नूपुर देसाई

झगड्याचं बदलणारं अवकाश


back

‘हाकारा’च्या दहाव्या आवृत्तीसाठी ‘झगडा/Friction’ यावर लिहिण्यासाठीची हाक आम्ही दिली, तेव्हा जगभरात असंख्य घडामोडी चालू होत्या. जग एका सामाजिक आर्थिक-राजकीय संक्रमणावस्थेतून जात असताना निरनिराळ्या पातळींवरचे संघर्ष आपल्यासमोर येत होते. जगभरात, खासकरून तरूणांमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेला सार्वजनिक अवकाशात एक रूप, एक आकार मिळत होता. सभा, मोर्चे, निदर्शनं, समाजमाध्यमं अशा सर्व रूपांमध्ये ही चर्चा घडत होती. विद्यार्थ्यांवरचे हल्ले असतील, विद्यापीठांमधली निदर्शनं असतील, त्याला प्रतिसाद देणारी कलारूपं असतील, अशा विविध प्रतलांवर हा झगडा आकाराला येत होता. लोकशाहीच्या हक्कांसाठी, घटनेतली मूल्यं जपण्यासाठीचा हा संघर्ष होता. माणसं रस्त्यावर उतरत होती, एकत्र येत होती. समाजातल्या निरनिराळ्या स्तरातले स्त्री-पुरूष, विद्यार्थी, कलाकार, असे सगळे जणच एक सामूहिक कृती करत आपल्या मानवी हक्कांसाठी लढत होती. पण या घडामोडींना गेल्या महिन्या दीड महिन्यात अचानक कलाटणी मिळाली. करोना वायरस किंवा कोविड-१९ या विषाणूनं जगभर थैमान घालायला सुरुवात केली. त्याचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी माणसांनी एकत्र येणं बंद झालं. माणसांना असलेली सामूहिकतेची गरज, एकमेकांबरोबर उभं राहाण्याची प्रबळ इच्छा या गोष्टींना बाजूला ठेवावं लागलं. आणि सामूहिक कृती ही जणू भूतकाळातील गोष्ट आहे की काय असं वाटावं इतक्या झपाट्यानं आपल्या भोवतीचं वास्तव बदलत गेलं, आणि अजूनही बदलतं आहे. ज्या वेगानं हे बदल आजूबाजूला घडत आहेत ते मती गुंगवून टाकणारं आहे आणि या सगळ्याला सामोरं कसं जायचं याचा विचार करेपर्यंत नवे बदल घडत आहेत. आणि ही फक्त आपल्या आजूबाजूची नव्हे तर जागतिक पातळीवरची स्थित्यंतरं आहेत, आपल्या जीवनकाळातल्या या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आहेत.

जागतिक महामारीचं वर्णन करताना आपण सहजच त्याला ‘युद्ध’ म्हणतो आणि विषाणू नावाचा शत्रू उभा करतो. ‘युद्धा’चं असं रूपक वापरणं हे एकीकडे आपल्या सामूहिक प्रयत्नांचं द्योतक आहे, पण त्याचबरोबर त्यात एक भीषण वास्तव लपलेलं आहे. कोणाचं आणि नेमकं कोणाविरूद्ध आहे हे युद्ध, हा प्रश्न भयचकित करणाराच आहे! आणि हे मानसिक, शारीरिक अशा सर्वच प्रकारे थकवणारं आहे. सध्या ‘एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणं, हे दमछाक करणारं आहे’, अशा अर्थीचं एक मीम समाज माध्यमांमध्ये फिरतंय. ते अगदी आपल्या खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करणारं असलं तरी त्यात मेख अशी आहे की, या ऐतिहासिक घडामोडींच्या पोटात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा झगडा, संघर्ष लपलेला आहे. हा झगडा रोजीरोटी मिळवण्याचा आहे, मूल्यं जपण्यासाठीचा आहे, जगण्याचा समान हक्क मिळावा यासाठी आहे किंवा महामारीच्या या लाटेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा आहे! या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, भीतीने आणि अस्वस्थतेने भरलेलं हे वातावरण ‘हाकारा|Hakara’चा हा अंक कसं प्रतिबिंबीत करतोय, असा मुद्दा आहे. तर मला वाटतं, ऐतिहासिकतेतला हा संघर्ष, मानवी संस्कृतीच्या आकार घेण्यातला हा झगडा आणि या झगड्यातून एकत्र येत नवनिर्मितीच्या क्षमता तयार होणं हाच याला सांधणारा धागा आहे. अशा घटनांचे परिणाम खोलवर मनात रूजणारे, अगदी आतवर हाडांपर्यंत पोहोचणारे असतात. या अंकातल्या अभिज्ञा भट्टाचार्य यांनी झरीना हाश्मी यांच्यावर लिहिलेल्या लेखात शेवटचं वाक्य आहे, ‘Perhaps it is easier to leave and say, I wish I’d stayed, than stay and wish you would have left – I will never know.’ त्यांची सारी कलानिर्मिती याभोवती गुंफलेली होती: असणं आणि नसणं यातला झगडा, घर कायमचं सोडावं लागणं, यातून स्वतःशी आणि अस्तित्वाशी चाललेला झगडा, स्वतःचं मूळ शोधण्याचा आटापिटा आयुष्यभर त्यांनी जपला आणि तो त्यांच्या मुद्राचित्रांमधून व्यक्त होत राहिला.

एकीकडे, माणसांनी तयार केलेल्या सीमांमुळे वा उतरंडीच्या रचनांमुळे उभा ठाकलेला हा संघर्ष होता आणि आजच्या संदर्भात बघायचं झालं, तर सगळा मानवी समाजच एकत्र येऊन या जागतिक महामारीशी लढत आहे. अर्थात, इंग्रजी म्हणीत थोडासा फेरफार केला तर ‘we are in the same storm, not in the same boat’ (आपण एकाच वादळाचा सामना करतोय, पण आपल्या होड्या वेगवेगळ्या आहेत) कारण घरात बसल्यामुळे कंटाळून गेलेले आपण काही जण आहोत, तर घरी पोहोचण्यासाठी वणवण करणारे, उपाशीतापाशी राहाणारे आणि जीव गमावणारेही मोठ्या संख्येनी आहेत. त्यामुळे, ही लढाई सगळ्यांसाठी एकसमान नक्कीच नाही. या पलीकडेही याला अनेक पैलू आहेत. उदाहरणार्थ, पाश्र्चिमात्य देशांमध्ये विषाणू रोखायला संचारबंदी करणं ही आमच्या मानवी हक्कांची पायामल्ली आहे, म्हणून त्याविरोधात आवाज उठवणं सुरू झालंय.

जामिया की लड़कीया
चित्रकार: अनुपम

अनुपम राय हे दिल्लीस्थित दृश्यकलाकार ‘प्रचारकी’ पोस्टर्स आणि रेखाटनं करतात आणि ‘झगडा’ किंवा संघर्ष हा त्यांच्या चित्रांचा गाभा आहे. त्यांच्या डायरीतल्या रेखाटनांचा समावेश ‘हाकारा |Hakara’च्या या अंकात केला आहे. ही रेखाटनं त्यांच्या भवतालाला, त्याच्या उद्भवणाऱ्या ताण-तणावांना आणि संघर्षाला दृश्य रूप देणारी आहेत. तसंच, मानवी विकृतीचं, शोषणाचं, दडपशाहीचं चित्रण करताना ती प्रस्थापित कलाभाषेला आणि कलाबाजाराच्या सर्वमान्य अशा नियमांना आव्हान देणारी देखील आहेत. एकीकडे, माणसांचा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडा चालू आहे पण दुसरीकडे, या सगळ्याच्या दरम्यान अगदी दोन महिन्यांपूर्वी चालू असलेल्या निषेधांनी ज्या सार्वजनिक जागा व्यापून टाकल्या होत्या, अशा माणसांच्या, कलाकारांच्या, नागरिकांच्या आठवणी जवळपास मागे पडल्या आहेत. रस्ते, चौक, बागा, नाट्यगृहं, कलादालनं ओस पडली आहेत आणि अशा सार्वजनिक जागांमध्ये पुन्हा एकदा जाण्याची तीव्र आस सर्वांना आहे.  पण आज सार्वजनिक अवकाशाची आपली संकल्पनाच कदाचित मुळापासून बदलते आहे. सर्वांना सहज संचार करता येतील, अशा लोकशाही मूल्य जपणाऱ्या या जागा, अशी आपण सार्वजनिक अवकाशाची कल्पना केली होती. अशा जागा येत्या काळात पुन्हा लगेच कार्यरत होणार नाहीत किंवा मतभेदासाठी, अभिव्यक्तीसाठी, चर्चाविश्व उभं करण्यासाठी आजपर्यंत जे अवकाश आपल्याला खुलं होतं, त्यावर आज बंधनं येत चालली आहेत. दुर्दैवाने, आज हे अवकाश व्यापलं आहे ते स्थलांतरित मजूर आणि कामगारांनी आणि त्यांच्या होणाऱ्या ससेहोलपटीनं. अनुपमची रेखाटनं बघताना असंही वाटतं की, आज प्रोटेस्ट किंवा निषेध हा अशा ऑनलाईन प्रतिरूपणापुरताच मर्यादित राहाणार का? कारण ज्यातून चर्चाविश्व आकाराला येत होतं असं हे भौतिक अवकाश आज एका बाजूला सारलं गेलं आहे आणि त्याची जागा आभासी अवकाशानं म्हणजेच इंटरनेटनं घेतली आहे.

कोविड-१९ च्या प्रसारामुळे हे सार्वजनिक अवकाश बदलताना दिसतं आहे. म्हणजे स्थलांतरित मजूरांना प्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आहेतच, पण मुख्यतः व्यक्तींचे परस्परसंबंध आणि व्यवहार हे मोठ्या प्रमाणात डिजिटलमाध्यमातून घडत आहेत. अर्थात, इंटरनेटची सेवा ज्यांच्यासाठी उपलब्ध आहे त्यांनाच हे शक्य आहे. सध्या मित्रांना भेटणं, एकत्र बसून नाटकं किंवा सिनेमे पाहाणं, चर्चासत्र आणि भाषणं आयोजित करणं, निषेध नोंदवणं, संगीताच्या महफिली, कविता वाचन, हे सगळं इंटरनेटच्या माध्यमातून घडतं आहे.  आपलं ते सार्वजनिक अवकाश बनलंय म्हणजे आपण त्यात केवळ सहभागी होतोय एवढंच नव्हे, तर आपलं शरीर जणू काही या डिजिटल जगाच्या रूपात आकारलं जातंय. आज फेसबुक, इंस्टाग्राम, झूम, डिस्कॉर्ड यासारख्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच आहे, पण आपलं सगळं अस्तित्वच जणू इंटरनेटवर तोलंल गेल्यामुळे तिथं काहीसा गोंधळही तयार होते आहे. समाज माध्यमांतून ‘लाईव्ह’ जाण्याचा मोह हा फक्त उपलब्ध आहे किंवा वैचारिक मांडणी आणि चर्चा करायची आहे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. कलाक्षेत्राचं उदाहरण घ्यायचं झालं, तर तिथं टिकून राहाणं आणि स्वतःचं अस्तित्व सार्वजनिक अवकाशात सतत नोंदवलं जाणं, यासाठीची ती निकडदेखील बनली आहे. या सगळ्या गोंधळात जगभरात कलासंस्था, संग्रहालयं, इत्यादि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावं लागू नये यासाठी धडपड करत आहेत, पण या परिस्थितीत कंत्राटी काम करणारे, दिवसाचा मोबदला घेऊन काम करणारे अशी कामं करणाऱ्यांना कामाला मुकावं लागतंय, ही देखील सत्य परिस्थिती आहे. ऑनलाईन प्रदर्शनं, तसंच आर्ट बाजल, त्रिनाले यासारखी भव्य प्रदर्शनं आणि तसंच, व्याख्यानं आणि चर्चासत्रं यासारखे कार्यक्रम इंटरनेटच्या माध्यमातून घडताना दिसत आहेत. पण या आभासी किंवा वर्च्युअल गॅलऱ्यांमधली प्रदर्शनं बघताना जाणवतं की एखादं चित्रं किंवा मांडणीशिल्प कसं पाहायचं त्याचा दृष्टीकोन ते ठरवत असतात, आपण ते ठरवू शकत नाही. शिवाय, लॅपटॉप किंवा मोबाईलच्या सपाट पडद्यावर प्रत्यक्ष बघताना जसा भौतिक अवकाशात त्रिमितीय अनुभव येतो तसा तो येत नाही. पण, त्याचबरोबर ती प्रदर्शन मांडणी आणि ती संरचना सांगणारे क्युरेटर्स असतील, तर या वर्च्युअल भेटी अधिक अर्थपूर्ण ठरू शकतात. अर्थात, हे एक उदाहरण झालं. या निमित्तानं कला निर्मितीच्या प्रक्रियांचाच कदाचित पुनर्विचार करावा लागेल, नव्याने त्यांच्या शक्यता मांडाव्या लागतील आणि त्याचबरोबर आजपर्यंत जे काही करत होतो, म्हणजे मोठाली प्रदर्शनं किंवा बिनाले किंवा जगभर सतत फिरत कलाव्यवहाराचा भाग होणं ते कितपत आवश्यक होतं, याचा आढावा घेण्याचीही वेळ आहे. दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आर्ट वर्कर्स (कलाक्षेत्रात काम करणारे/कला कामगार) संघटित होत आहेत, कलाक्षेत्राची अर्थव्यवस्था आणि एकूणच कामाची पद्धत, त्यातलं शोषण हे पुढच्या काळात बदलावं यासाठी एकत्र येत आहेत. महामारी नंतरच्या जगात काय वेगळं असेल, कलाक्षेत्रात आधी असलेल्या कोणत्या रचना आणि ढाचे हे नाकारावे किंवा नव्याने उभारावे आणि त्यात कोणाची काय भूमिका असेल, यावरही काहीजण मंथन करताना दिसत आहेत. 

आज या टप्प्यावर असताना आपण कला आणि संस्कृती यांचा नेमका कसा विचार करू शकतो? भौतिक अवकाश संकुचित होत असताना, तसंच त्याचं रूप पूर्णपणे बदलत असताना आपल्यावर त्याचे कोणते परिणाम होताना दिसत आहेत? इतिहासातलं उदाहरण घ्यायचं झालं, तर असं म्हणतात की चौदाव्या शतकातल्या युरोपातल्या प्लेगच्या साथीनं तिथलं सामाजिक आर्थिक वास्तव पार ढवळून निघालं होतं. लक्षावधी माणसं त्या साथीला बळी पडली पण केवळ तेवढाच तिचा परिणाम नव्हता, तर माणसांचे आंतरिक संबंध मुळापासून बदलत गेले आणि सामजिक ढाचा आतून बदलत गेला. आजच्या घडीला ठामपणे सांगणं कदाचित अवघड असेल, तरी पण आजूबाजूची परिस्थिती झपाट्याने बदलणार आणि आपण गृहीत धरत असलेली अनेक नाती, मग ती वैयक्तिक असोत किंवा सामाजिक, त्यात मूलभूत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक महामारी नंतर जग कसं असेल? कलानिर्मिती कशी असेल? आत्ता चालू असलेला हा झगडा नवनिर्मितीक्षम असेल काय? याच्या स्मृती कोणत्या स्वरूपात आपण जागवत राहू? साहित्य, चित्रं, फोटो, रेखाचित्रं, मीम्स या सगळ्या माध्यमातून हे टिपत असताना त्या अभिव्यक्तीमध्ये काही फरक होतो आहे का, आणि तो आज आपल्याला जाणवतो आहे का, हे येता काळच सांगू शकेल. जागतिक पातळीवर होणाऱ्या या स्थित्यंतरांमुळे येत्या काळात कलेची रूपं, त्यांची मांडणी, तिची अनुभूती अशा सगळ्याच रचना आणि तिचा अनुभव घेण्याचे आपले आखीवरेखीव समज आणि गरजा सगळंच उलटंपालटं होऊन जाईल कदाचित. पण त्याला तोंड देताना ठामपणे उभं राहाणं, आजूबाजूची अस्थिरता कवेत सामावून घेत आपल्या अभिव्यक्तीला चालना देणं, हाच विश्वास आपल्याला तारून नेऊ शकतो. हा नवनिर्मितीचा विश्वास मनात बाळगून ‘हाकारा|Hakara’ हा अंक आपल्या समोर घेऊन येत आहोत.

प्रतिमा सौजन्य: https://www.youtube.com/watch?v=cgUBLiF9LwU

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *