परावर्तन
नेमकंच उजाडायला येतय
भिंतीच्या पलिकडं केळी बाळंत होते
पहाटेची कळ, वाढते आणि संपते
अंधार पोखरून वाळवी बाहेर येते
उंबऱ्यावर जाते,पाय कोरायला लागते
उमटलेले न उमटलेले, थांबलेले न थांबलेले
भुईनाथ पोकळ जागा शोधतो
चमक मस्तकात जाते, उतरते
बल्बवरचे किडे कागदाला चिकटतात, मरतात
पाणी तापतं,काम संपतं
कौलावरचं मांजर आडं पार करतं
बॉडी पडून असते
हवेत दुखा:चं परावर्तन शिल्लक राहतं.
***
आमेन
कपारीला आलेली चार फुले तोडलीस
तेंव्हा,
रक्त वाहिलंस डोंगराचं आठवतंय
नीलगिरीला कान लावलेस
तेंव्हा,
शरीरातून सळसळून वाहिलं प्राक्तन आठवतंय
भुंड्या लिंबाच्या खोडाला शेण लावलंस
तेंव्हा,
नव्या पालवीला गोंजारून मनातच आमेन म्हणलं आठवतंय
किनाऱ्यावरती पायाखालून हळूच वाळू सरकली
तेंव्हा,
ओल्या नजरेने बघत राहिलीस सूर्योदयपर्यंत आठवतंय..
तर मग ही अमानुष यादवी कुणासाठी?
***
काफी
तेच ते उताराचे शेवटचे खडक
रंगीत, गोधड्यांचे खडक
चटका देणारे
डोह झालेले
बायांच्या येण्याजाण्याने
काही हिरवेगार निसरडे
लालभडक तुकड्या-कपडयात भिजत घातलेले
जाऊ दे, डोहांनी गिळून घेतलेल्या डोळ्यांची कात दिसते ना कपारीला
काफी है.
***
व्वा, खूप छान कविता लिहिल्यास प्रकाश…तुझी वाटचाल अधिक उंचीकडे होवो, सदिच्छा
प्रकाश,
मित्रा निरीक्षणं खूप डीप आणि सूक्ष्म आहेत.मी पहिल्यांदाच तुला वाचतोय.सुंदर.