हाक / Call : दरम्यान | In-between
हाकारा । hākārāच्या प्रकाशनपद्धतीत आम्ही बदल करत आहोत. त्याचाच भाग म्हणून संपूर्ण अंक प्रकाशित करण्याऐवजी दरम्यान | In-between हा नवीन विभाग सादर करत आहोत.
आठवण / Memory पासून ते आमच्या पंचविसाव्या अंकातील हाक / Call पर्यंत, हाकारा । hākārāच्या प्रत्येक अंकाची सुरुवात एका विशिष्ट संकल्पनेने झाली. आम्ही त्या संकल्पनेभोवती लेखन आणि कलाकृती पाठवण्याचे आवाहन केले आणि तुमच्याकडून कसा प्रतिसाद मिळेल, याची उत्सुकतेने वाट पाहिली. प्रत्येक अंकाचे संपादन आणि संकलन करण्याचा अनुभव आमच्यासाठी आनंददायी आणि समृद्ध करणारा ठरला. तुमच्या लेखनाने आणि कलाकृतींनी आम्हाला कधी परिचित तर कधी अपरिचित प्रदेशांत नेले. कधी आश्वस्त करणाऱ्या तर कधी अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांशी आमची ओळख करून दिली. एरवी कदाचित घडल्या नसत्या अशा संवादांची दारे उघडली.
आता दरम्यान | In-between या विभागाच्या माध्यमातून आम्हाला ही हाक आणखी व्यापक करायची आहे आणि नव्या सहयोगाच्या शक्यता अजमावायच्या आहेत. त्यासाठी आम्ही अंकाची वाट न पाहता मधल्या काळात, म्हणजेच ‘दरम्यान’, साहित्य आणि कलाकृती प्रकाशित करणार आहोत. भाषा, रूपे आणि संस्कृती यांच्या दरम्यान जे घडते, ते टिपणे, हाच दरम्यान | In-between या विभागाच्या शीर्षकामागचा विचार आहे. त्यातून आपल्या बदलत्या काळाशी संवाद साधण्याची आमची इच्छा आहे.
म्हणून, दरम्यान | In-between या विभागासाठी साहित्य / कलाकृती पाठवण्याची प्रक्रिया वर्षभर खुली राहील आणि यासाठी एखाद्या विशिष्ट संकल्पनेची वाट पाहण्याची गरज नाही. एखादा अंक प्रकाशित होईपर्यंत लेखन राखून ठेवण्याचीही आवश्यकता नाही. तुमचे लेखन किंवा कलाकृती तयार झाल्यावर तुम्ही ते कधीही आम्हाला पाठवू शकता.
मराठी, इंग्रजी किंवा या दोन्ही भाषांमध्ये केलेले लेखन आम्ही स्वीकारतो.
हाकारा । hākārāमध्ये प्रकाशित करण्यासाठी आजच्या काळाशी संवाद साधणारे लेखन आणि कलाकृती आम्हाला विशेष महत्त्वाचे वाटतात. जीवनातील आनंद आणि सौंदर्य टिपणारे, भवतालाचे सूक्ष्म निरीक्षण करणारे आणि अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करणारे, तसेच विचारांच्या सीमा ओलांडणारे आणि नव्या वाटा धुंडाळणारे साहित्य आम्हाला अपेक्षित आहे. मराठी आणि इंग्रजी यांसारख्या भाषा आणि त्यांच्याबरोबर येणारी संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न तुमच्या साहित्यातून होऊ शकतो. या भाषा आपल्यासोबत कोणता सांस्कृतिक वारसा घेऊन येतात, आजच्या काळात त्यांच्यात कोणते अनुबंध निर्माण झाले आहेत, याचा शोधही त्यातून घेता येईल. अभिव्यक्तीच्या विविध रूपांचा, त्यांच्या परस्परांशी जुळणाऱ्या आणि एकमेकांना छेद देणाऱ्या सीमांचा वेध तुम्ही तुमच्या लेखनातून किंवा कलाकृतीतून घेत असाल, तर त्याचे स्वागत आहे. या अभिव्यक्तीच्या रूपांमधून आपले जग एकाच वेळी मुळांशी जोडलेले असूनही सतत बदलणारे आणि प्रवाही कसे असते, याचा विचारही तुमच्या मांडणीत असू शकतो. आजच्या संस्कृतीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या एखाद्या कलाकृतीचे किंवा साहित्यकृतीचे रसग्रहणही तुमच्या लेखनातून होऊ शकते. किंवा तुमच्या स्वतःच्या कलानिर्मितीच्या प्रक्रियेविषयीचे चिंतनही तुम्ही मांडू शकता. व्यक्ती, समाज आणि कला एकमेकांना कसे घडवत असतात, हे त्यातून उलगडू शकेल, असे आम्हाला वाटते.
तुम्ही मांडत असलेली कल्पना एखाद्या साहित्य किंवा कला रूपात पूर्णपणे अभिव्यक्त झालेली असेलच, असे नाही. प्राथमिक स्वरूपातील विचार, सर्जनशील संकल्पना किंवा सुरू असलेल्या कामाबद्दलचे प्रस्तावही आम्हाला समजून घ्यायला आवडतील. त्यांना आकार देण्याच्या प्रक्रियेत तुमच्यासोबत काम करायलाही आम्हाला आनंद वाटेल.
प्रकाशन-प्रक्रिया कशी असेल?
तुम्ही पाठवलेल्या साहित्याचे पुनरावलोकन करून आमचे संपादक-मंडळ प्रकाशनासंबंधी निर्णय घेईल. यापुढे हाकारा । hākārāमध्ये आम्ही संपूर्ण अंक प्रकाशित करणार नाही. त्याऐवजी, दरम्यान | In-between या विभागात आम्ही वेळोवेळी निवडक लेखन आणि कलाकृती प्रकाशित करू. एकत्र गुंफता येतील अशा दोन-तीन प्रकाशनयोग्य साहित्यकृती किंवा दृक्-श्राव्य कलाकृती जमल्यानंतरच हे प्रकाशन केले जाईल.
कोणत्या प्रकारांतील साहित्य किंवा कलाकृती?
सर्जनशील आणि चिकित्सक अशा विविध ज्ञानशाखांमधील संवाद अधिक समृद्ध करत राहण्याचा आमचा मानस आहे. साहित्य, सादरीकरणाच्या कला आणि दृश्यकला अशा क्षेत्रांतील कलाकृतींचे आम्ही स्वागत करतो. कला आणि संस्कृतीकडे विचारपूर्वक पाहणारे लेखनही आम्ही प्रकाशित करू इच्छितो. दृक्-श्राव्य कलाकृती, निबंध, पुस्तक परीक्षणे, अनुवाद, नाटके, कविता, कथा-कादंबरी, दृश्यरूपातील कथन आणि विविध विषयांवरील संवाद अशा अनेक स्वरूपांतील साहित्य आणि कलाकृती तुम्ही आम्हाला पाठवू शकता.
साहित्य / कलाकृती कशा पाठवाल?
दरम्यान | In-betweenसाठी तुमचे अप्रकाशित लेखन, दृश्यकला किंवा दृक्-श्राव्य कलाकृती info.hakara@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. वर नमूद केलेल्या एका किंवा अधिक मुद्द्यांशी तुमचे साहित्य किंवा कलाकृती जोडलेली असेल, तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.
तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत.
हाकारा । hākārā
***
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना
१. हाकारा | hākārā हे सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध असलेले आंतरजालावरील विद्वत्प्रमाणित द्वैभाषिक (मराठी-इंग्रजी) नियतकालिक आहे.
२. लिखित मजकूर फक्त वर्ड-डॉक्युमेंट फाईलमध्ये पाठवावा. (मजकुराच्या रचना समजण्यासाठी मजकुराची पीडीएफ फाईलही सोबत पाठवावी). इंग्रजीतील लिखित मजकूर ‘टाइम्स न्यू रोमन’ (१२ आकाराचा) टंकामध्ये, ओळींमध्ये दुहेरी अंतर ठेवलेला असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये टंकित केलेला असावा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक मांडणीत किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरुवातीला लेखन पाठवताना जरूर कळवावे.
३. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रिझोल्यूशन ठेवावा. कलाकृतीचे शीर्षक, माध्यम, आकार आणि वर्ष यांबाबतची माहिती सोबत जोडावी. जर तुम्ही कथन किंवा मालिका-स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी दृश्य कलाकृती पाठवू इच्छित असाल, तर त्यातील प्रत्येक दृश्य कलाकृतीचा आकार १००० x ६०० पिक्सेल्स असा असावा.
४. कृपया दृक्श्राव्य धारिका (फाईल) लेखनातच समाविष्ट करून पाठवू नयेत. व्हिमिओवर, यूट्यूबवर किंवा सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असलेल्या अन्य तत्सम माध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या दृक्श्राव्य कृतींचे दुवे पाठवावेत, ते आम्ही लेखनासोबत देऊ शकतो. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखकाच्या किंवा कलाकाराच्या स्वतःच्या नसतील, तर त्यांच्या मूळ स्रोताची माहिती द्यावी. प्रतिमा / दृक्-श्राव्य साधने स्वामित्वाधिकार-मुक्त स्वरूपाची असावीत; किंवा त्यांचा वापर करण्यासाठी संबंधित स्रोतांकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
५. पाठवलेल्या साहित्याच्या पुनरावलोकन-प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख, आणि आपल्या कलाकृतीविषयीचा वा लिखाणाचा गोषवारा हे सर्व सोबत जोडावे.
६. हाकारा | hākārā-कडे पाठवलेली कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, हाकारा | hākārā-चे संपादक वा संपादक-मंडळ त्यांचे पुनरावलोकन करत असलेल्या कालावधीत ते प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेले नसावे, याची काळजी घ्यावी.
७. संशोधनपर लिखित साहित्याची मर्यादा २५००-३००० शब्द इतकी असावी. असे साहित्य पाठविताना ते मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावे.
८. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा यांबाबतच्या तपशिलांची सत्यासत्यता पडताळून मगच आपले लिखाण पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवावे. तसेच, अनुवादकांनी अनुवादित मजकूर हाकारा | hākārā-मध्ये प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.
९. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाण याबाबतचा निर्णय करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल. निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला निर्णय कळवला जाईल.
१०. प्रकाशनासाठी स्वीकारलेले लिखाण वा कलाकृती यांचे संपादक पुनरावलोकन व संपादन करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.
११. लिखाणाचे वा कलाकृतीचे स्वामित्व-अधिकार संबंधित लेखकाकडे किंवा कलाकाराकडे राहतील. हाकारा | hākārā-तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्यावी. कृपया पुनःप्रकाशित मजकुरासोबत हाकारा | hākārā-चा श्रेयनिर्देश पुढीलप्रमाणे जरूर करावा :
हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून आंतरजालावर प्रकाशित होणारे नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.
१२. हाकारा | hākārā-मध्ये प्रकाशित साहित्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
१३. आपल्याला काही विचारायचे असेल किंवा साहित्य पाठवायचे असेल, तर कृपया info.hakara@gmail.com या इ-पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधावा.
१४. हाकारा | hākārā-मध्ये साहित्य / कलाकृती प्रकाशित करण्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
