जमिनीतून वर
जेव्हा धुकं नाहीसं झालं तेव्हा युद्धही संपलं
कैक राज्यं हरवली आणि बरीच साम्राज्यही विफल ठरवली
बरेच जण देशातून पळाले, काहींना सैन्यांनी उचकून बाहेर काढलं,
राष्ट्रवादाची नवी चळवळ सुरू झाली आणि काय विसरुन जावं हे
कसं लक्षात ठेवण्याइतकंच महत्त्वाचं वाटू लागलं.
शाळांनी इतिहास शिकवायचं सोडून दिलं
आणि पुस्तकांची पानंही तशीच रिकामी ठेवली
धुकं विरल्यावर,
मार्क्सवादाचे आणि समाजवादाचे ट्रोजन घोडे धावू लागले
भांडवलशाहीच्या चिखलात
काहींना वाटलं आपण खरंच लढलो उच्च मूल्यांसाठी,
वाईटाच्या विरोधात
धूसरपणा संपल्यावर,
असंख्य प्रेतांचा ढीग जमा झाला होता
आणि उजाडलं पहिलं वर्ष:
शून्यातून पुन्हा सुरुवात झाली होती
पूल, अरण्य आणि मळे सारेच धुक्यात हरवले
आणि माणसं रोजचा १००० कॅलरीचा आहार म्हणून ट्यूलिपची फुलं खाऊ लागली
कैक मुलं अनाथ झाली
आणि बायकांनी गर्भपात केला पोटात वाढणाऱ्या कैक स्वप्नांचा
पडदा वर गेल्यावर
नेस्तनाबूत करणारं सैन्य आलं, पेळकटलेल्या पायाने
घेऊन आलं सोबत – दुष्काळ आणि रोगराई
आणि त्यासोबत मायक्रोवेव्ह, अणुबॉम्ब, सत्ता आणि दवापाणीही
धुकं नाहीसं झाल्यावर, सुरू झालं एक नवं शीतयुद्ध .
मृत्यू डोकावून पाहू लागला राष्ट्रांची उभारणी दोन पायांवर
त्यांच्या फुटलेल्या गुडघ्यांवर आणि उध्वस्त झालेल्या तळव्यांवर
काचेच्या कपच्यांवर चालणारा त्यांचा नाजूक नाच आणि राखेची ठेवलेली त्यांनी यादी
देश, ज्यांच्या जिभा हासडून काढल्या आणि ज्यांना विद्रुप केलं गेलं
त्या देशातल्या जनतेनंही कबूल केलं
त्यांनीही बळी पाडला होता त्यांच्याच जनतेचा
त्यांनीही केले होते बलात्कार आणि घडवल्या होत्या हत्या,
त्यांच्या सुऱ्यावरून निथळत होतं कित्येकांचं रक्त
आता पाठ्यपुस्तकात उरल्या आहेत अस्वस्थ आठवणी
गोरा नि काळा इतिहास नाही
नंतरच्या पिढ्यांनी
कंबर कसून कामाला सुरुवात केली
– दहा पटीनं काम वाढलं होतं त्यांचं
त्यांना डोकं वर करून पाहायचीही उसंत नव्हती
सकाळच्या कोऱ्या करकरीत आभाळाकडे
किंवा रात्रीच्या टणक आकाशाकडे
ते फक्त चालत राहिले –
हलण्यासाठी, गाण्यासाठी, रुळण्यासाठी, हुंदक्यासाठी, थांबण्यासाठी, पाडण्यासाठी अडण्यासाठी
अवस्थांतर करण्यासाठी
इतिहासाचं एकतरी पान उलटावं म्हणून
***
गर्भाशयातलं मरण
त्याच्या वडिलांची सावली मोठी होत जाते दररोज रात्री. सुऱ्या, ब्लेड, कोयता, पट्टा, आणि चाबकाच्या आकृत्या वाढत जातात. लांबलचक होत जातात. आईच्या चेहऱ्याला झाकोळतात . आकृत्या अवतरतात त्याच्या स्वप्नातल्या अमर चित्र कथेत, सुपर कमांडो ध्रुव, सुपरमॅन, बॅटमॅन, बोन, द डार्क नाईट रिटर्न्स, सॅण्डमॅन, एक्स- मेन आणि वॉचमेनसोबत.
त्याच्या आईच्या किंचाळ्यांमध्ये मिसळतात आवाज – रोबो, फायनल फँटसी, स्टार वार्स आणि अवतारमधल्या सुपरहिरोजचे. त्याला ठाऊक आहे, दरवेळी चांगल्या आणि वाईटाचं युद्ध होतं. चांगल्याचा जय होतो. वाईटाचा अंत. हळूहळू वाईटाची सावली छोटी होऊन नाहीशी होते. कुणीतरी राजकन्येला वाचवतोच. विनम्र माणसांनाच शेवटी पृथ्वीची सत्ता मिळते. चांगल्या लोकांबरोबर चांगल्याच गोष्टी घडतात.
त्याचा बाप त्याच्या आईवर इतक्या त्वेषानं चाबूक हाणतो की त्याच्या स्वप्नांतल्या सावल्याही टीव्हीतल्या आकृत्यांसारख्या हालतात किंवा मेणबत्तीच्या वातीसारख्या थरथरतात. काही सावल्या संपत नाहीत डोळे उघडल्यावरही. त्या पसरतात कोपऱ्याकोपऱ्यातून, डोळ्यांच्या कडांमधून, वाट काढत समोर येऊन ठाकतात. मिसळतात मूळ दुष्कृत्याच्या मूळ सावलीत.
प्रत्येक कॉमिक बुक, एनिमेटेड चित्रपट आणि साय फाय फिल्ममधल्या प्रत्येक सुपरहिरोचे संवाद, आवाज आणि कृत्यं ठाऊक असूनही त्याच्यातला सुपरहिरो का नाही जिवंत होत अशावेळी?
अजून किती सुपरहिरोजची बेरीज केली की एक सुपरहिरो तयार होईल, त्याच्यातला?
असे किती सुपरहिरो लागतील, असा एक सुपरहिरो तयार करायला? किती अजून ?
निळसर जांभळं आभाळ
नकोसं फुलपाखरू
आपल्या दुराव्यानंतरचं
***
माजो गांव
गोवा म्हणजे दरवर्षी मे महिन्यातल्या सुट्ट्यांची समेवर येणारी आठवण
घामाने भिजलेल्या घरातल्या चार बायकांची एक – तान, त्यांच्या अक्षरांना लगडलेली एक पाणीदार लय
इवल्याशा खोल्यांमधून, खुराड्यातून आणि पोटमाळ्यातून
ऐकू येणाऱ्या भुसा आणि काथ्याचा ऑर्केस्ट्रा
किरमिजी पायऱ्यांवरून, दगडाच्या सोफ्यावरून
आणि हिरव्या मलूल खिडक्यांवरून रेंगाळणारं पावसाचं सुनीत
गोवा म्हणजे
दाणेदार वाळूच्या परसातून उगवलेली एक गझल
फणसाची, पेरूची नि आंब्याच्या झाडांची
गोवा म्हणजे
वायफळ गावगप्पा – आजी आणि मावशींच्या तोंडून ऐकलेल्या
कधी कॅथॉलिक समाजाच्या तर कधी माजोरड्यावरून परतणाऱ्या नातेवाईकांच्या
ह्या कुटाळक्यांमध्ये आईला म्हणू लागले पुस्तकी वैज्ञानिक,
अविवाहित काकाला – बेबडो आणि विधवा झालेल्या आत्याला – अंकवार कोडी
गोवा म्हणजे
एका मावशीच्या गढूळलेल्या विहिरीपाशी झालेल्या लग्नानंतरच्या
सुप्त गोष्टींचा मुक्तछंद
गोवा म्हणजे
कच्च्या कैरीतून झिरपणारी आणि सुरेल गळ्याच्या गाण्यामधून
ऐकू येणारी लखलखीत वाढीव भाषा
गोवा म्हणजे
औरिया, मारिओ, मारिया ह्या शेजारच्या तीन मुलांचं
जे पटपट चालत जायचे भाताच्या शेतातून
खरबरीत रस्त्यांवरून स्नायूंना एकही इजा न होता
गोवा म्हणजे
रानटी झुडुपात अडकलेलं चतुर
हळूहळू त्यातून सरकणारं, निमुळत्या शेपटीचं
वाकलेल्या अंगानं दंश करणारं, चॅन्ट रॉयलमधलं काव्य
जूनमधल्या पावसासोबत संपणाऱ्या सुट्ट्यांचा
अंत जाहीर करणारं
गोवा म्हणजे
मा डोस पोब्रेस चर्च रोड, नुवेमधल्या नसलेल्या घराचं रितेपण
गोवा म्हणजे
काळाच्या अवकाशात हरवलेल्या अंगणपानांचा हायकू
लखलखीत ओलाशार गारगोटा माघार घेणाऱ्या लाटांवरचा
गोवा म्हणजे
एका पोर्तुगीज बंगल्याचं एका बाजूने ढासळणारं छप्पर
ज्याला माझ्या काकांनी आधुनिकतेतून पालटलं
वासाळलेल्या जिन्यावर गोळा करून ठेवलेली निश्चल घरं
– एक अपार्टमेंट (मुंबईत असतं अगदी तसं)
बालपणीची एक शोकांतिका
जिला विकून टाकलं होतं स्वस्तात
आम्हाला न विचारता
गोवा म्हणजे
कौतुक
गोवा म्हणजे
उपरोधिक काव्य
गोवा म्हणजे
यमकवजा कविता
शेवटची जागा
पुष्कळदा भ्रमनिरास होऊनही
पुन्हा परतणाऱ्या जागेची उरलेली शाश्वती
गोवा म्हणजे
शोकगीत
***