Skip to content Skip to footer

जिद्द : प्रज्ञा गान्ला

Discover An Author

  • Actor, Director & artist

    प्रज्ञा गान्ला मुंबई स्थित मल्टीमीडिया प्रोफेशनल व आकाशवाणीच्या माजी आर.जे. आहेत. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक म्हणून त्या नाट्यक्षेत्रात कार्यरत असून सुसंवाद आणि मानसिक स्वास्थ्य या विषयांवर कार्यशाळा घेतात.

ती शांतपणे समोर पाहात उभी राहिली.

भव्य, उत्तुंग, बुलंद..  सगळे, अगदी सग्गळे शब्द थिटे पडावेत अशी सभोवार पसरलेली ती ऐतिहासिक आणि देखणी वास्तू. डोळ्यांत न मावणारं तिचं आवार आणि पार्श्वभूमीला जाणवणाऱ्या अतिप्रचंड अशा, अनोख्या रंगसंगतीने नटलेल्या,  उन्हात चमचमणाऱ्या पर्वतरांगा. विलक्षण !

शब्दश: केवळ अवाक झालेली ती या अनुभवाला नक्की कसं सामोरं जावं याचा विचार करू लागली आणि तेव्हाच तिला जाणवलं तिच्या हातात गुंफलेल्या चिमुकल्या हाताची पकड अजून घट्ट झाल्याचं.

आपण,  आपला सो कॉल्ड इगो, आपलं एकूणच अस्तित्व खूप नगण्य असल्याची, लहानपणापासून ओळखीची असलेली जुनीच भावना पुन्हा एकदा मनात उफाळून वर येऊ पाहात होती. त्या भावनेला महत्प्रयासाने आवरत तिने आजूबाजूला नजर फिरवली. तशी फारशी गर्दी नव्हती. तुरळक पर्यटक इथे-तिथे दिसत होते. त्या प्रचंड आकारावर स्वारी करून त्याच्या अंगाखांद्यावर कुठे कुठे चढलेले. इवले इवलेसे दिसणारे. त्यातले बरेच जण या अतिभव्य निर्मितीला कॅमेऱ्यात कैद करण्याची धडपड करत असणारे. एक निष्फळ धडपड.. तिच्या मनात आलं.

बरोबर आलेली इतर मंडळी कधीच पुढे निघून गेली होती. छोटासाच,  लाफ्टर क्लबच्या निमित्ताने ओळखीच्या झालेल्या लोकांचा असा हा एक ग्रुप होता. गेले दोन दिवस सगळे एकत्र फिरत होते,  धमाल करण्याचा प्रयत्न करत होते. मागच्या दोन-तीन वर्षात जवळपास प्रत्येक आयुष्यात झालेली पडझड विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. आजचा मुक्काम या वास्तूच्या कुशीतच व्हायचा असल्याने सगळे तसे  निवांत होते. गाईडेड टूर सुरु होण्यापूर्वी हाताशी थोडा वेळ होता. तोवर हे सौंदर्य जमेल तेवढं नजरेत साठवावं असं वाटलं तिला. तसा इतिहास हा तिचा शाळेतला आवडीचा विषय  जो पुढे जगण्याच्या स्पर्धेत मागे पडला होता पण वेगवेगळया प्रदेशांची संस्कृती जाणून घेण्याची मनात असलेली अनिवार ओढ कायम  होती आणि  त्यातून घडलेलं चौफेर वाचन पाठीशी होतं. म्हणून मग  चिमुकल्याला हाताशी धरून तिने आस्ते आस्ते ती इमारत पायाखालून घालायला सुरुवात केली. तिथला प्रत्येक कोपरा दिमाखदार नक्षीने सजलेला. स्थानिक इतिहासाचं,  संस्कृतीचं दर्शन घडवणारा. त्यातच काही अंधाऱ्या, धूळभरल्या जागाही सामावलेल्या. ‘मला जाणून घे’  असं जणू आवाहन करत असलेली, अनेक संघर्ष, लढाया अन् आनंदाच्या प्रसंगांना शतकानुशतके सामोरी गेलेली  ती वास्तू.

फिरता फिरता तिला अगदी सहज विसरायला झाला तिचा नजीकचा क्लेशदायक भूतकाळ. तिथली काही शिल्पं पाहताना तिने अचानकपणे डुबकी मारली ती अनेक आठवणींत.. भारतातल्या एका छोट्या निमशहरात घालवलेलं बालपण, तिचं  मध्यमवर्गीय कुटुंब, नामवंत शाळा, अभ्यास आणि सवंगडी.. मग परदेशी शिक्षण, तिथेच लग्न, सेटल होणं आणि.. आणि आज इथे या परक्या देशात, परक्या संस्कृतीची नागरिक म्हणून उभी असलेली ती. कुठून कुठे आलो नाही आपण ! तिला वाटलं. पुढे पुढे जाताना जेवढा माहीत होता तेवढा त्या इमारतीचा इतिहास आणि त्याचा जमेल तसा अर्थ हाताला लटकलेल्या छोट्याला सांगण्याचा तिचा प्रयत्न सुरू होताच. अनेक चित्तथरारक घटना आणि त्यांचे आजही जाणवणारे पडसाद.. कित्ती, कित्ती गोष्टी.  

तेवढ्यात “अगं आई गं !” ती कळवळली. छोट्याने चमकून पाहिलं तर तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. अचानक पायाला ठेच लागली होती आणि मस्तकापर्यंत कळ गेली  होती. “ममा..” छोटा म्हणत राहिला.. पायाची ठेच तिला मात्र घेऊन गेली होती ती अनेक नकोशा आठवणींच्या आणि मग अपरिहार्यपणे गेला काही काळ सोसत असलेल्या वेदनांच्या प्रदेशात. परदेशात,  वेगळ्या देशाच्या माणसाबरोबर लग्न केल्याने मुळातच नात्यांचा फारसा गोतावळा तिच्याभोवती नव्हता. तिचा सुखी संसार आणि आवडतं काम करायला वाव देणारी उत्तम नोकरी. छान चाललं होतं सगळं. पण मग तीनेक वर्षांपूर्वी सगळ्या जगावर महामारीचं संकट आलं,  अर्थव्यवस्था कोसळल्या आणि अनेक आपली माणसं, प्रिय माणसं.. निघून गेली.. तिचा प्रिय रिचर्ड,  तो सुद्धा. तिचं तर सर्वस्वच हरवून गेलं या सगळ्यात आणि जगाच्या पाठीवर एकाकी उरली ती. काडी-काडीनं जमा केलेला संसार विखुरला आणि माणसं जशी हवेतच विरून गेली. कधी अस्तित्वात नसल्यासारखी नाहीशी झाली.

“आर यू ओके, ममा?” छोट्याच्या प्रश्नाने ती वर्तमानात आली.

“अं.. हो!  चल पुढे जाऊयात”.  ती म्हणाली आणि ती दोघं पुढे सरकली.

“मग नंतर काय झालं ममा?” समोरच्या शिल्पाकडे पाहात छोट्याने विचारलं. तिने मघाशी अर्धवट सोडलेल्या कहाणीचा धागा पुन्हा जोडला आणि ती पुढे सांगू लागली. सांगता सांगता तिच्या नजरेसमोरून सरकू  लागली भारतातली आणि तिच्या वास्तव्याच्या देशातली अनेक प्राचीन,  ऐतिहासिक आणि खऱ्या-खोट्या कहाण्यांनी भारलेली अद्भुत वारसास्थळं.  ती रोमहर्षक गोष्ट पुढे नेता नेता तिला जाणवलं की हे सगळं ती स्वतःला सुद्धा सांगते आहे. जणू आठवण करून देते आहे एकूणच मानवी इतिहासातल्या भव्यतेची,  सौन्दर्याची आणि निरंतरतेची. कितीही संकटं आली तरी त्यातून पुन्हा पुन्हा उभ्या राहायच्या विजिगीषु वृत्तीची. पिढ्यान् पिढ्या खर्ची पडल्या तरी हार न मानता पुढे जायच्या अमर्याद जिद्दीची.. जरी तिथेही, त्या स्थानीही जाणवत होता गेल्या दोन-तीन वर्षातल्या संकटांचा परिणाम. अनेक ठिकाणचा देखभालीचा अभाव आणि चढलेली धुळीची पुटं, जळमटं. पण त्यातूनही डोकावत होता माणूस, त्याची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा. भले तो कोणत्याही भाषेचा, प्रदेशाचा पाईक का असेना.

ती बोलत गेली, बोलत गेली आणि तिचं एकाकीपणाचं दुःख, परिस्थितीवरचा राग, भविष्याची चिंता यांचं तिच्या मानेवर बसलेलं मणामणाचं ओझं हलकं होत गेलं. ती मोकळी होत गेली. तिचं मूळ माणूसपण परत येत होतं बहुधा. संकट काळात अडगळीला पडलेली जिद्द,  आशावाद डोकं वर काढू लागला. लेक अचंबित होऊन तिच्याकडे बघू लागला. “हो, आणि आपण, आपण आजची माणसं आहोत या सुंदर, भव्य, आशेने भारलेल्या इतिहासाचे वारस !! सर्वसाक्षी निसर्गासमोर असू आपण नगण्य, क्षुद्र पण तरीही त्याचं सौन्दर्य जाणणारे, त्याचा आपल्या गरजेप्रमाणे वापर करू शकणारे आपणच तर आहोत. धुळीला मिळालो तरी त्यातून परत उभारी घेण्याची क्षमता असणारे.. ” तोंडभरून हसत ती मुलाला म्हणाली. त्याला किती समजलं  कोणास ठाऊक पण तोही मनापासून हसला.  असेच काही क्षण गेले आणि त्यांना गाईडेड टूरसाठी बोलावणं आलं. दोघं खुशीत त्या दिशेने निघाले. जाता-जाता तिने सहज मागे वळून पाहिलं. तिला दिसलं की आजूबाजूला विखुरलेल्या धुळीच्या पुटांवर तिच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत आणि लेकाने तर मघाशी त्या धुळीत त्याचं नाव व्यवस्थित कोरून ठेवलं आहे..

छायाचित्र सौजन्य : पारोमिता पत्रानोबिश

Post Tags

13 Comments

  • Kusum
    Posted 27 जून , 2021 at 11:03 pm

    Interesting and inspiring story. Felt connected throughout the reading.

    • Mansi Bhurke
      Posted 29 जून , 2021 at 12:04 am

      Very Nice

      • Vijaya Sahajrao
        Posted 29 जून , 2021 at 11:53 pm

        प्रज्ञा, मनात साठून राहिलेले दु:खावकाश आणि त्याला मानवनिर्मित भव्यतेने करुन दिलेली वाट यांची सहजसुंदर गुंफण. छान आहे कथा.

    • sheetal Bhosale
      Posted 30 जून , 2021 at 11:39 am

      अप्रतिम लिहिलं आहे. धुळीला मिळालो तरी त्यातून परत उभारी घेण्याची क्षमता असणारे….हे फार भावलं मला..

  • Pratik Mohite
    Posted 28 जून , 2021 at 2:03 pm

    प्रज्ञा. फारच सुंदर. 👍🏽

  • Pramod Pednekar
    Posted 28 जून , 2021 at 4:47 pm

    छान गोष्ट, आटोपशीर शेवट पर्यंत वाचायला लावणारी.
    Thanks

    • Pravin s.Chavan
      Posted 29 जून , 2021 at 4:12 pm

      Great .Really touching short story.
      Hearty congratulations Pradnya.
      Looking forward to more Stories

  • Ashwini Kondra
    Posted 29 जून , 2021 at 3:51 pm

    Khup sunder

  • Rochana
    Posted 30 जून , 2021 at 11:09 am

    ‘नवी उमेद’ खूप सुरेख प्रज्ञा !! तू लिहिलेल्या नवीन गोष्टी आम्हा वाचकांना वाचायला नक्की आवडतील.
    सदिच्छा❤️

  • Amit
    Posted 30 जून , 2021 at 12:50 pm

    खूप छान पद्धतीने कथन केलं आहे 👌

  • Prajakta More
    Posted 30 जून , 2021 at 3:45 pm

    Really very nice ❤️

  • Mugdha
    Posted 5 ऑगस्ट , 2021 at 12:58 pm

    Optimistic 👍nice writing 👌

  • Sheetal chowdhari
    Posted 19 ऑगस्ट , 2021 at 7:22 pm

    Sometimes some writings makes the person speechless. No words to express how beautifully you have written as I was able to understand each and every words. Keep it up.Thank you for such story.

Leave a comment