हाक २२
नवी हाक: मौन : ०.२
साहित्य/कलाकृती मागविण्यासाठीची ही हाक, या आधी प्रकाशित, ‘मौन’ या विषयाला वाहिलेल्या अंकाचा विस्तार आहे. नव्या अंकासाठी, नियतकालिकातील ‘कथन’ आणि ‘दृश्यांगण’ या विभागात समाविष्ट होतील अशा साहित्य आणि /किंवा कलाकृतींचा स्वीकार केला जाईल.
मौन म्हणजे निःशब्दता, शांतता, स्तब्धता, अव्यक्त अवकाश, अबोला, शुकशुकाट किंवा सन्नाटा. मौन म्हणजे नीरवता. मौनात निर्मितीचे क्षण दडलेले असू शकतात. तिथे अलिप्ततेचा भावही लपलेला असू शकतो. विचारांच्या आणि भावनांच्या स्तरावर व्यक्तीशी किंवा भवतालाशी जोडून घेण्यासंबंधीची निरिच्छाही मौनातून व्यक्त होऊ शकते. अव्याहत व्यक्त होणाऱ्यांसमोर मौन राहणे हे आत्मविश्वासाचे प्रतीक असू शकते. पण शांत राहण्यामुळे एखादी भावना किंवा विचार दुर्लक्षिलाही जाऊ शकतो. आणि शोषणाच्या संदर्भातील मौन हे तर सत्ताधीशांविषयीच्या, शोषकांविषयीच्या भयातून जन्म घेत असते. असे मौन ही शोषणासमोर शरणागती पत्करण्याची किंवा मुस्कटदाबीकडे डोळेझाक करण्याची वृत्ती ठरू शकते. मौन स्वेच्छेने राखलेले असू शकते, तसेच ते बाहेरून लादलेले असू शकते, ते इतरांना स्वमर्जीप्रमाणे वागायला लावण्यासाठीचे शस्त्र असू शकते, किंवा गप्प राहणे ही एखाद्याची सवयही असू शकते. एकंदरीत, जे मानवी भाषेतून शब्दांकित होऊ शकत नाही, अशा अफाट भवतालातील आणि मानवी अनुभवविश्वातील गुंत्यांचे प्रतीक असणाऱ्या मौनाला समजून घेणे किंवा त्याचा अर्थ लावणे सहज शक्य नसते. ‘हाकारा’च्या एकविसाव्या आवृत्तीतून ‘मौन’ या संकल्पनेवर प्रकाश टाकण्याचा मानस आहे.
अपेक्षित साहित्य प्रकार: कथात्म साहित्य, नाट्यात्म कथनरूपे, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन, प्रवासवर्णने, दृश्यरूपात्मक अभिव्यक्ती, चित्रकृती, छायाचित्रे, चित्रपट आणि चित्रफिती, प्रयोगात्म सादरीकरणे, आणि काष्ठ, कागद इत्यादी विविध साधनद्रव्यांचे सर्जक आविष्कार.
साहित्य पाठविण्याची शेवटची तारीख : नोव्हेंबर १०, २०२४.
अंक-प्रकाशन : डिसेंबर २०२४.
साहित्य पाठविण्यासाठीच्या सूचना: साहित्य इथे पाहू शकता.
कृपया आपले साहित्य इथे दिलेल्या गूगल-फॉर्मद्वारेच पाठवावे.
इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठविणे अपेक्षित नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
आशुतोष पोतदार: संपादक, हाकारा । hākārā
पूर्वी राजपुरिया: सहयोगी संपादक, हाकारा । hākārā
लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना
१. हाकारा | hākārā हे सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध असलेले आंतरजालावरील विद्वत्प्रमाणित द्वैभाषिक (मराठी-इंग्रजी) नियतकालिक आहे. आपले लिखाण वा कलाकृती हाकारा | hākārā च्या प्रस्तावित आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. संकल्पनेला समोर ठेऊन आपले लिखाण किंवा कलाकृती नसेल; तर नवी मांडणी, नाविन्यपूर्ण रचना किंवा जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे सर्जनशील तसेच संशोधनात्मक लिखाण व कलाकृतींचा समावेश अंकात केला जाईल.
२. आपले लिखाण, कलाकृती गूगल फॉर्म भरून पाठवाव्यात.
३. लिखित मजकूर फक्त वर्ड-डॉक्युमेंट फाइलमध्ये पाठवावा (मजकुराच्या रचना समजण्यासाठी मजकुराची पीडीएफ फाईलही सोबत पाठवावी). लिखित मजकूर ‘टाइम्स न्यू रोमन’ १२ आकाराचा असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये लिहिलेला असावा. लेखकांना त्यांचा मजकूर ठराविक मांडणी किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरूवातीला लेखासोबत जरूर कळवा.
४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रिझोल्यूशन ठेवा. कलाकृतींचे शीर्षक, माध्यम, आकार आणि वर्ष याची माहिती सोबत जोडा. जर तुम्ही ‘दृश्यांगण /Panorama’ या विभागात प्रकाशित करण्यासाठी दृश्य कलाकृती पाठवू इच्छित असाल तर त्यांचा आकार १०००x६०० पिक्सल्स असावा.
५. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखक किंवा कलाकारांच्या स्वतःच्या नसतील तर त्यांच्या मूळ स्त्रोताची माहिती द्या. प्रतिमा/दृक्-श्राव्य साधने स्वामित्वाधिकार-मुक्त स्वरूपाची असावीत; किंवा त्यांचा वापर करण्यासाठी संबंधित स्रोतांकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
६. पाठवलेल्या साहित्याच्या पुनरावलोकन प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख आणि आपल्या कलाकृती वा लिखाणाचा गोषवारा सोबत जोडा.
७. हाकारा | hākārā कडे पाठवलेल्या कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, हाकारा | hākārā चे संपादक वा संपादक मंडळ त्यांचे पुनरावलोकन करत असलेल्या कालखंडात त्या प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेल्या नसाव्यात याची काळजी घ्यावी.
८. संशोधनपर लिखित साहित्याची मर्यादा २५००-३००० शब्द इतकी असावी. असे साहित्य पाठविताना ते मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावे.
९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा याबाबतच्या तपशीलांची सत्यासत्यता पडताळून मगच पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवावे. तसेच, अनुवादकांनी अनुवादित मजकूर ‘हाकारा’त प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.
१०. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाणाबाबतचा निर्णय करण्यास महिन्याभराचा कालावधी लागेल. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला निर्णय कळविला जाईल.
११. प्रकाशनासाठी स्विकारलेले लिखाण वा कलाकृतींचे संपादन व पुनरावलोकन संपादक करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.
१२. लिखाण वा कलाकृतींचे स्वामित्व-अधिकार संबंधित लेखक, कलाकारांकडे राहातील. ‘हाकारा’तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्या. कृपया पुनःप्रकाशित मजकूरासोबत ‘हाकारा’चा श्रेयनिर्देश पुढीलप्रमाणे जरूर करा. हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणारे ऑनलाईन नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.
१३. हाकारा | hākārā मध्ये प्रकाशित साहित्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.
१४. आपल्याला काही विचारायचे असेल किंवा साहित्य पाठवायचे असेल तर कृपया info@hakara.in या इ मेल द्वारे आम्हाला संपर्क साधावा.
१५. हाकारा । hākārā चा ISSN 2581-9976 असून नियतकालिकाचा समावेश विद्यापीठ अनुदान आयोग च्या (युजीसी) केअर-लिस्ट मध्ये आहे.
१६. हाकारा | hākārā मध्ये साहित्य/कलाकृती प्रकाशनासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही.