररी पुस्तकं त्याला एके दुपारी दिसली. तो जवळजवळ वेडावून गेला. आपलं बस्तान बसेल असा आत्मविश्वास त्याला वाटू लागला. हनीफ कुरेशीची जाडजूड नवी कादंबरी, प्रेमचंदांच्या अर्धवट माहीत असलेल्या प्रतिनिधी कहानियॉँ, कलकत्तानिवासी हिंदी लेखिका अलका सरावगीच्या साधारण कथांचं इंग्रजी भाषांतर त्याने विकत घेऊन टाकलं. दुकानदाराने वीस टक्के सवलत दिली. आश्चर्याच्या धक्क्यांचीही साखळी असते म्हणतात. संध्याकाळच्या प्रकाशात हनीफ कुरेशीचं धावतं, खेळतं इंग्रजी गद्य वाचत तो नवे-नवे रस्ते फिरत राहिला.   

आपल्याला एका पार्टीला जायचं आहे असं फिरता फिरता त्याला आठवलं. जाऊ नये असं वाटून गेलं. घड्याळात वेळ पाहिली तर सात वाजले होते. हीच पार्टीची वेळ. पुस्तकं हातात होती. ती तशीच घेऊन तो गेला. पहिलं वाटणं त्याने बाजूला सारलं. कलीगच्या घरी रंगीबेरंगी वातावरण होतं. त्याला निरुत्साह वाटला. मधोमध सॅलड, बुंदी रायता, पाइनॅपल रायता, फळांच्या फोडी, दहीभेंडी, रोटी, पनीर बटर मसाला, पापड, पकोडे, जिरा राइस. आल्यावर लोक लगेच जेवणार होते बहुधा. खोलीच्या मध्यभागी टेबल आणि पदार्थ मांडून ठेवण्याची कल्पना त्याला बरी वाटली. जेवण मागाहून हळूच रहस्य उघड केल्याप्रमाणे पेश करण्यापेक्षा हे चांगलं. तेवढ्यात एक जोडपं आलं. तो धिप्पाड आणि ती नाकात मोठी मोरणी घातलेली. तो म्हणे गायचा आणि ती म्हणे नाटकात काम करायची. तो रवी आणि ती रावी. च्यायला! ते दोघं पुस्तकं आणि त्याचं नवेपण पाहून स्मितहास्य वगैरे करत म्हणाले, “तुला कल्चरल गोष्टींची आवड दिसते.” त्याला पळून जावंसं वाटलं. थोडं जेवून तो होस्ट कलीगचा रीतसर निरोप घेऊन बाहेर पडला. 

त्या रात्री त्याला दोनदा उलटी झाली. सगळं अन्न उलटून पडलं. असहाय वाटलं. तो क्षीण होऊन पलंगावर पडून राहिला. नंतर अंगात तापही भरला. थंडी वाजायला लागली. भेंडी खाताना, रायता खाताना त्याला थोडी अस्वस्थता वाटून गेली होती. शरीराने रचलेल्या त्या नावडपर क्षणिक जैविक कारस्थानाकडे त्याने नवेपणाला सामोरं जाण्याच्या, भूक भागवण्याच्या नादात जरा दुर्लक्ष केलं होतं. आता तापून, अंगावर चादर वगैरे ओढून पडून राहताना, बायकोची-बाळाची आठवण काढताना, त्याला मध्यरात्रीच्या शून्यात एकटं एकटं आणि प्रचंड भावुक व्हायला झालं. निरर्थाच्या रिंगणात तो असहाय मस्तवालपणाने गरगरत राहिला. 

तो एका अकादमीत विद्वानांसमोर उभा होता. तो जाब देत होता. तो निवेदन करत होता. ते आत्मनिवेदन होतं. ती कैफियत होती. ती स्वतःची वकिली होती. जग वसुली करायला आलं होतं. जग प्रश्न विचारत होतं. तो एकटा होता, अकेला होता. तो खुद्द प्रश्न होता बहुधा. त्याच्या कंठात दुःख होतं. त्या दुःखाला विषय नव्हता, कारण नव्हतं. अधूनमधून त्याचा आवाज घोगरा होत होता. त्याच्या हातात गळून पडू पाहणारा कागद होता. त्याचा हात थरथरत होता. तो विनोदी दिसायचा, केविलवाणा दिसायचा. कुणी त्याला हसत नव्हतं. कुणी त्याच्याकडे सतत पाहत नव्हतं. गांभीर्याची वस्त्रं सर्वांच्या अंगावर होती. सर्वांचं मिळून एक अंग होतं? सभेत तो बोलत होता. सभेत ढगांसाठी येण्याजाण्याची सोय केलेली होती. विद्वज्जनांच्या हाताशी पिण्याच्या पाण्याची भांडी होती. वेळ संपत आली की इशारा करण्यासाठीचं उपकरण अध्यक्षांच्या हाताशी होतं. तो म्हणत होता : 

“महोदय, मी कुणी नाही. मी एक जण आहे. माझ्याकडे पीएचडीचा अनुभव आहे. आपलं आर्ग्युमेंट मांडायचा सराव करायचा असेल, आपलं म्हणणं नीटनेटक्या पद्धतीने लिहिण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर पीएचडी करण्याची गरज नाही, हे माझ्या उशिरा लक्षात आलं. चांगल्या गोष्टी उशिरा लक्षात येतात किंवा उशिरा लक्षात येणार्‍या गोष्टींना आपण चांगल्या गोष्टी म्हणतो. अशा गोष्टींना आपण सत्यही म्हणतो. सत्य ठराविक काळानंतर, चाकोरीनुसार काहीएक जगणं पार पाडल्यानंतर कळावं, अशी आपली योजना असावी. सत्य हे नेहमी मागाहून लक्षात यावं असा आपला असंकल्पित असा पण प्रत्यक्षात कार्यरत असलेला उद्देश असावा. तो तसाच राहू देण्यात आपल्याला साफल्याचा अनुभव येत असेल. बघा, या माझ्या बोली वाक्यांवर देखील पीएचडीचा परिणाम झाला आहे. साधंसं म्हणणं मी टेढंमेढं करून सांगतो आहे. ते असो. माझ्यासारखा माणूस अंतराची व कालांतराची कल्पना करूनही थकून जातो. काहीएक जीवन जगल्याचा अनुभव घेणं तर माझ्यासारख्याच्या जीवावर येतं. एका क्षणी, एका बिंदूशी काहीतरी कळून जाईल, काहीतरी मिळून जाईल, ही पद्धत मला बरी वाटते. या विचारांचं धुकं माझ्या डोक्यात कायम असतं. मी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. ते असो. पीएचडीची चार-पाच-सहा-सात वर्षं म्हणजे तारुण्याचा नाश, शक्तीचा नाश, स्वतःचा नाश. पीएचडी एका वर्षापुरती ठेवावी अशी माझी विनंती आहे. पन्नासेक पानांचा निबंध विद्यार्थ्याने लिहावा. म्हणजे तो पुरेसा दीर्घ असेल. जाड्या थिसीसमधे मांडलेलं असतं त्या प्रकारचं म्हणणं या निबंधात थोडक्यात मांडलं जाईल. शिवाय इतर अभ्यासकांच्या अभ्यासाचा निर्देशही निबंधात थोडक्यात करता येईल. विचारांना चटकन आकार हवा असतो, विचारांचा कल स्फूर्तीतून व्यक्त होण्याकडे असतो, याकडे आपलं दुर्लक्ष झालं आहे. दीर्घता, कालांतर, लांबण हे विचारांचे शत्रू असतील, निदान विचारांसाठी घातक असतील, अशी दाट शक्यता आहे. पीएचडी विचारांवर हल्ला करते, त्यांना दाबून टाकते, नमवून टाकते. ती विचारांना आत्मविश्वासाचा ऑक्सिजन मिळूच देत नाही. मॉँटेनचे निबंध घ्या. ते शेक्सपिअरने तेव्हा वाचले होते. आजही लोकप्रिय आहेत. मॉँटेन लहान-मोठे निबंध लिहितो. प्रत्येक निबंधात अभिनव किंवा क्रांतिकारक विचार नसेल; पण ताजेपणा आहे, लहानमोठं नवल आहे. पीएचडीच्या प्रबंधात हे गुण नसतात. या गुणांच्या  अभावात वाढणारं, सरपटणारं काहीतरी तिथे असतं. एका वर्षात लिहिलेल्या पन्नासपानी निबंधाला पीएचडी म्हणता येत नसेल तर नका म्हणू, पण त्याला निदान पीएचडीचा दर्जा द्या आणि लोकांना विचार करण्याची मुभा व फुरसत मिळू द्या, अशी माझी कळकळीची विनंती आहे. मी थकलो आहे. प्रबंध प्रकाशित करा, प्रबंधाला पुस्तकाचं रूप द्या, असं आता जो-तो मला म्हणतो आहे. आधी प्रबंध लिहायचा, मग त्याला पुस्तकरूप द्यायचं, हा केस पांढरे करून घेण्याचा उपाय आहे. माणसाने अनेक लहानमोठे विचार मांडले आहेत आणि तो तरुणच राहिला आहे, खंगलेला नाही, दुसरं काही करतो आहे, हे चित्र प्रत्यक्षात उतरणं खरंच अशक्य आहे का? पीएचडीच्या प्रबंधाला शिस्त असते, कसून केलेलं प्राइमरी व सेकंडरी लिटरेचरचं वाचन त्याच्या पायाशी असतं, हे मला मान्य आहे. पण अशी शिस्त आणि असं वाचन निबंधाच्या मुळाशीही असू शकतं. दर वेळी त्या वाचनाची जाहिरात कशाला करायला हवी? असं वाचन नसेल तर आपोआपच विचाराला आजची भाषा गवसणार नाही. निबंध हलकेफुलके असतात असा जर आक्षेप असेल, तर प्रबंध पोकळ असतात असा आक्षेप घेता येतोच ना? काहीतरी करा, पण पीएचडीचा विषय मनावर घ्या. यातून मानवजातीची सुटका होणं आवश्यक आहे. मानवजात तिचा दुसरा बळी आहे. पहिला बळी विचारांचा आहे. महोदय, तुम्ही स्वतः आणि तुमच्या सोबत असलेले इतर विद्वज्जन या चक्रातून गेला आहात. तुम्हाला माझ्यासारखाच अनुभव असेल. शेवटी गाडं अनुभवाशी येतं. अनुभवाचा अर्थ लावावा लागतो हे मला मान्य आहे. क्षणकाळ तरी माझ्या रीतीने अर्थ लावून बघावा अशी माझी नम्र विनंती आहे. मला थंडी वाजतेय. इथे फार ढग आहेत. वाराही आहे. एसी चालू असावा. कृत्रिम ढग असावेत. बाहेरून पीएचडीच्या पाठिराख्यांचे आवाज येत आहेत. महोदय, मी थांबतो. एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्यावर आपण पूर्ततेच्या आनंदात गर्क होऊन प्रवास का विसरून जातो? मी आता थांबतो.”

ग्लानीतल्या आवर्तात तो भिरभिरत राहिला. दोनेक दिवस असे गेले. दग्ध-विदग्ध मनाने तो जगात पुन्हा उतरला.  

उन्हाचा, उकाड्याचा, घामाचा मौत का कुआं. मेसमधली पेलाभर लस्सी तो क्षणात पिऊन टाकायचा. वर दोन-तीन ग्लास पाणीही प्यायचा. लस्सीमुळे त्याच्या तहानेला आणखी चेव यायचा. तो पाण्याची चवसुद्धा पिऊन टाकण्याच्या निर्धाराने पाणी प्यायचा. कोर्सची पुस्तकं बघून ठेवावी, लायब्ररीशी ओळख करून घ्यावी, म्हणून तो एका दुपारी लायब्ररीच्या गुहेत गेला. एसीच्या गारव्यात लायब्ररी आत्मदंग होती. काही दिवसांपूर्वी तो लायब्ररी पाहून गेला होता. ती प्रयोजनमूलक भेट होती. त्याने ग्रंथसंग्रहाकडे, रेफरन्स विभागाकडे कटाक्ष फक्त टाकला होता. वेळ कमी होता. तो गराड्यात होता. आता एका दिव्याच्या चांदीसारख्या प्रकाशात एक मुलगी आणि एक मुलगा हसत कुजबुजत बसलेले दिसले. शेजारी लॅपटॉप होता, वह्या होत्या. हे दृश्य त्याला बरं वाटलं. कधीकधी इतरांचा लहानमोठा मानवीपणा त्याला सुखावून जायचा. कदाचित तो इतरांमधून हिशेबीपणा, हेतूप्रधानता, यंत्रगती हळूहळू वजा करत यायचा आणि उरलेल्या मानवीपणापाशी थांबायचा. तेवढा भाग त्याला आवडायचा. अशी विचारक्रिया या संस्थेत जॉइन झाल्यापासून सुरू झाली होती का, असा अशब्द प्रश्न त्याला पडलाही असावा. एसीची व्यवस्था असल्याने खिडक्या, दारं बंद होती; धूळ जवळजवळ नव्हती; पुस्तकं साफ होती. एक-दोन फिजिक्सची पुस्तकं, एक-दोन हिस्ट्री ऑफ सायन्सची पुस्तकं काढून तो खुर्चीवर टेकला. लायब्ररीतली शांतता त्याला जाणवली. त्या शांततेच्या पटावर हे पुढ्यातले शब्द होते. टी-शर्ट नि पायजमा घातलेले विद्यार्थी इकडून तिकडे जात होते. समाजशास्त्राच्या कपाटांच्या खोबणीत एक विद्यार्थी गार फरशीवर झोपलेला दिसला. तो पुस्तकं चाळत बसला. पाठीला रग लागली. खुर्ची खोलगट होती. तो दुसर्‍या खुर्चीवर बसला. ती खुर्चीही तशीच. टेबल खुर्चीच्या मानाने फारच उंच होतं. त्याने चालून एक-दोन दालनं पाहिली तर सगळीकडे अशाच टेबलखुर्च्या दिसल्या. तो खट्टू झाला. एक साइंटिफिक मेथडवरचं नवंकोरं पुस्तक इश्यू करून घेऊन तो बाहेर पडत होता तेव्हा लायब्ररीतला एक स्टाफ-मेंबर भेटला. त्याने याला स्वागतसत्रात पाहिलं होतं. त्याने विचारपूस केली. लायब्ररी कशी वाटली असं विचारलं. याने सरळ टेबलखुर्चीचं सांगितलं. याने औपचारिकतेचा मुलाहिजा ठेवला नाही. तो स्टाफ मेंबर मनुष्य अचंबित झाला, त्याच्या चेहर्‍यावर सूक्ष्म हसू तरळलं. पहले तो किसीने ऐसा बताया नहीं सर, असं त्याचं म्हणणं होतं. स्टाफ-मेंबरला लायब्ररीचा अभिमान होता. का नसावा? हा नवा मनुष्य सपशेल चुकला होता. आनंदाला लागलेली ही तीट त्याला प्रिय आणि अप्रिय वाटत राहिली. 

त्याने अमेरिकन मित्राला मोठी इमेल लिहून आपली दशा कळवली. नोकरी तर बरी नि मनासारखी मिळाली, पण इथे काहिली आहे, भयंकर घाम येतो, घाम पुसत दिवस काढावे लागतात, काही सुधरत नाही, कपडे काढून टाकावेसे वाटतात, त्यात मला अद्याप स्वतःचं ऑफिस नाही, सगळं अधांतरी आहे – असा सूर त्याने लावला. तुम्ही अमेरिकन लोकांनी स्तोम माजवलेल्या ‘गॅँजेस’ची इथे नामोनिशाणी नाही. आमच्या वर्तमानपत्रांमधे गॅँजेसमधल्या गाळाच्या बातम्या येतात. तुमच्या डॉक्युमेंटर्‍यांमधे पाहिलेली नितळ गॅँजेस कुठे आहे? माझा रोमॅँटिकपणा पार उडून गेला आहे. राहून राहून तुझ्या तोंडून ऐकलेला ‘copse’ शब्द आठवतो. घाम पुसत मी कोर्सचा, लेक्चर्सचा विचार करतोय. पीएचडीच्या खोड्यानंतर गळ्यात हे आलंय. आताही मी टाइप करता करता घाम पुसतो आणि सुकवतो आहे. एक कलीग म्हणत होता, “आता तिशीचा पैलतीर यूं गाठशील तू कोर्सेस शिकवून शिकवून; दशक उलटताना आपण इथेच असेच उभे असू, हा हा हा.” याला जीवन म्हणतात? नवे कोर्सेस फ्लोट करणं, उगाच लेक्चरबाजी करणं, तरुण विद्यार्थी तरुणच राहून या जागेला जुनी लेखून, आपल्याला मागे टाकून आपल्या डोळ्यांसमोरून निघून जाणं, हे जीवन म्हणावं? मला पळून जायचं आहे. दुसरी पीएचडी परवडेल. मी एकटा कुहरात उदास उतरत राहीन. इथे आधीच भिंत दिसते आहे. त्यात मी आज लायब्ररीत गेलो. इतके दिवस टाळत होतो. आज हिय्या करून गेलो. खुर्च्या अजिबात कम्फर्टेबल नाहीत रे. आणि जर्नल्सना, जरा जुन्या झालेल्या पुस्तकांना लगेचच्या लगेच जाडं जाडं जांभळं बाइंडिंग करून ठेवलंय. आपल्या लायब्ररीत तपकिरी नाहीतर काळं बाइंडिंग होतं. काय करावं सुचत नाही रे. महाराष्ट्रात परत जाऊ का? दक्षिणेत निघून जाऊ का? मला इंग्रजीत एम.ए.ही करायचंय. ते करू? की समाजकार्य करू? जेवायला गेलो तरी घाम येतो आणि फिरायला गेलो तरी घाम येतो. घाम पुसत रात्रीचा चंद्र बघायची पाळी माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदाच आली आहे. असं त्याचं दुःख-पुराण इमेलवर मोठं मोठं होत गेलं, कंठात सलणारं आभाळ गोळा होत गेलं. 

दीडेक दिवसांनी मित्राचं लांबलचक सांत्वनपर उत्तर आलं. तो म्हणाला, “कामूच्या कादंबरीतल्यासारखं तुझं वातावरण वाटतंय. घामट, चिकट हवा, तप्त सूर्य, उन्हाचा जाच. हे नि ते वरवरचं. किंवा खोलातलंच. असा तू फिरतोय. आय मीन, बसतोय. कलीगचं मनावर घेऊ नकोस. तो पोक्त असेल. तू सुरुवात करतो आहेस. तुझ्याकडे मॅप नाही. तू म्हणतोस, चांगले चांगले विद्यार्थी तिथे येतात, तर तू शिकवून, त्यांच्याशी बोलून त्यांना घडवशील ना. क्लिशे वाटेल, पण असं आहेच ना? लाइफ म्हणजे कोर्स फ्लोट करणं नाही हे बरोबर, पण कोर्स फ्लोट करता करता, काहीतरी करता करता सूर सापडतो ना. तू नवानवा आहेस. ही स्थिती उत्तम. स्वतःला उन्हात बेक करून घेऊ नकोस. आणि लायब्ररीबाबतचा क्रेझिनेस बाजूला ठेव. तू कामूसारखं काहीतरी लिहिशील. पुढच्या वेळी एवढं डिस्ट्रेसिंग लिहून पाठवू नकोस. तिकडे गॅरी प्रोफेसर झाल्याचं ऐकलं. तुला आनंद होईल म्हणून मुद्दाम कळवून ठेवतोय. तू बाप आहेस आता. तुझी जगाशी किमान ओळख आहे असं बाळाला भासवावं तरी लागेल ना? काय करावं, काही करावं का, याचा माझा विचार चालूच आहे.”  

लायब्ररीतला जिना उतरता उतरता हा मित्राला मनात म्हणत होता, “तू साला सार्त्रचा भक्त. तुलाही कामूच्या पुस्तकातलं ऊन, घाम फक्त दिसतो. खून दिसत नाही. सार्त्र त्या लेखात खुनाबद्दल एक शब्द लिहीत नाही. माझ्यासारख्या अरबाचा खून. तू साला गोरा अमेरिकनच.” तेवढ्यात पायरी चुकून हा खाली पडला. अगदी गडगडला नाही, पण दोन-तीन पायर्‍या खाली आला. हात-पाय सुरक्षित होते. समोर बसलेल्या मुलांकडे पाहून हा स्वतःच स्वतःवर हसला. हे फार तर निर्हेतुक विनोदी अधोगमन होतं. अंग थोडं दुखत होतं. त्या मुलांमागे एन्सायक्लोपिडिआजच्या रांगा होत्या. वर पंखा तुफान गरगरत होता. हा नवा लेक्चरर आहे हे त्यांना कळलंच असेल. 

अरूप बराच सेल्फ-कॉन्शस होता. आपल्या विचारक्रियेबद्दल तो भान बाळगून असायचा, सजग असायचा. आपल्या मनात येणारे विचार, कल्पना, आठवणी, स्वप्नं, विनोद, लहानमोठ्या संवेदना यांच्याबद्दल तो सदोदित विचार करत असायचा. आपली जाणीव अशी बहुस्तरीय आहे याचा त्याला सुप्त आनंद वाटायचा. सर्वांना अशा प्रकारे एकाच वेळी विविध पातळ्यांवर राहता येत नाही, असं इतरेजन म्हणायचे. त्याने स्वतः स्वतःपाशी असं कधी म्हटलं नव्हतं. त्याला आपली बहुस्तरीय जाणीव जणू अबोध राहू द्यायची असायची. म्हणजे एवढा सबोध अबोधपणा त्याच्याकडे होता. 

आपण बाहेरून या प्रदेशात आलो आहोत; आपली नजर परक्याची, बाहेरच्याची आहे; ही स्वाभाविक गोष्ट त्याच्या लक्षात आलीच होती. आपण कुठून नि कशाला इथे येऊन पडलो असा आपला आविर्भाव आहे, असं त्याला जाणवायचं. इथलाच माणूस असे उद्‍गार काढणार नाही, असा अस्वस्थ होणार नाही, हे त्याला उमगायचं. पण हा केवळ स्थानिक आणि परका असा फरक नव्हता. स्थानिक माणूसही उन्हाला, दमट हवेला, बेशिस्तीला वैतागत असेलच. पण या बाहेरून आलेल्या इसमाच्या वाटण्याला, सुखदुःखविषयक कल्पनांना, एकंदर दृष्टिकोनाला आणखी एक मिती होती. तिचं मूळ कशात आहे हे तो शोधत असावा. इथे असं आहे, आपल्याकडे असं नाही; आपल्याकडेही ऊन असतं, पण इथलं ऊन म्हणजे – असण्याचं असं द्विभाजन तो सोबत घेऊन आला होता. स्थानिक माणूस मात्र एकात, एकाकारात राहत होता. स्थानिक माणसाच्या वैतागाच्या पायाशी दुसरी भूमी नव्हती. हे द्विभाजन या बाहेरच्याच्या स्थितीतून उद्‍भवलं होतं. पण स्थिती हे मूळ नव्हे. मूळ शोधण्यासाठी अजून मागे किंवा खोल गेलं पाहिजे. 

आपण या परिसराकडे आपल्या बाजूने पाहतो. आपल्याला आपली दृष्टी महत्त्वाची वाटते. आपल्याला काय खुपतं, आपल्याला कशामुळे बरं वाटतं, या आधारे आपण या परिसराकडे पाहतो. ‘पाहतो’ हा शब्द महत्त्वाचा आहे. आपण पाहतो; आपण मिसळत नाही; आपण तडक या परिसरात जगायला लागत नाही. आपण प्रेक्षकाची, निरीक्षकाची भूमिका आपलीशी करतो. उन्हाच्या वेळी घरात बसलेल्या माणसाचं उदाहरण घेऊ. तो घरात, खोलीत, चार भिंतींत बसलेला असतो. आत थोडंफार गरम होत असेल, पण त्याला थेट ऊन लागत नाही, सूर्य त्याच्या डोक्यावर नसतो. या माणसाला बाजारातून भाजीपाला आणायचा असतो. कपडे घालून, चपला-बूट घालून, टोपी घालून किंवा छत्री घेऊन तो बाहेर पडतो. पिशवीही घेतो. आपोआप गोष्ट तयार व्हायला लागते. मग उन्हाचे चटके जाणवतात, घाम यायला लागतो, तहान लागते. अनवाणी भिकारी किंवा बेघर मनुष्य दिसून जातो. ओळखीचं कुणीतरी भेटतं नि म्हणतं, “काय ऊन आहे हो!” मग भाजीपाला घेऊन हा मनुष्य घरी येतो; कपडे-बिपडे काढून, हातपाय धुवून, घराच्या सावलीत, गारव्यात बसतो; घरच्यांना स्वतः नुकत्याच अनुभवलेल्या उन्हाळ्याची हकीगत सांगतो. तो उन्हाच्या बाजूला नसतो. तो उन्हाच्या बाजूने बोलत नाही. ऊन त्याला खरं, मोठं, असणं लाभलेलं वाटतच नाही. ऊन ही बला असते. तो घराच्या पक्षात असतो, तो स्वतःच्या बाजूने बोलतो, तो स्वतःच्या वाटण्याला व अनुभवाला महत्त्व देतो. आपण, आपलं घर, इतर लोक, इतर घरं या उन्हात, या उन्हाळ्यात, या गावात, या काळात राहतो, हे तो मान्य करत नाही. उन्हाळा आपला भाग आहे, हिस्सा आहे, हे त्याच्या गावी नसतं. आपलं वागणं उन्हाळी घरात बसलेल्या या माणसासारखं आहे, हे त्याच्या ध्यानात येत होतं.  

उन्हाच्या वेळी घरात बसलेला हा मनुष्य घराला केवळ सुरक्षित जागा मानत असतो की घर हा त्याला आपला मूळ कोश वाटतो, आपली खरी स्थिती वाटते? हा प्रश्न अवघड आहे. घरातला मनुष्य बहुधा घर उन्हात आहे, घर उन्हापासून आपलं रक्षण करतं, अशा विचारानिशी घरात बसतो, घराला मानतो, घरापासून गोष्टीची सुरुवात करतो. हा बाहेरचा इसम मात्र आपल्या प्रदेशाला, गावाला, सोडून आलेल्या परिस्थितीला उगीच आपली खरी स्थिती—आणि आपली आदर्श स्थिती—मानून वागत-बोलत राहतो. हे सूत्र ध्यानात येणं किंवा घेणं हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरण्याचा, या धक्क्यामुळे झालेल्या पडझडीतून उठण्याचा प्रयत्नही तो आस्थेने, स्वतःविषयीच्या आपलेपणाने करत होता. 

अरूपच्या कॉन्शस विचारप्रक्रियेत अजून एक धागा होता. आपण ज्या परिसरात वा जागेत राहतो, वावरतो, इतरांबरोबर चालतो-बोलतो, तो परिसर वा ती जागा आपल्या लेखी असते, आपल्याला वाटते तेवढी मोठी, मोकळी, विस्तीर्ण व विस्तारशील नसते. आपण हे क्वचितच मान्य करतो. जागेचा विस्तार आपल्या भावनांना अनुसरून व विचारांना अनुरूप असा होत असतो असंच आपण धरून चाललेलो असतो. हा धागा शब्दांकित वा भानांकित व्हायला एका पिक्चरचं निमित्त घडलं. 

दिवसभर कंटाळल्यावर गेस्टहाऊसमधल्या आपल्या लहान खोलीतल्या टीव्हीवर लागलेला एक थ्रिलर सिनेमा संध्याकाळी पाहत अरूप बसला होता. सिनेमा बंद करून बाहेर बरी संध्याकाळ आहे का ते पाहून यावं असं सारखं मनात येत होतं; पण खुनी कोण असेल याची उत्कंठाही लागून राहिली होती. संध्याकाळ जणू अभ्यासक्रमातल्या एखाद्या प्रकरणासारखी बाहेरून लक्ष ओढून घ्यायची, विवेकबुद्धीला टोचायची; पण सिनेमातले रंग, प्रसंगांचे ताणेबाणे, मुख्य पात्र असलेली भयभीत स्त्री, तिचं प्रशस्त घर त्याला बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. एका प्रसंगात ही मुख्य अभिनेत्री संशय वाटून आपल्या मैत्रिणीच्या घरी जाते. ते घर सायंकाळच्या, रातकिड्यांच्या आवाजाच्या कुपीत लपलेलं असतं. उंच जिन्याच्या पायर्‍यांवर, सरसर पसरत गेलेल्या लांबसर दिवाणखान्यातल्या फरशीवर, दिवाणखान्याने सहज सामावून घेऊन अलगद मांडून ठेवलेल्या सोफ्यांवर, खुर्च्यांवर, टेबलांवर, फुलदाण्यांवर, भिंतींवरच्या फोटोंवर, ॲण्टिक सुरयांवर, मातीच्या एथनिक घड्यांवर, दारांच्या चौकटींवर मासूमसा संधिप्रकाश पडलेला दिसतो. एका कोपर्‍यात सहज बसलेल्या मनुष्यासारखी बसलेली, सरबत की दारू पित असलेली, स्वतःच्या केसांशी चाळा करून स्वतःवर प्रेम करत असलेली मैत्रीण दिसते. मुख्य अभिनेत्री दचकते, तिचे डोळे विस्फारतात, भीती तिच्या देहाचा कब्जा घेते. मैत्रीण मात्र तिच्या येण्याची, खळबळीची भयपटातल्या संशयिताप्रमाणे दुर्लक्षयुक्त दखल घेत म्हणते, “ये, तू येशील असं वाटलंच होतं मला, मी तुझी वाटच पाहत होते.” भीती, संशय, राग, अनुराग, असूया, द्वेष या भावनांना या मोठ्या घराचा, या प्रशस्त अवकाशाचा उदार आश्रय आहे असं अरूपला वाटून गेलं होतं. मुख्य अभिनेत्री आपल्या मोकळ्या घरून इथे आली होती. मैत्रीण आपल्याच मोकळ्या बंगल्यात स्वतःला जपत बसलेली होती. हा सबंध भयपट अशा मोठाल्या जागांवर घडत होता. जागा भावभावनांना आकुंचित करत नव्हती. त्यामुळे प्रत्येक पात्र भीतीचं, संशयाचं, सूडाचं स्पष्ट, तल्लख, विमुक्त रूप अनुभवत होतं. जागा लहान असत्या तर या भावना फाटल्या असत्या, संकुचित झाल्या असत्या, विपर्यस्त रूपात प्रतीत झाल्या असत्या. मग सगळ्याच भावनांची घुसमट झाली असती. ही प्रशस्त स्थळं भीतीची वा संशयाची कोंडी करत नाहीत, त्यांना भरपूर वाव देतात. फिल्ममेकर्स कदाचित अशा धर्तीचा विचार करत नसतील. त्यांना श्रीमंती थाटाचे, आलिशान वाटतील असे बंगले दाखवायचे असतात. प्रेक्षकांच्या अभिलाषेची नस त्यांना थोडीबहुत माहीत असते. फिल्म्सची आपल्या मनावर गाढ छाप पडून आपल्या सुखदुःखांनाही जंगी, प्रशस्त, श्रीमंत स्थळांचा आसरा असतो, परिमाण असतं असं आपल्याला वाटू लागत असेल असं अरूपच्या मनात भरत गेलं होतं. म्हणजे अत्यंत लहान, कोंदट जागेत वावरतानाही आपल्या सुखाला व दुःखाला स्थळाचं, अवकाशाचं मोठं परिमाण आहे असंच आपल्याला वाटत असेल असं जाणवून तर अरूपची धायमोकल अवस्था होऊन गेली होती. आपली जागाच लहान असेल तर? आपली सुखदुःखं घडतात ते स्थळच तुटपुंजं असेल तर? 

चित्र सौजन्य: राम कुमार, १९९३. वढेरा आर्ट गॅलरी, नवी दिल्ली

प्रशान्त बागड: लेखक आणि तत्त्वचिंतक. ‘नवल’ ही कादंबरी (पपायरस प्रकाशन, कल्याण) आणि ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे’ हा कथासंग्रह (शब्द पब्लिकेशन, मुंबई) प्रकाशित. कथासंग्रहाला बाबुराव बागूल शब्द पुरस्कार आणि पु. ना. पंडित पुरस्कार. अनेक कथा, कविता, समीक्षालेख विविध वाड्मयीन नियतकालिकांतून प्रसिद्ध. काही कथांची आसामी, इंग्रजी व हिंदी भाषांतरं. आय. आय. टी. कानपूर येथे तत्त्वज्ञानाचं अध्यापन.

2 comments on “अनाठाय: प्रशान्त बागड

  1. Pandurang Sutar

    Written in a flow of mind, sometimes it seems tedious, at next moment we began to flow with the narrator in the deep water of the story…
    good story, simply told …
    much regards to the author …

    Reply
  2. Pandurang Sutar

    साध्या धाटणीची, क्वचित कंटाळवाणी वाटत असतांना , पुन्हा निवेदकासोबत कथेत खोलवर घेऊन जाणारी शैली आवडली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *